कृतघ्न -6

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
2 May 2020 - 2:42 pm

याआधीचे भाग

भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154
भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159
भाग 3: https://www.misalpav.com/node/46183
भाग 4: https://www.misalpav.com/node/46203
भाग -5
https://www.misalpav.com/node/46261

आता पुढे..

गाडी निघाली, आणि थेट सोलापूर च्या दिशेने धावू लागली. रामदास ला बाहेर पाहायचे होते कि आपल्याला नेमके कुठे नेले जातेय, पण त्याची मान उचलली जात नव्हती. तो जिवंत तर होता पण शरीराचे सर्व अस्तित्व च संपून गेले होते. माने पासून खाली आपले शरीर तो ना पाहू शकत होता ना त्याला कंट्रोल करू शकत होता. शरीराच्या नावाखाली आपल्याजवळ आता फक्त मुंडकेच उरले आहे आणि तेदेखील कधी आपल्याला सोडून जाईल याची खात्री नव्हती. पण दिलासा देणारी गोष्ट एवढीच कि आज माऊली त्याच्याबरोबर होता. तो आपल्यासोबत आहे तर काही ना काही चांगलं होईल ही आशा त्याच्या मनात होती पण एक पश्चातापाची भावना देखील होती कि मी त्याच्यासोबत असं का वागलो.
इकडे माऊली सुद्धा विचारात हरवून गेला होता, आता नेमके पुढे काय करायचे? डॉक्टर काय सांगतील रामदास बद्दल? तो जगेल कि मरेल..?
पुणे ते सोलापूर असा जवळपास 4-5 तासाचा प्रवास संपवून गाडी सोलापूर शहरात पोहचली. सोलापूर हे माउलीचे दुसरे घर होते, आयुष्यातील जवळपास 30 वर्षे त्याने इथे घालवली होती. इथे त्याचे घर, दुकाने आणि थोडीफार प्रॉपर्टी होती..
हे तेच सोलापूर होते जिथे एके काळी माऊली बस स्थानकावर उपाशी झोपला होता. त्याच बस स्थानकावर एक वडापाव खाण्याइतपत देखील पैसे माऊलीच्या खिश्यात नव्हते. पण नंतर माऊलीने त्याच बस स्थानकाचा इन्चार्ज होऊन दाखवले होते. फक्त बसेस नव्हे तर त्या स्थानकात असणारी सर्व दुकाने देखील त्याच्या अधिकारात होती. हे सर्व फक्त त्याच्या मेहनतीने आणि आई तुळजाभवानी वरील श्रद्धेने शक्य झाले होते. इतका मोठा अधिकारी झाल्यानंतर सुद्धा माउलीने अध्यात्माची कास सोडली नव्हती. आजकाल लोकं थोडासा पैसा, यश किंवा प्रसिद्धी मिळाली कि मीपणा आणि अहंकार यात गुरफटून जातात, परमेश्वराला आणि अध्यत्माला अडगळीत फेकून देतात पण माऊली तसा नव्हता. वाईट आणि चांगल्या दोन्ही वेळेतदेखील माउलीचे पाय जमीनीवर च होते. आज सोलापुरातील घर, दुकाने, व्यवसाय हे सर्व माउलीने शून्यातून उभे करून दाखवले होते......

5 तासाच्या प्रवासानंतर गाडी डॉक्टर जोशींच्या हॉस्पिटल मध्ये पोहचली.
डॉक्टर जोशी हे माऊलींचे जवळचे मित्र आणि एक निष्णात डॉक्टर. फक्त MBBS असले तरी एखाद्या MD किंवा सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर ला देखील न जमणाऱ्या केसेस त्यांनी आजपर्यंत यशस्वी रित्या हाताळल्या होत्या.
बऱ्याच दिवसांनी आज माऊली आणि डॉक्टर जोशी भेटले होते. माउलींनी झालेला सर्व प्रकार जोशींना सांगितला आणि रामदास ला त्यांच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.

डॉक्टरांनी फटाफट मागचे सगळे रिपोर्ट पाहिले आणि लक्षणांवरून त्यांना अंदाज आला कि नेमके काय झालेय.
माउलीला त्यांनी कन्सल्टिंग रूम मध्ये बोलावले.

