दोसतार - ४

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 Apr 2018 - 8:37 am

मागील दुवा : https://misalpav.com/node/42343
हा मोका साधून म्हादू शिपायाने एकदम बोलो भारत माता की ...असे म्हंंटले. त्यावर पोरानी ही हात उंचावून जोरात जय म्हंटले आणि आमचे समूहगीत संपवले.
मटंगे बाईनी आम्हाला गायन वर्गात चला अशी खूण केली. पण त्याकडे लक्ष्य न देता काय व्हायचं ते होऊ दे म्हणत आम्ही मुलांमधे जाऊन बसलो.

त्या दिवशी कार्यक्रम संपला तसे आम्ही तेथूनच पसार झालो. हेडमास्तर बोलावून घेतील या भीतीने दप्तरे वर्गात तशीच ठेऊन रिकाम्या हाताने घरी गेलो.
घरी आईने दप्तर कुठे आहे विचारले " ते यल्प्याने गृहपाठ उतरवून घेण्यासाठी ठेवून घेतले आहे म्हणून सांगितले आईला ते पटले असावे ती म्हणाली अरे निदान डबा तरी आणायचास की घरी. तोही त्यातच राहीला. धुतला आहेस ना नीट नाहीतर उगाच शिळा वास भरून रहायचा दप्तरात. यल्प्याने त्याच्या घरी दप्तर टंप्याकडे आहे म्हणून सांगीतले आणि टंप्याने माझे नाव सांगीतले.
दुसर्‍या दिवशी शाळेत जाताना हात रिकामे होते. इतक्या रिकाम्या हाताने कधीच शाळेत गेलो नव्हतो. काहितरी विसरल्यासारखे वाटत. शाळेत निघालोय असे वाटतच नव्हते.
अगदी मोकळे .. हलके हलके वाटत होते. उगाचच हसू येत होते. रस्त्याने उड्या मारत चालावेसे वाटत होते. वाटेत आंजी दिसली. तीने माझ्याकडे पहाताना असा काही चेहेरा केला की ज्याचे नाव ते. शाळेला सुट्टी असावी आणि आपल्याला ते माहीत नसावे असा काहीसा भाव त्यावर होता. अर्थात हे मला वाटले. बाकी आंजीच्या चेहेर्‍यावर नेहमीच तसे भाव असतात. रस्त्याने जाणारे सगळे आज एकदम निवान्त वाटत होते. कुणालाच कुठे जायची घाई नव्हती. मला तर चालताना टणाटण उड्या मारत चालावेसे वाटत होते. शाळेच्या चौकाजवळ सावजीचे दुकान आहे. कायम उघडाबंब बसलेला असतो तो दुकानात. तो बहुतेक शर्ट विकत घेतच नसावा. अर्थात बीन शर्टाने तो दुकानातून उघडाबंब घरी जाताना पेन वगैरे सारख्या वरच्या खिशात ठेवायच्या वस्तू कुठे ठेवत असेल कसा जात असेल हा प्रश्नच आहे. मला अर्थात हा प्रश्ण नेहमीच पडत आलाय. एकदा बाबांनी मोठ्याने पेपर वाच म्हणून मला लोकसत्ता वाचायला दिला. मी बातमी वाचली. " नाशीकच्या कुंभ मेळ्यात नंग्या साधूचे पाकीट मारले" मी बाबांना विचारले नंग्या साधूचे पाकीट मारायला त्याने ते कुठे ठेवले असेल? आता या प्रश्नात रागावण्यासारखे काय आहे आईने मला पाठीत " वात्रट मेला म्हणत धपाटा घातला. बाबा खीक्क करुन हसले. त्यांच्या कपाळावरून चष्मा खाली पडला. त्या नंतर बाबांनी मला पुन्हा कधीच पेपर वाच म्हणून सांगीतले नाही. पाठीत धपाटा हे एका प्रश्नाचे उत्तर असेल तर आख्खी प्रश्नपत्रीका कशी सोडवतील हे लोक कोण जाणे. सावजीच्या दुकानात नक्की काय मिळते तेच समजत नाही. त्याच्या दुकानावर नावाचा बोर्डही नाहिय्ये. बोर्डाच्या जागेवर नाही म्हणायला तो पेनची शाई, आलेखाचे कागद , अर्ध्या पेन्सीली, तळलेल्या जुल्या, मिरच्यांची भजी,साबुदाणा चिवड्याची पाकिटे, लॉटरीची तिकीटे, फुगे, रबरी बॉल वगैरे ठेवत असतो अधून मधून. त्याच्या दुकानाबाहेर दर आठवड्याला पाटीवर तो "दुकानासाठी कामगार पाहिजे आहे' असे लिहुन ठेवतो. मी एकदा त्याला विचारालेही होते की असे नेहमी खडूने लिहीण्या ऐवजी पेंट करून घ्या की काका. अर्थात सावजीला काका तो फक्त वयाने मोठा आहे म्हणून म्हणायचे. बाकी तो आम्हा पोरां इतकाच रिकामा असतो.शाळेत वर्गात बसत नाही इतकेच.
