या लेखमालेत कालानुक्रमे पुढे जात आपण २१व्या शतकात पोचलो आहोत. या लेखात २००८ च्या पुरस्काराची माहिती घेऊ. हा पुरस्कार २ वेगळ्या संशोधनांसाठी विभागून दिला गेला. ही दोन्ही संशोधने विषाणूंच्या शोधांसाठी झाली होती. ते विषाणू आहेत HIV आणि HPV. या लेखात आपण फक्त HIV या बहुचर्चित विषाणूच्या शोधाचा आढावा घेणार आहोत. या संदर्भातले नोबेल हे खालील दोघांत विभागून दिले गेले.
विजेते संशोधक : Françoise Barré-Sinoussi आणि Luc Montagnier
देश : दोघेही फ्रान्स
संशोधकांचा पेशा : विषाणूशास्त्र
संशोधन विषय : HIV चा शोध
या विषाणूचे पूर्ण नाव Human Immunodeficiency Virus ( HIV) असे आहे. त्याच्या संसर्गाने जो गंभीर आजार होतो त्याला Acquired Immune Deficiency Syndrome (AIDS) असे म्हणतात, हे प्राथमिक ज्ञान एव्हाना बहुतेकांना आहे. गेल्या ३७ वर्षांत या आजाराने सामाजिक आरोग्यविश्व अक्षरशः ढवळून काढले आहे. सुरवातीचे त्याचे भयंकर स्वरूप बघता त्याबद्दलची जनजागृती करणे आवश्यकच होते आणि ती अनेक माध्यमांतून करण्यात आलेली आहे. एड्सचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकविश्वाच्या जोडीने अनेक समाजसेवी संस्थाही मोलाचे योगदान देत आहेत. HIVचा शोध आणि एड्सची कारणमीमांसा हा वैद्यकीय संशोधनातील अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणता येईल. त्यासाठी दिले गेलेले नोबेल हे यथोचित आहे. या सगळ्याचा आढावा या लेखात घेत आहे.
२०व्या शतकाच्या पूर्वार्धात संसर्गजन्य आजारांनी समाजात थैमान घातले होते. हे आजार विविध जिवाणू व विषाणूंमुळे होतात. त्यामुळे तत्कालीन संशोधनाचा भर त्या आजारांवरील उपचारांवर केंद्रित होता. त्यातून निर्माण झालेल्या जंतूविरोधक औषधांनी ते आजार बऱ्यापैकी नियंत्रणात आणले. १९७०चे दशक संपताना बरेच संसर्गजन्य आजार आटोक्यात आले होते. प्रगत देशांत तर असा समज झाला होता की असे आजार हे जवळपास दुर्मिळ झालेले आहेत आणि इथून पुढे आपण सूक्ष्मजंतूंची फारशी काळजी करण्याचे कारण नाही ! पण या समजाला एक फार मोठा धक्का लवकरच बसणार होता.
सन १९८१मध्ये अमेरिकेत काही रुग्णालयांत एका विशिष्ट प्रकारचे रुग्ण एकगठ्ठा आढळले. ते समलिंगी पुरुष होते आणि त्यापैकी बहुतेक जण इंजेक्शनद्वारा अमली पदार्थ नियमित घेत असत. त्यांना एका दुर्मिळ प्रकारच्या न्यूमोनियाने ग्रासले होते. एरवी हा आजार आपली प्रतिकारशक्ती प्रचंड ढासळली असताना होतो. त्यामुळे असे रुग्ण हे डॉक्टरांच्या कुतुहलाचे विषय ठरले. त्यानंतर काही काळाने काही समलिंगी पुरुषांना त्वचेचा एक दुर्मिळ कर्करोग (sarcoma) झालेला आढळला.
