क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ९

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
15 Jul 2013 - 6:36 am

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ५
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ६
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ७
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ८

क्लोंडायकमधे जमीनीत लपलेलं सोनं शोधण्यसाठी जी पद्धत वापरात होती तिला 'प्लासेर मायनिंग' असं संबोधतात. या पद्धतीच्या अधिक तपशिलात जाण्याआधी भूगर्भात सापडणारे सोन्याचे विविध प्रकारांवर थोडक्यात नजर टाकू.

(१) Flour Gold - या स्वरुपातलं सोन्याचे कण अत्यंत सूक्ष्म असल्याने नुसत्या डोळयांना दिसणं शक्य नसतं. त्यामुळे जमीनीतून बाहेर काढल्यावर माती, कचरा इत्यादी बाहेर काढतांना ते वाया जाउ नये म्हणून आधी Quick Silver अर्थातच पारा मिसळावा लागतो.

(२) Leaf Gold - अर्थातच सोन्याचे पातळ (साधारण अर्धा इंची ) पापुद्रे.

(३) Wire Gold - छोटे व लांब सोन्याचे तुकडे.

(४) Coarse Gold - सर्वसामान्यपणे Flour Gold ते सोन्याच्या छोट्या तुकड्यांपर्यंतच्या सोन्याच्या प्रकराला Coarse Gold असं संबोघलं जातं.

(५) Nugget Gold - हि सुद्धा सर्वसामान्य संज्ञा आहे ज्यामधे सोन्याच्या छोट्या तुकड्यांपासून अवजड असे मोठे मोठे तुकडे गणले जातात.

सोन्याच्या पातळ अशा एका पापुद्र्याला "कलर" (Color) असं संबोधतात.

युकान व अलास्कात सोनं शोधाणारे प्रॉस्पेक्टर्स 'पॅनिंग' (Panning) पद्धतीने सोन्यचा शोध घेत असत. या पद्धतीत सोनं साधारणपणे खालील प्रकारे शोधलं जाई.

(१) नदीपात्रातली खडीमिश्रित वाळू सोनं चाळण्याच्या पसरट परातीत (Gold Pan) घेतली जाई.

(२) मातीने भरलेल्या या परातीची कड हलकेच स्वच्छ पाण्यात बुडवून आवश्यक तेवढं पाणी भरलं जात असे.

(३) हलक्या हाताने मातीची ढेकळं सुटी केली जात.

(४) यानंतर परात गोल फिरवून सोन्याचे छोटे छोटे कण तळाशी जाईपर्यंत चांगली घंगाळली जात असे. यामुळे मातीतला हलका कचरा, धूळ सोन्याच्या कणांपासून वेगळे होऊन पाण्यावर तरंगू लागत. हा कचरा पाण्याबरोबर फेकून दिला जाई.


(५) ही घंगाळण्याची प्रक्रीया सोन्याचे कण मिश्रित काळी वाळू मिळेपर्यंत वरचेवर केली जात असे.

(६) या प्रक्रियेत वजनाला हलकं पण अत्यंत शुद्ध सोनं फुकट जाण्याची शक्यता असे. त्यामुळे अनेकदा सोन्याच्या कणात पारा (Quick Silver) मिसळत असत. पारा मिसळल्यानंतर तयार होणार्‍या मिश्रणाला 'Amalagam' असं संबोधतात.

(७) त्यानंतर हे मिश्रण मोठ्या भांड्यात घेउन पारा उडून जाईपर्यंत उकळवलं जात असे.

(८)पारा उडून गेल्यावर उरलेलं मिश्रण कापडात घेउन गाळलं जात असे. गरज वाट्ल्यास ही प्रक्रिया वरचेवर केली जाई.


(नदीकाठाशी पॅनिंग करणारा कामगार)

बरेचदा एकाच ठिकाणी बरेच गोल्ड्फ्लेक मिळणं हि त्याठिकाणी भूगर्भात मुबलक सोनं लपलं असल्याची शक्यता मानली जात असे. पॅनिंग करुन अशी जमिन सापडली की प्रॉस्पेक्टर्स त्या ठिकाणी खोल खोदकाम करीत. सोनं शोधण्याच्या या पद्धतीला 'प्लासेर मायनिंग" (Place Mining) अथवा 'Poor man's mining' असं म्हणतात. जेव्हा प्रॉस्पेकटरला अशी एखादी आशादायक जमिन सापडत असे तेव्हा त्याठिकाणी तो आपलं नाव तारीख लिहून ठेवत असे. यानंतर त्याला शहरात जाऊन त्या जागी खोदकाम करण्यासाठी कायदेशिर हक्क म्हणजेच क्लेम (Claim) मिळवण्यासाठी तीन दिवस मिळत. एखाद्या ठिकाणी आधी कुणालाही सोनं मिळालं नाही अशा नविनच भागात जर सोनं सापडलं तर त्या क्लेमला 'डिस्कवरी क्लेम' (Discovery Claim) असं संबोधलं जाई.