शाळेत कोणाला दम देत देताना तू बाहेर भेटच मग दावतो तुला म्हणताना बाहेर म्हणजे तर सावजीच्या दुकाना समोर हे वेगळे सांगायची गरज नसायचीच. ही सोय व्हावी म्हणूनच की काय शाळेने शाळा बांधतानाच बहुतेक सावजीच्या दुकानासमोर बांधली असावी. माझ्या हातात दप्तर नाही बघून सावजीने दुकानातूनच मला काय असे हाताने विचारले. मी पण त्याला दोन्ही हात वर करून रीकामाच आलोय असे दाखवले. तो हसला. मी पण हसलो. नशीब त्याने माकडासारखे नाक खाजवून नाही दाखवले नाहीतर मलाही तसेच करावे लागले असते. दप्तर हातात नसताना शाळेच्या चौकात नाक खाजवत उभे रहाणे बरे नसते दिसले.
थोडावेळ मी तिथेच रेंगाळत राहीलो. शाळेची दुसरी घंटा झाली तसा गडबडीने पळतच वर्गात गेलो.
वर्गात आलो तर टंप्या कपाळाला हात लावून बसला होता. का रं काय झालं काकांनी बदडलं का काल.
नाय रे.
मग असा का कपाळाला हात लावून बसला आहेस.
दप्तर आणलंस का?
असं आणणार काल आपण हितंच ठीवून गेलो होतो की.
आरे आपली दप्तरेच नाहीत की .
काय दप्तरं नाहीत?
तर तेच म्हणतोय की . दप्तरं नाहीत.
यल्प्या कुठे आहे?
तेच शोधायला गेलाय तो.
कुठे गेलाय?
दप्तरं शोधायला
तेच विचारतोय की कुठे गेलाय.
तेच सांगतोय की दप्तरं शोधायला गेलाय.
मी विचारतोय तेच तो सांगत होता आणि तो सांगत होतो तेच मी विचारत होतो.
आरे पण दप्तरं शोधायला कुठे गेलाय ते सांग ना
त्यानं काय होणार आहे.
आरे म्हंणजे तो जिकडं गेलाय त्यापेक्षा वेगळ्या जागेवर आपण शोधूया. म्हणजे सापडेल
आन नाय सापडलं तर?
या प्रश्णाला माझ्या कडे उत्तर नव्हते. टंप्याच्या पाठीत एक धपाटा ठेवून द्यावा असे वाटायला लागलं. आत्ता लक्ष्यात आलं मोठ्या माणसाना आपण विचारालेल्या प्रश्नांची उत्तरे येत नसली की ती आपल्या पाठीत धपाटा घालतात.
खरे तर यल्प्या दप्तर शोधायला कुठे गेला हे महत्वाचे नव्हते तर दप्तरे कुठे गेली हे शोधणे महत्वाचे होते. दप्तरं नसल्यामुळे वर्गात काही फारसा फरक पडला नसता. पुस्तक डाव्या उजव्या शेजारच्या कडून तरी घेतलं असतं. अर्थात माझ्या डाव्या उजव्या बाजूला यल्प्या आणि टंप्या हीच दोघे. त्यांच्याकडेही पुस्तकं नव्हतीच.
त्याही पेक्षा मोठा प्रश्न होता की आज बीन दप्तराचं घरी गेल्यावर काय उत्तर द्यायचं? आणि त्याहीपेक्षा अवघड होतं की समजा दप्तर सापडलंच नाही तर काय?
दप्तराशिवाय वर्गात बसता आलं नसतं आणि दप्तर नाही हे कारण घरातही सांगता आलं नसतं.
मलापण आता टंप्यासारखंच डोक्याला हात लावून बसावंसे वाटत होतं. पण नुसतं डोक्याला हात लावून दप्तर सापडल नसतं कायतरी करायला हवं होतं
मी आमच्च्या बेंचचे सगळे कोपरे तपासले. अगदी उलटं करुन पण बघितलं कुठल्यातरी जादूगाराने दप्तरं गायब केली होती. त्या जादुगाराला आमाला दप्तरासोबत का नाही गायब केलंस असे विचारावेसे वाटले. अर्थात त्याने ते तसे केले नाही ते एका अर्थाने बरेच झाले. दप्तरात भुगोलाच्य आणि गणीताच्या गृहपाठाच्या वह्या होत्या. दप्तरासकट गायब केले असते तर गृहपाठ करावा लागला असता.
इतक्यात यल्प्या आला. काय रे घावलं का दप्तर.
नाय रे. अगदी वरच्या ग्राउंडवरही शोधलं. भौतीकशास्त्र प्रयोगशाळेत पाहिले, प्रेक्षागृहात पाहिले, इतकेच काय पण तालमीतपण पाहिले.
दप्तर तालमीत कशाला घेवुन जाईल कोणी? त काय वजन उचलायला वापरायचं आहे का. टंप्याचा आणखी एक प्रश्न. " तालमीत दप्तर " हा कल्पनाविलासा चा निबंधाचा विषय दिला ना तर सगळे नापास होतील. मास्तरांसकट.
यल्प्याने त्याच्याकडे रागाने पाहिले. टंप्याला ना कुठे काय विनोदायचे तेच समजत नाही. पण एक झाले त्याच्या प्रश्नामुळे टेन्शन थोडेतरी कमी झाले.
पण दप्तराचे काय झाले असावे हा प्रश्न होताच. तालमीत दप्तराचा उपयोग वजन उचलायला म्हणून नक्कीच झाला असता . इतके जड दप्तर आम्ही रोजच उचलत होतो.
इतक्यात तिसरी घंटा झाली. गजेंद्रगडकर बाई ही वर्गात आल्या. सगळॅ जणगणमन साठी उभे राहिले. संपल्यावर खाली बसले. बाईनी उपस्थिती घेतली.
आमच्या डोक्यातून दप्तराचा विषय काही जात नव्हता. समोरचा रीकामा बेंच दुसरे काही सुचूच देत नव्हता.
( क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

