वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(४) : रक्तगटांचा शोध

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
23 Oct 2018 - 12:31 pm

( १९३० चे नोबेल)

या संशोधनाचा तपशील असा आहे:

विजेता संशोधक : Karl Landsteiner
देश : ऑस्ट्रिया

संशोधकाचा पेशा : औषधवैद्यक व विषाणूशास्त्र
संशोधन विषय : मानवी रक्तगटांचा शोध

अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. त्या खालोखाल कुठल्या दानाचा क्रमांक लावायचा? माझ्या मते अर्थात रक्तदान ! जेव्हा एखाद्या रुग्णाला काही कारणाने तीव्र रक्तस्त्राव होतो तेव्हा तो भरून काढायला दुसऱ्या माणसाचे रक्तच लागते. विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरी हुबेहूब मानवी रक्त प्रयोगशाळेत तयार करणे अद्याप तरी जमलेले नाही. अशा वेळी माणसाला गरज असते ती मानवी रक्तदात्याचीच. अशा वेळेस आपण एखाद्या निरोगी आणि रक्तगट जुळणाऱ्या दात्याची निवड करतो. या दात्याचे रक्त जेव्हा संबंधित रुग्णास दिले जाते त्या प्रक्रियेस रक्तसंक्रमण (transfusion) म्हणतात.

सर्व माणसांचे रक्त जरी एकाच रंगाचे असले तरी त्यांचे ‘गट’ निरनिराळे असतात हे आपण आज जाणतो. परंतु हा मूलभूत शोध अनेक वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमानंतर लागलेला आहे. त्यासाठी हे संशोधन काही शतकांत अनेक टप्प्यांतून गेलेले आहे. त्याचा इतिहास आता जाणून घेऊ.

रक्तसंक्रमणाचे प्रयोग इसवी सनाच्या पंधराव्या शतकापासून सुरु झाले. जेव्हा एखाद्या रुग्णास रक्ताची गरज असे तेव्हा त्याकाळी त्याला एखद्या प्राण्याचे अथवा निरोगी व्यक्तीचे रक्त काढून पिण्यास देत ! किंबहुना यातूनच ‘रक्तपिपासू’ भुताची दंतकथा रुजली असावी. अर्थातच असे प्रयोग अयशस्वी ठरले. त्यातून असा निष्कर्ष निघाला की रक्तसंक्रमण हे शिरेतूनच (vein) झाले पाहिजे.

१७व्या शतकाच्या उत्तरार्धात एका प्राण्याचे रक्त दुसऱ्या प्राण्यास देऊन असे प्रयोग झाले. त्यानंतरच्या टप्प्यात सस्तन प्राण्याचे रक्त माणसास दिले गेले. काही प्रयोगांत माणसाचे रक्त कुत्र्यास दिले गेले. मात्र त्यात कुत्रा नंतर मरण पावला. असे बरेच वेळा दिसल्यानंतर एक महत्वाचा निष्कर्ष निघाला.तो असा की, एका प्राणिजातीचे (species) रक्त अन्य जातीस चालणार नाही. पुढे ते प्रयोगशाळेत सिद्ध केले गेले. त्या प्रयोगात जेव्हा एका प्राण्याच्या रक्तपेशी जेव्हा दुसऱ्या जातीच्या रक्ताबरोबर मिसळल्या जात तेव्हा त्या २ मिनिटांतच फुटून जात. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे, माणसाला रक्ताची गरज भासल्यावर माणसाचेच रक्त दिले पाहिजे.

अखेर इ.स. १८१८मध्ये इंग्लंडमध्ये एका माणसाचेच रक्त दुसऱ्यास संक्रमित करण्याचा प्रथम प्रयोग झाला. James Blundell या प्रसूतीतज्ञास त्याचे श्रेय जाते. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झालेल्या स्त्रीत त्याने असे संक्रमण यशस्वी केले. या घटकेला मानवी रक्तगटांचे ज्ञान झालेले नव्हते ही बाब उल्लेखनीय आहे ! म्हणजेच वरील घटनेत दाता व रुग्ण यांचे ‘गट’ योगायोगानेच जुळले असले पाहिजेत. इथपर्यंतचा अभ्यास हा Karl Landsteiner यांच्या पुढील संशोधनासाठी पाया ठरला.

