पुणे-मुंबई-पुणे - एक पुनर्नवानुभव

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
2 Feb 2017 - 12:27 pm

फारा वर्षांपूर्वी आम्ही मुंबई पुणे रेल्वे प्रवास सातत्याने करायचो. ३ तासांच्या डेक्कन क्वीन प्रवासासाठी, दोन तास रिझर्व्हेशनच्या रांगेत उभे रहाण्याचाही आम्ही विक्रम नोंदवला आहे. त्या रिझर्व्हेशन केलेल्या डब्यांत तीन्-दोन अशी बसण्याची व्यवस्था असल्याने , आम्ही सेकंड क्लासमधेही , अगदी मांडी घालून प्रवास केलेला आहे. पुढे, रेल्वेला भिकेचे डोहाळे लागल्याने, त्यांनी आमचा विश्वासघात करुन तीन्-तीन अशी बसण्याची व्यवस्था आणली. त्याचा आम्ही भरपूर निषेध केला. कारण तोपर्यंत आमची बुडे भरपूर रुंदावल्यामुळे, आमची, अंगाला अंग लागू न देण्याची ब्रिटिश सभ्यता धोक्यांत आली. पण तरीही, वरच्या वर्गाचे तिकीट काढण्याला आमचे मध्यमवर्गीय मन साथ देत नव्हते. त्यामुळे, आमचा अंग चोरुन प्रवास काही दिवस चालूच राहिला. पण एके दिवशी तो घोर प्रसंग उदभवला. पुण्याहून मुंबईला जाताना, आमचे तिकीट मध्यभागी आले. दोन्ही बाजूल दोन पुणेरी ललना आल्या. दोघींनाही, मला स्वतःला कडेला बसू द्या, अशी विनंती करुन पाहिली. पण दोघींनीही ती साफ धुडकावून लावली. खिडकीवालीला खिडकी सोडायची नव्हती आणि कडेचीला आपले स्वातंत्र्य गमावायचे नसावे. त्यामुळे, अगदी दादर येईपर्यंत, अंगाची घडी घालून बसावे लागले. चुकून डुलकी लागून जरासा स्पर्श झाल्यावर नजरेचे अंगार झेलावे लागले. घरी आल्यावर दोन दिवस अंग दुखत होते. त्या अनुभवावरुन आम्ही रेल्वे सोडली आणि एशियाडची कास धरली. पुढे, एशियाडच्याही सर्व खिडक्या वाजू लागल्यावर, नवीन आलेल्या वोल्वो कडे मोर्चा वळवला. दोन्ही बाजूला, स्टॉप, घराच्या अगदी जवळ असल्याने, तो फार सुखकर प्रवास झाला. फक्त एक, ठणठणाटी सिनेमाचा त्रास होता. पण तोही, आम्ही कानांत 'इअर प्लग्स' घालून सोडवला. असा अनेक वर्षे हा सुखाचा प्रवास चालू राहिला असता. पण, वोल्वोचे भाव डोक्यावरुन जायची वेळ आली आणि पुण्याहून निघणारी वोल्वो, हिजवडीपर्यंतच एक तास घ्यायला लागली तेंव्हा रेल्वेचा पुनर्विचार करायची वेळ आली. रिटायर झाल्यामुळे आता हीपण प्रवासांत बरोबर येणार असल्याने, व्यस्त बुडांच्या मेजॉरिटीवर तिसर्‍याला चिणता येईल, असा धूर्त विचार केला. दोन्ही वेळेची तिकीटे नेटवर काढून ठेवली.
प्रवासाच्या दिवशी, रिक्शाची मक्तेदारी मोडण्यासाठी 'ओला' मागवली. अनेक वर्षांनंतर पुणे स्टेशनवर पाय ठेवायची वेळ आल्याने, गाडी कुठल्या फलाटावर लागते, हे सुद्धा विसरुन गेलो होतो. रेल्वे किती बदलली आहे, याचा अनुभव घ्यायचा होता. पण, सुटायच्या वेळेला पंचवीस मिनिटे राहिली असतानाही, गाडी फलाटावर नव्हती. गाडी लागल्यावर अपेक्षित डबा चांगला एक फर्लांग पुढे गेलेला बघून पुनर्प्रत्ययाचा प्रथमानंद झाला. त्यानंतर प्रवास सुरु झाल्यावर, गाडीच्या लोखंडी खिडक्या, अजूनही आपला 'शाहिस्तेखान' करतात, हे पाहून रेल्वे बदलली नसल्याचा द्वितीयानंद जाहला. त्यापाठोपाठ, आतली काचेची खिडकी बंद केल्यावर, अजूनही ती कडीला न जुमानता, बायकांच्या पोटिमा पोलक्यासारखी, वरवर जातच रहाते, हाही साक्षात्कार झाला. अशा तर्‍हेने आपली रेल्वे, अजूनही आपल्या जुन्या संवयी सोडत नाही याचा आनंद झाला. (पोटिमा शब्द विआ बुवा नामक लेखकांनी शोधला असून त्याचा पूर्ण उच्चार, 'पोटावर टिचकी मारा", असा आवाजच्या दिवाळी अंकात वाचल्याचे स्मरते.) शेवटी जुन्या परंपरेनुसार गाडी पंधरा मिनिटे उशीरा पोचली. दादर स्टेशन बाहेर, टॅक्सीज उभ्या होत्या पन त्यातले कोणीच अंधेरीला यायला तयार नव्हते. (पूर्वी तर, उडी मारुन यायचे). शेवटी स्टेशन परिसराच्या बाहेर एक नॉर्मल टॅक्सीवाला भेटला. परतीच्या प्रवासातही हेच सगळे अनुभव, उलट्या क्रमाने आले त्यामुळे त्याची द्विरुक्ती टाळतो.
दोन्ही वेळेला, रेल्वेच्या सुपीक डोक्याच्या संगणकामुळे, आमची तिकीटे वेगवेगळ्या बाकांवर आली. अर्थातच व्यस्त बुडे मायनॉरिटीत गेल्याने आम्हीच 'वाटीत पुरण" झालो. पुन्हा एकदा वोल्वोचे पाय धरणे आले!!!

