क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ६

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
19 Jun 2013 - 9:59 pm

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ५

(लेखात वापरलेली सर्व चित्रे प्रताधिकारमुक्त नाहीत. या चित्रांचे सर्व प्रताधिकार University Libraries (University of Washington) - Digital Collection या विभागाच्या मालकीचे आहेत. या लेखमालिकेसाठी ही चित्रे वापरण्याचे विशेष अधिकार दिल्याबद्द्ल University of Washington चे मनःपूर्वक आभार.)

व्हाईट पासप्रमाणेच क्लोंडायकला जाणारा अजून एक मार्ग होता 'चिलकूट पास' (Chilpkoot Pass). व्हाईट पासपासून तीन मैल उत्तरेस असणारा चिलकूट पास शेकडो वर्षांपासून स्थानिक चिलकट ईंडीयन्स व्यापार उदीमासाठी वापरत असत. गोल्ड रशची सुरवात होण्याआधी कैक वर्षे या स्थानिक लोकांची मक्तेदारी या मार्गावर होती. क्लोंडायक भागात सोनं सापडलं आणि या भागाचं नशीब पालटलं. गोल्डरशमुळे लोटलेल्या गर्दीपुढे आपला टिकाव लागणं अशक्य हे या स्थानिक चिलकट जमातीने ओळखलं. थोड्याफार लुटुपुटुच्या विरोधानंतर या स्थानिकांनी गोल्डरशला जाणार्‍या स्टँपेडर्ससाठी पॅकरचं काम करणं यात आपला फायदा आहे हे वेळीच ओळखलं.

https://lh4.googleusercontent.com/-Gj1wUGlCUnA/Ub-Dm39BKfI/AAAAAAAABJM/T33YQgJPUvE/w380-h532-no/topomap.gif
(चिलकूट पासचा मार्ग)

व्हाईट पासच्या तुलनेत ६०० फूट उंच आणि जास्त खडबडीत असा ३३ मैल लांबीचा चिलकूट पास, क्लोंडायकवारीला जाणार्‍या स्टँपेडर्समधे लोकप्रिय मार्ग होता. या मार्गाने प्रवास करण्यासाठी बोटीने सिअ‍ॅटलवरुन डाईया (Dyea) या बंदरावर स्टँपेडर्स उतरत असत. डाइयाला स्वतःचं बंदर नव्हतं तसंच किनार्‍याजवळ बोट जाण्याइतकं पाणी खोलही नव्हतं. बोटीतून उतरल्यावर किनार्‍यापर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना छोट्या होडीतून सामान किनार्‍यावर पोचवावे लागत असे. एवढ्या प्रचंड प्रमाणात सामान किनार्‍यावर एकाच वेळी आणणं अशक्य असल्याने थोडं थोडं करुन किनार्‍यावर आणलं जाई आणि लागलीच ते उंच ठिकाणी हलवावं लागे कारण भरतीच्यावेळी तीस फूटापर्यंत पाणी चढण्याची भीती असे. आधीच बोटीच्या प्रवासाने थकले भागलेले प्रवासी भराभर सामान हलवू शकत नसत अशावेळी भरतीची मोठी लाट सामान भिजवून जाई. भरतीच्या मोठ्या लाटांबरोबर आयुष्यभराची कमाई खर्ची घालून आणेलेलं सामान अक्षरशः डोळ्यासमोर वाहून जात असे.

https://lh4.googleusercontent.com/-mZKUqS62BmI/UcHadPq2ipI/AAAAAAAABM4/oRG5aLnH8Ks/w628-h500-no/scow.jpg
(स्टँपेडर्स व त्यांचं सामान डाइयाच्या किनार्‍यावर आणणारी छोटी नौका)

