दोसतार...२

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
21 Mar 2018 - 7:36 am

मागील दुवा http://www.misalpav.com/node/42264

आम्ही ओणवे होऊन अंगठे धरले होते तरी ही हसत होतो. हसत हसता धन्या जाधवचा तोल गेला तो पडला. भामरे मास्तर आणखीनच भडकले. ते काही बोलणार इतक्यात छोटी सुट्टी झाल्याची घंटा झाली. आम्ही सगळे मास्तरना तेथेच सोडून वरच्या ग्राउंडवर पसार झालो. पुढच्या प्रसंगातून आम्हीही सुटलो आणि भामरे मास्तरही सुटले.

पण घडल्या प्रसंगामुळे टंप्या खूपच बिथरला होता. तो म्हणाला की मी आता जे करायचे ते करुनच दाखवतो.
आम्हाला वाटले की हा आता संध्याकाळी जाऊन त्या आपी जोशीला दम देणार वगैरे.
अर्थात ते शक्यच नव्हते. कारण शाळेत मुलानी मुलींशी बोलणे किंवा मुलीनी मुलांशी बोलणे हे फक्त गॅदरींग किंवा कसलेतरी सांस्कृतीक कार्यक्रम असतील तरच व्हायचे तेही जे रंगमांचावर असतील त्यांच्याच बाबतीत. इतरवेळी मुलींशी बोलणे म्हणजे दुरापास्तच.
त्या रडुबाई पोरींशी बोलणे म्हणजे काहितरी कमीपणा मानत असू.
टंप्या आता काय करतोय याची उत्सुकता सगळ्यानाच होती. जास्त करुन मला आणि यल्प्याला .
यल्प्याने टंप्याला तोंडावर सांगितले की तुझ्या लेका नुसता तोंडात दम आहे. तुझा अपमान झालाय त्याचा बदला घ्यायलाच पाहिजे. इतके बोलून तो थांबला नाही .त्याने तिथेच एका हाताची मूठ हवेत उचलत कुठल्यातरी मोर्चात ऐकलेली घोषणापन दिली ' कोण म्हणतो देणार नाय.. अरे घेतल्याशिवाय रहाणार नाय " " लाल बावट्टे की जै " आमच्या मागण्या मान्य करा. नायतर खुर्ची खाली करा."
टंप्या आता काय करणार या विचारात आम्ही घरी गेलो. घरी जेवताना , झोपताना पण तो विचार डोक्यातनं जायला तयार नव्हता.
मला स्वप्न पडले की टंप्या एक मोठा च्या मोठा राक्षस झालाय. त्याचे डोके पार ढगाला थडकतंय तो जादू करतोय. लांडगा मंतर कुत्रा मंतर .... असे कायतरी बोलतोय. तिकडून आपी आली. तिने हातातल्या वोटरबॅगमधले पाणी टंप्याच्या डोक्यावर टाकले. टंप्या च्या गळ्यात दोरी बांधून आपीने त्याला फिरायला नेले. लाईटच्या खांबाजवळ टंप्याने एक पाय वर केला. आणि खांबावरचा दिवा गेला. आमची शाळा भुकंपाने हादरतेय. आणि सोनसळेमास्तर आम्हाला आपी जोशी च्या तक्रारीवरुन छड्या मारताहेत...
सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर हात पाय पाहिले . छड्यांचे वळ दिसले नाहीत. मग थोडा हसलो. बरं झालं ते स्वप्नंच होते. आईला विचारल की पहाटेची स्वप्न खरी होतात का. तर ती म्हणाली हो शंभर टक्के . हे असे असेल तर भयंकरच आहे.
छड्या खाव्या लागल्या तर फार काही नाही पण उद्या डोकं ढगाला लागण्या इतका टंप्या उंच झाला तर तो शाळा सुटल्यावर घरात कसा जाणार संध्याकाळी? काहीतरीच.