जीवनमानमौजमजाप्रतिक्रियाअनुभव

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

2 Feb 2017 - 12:47 pm | संजय पाटिल

खुसखुशित लेखन...

कंजूस's picture

2 Feb 2017 - 2:28 pm | कंजूस

अगागागा! काय त्या स्मार्टसिटींतल्या स्मार्ट वाहनांची नवस्था!

चिनार's picture

2 Feb 2017 - 2:38 pm | चिनार

मस्त !!!

सिरुसेरि's picture

2 Feb 2017 - 3:10 pm | सिरुसेरि

लेखात लिहिलेल्या त्रासांबरोबरच अनेकदा रेल्वे प्रवासात भिकारी विनातिकिट रेल्वे डब्यात चढतात आणी प्रवाशांना अरेरावी करतात हे बघितले आहे .

फेदरवेट साहेब's picture

2 Feb 2017 - 3:25 pm | फेदरवेट साहेब

पुणे रेल्वे स्टेशन, एक अतिशय होपलेस जागा. सोहराब हॉल कडील बाजूस तर (प्लॅटफॉर्म क्रमांक ७ का १०) उभं राहवत नसे. पेस्तन काका बावाजी म्हणत तसे त्याच प्लॅटफॉर्मवर बद्धा गाडी सुपडा साफ करते का काय अशी शंका येत असे. अगदी प्लॅटफॉर्मवर सुद्धा गुलाबाची फुले (सांकेतिक शब्द) विखुरलेली पाहिली आहेत. रेल्वेचा फलाट अन तो पाहून हागाय लागणारी इरसाल कार्टी ह्यावर कोणी रिसर्च करावा नोबेल मिळेल. पुणे स्टेशनची लायकी आता सर्वबाजूने वाढलेल्या पुण्याची सोय लावण्याइतपत उरलेली नाही. पुरंदारात ग्रीनफिल्ड का कुठलं एअरपोर्ट बांधण्यापेक्षा जर स्टेशनच नवे कुठंतरी तयार करता आले तर उत्तम सोय होईल सगळ्यांची.

एस's picture

2 Feb 2017 - 3:28 pm | एस

खी खी खी!

संजय क्षीरसागर's picture

2 Feb 2017 - 3:32 pm | संजय क्षीरसागर

भन्नाट लिहीलंय ! एकदम आवडलंं.

सुचेता's picture

3 Feb 2017 - 8:23 pm | सुचेता

अगदि

सुमीत भातखंडे's picture

2 Feb 2017 - 3:43 pm | सुमीत भातखंडे

भरिये!!

अनुप ढेरे's picture

2 Feb 2017 - 4:13 pm | अनुप ढेरे

हा हा! खिडक्यांनी केलेला शाइस्तेखान हे आवडलं. आता पहिल्या फलाटावर तरी वायफाय मिळतं. सो फुकट ईन्टरनेट वापरण्याचा आनंद मिळतो बोनस म्हणून.

रेवती's picture

2 Feb 2017 - 4:26 pm | रेवती

लेखन आवडले.