कसंबसं वाचवलेलं सामान घेउन स्टँपेडर्स डाइयावरुन पुढ्च्या प्रवासाला लागत. प्रवासाचा पुढचा टप्पा 'कॅनियन सिटी'. कॅनियन सिटीला पोचल्यावर सामान वाहण्यासाठी घोडागाडी अथवा हमलाची सोय करता येत असे. घोडगाडीचा दर होता $१०० आणि हमालाचा दिवसाला $२५. पोटाला चिमटा काढून सोन्याचा हव्यासापायी एवढा लांबचा प्रवास करुन आलेल्या अनेक स्टँपेडर्सना हा दर परवडणं निव्वळ अशक्यच होतं. यावर उपाय म्ह्णून अनेकांनी स्थानिक लोकांची मदत घेऊन उरलेला रस्ता पार करयचं ठरवलं. स्थानिक लोकांचा दर होता पौंडाला १० सेंट. गोल्डरशचा जोम जसा वाढू लागला तसा हा दर प्रत्येक आठवड्याला वाढू लागला. १० वरुन ३०, ४० सेंट्पर्यंत गेला. स्थानिक लोकांना या भागाची , हवमानाची चांगलीच जाण असल्याने हा सौदा तसा स्वस्तच पडणार होता

https://lh4.googleusercontent.com/-BeP4kQRs8sg/UcHbAaQfXKI/AAAAAAAABNE/5EXtOOpty58/w627-h505-no/pac.jpg
(स्थानिक रहिवासी फोटोसाठी पोझ देतांना)

यापुढचा टप्पा 'प्लिसंट कँप' (Pleasent Camp' आणि त्यानंतर 'शीप कँप' (Sheep Camp). शीप कॅंप हे शेवटचं ठिकाण जिथे स्टँपेडर्सना लाकूड्फाटा तसंच थोडेफार खाद्यपदार्थ उपलब्ध होत असत. शिप कँप नंतर 'स्टोन हाउस' हा दगड आणि खाचखळग्यांनी भरलेला रस्ता पार करावा लागे. स्टोन हाऊसनंतरचा टप्पा होता 'स्केलस' (Scales). या ठिकाणी स्टँपेडर्सना आपलं सामान पुन्हा एकदा वजन करुन पहता येत असे. या ठिकाणी रस्त्याची उंची थोडी वाढत असे तसंच ट्रेक थोडा अवघड होता असे. या ट्प्प्यासाठी हमाल वाढीव दर म्हणजेच पौंडाला $१ लावत असत.

एकदा स्केल्स पार केलं की चिलकूट पासचा खरा ट्रेक सुरू होत असे. यापुढे तीन मैलांचा चिंचोळा आणि ३५ अंश उतार असेलला अतिशय 'समीट पास'चा (Summit Pass) रस्ता पार करणं हे एक आव्हानच होतं. त्यात भर म्हणून बर्फाची वादळं आणि सोसाट्याचा वारा. जोरदार वार्‍यामुळे स्टँपेडर्सना कित्येकदा सरळ उभंही रहाता येत नसे, समिट पार करणं तर दुरची गोष्ट होती. सततच्या बर्फवृष्टी व पावसामुळे कित्येकदा स्टँपेडर्स तंबूतच तळ ठोकून रहात. सरतेशेवटी फेब्रुवारी १८९८, डोंगर पार करण्यासाठी बर्फात जवळजवळ १५०० पायर्‍या खोदण्यात स्टँपेडर्सना यश आलं. चिलकूट पास पार करण्यासाठी हा सर्वात अवघड भाग होता. अतिशय अरूंद, तिरपा व उतार असलेल्या या पायर्‍यांना 'गोल्डन स्टेअर्स' (Golden Stairs) असं ओळखलं जातं.

https://lh3.googleusercontent.com/-tMohHz8rkMc/UcHbhFTjRFI/AAAAAAAABNc/K59WI9XnPEE/w630-h505-no/chil.jpg
(गोल्डन स्टेअर्स पार करतांना स्टँपेडर्स)

