दोसतार-१०

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
24 May 2018 - 12:13 am

मागील दुवा https://misalpav.com/node/42617

आईने तीच्या हातातला पुडा पिशवीत ठेवला. या शेंगा बाबाना . तो पुडा तुला. मी पुड्यातल्या चार गरम शेंगा काढून आईला दिल्या. आईने माझ्या हातातला पुडा किती गरम आहे याचा अंदाज घेतला आणि तो माझ्या शर्टच्या खिशात उपडा केला.
अर्धवट भिजलेल्या शर्ट मुळे वाजणारी थंडी त्या खिशातल्या गरम शेंगानी एकदम पार पळवून लावली.
पुढच्या आठवड्यात पुस्तंक आली आहेत का ते पहायला यायचं ते पाऊस येणार आहे हे बघूनच. हे ठरवूनच टाकले.

पुस्तकं कधी येणार हे माहीत नव्हते. शाळेच्या वर्गात बहुतेकांची हीच परिस्थिती होती. त्यामुळे वर्गात फक्त गणीत , संगीत, चित्रकला आणि पी टी हेच तास होत होते.
इतिहास शिकायला पुस्तकं हवं कारण तहाची कलमे सरांनाही माहीत नव्हती. अभ्यासक्रमात काहितरी बदल झालेले होते म्हणून नवीन पुस्तकाप्रमाणे इतिहास शिकवणार असे त्यानीच वर्गात सांगितले . भुगोलाचेही तेच. पुस्तकं बदललं म्हणुन इतिहास कसा काय बदलतो तेच मला समजत नव्हते. मी सरांना विचारणार होतो. की पुस्तक बदलले म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी वरच होणार ना की दुसरीकडे कुठे ? पण टंप्याने मला थांबवलं. म्हणाला नवीन आहेस शाळेत. हे सर लैच खवट आहेत. एकदम मारकुटे. विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न आवडला नाही तर छडीने मारतात आणि दुसर्‍या दिवशी पालकांना बोलावून घेतात.
खरे तर मला टंप्याने काय सांगितले ते समजलेच नाही. पण प्रश्न विचारला तर या शिक्षकांपासुन काहितरी धोका आहे इतकेच समजले. वर्गात तास चालु असताना आम्ही बोलतोय ते सरांना समजू नये म्हणून आम्ही डोळ्यानी सरांक्डे पहात पण एकमेकांशी बोलत होतो. ते ही ओठांची हालचाल न करता.त्यामुळे नक्की काय बोलतोय तेच कळत नव्हते. बाकीचे सगळेच जण बहुतेक असेच करत असावेत. वर्गात चालू एस टी बस मधे सगळे एकदम बोलतात ना तसे काहिसे झाले होते. बोलताना कोणीच दिसत नव्हते पण आवाज मात्र येत होता. सर्वांचा एकत्रीत . फरफर्‍या स्टोव्ह चालू असल्यावर येतो ना तसा काहीसा. सर थोड्या थोड्या वेळाने डस्टर टेबलावर खाट खाट आपटून आवाज करत होते. त्या खट खट आवाजामुळे वर्गाच्या आवाजात अर्धा एक मिनीट फरक पडत होता. मला तर पिठाच्या गिरणीत गिरणीवाल्याने हातातील लाकडी दांडक्याने त्या गिरणीच्या पट्ट्याला लावलेल्या मोटारवर काही तरी ठाक ठुक असे ठोकले की गिरणीच्या आवाजात फरक पडतो ना तसे काहिसे वाटत होते.
कोणत्याही वर्गात काहीही न शिकवता पस्तीस चाळीस मिनिटे पन्नास साठ मुलांना नुसते शांतपणे बसवने ज्या कोणाला जमले त्यांना सरकारने एक स्पेश्यल बक्षीस द्यावे . सरांना थोड्या फार प्रमाणात अधून मधून हे जमत होते. त्याना आख्खे बक्षीस नाही पण बक्षिसाची सावली बक्षीस म्हणून द्यायला हरकत नसावी. सर काही शिकवत नव्हते, कोणाकडेच पुस्तके नव्हती. काय करावं हे समज्त नव्हते. शांत तरी किती वेळ बसणार? आणि शांत बसून त्याचा उपयोग तरी काय. बोललं तर निदान त्यामुळे काही माहिती तरी मिळते. गावसकर लै भारी की विश्वनाथ? इम्रानखान फाष्ट की कपील देव ? पिकासो हे नाव मुलीचे की मुलाचे ? कॅम्लीन ची रंगपेटी चांगली की तेलीखडू? शिसपेन्सील किती संपली म्हणजे पूर्ण संपली असे समजायचे? चौकोनी असणारे खोडरबर शेवटी शेवटी गोल का होते? कम्पासपेटीतील गोल काढायच्या कंपास ने काढलेल्या गोलाची टोके जुळत का नाहीत? बाकावर नाव कोरणे आणि खोडरबरला भोक पाडणे या शिवाय करकटकाचा आणखी काय उपयोग असतो? शोलेतल्या ठाकुरच्या बुटाला खिळे कसे लावले असतील? शोलेतला दोन्ही हात नसलेला ठाकूर दात कसा घासत असेल? ऐतीहासेक कमानी हौदातील कारंजातील गुप्त खजिना अजून सापडत का नाही हे आणि असले कधीच न सुटलेले प्रश्न बोलत असतात मुले. मुली पण तशाच . त्या काय बोलतात तेच कळत नाही. रस्त्याने जातानाही कळत नाही. कुजबुजत असतात आणि अचानक एकदम पायाखाली लवंगी फटाका वाजल्यावर माणूस दचकतो ना तशा या मुली काहीतरी बोलत असताना अचानक खडीचा ट्रक रीकामा करताना आवाज येतो ना तशा पण मोठ्या