दोसतार...

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
20 Mar 2018 - 6:44 am

एल्प्या , टंप्या आणि मी हे त्रिकुट आख्ख्या शाळेत एकदम फेमस होतं. फेमस म्हण्जे काय लैच फेमस.
सगळे मास्तर आणि बाया आमाला वळखायच्या. कायबी असू दे , कुटं जायचं असू दे की मग कुठलं काम असू दे आमी कायम बरोबर .
बाकावर बसायला एकत्र ,मधली सुट्टी सोबत, छोटी सुट्टी सोबत ,खेळायला सोबत डबा खायला सोबत .
इतकंच काय तर दोन तासाच्या मधे कधी आमच्या पैकी कुणाला लघ्वीला जायचे असेल तर लागली नसली तरीबी बाकीचे दोघे सोबतच जायचो.
शाळेत येताना जाताना प्रत्येकाच्या घराची वाट वेगळी होती म्हणून बरं नायतर घरी जाताना बी एकत्रच गेलो असतो.
खरंतर टंप्या आणि यल्प्या हे अगोदरपासूनच बरोबर. पाचवी पासून,आठवीच्या वर्गात गेल्यावर दोघानी पण एकदमच ड्रॉप घेतला. आणि ते आठवीतच राहीले होते
मी पाटणच्या शाळेत सातवी करून मग इकडे आठवी करायला आलो .
आमची दोसती याच वर्षी झाली. नवीन प्रवेश घेतला होता. शाळेच्या कार्यालपर्यंत बाबा आले होते . त्यानी मला तिथेच सोडले.
मग शाळेचा शिपाई मला आठवी ब च्या वर्गापर्यंत घेवून आला. दप्तर पाठीवर घेवून मी वर्गात आलो.वर्गात सगळी बाके फुल्ल्ल.
कोणत्याच बाकावर बसायला जागा नव्हती मग यल्प्याच म्हणाला बस आमच्या बाकावर तिसरा. मी बसलो.
आगोदर जरा दाटीवाटी झाली पण मग नंतर सवय झाली. इतकी सवय झाली की सवय लागली म्हणाना.
दुसर्‍या कुठल्या बाकावर रिकामी जागा असली तरीबी आमी आमचा तीन शीटचा बाक काही सोडायचो नाही.
काही मास्तरानी आमची ही सवय बदलायचा प्रयत्न केला पण मास्तर वर्ग सोडून गेले की भिंतीवर आपटलेला बॉल जसा परत आपल्याकडेच येतो तसे पुन्हा त्या तिब्बल शीट बाकावर परत यायचो.
यल्प्या. खरं तर याचं नाव एल पी असे नव्हते. मला तर कित्येक दिवस त्याचे नाव यलप्पा वगैरे असावे असे वाटायचे. टंप्याचे नाव ऐकल्यावर त्याच्या बारशाला आत्याने टंप्या हे नाव असे ठेवले असावे हाच एक मोठाच विचार यायचा कुणाच्याही डोक्यात. ग्रेट च म्हणायची ती आत्या.आणि बरे झाले आपल्याला असली आत्या नव्हती नाहीतर तीने ही आपले नाव टिंगर्या नाहीतर खुसखपाट्या असे काहीतरी ठेवले असते. यल्प्या चे नाव यशवंत होते आणि टंप्या चे नाव तुषार. पण आडनाव मात्र पाटील होते. आमच्या वर्गात सहा पाटील होते. तीन इनामदार,चार कुलकर्णी , दोन जोशी , आणि दोन देशपांडे ,तीन चव्हाण, बाकी सगळे मग उकीडवे, कांबळे , गायकवाड, लेले, असे होते. अर्थात ही सगळी नावे नुसती हजेरीपटा पुरती . मास्तरानी " पाटील " असे बोलावले की साहीजण पळत जायचे. मास्तरांना जो हवा तो पाटील सोडून बाकीच्याना परत पाठवताना नक्की काय कामासाठी बोलावले होते तेच विसरायला व्हायचे.
नावाने बोलवायला जावे तर वर्गात तीन ओमकार, दोन सतीश, पाच महेश , चार सुरेश , मुलींच्यात तीन अंजल्या, दोन वैजयंत्या , पाच दिपाल्या आणि चार सोनाल्या होत्या. आमचा वर्ग म्हणजे एक नमुनाच होता.
मग सोनसळे मास्तरानीच एक आयडीया काढली.सगळ्याना त्यांच्या यनीशियल्स ने म्हणजे आद्याक्षरानीच बोलवायचे.
त्यात पण एक गोची होतीच. वर्गात दोन एम एम होते. एक बरं होतं की एक कुलकर्णी होतीआणि एक गायकवाड होता.
त्यामुळे इतका काही गोंधळ झाला नसता. नुसतं एम एम असे बोलावले म्हणून भोंडल्याला गायकवाड गेला नसता आणि दहीहंडीला कुलकर्णी गेली नसती.
पण त्यामुळे एक गम्मत झाली. लक्ष्मण पुरुषोत्तम पाटील हा एल पी झाला. तुशार जोशी टीप्या झाला.
ते ऐकल्यावर मुलींच्या बाकांवर एकदम कुणीतरी खीक्क करुन हसले. कुणीतरी कशाला . ती आप्पी जोशी च हसली. आणि कारण समजल्यावर सगळ्या मुली बाकावर डोके ठेवून फिदीफिदी हसत सुटल्या. सोनसळे मास्तरानी वैजयंती गुरसाळेला उठवले . तीला अगोदर हसू आवरतच नव्हते. मग तीने सांगीतले. आप्पीच या कुत्र्याचे नाव टिप्या होते. वावटळ यावं तसा सगळा वर्ग मग हसत सुटला . सोनसळे मास्तरांना पण हसू आवरत नव्हते. तो जयंत्या देशपांडे तर हसता हसता बाकावरुन खालीच पडला . सगळा तास हसाण्यातच संपला. दुसर्‍या तासालाही ही हसण्याची लागण चालूच राहिली. आमाला सगळ्यानाच उगीचच हसायला होत होतं.
भुगोलाच्या भामरे मास्तरानी फळ्यावर खडू ने आकृती काढताना खडूचा गाढव ओरडावा तसा घुर्रर... किच्च असा आवाज झाला. तो आवाज ऐकुनही आम्ही हसत सुटलो.
मास्तराना तर काही कळेचना की आखखा वर्ग का हसतोय. त्याने काहीतरी खारे वारे मतलई वारे असे काहितरी शिकवायला सुरवात केली.
कोणीतरी मागच्या बेंचवरुन खारे शेंगदाणे फुटाणे असे हळूच बोलले. ते सगळ्याना ऐकू गेले. मग पुन्हा एकदा वर्गात हसण्याची एक वावटळ आली.
भामरे मास्तर संतापले. कोण हसतंय म्हणत ते बाकांच्या रांगेतून फिरु लागले. आम्ही सगळेच बाकावर हाताच्या घडीत डोके खुपसून हसत होतो. मास्तर जवळ आले की कसे बसे हसू थाम्बवायचो. ते पुढे गेलो की थांबलेले हसू पावसाळ्यात ओढ्याला घातलेला बांध फुटून ओढा वाहू लागावा तसे उसळून वाहू लागायचे.
मास्तरानी अभय दामलेला उभे केले. बिचारा सिन्सीयर पोरगा. त्याला काय झाले विचारले. उत्तर द्यायच्या ऐवजी तो पोट धरुन हसत सुटला. ते बघून पुन्हा एकदा सगळा वर्ग हसत सुटला. भामरे मास्तर आणखी भडकले. त्यानी आख्ख्या वर्गाला ग्राउम्डवर नेले आणि अंगठे धरायची शिक्षा दिली. आम्ही ओणवे होऊन अंगठे धरले होते तरी ही हसत होतो. हसत हसता धन्या जाधवचा तोल गेला तो पडला. भामरे मास्तर आणखीनच भडकले. ते काही बोलणार इतक्यात छोटी सुट्टी झाल्याची घंटा झाली. आम्ही सगळे मास्तरना तेथेच सोडून वरच्या ग्राउंडवर पसार झालो. पुढच्या प्रसंगातून आम्हीही सुटलो आणि भामरे मास्तरही सुटले.
( क्रमशः)

कथालेख

प्रतिक्रिया

निशाचर's picture

20 Mar 2018 - 6:55 am | निशाचर

:)
शाळेतली मजामजा आठवली. पुभाप्र

प्रचेतस's picture

20 Mar 2018 - 8:39 am | प्रचेतस

भारीच हो विजुभाउ.

जबरदस्त.. उत्सुकतेने वाट पाहात आहे पुढची.

बादवे,

इतक्यात छोटी सुट्टी झाल्याची घंटा झाली.

छोटी सुट्टी म्हणजे आमच्या शाळेत "लगवीसुट्टी."

एस's picture

20 Mar 2018 - 11:00 pm | एस

:-) वाचतोय. पुभाप्र.

विजुभाऊ's picture

21 Mar 2018 - 7:37 am | विजुभाऊ

पुढील भाग http://www.misalpav.com/node/42267

अनामिक's picture

21 Mar 2018 - 8:49 am | अनामिक

भारीच हो विजुभाऊ.
बाकी ते यल्प्या चा आधी यशवंत आणि नंतर लक्ष्मण केला ते ठिक करा.

पैसा's picture

14 Apr 2018 - 8:40 pm | पैसा

मस्त सुरुवात!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Apr 2018 - 7:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

येकदम झुंबरमधल्या लंपनची आठवण आली बघा!!!

शाली's picture

11 May 2018 - 8:39 am | शाली

भन्नाट.

चौथा कोनाडा's picture

27 Jun 2020 - 1:30 pm | चौथा कोनाडा

मस्त, जब्राट शाळा दिवस !
माझ्याही वर्गात असे चार-पाच बडवे आणि उत्पात, दोन तीन तारे आणि काही भोसले होते त्यांची आठवण झाली !
बाकी इनिशियल्सचा गोंधळ सुद्धा सेम असाच होता, पण मास्तर लोक शिताफीनं सोडवायचे !

विजुभाऊ _/\_
हा भाग पुन्हा वाचला, काही भागानंतर वाचायचे राहिले होते आता एक-एक करून वाचणार !

वामन देशमुख's picture

28 Jun 2020 - 1:15 pm | वामन देशमुख

संपादक मंडळ / विजुभाऊ,

दोस्तारच्या सर्व भागांची अनुक्रमणिका बनवून इथे लावावी विनंती. सध्याच्या अनुक्रमणिकेत सोळाच भाग आहेत.

मस्त मालिका लिहील्याबद्धल विजुभाऊंचे आभार.

चौथा कोनाडा's picture

28 Jun 2020 - 6:02 pm | चौथा कोनाडा

दोस्तारच्या सर्व भागांची अनुक्रमणिका बनवून इथे लावावी विनंती. सध्याच्या अनुक्रमणिकेत सोळाच भाग आहेत.

समर्पक सुचवणी !

चौथा कोनाडा's picture

28 Jun 2020 - 6:05 pm | चौथा कोनाडा

इथे वाचायला मिळेल पुढचा भाग :

पुढील भाग : दोसतार...२ ">पुढील भाग : दोसतार...२