गणेशचतुर्थीच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
भटकंतीच्या निमित्ताने लेणी, मंदिरे फिरता फिरता आढळलेल्या गणेशमूर्ती आज येथे देत आहे.
ह्या मूर्ती निवडतांना मुद्दामच प्राचीन काळातील निवडलेल्या आहेत. साधारण ८व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंतच्या ह्या मूर्ती. राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार ते यादव या राजवटींमधील ह्या मूर्ती. त्या काळी गणेशदेवतेला मुख्य देवतांत स्थान नव्हते म्हणूनच ह्या काळात गणेशमूर्ती मुख्य गर्भगृहांत कधीही नव्हत्या. त्या कोरलेल्या असायच्या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांतील गणेशपट्टीवर किंवा सप्तमातृकांपटांमध्ये.
१. सप्तमातृकांसह असलेला वेरूळच्या कैलास लेणीतील यज्ञशाळेतील हा गणेश. शेजारीच आहे सर्वभक्षक काल.
२. वेरूळच्याच २१ व्या क्रमांकाच्या रामेश्वर लेणीतील हा सप्तमातृकांसह असलेला गणेश
३. वेरूळ लेणी क्र. १७ मधील हाती असलेल्या मोदकपात्रातील मोदक (का लाडू?) खात असलेला गणेश.
४. अंजनेरीच्या भग्न जैन मंदिरातील ही गणेश प्रतिमा
५. अंजनेरीतीलच गणेशाची अजून एक भग्न प्रतिमा. ह्या गणेशाने त्याच्या पत्नीला (रिद्धी/सिद्दी) पैकी एकीला आपल्या मांडीवर बसवले आहे.
६. गोंदेश्वर शिवपंचायतनातील एक गणेशमूर्ती
७. गोंदेश्वर मुख्य शिवमंदिराच्या स्तंभावरील गणेशप्रतिमा
८. पाटेश्वर येथील आगळावेगळा गणेश
९. पाटेश्वर येथीलच स्त्रीरूपी गणेश अथवा गणेशिनी अथवा विनायकी
१०. भुलेश्वर येथील स्त्रीरूपी गणेश अथवा गणेशिनी अथवा विनायकी
११. पेडगाव येथील भग्न बाळेश्वर मंदिरातल्या सभामंडपातील स्तंभावर असलेला गणांसह नृत्यमग्न गणेश
१२. तिथल्याच बाह्य भिंतीवर असलेला अजून एक नृत्यमग्न गणेश
१३. पेडगाव येथीलच अजून एका भग्न मंदिरातील गणेशमूर्ती
१४. पिंपरी दुमाला येथील प्राचीन मंदिरातील गणेशप्रतिमा
१५. पिंपरी दुमाला येथीलच महावीरांसह असलेली गणेश प्रतिमा
१६. पांडेश्वरच्या यादवकालीन शिवमंदिरातीच्या बाह्य भिंतीवर असलेला गणेश
१७. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बाह्य भिंतीवर असलेली भव्य गणेशप्रतिमा
१८. खिद्रापूरच्या मंदिरातील सप्तमातृकापट. डवीकडे वीरभद्र शिव मध्ये सप्तमातृका आणि शेवटी उजवीकडे गणेश
प्रतिक्रिया
9 Sep 2013 - 12:44 pm | यशोधरा
कुठे कुठे फिरतोस! किती माहिती जमवतोस! एकदम सह्ही :)
खिद्रापूरचा गणपती देखणा आहे! तसेच भुलेश्वराचे शिल्प.
9 Sep 2013 - 12:52 pm | मुक्त विहारि
पुढील लेखाची वाट बघत आहे..
9 Sep 2013 - 12:52 pm | स्पा
एक लंबर कलेक्शन
मस्तच।
9 Sep 2013 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
+1
9 Sep 2013 - 1:14 pm | बॅटमॅन
kalekshan ek number!!!! AwaDale ekadam :)
9 Sep 2013 - 1:22 pm | गणपा
समयोचीत.
॥कुठे कुठे फिरतोस! किती माहिती जमवतोस! एकदम सह्ही ॥
+१
असेच म्हणतो
9 Sep 2013 - 2:32 pm | पैसा
सुंदर फोटो आणि समयोचित लेख!
12 Sep 2013 - 9:51 am | ऋषिकेश
+१ असेच म्हणतो
9 Sep 2013 - 5:26 pm | प्यारे१
भन्नाट रे!