गवि's picture

8 Apr 2018 - 11:24 pm | गवि

लगे रहो विजुभौ.. !!!

प्रचेतस's picture

9 Apr 2018 - 8:33 am | प्रचेतस

मस्त लिहिताय

पैसा's picture

17 Apr 2018 - 4:54 pm | पैसा

मस्त चालू आहे!

चौथा कोनाडा's picture

30 Jun 2020 - 1:43 pm | चौथा कोनाडा

अगदी मोकळे .. हलके हलके वाटत होते. उगाचच हसू येत होते. रस्त्याने उड्या मारत चालावेसे वाटत होते. वाटेत आंजी दिसली. तीने माझ्याकडे पहाताना असा काही चेहेरा केला की ज्याचे नाव ते. शाळेला सुट्टी असावी आणि आपल्याला ते माहीत नसावे असा काहीसा भाव त्यावर होता. अर्थात हे मला वाटले. बाकी आंजीच्या चेहेर्‍यावर नेहमीच तसे भाव असतात. रस्त्याने जाणारे सगळे आज एकदम निवान्त वाटत होते. कुणालाच कुठे जायची घाई नव्हती. मला तर चालताना टणाटण उड्या मारत चालावेसे वाटत होते.

व्वा, सुंदर वर्णन केलंय, विजुभाऊ !
मला ही माझे "हलके" दिवस आठवले

कायम उघडाबंब सावजीचे व्यक्तिचित्र भारी रंगवलं आहे !

इतकी शोधाशोध करून दप्तर काही सापडलं नाही ! :-( अरेरे !