"मला असे वाटतेय कि this is case of Guillain-Barre syndrome. हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे ज्यामध्ये
एका विशिष्ट इन्फेक्शन मुळे आपल्या शरीरातील immune सिस्टिम स्वतः च शरीरातील nevers वरती अटॅक सुरु करते. त्यामुळे शरीरातील नर्वस सिस्टिम हळूहळू कोलॅप्स होऊ लागते. मेंदूकडे शरीरातील कोणत्याही संवेदना पोहचत नाहीत. त्यामुळे शरीरातील सर्व अवयव प्यारलाईज होऊन त्यावरील सर्व कंट्रोल मेंदू गमावून बसतो. लाखातून एखाद्याला, किंवा मी तर म्हणेन कि 10-15 लाखातून एखाद्या माणसाला हा आजार होतो,. त्यामुळे या अजराबाबत समाजामध्ये आणि त्याचबरोबर डॉक्टरामंध्येही म्हणावी तितकी माहिती नाहीये. "

पण डॉकटर रामदास ला हा आजार कश्यामुळे झाला? कारण तो गावाच्या वातावरणात राहिलेला माणूस, शुद्ध हवा पाणी आणि रोजची अंगमेहनत असून सुद्धा हा आजार त्याला का? माउलीने आपली शंका विचारली.

"हा आजार नेमका कश्यामुळे होतो याबाबत शास्त्रज्ञांमध्ये अजूनदेखील मतमतांतरे आहेत. यावर संशोधन अजूनही सुरु आहे. पण काही गोष्टी जसे कि शरीरातील जुने इन्फेक्शन, किंवा श्वसनसंस्थेतील इन्फेक्शन किंवा आपल्या पचन संस्थेतील इन्फेक्शन मुळे हा आजार होतो. कधी कधी अर्धे शिजवलेलं मांस किंवा कच्चे चिकन खाल्यामुळे देखील इन्फेक्शन होऊन हा आजार होऊ शकतो. कधी कधी एखादया लसीकरणातून देखील शरीरात इन्फेक्शन होऊन हा आजार होऊ शकतो. आता यामधले नेमके कारण शोधणे अवघड आहे. तसेच हे इन्फेक्शन त्याला कधी झाले होते हे शोधणे देखील अवघड आहे. "

डॉक्टरांचे म्हणणे माउली शांतपणे ऐकत होता. पण
चिकन हा शद्ब ऐकताच माउलीला समजले कि नेमके काय झालेले असू शकत. कारण थोड्याच दिवसापूर्वी रामदास ने शेतात पोल्ट्री मधून आणलेले खत विस्कटण्याचे काम केले होते आणि त्यानंतर आजारी पडण्याच्या आधल्या दिवशी देखील हेच खत माऊलीच्या शेतातून उचलून तुकाराम च्या शेतात टाकण्याचे काम केले होत.. कदाचित त्यामुळेच तर त्याला कुठे संसर्ग झाला नसेल?? माउलीने ही शक्यता लक्षात घेऊन, आत्तापर्यंत घडलेला सर्व प्रकार डॉक्टरांना सांगितला.

"हे कारण देखील असू शकत, हा आजार घडवणारे बॅक्टरीया आपल्या शरीरातील एखाद्या जखमेतून देखील आपल्या शरीरात येऊ शकतात. आणि रामदास च्या केसमध्ये हेच झाले असण्याची जास्त शक्यता आहे. पण कोणतेही कारण आपण 100% prove करू शकत नाही. बहुतांश केसेस मध्ये तर डॉक्टर आणि पेशंट दोघांनाही हा आजार कश्यामुळे झाला याची माहिती नसते. "

मग डॉक्टर यावर उपाय काय?? आता पुढे काय करायचं?

"पहिल्यांदा मला हे कन्फर्म करू दया कि हा गिया बेरी सिंड्रोम आहे कि नाही. आत्तापर्यंत समोर आलेल्या लक्षणावरून तरी हेच वाटतेय.
रामदास च्या शरीरातुन मणक्याच्या जवळ एका छोटयाश्या सुईने छिद्र पडून Cerebrospinal fluid चा नमुना काढून तो टेस्ट करावा लागेल. टेस्ट झाल्यावरच समजेल कि त्याला नेमका कोणत्या प्रकारचा गिया बेरी सिन्ड्रोम झाला आहे. या आजारामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यावरून आपल्याला पुढे कोणती ट्रीटमेंट द्यायची हे ठरवावे लागेल. पण हे लक्षात असुद्या कि ट्रीटमेंट कोणतीही असूदेत पण हा आजार असा नाहीये कि आज औषधं दिल आणि उद्या किंवा काही दिवसात रुग्ण बरा झाला. ह्या आजारातून बाहेर पडायला काही महिने किंवा काही वर्षे पण लागू शकतात. "

काही वर्षे???? इतका वेळ???
आणि तेही ठीक आहे पण यातून रामदास बरा होईल? त्याची पूर्णपणे बरा होण्याची किती शक्यता आहे? माऊली ने सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला.

" हे बघा माऊली, मी स्पष्ट च सांगतो, या आजारातून फार कमी लोक पूर्णपणे बरे होतात. आणि ते ठीक झाले तरीही अगदी पाहिल्यासारखं जिवन ते जगु शकत नाहीत. थोडी ना थोडी शारीरिक उणीव ही राहतेच. शरीर आपली थोडी ना थोडी तरी ताकद गमावते. आणि हा आजार लॉन्ग टर्म आजार असल्याने एकाच जागी रुग्ण अंथरुणाला खिळून राहतो त्यामुळे शरीरात इतर कॉम्प्लिकेशन होतात. काही वेळेला तर फक्त बेड सोअर्स मुळे देखील रुग्ण दगावतात.
रामदास च्या बाबत बोलायचं तर त्याची एकंदरीत परिस्थिती आणि वय पाहता तो या आजारातून पूर्णपणे बरा होण्याची खूप कमी शक्यता आहे. "

खूप कमी?? म्हणजे किती?? माउलीच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे भाव आले होते.

" वेल.. खूप कमी म्हणजे फक्त 5 ते 7 टक्के.
मी किंवा कोणत्याही इतर डॉक्टर ने प्रयत्न केले तरी मला अस वाटत कि रामदास यातून बाहेर पडण्याची शक्यता फक्त 5-7 टक्के एवढीच आहे. "

माऊली हादरला. रामदास तसा त्याचा कोणताही रक्ताचा नातेवाईक नव्हता पण इतके दिवस ज्याने आपल्यासोबत या घरासाठी काम केले तो रक्ताच्या नात्यापॆक्षा कमी देखील नव्हता. त्यामुळे तो त्याच्यासाठी काहीही करायला तयार होता...
पण फक्त 5 ते 7 टक्के?? उद्या जर रामदास च काही बरंवाईट झाल तर गावातील लोक मलाच दोषी ठरवतील. तुकाराम तर सगळा आरोप माझ्यावरच ठेवेल कि मीच रामदास च्या मृत्यूला कारणीभूत ठरलो..आणि त्याची मुले देखील मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील. आजच्या घडीला भलेही रामदास ला कोणीही वाली नाहीये पण तो मेल्यावर त्याचे शंभर वाली तयार होतील आणि सर्व प्रयत्न करून देखील फक्त मलाच रामदास च्या मृत्यूचे कारण ठरवले जाईल. हे सर्व करण्यात गावातील लोक किती पटाईत असतात हे माऊली जाणून होता..

पुढे काय करायचं या प्रश्नाने माऊली पूर्णपणे हवालदिल झाला होता.

ठीक आहे डॉक्टर तुम्ही त्याची टेस्ट करून घ्या, टेस्ट चे रिपोर्ट आले कि आपण रामदास च पुढे काय करायचं याचा निर्णय घेऊ.
हताशपणे माऊली कन्सल्टिंग रूम मधून बाहेर आला. पुढे काय करायचे या विवंचनेत...!!

क्रमश :

धोरणमांडणीकथामुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचारसमीक्षालेखअनुभवमतसल्लाप्रश्नोत्तरेआरोग्य

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

3 May 2020 - 3:03 pm | योगी९००

मस्त रंगतेय गोष्ट बाप्पू...

कुमार१'s picture

3 May 2020 - 3:16 pm | कुमार१

छान !

बाप्पू भाग लवकर येउद्यात !!!

बाप्पू's picture

23 May 2020 - 11:07 am | बाप्पू

पुढील भाग

https://www.misalpav.com/node/46885