गणपती बाप्पा मोरया!
9 Sep 2013 - 5:40 pm | मृत्युन्जय
आयला कुठुन कुठुन शोधुन मिळवले आहेस रे. एका परिच्छेदात प्रत्येक मंदिराची माहितीही दे की.
9 Sep 2013 - 5:46 pm | प्रचेतस
प्रत्येक मंदिरावर सविस्तर लेख लिहिणारच आहे रे. यातल्या काही ठिकाणांवर याआधीच लिहिलेले आहे. उरलेल्यांवर लवकरच लिहिन
9 Sep 2013 - 6:15 pm | चित्रगुप्त
उत्कृष्ट फोटो.
गणेशाची मूर्ती ही सप्तमातृकांबरोबर असण्याचे काही विशेष कारण आहे का?
तसेच गणेशाला दुय्यम देवतांपासून मुख्य देव म्हणून स्थान मिळण्यापर्यंतचे विविध टप्पे मूर्त्यांमधून/मंदिरांमधून वा ग्रंथांमधून आढळतात का? ('संतोषीमाता' ही सिनेमानंतर जास्त प्रसिद्ध झाली, तसे काही गणेशाबाबद झाले का?) गणपति हा मुळात 'विघ्नकर्ता' होता, कालांतराने 'विघ्नहर्ता' झाला, असे वाचल्याचे आठवते.
माझ्याकडे पॅरिसच्या एका संग्रहालयातील रतिमग्न गणेशाच्या मूर्तीचा मी घेतलेला फोटो आहे, तो सापडला की देईन.
9 Sep 2013 - 8:11 pm | प्रचेतस
सप्तमातृका या मुख्यतः शाक्तपंथीयांच्या देवता. या मातृकांपैकी चामुंडा, वाराही, नारसिंही या मूळचे अवैदिक रूप घेऊन आलेल्या. गणेशसुद्धा मूळचा अवैदिक आणि तोही सुरुवातीला तंत्रपूजकांचाच देव होता. त्यामुळेच सप्तमातृकापटांमध्ये गणेशाची मूर्ती सुद्धा आढळते.
म्हटले तर आढळतात.
सुरुवातीच्या मंदिरांतील गणेशमूर्ती ह्या मंदिरांच्या बाह्यभिंतींवर किंवा सप्तमातृकांच्या जोडीला आढळून येतात. नंतर उत्तर राष्ट्रकूट्, शिलाहार काळात ह्या हळूहळू मुख्य देवतांमध्ये येण्यास सुरुवात झाली. दिवेआगरच्या सुवर्णगणेश ह्याच शिलाहारांच्या काळचा. साधारण ह्याच काळात मंदिरांच्या गर्भगृहांवर गणेशपट्टी कोरण्यास सुरुवात झाली. तत्पूर्वीच्या कालखंडातील मंदिरांच्या द्वारपट्टीकेवर देवी, शिव, गजान्तलक्ष्मी किंवा अगदी विष्णूसुद्धा मी पाहिला आहे. उत्तरयादवकाळात गणेश मुख्य देवतांत यायची प्रक्रिया पूर्ण होत गेली आणि शिवकाळ व तदनंतर पेशवेकाळात तिला आजचे स्वरूप प्राप्त झाले.
बाकी रतिमग्न गणेशाच्या मूर्तीच्या फोटोच्या प्रतिक्षेत.
10 Sep 2013 - 1:02 pm | चौकटराजा
ही उत्तरे वाचून आपण खरंच बावळा " चौकटराजा" आहोत असा complex येउ लागला आहे.
बाकी रतिमग्न गणेशाच्या मूर्तीच्या फोटोच्या प्रतिक्षेत.
अगदी रतिमग्न नव्हे पण काहीसा प्रणयी गजानन अंबरनाथ शिवालय मधे आहे !
9 Sep 2013 - 8:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्लीशेठ, श्रीगणेश लेखमालिकेतलं पहिलं पुष्प आवडलं.
फोटो भारीच.
-दिलीप बिरुटे
9 Sep 2013 - 9:06 pm | मदनबाण
आहाहा ! :)
9 Sep 2013 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा
टाळ्या...............!!! गंपती बाप्पा मोरया! :)
==========================================
समांतर-परत पाऊस सुरु झालाय...
अजुन एक पेडगाव ट्रीप करायची लै विच्छा व्हायलीया..सगळं कसं हिरवं हिरवं गार असल!
10 Sep 2013 - 12:04 pm | झकासराव
अफलातुन :)
सप्तमातृका म्हणजेच सातीआसरा का?
का त्या वेगळ्या?
10 Sep 2013 - 12:32 pm | प्रचेतस
सातीआसरा ह्या सप्तमातृकांमधूनच उत्क्रांत झाल्यात हे नक्की. जलदेवताच त्या.
बाकी आसरांविषयी अधिक माहिती पैसा ताई देऊ शकेल असे वाटते.
10 Sep 2013 - 12:49 pm | पैसा
आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात.
ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः ||
असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे.
या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्या बाजूला गणपती असतो. या सार्या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात.
प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे.
10 Sep 2013 - 1:05 pm | प्रचेतस
धन्यवाद.
ह्या मातृकांमध्ये नारसिंहीचा पण कधी कधी समावेश केला जातो.
10 Sep 2013 - 2:34 pm | सागर
पैसाताई सुंदर प्रतिसाद
सप्तमातृकांवर रा.चिं. ढेरे यांच्या 'लज्जागौरी' या पुस्तकांत सविस्तर माहिती आली आहे.
तशीच सप्तमातृकांची माहिती त्यांनी इतरही पुस्तकांतून वेळोवेळी मांडली आहे.
10 Sep 2013 - 4:04 pm | झकासराव
माहितीपुर्ण प्रतिसाद पैसाताइ :)
धन्यवाद..
सातीआसरा ज्याला कोल्हापुरात बोलीभाषेत सात्यासरा म्हणलं जातं, त्याची पितळी, देवघरात ठेवता येणारी छोटी मुर्ती पाहिली आहे. त्याला परपेन्डीक्युलर असा एक देव असतो. त्याला बोली भाषेत झोटीन्ग म्हणतात.
बहुतेक वीरभद्र असणार..
7 Mar 2014 - 6:10 pm | जेपी
आसरा कंदी बगितल्यात का ? आमच्या हिरीत हायत . माग लागल्या की आख्खा सौंसार अर्पवा लागतो .
आमच्या मामाला प्रसन्न हायत , त्याच्या हिरीला कदी बी पाणी कमी पडत नाय .
7 Mar 2014 - 10:26 pm | आयुर्हित
चला जाऊ या बघायला.
करा तयारी!
10 Sep 2013 - 12:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्तच रे वल्ली... अजुन येऊ दे.
फिरायला काय अनेक जण फिरत असतात. पण असं जागरुकतेने फिरणारे फार कमी.
10 Sep 2013 - 12:33 pm | llपुण्याचे पेशवेll
छान शिल्पे. फक्त
>>१६. पांडेश्वरच्या यादवकालीन शिवमंदिरातीच्या बाह्य भिंतीवर असलेला गणेश
हा गणपती नाही वाटला, हत्ती वाटला.
10 Sep 2013 - 12:35 pm | प्रचेतस
सहमत आहे. हत्तीशी जास्त साधर्म्य आहे हे खरं. पण तिथे इतर कुठल्याच प्राण्यांची शिल्पे नाहीत. फक्त देवतांची आहेत.
10 Sep 2013 - 1:01 pm | विटेकर
खूपच छान चित्रे आणि माहीती.
पैसा ताईंची माहीती ही नवीनच आहे .. आवडेश !
10 Sep 2013 - 1:13 pm | भ ट क्या खे ड वा ला
फिरण्याचा एक नवीन दृष्टीकोन मिळाला.
10 Sep 2013 - 3:47 pm | कवितानागेश
अतिशय सुंदर शिल्पे. :)
10 Sep 2013 - 6:21 pm | अनन्न्या
सविस्तर माहिती येऊ दे.
10 Sep 2013 - 10:53 pm | मराठे
स्त्रीरूपी गणेश / विनायकी हे प्रथमच ऐकतोय. त्याची काही ष्टोरी आहे का?
11 Sep 2013 - 3:23 am | किसन शिंदे
यातली बहूतेक शिल्पे तुझ्यासोबत पाहीली आहेत. बाकीचे लेख कधी येणारेत म्हणे?
11 Sep 2013 - 2:31 pm | सस्नेह
गणेशाच्या आकृतिबंधातच डौल आहे. तो शिल्पांनी जास्तच खुलवला आहे.
11 Sep 2013 - 6:18 pm | अभ्या..
अगदी सहमत.
इतके व्हेरिअशन्स दुसर्या संपूर्ण मानवी आकार प्राप्त देवतेचे आढळत नाहीत.
फक्त स्थूल मानवी शरीर आणि हत्तीचे डोके एवढ्याच कन्सेप्ट्वर एवढे व्हिजुअलायझेशन म्हणजे नवलच आहे.
(बाकी अलंकार, शस्त्रे, वाहन, मुद्रा, आकार व सोबतच्या देवता हे प्रॉप्स वगळता हत्तीचे शिर नरदेह हेच बेसिक)
@ वल्ली
दाद्या यज्ञवराहमूर्ती जशी पूर्ण वराहाआकारात आहे तसा पूर्ण हत्तीच्या आकारात कुठे गणेशमूर्ती आहे का रे?
किंवा पूर्ण मनुष्याकृती तरी?
11 Sep 2013 - 9:00 pm | प्रचेतस
नाय रे. म्हणजे निदान मी तरी पाहिली नाही. बाकी गणेश म्हणजे हत्तीचे मुख आणि मनुष्याचे धड. यापैकी काहीही नसले मग तो गणेश होऊ शकत नाही.
11 Sep 2013 - 7:40 pm | दत्ता काळे
गणेशाची सर्व शिल्पचित्रे मस्तं.
11 Sep 2013 - 9:13 pm | मोदक
जबरी धागा रे!!
12 Sep 2013 - 10:14 am | सुमीत भातखंडे
अप्रतिम संकलन!
12 Sep 2013 - 12:22 pm | सौंदाळा
सहीच
15 Sep 2013 - 12:50 pm | स्वाती दिनेश
सर्वच शिल्पे सुंदर!
स्वाती
15 Sep 2013 - 1:50 pm | मालोजीराव
खिद्रापूर वाला आपला फेव्हरेट आहे...अजुन धागे येउदेत रे
17 Sep 2013 - 6:53 am | स्पंदना
स्त्रीरुप गणेश पाहुन चाट पडले आहे.
केव्हढी ती माहीती! पैसाताईचा प्रतिसाद अन त्यानुरुप घडलेली चर्चा आवडली.
आणखी तीन चित्रे टाकली असती तर एकवीस गणपती पहायची हौस फिटली असती.
23 Sep 2013 - 7:06 pm | अनिरुद्ध प
+१
17 Sep 2013 - 8:45 am | नाखु
माहीतीपूर्ण लेख आणि "प्रची" खास वल्ली "नजाकत" असलेली..
"गडकरी" अभिनंदन
4 Mar 2014 - 11:24 pm | पैसा
रा.चिं.ढेरे यांचे 'लोकदैवतांचे विश्व' वाचते आहे. त्यात ते म्हणतात की गणेश विघ्नकर्ता स्वरूपात पूजला जात होता तेव्हाचे प्राचीनतम शिल्प इराणमधील लुरिस्तान इथे सापडले आहे. ते इ.स. पूर्व १२०० वर्षे इतके जुने आहे. सध्या पॅरिस येथे लुव्रमधे आहे. मात्र त्याचे छायाचित्र कुठेही मिळाले नाही.
http://www.india-seminar.com/2013/651/651_nanditha_krishna.htm
या पानावर त्याचे रेखाचित्र आहे. तसेच चौथ्या शतकातील अफगाणिस्तानमधील गणेशाच्या मूर्तीचेही छायाचित्र आहे.
वर उल्लेख केलेल्या स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले.
7 Mar 2014 - 9:33 am | प्रचेतस
रेखाचित्र रोचक आहे.
ते शिल्पाचा फोटो कुठे मिळतो का ते बघायला हवे.
अफगाणिस्तानातील त्या दोन गणेश मूर्ती तर लै फेमस आहेत.
अलक्ष्मीचे फारसे पटत नाही कारण मातृकांसहीत विनायकी वैग्रे स्त्रीरूपे ही त्या त्या पुरुषदेवतांचीच स्त्रीरूपे प्रतिके आहेत असे मला वाटते. स्त्रीरूपात ह्या देवता येताना त्यांची बरीचशी मूळ पुरुष लक्षणे मात्र कायम राहिलेलीच आढळतात जसे वाहन, शस्त्र वैग्रे.
8 Mar 2014 - 5:09 pm | पैसा
विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.
8 Mar 2014 - 2:41 pm | कंजूस
अप्रतिम !
पुढील विषय
देवळांचे लाकडी रथ
येऊ द्या .
8 Mar 2014 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा
+१