क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १०

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
20 Jul 2013 - 8:03 am

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ५
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ६
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ७
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ८
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ९

२६ एप्रिल १८९९ ची काळोखी पहाट. बाहेर थंडी मी म्हणत असतांना उत्तरेचं पॅरीस - 'डाउसन' आगीच्या ज्वाळात लपेटलं होतं. तुटपुंजं अग्नीशमन दल जीवाची बाजी लावून आग विझवायचा प्रयत्न करत होतं. पण उणे ४५ फॅ अंशापर्यंत पोचलेल्या थंडीत पाणी आगीपर्यंत पोचण्याआधीच गोठून जात होतं. महिनोनमहिने रक्ताचं पाणी करुन मिळवलेली संपत्ती डोळ्यासमोर नष्ट होताना हताशपणे बघण्याशिवाय स्टँपेडर्सच्या हातात काहीही उरलं नव्हतं.


(आगीच्या ज्वाळांनी लपेटलेलं डाउसन)

त्याचं झालं असं, सोन्याच्या खाणीतून खोर्‍याने पैसा ओढणार्‍या डाउसन शहराच्या प्रशासनाजव़ळ जीवावर उदार होउन काम करणार्‍या अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांना वेतनवाढ देण्यासाठी पैसा नव्हता. ही चूक प्रशासनला भविष्यात चांगलीच भोवली. अग्निशमनदलाच्या अनेक कर्मचार्‍यांनी संप पुकारला असतांना Bodega Saloon या डान्सहॉलच्या दुसर्‍या मजल्यावरील एका शयनगृहात एका डान्सरचा धक्का लागून दिवा पडला आणि काही मिनीटातच डाउसन शहर आगीने वेढलं गेलं. शहराच्या मुख्य भागातल्या ११७ इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवाने अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आलं. जळणार्‍या इमारतीत एक इमारत होती Bank of British North America या बँकेची. आगीच्या होरपळीतून या बँकेची तिजोरीही सुटली नाही. आगीचा प्रकोप इतका तीव्र होता की या तिजोरीत ठेवलेले सोन्याचे तुकडे, दागिने, गोल्डड्स्ट आगीच्या ज्वाळांनी वितळून गेले. या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी असलेल्या Walter Washburn च्याच शब्दात सांगायचं तर - "Thats the way I made it and thats the way its gone. So what the hell!!"


(पाण्याच्या टाक्या वाहून नेणारे डाउसनच्या अग्निशमन दलातचे कुत्रे)

आगीनंतर काही महिन्यात डाउसन पुन्हा उभं राहू पहात होतं परंतु आता बराच उशीर झाला होता. त्यातच १८९९ च्या उन्हाळ्यात डाउसनपासून दोन हजार किलोमीटरवर अलास्कातल्या 'नोम'च्या किनार्‍यावर सोनं सापडल्याची अफवा वार्‍याबरोबर पसरली. काही दिवसात या अफवेची खातरजमाही झाली. अनेक स्टँपेडर्सनी रातोरात काशाबाशा गुंडाळून 'नोम'ची वाट धरली. ऑगस्ट महीन्यात केवळ एका आठवड्यात आठ हजार स्टँपेडर्सनी डाउसन सोडलं. यानंतर Yetna, Susitna, Tanana या ठिकाणी सोनं मिळाल्याच्या अफवा पसरत राहिल्या. आणि या अफवांच्या पडसादांबरोबर कित्येक स्टँपेडर्स आशेने प्रवास करीत राहीले. यापैकी कुठल्याही जागेत सोनं सापडलं नाही किंवा यापैकी एकाचीही क्लोंडायक गोल्ड रश इतकी चर्चा झाली नाही. अनेक स्टँपेडर्स हाताला काहीही न लागता आयुष्यभर कफल्लकच राहीले.


(आगीने उद्धवस्त झालेलं डाउसन)

जॉर्ज कारमॅकच्या सोन्याच्या शोधानंतर साधारण १८९६ ते १८९९ , तीन वर्ष चाललेल्या क्लोंडायक गोल्ड रशसाठी जवळजवळ एक लाख स्टँपेडर्स युकान मधे आले. ज्यांच्या हाती खरोखरच सोनं लागलं असे स्टँपेडर्स होते फक्त चार हजार!! त्यातही रंकाचे राव झालेले स्टँपेडर्स फारच कमी. या स्टँपेडर्समधल्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी डोकं लावून आपला पैसा गुंतवला, टिकवला. बाकीच्यांसाठी पैसा पाण्यासारखा वहायला डाउसनमधे डान्सबार, दारुचे गुत्ते, जुगाराचे अड्डे भरपूर होते. १८९८ मधे क्लोंडायकच्या जमिनीतून $१० मिलियन किंमतीचं सोनं काढलं गेलं तर १८९९ मधे $१६ मिलियन किंमतीचं पण डाउसन पर्यंत पोचण्यासाठी केलेल्या प्रवासात स्टँपेडर्सनी खर्च केला होता एकूण - $६० मिलियन !!!


