या लेखमालिकेतील हा शेवटचा भाग. त्यानिमित्ताने थॊडंसं मनातलं....
क्लोंडायक गोल्ड रशची गोष्ट मी जेव्हा ऐकली त्यानंतर कित्येक दिवस या गोष्टीने मला वेड लावलं होतं. मिसळपाववर ही गोष्ट लिहायला घेतल्यावर तर मीच या प्रवासाचा भाग बनत गेले. कित्येकदा स्टँपेडर बनून मी कल्पनेतच गर्दीच्या जहाजात घुसण्याचा प्रयत्न केला, तर कधी व्हाईट पास, गोल्डन स्टेअर्स पार केल्यात. सोनं न मिळाल्यावर स्टँपेडर्स इतकीच निराशा मी अनुभवली. मीही अनेकदा या सफरीवर सोनं मिळण्याची स्वप्न पाहीली. सध्या सिअॅट्लमधेच असल्याने अनेकदा गोल्डरशच्या खाणाखुणा शोधण्याचा वेड्यासारखा प्रयत्न केला. काही सापड्ल्या, काही काळाच्या ओघात हरवल्या होत्या. ही गोष्ट माझ्या परीने ऐतिहासिक संदर्भाल कुठेही धक्का न लावता खुलवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. या मालिकेत वापरलेली अनेक प्रताधिकारीत चित्र University of Washington - Digital Collection विभागाने विनामोबदला वापरायला दिली, तसंच सिअॅटलमधील गोल्डरश नॅशनल पार्कने अनेक संदर्भ साहित्य विनामोबदला मला पुरवलं. या मदतीशिवाय ही मालिका पूर्ण करणं अशक्य होतं. या प्रवासात मिपाच्या वाचकांनीही प्रतिसद, व्यनी, खरडींमार्फत भरपूर प्रोत्साहन दिलं. रुढार्थाने लेखनाशी काडीचा संबंध,अनुभव नसलेल्या माझ्या लेखनाला 'दखल' विभागात पाहून आश्चर्य तर वाटलंच पण खूप आनंदही झाला. मिपा प्रशासन व वाचक, प्रतिसादकांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!
***
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ५
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ६
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ७
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ८
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ९
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १०
"We are taking advantage of the Klondike excitement to let the world knew about Seattle" - Erastus Brainerd.
१८७३ च्या आर्थिक मंदीत सापडलेल्या अमेरिकेतल्या अनेक मोठया शहरांबरोबरच पश्चिम किनार्यावर अतिउत्तरेला असलेलं एक छोटसं, थोडंसं दुर्लक्षित शहर होतं - 'सिअॅटल'. आर्थिक मंदीच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतांनाच १८८९ साली लागलेल्या "Greate Seattle Fire" ने या शहराचं कंबरडं चांगलच मोडलं होतं. अशा परिस्थितीत इतर शहरांप्रमाणेच सिअॅटलही एका चमत्काराची अपेक्षा ठेवून होतं आणि सिअॅटलच्या सुदैवाने १५ जुलै १८९७ साली तो चमत्कार 'पोर्ट्लंड' या जहाजाच्या रुपाने सिअॅटल बंदरावर अवतरला होता. सोनं भरुन आलेल्या पोर्ट्लंडच्या रुपाने मरगळलेल्या सिअॅट्ल शहराला अक्षरशः नवसंजीवनी दिली होती.
(अमेरिकेच्या नकाशात अतिउत्तरेला असलेलं सिअॅटल)
भौगोलिकदृष्ट्या सिअॅटल अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावर अतिउत्तरेला असल्याने आलस्काला पोचण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग. परंतु सिअॅटलच्या बरोबरीने आसपासची बंदर जसं सॅन्फ्रान्सिस्को, टाकोमा, एव्हरेट, पोर्ट्लंड, वॅनकुवर, व्हिक्टोरीया ही बंदरं या स्पर्धेत होती. क्लोंडायकला पोचण्यासाठी सिअॅटल बंदराचा वापर जास्तीत जास्त व्हावा तसंच या घटनेचा जास्तीत जास्त फायदा करुन घेण्यासाठी ३० ऑगस्ट १८९७ साली सिअॅटल चेंबर ऑफ कॉमर्सने क्लोंडायकसाठी विशेष माहीती विभागाची (Bureau of Information) स्थापना केली. या विभागाचा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली 'एरास्ट्स ब्रेनार्ड'ची.