यथावकाश या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यांचा आजार दीर्घकालीन असल्याचे दिसू लागले तसेच त्यांची प्रतिकारशक्ती वेगाने ढासळत असे.त्यतून त्यांना अनेक जंतुसंसर्ग होत. त्यामुळे या आजाराची दखल आरोग्यसेवेतील सर्वोच्च केंद्राकडून घेतली गेली आणि या रुग्णांच्या देखभालीसाठी विशेष वैद्यकीय पथके स्थापन झाली. सुरवातीस या आजाराला "Gay-related Immune Deficiency" (GRID) असे नाव दिले गेले. अन्य एक नाव देखील पुढे आले आणि ते होते “4 H आजार”. त्यातील एक H हा होमोसेक्शुअलसाठी तर दुसरा H हेरोईन-व्यसनाचा निदर्शक होता.
आता संशोधकांचे प्रथम लक्ष्य होते ते म्हणजे या गूढ आजाराचे कारण शोधून काढणे. सुरवातीस काहींनी फंगस वा विशिष्ट रसायने ही या आजाराची कारणे असावीत असे मत मांडले. तर काहींनी हा ‘ऑटोइम्यून’ आजार असावा जो रक्तातील पांढऱ्या पेशींचा नाश करतो, असा तर्क केला.
मग १९८२मध्ये पॅरीसमधील एका रुग्णालयात यावर झटून काम सुरु झाले. त्यात Luc यांचा पुढाकार होता. हा आजार बहुधा एका विषाणूमुळे होत असावा असा काही संशोधकांचा अंदाज होता. मग Luc, Françoise आणि अन्य काही विषाणूतज्ञांचा चमू यासाठी कामास लागला. त्यांनी संबंधित रुग्णांच्या कसून तपासण्या चालू केल्या. या रुग्णांच्या ‘लिम्फ ग्रंथी’ वाढलेल्या होत्या. त्यांची सूक्ष्म तपासणी केल्यावर त्यात एक खास विषाणू आढळला आणि त्याला LAV असे नाव तात्पुरते दिले गेले (L= lymph). आता हा विषाणू आणि त्या रुग्णांचा खंगवणारा आजार यांचा कार्यकारणभाव लवकरच सिद्ध झाला.
मग असेही लक्षात आले की हा आजार फक्त समलिंगी लोकांपुरता मर्यादित नाही. म्हणून सखोल विचारांती जुलै १९८२मध्ये त्याचे अधिकृत नाव ‘एड्स’ असे ठरवण्यात आले. नंतर संबंधित विषाणूवर अधिक संशोधन झाले आणि त्याची १-२ नामांतरे होत अखेर HIV या नावावर १९८६मध्ये शिक्कामोर्तब झाले. हा विषाणू ‘रेट्रोव्हायरस’ या विशिष्ट गटात मोडतो आणि त्याचे २ मुख्य प्रकार असतात. तो रक्तातील लिम्फोसाईट्स या पेशींवर हल्ला करतो. परिणामी आपल्या प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते. हा संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीस एड्स ‘आजार’ होतोच असे नाही; हे शरीरातील विषाणूंच्या एकूण संख्येवर (viral load) अवलंबून असते. ती विशिष्ट संख्या ओलांडल्यावर मात्र आजार होतो.
संशोधनाच्या पुढच्या टप्प्यात एड्सच्या प्रसारावर लक्ष केंद्रित केले गेले. ज्या व्यक्तीस HIVचा संसर्ग झाला आहे तिच्याद्वारा विषाणूचे संक्रमण अन्य व्यक्तीत होऊ शकते. मात्र त्यासाठी बाधित व्यक्तीच्या शरीरातील खालीलपैकी कशाचा तरी थेट संपर्क दुसऱ्या व्यक्तीस व्हावा लागतो:
१. रक्त : यात दूषित रक्तसंक्रमण किंवा इंजेक्शनची सुई वा सिरींज शेअर करणे हे प्रकार येतात.
२. वीर्य आणि गुदद्वारातील अथवा योनीतील द्रव : हे सर्व असुरक्षित संभोगातून येते.
३. मुलास जन्म देताना किंवा स्तनदा मातेचे दूध तिच्या बाळास पाजतानाचा संपर्क.