(अलस्कातल्या 'नोम'च्या दिशेने निघालेलं स्टँपेडर्सनी भरलेलं जहाज)

हळूहळू डाउसन ओस पडू लागलं होतं. सोन्याच्या अमिषाने मोठ्या खाणकंपन्या डाउसनमधे दाखल झाल्या. या कंपन्यांनी भरपूर पैसा ओतून स्टँपेडर्सकडून क्लेम विकत घेतले आणि यंत्रांच्या सहाय्याने खाणकाम चालू केलं. यंत्रांच्या मदतीमुळे मोठ्या प्रमाणात कामगारकपात करण्यात आली. अनेक स्टँपेडर्सना खिशात एकही दमडी न कमवता युकान सोडावं लागलं. काही स्टँपेडर्सनी या अभूतपूर्व प्रवासाची आठवण म्हणून मिळेल ते काम पकडून युकानमधेच थांबण्याचा निर्णय घेतला. उण्यापुर्‍या तीन वर्षात क्लोंडायक गोल्ड रशचा बहर ओसरला होता.


(नव्याने दाखल झालेल्या कंपन्यांनी अजस्त्र यंत्रसामुग्री डाउअसमधे आणली.

आता प्रश्न उरतो क्लोंडायक गोल्ड रशचा परिपाक काय? क्लोंडायकमधे हुशारीने पैसा लावलेल्या काही क्लोंडायक किंग्जनी पुढे पैसा व मानमरातब कमवला. जॅक लंडनसारख्या स्टँपेडर्सनी आपली क्लोंडायकवारी पुस्तकाच्या रुपाने जगासमोर आणली तर जॉन नॉर्ड्स्ट्रॉमसारख्याने क्लोंडायकवरुन परल्यावर 'नॉर्ड्स्ट्रॉम' थाटून यशस्वी व्यावसाय केला.

क्लोंडायकवारीत सामील झालेल्या सर्वच स्त्रीपुरुषांचं आयुष्य या घटनेने पूर्णपणे बदलून टाकलं. सोन्याच्या अमिषाने का होईना कधीही कल्पनेत न रंगवलेलं धाडस त्यांनी सत्यात उतरवून दाखवलं होतं. गोल्डरशमधला प्रत्येक स्टँपेडरला स्वतःच्या असामान्य क्षमेतेची खात्री पटली होती. गोल्डरशमधून ताउन सुलाखून निघालेला स्टँपेडर आपल्या पुढच्या आयुष्यात कमालीच्या आत्मविश्वासाची शिदोरी घेउनच वावरला. स्मृतीपटलावर आजीवन जपण्यासारखा हा अनुभव होता. अगदी रिकाम्या हाताने परतलेल्या स्टँपेडर्सनी सुद्धा हा एक वेगळी अनुभूती देणारा अनुभव असल्याचं कबूल केलं.

सोन्याच्या शोधापेक्षा ज्यांनी डाउसनमधे खाणावळी, हॉटेल किंवा अन्य धंदे उघडले त्यांनी प्रॉसपेक्टर्सपेक्षा जास्त पैसा कमवला. चिलकूट पासच्या आसपास अनेक छोटी छोटी गावं वसली. या गावातल्या स्थानिकांनी स्टँपेडर्सना जरुरीच्या वस्तू पुरवण्याचे उद्योग सुरू केले. स्टँपेडर्सचं सामान चिलकूट पास पार करुन पलिकडे नेणं हा ही एक मोठ्या प्रमाणावर चालणारा उद्योग होता. स्थानिक आदिवासांना या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असे. काही व्यावसायिकांनी सामामाची ने-आण करण्यासाठी ट्रामसारख्या सुविधा पुरवल्या. अशा दुर्गम ठिकाणी ट्रामवे बांधून काढणं हे ही त्याकाळी अभियांत्रिकी कसब होतं.