(एरास्ट्स ब्रेनार्ड)
१८५५ साली कनेक्टिकट येथे जन्मलेला चुणचुणीत एरास्ट्सने लहान वयात युरोपची सफर पार पाडली होती. युरोपात अनेक ठिकाणी सहलींचं उत्तम आयोजन करुन त्याने नाव कमवलं होतं. अमेरिकेत परतल्यावर त्याने पत्रकारीतेत आपलं नशीब आजमावून पहायचं ठरवलं. पुढे पत्रकारीतेचा व्यवसाय बहरात असतांना प्रकृतीच्या कारणांमुळे एरास्ट्स सिअॅटल शहरात स्थायिक झाला. सिअॅटलमधे त्याने 'प्रेस-टाईम्स' या वृत्तपत्राचा संपादक म्हणून कार्यभार सांभाळू लागला. या नोकरीबरोबरच एरास्ट्सने सिअॅटलच्या राजकीय तसंच सामाजिक वर्तुळातही नाव कमवलं. सिअॅटल चेंबर ऑफ कॉमर्सने क्लोंडायकसाठी विशेष माहीती विभागाची स्थापना केली तेव्हा एरास्टच्या अंगभूत गुणांना ओळखून या विभागाचा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. एरास्ट्सने ही नविन जबाबदारी मोठ्या उत्साहाने व आनंदात मान्य केली.
सिअॅट्ला "क्लोंडायचं प्रवेशव्दार" (Gateway to Klondike) बन्वण्यासाठी एरास्ट्सने आखलेल्या योजनेत महत्त्वाचा मुद्दा होता क्लोंडायकला जाणार्या स्टँपेडर्ससाठी लागणारी सर्व साधनसामग्री (Outfit) एकाचवेळी एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणं. या दृष्टीने पावलं उचलतांना एरास्टसने एक प्रश्नावली तयार केली. त्याच्या प्रती सिअॅटल व आसापासच्या भागात वाटून क्लोंडायक गोल्ड रशसंबधी जागरुकता वाढवण्यास सुरवात केली. क्लोंडायकला जाण्यासाठी लागणारं सामान विकण्यास तयार होणार्या व्यावसायिकांना एरास्ट्सने भांडवल तसंच अनेक सवलती पुरवण्याचं आश्वासन दिलं. एरास्टसला दिल्या गेलेल्या एकूण भांडवलापैकी बराचसा भाग त्याने वर्तमानपत्र व जर्नलमधील जाहिरातींसाठी राखून ठेवला होता. त्याकाळी एका पानासाठी तब्बल $८०० खर्चून Munsey, Cosmopolitan, Scribber's, Review of Reviews आदी अग्रगण्य जर्नल्समधे सिअॅट्ल शहरात उपलब्ध असणार्या निवासाच्या व इतर सोयींच्या जाहिराती छापण्यात आल्या. या जाहिरातींमधे सिअॅटलचा उल्लेख 'Queen City of NorthWest' असा करण्यात आला. ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्याकरीता या जाहिरातींमधे आकर्षक ओळींचा वापर केला जात असे. "Look at you map!". जाहिरात ग्राहकांना आग्रह करीत असे. "Seattle is a commercial city and is to the Pacific Northwest as Newyork is to Atlantic Coast".
एरास्ट्स ब्रेनार्ड्ने Post Inteligencer या अग्रगण्य वृत्तपत्राला हाताशी धरुन क्लोंडयकसाठी विशेष पुरवणी काढली. या पुरवणीच्या मुखपृष्ठावर "Seattle opens the gate to the Klondike Gold Field" अशा मथळयाखाली लिहिलेल्या लेखात क्लोंडायकला जाणारा मार्ग, तेथील हवमान, रहाणीमान, लागणारं सामान, ते मिळण्याचं ठिकाणं याविषयी सविस्तर माहिती पुरवण्यात आली होती. या विशेष पुरवणीच्या एकूण २१२००० प्रती छापण्यात आल्या. त्यातल्या ७०००० प्रती वाट्ण्यासाठी संपूर्ण अमेरीकेतल्या टपाल खात्यात पाठवण्यात आल्या, १०००० प्रती विविध वाचनालयात, मेयर, समाजतल्या अग्रगण्य व्यक्ती यांना पाठवण्यात आल्या. १०००० प्रती नॉर्थन रेल्वेला पाठवण्यात आल्या. 'Seattle is a remarkable place.', 'Something remarkable is sure to occur here.', 'Everybody in the east says Seattle is an extraordinary place.', 'The Seattle spirit has accomplished wonders.' अशा थोड्या अतिशयोक्तीने भरलेल्या वाक्यांची पेरणी केलेल्या या पुरवण्या गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या परंतु प्रत्यक्षात या भागाची काडीचीही माहीती नसलेल्या स्टँपेडर्ससाठी तर मोठीच पर्वणी होती. कर्णोपकर्णी या पुरवणीची बरीच जाहिरात झाली. एकूणच ज्या भागात क्लोंडायकमधील सोन्याची बातमी पोचली नव्हती अशा ठिकाणी बातमी पोचवण्याचं काम या पुरवणीने चांगलचं बजावलं..
या पुरवण्या एरास्टस ब्रेनार्डने सिअॅटलमधल्या वजनदार व्यक्तींना संपर्क साधण्यास सुरवात केली. सिअॅट्लमधील व्यावसायिक, राजकारणी, शिक्षक यांना खाजगी पत्र लिहून आपल्या नातेवईकांना, मित्रपरीवाराला क्लोंडायकला जाण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी व सिअॅटल बंदराचा उपयोग करण्याविषयी आग्रह करीत असे. अशाप्रकारे ज्यांनी पत्र लिहिण्यास तयारी दर्शवली, त्यांना सर्वतोपरी सहाय्य तसंच पत्रव्यवहार करण्यासाठी लागणारा टपालखर्च करण्याचंही आश्वासन ब्रेनार्ड या पत्रात देत असे. याच जाहिरातबाजीचा एक भाग म्हणून एक फिरतं प्रदर्शन बनवून एरास्टस ब्रेनार्डने नॉर्थन रेल्वेच्या सहाय्याने संपूर्ण अमेरीकेत फिरवलं.
एरास्टस ब्रेनार्ड्ने जातीने लक्ष घालून छोटेखानी पत्रिका तयार केली. वॉशिंगटन राज्याचे सेक्रेटरी - Will D Jenkins यांना या सिअॅटल शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्व पटवून त्यांना त्यावर सही करण्यास भाग पाडलं. या पत्रिकेत क्लोंडायला जाण्यासाठी सिअॅटल बंदराचा वापर करणार्या स्टँपेडर्सना अनेक सवलतींबरोबर सुरक्षिततेची हमी देण्यात आली होती. अनेक सवलती व सोयींची बरसात करणारी ही पत्रिका युरोपातल्या फ्रांस, बेल्जियम, इटली, स्वित्झर्लंड या देशांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर ब्रेनार्ड्ने सिअॅट्ल शहराबद्द्ल अधिक माहीती देण्याकरीता शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणची छायाचित्र काढून नाताळची भेट म्हणून पाठवायला सुरवात केली. जर्मनीचा राजा दुसरा कैसर याने बाँबच्या भीतीने ही भेट जेव्हा नाकारली तेव्हा याही घटनेचा वापर लोकप्रियता मिळवण्यास केला.
सहा महिने भरमसाठ जहिरातबाजी केल्यानंतर एरास्ट्स ब्रेनार्डने दुरदृष्टीने ठेवून पुढच्या कामाला सुरवात केली. क्लोंडायकला जाणार्या स्टँपेडर्ससाठी तर सिअॅटलमधे अनेक सोयी होत्या परंतु क्लोंडायक वरुन सोनं भरुन बोटी येतील तेव्हा सोन्याची विश्वासर्हता ओळखून त्याचं योग्य ते मोलं ठरवण्यासाठी Assay Office ची गरज भासेल अशावेळेस सिअॅट्लमधेच Assay Office उपलब्ध असणं हे फार मोलाचं होतं.. वॉशिंग्ट्न डी.सी. मधल्या अनेक बड्या अधिकार्यांना वेळोवेळी भेटून हरतेर्हेने त्यांना सिअॅटलमधे Assay Office ची गरज, त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी ब्रेनार्डने अतोनात प्रयत्न केले. सरतेशेवटी १८९८ च्या जून महिन्यात काँग्रेसने सिअॅट्लमधे Assay Office थाटण्याबाबतचं बिल पास केलं व लागलीच जुलै महिन्यात सिअॅटलला आपलं पहिलंवहिलं Assay Office मिळालं. क्लोंडायकवरुन आलेल्या सोन्याची तपासणी, वजन करुन सोन्याच्या बदल्यात स्टँपेडर्सना Assay Office पैशाचा मोबदला देत असे. Assay office उघडताच पहिल्याच दिवशी $१ मिलियन किंमतीचं सोनं Assay office कडे तपासणीसाठी आणण्यात आलं. आणि त्यानंतर १९०२ सालापर्यंत सिअॅटल Assay Office मधे आणण्यात आलेल्या सोन्याची किंमत होती. $१७४ मिलियन.
या सर्व जाहीरातबाजीचा परिणाम योग्य तो झाला. मंदीने मरगळलेल्या सिअॅटल शहराला क्लोंडायकच्या निमित्ताने नवी दिशा मिळाली होती, एरास्टस ब्रेनार्डच्या जहिरातबाजीने अवघ्या सहा महिन्यात सिअॅटल चेंबर ऑफ कॉमर्सला दहा हजार डॉलर्सच्यावर नफा मिळवून दिला. अवघ्या सहा महिन्यात सिअॅट्ल ही क्लोंडायकला जाणार्या स्टँपेडर्ससाठी मोठी व महत्त्वाची बाजरपेठ बनली. मागणी तसा पुरवठा या तत्त्वाला धरुन सिअॅट्लमधे अन्ननिर्मीती, प्रक्रिय करणारे कारखाने, सूतगिरण्या, क्लोंडयकला जाणार्या प्राण्यासांठी अन्नाचे डबे बनवणारे नवनविन कारखाने भूछत्राप्रमाणे उगवू लागले. यातल्या बराचश्या वस्तूंची नावं क्लोंडायक व गोल्ड रशशी संबधित असत. जसं युकान बटाटे, क्लोंडायक मच्छरदाणी, क्लोंडायक चपला, क्लोंडायक शर्ट. गंमत म्हणजे यातल्या अनेकांनी क्लोंडायक हा शब्दच मुळी आयुष्यात पहिल्यादा ऐकला असल्याने, प्रत्येकजण वस्तूच्या वेष्टनावत 'क्लोंडायक' छापतांना आपल्याला हवा तसा छापत असे. त्यामुळे एकाच शब्दाचं स्पेलिंग अनेक ठिकाणी 'Klondyke', 'Clondyke', 'Klondike' असं वेगवेगळं आढळतं.
सुकवलेली फळं व क्रिस्टलाट्ज्ड अंडी ही दोन महत्त्वाची आणि फायदेशीर उत्पादनं मानली जात. टाचणीपासून ते घडी करुन ठेवता येणार्या छोट्या घरापर्यंत अनेकानेक वस्तूंची जंत्री सिअॅटलच्या बाजारपेठेत लागली होती. दुकानांच्या भाउगर्दी ज्यांना नक्की काय वस्तू घ्यायच्या याची शंका असेल तर त्यांच्या मदतीसाठी खरेदीतले तज्ज्ञ उपलब्ध होते. क्लोंडायकला जाणारा एक स्टँपेडर विल्यम बालोउ म्हणतो, "I like Seattle, all its different fakirs trying to sell you a gold washer, a Klondike Stove, or a dog team with one lame dog which would get well by tomorrow."