दुसर्‍या दिवशी टंप्याने एक मधल्या सुट्टीत जेवणाच्या डब्याच्या जोडीला आणखी एक डबा आणला होता. त्याने आम्हाला सर्वाना दाखवले. टंप्याने काय आणले असेल याची सर्वानाच उत्सुकता होती. सगळेजण तेच कुजबुजत होते. मधल्या सुट्टीत कोणीच वर्गाबाहेर गेले नाही. टंप्याने डबा काढला. आम्ही सगळे त्याच्या भोवती गोल करून बसलो होतो. टंप्याने विजयी वीराच्या स्टाईलमधे डबा हातात उंच धरला होता. तो म्हणाला " अब देखो... जादू का कमाल. तुषार.... का धमाल. जमाल बन जाये हमाल.. चादर बन जाये रुमाल. भुश भुश भुश भुश बुम बुम बुम बुम भुश भुश भुश भुश बुम बुम बुम बुम.." असे म्हणून त्याने त्या डब्याचे झाकण उघडले. आणि म्हणू लागला. "आपी बाहेर ये.... ये रे शोने बाहेर ये..... " हे बग सगळे आपलेच मित्र आहेत . ये बाहेर ये." असे म्हणून त्याने डबा उघडला.
डब्यातून मिशा फेंदारत एक झुरळ बाहेर आले. ते बाकावर इकडे तिकडे फिरु लागले.. हे माझे पाळलेले झुरळ. हीचे नाव आपी. हो किनई आपी. तु छान छान शाहाणे झुरळ आहेस की नाही. ते झुरळ इकडे तिकडे जाऊ लागले. मग टंप्याने त्याला पुन्हा डब्यात ठेवून दिले आणि झाकण लावले. ...... ईईईईईईईईईईईईईईई तू झुरळ पाळलेस? आणि ते शाळेत आणलेस?
हो तुम्हाला दाखवायला. हीचे नाव आपी ठेवलंय.
ते नाव तू ठेवलंस की झुरळाच्या आत्याने?
त्याला त्याच्या नावाने बोलावलेलं समजतं ?
ते काय खातं रे?
आपण जर त्याला चहा पाजला तर पिईल का ते?
समजा या झुरळाला बाळ झालं तर त्यांचं काय करणार तू?
या आपीला तू रोज आंघोळ घालणार?
काय छान दिसतंय रे. कसलं चकचकीत दिसतंय .याच्या पाठीला तू पॉलिश केलं आहेस का?
पोरांनी प्रश्नांची सरबत्तीच लावली.
नेहमीसारखीच टंप्याकडे अर्थातच याची उत्तरे नव्हती. पण एक बरं होतं की उत्तर आलं नाही म्हणून अंगठे धरुन उभे करणारं कोणी नव्हते.
पुढच्या तास चित्रकलेचा. मास्तरानी सगळ्याना कोणते चित्र काढायचे ते सांगितले. कसले तरी गुंडाळ्या आणि तिरक्या सरळ रेशांचे चित्र होते. फळ्यावर मास्तरानी काढलेल्या त्या गुंडाळ्यातून तयार झालेला आकार झुरळासारखाच दिसत होता.
मी मागच्या बाकावरच्या दिप्याला तसे म्हणालो सुद्धा. दिप्याला पण ते पटले.
तो म्हणाला अरे खरेच की अगदी आपी सारखेच दिसताहेत.
यल्प्या म्हणाला. नाही रे. तुमच्या डोक्यात बसलं ते. हे बघ आहे का ते तसलं . दिसतंय का ते तसं .म्हणत यल्प्याने टंप्याच्या दप्तरातून तो झुरळाचा डबा काढून उघडला.
त्याच वेळेस ड्रॉईंगचे थत्ते मास्तर पोरांनी चित्रं कशी काढली आहेत ते पहायला म्हणून वर्गात फिरत होते.
डबा उघडल्यावर त्या आपीने मिशा फेंदारून जी एक हनुमान उडी घेतली. ती थेट थत्ते मास्तरांच्या खांद्यावर. तरी बरं त्यांची आमच्या कडे पाठ होती. म्हणून त्याना समजले नाही. आपीला ,त्या झुरळाला थत्ते मास्तरांचा शर्ट बहुतेक आणि त्यांची पाठ आवडली असावी. ते तेथेच बसुन राहीले.
गणपतीच्या मिरवणूकीत उंचीमुळे गर्दीत नीट दिसत नाही म्हणून सोबतच्या काका , मामाच्या खांद्यावर बसून मिरवणूक पहावी तसे ते झुरळ थत्ते मास्तरांच्या पाठीवरून मजेत सगळ्या वर्गाकडे पहात होते.
घडला प्रकार अजून थत्ते मास्तराना समजला नव्हता. ते बाकांच्या रांगामधून चित्रे पहात फिरतच होते. दिप्याने सुन्याला दाखवले सुन्याने अज्याला. अज्याने रम्याला, रम्याने ओमकारला. प्रत्येकाने ते पाहिले आणि शेजारच्या मुलाला दाखवले. त्याचे लक्ष्य नसेल तर कोपराने ढोसून लक्ष्य वेधून ते झुरळ दाखवले. वर्गातल्या तीस च्या तीस मुलांचे लक्ष्य चित्रकलेच्या कागदापेक्षा त्या झुरळाकडेच लागले होते.
टंप्याला वेगळीच चिंता लागली होती. आता या झुरळाला परत कसे बोलवायचे . त्याच्या चेहेर्‍यावर ते दिसतच होते.
कसे कोण जाणे मुलींना सरांच्या शर्टवरच्या झुरळाबद्दल समजले. पण त्याना झुरळ वर्गात कसे आले ही श्टोरी माहीत नसावी. ही आमच्या दृष्टीने जमेची बाजू होती. नाहीतर थेट रवानगी हेड मास्तरांच्या खोलीत झाली असती.
थत्ते सर आमच्या बाकांच्या ओळीतून बाहेर आले. आणि ते मुलींच्या ओळी कडे जाऊ लागले. तसे दिपाली ईईईईईईई करत किंचाळली. ती किंचाळली तशी सोनाली पण किंचाळली. सोनाली किंचाळली म्हणून अंजली किंचाळली.
समूह गीत गाताना जसे सगळ्यांचे एकसाथ " आ " वासतात तसे सगळ्या मुलीनी ईईईईईईई वासले. एका सुरात ईईईईईईईईईईई म्हणायचा सपाटा लावला होता.
गाण्याचा तास असता तर मटंगे बाईनी एका सुरात गायल्या बद्दल आख्ख्या वर्गाला पैकी च्या पैकी मार्क दिले असते. पण हा तास चित्रकलेचा होता. सरांना कळेना काय झाले. या समूह ईईईईईईईई मुळे सर स्वतःच दचकले. ते इकडे तिकडे पाहू लागले. आणि कोण मुलगी का ओरडली ते पहायला अंजलीच्या बाका कडे जायला लागले. त्यामुळे अजूनच गोंधळ उडाला. सर जसजसे एक एक बाक पुढे पुढे जायला लागले तस तसे त्या त्या बाका वरच्या मुली किंचाळायला लागल्या.
त्यामुळे थत्ते सर अधीकच गोंधळले. ते इकडे तिकडे पाहू लागले. पण त्यामुळे ते ज्या बाजूला पहायचे त्या बाजूच्या मुलीनी किंचाळायला सुरवात केली.
टीव्ही वर ऑपेरा कंडक्ट करताना दाखवतात तसे आमच्या आख्ख्या वर्गाला कंडक्टेड ऑपेरा चे स्वरूप आले होते. थत्ते मास्तर ऑर्केस्ट्र कंडक्टर .
या सगल्या गोंधळाचा त्या आपी झुरळावर काहीच परीणाम झालेला दिसत नव्हता. ते मजेत मास्तराचंया पाठंगुळीला बसून फेंदारलेल्या मिशा हलवत ही गम्मत बघत होते.
थत्ते मास्तर खिडकी जवळच्या ओळीत गेले, तिथल्या मुली आता बाकावरुन उठुन दुसर्‍या बाजुला आल्या. हनुमानाचे लंकेची केली असेल तशी वर्गाची गत झाली होती. थत्ते मास्तर जसे खिडकी जवळ गेले तसे त्या प्रसंगनायकाने अपीने त्या झुरळाने पुन्हा एकदा उड्डाण केले. वर्गाच्य अलंकेतून थेट खिडकीबाहेर.
या हनुमान उड्डाणाने त्याची आणि आमची , सर्वांचीच लंकेतून सुटका झाली होती.
( क्रमशः )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

निशाचर's picture

21 Mar 2018 - 7:44 am | निशाचर

हा भागही मस्त!
पुभाप्र...

प्राची अश्विनी's picture

21 Mar 2018 - 11:58 am | प्राची अश्विनी

+111

एस's picture

21 Mar 2018 - 12:00 pm | एस

:-)

गवि's picture

21 Mar 2018 - 7:24 pm | गवि

उत्तम.

पैसा's picture

17 Apr 2018 - 4:44 pm | पैसा

मस्त!

चौथा कोनाडा's picture

28 Jun 2020 - 6:07 pm | चौथा कोनाडा

आपीच्या झुरळाच्या ऑपेराची फुल्ल धमाल !
मजा आली वाचताना, आख्खा वर्ग आणि गोंधळ डोळ्यांपुढे उभा राहिला !