क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
1 May 2013 - 11:38 am

इसवी सन १५०० च्या आसपास युरोपात सत्ता काबीज केल्यावर रशियनांनी अतिपुर्वेला सैबेरियाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सैबेरिया काबीज करून पुढे अमेरिका खंडात प्रवेश करायाचा त्यांचा इरादा होता. सैबेरियाच्या दिशेने प्रवास करता करता आशिया खंडाच्या पॅसिफीक किनार्‍यावर त्यांचं लक्ष गेलं. यातूनच सैबेरिया व उत्तर अमेरिका जोडण्याची कल्पना तत्कालीन रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट' याच्या डोक्यात आली. या कल्पनेला कितपत मूर्त स्वरूप देता येईल याची शाहनिशा करण्याकरीता त्याने रशियन नेवीतील डॅनिश ऑफिसर Vitus Bering (१) याला मोहीमेवर रवाना केलं.

https://lh4.googleusercontent.com/-zj5vIxgBiL8/UYBsDT07HvI/AAAAAAAAA6E/uVROy2UtDU0/w331-h461/Peter_the_great.jpg

(रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट')

पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलेल्या Vitus Bering ने १७४१ साली हार न मानता पुन्हा प्रयत्न केले. यावेळी बेरिंगने सर्वप्रथम अलास्काच्या दक्षिण किनार्‍यावरील कायक(Kayak) बेटावर पाय ठेवला. या प्रदेशाची नीट पहाणी करून तिथून परताना त्याने 'सी ओटर्स' (Sea Otter) (२) या समुद्री प्राण्याची कातडी रशियात आणली. अतिशय मऊ मुलायम अशा या कातडयाला रशिया व चीन मध्ये बरीच मागणी होती. या कातडयामुळे रशियात बरीच खळबळ माजली. अनेक दर्यावर्दी व्यापार्‍यांनी मौल्यवान कातडयाच्या हव्यासापोटी अलास्काच्या दिशेने प्रवास सुरू केला. शांत अलास्काच्या भूमीवर झालेले हे पहिलं परदेशी आक्रमण.

https://lh5.googleusercontent.com/-nksREacs5Zw/UYBurquOzJI/AAAAAAAAA6Y/hJu_S5Oz7KU/w769-h461/bering_voyage.jpg
(Vitus Bering ने या मार्गाने अलास्कापर्यंतचा प्रवास केला)

अलास्कात शिरकाव करताच रशियनांनी हळूहळू हातपाय पसरायला सुरवात केली. जगातील इतर जेत्यांप्रमाणे इथेही मुळ आदिवासी जमातींवर हल्ला करून त्यांना मूळापासून उखडून टाकायचा प्रयत्न केला. या परदेशी लोकांमुळे कांजण्या व क्षयरोगासारख्या साथी पसरल्या. इथल्या मूळ जमातींनी जेव्हा याचा प्रतिकार केला तेव्हा रशियनांनी हजारो आदिवासींची कत्तल केली. अखेर अजून एक प्राचीन संस्कृती हावरेपणाला बळी पडली.

१७८४ पर्यंत रशियनांनी आपली पहिली वसाहत अलास्कातील कायक बेटावर वसवली. सर्व काही आलबेल चालत असतांना इ.स. १८६७ च्या आसपास युरोपात उद्भवलेल्या Crimean War मुळे रशियन्स आपली युरोपातली सत्ता टिकवून ठेवण्यात गर्क होते आणि यामुळे अमेरिका खंडातल्या आपल्या वसाहतीकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ लागलं. आधीच ब्रिटिश व अमेरिका अलास्कावर डोळा ठेऊन होते. सततच्या युद्धामुळे रशियालाही पैशाची चणचण भासू लागली होती. त्यातच ब्रिटीशांकडून युद्ध लादण्याची भीतीही होतीच. ब्रिटीशांना रोखण्यासाठी रशियाने सरते शेवटी अलास्का ही वसाहत अमेरिकेला देऊ केली.