सन १९०० मध्ये कार्ल हे व्हिएन्नातील एका संशोधन संस्थेत काम करीत होते. त्यांनी वेगवेगळ्या माणसांचे रक्तनमुने गोळा करून त्यांच्यावर प्रयोग चालू केले. आपल्या रक्तात पेशी आणि द्रव भाग (serum) असे दोन घटक असतात. या प्रयोगांत पेशींपैकी त्यांनी लालपेशीवर लक्ष केंद्रित केले होते.
त्यांच्या प्रयोगात एका माणसाच्या लालपेशी दुसऱ्या माणसाच्या serum बरोबर मिसळल्या जात. हे प्रयोग अनेक जणांचे रक्तनमुने घेऊन करण्यात आले. त्यापैकी काही मिश्रणे व्यवस्थित राहिली. पण, अन्य काहींत लालपेशींच्या गुठळ्या (clumps) झाल्या. यातून असा निष्कर्ष निघाला की काही माणसांच्या लालपेशीवर विशिष्ट antigens असतात तर अन्य काहींच्या नसतात. या अनुषंगाने त्यांनी माणसांची तीन रक्तगटांत विभागणी केली: A, B आणि C. याचा अर्थ असा होता:

१. A गटाच्या रक्तात लालपेशीच्या आवरणात ‘A’ हा antigen असतो.
२. B गटाच्या रक्तात लालपेशीच्या आवरणात ‘B’ हा antigen असतो आणि,
३. C गटाच्या रक्तात लालपेशीच्या आवरणात कुठलाच antigen नसतो.

त्याचबरोबर त्यांच्या हेही लक्षात आले की एखाद्या रुग्णास समान गटाचे रक्त दिल्यास त्याच्या लालपेशीना कुठलीच इजा पोहोचत नाही. मात्र अन्य गटाचे रक्त दिल्यास धोका पोहोचतो. अशा प्रकारे या घटकेला या संशोधनाचा पाया तयार झाला. पुढे कार्ल यांच्या विद्यार्थ्यांनी एक चौथा गट शोधला आणि त्याला AB हे नाव दिले. या गटाच्या रक्तातील लालपेशीवर A व B हे दोन्ही antigens असतात. पुढे अधिक विचारांती C गटाचे O असे नामांतर झाले. या O चा अर्थ ‘शून्य’(antigen) असा आहे. अशा रीतीने ही ४ रक्तगटांची एक प्रणाली तयार झाली आणि त्याचे A, B, O व AB हे प्रकार ठरले. या संशोधनावर आधारित पहिले रक्तसंक्रमण १९०७मध्ये न्यूयॉर्कमध्ये केले गेले.
आता आपण या चारही गटांचा अर्थ समजून घेऊ (चित्र पाहा):

pict

A = लालपेशीवर A antigen आणि सिरममध्ये anti-B हे प्रथिन.

B
= लालपेशीवर B antigen आणि सिरममध्ये anti-A हे प्रथिन.

AB = लालपेशीवर A व B हे दोन्ही antigens आणि सिरममध्ये कोणतेच विरोधी प्रथिन (antibody) नाही.

O = लालपेशीवर कोणताही antigen नाही आणि सिरममध्ये anti-A व anti-B ही दोन्ही प्रथिने.
यातून रक्तसंक्रमणासंबंधी खालील महत्वाचे निष्कर्ष निघाले:

१. समान रक्तगटाची माणसे एकमेकास रक्त देऊ शकतात.
२. O गटाचे रक्त अन्य तिन्ही गटांस दिल्यास काही बिघडत नाही कारण या लालपेशीवर कोणताच antigen नसतो. त्यामुळे हे रक्त घेणाऱ्यांच्या रक्तात कोणतीच ‘प्रतिक्रिया’(immune reaction) उमटत नाही.
३. AB गटाची माणसे अन्य तिन्ही गटांचे रक्त स्वीकारू शकतात कारण त्यांच्या सिरममध्ये A वा B ला विरोध करणारी प्रथिने तयार होतच नाहीत.

या क्रांतीकारी संशोधनाबद्दल कार्लना १९३०मध्ये नोबेल दिले गेले. हे संशोधन अत्यंत मूलभूत असल्याने त्यांना रक्तसंक्रमणशास्त्राचा पिता म्हणून ओळखले जाते.

यानंतर वैद्यक व्यवसायात अनेक रक्तसंक्रमणे होऊ लागली. त्यासाठी दाते निवडताना फक्त वरील ABO या प्रणालीचाच विचार होत होता. परंतु कार्ल यांचे संशोधन अद्याप चालूच होते. त्यांच्या मते लालपेशीवर या प्रणालीखेरीज अन्य काही प्रकारचे antigensही असण्याची शक्यता होती. अखेर त्यांच्या परिश्रमास १९३७मध्ये यश आले. आता अन्य एका सहकाऱ्यासमवेत त्यांनी Rh या नव्या antigenचा शोध जाहीर केला. Rh हे नाव देण्यामागे एक कारण होते. तेव्हा त्यांना असे वाटले की आपल्या लालपेशीवरचा हा antigen ‘Rhesus’ माकडाच्या पेशींवर असलेल्या antigen सारखाच आहे. पुढील संशोधनात असे आढळले की माणूस व माकडातील हे antigens वेगवेगळे आहेत. त्यामुळे आता Rh हे नाव शास्त्रीयदृष्ट्या बरोबर नसले तरीही ऐतिहासिक कारणासाठी ते टिकून आहे.

आता रक्तगट प्रणालींत ABOच्या जोडीला Rhची भर पडली. त्यानुसार माणसांचे २ गट पडले:

१. लालपेशीवर Rh(D) हा antigen असल्यास त्याला Rh-positive म्हणायचे आणि,
२. लालपेशीवर Rh(D) हा antigen नसल्यास त्याला Rh-negative म्हणायचे.

आज आपण आपला रक्तगट सांगताना वरील दोन्ही प्रणालींचा वापर करतो. उदा.: A, Rh-positive.

Rh प्रणालीच्या शोधानंतर रक्तदानासाठी “सार्वत्रिक दात्या”ची व्याख्या सुधारण्यात आली. त्यानुसार O, Rh-negative हा गट असलेली व्यक्ती सार्वत्रिक दाता ठरते. अर्थात रक्तसंक्रमणापूर्वी दाता व रुग्ण यांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पूर्णपणे “match” करून आणि दात्याचे अन्य काही निकष बघूनच योग्यायोग्यतेचा निर्णय घेतला जातो.

कार्ल यांनी वरील शोधाव्यतिरिक्तही अन्य संशोधन केले आहे. ते रोगप्रतिकारशक्ती आणि allergy या संदर्भात आहे. तसेच त्यांनी अन्य सहकाऱ्याच्या मदतीने पोलिओच्या विषाणूचा शोध लावलेला आहे. ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत.
सन १९१०च्या दरम्यान अन्य काही संशोधकांनी रक्तगट हे अनुवांशिकतेने पुढच्या पिढीत संक्रमित होतात हे सिद्ध केले. पुढे त्याचा उपयोग वादग्रस्त पितृत्वासंबंधीच्या दाव्यांमध्ये करता आला.

काही आजार वा शस्त्रक्रियादरम्यान रुग्णास रक्तस्त्राव होतो. अन्य काही आजारांत शरीरात निरोगी रक्त तयार होत नाही. अशा सर्व प्रसंगी रुग्णास अन्य व्यक्तीचे रक्त द्यावे लागते. त्या प्रसंगी ते जीवरक्षक ठरते. आपल्या अनेक सामाजिक कर्तव्यांत रक्तदान हेही समाविष्ट आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाला स्वतःचा रक्तगट माहित असणे अत्यावश्यक आहे. रक्तगटांच्या मूलभूत शोधामुळे वैद्यकातील रक्तसंक्रमण निर्धोकपणे करता येऊ लागले. हा क्रांतीकारी शोध लावणाऱ्या कार्ल यांना वंदन करून हा लेख पुरा करतो.
******************************************************
(चित्र जालावरून साभार).

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

23 Oct 2018 - 12:53 pm | टर्मीनेटर

फारच छान माहितीपूर्ण लेख.
माझा रक्तगट 'B' Rh-negative आहे. मध्यंतरी बायकोने कुतेतरी वाचले होते कि रक्तगट Rh-negative असणे हे माणसांचे नाही तर एलियन्स चे लक्षण आहे. त्यावरून माझी बरीच मस्करी ती करत असे, आता तिला हा लेख वाचायला देतो :)
मी आणि माझा एक मित्र (ज्याचा रक्तगट AB Rh-negative आहे) २-३ वेळा स्वेच्छेने रक्तदान करायला गेलो असताना दोघांचे रक्तगट Rh-negative असल्याने त्यांनी त्यावेळी आमचे रक्त न घेता फोन. नंबर्स घेतले होते आणि आवश्यक असेल तेव्हा आम्ही कॉल करू असे सांगितले होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2018 - 6:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. मुळातच, AB व Rh-negative हे रक्तगट विरळ आहेत. अर्थातच, त्याचे संयोजन (काँबिनेशन) खूप विरळ आहे.