आवाजात हसायला लागतात. शेजारून जाणारा माणूस दचकतो. त्यांचा आवाज बारीक असला तरी आख्खा वर्गभर व्यापून असतो. वर्गात काही मुलांचा आवाज फुटायला सुरवात झाली होती. त्यांचे घोघरे आवाज, ज्यांचे आवाज अजून नीट फुटले नव्हते त्यांचे किंचीत डोनल्ड डक सारखे आवाज, मुलींच्या ओळीतून येणारे त्यांचे किनरे आवाज . या सगळ्या आवाजांचे मिश्रण म्हणजे ऐकायचे म्हणजे एक गम्मतच होती. भाजीला फोडणी देताना होणारा चुर्र आवाज ट्रकला ब्रेक लावल्यावर येणारा आवाज, भजी तळताना येणारा तळण्याचा आवाज या सर्वांचा एकत्रीत भास होतो. काय की असेल या मुली किती बोलत असतात ना. सदा न कदा. काय बोलतात इतके कोण जाणे . मी एकदा अंजीला विचारले काय बोलत असता रे तुम्ही मुली इतक्या. ती डोळे मोठ्ठे करत म्हणाली " ते आमचं गुपीत आहे, सगळ्याना सांगायचं नसतं "
तीला काहिही विचारलं तरी ते त्याचं सिक्रेटच असतं अगदी उद्या डब्यात काय नेणार आहेस, अभ्यास झाला आहे का? ग्रुहपाठाचा निबंध कोणता लिहीला? केळी काय भावाने आणलीस? या कोणत्याही प्रश्नाला तीचे हेच उत्तर असते.
पण मी कुठे सगळे आहे. मला सांगायला काय हरकत आहे.
हं तुला म्हणून सांगते. आम्ही की नै स्वेटरला टाके घालताना दोन उलट की तीन सुलट , ठिकप्याची रांगोळी काढताना सुरवात मधून करावी की बाहेरून.
ठिपक्याच्या रांगोळीला अंजी ठिकप्याची रांगोळी असे म्हणत होती. पण तीला तीची चूक दाखवली असती तर याच वेळी काय पण पुढच्या प्रश्नाच्यावेळेलाही मला उत्तर म्हणून काहितरी भलतेच मिलाले असते. चूक दाखवुन न देण्यातच फायदा होता. आम्ही मुली चिंच गाभुललेली चांगली की हिरवी चांगली, राय आवळ्याची चटणी चांगली की मग डोंगरी आवळ्याची, दोन वेण्या बांधल्या तर रीबीन बांधावी की एका वेणीवर, अंबाडा चांगला की मग केसांचा बुचडा? केसातील उवा मारायला रिठे चांगले की शिकेकाई? कोणाची आई वेणी चांगली घालते.नेलपेंट चांगली की मेंदी अशा चर्चा करत असतो.
मी सुचवू का काही प्रश्न.
तू आणि मुलीना प्रश्न सूचवणार?
हो.
मग तूच का नाही विचारत?
नको तुला माहीत आहे ना मुलींशी बोललं की चिडवतात. मुलीत मुलगा लाम्बोडा. भा़ऊन खातो कोंबडा"
बर बर विचार
बघ हं नंतर रागावशील?
नाही रागवत. तुझ्या शप्पथ.
शप्पथ सुटली म्हण अगोदर.
सुटली.. आता विचार?
बघ चिडणार नाहीस ना?
नाही म्हंटलं ना एकदा. मग नाही रागावणार.
हां मग विचारतो.बॉबकट केला की मुलींचे दात पुढे आल्यासारखे का वाटतात?
काय?
बॉबकट केला की मुलींचे दात पुढे आल्यासारखे का वाटतात?
हा काय प्रश्न झाला?
मग कसा ?
मला वाटले की तू विचारशील तुम्ही नीतू सिंग छान दिसते की रेखा हे बोलता का कधी? अरे तुला माहीत आहे त्या सरनाईक बाईना आपल्या शाळेची रेखा असे म्हणतो.
आणि मग अमिताभ बच्चन कुणाला म्हणता?
ह्म्म ते नाई सांगणार ते आमचं सिक्रेट आहे.
अंजीशी काही बोलण म्हणजे असंच होतं ती कोणत्या प्रश्नाला " ते आमचं सिक्रेट आहे " हे उत्तर देऊन समोरच्याचा त्रिफळा उडवेल हे ती पण सांगू शकत नाही.
विचारणारा मात्र गाफील सापडतो.
वर्गातले ते सगळे सम्मिश्र आवाज मी बाकाला कान लावून ऐकत राहिलो. किती वेळ गेला कोण जाणे माझ्या गालाला काहितरी जोरात लागले होते.
मी गाल चोळला. सर माझ्याकडे रागारागाने पहात होते. सगळ्या वर्गात शांतता पसरली होती.
" तो खडू आण इकडे. काय झोपा काढायला येता का रे शाळेत. काय विचारतोय मी." सर मला विचारत होते. आवाज ऐकायच्या तंद्रीत मी बहुतेक बाकावर झोपून गेलो होतो.
नाही सर शिकायला येतो.
झोपतो ते झोपतोस आणि वर तोंड वर करून मोठ्या तोंडाने बोलतोस? बराच दिसतो आहेस की?
सरंचा एकुण नूर पाहून टंप्याने सरानी मला फेकून मारलेला खडू शोधून सराना परत नेवून दिला. देताना परत देताना टंप्या खडुचा एक तुकडा काढून घ्यायला विसरला नाही.
मला बाकावर डोके ठेवून झोपलेला सरानी पाहीले आणि त्यानी मला खडू फेकून मारला. सरांचा नेम एकदम बरोबर लागला.
सर भारताच्या क्रिकेट टीम मधे असते तर अशा अचूक नेमबाजी मुळे सरानी पॅव्हलीयन मधूनही बरोब्बर चेंडू फेकून बॅट्समनला सहज रनाऊट केलं असतं . ते या शाळेत शिक्षक म्हणून चुकून आले असावेत.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