या पायर्‍यांच्या एका बाजूने तोल सांभाळण्यासाठी दोरी बांधण्यात आली होती. तसंच स्टँपेडर्सना विरामासाठी मधे थांबण्यासाठी जागाही ठेवण्यात आली होती. गोल्डन स्टेअर्स पार करण्यासाठी साधारणपणे एका माणसाला सहा तास लागत. पण पाठीवर ५० पौंडाचं वजन घेऊन या पायर्‍या पार करणं हे एक आव्हान होतं. सोसाट्याच्या थंड वार्‍याला तोंड देत अरुंद अशा पायर्‍यांवर पाठीवर वजन घेउन अर्धकमान झालेलं शरीराचा तोल सांभाळणं जिकीरीचं काम होतं. स्टँपेडर्स एकाच वेळी थंडीने कुडकुडत तर पाठीवरच्या ओझ्याने घामाने डबडबून जात असत.

https://lh5.googleusercontent.com/-ZysmBzMdlHA/Ub-1E3XnsqI/AAAAAAAABLY/2_kaTxyUnUM/w620-h532-no/chilkoot+golden+stairs.jpg

स्टँपेडर्स थोडं थोडं सामान घेउन खाली वर करीत. जर दोन किवा त्यापेक्षा अधिक सहकारी असतील तर सामान ने-आण
करणं सोपं होतं. एक जण सामान वरती नेऊन ठेवेपर्यंत दुसरा खाली सामानाची राखण करीत असे. सामान ठेऊन खाली उतरणं त्यामानाने कमी जिकीरीच होतं. खाली उतरण्यासाठी काही स्टँपेडर्स बर्फावरुन खाली घसरत खाली येत तर काहींनी सोनं चाळण्यासाठी आणलेल्या पसरट परातीत बसून खाली सरकत येतं असत. खरंतर या भागात ट्रामवे बांधण्याचं काम डिसेंबर १८९७ मधे चालू होऊन साधारण १८९८ च्या मे महीन्यापर्यंत पाच ट्राम वे कार्यरतही झाले होते. पण ट्राम वे चं तिकीट सामान्य स्टॅंपेडर्सच्या खिशाला न परवडण्यासारखं होतं.

https://lh3.googleusercontent.com/-QH7C577m22E/Ub-DlEWmuyI/AAAAAAAABIw/Th0_xJJzEsY/w436-h342-no/Chilkoot_Pass_-_Alaska.jpg

सर्व स्टँपेडर्स ट्प्प्याटप्प्याने खालून वर आणून एका ठिकाणी जमा करीत असत आणि खुणेसाठी आपलं फावडं जमिनीत रोवून ठेवत असत. या भागात बर्फाची वादळं तशी फारच सामान्य बाब. व्हायचं काय की बर्फाचं वदळ आलं की चार-पाच फूट बर्फाचा थर जमा होत असे. आणि जमा करुन ठेवलेलं सामान या बर्फाच्या थराखाली गडप होत असे. स्टँपेडर जेव्हा सामानाचा पुढचा भार घेउन आपल्या निश्चित स्थळी पोचत असे तेव्हा त्याला त्याच्या वस्तू गायब झालेल्या दिसत. बर्फाच्या ढिगात आपलं सामान शोधून काढण्यत बराच वेळ जाई. त्यातच अधून मधून येणारी वादळं अडथळा आणीत. एकदा का बर्फाचं वादळ आलं की तापमान अचानक उणे ५० अंशाखाली जात असे. त्यामुळे कित्येक स्टँपेडर्सना हा टप्पा पार करायला ३ महीने लागले.

https://lh5.googleusercontent.com/-HT3O_mQPebQ/Ub-G6XBTMdI/AAAAAAAABKQ/Ya6bOi08cSg/w677-h532-no/stacks.jpg
(समीट पासजवळ सामान गोळा करुन ठेवतांना स्टँपेडर्स)