एकदा का क्लेम नावावर झाला की पुढची तयारी सुरु होत असे. खोदकामाची सुरवात मुख्यत्वे हिवाळ्यातच केली जाई. कारण वसंत ऋतूत बर्फ वितळून झरे वाहू लागत. अशा वेळी खोदकाम करणं कठिण होत असे. हिवाळ्यात गोठलेली जमीन कामगार फूटभर खणून काढीत, या क्रियेला 'Preafroast' संबोधतात.

त्यानंतर या खणलेल्या खड्ड्यापाशी गोठलेली जमिन वितळवण्यासाठी आग तयार करीत. बरेचदा अशी आग रात्रभर जळत असे. एकदा का आग विझली की वितळलेला बर्फ, माती, कचरा बाजूला केला जाई. या कचर्‍याला 'Musk' म्ह्णतात. गरज वाट्लयास ही प्रक्रिया वारंवार केली जाई. कामगार जसजसं खड्डा जमिनीच्या आत खणत जात असत तसतसं कचरा, माती बाहेर काढणं मुश्किल बनत असे. अशावेळी एक कामगार दोर लावलेली बादली घेउन आत उतरत असे. माती बादलीत भरून वर उभ्या असलेल्या कामगारा़कडे देत असे.

गोठलेल्या जमीनीत खोल खड्ड्यात उतरलेल्या कामगाराला चिखल, धूर, धुळीचा सामना करावा लागे. अतिशय अरुंद असा खड्डा खणत खणत कामगार कातळापर्यंत पोचला की 'ड्रिफ्टिंग' (Drifting) म्हणजेच जमिनीला समांतर खणायला सुरवात करी. अतिशय अरुंद अशा खड्ड्यात कधी आडवं झोपून तर कधी ओणवं उभं राहून ड्रिफ्टिंग करतांना कामगारांची कसोटी लागत असे. खणताखणता कामगार 'पे- डर्ट' (Pay Dirt) अर्थातच ज्या मातीत सोन्याचं प्रमाण आहे अशा ठिकाणापर्यंत पोचत असे. अशी माती भूपृष्ठावर आणून साठवली जाई. तिला 'डंप' (Dump) असं संबोधत. त्याकाळी जमिनीकडे नुसतं वरवर पाहून कितपत आत खणावं लागेल हे सांगणं मुश्किल त्यामुळे अनेकदा महिना महिना खोदकाम करुन काहीही हाताला लागत नसे. अशाठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांना 'Skunk' असं संबोधत. डाउसनमधे उशिराने पोचेलेल्या अनेक स्टँपेडर्सनी सोन्याच्या खाणीत अशाप्रकारचं मिळालं.


(सोनंमिश्रित मातीचा ढिगारा)

वसंतऋतूत जेव्हा बर्फ वितळून कालवे, झरे वाहू लागत तेव्हा खळाळत्या पाण्यात 'Sluice Box' ठेवून त्यात खोल जमिनीतून बाहेर काढलेली सोनं मिश्रित माती स्वच्छ करण्याकरीता भरत असत. पाण्याच्या प्रवाहबरोबर माती वाहून जात असे तर सोन्याचे छोटे कण Sluice Box ला असणार्‍या चर्‍यामधे अडकून बसत. या प्रक्रीयेत स्टँपेडर्सना आपण हिवाळ्यात बाहेर काढलेल्या मातीतून कितपत सोनं हाताला लागलंय याची कल्पना येत असे. ही प्रक्रिया साधारण तीन दिवस वरचेवर केल्यानंतर परातीच्या सहाय्याने Sluice Box मधली वाळू उचलली जाई. ही उरलेली गोल्ड डस्ट जवळच्या बँकेत कागदी चलनाच्या बदल्यात विकली जात असे.