क्लोंडायक गोल्ड रशच्या निमित्ताने सिअॅटलमधे वस्त्रोद्योगाची अमाप भरभराट झाली. कूपर अँड लेवी तसंच फिल्सन ही क्लोंडायक आउट्फिट पुरवणारे दोन सिअॅटलमधील नामांकीत नावं होती. यापैकी फिल्सन हे गेली शंभर वर्ष सिअॅटलमधे दिमाखात उभं असून आजही टिकाऊ कापडासाठी ग्राहकांची पहीली पसंत मानलं जातं. तर कूपर अँड लेवी गोल्डरश नंतर Bon Marche या कंपनीला विकण्यात आलं. याच गोल्डरश काळात प्रसिद्ध औषधविक्रेते 'Bartell Drug' उदयास आले. क्लोंडायकला जाणार्या एकूण एक लाख स्टँपेडर्सपैकी सत्तर हजार स्टँपेडर्सनी सिअॅटल बंदराचा वापर केला. याच काळात सिअॅटल बंदराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला.
(क्लोंडायक आउट्फिट्सने भरलेलं कूपर अँड लेवी)
"The stores are ablaze with Klondike goods; men pass by robed in queer garments; ... teams of trained dogs, trotting about with sleds; men with packs upon their backs, and a thousand and one things which are of use in the Klondike trade."
- The Seattle Daily Times,1897
स्वतः घडविलेल्या मूर्तीच्या प्रेमात मूर्तीकरानेच पडावं, त्याप्रमाणे जगासमोर क्लोंडायक गोल्ड रशची थोडी अतिशयोक्तीपूर्ण प्रतिमा उभी करणारा एरास्टस शेवटी स्वतःच या प्रतिमेच्या प्रेमात पडला आणि त्याने क्लोंडायाची वाट धरली. इतर अनेक स्टँपेडर्सप्रमाणे उशीरा पोचल्याने रिकाम्या हाताने तो सिअॅटलला परत आला. काही काळ सिअॅटल शहराच्या विकासाच्या कामात सहाय्य केल्यानंतर आयुष्याच्या अंतिम ट्प्प्यावर त्याला मानसिक रोगाने ग्रासलं. सरकारी इस्पितळात अनेक वर्ष हालाखीच्या स्थितीत खितपत पडलेल्या या सिअॅटल शहराच्या शिल्पकाराची १९२२ साली नाताळच्या दिवशी प्राणज्योत मालवली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या सिअॅटल शहराला नवसंजीवनी देणार्या या माणासाच्या मृत्यूची साधी दखल घेणं हे सिअॅटलमधल्या एकाही वृत्तपत्राला जमलं नाही.
गोल्ड रशमुळे 'Gateway to Alaska' हे बिरुद सिअॅटलला कायमचं चिकट्लं फक्त अमेरिकाच नव्हे तर अनेक देशांना सिअॅटल बंदराचं महत्त्व पटलं होतं. गोल्डरशमुळे फक्त पैसाचं नव्हे तर बराच मानमराब सिअॅटलला लाभला. गोल्डरश नंतर 'Alaska–Yukon–Pacific Exposition' चं यशस्वीपणे यजमानपद भूषवून सिअॅटलने मोलाची भर घातली. सिअॅटल हे आजही अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरील एक महत्त्वाचं बंदर मानलं जातं. दुसर्या महयुद्धाच्या काळात बोंईंगसारख्या उद्योगाची भरभराट तसंच २०व्या शतकात नव्याने सुरु झालेल्या इंटरनेट व संगणक क्रांतीतही मोलाचा वाटा उचलून सिअॅटल हे आज अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांचं माहेघर मानलं जातं. तरीही क्लोंडायक गोल्ड रशचा काळ हा सिअॅट्लच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा लागेल.
(सिअॅटल)
It was through the gold rush that Seattle learned the marketing flair it now applies to selling computer software or persuading people to pay $2 .... for a cup of coffee. - The Economist, 1997.