ललित म्हणून उत्तम आहे. परंतू आम्ही यावर उत्तम उपाय काढले आहेत.
१) आंध्र राज्याच्या बस:- ( AP NO वाल्या ) कुर्ला पनवेल - एक्सप्रेस वेने थेट पुणे स्टेशनला थांबतात. वाटेत शिवाजीनगरला उतरण्याचा पर्याय आहेच कारण वाकडफाडा- औंध- युनिवरसटी शिवाजीनगर मार्गे जातात. उत्म सेवा आणि बस स्वच्छ. तिकीट पन्नास रु कमी आपल्या एवेने जाणाय्रा बसपेक्षा.
२) कन्याकुमारी जयंतिजंता (16381) exp चे स्लिपरचे तिकिट काढणे. पुणे स्टे ७.४० ला पोहोचते. रेल्वेच्या डब्या कोणीही त्रास द्यायला येत नाही. मस्त पुस्तक वाचत लोळावे. पुण्याला उतरल्यावर चहा वडा घेऊनच नंतर पुढे जावे ( याला accliamatisation मी म्हणतो, मनस्ताप वाचतो.) पिएमटिने. यावेळी रिकाम्या असतात.
करून पाहा. पुणेकरही चांगले स्वागत करतील घाईने न आल्याबद्दल.

तिमा's picture

2 Feb 2017 - 5:55 pm | तिमा

धन्यवाद, दोन नंबरचा पर्याय भारी आहे.

सुबोध खरे's picture

2 Feb 2017 - 6:32 pm | सुबोध खरे

प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडीला पुणेहुन आरक्षण मिळणारा डबा असतो उदा महालक्ष्मी एक्स्प्रेस चा s ५, उद्यान एक्स्प्रेस ला S ७ इ. स्लिपरचे तिकीट काढायचे९ वेटिंग लिस्ट असली असली तरीही. आणि शांत पणे या डब्यातून प्रवास करायचा. आपल्या बापाची गाडी असल्यासारखे असते. रेल्वेचेच लोक त्यात असतात. निवृत्त होण्याअगोदर पुणे येथे असताना असा सुखात प्रवास भरपूर केला आहे. अन्यथा आरक्षण करताना खिडकीचे आरक्षण आवर्जून करत असे. ( तसे लिहून दिल्यास मिळते).
बाकी व्हॉल्वो पेक्षा रेल्वेचा वातानुकूलित कुर्सीयानाचे तिकीट स्वस्त असून बकेट सीट असल्याने दुसऱ्याला स्पर्श होत नाही. शिवाय धूळ घाण आणि आवाज यापासून रक्षण होते हा फायदा. शिवाय रेल्वे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकत नाही किंवा पुणे दर्शन करत पुण्याच्या बाहेर पडण्यास वेळ खात नाही.

Nitin Palkar's picture

2 Feb 2017 - 7:49 pm | Nitin Palkar

सुंदर लेखन!
'बायकांच्या पोटिमा पोलक्यासारखी, वरवर जातच रहाते. (पोटिमा शब्द विआ बुवा नामक लेखकांनी शोधला असून त्याचा पूर्ण उच्चार, 'पोटावर टिचकी मारा", असा आवाजच्या दिवाळी अंकात वाचल्याचे स्मरते.)'
पोटिमाची व्युत्पत्ती अचूक. त्याच बरोबर वि आ बुवांनी दंटिमा व बेंटिमा हे ही पोलक्याचे दोन प्रकार वर्णन केले होते.

१६३८१चे तिकिट दोनचार दिवस अगोदरही मिळते कारण ही फारच रटाळ गाडी आहे.

सुबोध खरे's picture

3 Feb 2017 - 8:42 pm | सुबोध खरे

साडेचारला कल्याणला आहे आणि सव्वासातला पुण्याला पोहचते. काय वाईट आहे?
त्यापेक्षा हैद्राबाद एक्स्प्रेस दुपारी १२.३० ला सीएस टी ला आहे आणि (१३.३०) दीड वाजता कल्याणला आहे आणि साडेचारला पुण्याला पोहोचते. जेवून खाऊन स्लीपर मध्ये ताणून द्यायची चहाच्या वेळेस पुण्यात.

ती गाडी पुण्यासाठी रटाळ नाही,रेनिगुंठा तिरुपति रेनिगुंठा सालेम कोइमतुर त्रिशुर कन्याकुमारि जाते त्यामुळे त्याचे तिकीट मिळते.

पैसा's picture

2 Feb 2017 - 10:31 pm | पैसा

खुसखुशीत एकदम!

सुखीमाणूस's picture

2 Feb 2017 - 10:50 pm | सुखीमाणूस

छान जमला आहे लेख

अजया's picture

2 Feb 2017 - 11:00 pm | अजया

मस्त लेख!

औरंगजेब's picture

3 Feb 2017 - 9:03 am | औरंगजेब

दुपारी ठाण्याहुन जायचे आसल्यास चेन्नै एक्सप्रेसने जावे. मस्त गाडी आहे.

बिहाग's picture

4 Feb 2017 - 10:57 am | बिहाग

आजून जास्त लिहित चला.

जव्हेरगंज's picture

4 Feb 2017 - 12:28 pm | जव्हेरगंज

मस्त!

तिमा's picture

4 Feb 2017 - 2:22 pm | तिमा

सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद.

स्वीट टॉकर's picture

18 Feb 2017 - 12:50 pm | स्वीट टॉकर

लेख मस्त जमला आहे!