सर्वसाधारणपणे, AB+ रक्तगटसमुह ३.४% लोकांत आणि AB- रक्तगटसमुह ०.६% लोकांत (पक्षी : अत्यंत विरळ) असतो. यात देश आणि/अथवा वर्णाप्रमाणे थोडासा फरक असू शकतो.

२. शरीराबाहेर काढलेल्या रक्ताला समाप्ती-तारीख (एक्सपायरी डेट) असते. म्हणजेच, ठराविक कालावधीत ते वापरले गेले नाही तर त्याची उपयुक्तता कमी होते किंवा संपते.

त्यामुळे, अश्या विरळ रक्तगटांच्या लोकांचे रक्त आधिपासून काढून साठविण्याऐवजी, गरज पडेल तेव्हा त्यांना बोलवून घेऊन रक्त मिळवणे जास्त संयुक्तिक ठरते.

टर्मीनेटर's picture

24 Oct 2018 - 6:46 pm | टर्मीनेटर

विस्तृत माहितीसाठी धन्यवाद डॉक्टर.

यशोधरा's picture

23 Oct 2018 - 1:20 pm | यशोधरा

मस्त लेख आहे. आवडला.

मूलभूत संशोधन शेकडो प्रयोग, दुरुस्त्या आणि प्रत्यय अश्या अनेक पायऱ्यातून कसे जाते ह्याची थोडक्यात झलक ह्या मालिकेमुळे मिळत आहे.

ह्या संशोधकांचे मानव जातीवर अनेक उपकार आहेत हेच खरे.

अनिंद्य

अनिंद्य's picture

23 Oct 2018 - 1:32 pm | अनिंद्य

पण रक्तदानाबद्दल वाचतांना सारखे 'अमर अकबर अँथोनी' मधला निरुपा रॉयला रक्त चढवायचा सीन आठवून हसायला येत होते :-)

कुमार१'s picture

23 Oct 2018 - 2:56 pm | कुमार१

टर्मिनेटर, अहो एलियन्स कुठले, तुम्ही तर हाडामासाचे मिपाकर !
अनिंद्य, तो किस्सा काही आठवत नाही, तुम्हीच सांगा.

सांगायचे काय, बघाच तुम्ही थेट :

हा सीन हिंदी सिनेमाच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. :-)

https://www.youtube.com/watch?v=Z8TzAQXeYFk

कुमार१'s picture

23 Oct 2018 - 7:31 pm | कुमार१

लय भारी असेच म्हणतो !
डॉ सुहास, पूरक माहितीबद्दल आभार .

लई भारी's picture

23 Oct 2018 - 4:43 pm | लई भारी

अगदी त्रोटक माहिती होती आधी, विस्ताराने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नेहमीप्रमाणे सोप्या भाषेत!

Rh -ve हा गट अभावानेच आढळतो, असे का असावे?

कुमार१'s picture

23 Oct 2018 - 7:25 pm | कुमार१

Rh -ve हा गट अभावानेच आढळतो, असे का असावे? >>

चांगला प्रश्न. मुळात हे विधान जगातील सर्व वंशांना लागू नाही. हे पहा Rh –ve चे प्रमाण (%) :

१. Basques (युरोपातील भाग) : ३५
२. मोरोक्कोतील वंश : २९
३. अमेरिकी वंश : १५
४. भारत : ०.६ ते ८.५

म्हणजेच या आढळाची कारणे वांशिक आहेत. Rh +ve असण्याचे काही फायदे आहेत. त्यातला एक म्हणजे Toxoplasma या जंतूसंसर्ग पासून संरक्षण. अर्थात हे काही प्रमाणात लागू आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2018 - 6:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच, सुंदर माहितीपूर्ण लेख !

चौकटराजा's picture

24 Oct 2018 - 10:30 am | चौकटराजा

आर्थर हेली यांची वर नाव दिलेली एक कादंबरी आहे . आर एच निगेटिव्ह व दुसरे बाळ यांचे मतिमंदत्व असा काहीसा या कादंबरीचा विषय होता . ते काय प्रकरण आहे . हल्ली दिवस असलेल्या मातेचे रक्त व तिच्या पतीचे रक्त यांचा आर एच समजून घ्यावा लागतो ना ? अँटिजेन व अँटीबॉडी ही जर दोन्ही प्रथिनेच आहेत तर त्यांचे कार्य काय स्वरूपात भिन्न आहे ? बाकी या लेखात मला क्रान्तिकारी वाटणारा विषय आहेच ! आता आर एन ए , डी एन ए कधी घेता ?