मुळात हा खतरनाक विषाणू माणसात आला कुठून याचे संशोधकांना कुतूहल होते. हा शोध घेता त्याचे मूळ मध्य व पश्चिम आफ्रिकेत सापडले. तेथील चिम्पान्झी आणि अन्य काही माकडांना त्याचा संसर्ग होतो. २०व्या शतकाच्या मध्यात या प्रदेशांत माणसे वृक्षतोडीसाठी ट्रकने जाऊ लागली. त्या दरम्यान ती तेथील वन्य जिवांच्या शिकारी आणि त्यांचे मांसभक्षण करू लागली. त्यातूनच कधीतरी एखाद्या HIV संसर्ग झालेल्या मांसातून हा विषाणू माणसाच्या संपर्कात आला. अशा तऱ्हेने बाधित झालेल्या माणसातून तो समाजात आला आणि पुढे जगभर फैलावला.
वैद्यकाच्या इतिहासात एड्स प्रथम आढळल्याची अधिकृत नोंद १९८१मध्ये अमेरिकेत झाली आहे. पण, त्याचा पूर्वव्यापी (retrospective) शोध घेता असे वाटते की असा पहिला रुग्ण १९६६मध्येच नॉर्वेत आढळला असावा.
आता थोडे प्रस्तुत संशोधकांबद्दल. Francoise या विदुषी फ्रान्सच्या रहिवासी. सामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या. त्यामुळे त्यांना स्वस्तात आणि लवकरात लवकर पूर्ण होणारे शिक्षण घ्यावे लागले. पुढे अगदी अपघातानेच त्या पॅरीसमधील प्रतिष्ठित पाश्चर संस्थेत एक स्वयंसेवक म्हणून दाखल झाल्या. नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. १९७५मध्ये स्वतःची पीएचडी पूर्ण केली आणि तनमन अर्पून विषाणूशास्त्रातील संशोधनास वाहून घेतले. हा पुरस्कार हे त्याचेच फलित.
Luc M हेदेखील फ्रान्सचे रहिवासी. त्यांनी विज्ञान व वैद्यकशास्त्र अशा दोन्ही शाखांतील शिक्षण घेतले आहे. या संशोधनादरम्यान ते पाश्चर संस्थेत ज्येष्ठ वैज्ञानिक होते. त्यांच्या नेतृत्वाखालील चमूने अथक परिश्रम करून हा शोध लावण्यात यश मिळवले. पुढे १९९३मध्ये त्यांनी एड्सच्या संशोधन व प्रतिबंधासाठी जागतिक संस्था स्थापन केली आहे. या कार्याबद्दल ते अनेक मानसन्मानांचे मानकरी आहेत.
या बहुमूल्य मूलभूत संशोधनानंतर HIV व एड्सच्या संदर्भात वैद्यकात अफाट संशोधन झाले. संबंधित रोगनिदान रक्तचाचण्या विकसित झाल्या. त्या अधिकाधिक सोप्या होत गेल्या. त्यांचे निष्कर्ष त्वरीत मिळू लागले.
पुढच्या टप्प्यात रोगोपचारासाठी विविध विषाणूविरोधी औषधांचे शोध लागले. आजच्या घडीला अशी अत्यंत प्रभावी औषधे उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्या जोडीला अशा रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे हा आजार आटोक्यात येत आहे.
१९८०- ९० च्या दरम्यान एखाद्याला एड्स झाला म्हणजे “आता सगळे संपले, तो खात्रीने मरणार” अशी काहीशी परिस्थिती होती. आज त्याचे उपचार व प्रतिबंध यावर भरपूर लक्ष दिल्याने परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. योग्य उपचार घेतल्यास अशा रुग्णांचा जगण्याचा कालावधी बराच वाढलेला आहे. थोडक्यात, ‘नियंत्रणात ठेवता येणारा (treatable) आजार’ असे एड्सचे आजचे स्वरूप आहे. मात्र समाजमनात त्याकडे एक कलंक म्हणून बघण्याचा दृष्टीकोन अजूनही दिसून येतो. त्याचे उच्चाटन करणे गरजेचे आहे आणि ते आपण सर्वांनी मिळूनच करायचे आहे. भविष्यात नवनवीन प्रभावी औषधांनी HIVचे समूळ उच्चाटनही कदाचित होऊ शकेल. पण, त्याचबरोबर समाजमनातील ‘विषाणू’ही नष्ट व्हायला हवा.
