सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

Once in a lifetime....!

Primary tabs

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
12 Sep 2020 - 1:35 pm

२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ?

मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच.

भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ... प्रचंड तणावाखाली कामं करणारी पोरं ,हो पोरंच कारण तिशी पण ओलांडलेली नाही त्यांनी !!
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं ....

घाईत होतो पण पेशंटच्या मुलाशी बोललो “तब्येत बरी आहे पण किमान दोन दिवस आयसीयुत ठेवून मगच निगेटिव्ह वाॅर्डात शिफ्ट करू.” त्यावर त्यानी थॅंक्यू म्हणून कडक सॅल्यूट करून जयहिंद म्हणाल्यावर मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला.

मी ज्या बिल्डींग मधे जायचो तिथले पाॅझिटिव्ह ,निगेटीव्ह आणि मृत्यु चे रोजचे आकडे पाहून येत होतो....

पहीले दोन दिवसही आशादायक आकडे होते स्वत:वरचा ताण मला बराच कमी झाल्यासारखा वाटायला लागला काही पेशंट्सला inhaler सुरू केलेलं, दोन दिवसांमधे त्यांना फरक पडलाय जे की encouraging होतं. MICU मधले दोन पेशंट निगेटिव्ह होऊन वाॅर्डात गेले , त्यांना तिथे जाऊन भेटलो तर नातेवाईकांना खूप बरं वाटलं.मी प्रत्येक वेळेस ICU मधे जाण्याआधी पेशंटचे नातेवाईक दिसल्यास बोलून जायचो आणि परत आल्यावर सविस्तर चर्चा करायचो जेणेकरून त्यांचं समाधान व्हावं आणि ICU च्या डाॅक्टरांवरचा ताण कमी व्हावा.

तिसऱ्या दिवशी ICU तून बाहेर पडलो तोच एक पेशंटची बायको जवळ येऊन म्हणाली “डाक्टरसाब हमारे शौहर को एकबार देख लिजिए गा। बहूत चिढचिढ करते है , सोते भी नही, घरमें चार साल की छोटी बच्ची है और ये यहा ॲडमिट होने के बाद हमारे घरपे कोई आता भी नही और हमसें बात तक नही करते लोग।” तिच्या सोबत जाऊन पेशंटला बघीतलं आणि ड्युटीवरच्या डाॅक्टरला औषधाबाबत सल्ला देऊन आलो. बाहेर आल्यावर तिनं मला माझं नाव विचारलं तेव्हा म्हणालो मी इथं काम करत नाही काही दिवस ड्युटीकरण्यासाठी आलोय. त्यावर तिनं इतकी दुवा दिली की पुढे मी काही बोलूच शकलो नाही.

PPE KIT हे फक्त २-२:३० तास घालून ३ वेगवेळ्या ICU चे राउंडस् घ्यायचो , अर्धे कपडे घामानी गच्च भिजून जायचे तिथले डाॅक्टर्स आणि स्टाफ ६-८ तास रोजचे गेले ५ महिने कसे राहीले असतील ह्याची कल्पनाही करवत नाही ....
12

एके दिवशी ड्युटी आटोपुन गाडीत बसतांना दोघांनी जवळ येऊन विचारलं “डाॅक्टर ऐम्ब्युलन्स मधून पाॅसिटिव्ह पेशंटला घेऊन जाता येईल का ? “ मी समजावण्याच्या सुरात म्हटलो “अहो इथे सर्वात चांगला ईलाज होतो आहे तुम्हाला दुसरीकडे कुठेही ॲडमिशन साठी बेड मिळणार नाही हो.” त्यावर त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.”

नंतर नंतर डोळ्यासमोर रोजचे होणारे मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र वेड लावायला पुरेसं होतं. पण तिथं काम कराणाऱ्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळत होतं , रोजच !! बाहेर ड्युटीवर तैनात असलेले पोलीस आणि SRPF चे जवान देखील काही न बोलता शिकवून गेले.

PPE किट घ्यायला ICU च्या सिस्टर इंचार्ज कडे जायचो , थोड्या गप्पा व्हायच्या तेव्हा त्या बोलून गेल्या “डाॅक्टर आज रात्री पावणेतीनलाच जाग आली , ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.”

३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला.

त्या परिसरात कोणताही राजकीय पक्षाचा माणूस किंवा ब्युरोक्रॅट / बाबू फिरकलेला दिसला नाही किंवा येऊन गेल्याचं ऐकलं नाही. ह्या लोकांना फक्त PPE Kit घालून ICU च्या दारात जरी उभं केलं ना तरी २-३ मिनिटात बेशुद्ध तरी होतील किंवा PPE Kit पांढऱ्याचं पिवळं करतील !!

अशक्य अश्या परिस्थितीत ही डाॅक्टर लोकं काम करत आहेत, आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये.

फाईल्स बघतांना एका ठिकाणी नोट्स मधे लिहीलेलं दिसलं की पेशंटची तब्येत अतिशय सिरिअस आहे आणि घरच्यांना फोन करून कळवण्याचा प्रयत्न केला तर कोणीही फोन रिसिव्ह करत नाहीये. आत राउंड घेतांना ती व्हेंटीलेटरवरची पेशंट बघून मला एवढंच वाटलं की जिचं कोणीच नाही तिच्यासाठी एवढी मरमर करणाऱ्या डाॅक्टरच्या मनात काय विचार येत असतील? का तिला वाचवून पुढच्या पेशंटकडे वळणाऱ्या डाॅक्टर ला विचार करायलाही वेळ मिळत नसेल ?

मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.

-डॉ.श्रीहास सु. बर्दापुरकर

मांडणीआरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनविचारसद्भावनाप्रतिक्रियालेखअनुभवमाहितीप्रश्नोत्तरेमदतआरोग्य

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

12 Sep 2020 - 1:48 pm | महासंग्राम

डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या !

सलाम

भ ट क्या खे ड वा ला's picture

12 Sep 2020 - 1:51 pm | भ ट क्या खे ड वा ला

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे.
काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही .
जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

गवि's picture

12 Sep 2020 - 1:52 pm | गवि

ब्राव्हो डॉक... सलाम.

कुमार१'s picture

12 Sep 2020 - 1:56 pm | कुमार१

मनापासून कौतुक व सदिछा !

संजय क्षीरसागर's picture

12 Sep 2020 - 2:08 pm | संजय क्षीरसागर

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.

शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

नावातकायआहे's picture

12 Sep 2020 - 3:04 pm | नावातकायआहे

दंडवत डॉक ! __/\__

शा वि कु's picture

12 Sep 2020 - 3:56 pm | शा वि कु

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2020 - 4:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब लेखन वाचून गहिरवरलो. सॅल्युट तुम्हाला.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

12 Sep 2020 - 4:37 pm | टवाळ कार्टा

_/\_

विनिता००२'s picture

12 Sep 2020 - 4:47 pm | विनिता००२

बोलायला शब्द नाहीत! शतशत नमन __/\__

चौथा कोनाडा's picture

12 Sep 2020 - 5:02 pm | चौथा कोनाडा

तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं ....

मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला.

त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.”

मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र ..

ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.”

३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला.

आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये.

मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं !
सलाम दंडवत _/\_

Gk's picture

12 Sep 2020 - 5:52 pm | Gk

छान

चौकटराजा's picture

12 Sep 2020 - 6:58 pm | चौकटराजा

पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी's picture

13 Sep 2020 - 4:38 am | रातराणी

_/\_

फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

अन्या बुद्धे's picture

13 Sep 2020 - 8:27 am | अन्या बुद्धे

दण्डवत!

ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

अन्या बुद्धे's picture

13 Sep 2020 - 8:27 am | अन्या बुद्धे

दण्डवत!

ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

सनईचौघडा's picture

13 Sep 2020 - 9:30 am | सनईचौघडा

दंडवत साहेब तुम्हाला.

हॅट्स ऑफ तुम्हाला आणि सर्व कोविड योद्ध्यांना. _/\_

सिरुसेरि's picture

13 Sep 2020 - 8:17 pm | सिरुसेरि

जबरदस्त अनुभवकथन आणी त्याग व कर्तव्य भावना . +१००

शाम भागवत's picture

13 Sep 2020 - 8:41 pm | शाम भागवत

प्रथम डोळे पुसले.
आता तुम्हां सर्वांना नमस्कार करतोय.
_/\_

कोहंसोहं१०'s picture

13 Sep 2020 - 8:41 pm | कोहंसोहं१०

तुमच्या कार्याला सलाम! धन्यवाद डॉक्टर.

तुषार काळभोर's picture

13 Sep 2020 - 9:36 pm | तुषार काळभोर

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात.
खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

फारएन्ड's picture

13 Sep 2020 - 11:18 pm | फारएन्ड

टोटल रिस्पेक्ट!

तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_

हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे.

रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

राघव's picture

14 Sep 2020 - 12:28 am | राघव

काय बोलणार.. नि:शब्द.

राघवेंद्र's picture

14 Sep 2020 - 2:17 am | राघवेंद्र

सॅल्यूट डॉक्टर साहेब !!!

सुमो's picture

14 Sep 2020 - 4:57 am | सुमो
सुमो's picture

14 Sep 2020 - 5:00 am | सुमो

कोविड योध्यांना आणि तुम्हाला दंडवत डॉ.श्रीहास.
_/\_

निनाद's picture

14 Sep 2020 - 6:10 am | निनाद

तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2020 - 11:00 am | ज्ञानोबाचे पैजार

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे.

नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन

मनःपूर्वक धन्यवाद

पैजारबुवा,

नीलस्वप्निल's picture

14 Sep 2020 - 1:01 pm | नीलस्वप्निल

सलाम डॉक्टर साहेब !!

चिर्कुट's picture

14 Sep 2020 - 1:05 pm | चिर्कुट

रिस्पेक्ट आणि सॅल्युट _/\_

डॉ श्रीहास's picture

16 Sep 2020 - 8:02 am | डॉ श्रीहास

मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय.
तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

डीप डाईव्हर's picture

16 Sep 2020 - 11:10 am | डीप डाईव्हर

प्रेरणादायी अनुभव कथन
🙏

कौतुक करावे तितके कमी आहे डॉक.
पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ .
हॅट्स ऑफ

मालविका's picture

23 Sep 2020 - 1:09 pm | मालविका

निःशब्द! सुंदर अनुभवकथन! आणि सलाम तुमच्या कार्याला!