कुमार१'s picture

24 Oct 2018 - 11:14 am | कुमार१

मालेतील विषय कालानुक्रमे घेत आहे. काळजी नसावी ! तसेच निवडलेला विषय वाचकांना रंजक वाटेल ही कसोटी लावत आहे.
आर एच बद्दल सविस्तर उत्तर नंतर देतो

कुमार१'s picture

24 Oct 2018 - 11:48 am | कुमार१

हल्ली दिवस असलेल्या मातेचे रक्त व तिच्या पतीचे रक्त यांचा आर एच समजून घ्यावा लागतो ना ? >>>>

होय, ते माहित असलेले चांगले. आता प्रश्न कधी उद्भवतो ते बघा.

१. समजा आई Rh –ve व वडील +ve आहेत.
२. मग गर्भातले मूल +ve वा –ve असू शकते.
३. समजा ते +ve आहे.

४. पहिल्या गरोदरपणात सहसा काहीच बिघडत नाही. कारण मुलाचा जन्म होईपर्यंत त्याचे रक्त आईच्या रक्तात मिसळत नाही.
५. प्रत्यक्ष बाळंत होताना placenta तुटतो आणि मग बाळाचे रक्त आईच्यात जाते. त्यातून +ve प्रकारच्या लालपेशी आईत जातात.

६. आई –ve असल्याने आता तिचे शरीर Rh-विरोधी antibodies तयार करते. पण पहिल्या बाळाचा जन्म आधीच झालेला असल्याने त्याला काहीच त्रास नाही.

७. पुढे ती दुसऱ्या वेळेस गरोदर झाली आणि तेव्हाचे बाळ +ve असेल तर मग तिच्या रक्तातील antibodies बाळात जाऊन त्याच्या लालपेशीचा नाश करतील.

८. पण, असे होऊ नये म्हणून या गरोदरपणात Rh immunoglobulin हे इंजेक्शन तिला दिले जाईल ज्यामुळे वरील पेशी-मारामारीची प्रक्रिया होणार नाही.

बापरे, बराच गुंतागुंतीचा आहे कि हा प्रकार.

कुमार१'s picture

24 Oct 2018 - 7:56 pm | कुमार१

सामान्य माणसाचे हे वाचताना डोके अगदी भंजाळून जाते !

तुषार काळभोर's picture

24 Oct 2018 - 8:35 pm | तुषार काळभोर

अखिल मानवजातीवर अनंत उपकारक असा शोध!!

इट डिजर्वस मच मोर दॅन या नोबल.

नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण लेख.

मुलांचा रक्त गट कसा ठरतो ? आई किंवा वडीलांचा असतो की वेगळा ही असू शकतो.

माझ्या ऐकीव माहिती प्रमाणे रक्त गट AO , BO, AB आणि OO असे आहेत पण कुठेही ही माहिती मिळत नाही. रक्तगटाचे ही नावे खरीच आहेत का ?

कुमार१'s picture

25 Oct 2018 - 9:54 am | कुमार१

मुलांचा रक्त गट कसा ठरतो ? आई किंवा वडीलांचा असतो की वेगळा ही असू शकतो? >>>

चांगला प्रश्न.
हे समजून घ्यायला जीवशास्त्राची पार्श्वभूमी लागेल.

१. समजा एखाद्याचा गट A आहे तर त्याला phenotype A म्हणतात.
२. या A च्या अंतर्गत २ genotypes असू शकतात : AA किंवा AO. त्यातला कुठला हे त्याच्या आईवडिलांच्या genotypes वर ठरेल.

३. A व B हे antigens अनुवंशिकतेत ‘प्रबळ’ असतात तर O (शून्य) हा दुर्बल असतो.
४. त्यामुळे O गट असणाऱ्याचा genotype OO च असतो.

५. समजा, वडील A व आई B गटाचे आहेत . तर त्यांना होणारी मुले ही A, B, AB अथवा O ची सुद्धा असू शकतात. हे समजण्यासाठी खलील चित्र पहा :

pict

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Oct 2018 - 2:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर विश्लेषण !

फक्त, एक छोटीशी पुरवणी.

A = लाल रक्तपेशीच्या आवरणात A अँटिजेन (प्रोटीन) आहे.

B = लाल रक्तपेशीच्या आवरणात B अँटिजेन (प्रोटीन) आहे.

AB = लाल रक्तपेशीच्या आवरणात A आणि B हे दोन्ही अँटिजेन्स (प्रोटीन्स) आहेत.

O = लाल रक्तपेशीच्या आवरणात A आणि B हे दोन्हीही अँटिजेन्स (प्रोटीन्स) नाहीत... त्यांचा अभाव आहे.

Rh Positive = लाल रक्तपेशीच्या आवरणात Rh अँटिजेन (प्रोटीन) आहे.

Rh Negative = लाल रक्तपेशीच्या आवरणात Rh अँटिजेन (प्रोटीन) नाही... त्याचा अभाव आहे.

थोडक्यात, A, B, AB व Rh Positive हे रक्तगट व्यक्तीत ते ठराविक अँटिजेन्स (प्रोटीन्स) असल्याचे दर्शवतात, तर... O किंवा Rh Negative हे रक्तगट त्या व्यक्तीत अनुक्रमे A/B किंवा Rh अँटिजेन्सचा (प्रोटीन्सचा) अभाव दर्शवतात.

कुमार१'s picture

25 Oct 2018 - 2:38 pm | कुमार१

अगदी सहमत.
धन्यवाद

सुंदर आणि सोप्या पद्धतीत समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

गुल्लू दादा's picture

25 Oct 2018 - 9:29 am | गुल्लू दादा

माहितीपूर्ण लेख

अँटिजेन व अँटीबॉडी ही जर दोन्ही प्रथिनेच आहेत तर त्यांचे कार्य काय स्वरूपात भिन्न आहे ? >>>>

अँटिजेन = हे प्रथिन शरीराच्या दृष्टीने ‘परकीय’ असते. ते जेव्हा शरीरात शिरते, तेव्हा ते आपल्या प्रतिकारयंत्रणेला (immune system) उत्तेजित करते. त्यातून अँटीबॉडी निर्माण होते आणि पुढे अँटिजेन व अँटीबॉडीचे संयुग तयार होते.

अँटीबॉडी = हे शरीराने तयार केलेले प्रथिन असून ते (परकीय) अँटिजेनच्या विरोधात लढते.
थोडक्यात,

अँटिजेन ही तलवार असेल तर अँटीबॉडी ही ढाल आहे !

सुधीर कांदळकर's picture

25 Oct 2018 - 1:18 pm | सुधीर कांदळकर

आकृत्यांमुळे समजणे सोपे झालेच, वर लेखाचे सादरीकरणही सौंदर्यपूर्ण झाले.

आवडले. धन्यवाद.

कुमार१'s picture

26 Oct 2018 - 10:32 am | कुमार१

सुयोग्य प्रश्न, चांगली चर्चा, प्रतिसाद आणि प्रोत्साहनाबद्दल सर्व सहभागींचे आभार !

चौकटराजा's picture

26 Oct 2018 - 7:13 pm | चौकटराजा

प्रत्येक अँटीजेन ला एक विशिष्ट प्रोटीन कॅप असते का ? अशा कॅप ला किल्ली समजले तर अँटीबॉडीच्या तशांच प्रोटीन कॅप ला कुलूप म्हणावे काय ? आपलया शरीराला विविध अमायनो ऍसिड चा पुरवठा ना मिळाल्यास अँटीबॉडीचे विशिष्ट कुलूप निर्माण करण्यात " कच्चा माल " कमी पडला असे असते का ? काहींची सर्दी लवकर बरी झाली काहिची उशीरा यात या कच्च्या मालाच्या पुरवठ्याची भूमिका महत्वाची ठरते काय ?

कुमार१'s picture

26 Oct 2018 - 7:30 pm | कुमार१

आपलया शरीराला विविध अमायनो ऍसिड चा पुरवठा ना मिळाल्यास अँटीबॉडीचे विशिष्ट कुलूप निर्माण करण्यात " कच्चा माल " कमी पडला असे असते का ? >>>

होय, बरोबर. आपली प्रतिकारशक्ती 'इम्म्युनोग्लोब्युलिनस' वर अवलंबून असते. ती प्रथिने असल्यामुळे शरीरात ती तयार करण्यास उच्च प्रथिनयुक्त आहार (कच्चा माल) आवश्यक असतो. त्यातूनच योग्य ती अमिनो आम्ले मिळतात.

म्हणून,
कुपोषण >> प्रथिन कमतरता >> 'इम्म्युनोग्लोब्युलिनसचे कमी उत्पादन >>> ढासळती प्रतिकारशक्ती

कुमार१'s picture

29 Oct 2018 - 9:51 am | कुमार१
वन's picture

3 Nov 2018 - 10:04 am | वन

एक शंका
आपण लेखात वर्णन केलेल्या एबीओ आणि आरएच व्यतिरिक्त रक्तगटाच्या अन्य काही प्रणाली असतात का? असे कुठेतरी ऐकले होते.