‘HIV आणि एड्स’ हा खरोखर एखाद्या प्रबंधाचा विषय आहे. त्याची सखोल माहिती देणे हा या लेखाचा उद्देश नाही. या विषाणूचा मूलभूत शोध आणि संबंधित संशोधकांचे योगदान एवढीच या लेखाची व्याप्ती आहे. २००८च्या या नोबेलविजेत्या द्वयीस अभिवादन करून हा लेख पुरा करतो.
*************************************************
प्रतिक्रिया
17 Dec 2018 - 9:03 am | कुमार१
मा सा सं
यांना विनंती
17 Dec 2018 - 12:29 pm | वन
ही मालिका रंगतदार होत आहे. अनेक धन्यवाद.
हा विषाणू ‘रेट्रोव्हायरस’ या विशिष्ट गटात मोडतो आणि त्याचे २ मुख्य प्रकार असतात. >>>>>
या दोन प्रकारांच्या तीव्रतेत काही फरक असतो का?
17 Dec 2018 - 1:24 pm | कुमार१
वन,आभार.
HIV-१ च्या तुलनेत २ हा कमी आक्रमक असतो. २ मुळे झालेल्या संसर्गातून एड्सकडे मार्गक्रमण हळू होते. तसेच त्याची प्रसार करण्याची क्षमता १च्या तुलनेत काहीशी कमी असते.
17 Dec 2018 - 5:17 pm | वन
माहितीबद्दल धन्यवाद.
पु भा प्र
17 Dec 2018 - 10:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.
18 Dec 2018 - 1:52 pm | सुधीर कांदळकर
असा विषय अतिशय सोप्या भाषेत मांडलात. धन्यवाद. तरी अनेक प्रश्नांनी डोकी वर काढलीच. व्हायरस आणि रिट्रोव्हायरस यातील फरक ठाऊक नाही.
रच्याकने: सुप्रसिद्ध विज्ञानसाहित्यिक आयझॅक अॅसिमॉव्ह यांना हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर दिल्या गेलेल्या रक्तातून या रोगाच्या विषाणूचा संसर्ग झाला होता.
18 Dec 2018 - 2:51 pm | कुमार१
विषाणूंचे दोन प्रकार असतात: DNA-v व RNA-v.
१. DNA-v हा मूलभूत तत्वानुसार चालतो. म्हणजे त्यापासून पेशींचा RNA व पुढे प्रथिने तयार होतात.
२. RNA-v हा ‘उलट्या डोक्याचा” आहे ! म्हणजे त्यापासून DNA तयार होतो. त्यासाठी त्याच्याकडे एक विशिष्ट एन्झाइम (reverse transcriptase) असते. इथे पेशींचे मूलभूत तत्व चक्क उलटे होते.म्हणून तो झाला retrovirus
19 Dec 2018 - 12:48 pm | टर्मीनेटर
मालिकेतील हा लेखही छानच.
याच बरोबर
मध्य व पश्चिम आफ्रिकेतील जंगली जमाती/आदिवासी लोकांमध्ये पुरुषांची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी माकडांचे रक्त जननेंद्रियावर लावण्याच्या अंधश्रद्धेतून या विषाणूंचा संपर्क मानवाशी आला, आणि अशा बाधित व्यक्तींशी आलेल्या शरीरसंबंधांमुळे त्याचा उर्वरित जगात प्रसार झाल्याचेही वाचनात आले होते.
लेख आवडला, पुढील लेखनास शुभेच्छा!
20 Dec 2018 - 11:00 am | हरवलेला
"वन्य जिवांच्या शिकारी आणि त्यांचे मांसभक्षण" हे आफ्रिकेत नवीन नाही. हजारो वर्षांपासून तेथील आदिवासी जमाती हे करत आहेत. पण त्यांना "HIV" ची लागण होण्यास विसावे शतक उजाडावे लागले. हे कारण पटण्यासारखे नाही. तसेच त्यांच्या "अंधश्रद्धा" ही नवीन नाहीत.