अमेरिकचा तात्कालीन राज्यसचिव William H. Seward(३) याला हा प्रांत अमेरिकेत सामील करून घेण्यात रस होता. त्याच्या द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाने क्षेत्रफळाने अतिप्रचंड अशा या प्रांतातील नैसर्गिक संपत्ती, खनिजं, लांबच लांब समुद्रकिनारा याचा भविष्यात अमेरिकेला होणारा फायदा ओळखला होता. त्याने रशियाला अलास्का विकत घेण्यासाठी ७.२ मिलियन डॉलर्स देऊ केले. सुंदर पर्वतराजींनी नटलेला, जगातील सर्वात लांब जागृत ज्वालामुखीची रांग असलेला परंतु मुळ अमेरिकन भूमीपासून बराच लांब, जवळजवळ वर्षभर बर्फाने आच्छादलेला 'अलास्का', ३० मार्च १८६७ साली रशिया व अमेरिकेत झालेल्या करानुसार आता अमेरिकेचा एक भाग बनला होता.

https://lh4.googleusercontent.com/-JmF2kaMgTGM/UYB2h8_gI4I/AAAAAAAAA6o/0fcl-ZmI8Co/w800-h395/Alaska_Purchase_check.jpg

(अलास्का बेट विकत घेताना अमेरीकेने रशियाला दिलेला धनादेश)

Seward च्या दृष्टीने त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेला हा सर्वोत्तम सौदा होता. पण त्याचवेळी त्याला हेही ठावूक होत या सौद्याचं महत्त्व सामान्य जनतेला पटण्यासाठी बराच काळ जाणं आवश्यक आहे आणि झालंही तसंच. सामान्य अमेरिकन जनतेने या कराराची यथेच्छ खिल्ली उडवली. 'Seward's Folly', 'Seward's Icebox, 'polar bear garden' असं या सौद्याच नामकरण केलं गेलं. अलास्का हा एक तर मूळ अमेरिकन भूमीपासून थोडा दूरच, त्यातून वर्षभर बर्फाने आच्छादलेला नव्हे हिमनगांनी भरलेला प्रदेश.

https://lh4.googleusercontent.com/-SigztQx4XnI/UYCTxk_9kzI/AAAAAAAAA8E/I5GguSrUb2Q/w578-h461/alaska_map.jpg
(मूळ अमेरिकन दूर असलेला अलास्का)

बहुसंख्य अमेरिकन जनता कुचेष्टेने या व्यवहारबद्द्ल 'Seven million, two hundred thousand dollars for an inaccessible region of icebergs - the heights of stupidity.' म्हणत असे.

https://lh4.googleusercontent.com/-W7mp15cZHnU/UYB5vUtXFRI/AAAAAAAAA64/9qCNH6eFV90/w630-h450/alaska_purchase+cartoon.gif
(Seward's Folly)

त्यातच पुढे १८९३ साली आलेल्या मंदीमुळे सामान्य अमेरिकन जनता अक्षरशः होरपळून निघाली. या 'Panic of 1893' काळात अमेरिकेत जवळजवळ १५००० उद्योग बंद पडले. सामान्य माणसाला काम मिळणं दुरापास्त होऊ लागलं. निराशेच्या गर्तेत सापडलेला सामान्य माणूस लवकरात लवकर या संकटातून बाहेर पाडण्यासाठी मार्ग शोधू लागला. १८४९ साली कॅलिफोर्नियातील गोल्ड रशने अनेकांना झटपट श्रीमंत केलं होतं. अमेरिकेला यावेळी ही अशाच काहीश्या चमत्काराची गरज होती. याच आशेवर अनेकांनी अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील राज्यात सोनं शोधण्यास सुरुवात केली. त्यातच एक दिवस प्रोस्पेकटर्स Joe Juneau Richard Harris यांना अलास्काच्या नैऋत्य किनारर्‍यावर सोनं सापडल्याची बातमी अमेरीकेत थडकली आणि सोनं मिळण्याच्या आशेवर सॅनफ्रान्सिस्को व सिअ‍ॅटलच्या बंदारवर जहाजं भरून माणसं उतरू लागली.

https://lh6.googleusercontent.com/-aaMYco8x9iY/UYB8TYCw4HI/AAAAAAAAA7I/-F2sCi3CXnE/w686-h461/0052_BOARDING_THE_PORTLAND.JPG
(सिअ‍ॅटल बंदरावरील प्रोस्पेकटर्सची गर्दी)

आजवर Seward's Folly या नावाने अवहेलना केला गेलेला हाच अलास्काचा भूभाग एका नाटयमय कहाणीचा साक्षीदार होणार होता.

कहाणी होती मानवी इर्ष्येची, दुर्दम्य इच्छाशक्तीची, शौर्य आणि असामान्य धाडसाची,
कहाणी असामान्य कष्टाची, मानवी स्वप्नांची, आशा आणि निराशेची, घोर अपेक्षाभंगाची....
कहाणी एका देशाचा भूगोल आणि इतिहास बदलणारी,
कहाणी सुरु होणार होती 'क्लोंडायक गोल्ड रश' ची ....

क्रमश:

(१) Vitus Bering :

https://lh4.googleusercontent.com/-3wk_ldWzvcQ/UYCSKC5RagI/AAAAAAAAA7o/z9eb-tkbleo/w180-h200/Vitus_Bering.jpg

(२) सी ओटर्स :
https://lh6.googleusercontent.com/-GbtCSwOd0RM/UYCRPQegv4I/AAAAAAAAA7Y/ftnOiSJNWeo/w733-h488/Sea+Otters.jpg

(३) William H. Seward :

https://lh6.googleusercontent.com/-EuXOhK9LVDg/UYCTbjNezSI/AAAAAAAAA78/VYHB1fMhroM/w225-h274/seward.jpg

(४) Bering Strait : Vitus Bering च्या मार्गाने अलास्कात पोचला त्या चिंचोळ्या समुद्री मार्गाला त्याचं नाव देण्यात आलं आहे.

https://lh3.googleusercontent.com/-EQo6Xs_J21w/UYCSKNd2FZI/AAAAAAAAA7k/G7GMiexv3ng/w484-h300/Bering_strait.jpg

संदर्भ :
१) Yukon Gold (Charlotte Foltz Jones)
२) Alaska: Celebrate the States (Marshall Cavendish)
३) Mission Klondike (James M. Sinclar)
४) Alaska : saga of a bold land (Walter R. Borneman)
५) Alaska : the last frontier.
६) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit

लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

1 May 2013 - 11:44 am | बॅटमॅन

भारीच!!!! टिपिकल हेमांगीके ष्टाईलप्रमाणे हा लेख एकदम संदर्भसंपृक्त झालेला आहे, आणि रोचक विषयामुळे चार चांदच का सूर्यही लागलेले आहेत. लेख मस्त आवडला, पुढील भागाच्या प्रतीक्षेत. हा इतिहास आजपर्यंत कधी नीट वाचला नव्हता, तो या निमित्ताने वाचावयास मिळेल. :)

सुहास झेले's picture

1 May 2013 - 11:56 am | सुहास झेले

वाह... आजवर ह्या इतिहासाबद्दल काहीच वाचले नव्हते. आता वाचायची तीव्र इच्छा आहे.

पुढचा भाग लवकर येऊ देत :) :)

तिमा's picture

1 May 2013 - 12:04 pm | तिमा

अलास्का हे, अमेरिकेने रशियाकडून विकत घेतले हे माहित होते, पण ते आधी रशियनांना कसे मिळाले हा इतिहास माहित नव्हता.
लेख छान झाला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2013 - 3:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता अजून माहितीची उत्सुकता चाळवली गेली आहे. सुंदर माहितीपूर्ण लेख.

पुभाप्र.

आदूबाळ's picture

1 May 2013 - 1:28 pm | आदूबाळ

सुंदर लेखन! पुभाप्र!

अग्निकोल्हा's picture

1 May 2013 - 2:09 pm | अग्निकोल्हा

पुलेश..

वाचतोय... मस्त जमलाय हा भाग!

काही फोटो दिसत नाहीयेत. दुरूस्त करता येईल का प्लीज..?

मला दिसत आहेत सर्व फोटो.

छान.
पुढील भागाकरिता शुभेच्छा

वाचतीये. उत्सुकता वाढवणारे लेखन.

श्रीरंग_जोशी's picture

1 May 2013 - 6:37 pm | श्रीरंग_जोशी

मेक्सिकोपर्व लेखमालिकेप्रमाणेच माहितीपूर्ण लेखन. पुभाप्र.

अवांतर - माझ्या अर्धवट असलेल्या लेखमालिकेला रुळावर आणण्यासाठी प्रोत्साहन मिळाले, धन्यवाद.

प्यारे१'s picture

1 May 2013 - 6:42 pm | प्यारे१

माहितीपूर्ण. पुलेशु.

वेगळ्या विषयावरचं माहितीपूर्ण आणि रोचक लेखन. आवडलं.
तुमच्या जुन्या लेखमालिकाही वेळ मिळेल तशा (खरं तर वेळ काढून) वाचेन आता.

मुक्त विहारि's picture

1 May 2013 - 9:19 pm | मुक्त विहारि

छान सुरुवात..

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

तुमचा अभिषेक's picture

1 May 2013 - 9:36 pm | तुमचा अभिषेक

वाचतोय.......

पैसा's picture

3 May 2013 - 6:42 pm | पैसा

एकदम माहितीपूर्ण!

उर्मिला००'s picture

13 Aug 2013 - 4:09 pm | उर्मिला००

अप्रतीम!!!!!!