कुमार१'s picture

3 Nov 2018 - 10:33 am | कुमार१

रक्तगटाच्या तशा एकूण ३४ प्रणाली आहेत. त्यापैकी ABO व Rh या antigenic गुणधर्माच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या आहेत. अन्य प्रणालीतले antigens सौम्य असतात.
तरीदेखील रुग्णास रक्त देण्यापूर्वी त्याचे व दात्याचे रक्त प्रयोगशाळेत एकत्रित तपासले जाते. त्यात Cross matching, antibody screening अशा चाचण्या करतात. त्यामुळे ‘इतर’ प्रणालीतील antigensची दखल घेतली जाते.

त्यामुळेच रक्त संक्रमण जास्तीत जास्त सुरक्षित होते.

वन's picture

3 Nov 2018 - 12:03 pm | वन

धन्यवाद डॉ.
म्हणजे दोन माणसांचा रक्तगट जरी एकच असेल तरी वर तुम्ही सांगितलेल्या चाचण्या केल्याशिवाय ते एकमेकास रक्त देऊ शकत नाहीत. बरोबर ना ?

कुमार१'s picture

3 Nov 2018 - 12:15 pm | कुमार१

अगदी बरोबर.

कुमार१'s picture

14 Jun 2019 - 11:46 am | कुमार१

ABO व Rh सोडून लालपेशीतील इतर काही antigens मुळे कशी समस्या येते यासंबंधीची आजची बातमी:

नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा व त्याच्या आईचा गट A Rh +ve. या बाळाला जन्मतःच कावीळ झाली आणि हिमोग्लोबिन धडाधड कमी होऊ लागले. त्याला तातडीने रक्त द्यावे लागणार होते पण त्याच्या आईचे (त्याच गटाचे) क्रॉस-match होत नव्हते.

बातमी इथे:
https://www.esakal.com/pune/thirty-six-hours-baby-fighting

कुमार१'s picture

1 Oct 2021 - 8:18 am | कुमार१

आज राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन आहे.
या निमित्त सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा !

सिंधुदुर्ग मधील सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान हे या संदर्भात खूप चांगले काम करीत आहे.
विविध उपक्रमांत बरोबरच ते बॉम्बे ब्लड ग्रुप या अतिदुर्मिळ रक्तगटाचे दाते शोधण्याची मोहीम राबवत आहेत.
हा रक्तगट आपल्या लोकसंख्येत साधारण 10 लाखात चार इतक्या अत्यल्प प्रमाणात आढळतो.

संबंधित प्रतिष्ठानचे अभिनंदन व शुभेच्छा !

कुमार१'s picture

11 Apr 2022 - 11:45 am | कुमार१

दुर्मिळ रक्तगट

जबलपूर येथील एका ३० वर्षीय पुरुषात एक दुर्मिळ रक्तगट सापडला आहे. त्याचे नाव Ael असे असून तो A गटाचा एक उपप्रकार असतो. परंतु तो लक्षात येण्यासाठी काही उच्च पातळीवरील जनुकीय चाचण्या कराव्या लागतात. हे गृहस्थ नियमित रक्तदाते असून आतापर्यंत त्यांचा रक्तगट सामान्य चाचण्यांच्या आधारे O निगेटिव्ह असा धरला होता. परंतु यावेळेच्या रक्तदानानंतर संबंधित डॉक्टरांना चाचणी करताना काही शंका आल्याने त्यांनी वेगळ्या चाचण्या करवून घेतल्या.

https://www.thehindubusinessline.com/news/science/meet-the-jabalpur-man-...

अशाच प्रकारचा रक्तगट एका चिनी माणसामध्ये पूर्वी आढळलेला आहे. जगभरात या उपप्रकाराची खूप कमी माणसे आहेत.
https://www.nature.com/articles/jhg2005102

कुमार१'s picture

14 May 2022 - 11:28 am | कुमार१

जागतिक रक्तदान दिनानिमित्त
सर्व नियमित दात्यांचे
अभिनंदन आणि शुभेच्छा !

कुमार१'s picture

14 Jun 2022 - 7:49 am | कुमार१

१४ जून : Karl Landsteiner यांचा जन्मदिन जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो.

सर्व नियमित दात्यांचे
अभिनंदन आणि शुभेच्छा !

वामन देशमुख's picture

14 Jun 2022 - 3:41 pm | वामन देशमुख

मी अनेकदा वेळोवेळी रक्तदान करतो.

माझे एक स्नेही महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेत अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत पन्नासहून अधिक वेळा रक्तदान केले आहे.

---

अवांतर मत: रक्तदान शिबिरांत शक्यतो रक्तदान करू नये, जेंव्हा कुणाला गरज असेल तेंव्हा रक्तदान करावे. चूभूदेघे.

---

सवांतर प्रश्न: रक्तदान केल्याने रक्तदात्याला काही शारीरिक उपयोग / फायदा होतो का?

कुमार१'s picture

14 Jun 2022 - 4:50 pm | कुमार१

छान, अभिनंदन !

*जेंव्हा कुणाला गरज असेल तेंव्हा रक्तदान करावे.
>>> हे केव्हाही उत्तम.

**रक्तदान केल्याने रक्तदात्याला काही शारीरिक उपयोग / फायदा >
मानसिक समाधान हा फायदा.

(काही लोह- निगडित आजारांत ठराविक रक्त काढून टाकणे हा उपचार असतो)

कुमार१'s picture

14 Jul 2022 - 8:01 pm | कुमार१

भारतातील एका व्यक्तीमध्ये एक दुर्मिळ रक्तगट सापडला असून या रक्तगटाच्या फक्त दहा व्यक्ती सध्या जगभरात आहेत.
यानिमित्ताने Emm ही एक नवी रक्तगट प्रणाली दखलपात्र झाली आहे.

बातमी

कुमार१'s picture

4 Nov 2022 - 8:38 am | कुमार१

डेंग्यूचे रुग्ण वाढलेले असल्याने त्यांना प्लेटलेटचे उपचारही मोठ्या प्रमाणावर द्यावे लागत आहेत.
त्यातून रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटचा तुटवडा झालेला आहे.
उत्स्फूर्त रक्तदानाचे आवाहन

कुमार१'s picture

10 Nov 2022 - 8:47 am | कुमार१

सध्या रक्तपेढ्यांना प्लेटलेटचा तुटवडा जाणवत असल्याचा वर उल्लेख केलेला आहे. त्या संदर्भातील एक कौतुकास्पद कार्य :

श्री सचिन मराठे हे त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच नियमित रक्तदाते आहेत. 2010 पासून ते पुण्यातील एका रक्तपेढीत महिन्यातून एकदा असे नियमित प्लेटलेट्स दान करतात. आतापर्यंत त्यांनी 130 वेळा असे दान केलेले आहे.

अभिनंदन !

रक्तसंक्रमणातून एचआयव्ही आणि हेपेटाइटिस यांचे विषाणू ( HIV, HBV, and HCV) संक्रमित होण्याचा धोका असतो. म्हणून प्रत्येक रक्तदात्याची यासंदर्भात संक्रमणपूर्व चाचणी केली जाते. हे तीनही विषाणू एकाच चाचणीने ओळखणारे NATSpert ID TripleH Detection Kit हे तंत्रज्ञान मायलॅब डिस्कवरी सोल्युशन्स यांनी विकसित केलेले आहे. हे संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान आहे.

या उपक्रमाबद्दल संबंधित उद्योगाला केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार दिला गेलेला आहे.
अभिनंदन !

कुमार१'s picture

23 Feb 2024 - 5:53 pm | कुमार१

AB Rh+ रक्तगट असलेल्या सचिन शर्मा या २३ वर्षीय तरुणाला रुग्णालयाच्या चुकीने O Rh+ या गटाचे रक्त दिले गेले. परिणामी त्याच्या शरीरात घातक प्रतिक्रिया होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे.
आदरांजली !

या घटनेच्या बातम्यांनुसार सचिनचा रक्तगट हा AB Rh+ होता आणि त्याला चुकून O Rh+ हे रक्त दिले गेलेले आहे.
म्हणून कुठलेही रक्त संक्रमण करण्यापूर्वी दाता व स्वीकारणारा यांच्या रक्ताचे प्रयोगशाळेत क्रॉस मॅचिंग करणे अत्यावश्यक असते.

O रक्तगटाचे काही उपप्रकार असे आहेत, की ज्यामध्ये आर एच व्यतिरिक्त अन्य अँटीजेन्सचा समावेश असतो. त्यांच्यामुळे वरील प्रकारची दुर्घटना घडली असावी.

अधिक चौकशीअंती गोष्टी स्पष्ट होतील.