"AIDS" ही लिंक मांसभक्षण हेच कारण स्पष्ट करते. पण बाकीचे प्रश्न अनुत्तरित राहतात. आफ्रिकेतील रोगांच्या इतिहासाच्या अभ्यासाची गरज आहे. तसेच जर १९ व्या शतकाच्या आधी एड्स मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे अवशेष मिळाले तर मांसभक्षण या तर्काला पुष्टी मिळेल.
20 Dec 2018 - 12:15 pm | कुमार१
कदाचित असेही असेल. तेव्हाही या रोगाने माणसे मरत असतील. पण, तेव्हा सध्याच्या रोगनिदान पद्धती नसल्याने त्या रोगाला ‘नाव’ दिले गेले नाही.
असे अन्य काही रोगांच्या बाबतीतही लागू आहे .
20 Dec 2018 - 1:06 pm | वन
मला एक शंका आहे.
अन्नातून तर एच आय व्ही चा प्रसार होत नाही. मग “मांसभक्षण” हे कारण कसे होऊ शकेल?
20 Dec 2018 - 1:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
HIV विषाणू...
१. हा विषाणू निरोगी त्वचा/श्लेष्मल त्वचा यांना भेदू शकत नाही. त्यामुळे, त्यांच्यावर पडलेल्या दुषित रक्त अथवा इतर शारिरीक स्त्रावांमुळे (वीर्य, थुंकी, इ) संसर्ग होत नाही. मात्र, त्वचेवर/श्लेष्मल त्वचेवर व्रण असल्यास तो त्यामार्गे रक्तात पोचून आजार निर्माण करू शकतो.
२. हा विषाणू उष्णतेने नष्ट होतो. त्यामुळे, शिजवलेले दुषित मांस (किंवा इतर कोणतेही शिजवलेले दुषित अन्न) खाल्ल्यामुळे त्याचा संसर्ग होऊ शकत नाही. मात्र, दुषित कच्चे मांस खाणार्या माणसाच्या तोंड अथवा जठरात व्रण असल्यास त्याला संसर्ग होऊ शकेल.
20 Dec 2018 - 2:06 pm | कुमार१
धन्यवाद. हेच लिहायला आलो होतो आणि तुमचा सुयोग्य प्रतिसाद दिसला.
वेगळ्या शब्दात :
या विषाणूचा प्रसार हा थेट रक्तामार्फत(blood borne) होतो. "अन्नातून (food borne) "नाही.
20 Dec 2018 - 2:09 pm | कुमार१
धन्यवाद. हेच लिहायला आलो होतो आणि तुमचा सुयोग्य प्रतिसाद दिसला.
वेगळ्या शब्दात :
या विषाणूचा प्रसार हा थेट रक्तामार्फत(blood borne) होतो. "अन्नातून (food borne) "नाही.
20 Dec 2018 - 3:20 pm | वन
डॉ सुहास म्हात्रे व डॉ कुमार १,
उत्तरा साठी अनेक धन्यवाद. या धाग्यावरील आणि लेखमालिकेतील चर्चेमुळे खूप उपयुक्त माहिती मिळत आहे.
20 Dec 2018 - 10:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
HIV विषाणूपिडित व्यक्तीचे रक्त अथवा इतर जैवद्रव (बायॉलॉजिकल फ्लुइड्स; उदा: semen, pre-seminal fluid, rectal fluid, vaginal fluid, saliva, इत्यादी) दुसर्या व्यक्तीच्या रक्तात मिसळले तरच केवळ HIV संक्रमित होतो.
उदा : असुरक्षित यौनसंभोग, गुदसंभोग, विषाणू बाधित व्यक्तीने वापरलेल्या सुईने नशेची औषधे टोचून घेणे, विषाणूयुक्त रक्तदान/रक्तसंक्रमण, तोंडात व्रण असलेल्या पिडीत व्यक्तीचे उघड्या तोंडाने दीर्घ चुंबन, इ.
याशिवाय, शरीरात जास्त प्रमाणात विषाणू असलेल्या स्थितीत मातेच्या दुधातून तो बाळामध्ये संक्रमित होण्याची शक्यता असते. या संक्रमणाविषयी अजून संभ्रम आहेत. सद्या तरी धोकाप्रतिबंध म्हणून अश्या प्रकारच्या मातांनी मुलाला स्तनपान करू नये असा सल्ला आहे.
स्पर्श करणे, अश्रू/लाळ पुसणे, बाजूला बसणे, एकत्र खाणे-पिणे, कपाळ/गालाचे चुंबन, तोंड बंद ठेवून घेतलेले ओठांचे चुंबन, एकच बाथरूम वापरणे, हवा, पाणी, पाळीव प्राणी, कीटक, इत्यादींमुळे HIV चे संक्रमण होत नाही.
21 Dec 2018 - 9:51 am | कुमार१
तोंडात व्रण असलेल्या पिडीत व्यक्तीचे उघड्या तोंडाने दीर्घ चुंबन, इ. >>>>>
एक शंका बरेच दिवस मनात आहे.
आपण काही चित्रपट व मालिकांत अशी चुंबनदृश्ये पाहतो. ती चित्रित करताना संबंधित कलाकारांना एकमेकाबद्दल (बाधित नसल्याची) खात्री असते का? का ते फिकीर करत नाहीत?
21 Dec 2018 - 5:29 pm | हरवलेला
चुंबनाद्वारे HIV अतिशय दुर्मिळ आहे. आतापर्यंत एकच केस आढळून आली आहे.
संदर्भ : १. article
२. CDC
21 Dec 2018 - 5:58 pm | कुमार१
हरवलेला, धन्यवाद.
सदर दोन्ही लेख वाचले. म्हणजे अशा प्रकारे चुंबन घेणाऱ्या जोडीत:
१. एकाला संसर्ग झालेला असणे, आणि
२. दोघांच्याही तोंडात जखमा असणे आवश्यक आहे .
तरच पहिल्याच्या रक्तातून लाळेत व पुढे दुसऱ्याच्या लाळेतून रक्तात असा तो प्रसार होईल.
23 Dec 2018 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
चुंबनाद्वारे HIV अतिशय दुर्मिळ आहे. आतापर्यंत एकच केस आढळून आली आहे.
आजाराच्या संक्रमणाची एखादी पद्धत किती दुर्मिळ आहे, यापेक्षा तो असाध्य आणि/अथवा गंभीर आहे की नाही* , हे परिणामांच्या दृष्टीने फार फार जास्त महत्वाचे असते. कारण, संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी ज्याला आजार होतो, त्या व्यक्तिला १००% गंभीर धोका होतो... तेथे आकडेवारी (statistics) कामी येत नाही !
=========
* प्रस्थापित झालेला HIV संसर्ग पूर्ण बरा (cure) होत नाही. फक्त, योग्य वेळी निदान झाल्यास, त्याला antiretroviral औषधे वापरून, ताब्यात ठेवता (control ) येते.
23 Dec 2018 - 12:42 pm | कुमार१
म्हणूनच संपर्काचे धोक्याचे मार्ग टाळलेलेच बरे .
25 Dec 2018 - 5:54 am | हरवलेला
सहमत
19 Dec 2018 - 12:53 pm | कुमार१
आदिवासी लोकांमध्ये पुरुषांची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी माकडांचे रक्त जननेंद्रियावर लावण्याच्या अंधश्रद्धेतून या विषाणूंचा संपर्क मानवाशी आला >>>>>
बाप रे ! काय भयानक समजुती असतात.
असो.
अभिप्रायाबद्दल आभार .
20 Dec 2018 - 11:09 am | अनिंद्य
आढावा छान आहे HIV चा.
HIV / AIDS आणि त्यावरील प्रतिबंधक-उपकारक योजना ह्यावरचे संशोधन बघता अजून काही नोबेल पुरस्कार ह्या विषयाच्या संशोधकांना मिळणार हे नक्की.