(Sluice Box मधून वाळू काढणारे स्टँपेडर्स)

क्लोंडायच्या जमिनीतून सोनं काढणं जितकं खडतर होतं त्याही पेक्षा कैक पटीने खडतर स्टॅंपेडर्सचं दैनंदीन आयुष्य असे. स्टँपेडर्स ज्या १२ X १६ फूटाच्या छोट्या खोल्यांमधे रहात त्यांना 'केबिन' (Cabin) असं म्हणत. एका केबिनमधे बरेचदा एका स्टँपेडरचं वास्तव्य असे. परंतु अनेकदा दोन अथवा त्यापेक्षा जास्त स्टँपेडर्स एकत्र काम करीत असले तर त्यांना दाटीवाटीने एका केबिनमधे तडजोड करुन रहावे लागत असे. या केबिन्सही आसपासच्या जंगलातून तोडून आणलेल्या लाकडाच्या ओंडक्यापासून बनवल्या जात. छतावर बांबू पसरवून त्यावर छोटी झुडूप, शेवाळं पसवलं जाई. या झुडूपांवर चिखलाचा थर दिला जात असे. उन्हाळ्यात वाढ्त्या उन्हाबरोबर चिखल आणि झाडाझुडूपांनी बनवलेलं हे छत रानटी फुलांनी भरुन जात असे. ज्यांच्याजवळ पैसा असे त्यांना केबिनसाठी काचेच्या खिडक्या लावणं परवडत असे परंतु बहुतेकदा केबिन्स बाट्ल्या, कपडे अशा मिळेल त्या वस्तूंना चिखलाच्या सहाय्याने चिकटवून खिडक्या बनवत.


(केबिन)

केबिनच्या आत नाममात्र वस्तू असत. झोपायला एक छोटेखानी फळकूट्वजा बाकडा , एक मेज, एखादं दुसरी खुर्ची, टेबल आणि हिवाळ्यात केबिन गरम ठेवण्यासाठी व स्वयंपाकासाठी स्टोव्ह. अतिउत्तरेला असल्याने डाउसनमधे हिवाळ्यात दिवस अगदीच कमी तासांचा असे. साधारण सकाळी साधारण दहा वाजता दिवस सुरु झाला की दुपारी दोन वाजेपर्यंत सुर्यास्त होउन तीन वाजेपर्यंत अंधार पडत असे. त्यामुळे दिव्यांना मागणी फार. मेणबत्ती विकत घ्यायची झाली तर $१ ते $१.५० मोजावे लागत तर तेलाचे दिवे $७.५० पर्यंत मिळत.


(केबिनचा अंतर्गत भाग)

थंडीत तापमान शून्याखाली जाणं ही तर नित्याचीच बाब. त्यावेळी स्टँपेडर्सकडे तापामान मोजण्याकरीता थर्मामीटर नसत. त्यामुळे थंडीत तापमान मोजण्यासाठी त्यांनी स्वतःची अशी पद्धत शोधून काढली होती. काचेच्या चार बाटल्या बरेचदा केबिनबाहेर ठेवलेल्या असत. जर पारा भरलेली बाटली गोठली तर तापमान उणे ३८ फॅ. अंशाच्या आसपास आहे असं मानलं जाई. जर व्हीस्की भरलेली बाटली गोठली तर तापमान उणे ५५ फॅ. अंशाच्या आसपास, जर केरोसिन भरलेली बाटली गोठली तर तापमान उणे ६५ फॅ. अंशाच्या आसपास आणि जर पेरी डेविस पेन किलर नावाचं औषध भरलेली बाटली गोठली तर तापमान उणे ७५ फॅ. अंशाच्या आसपास आहे असं मानलं जात असे.

सोनं मिळवण्याच्या अमिषाने क्लोंडायकडे खेचले गेलेले कित्येक स्टँपेडर्स डाउसनमधे येउन हालाखीचं जीवन जगत होते. शांत, रम्य डाउसनचा परिसर तर धूर, धुळीने भरला होता. घनदाट अरण्य Sluice Box, केबिन्स, खाणीत जळणासाठी तोडून नेल्याने हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर होतं. धुराने भरलेलं डाउसनचं क्षितीज दूरवरून युद्धोत्तर रणभूमीगत भासत असे. हे असं किती दिवस चालणार होतं? म्हणतात ना 'प्रत्येक आरंभाचा एक अंत असतो, पण हा शेवट काहितरी नविन आरंभ घेउन येतो.'
आता क्लोंडायक गोल्डरशच्या शेवटाची नांदी लिहीली जात होती.

टिपा :

Sluicing संबधित अधिक समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ

ग्राफिक रेखाटनं आपल्याकडे बरेचदा लहान मुलांच्या पुस्तकांत अथवा कॉमिक्समधे वापरली जातात.परंतु परदेशात बरेचदा कठीण असा विषय सोप्पा करुन समजावण्यासाठी अशा रेखाटनांचा वापर होतो. क्लोंडायक गोल्डरश वरील असंच एक पुस्तक - http://www.amazon.com/The-Klondike-Zach-Worton/dp/B008PI8Y5C%22%20title=%22http://www.amazon.com/The-Klondike-Zach-Worton/dp/B008PI8Y5C">The Klondike हाताला लागलं. या पुस्तकात क्लोंडायकमधे वापरली गेलेली पॅनिंग पद्धत चित्रांच्या सहाय्याने उत्तमरित्या मांडली आहे. या लेखातल्या रेखाचित्रांची प्रेरणा तिथूनच घेतली आहे.

रेखाटनं : शिशिर केळुसकर

(लेखात वापरलेली सर्व चित्रे प्रताधिकारमुक्त नाहीत. या चित्रांचे सर्व प्रताधिकार University Libraries (University of Washington) - Digital Collection या विभागाच्या मालकीचे आहेत. या लेखमालिकेसाठी ही चित्रे वापरण्याचे विशेष अधिकार दिल्याबद्द्ल University of Washington चे मनःपूर्वक आभार.)

संदर्भ :

१) Yukon Gold (Charlotte Foltz Jones)
२) Alaska: Celebrate the States (Marshall Cavendish)
३) Mission Klondike (James M. Sinclar)
४) Alaska : saga of a bold land (Walter R. Borneman)
५) Gamblers and Dreamers: Women, Men, and Community in the Klondike (Charlene Porsild)
६) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit

इतिहासलेख

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

15 Jul 2013 - 9:09 am | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणेच हाही भाग माहितीवर्धक आहे व मांडणी एकदम सुटसुटीत आहे.

अवांतर - सोने खरेदी करताना व वापरताना ते मिळवण्यासाठी लागणार्‍या कष्टांची अजिबात कल्पना येत नाही. कदाचित आजच्या काळात मानवी कष्ट सदर लेखात वर्णिलेल्या कष्टांपेक्षा बरेच कमी असतीलही पण किरकोळ नक्कीच नसतील.

प्रचेतस's picture

15 Jul 2013 - 9:10 am | प्रचेतस

उत्तम माहितीने नटलेला भाग.

जेपी's picture

15 Jul 2013 - 10:21 am | जेपी

*****

ही मालिका संपली कि दुसरी सुरु कर..

चाणक्य's picture

15 Jul 2013 - 11:09 am | चाणक्य

छान लिहिताय. तुमचे कष्ट आणि अभ्यास जाणवतोय. ब-याच गोष्टी नव्याने कळाल्या. येऊद्या आणखी.

सुरेख आणि माहितीपूर्ण लेखन मालिका. :)
बाकी Nugget Gold पाहुन मला अ‍ॅन्ड्रॉइडवरचा Gold Miner हा खेळ आठवला.फुल टीपी आहे.

अग्निकोल्हा's picture

16 Jul 2013 - 6:00 pm | अग्निकोल्हा

'प्रत्येक आरंभाचा एक अंत असतो, पण हा शेवट काहितरी नविन आरंभ घेउन येतो.' आता क्लोंडायक गोल्डरशच्या शेवटाची नांदी लिहीली जात होती.

हम्म!

मुक्त विहारि's picture

16 Jul 2013 - 6:19 pm | मुक्त विहारि

नेहमीप्रमाणेच छान लिहिले आहे..

कवितानागेश's picture

16 Jul 2013 - 7:55 pm | कवितानागेश

छान चाललिये लेखमाला. उत्सुकता वाढतेय. :)

मॅकनाज गोल्ड मध्ये दाखवली आहे तशी सोन्याचे खडक असलेली खाण कुठे आस्तित्वात आहे का?

बा़की माणसाला सहजासहजी न पेलवण्याइतक्य वजनाचे गोल्ड नगेट असतात. लास वेगास मध्ये गोल्डन नगेट या कसिनोमध्ये मोठ्या वजनाचा गोल्ड नगेट ठेवलाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2013 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान माहितीपूर्ण लेखमाला. आता नविन आरंभ कशाचा त्याची उस्तुकता आहे. पुभाप्र.

अर्धवटराव's picture

17 Jul 2013 - 3:20 am | अर्धवटराव

या गोल्डरशचा थरार आणि काठिण्य अगदी सहीसही उतरला.
पु.भा.प्र.

अर्धवटराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jul 2013 - 6:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता क्लोंडायक गोल्डरशच्या शेवटाची नांदी लिहीली जात होती.

पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

सुरेख. अत्यंत माहीतीपूर्ण आणि रोचक लेखमाला.
सुरेख चित्रांनी लेखमालेला चार चाँद लावले आहेत.
धन्यवाद आणि पुढील अशाच लेखनासाठी शुभेच्छा.

या मालिकेतील पुढील भाग - क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ९