दोसतार-११

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
3 Jun 2018 - 11:57 am

मागील दुवा https://www.misalpav.com/node/42660

सर भारताच्या क्रिकेट टीम मधे असते तर अशा अचूक नेमबाजी मुळे सरानी पॅव्हलीयन मधूनही बरोब्बर चेंडू फेकून बॅट्समनला सहज रनाऊट केलं असतं . ते या शाळेत शिक्षक म्हणून चुकून आले असावेत.

मी तसे टंप्याला म्हणालो देखील
" ह्या.... एकदम टिनपाट. गेल्या वर्षी गॅदरिंगच्या मॅचमधे त्या शरद जाधवने सरांची काय झकास विकेट उडवली होते. एकदम फुलटॉस वर . सर मारायला म्हणून पुढे गेले आणि घसरून पडले. बॉल त्यांच्या बॅटला लागून स्टंपावर गेला होता. " एल्प्याने नवी महिती पुरवली.
सर खडू घेवून परत जाताना ते पाठमोरे झाले. तसे आत्तापर्यंत शांत झालेल्या वर्गात पुन्हा गलका सुरू झाला.
शाळेत कोणी पाहुणे वगैरे आले की मुले जशी एका आवाजात " एकसाथ नमस्ते " म्हणतात.वर्गातल्या सगळ्या मुलांना एकाच वेळेस गलका सुरू करायचे ज्ञान कसे मिळते कोण जाणे. पाटणच्या शाळेतही हीच परिस्थिती होती. तिकडची मुले " एकसाथ नमस्ते" हे दोनच शब्द एकत्र आणि बरोबर म्हणायची. बाकी कधीच कोणी काही एकसाथ म्हणायचे नाही. अगदी शाळेच्या स्वागतगीताच्या वेळेसही.
" स्वागत करू या , सकल जनांचे. आपण स्वागत करुया सकल जनांचे. अमूक तमुक अध्यक्ष लाभले, आहे मोठे भाग्य आपुले. सकल साध्य साधका . दे बुद्धी दे गणराया.
या गाण्यात "अमूक तमूक " या जागी परीक्षेत गाळलेल्या जागा भरा असते ना तशा त्या त्या वेळेस आलेल्या पाहुण्यांचे नाव टाकायचे आणि गाणे म्हणायचे. हे गाणे म्हणताना अर्धी मुले मागल्या वेळच्या अध्यक्षांचे नाव म्हणायची तर अर्धी मुले नव्या आलेल्या अध्यक्षांचे नाव म्हणायची. आणि हे न चुकता दरवेळेसच व्हायचे. एक बरे होते दोन्ही नावांचा उच्चार एकदम व्हायचा त्यामुळे गाण्यात नक्की काय नाव आले ते अध्यक्षांनाच काय पण गायनाच्या सरांनाही कळायचे नाही. एकदा थोर साहित्यीक यशवंत दिगंबर शाळेत आले होते. त्यांच्या नावात आडनाव आणि नाव कोणते तेच समजत नव्हते. त्यातून दिगंबर हे नाव गाण्यात म्हणायला आले की आम्हाला दिगंबर म्हणजे नागडे हा त्याचा अर्थ आठवून जाम हासू येत होते. आणि एकाला हासू आले की लागण लागावी तशी सगळी जणं हासायला लागायची. आसलं कसलं नाव असेल ना. म्हणजे बघा त्यांची मुळे जन्माला आली ती दिगंबर म्हणूनच की. अशीही आणि तशीही. शाळेत त्यांचे शिक्षक त्यांची हजेरी घेताना खूप हसत असतील " दिगंबर.... हजर" आमच्या वर्गात असा कोणी असता ना तर आम्ही हजेरी घेतल्यापासून आख्खा वर्ग हसत सुटला असता. पण हे असले नावच वाईट ना. त्या पेक्षा माझे नाव विन्या खूप बरे. निदान त्याचा वेगळा काही अर्थ तरी होत नाही.
ते दिगंबर पाहुणे येणार होते त्याच्या अगोदर आम्ही गाण्याची प्रॅक्टीस केली होती पण नावाचा अर्थ आठवून आमचे हासणे काही थांबत नव्हते. गाण्याचे थोरात सर देखील हासायचे.
ते पाहुणे जेंव्हा आले तेंव्हा आम्ही ठरवले की ज्याला हासायला येईल त्याने गप्प बसायचे. शेवटी जेंव्हा गाणे म्हणायचे वेळ आली त्या वेळेस ते एकट्या सीमा भोसले ने ने " यशवंत दिगंबर अध्यक्ष लाभले" हे शब्द म्हंटले बाकीचे एकदम हात तोंडावर ठेवून गप्प झाले होते. फक्त सीमाने गाताना एक चूक केली तीने यशवंत दिगंबर अध्यक्ष लाभले या ऐवजी यशवंत नागडे अध्यक्ष लाभले असे शब्द म्हंटले होते. अर्थात ते गाणे चालीत म्हंटले होते त्यामुळे कोणाच्या फारसे लक्षात आले नाही. आम्ही मात्र कसे बसे हासू दाबत गाणे पूर्ण केले.
बरे तरी ते शब्द गाण्यात बसवता येत होते. काही काही वेळा सुब्रम्हण्यम करडेगुद्दी , दृष्ट्यद्यूम्न तिरुचिरापल्ली किंवा श्रीनीवास शंकर बामणहळ्ळी अशा नावाचे कोणी अध्यक्ष पाहुणे असले की गाणारांची पंचाईत व्हायची. गाणे गाताना कोणी स्वागत करुया वर रेंगाळत असायचे तर काही सकल जनांचे वर... बामणहळ्ळी या शब्दांपर्यंत पोहोचताना बहुतेक सगळ्यांचीच दमछाक व्हायची. शेवटी आम्ही स्वागत गीत म्हणणार्‍या सर्वानी मिळून मुख्याध्यापकाना विनंती केली की प्रमूख पाहुणे म्हणून कोणी आणाल तर त्यांचे नाव आणि आडनाव अगदी छोटे असावे सगळी मिळून फार तर सहा अक्षरी असावे आणि त्यात जोडाक्षर नसावे . पाहुण्यांचे आडनाव मोठे असले की गाताना एकसाथ गाता येत नाही.उगाच पुढे मागे व्हायला होते.
एकसाथ नमस्ते हा एकच शब्द असावा . मी घरी कोणी पाहुणे आले तरी त्याना नमस्ते करताना एकसाथ नमस्तेअसेच म्हणायचो. आई आणि ते पाहुणेही हसत सुटायचे. आम्हाला शारीरीक शिक्षणाच्या सरांनी एकसाथ नमस्ते हे जोरात म्हणायचे असे सांगितले होते. त्यामुळे ते जितक्या जोरात म्हणता येईल ते तितके जास्त गुण द्यायचे.
त्या सरानी एकसाथ नमस्ते म्हणायला शिकवले होते. पण इथे मुलांना गलका करायला कुणीच शिकवलं नव्हते तरीही ते त्याना आपोआप जमायचे. पाटणच्या शाळेत काय किंवा या सातारच्या शाळेत काय. सगळ्या मुलाना ही गोष्ट अचूक जमत होती.
"इथे ग्यादरिंग ला दहावीची टीम आणि शिक्षकांची टीम यांच्यात मॅच होते." एल्प्या सांगत होता. " दहावीच्या बॅचची पोरे शिक्षक संघाला इतकं पिदवतात. सांगू नको. फोर वर फोर मारून त्याना पळायला लावतात. प्रत्येक जण ब्याट घुमवत अगदी आडवी पट्टी दाम्डपट्टा मारला की बाउंड्र्या जातात"
" तर तर आणि बॉलिंगच्या वेळेस बंपर वर बंपर टाकतात. मारकुट्या शिक्षकांची बॉडी शेकाटून काढतात. शाळेतल्या पाच वर्षांचा वचपा काढतात म्हण ना" टंप्या ने दुजोरा दिला.
अचानक वर्गात काहितरी खरखरू लागले. बटण दाबून लाईट बंद करावा तशी सगळी मुले गप्प झाली. " फुर्र्र्र....सर्वांने इकडे लक्ष्य द्यावे" शाळेत सर्वाना काही सांगायचे असले की मुख्याध्यापक माईकवरून सर्वांशी बोलायचे. शाळेच्या प्रत्येक कोपर्‍यात एक एक स्पीकर लावलेला होता. त्यातून सर्वाना ऐकु जायचे. रोजचे जनगणमन पण या वरुनच ऐकू यायचे." एक प्रकटन आहे. बाजारात अभ्यासक्रमाची पुस्तके अनुपलब्ध असल्याकारणामुळे विद्यार्थ्याना पाठ्यपुस्तके मिळण्यात अडचण येत आहे. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेवून शाळेने पुस्तक पेढी ची सोय केली आहे. तरी विद्यार्थ्यानी त्याचा लाभ घ्यावा. मात्र पुस्तकपेढीतील पुस्तकांची संख्या लक्षात घेता विद्यार्थ्याना ही पुस्तके दोन दिवस नेता येतील. तिसर्‍या दिवशी मात्र पुस्तक परत करावयाचे आहे. प्रकटन संपले . फुर्र्र्र्र"
शाळेची घंटा हे प्रकटन संपायचीच जणू वाट पहात असावी. तास संपला. शाळा सुटली.
आठवड्यापुरती का होईना पुस्तकांची काळजी मिटली होते. अर्थात आम्हाला कोणालाच ही काळजी पडली नव्हती. हा भाग वेगळा....
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

3 Jun 2018 - 1:21 pm | शाम भागवत

झकास

गवि's picture

3 Jun 2018 - 3:00 pm | गवि

:-)

चौथा कोनाडा's picture

8 Jul 2020 - 6:11 pm | चौथा कोनाडा

व्वा ! भारी !

या गाण्यात "अमूक तमूक " या जागी परीक्षेत गाळलेल्या जागा भरा असते ना तशा त्या त्या वेळेस आलेल्या पाहुण्यांचे नाव टाकायचे आणि गाणे म्हणायचे. हे गाणे म्हणताना अर्धी मुले मागल्या वेळच्या अध्यक्षांचे नाव म्हणायची तर अर्धी मुले नव्या आलेल्या अध्यक्षांचे नाव म्हणायची. आणि हे न चुकता दरवेळेसच व्हायचे

एकट्या सीमा भोसले ने ने " यशवंत दिगंबर अध्यक्ष लाभले" हे शब्द म्हंटले बाकीचे एकदम हात तोंडावर ठेवून गप्प झाले होते. फक्त सीमाने गाताना एक चूक केली तीने यशवंत दिगंबर अध्यक्ष लाभले या ऐवजी यशवंत नागडे अध्यक्ष लाभले असे शब्द म्हंटले होते.

सर्वानी मिळून मुख्याध्यापकाना विनंती केली की प्रमूख पाहुणे म्हणून कोणी आणाल तर त्यांचे नाव आणि आडनाव अगदी छोटे असावे सगळी मिळून फार तर सहा अक्षरी असावे आणि त्यात जोडाक्षर नसावे . पाहुण्यांचे आडनाव मोठे असले की गाताना एकसाथ गाता येत नाही.उगाच पुढे मागे व्हायला होते.

पण इथे मुलांना गलका करायला कुणीच शिकवलं नव्हते तरीही ते त्याना आपोआप जमायचे. पाटणच्या शाळेत काय किंवा या सातारच्या शाळेत काय. सगळ्या मुलाना ही गोष्ट अचूक जमत होती.

क्या बात हैं, एकसे बढकर एक फुलबाज्या !