20 Dec 2018 - 11:55 am | कुमार१
हरवलेला व अनिंद्य , आभार व सहमती.
जर १९ व्या शतकाच्या आधी एड्स मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे अवशेष मिळाले तर मांसभक्षण या तर्काला पुष्टी मिळेल. >>>> +१ कुतूहलजनक विषय आहे खरा.
अजून काही नोबेल पुरस्कार ह्या विषयाच्या संशोधकांना मिळणार हे नक्की. >>> +१११ . विषयच तसा व्यापक आहे.
20 Dec 2018 - 1:09 pm | श्वेता२४
नेहमीप्रमाणेच साध्यासोप्या भाषेत माहितीत भर घातलीत. पु.भा.प्र.
22 Dec 2018 - 5:04 pm | कुमार१
श्वेता आणि चर्चेत सहभागी सर्वांचे आभार !
22 Dec 2018 - 8:04 pm | चौकटराजा
विषाणू रेट्रोव्हायरस प्रकारातील असेल तर त्याच्यात स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता जास्त सबब प्रभावी लस निर्माण करणे अवघड . प्रत्येक विषाणूची आवडती अशी एक होस्ट पेशी असते दुर्दैवाने एच आय व्ही ची आवडती पेशी लिम्फोसाईट म्हणजे पोलीस पेशी सबब तिला मारले की " आव जावं घर तुम्हारा " सुदैवाने हा एक अशक्त विषांणू आहे व तो एअर बॉर्न नाही सबब इबोला सारखा तो भयानकी अवतार धारण करू शकत नाही .
22 Dec 2018 - 8:17 pm | कुमार१
बरोबर आहे. इबोला च्या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाण ९०% पर्यंत आहे.
धन्यवाद
22 Dec 2018 - 8:58 pm | जेडी
१९९० ते २००० हाय दरम्यान बरीच माणसे HIV ने मरण पावली , ती साथ एकदमच आल्यासारखे काय झाले असेल ? त्यामुळे लोक प्रत्येकाकडे संशयाने पाहत . अतिशय सोप्या शब्दात समजावून देण्याच्या पद्धतीमुळे कीकात विषय देखील समजून जातात . धन्यवाद .
23 Dec 2018 - 9:22 am | कुमार१
जेडी,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
एड्सने मृत्यू होण्याचे प्रमाण १९९०-२००४च्या दरम्यान खूप होते. आता ते कमी होण्याची करणे:
१. प्रभावी उपचार विकसित झाले.
२. प्रतिबंधात्मक उपायांचा वाढता वापर, आणि
३. वाढते लोकशिक्षण .
24 Dec 2018 - 9:54 am | कुमार१
इथे आहे:
https://www.misalpav.com/node/43817
26 Jan 2020 - 10:56 am | कुमार१
डॉ गंगाखेडकर : अभिनंदन !
आईकडून मुलात संक्रमित होणाऱ्या एड्स आजाराच्या बहुमूल्य संशोधनाबद्दल डॉ रमण गंगाखेडकर यांना आज पद्मश्री जाहीर झाली आहे.
हार्दिक अभिनंदन !
2 Oct 2020 - 9:40 am | कुमार१
एड्स संदर्भात ‘बर्लिन रुग्ण’ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते टी. आर. ब्राऊन यांचे नुकतेच वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या एड्ससाठी त्यांच्यावर २००७मध्ये विशेष मूळ पेशींचे प्रत्यारोपण झाले होते. त्यानंतर ते पूर्णपणे लक्षणमुक्त होते. एड्सचा पहिला ‘बरा’ झालेला रुग्ण अशी त्यांची नोंद झालेली आहे.
मात्र नंतर त्यांचा कर्करोग बळावला आणि त्यामुळे निधन झाले.
6 Apr 2021 - 11:34 am | कुमार१
एचआयव्ही विरोधी लस तयार करण्याचे काम आव्हानात्मक असून गेली २० वर्षे त्याचे प्रयत्न चालू आहेत.
सध्या कोविड लसनिर्मितीच्या निमित्ताने ‘एम-आरएनए’ तंत्रज्ञानाचा बराच बोलबाला झाला. फायझर व मॉडरनाच्या लसी या तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
आता हेच तंत्रज्ञान वापरून एचआयव्ही विरोधी लस तयार केली जाणार आहे. एड्स संबंधी एक संशोधन संस्था आणि मॉडरना यांच्या सहकार्याने ही लस विकसित केलेली आहे.
त्याचे पहिल्या टप्प्यातील शास्त्रीय प्रयोग आशादायक आहेत.
6 Apr 2021 - 11:41 am | ॲबसेंट माइंडेड ...
चांगली वातमी.
हल्ली एच आय व्ही बाधीतांचे प्रमाण बरेच घटण्यामागे जनजागृती हे कारण असावे का?
6 Apr 2021 - 12:53 pm | कुमार१
होय, ते एक महत्वाचे कारण आहे.
राष्ट्रीय पातळीवरील अभियानांनी या संदर्भात चांगले यश मिळत आहे.
11 Feb 2022 - 1:40 pm | कुमार१
HIV चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ ल्यूक माँटग्नियर यांचे निधन
https://www.loksatta.com/desh-videsh/french-discoverer-of-hiv-virus-luc-...
12 Apr 2022 - 9:34 am | कुमार१
स्तुत्य उपक्रम
कोलकाता येथे डॉ. कल्लोल घोष यांनी 2018 मध्ये एचआयव्हीग्रस्त तरुणांना बरोबर घेऊन एक ‘पॉझिटिव्ह कॅफे’ (उपाहारगृह) चालू केला. यात काम करणारे ७ जण एचआयव्हीग्रस्त आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलावा हा या उपक्रमामागचा हेतू आहे. नुकतेच या कॅफेने मोठ्या जागेत स्थलांतर केले.
पूर्णपणे एचआयव्हीग्रस्त तरुग्णांकडून चालवला जाणारा हा भारतातील आणि आशियातील पहिला कॅफे असल्याचा दावा डॉ. घोष यांनी केला आहे.
7 Aug 2022 - 4:34 pm | कुमार१
स्वस्तात टॅटू काढून घेणं पडलं महागात; एकच सुई वापरल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये १४ जणांना एचआयव्हीची लागण
ही बातमी अन्यत्र आली आहे त्यात बाधितांचा आकडा कमी दिसतोय.
एचआयव्हीचा प्रसार याप्रकारे होण्याची शक्यता बरीच कमी असते पण ती असतेच
1 Dec 2022 - 7:32 pm | कुमार१
1 डिसेंबर :जागतिक एड्स दिन
यंदाची जागतिक मध्यवर्ती कल्पना
Equalize
ही आहे. म्हणजेच सर्व एचआयव्हीग्रस्तांना रोगनिदान आणि उपचारांच्या सेवा उपलब्ध होण्याबाबत समानता आली पाहिजे.
12 Apr 2024 - 7:43 pm | कुमार१
एक महत्त्वाची संकल्पना U = U
एड्स झालेली व्यक्ती जर नियमित उपचार घेत राहिली आणि कालांतराने तिच्या रक्तावरील HIV Viral Load ही चाचणी निगेटिव आली आणि ती सातत्याने निगेटिव्हच राहिली, तर अशा व्यक्तींकडून त्यांच्या लैंगिक जोडीदाराला एचआयव्हीचे संक्रमण होत नाही. म्हणजेच अशा जोडीच्या लैंगिक संबंधादरम्यान एड्सच्या कारणास्तव निरोध वापरण्याची गरज नसते.
यालाच वैद्यकात
undetectable = untransmittable
असे म्हटले जाते.
या विषयावरील एक सुंदर हिंदी लघुपट इथे पाहता येईल.
त्याचे निर्माता डॉ. संजय पुजारी असून लेखन डॉ. विवेक बेळे यांनी केलेले आहे.
सुंदर लघुपट ! जरूर पहा. . .