****
क्लोंडायक गोल्ड रशची कहाणी संपवतांना एका माणसाचा आवर्जून उल्लेख करवासा वाटतो. तो म्हणजे छायाचित्रकार - एरिक हेग. क्लोंडायक गोल्ड रश संबंधी जी महत्त्वाची माहीती छायाचित्रांच्या रुपात आपल्याला आज उपलब्ध आहे ती बरीचशी छायाचित्र एरिक हेगने काढलेली आहेत. व्हाईट पासचा खडतर मार्ग पूर्ण करुन हेग क्लोंडायकला पोचला. छायाचित्रणसाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे प्रकाश. अतिउत्तरेला थंडीत जेव्हा दिवसातले काही तास मिळणार्या अंधुकश्या प्रकाशात, प्राथमिक साधनांच्या सहाय्याने काढलेली ही छायाचित्रं हा एक ऐतिहासिक ठेवा आहे.
(एरिक हेगचा अलस्कातील फोटोग्राफी स्टुडीयो)
सिअॅटलने आपला ह ऐतिहासिक ठेवा 'क्लोंडायक गोल्ड रश नॅशनल पार्क'च्या रुपात जपून ठेवला आहे. ज्या ठिकाणी गोल्डरश आउट्फिट पुरवणारं प्रसिद्ध दुकान 'कूपर अँड लेवी' होतं त्या ठिकाणी आता हे म्युझियम थाटलं आहे.या म्युझियममधे गोल्डरशचा काळ चित्रं, फोटो तसंच प्रतिकृतींमर्फत उभारण्यात आला आहे. हे म्युझियम पर्यट्कांसाठी आठवड्याचे सर्व दिवस विनामूल्य उपलब्ध आहे.
(कॅडीलॅक हॉटेलच्या तळमजल्याला पूर्वी 'कूपर अँड लेवी' होतं. आत तिथे 'क्लोंडायक गोल्ड रश नॅशनल पार्क' आहे.)
समाप्त
संदर्भ :
१) Hard Drive to Klondike - Lisa Mighetto and Marica Montgomery.
२) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit
लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.
प्रतिक्रिया
22 Aug 2013 - 7:52 am | श्रीरंग_जोशी
अमेरिकेच्या औद्योगिक एतिहासातील एक महत्वाचे पण एका मर्यादेपलिकडे फारसे प्रसिद्ध नसलेले पर्व या लेखमालिकेतून सहजपणे डोळ्यांसमोर उभे राहिले.
लेखिकेला मनःपूर्वक धन्यवाद!!
22 Aug 2013 - 10:56 am | जेपी
अप्रतिम प्रवास घडवलात
22 Aug 2013 - 6:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम प्रवास घडवलात
असेच म्हणतो !श्री. तथास्तु यांना त्यांच्या नेहमीच्या चांदण्या (*****) विसरून शब्द लिहायला भाग पाडलेत याची ही लेखमाला रोचक झाली असल्याची खास पावती आहे ! :)
23 Aug 2013 - 12:30 am | किलमाऊस्की
मी माझ्यापुरता तरी ५ स्टार असा त्याचा अर्थ घेतला :-)
23 Aug 2013 - 1:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
ते नेहमी ५ स्टार देतात, शब्द येथेच प्रथम पाहिले... म्हणजे त्यांचे शब्द ५ स्टारपेक्षा जास्त मोलाचे आहेत ! :)
22 Aug 2013 - 11:06 am | प्रचेतस
अतिशय सुरेख मालिका.
बहुत धन्यवाद.
22 Aug 2013 - 11:15 am | सौंदाळा
सुंदर लेखमाला.
भरपुर कष्ट घेऊन आम्हाला बसल्या जागी एका वेगळ्याच विषयाची, विश्वाची मस्त ओळख करुन दिलीत.
22 Aug 2013 - 12:39 pm | भटक्य आणि उनाड
मनःपूर्वक धन्यवाद!!