एप्रिल १८९८ मधे ब्रिटीश गुंतवणूकदार व कॅनेडीयन रेलरोड कॉंर्ट्क्टर्सनी मिळून 'व्हाईट पास अँड युकान राउट रेल्वे' कंपनीची स्थापना केली. या कंपनीने व्हाईट पासवर रेल्वे बांधून काढायचं काम हाती घेतलं. अत्यंत प्राथमिक साधनं व ब्लास्टींग पावडरच्या सहाय्याने अतिशय अवघड अशा व्हाईट पासवर १८९९ ला हा रेल्वे मार्ग बांधून पूर्ण झाला. तोवर क्लोंडायक गोल्ड रश जरी आटोपली असली तरी गोल्डरशच्या निमित्ताने का होईना हा भागात दळणवळणाची साधनं उपलब्ध झाली. त्याकाळी मोठ्या खाणकंपन्यांना अवजारं पुरवण्याचं काम या रेल्वेने चोख बजावलं.


(प्राथमिक साधनांच्या सहायाने अतिशय खडतर अशा व्हाईट पासवर बांधण्यात येत असलेला रेल्वेमार्ग)


(सध्या ही रेल्वे पर्यटकांच्या सेवेत रुजू आहे. या रेल्वेच्या मद्तीने व्हाईट पास पूर्ण करता येतो.)

क्लोंडायकच्या धाडसी आणि अजब कहाण्या ऐकतांना डावी बाजूही विचारात घ्यायला हवी. गोल्ड रशमुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं स्थलांतर अलास्का आणि कॅनडात झालं. याचा परीणाम अर्थातच या भागातील स्थानिक आदिवासी जमातींवर झाला. स्थानिक टॅगिश, टचोन, टिलिंगीट जमातींच्या ही जन्मभूमीवर हे मोठं आक्रमण होतं. स्टँपेडर्सनी स्वतःबरोबर आणलेले संसर्गजन्य रोगांमुळे स्थानिक जमातीतल्या अनेकांना आपले प्राण हकनाक गमवावे लागले. लाकडासाठी जंगलं तोडली गेली, सोन्यासाठी नदी तळापासून उपसून काढली गेली. या लोकांचे जगण्याखाण्याचे पारंपारीक स्त्रोत क्षणार्धात नाहीसे झाले.

सोनं शोधण्याच्या नादात स्टँपेडर्सनी नदीपात्रातली गाळाची जमीन मुळापासून खणून काढाल्याने अनेक वनस्पती, मासे यांचं वास्तव्यास धोका निर्माण झाला. अमाप लाकूडतोडीमुळे नैसर्गिक साधन्संपत्तीचा बोजवारा उडालाच होता तसंच निर्सगाचा समतोल ढळला होता. १८९७ साली जेव्हा सोनं डोंगरमाथ्यावर मिळालं त्यानंतर डोंगरही खणून काढले गेले. माळरानं उजाड झाली. १९०० च्या सुमारास अवतरलेल्या मोठ्या अवजारांनी या परिसराची वाताहत आणखीनच वाढवली. आसमंत दणाणून सोडणार्‍या आवाजाबरोबरच खोलवर खणत जाणार्‍या या मशिन्स मोठ्या प्रमाणात खडी, माती उकरुन काढू लागल्या.

डोळ्यांना सहज दिसून न येणारा धक्कादायक बदल या परिसरात घडला. सोन्यावर प्रक्रिया करतांना फार मोठ्या प्रमाणावर पार्‍याचा वापर केला गेला. याचाच परीणाम म्हणून युकान व आसपासच्या भागातल्या पर्यावरणावर झालेला दिसून येतो. अन्नसाखळीतील अनेक घटकांमधे जसं मासे, जंगली प्राणी पार्‍याचं वाढतं प्रमाणं आजही दिसून येतं.

आगीनंतर अवघ्या दोन महीन्यात डाउसन उभं राहील. बहुसंख्य अमेरिकन स्टँपेडर्सनी चार जुलै रोजी आपला स्वातंत्रदिन मोठ्या दिमाखात साजरा केला. नव्याने उभं राहिलेलं डाउसन अत्याधुनिक होतं.

आजवर Seward's Folly या नावाने हिणवला केला गेलेल्या अलास्काचं महत्त्व सरतेशेवटी सामान्य अमेरि़कन जनतेला क्लोंडायक गोल्डरशच्या निमित्ताने कळून चुकलं होतं. William H. Seward ची दूरदृष्टी अमेरीकेला चांगलीच फायद्यात टाकणारी ठरली.

पण अमेरीकेच्या नकाशावर अलास्काच्या बरोबरीने सोन्याच्या झळाळीमुळे अजून एका शहराचा नव्याने जन्म झाला होता. शहर होतं - 'सिटी ऑफ सिअ‍ॅट्ल' !!!

क्रमशः

(लेखात वापरलेली सर्व चित्रे प्रताधिकारमुक्त नाहीत. या चित्रांचे सर्व प्रताधिकार University Libraries (University of Washington) - Digital Collection या विभागाच्या मालकीचे आहेत. या लेखमालिकेसाठी ही चित्रे वापरण्याचे विशेष अधिकार दिल्याबद्द्ल University of Washington चे मनःपूर्वक आभार.)

संदर्भ :

१) Yukon Gold (Charlotte Foltz Jones)
२) Alaska: Celebrate the States (Marshall Cavendish)
३) Mission Klondike (James M. Sinclar)
४) Alaska : saga of a bold land (Walter R. Borneman)
५) Gamblers and Dreamers: Women, Men, and Community in the Klondike (Charlene Porsild)
६) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit

इतिहासलेख

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

20 Jul 2013 - 9:37 am | श्रीरंग_जोशी

जीवाची बाजी लावून स्टँपेंडर्सनी जे काही मिळवले असेल किंवा मिळवण्याच्या जवळ पोचले असतील त्या सर्व गोष्टींवर या अग्नितांडवाने पाणी फेरले.

दुर्दैवी पण जवळ जवळ न टाळता येणारी ही घटना होती असे या लेखमालिकेत वर्णिलेल्या घटनाक्रमावरून वाटत आहे.
हे सर्व इतक्या परिणामकारकपणे इथे मांडल्याबद्दल धन्यवाद.

प्रचेतस's picture

20 Jul 2013 - 9:51 am | प्रचेतस

इत्तम लेखमाला.
पुभाप्र.

जेपी's picture

20 Jul 2013 - 10:42 am | जेपी

*****

पैसा's picture

20 Jul 2013 - 9:18 pm | पैसा

स्टँपेंडर्सची आणि डाऊसनची कथा वाचून वाईट वाटलं. एवढे कष्ट करून शेवट हातात काय आलं? शून्य. शिवाय तिथल्या पर्यावरणाची वाताहत हे तर अजूनच भयानक.

शिल्पा ब's picture

21 Jul 2013 - 12:51 am | शिल्पा ब

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2013 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चाललीय ही माहितीपूर्ण लेखमाला. पुढे क्लोंडायकचं काय झालं हे वाचायची उत्सुकता आहे. पुभाप्र.

कवितानागेश's picture

20 Jul 2013 - 10:12 pm | कवितानागेश

१८९८ मधे क्लोंडायकच्या जमिनीतून $१० मिलियन किंमतीचं सोनं काढलं गेलं तर १८९९ मधे $१६ मिलियन किंमतीचं पण डाउसन पर्यंत पोचण्यासाठी केलेल्या प्रवासात स्टँपेडर्सनी खर्च केला होता एकूण - $६० मिलियन !!!> ही वाचून वाईट वाटलं. शिवाय नैसर्गिक साधनसंपत्तीचे पण खूप नुकसान झालं... कठीण आहे.

प्रसाद गोडबोले's picture

22 Jul 2013 - 11:17 pm | प्रसाद गोडबोले

अप्रतिम लेखन मालिका ...सिअ‍ॅटल्च्या लेखाच्या प्रतिक्षेत

अग्निकोल्हा's picture

23 Jul 2013 - 2:42 am | अग्निकोल्हा

गोल्डरशमधून ताउन सुलाखून निघालेला स्टँपेडर आपल्या पुढच्या आयुष्यात कमालीच्या आत्मविश्वासाची शिदोरी घेउनच वावरला. स्मृतीपटलावर आजीवन जपण्यासारखा हा अनुभव होता.

छान.

सोन्याच्या मागे धावणार्‍या माणसाच्या या अचाट धाडसाचे कौतुक करावे, कि त्याने अविचाराने घडवुन आणलेल्या या प्रचंड नुकसानीकरता त्याला दुषणं द्यावी... कि दुर्दैवी म्हणुन त्याला सहानुभुती दाखवावी???

हे सगळे पदर, त्या घटनेची नाटयमयता किंचीतही कमि होऊ न देता, अगदी व्यवस्थीत उलगडुन दाखवणारे लेखीकेचे कसब जबरदस्त आहे.

क्रमशः बघुन आनंद झाला :)

अर्धवटराव

काही वैयक्तिक कारणांमुळे पुढच्या भागास थोडा उशीर होईल.
वेळात वेळ काढून हि मालिका वाचणार्‍यांचे, आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

रोमांचक.. :) मी ही लेखमाला वाचत असतोच, प्रतिसाद देता येत नाहीत दुर्दैवानं :( पण अत्यंत शुभेच्छा :)