24 May 2018 - 12:39 pm | शाम भागवत

मस्त.

स्वलेकर's picture

24 May 2018 - 1:32 pm | स्वलेकर

मस्त.

सस्नेह's picture

24 May 2018 - 3:44 pm | सस्नेह

हा: हा :

सिरुसेरि's picture

24 May 2018 - 5:17 pm | सिरुसेरि

छान . पुभाप्र .

शलभ's picture

24 May 2018 - 5:55 pm | शलभ

भारी लिहिलंय.

पैसा's picture

27 May 2018 - 7:10 pm | पैसा

कसलं भारी!!

विजुभाऊ's picture

3 Jun 2018 - 11:58 am | विजुभाऊ

पुढील भाग https://www.misalpav.com/node/42737

चौथा कोनाडा's picture

7 Jul 2020 - 5:42 pm | चौथा कोनाडा

हा ही भाग फर्मास !

कोणत्याही वर्गात काहीही न शिकवता पस्तीस चाळीस मिनिटे पन्नास साठ मुलांना नुसते शांतपणे बसवने ज्या कोणाला जमले त्यांना सरकारने एक स्पेश्यल बक्षीस द्यावे . सरांना थोड्या फार प्रमाणात अधून मधून हे जमत होते. त्याना आख्खे बक्षीस नाही पण बक्षिसाची सावली बक्षीस म्हणून द्यायला हरकत नसावी.

एकदम भारी आयडिया !
रिकामपणी पडणारे प्रश्न आणि अंजीशी केलेलं संभाषण धमाल आहे !