22 Aug 2013 - 3:31 pm | सोनल परब
खुपच सुंदर आणि मेहनत पूर्ण लिखाण.
22 Aug 2013 - 6:00 pm | वसईचे किल्लेदार
धन्यवाद
22 Aug 2013 - 6:38 pm | प्रसाद गोडबोले
अप्रतिम लेखनमालिका !!
अभिनंदन !
पुलेशु!!
22 Aug 2013 - 7:41 pm | धमाल मुलगा
>>या प्रवासात मिपाच्या वाचकांनीही प्रतिसद, व्यनी, खरडींमार्फत भरपूर प्रोत्साहन दिलं.
कारण, हा विषय, तो हाताळण्याची खुबी अन मांडण्याचं कौशल्य! सगळ्यांनाच भुरळ घातली.
>>रुढार्थाने लेखनाशी काडीचा संबंध,अनुभव नसलेल्या माझ्या लेखनाला 'दखल' विभागात पाहून आश्चर्य तर वाटलंच पण खूप आनंदही झाला.
यू हॅव अर्न्ड इट माय फ्रेन्ड! यू रिअली डिझर्व्ड दॅट :)
>>मिपा प्रशासन व वाचक, प्रतिसादकांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!
छे छे! उलट आम्ही वाचकच आपले आभारी आहोत ही अप्रतिम मेजवानी दिल्याबद्दल.
अॅझ्टेक्स, मायन्सवरचं झालं, मग क्लोंडायक आलं...आता क्लोंडायक संपलं! संपलं ह्याची हुरहूर आहेच, पण आता भूक चाळवली आहे. एकतर तू पदार्पणातच एकापाठोपाठ एक अशा दोन्ही म्याचेस खिशात घातल्या आहेस त्यामुळं आता इजा-बिजा झालं, तिजा काय असेल ह्याची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. :)
पुढच्या विषयनिवडीला आणि तयारीला भरपूर शुभेच्छा! :)
22 Aug 2013 - 9:22 pm | वसईचे किल्लेदार
संपुर्ण मालिका अतिशय आवडली.
आमचा मानाचा मुजरा.
23 Aug 2013 - 1:05 am | आनन्दिता
+१ असच म्हणते.
आणि पुढच्या लेखमालेची वाट पाहण्यात येत आहे असं आवर्जुन नमुद करते....
22 Aug 2013 - 8:39 pm | पिंगू
सही होती क्लाँडायक रश मालिका.. आता पुढची केव्हा
23 Aug 2013 - 12:28 am | किलमाऊस्की
सर्व प्रतिसाद्क व वाचकांचे धन्यवाद !
23 Aug 2013 - 5:41 am | पहाटवारा
तुमची हि लेखमालिका कायम वाचत आलोय आणी हा एक सुरेख अनुभव होता.. वाचताना पदोपदी हे जाणवत होते कि तुम्हि मनाने खरोखर स्टॅम्पेण्डर्स बरोबर प्रवास करताय .. बरोबर दिलेल्या फोटोंनी मजा अजुनच वाढ्वली ..
आता पुढची मालिका काय - क्यालिफोर्नीया गोल्ड रश (?) :)
-पहाटवारा
23 Aug 2013 - 12:09 pm | नि३सोलपुरकर
संपुर्ण मालिका अतिशय आवडली आणि मेहनत पूर्ण लिखाण वाचताना पदोपदी हे जाणवत होते.
धन्यवाद.
पुढच्या लेखमालेची वाट पाहण्यात येत आहे
23 Aug 2013 - 1:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर लेखमालिकेत क्रमशः दिसलं की तसा वाचक म्हणुन अशा लेखनाचा मला कंटाळा. पण, क्लोंडायक गोल्ड रशचा एकेके भाग वेळेवर येत राहीला आणि ते वाचतांना नेहमी मजा येत गेली. येणार्या भागाची उत्सुकता असायची. स्टँपेडरप्रमाणे आपल्याला काही अशा खाणी शोधायच्या नाहीत, पण हा एक त्यांच्याबरोबर आम्हीही केलेला एक अद्भूत प्रवास होता. लेखनाची शैली सुरेख होतीच, सहजपणे वाचन होतं होतं. उगाच बोजड शब्द नाही, उगाच लांब लांब वाक्य नव्हती. इंग्रजी शब्द त्यांचे उच्चार, अर्थ, संदर्भ, चित्र, स्पष्टीकरण हे सर्व ओघवतं असं होतं. आणि लेखनामागे नेहमी घेतलेली मेहनतही दिसायची. थोड्क्यात काय मिपावर आवडलेली एक उत्तम लेखमालिका. मिपा समृद्ध होतं ते अशा लेखनांनी. मनःपूर्वक आभार.
पुढील लेखमालिकेच्या प्रतिक्षेत. :)
-दिलीप बिरुटे
23 Aug 2013 - 2:31 pm | कौस्तुभ_अत्रे
अप्रतिम लेख. असेच लिहित रहा.
23 Aug 2013 - 11:11 pm | पैसा
मला जे म्हणायचं होतं ते सगळं धम्या आणि बिरुटे सरांनी म्हटलं आहेच! तरी पुढच्या क्रमशः ची नाही तर पुढच्या लेखमालिकेची वाट पहात आहे असे म्हणते!
23 Aug 2013 - 11:23 pm | मंदार कात्रे
फार छान लेखमाला
24 Aug 2013 - 12:05 am | कौस्तुभ_अत्रे
काय सांगता ? याच लेख मालिकेचा विस्तार केलात तर पुस्तक सुद्धा लिहू शकता तुम्ही.
अप्रतिम मलिका …!!सर्व भाग एका दमात वाचून काढले. तसे लिंक उपलब्ध करून दिल्याबद्दल मि पा चे सुद्धा आभार.
26 Aug 2013 - 12:07 am | अग्निकोल्हा
तुफान लेखमाला.
24 Aug 2013 - 1:13 am | अर्धवटराव
फारच सुंदर झाली हि मालिका. गोल्डरशची एक्साइटमेण्ट तर पुरेपूर उतरलीच, पण अमेरीका अमेरीकाच का आहे यावर देखील संधीप्रकाश पडला.
अर्धवटराव
25 Aug 2013 - 6:38 am | किलमाऊस्की
सर्व नविन प्रतिसादकांचे आभार !
25 Aug 2013 - 6:50 am | पाषाणभेद
खुपच माहितीपुर्ण लेखमालिका पुर्ण केल्याबद्दल आपले अभिनंदन.
30 Aug 2013 - 9:21 pm | किलमाऊस्की
धन्यवाद!
1 Sep 2013 - 1:25 am | कवितानागेश
खूपच मस्त झालीये ही लेखमालिका. तो वरचा सिअॅटलचा 'सोनेरी' फोटोपण छान आहे. :)
1 Sep 2013 - 7:25 am | जॅक डनियल्स
दरवेळा इकडे टेनेसी मध्ये काही सोन्याचे पहिले की तुमची लेखमाला आठवते मला.
काय जीवाची किंमत देऊन सोने जगभरात पोहचले असेल याची ही लेखमाला वाचून कल्पना येते.
खूप ओघवते आणि माहितीपुर्वक लिखाण झाले आहे. जुने फोटो पण टाकल्याबद्दल खूप सारे धन्यवाद्.
5 Sep 2013 - 12:30 am | किलमाऊस्की
सर्व नविन प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार !
3 Mar 2016 - 9:14 pm | जेपी
सध्या discovery वाहिनी वर gold rush चा नवा सिझन चालु झाला आहे त्यानिमीत्त ही लेखमालीका आठवली..
--
अवांतर-लेखिकेचा आयडी बदलेला दिसतोय..
--अतिअवांतर-
ते चांदण्या देणारे कोण ??;)
3 Mar 2016 - 9:18 pm | किलमाऊस्की
आश्चर्य वाटलं. डिस्कवरीच्या माहितीबद्दल थँक्यू. नक्कीच बघेन कार्यक्रम.
अवांतर - चांदण्या देणार्यांचाही आयडी बदलेला दिसतोय ;-)