समिट पासच्या आसपास वसंतऋतूत हिमस्खलन (Avalanche) होणं ही फार सामान्य बाब असे. स्थानिक आदीवासी जमातींना वर्षानुवर्षांच्या अनुभवातून या नैसर्गिक घटनांची चांगलीच जाण होती. ३ एप्रिल १८९८ ला झालेल्या बर्फाळ वादळामुळे समिट पासचा रस्ता बर्फाने झाकून गेला. स्थानिक पॅकर्सनी प्रवास न करण्याच्या सूचना आधीच दिल्या होत्या आणि त्यानुसार अनेक स्टँपेडर्सनी तात्पुरती विश्रांती घेण्यातच पसंती दाखवली परंतु आधीच सततच्या बर्फवृष्टीमुळे विश्रांती घेतलेल्या काही स्टँपेडर्सचा धीर सुटू लागला आणि त्यांनी पुढची वाट धरली. त्यांनी प्रवास सुरू केल्यानंतर काही मिनीटातच अचानक झालेल्या हिमस्खलनात २० मिनीटात स्टँपेडर्स जागीच बर्फात गाडले गेले.

https://lh3.googleusercontent.com/-dYBJ-yZ02Hk/Ub-s5aN6_SI/AAAAAAAABK0/ASeeU5Z5r8Q/w678-h532-no/avalanche.jpg
(३ एप्रिल १८९८ ला झालेल्या हिमस्खलनात गाडले गेलेले मृतदेह शोधणारे इतर स्टँपेडर्स)

समीट पासजवळच कॅनेडीयन कस्ट्म व इमिग्रेशन अधिकारी कॅनडात नेण्यात येणार्‍या सर्व वस्तूंवर कर गो़ळा करण्याचं काम करीत. स्टँपेडर्सना आणलेल्या प्रत्येक वस्तूवर वस्तूवर २५ ते ३० टक्के कर भरावा लागत असे. तसंच कॅनडात लागणार्‍या वस्तूंचा साठा यादीप्रमाणे आहे की नाही याची ही खात्री केली जाई. कर गोळा करण्याबरोबरच अधिकारी या भागात येणार्‍या प्रत्येक स्टँपेडरची माहीती नोंदवून घेत. माहीती गोळा करण्यामुळे चोरांचा बंदोबस्त तर करत येई तसंच एखाद्या स्टँपेडरला रस्त्यात अपघात झाल्यास त्याला मदत करतांनाही ही माहीती उपयोगात येई.

https://lh6.googleusercontent.com/-dLylMNM_ng4/Ub-uTC3Vg1I/AAAAAAAABLA/MAjK0p35deY/w662-h532-no/customs.jpg
(समीट पास जवळील तंबूत थाट्लेलं कॅनेडीन कस्टम व इमिग्रेशन ऑफिस)

चिलकूट पासच्या प्रवासात अनेकांनी गरजेच्या वस्तूंबरोबर काचेची भांडी, पियानो, रेशमी कपडे, जुनी वर्तमानपत्रं अशा अनेक गोष्टीही आणल्या होत्या. बिली हाउसन आणि त्याच्या बायकोने पियानोच्या साउंडबोर्ड्ला लोकर गुंडाळून आणली होती. हे दांपत्य जेव्हा डाउसना पोचलं तेव्हा बिलीने $१२०० ला पियानो विकला तर त्याच्या बायकोने गुंडाळून आणलेल्या लोकरीचे स्वेटर विणून पैसे कमवले. रेल्वे कर्मचारी रगने जवळचे पैसे संपल्यावर वाटेत थांबून आचार्‍याचं काम केलं आणि जमलेल्या पुंजीतून हमालकरवी चिलकूट पास पुर्ण केला. डाईयात उतरलेल्यापैकी मजलदरमजल करीत अनेक स्टँपेडर लेक लिंड्मन पर्यंत पोचले. व्हाईट पासप्रमाणे इथेही अन्नविषबाधा, न्युमोनिया, अपघातात बरेच स्टँपेडर मृत्युमुखी पडले. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जवळजवळ ६६००० स्टँपेडर्सनी चिलकूट पास पूर्ण केला.

व्हाईट पास असो वा चिलकूट, दोन्ही मार्गाने लेक बेनेट वा लेक लिंडमन पर्यंत आलेल्या स्टँपेडर्सनी अर्धी लढाई तर यशस्वीपणे जिंकली होती. त्यांनी अत्यंत खडतर असा रस्ता पार केला होता, अशक्य असं हवामान अंगावर झेललं होतं, रोगराईला समर्थपणे तोंड दिलं होतं. आपण शारीरिकदृष्ट्या या प्रवासासाठी सक्षम असल्याचं सिद्ध केलं होतं. आता फक्त आव्हान बाकी होतं लेक लिंडमन वा लेक बेनेट पार करण्याचं.

***

संदर्भ :
१) Yukon Gold (Charlotte Foltz Jones)
२) Alaska: Celebrate the States (Marshall Cavendish)
३) Mission Klondike (James M. Sinclar)
४) Alaska : saga of a bold land (Walter R. Borneman)
५) Gamblers and Dreamers: Women, Men, and Community in the Klondike (Charlene Porsild)
६) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit
७) Skagway - City of the new Century : Lynn Canal Publishing

इतिहासलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

19 Jun 2013 - 10:16 pm | मुक्त विहारि

हा पण भाग आवडला..

पैसा's picture

19 Jun 2013 - 11:22 pm | पैसा

अगदी गुंगवून टाकणारी हकीकत!

अजो's picture

21 Jun 2013 - 7:18 pm | अजो

मस्त..पुभाप्र.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2013 - 10:02 pm | श्रीरंग_जोशी

छान सुरू आहे लेखमालिका. प्रत्येक भाग एकाहून एक आहे.

अवांतर - हे गोल्ड रश तर संपले, भारतीयांचे गोल्ड रश कधी संपणार? देशाच्या अर्थव्यवस्थेवर भयंकर ताण पडतोय हे जाणूनही काही सकारात्मक बदल दिसत नाहीत :-(.

प्यारे१'s picture

21 Jun 2013 - 10:03 pm | प्यारे१

काय काय करतात लोक. अजबच.
आने दो आने दो!

प्रसाद गोडबोले's picture

22 Jun 2013 - 12:39 am | प्रसाद गोडबोले

लय म्हणजे लय म्हणजे लय भारी !!

प्रचंड उत्कंठावर्धक लेखन !!

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !

(मिपाकरांची एक ट्रीप कम एक्सप्लोरेशन अ‍ॅडव्हेंचर काढुयात ह्या जागी !!)

धमाल मुलगा's picture

22 Jun 2013 - 3:08 am | धमाल मुलगा

बर्‍याच मोठ्या ग्यापनंतर पुढचा भाग आला..अर्थातच वाट पहातच होतो. भारीए हे क्लोंडाएक प्रकरण.
नेटावर अंमळ शोध घेतला, पण क्लोंडायक गोल्ड रशवरचे सिनेमे काही मिळाले नाहीत बुवा. (एक चार्ली चॅप्लिनचा सोडता. पण त्याची जातकुळीच वायली आहे.) काही ठाऊक असतील असे शिनेमे तर सांगा की.

किलमाऊस्की's picture

24 Jun 2013 - 2:45 am | किलमाऊस्की

क्लोंडायक गोल्ड रश वर व्यावसायिक सिनेमे तरी पाहिले नाहीत चार्ली चप्लिनचा वगळता. डॉक्युमेंट्रीज मिळतील तूनळीवर.

शिल्पा ब's picture

22 Jun 2013 - 3:57 am | शिल्पा ब

नेहमीप्रमाणेच आवडलं.

किलमाऊस्की's picture

1 Jul 2013 - 12:32 am | किलमाऊस्की

या मालिकेतील पुढील भाग - क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ७