***
आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा
***
छत्रपति शिवाजी महाराज
इ.स. १५७० च्या सुमाराला बहामनी सत्तेचे ५ तुकडे झाले. आणि तिसवाडी, बार्देश व साळशेत हे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले ३ तालुके वगळून बाकीचे तालुके इस्माईल आदिलशहाच्या ताब्यात आले. इ.स. १५८० मध्ये पोर्तुगालवर स्पेनची सत्ता प्रस्थापित झाली. इथून पुढे इ.स. १६४० पर्यंत पोर्तुगालवर स्पेनची सत्ता सुरू राहिली. अर्थातच, या काळात गोव्यावर अप्रत्यक्षपणे स्पेनची सत्ता होती. या काळात पोर्तुगीज सत्ता काहीशी दुर्बल झाली होती. या काळात हॉलंड आणि स्पेन यांचं शत्रुत्व होतं. इ.स. १६०३ मध्ये वलंदेज म्हणजेच डच लोकानी मांडवीच्या मुखात ठाण मांडून गोव्याची नाकेबंदी सुरू केली. इ.स. १६०४ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध, डच आणि कालिकतचा झामोरिन यांच्यात तह झाला. डच आणि पोर्तुगीज यांच्यातल्या चकमकी सुरूच राहिल्या. इ.स. १६४० साली श्रीलंका तर इ.स. १६४१ साली मलाक्का हे दोन प्रांत डचानी पोर्तुगीजांकडून हिसकावून घेतले. समुद्रातून गोव्याची नाकेबंदी इ.स. १६४० च्या दरम्यान परत सुरू झाली. नंतर इ.स. १६६० पर्यंत हे असंच सुरू राहिलं. इ.स. १६६० मधली महत्त्वाची घटना म्हणजे कॅथरिन या राजकन्येच्या विवाहात मुंबई बेट पोर्तुगालकडून दुसर्या चार्ल्सला हुंडा म्हणून मिळालं आणि भारताच्या पश्चिम किनार्यावर इंग्रजांना एक महत्त्वाची जागा मिळाली. आता भारतात पोर्तुगीजांचं राज्य दीव-दमण, वसई, चौल आणि गोव्यातले ३ तालुके एवढ्यापुरतंच उरलं.
या दरम्यान, शिवनेरीवर एक तेजस्वी, महापराक्रमी शक्ती १९ फेब्रुवारी १६३० ला उदयाला आली होती. राजे शिवाजी स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना करून त्याच्या मजबुतीचं काम करत होते. या द्रष्ट्या महापुरुषाने तेव्हाच्या कोणत्याही भारतीय शासकाने फारशा न केलेल्या अनेक गोष्टी केल्या. त्यातली एक म्हणजे आरमाराची स्थापना. भूदुर्गांबरोबरच जलदुर्गांची स्थापना. इ.स. १६५९ मध्येच शिवाजी राजांनी २० लढाऊ नौका तयार करून युरोपियन आक्रमकांना जबरदस्त आव्हान उभे केले. या आरमाराची पोर्तुगीजांनाही एवढी दहशत होती की, त्यांनी राजांच्या नौकांना आपल्या बंदरात येऊ द्यायला नकार दिला होता! संपूर्ण कोकण किनार्या वर महाराजांनी अनेक जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांना धडकी भरवणारा सिंधुदुर्ग इ.स. १६६४ मध्ये अस्तित्त्वात आला. सुरुवातीच्या काळात आदिलशहाच्या विरोधात लढण्यासाठी शिवाजी राजांनी पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पोर्तुगीज घाबरले आणि त्यांनी या लढ्यात गप्प राहणे पसंत केले. या काळात सावंतवाडी संस्थानात लखम सावंतची सत्ता होती. त्याने शिवाजी राजांचे आधिपत्य मान्य केले. कोकणातून राजांचे सैन्य कुडाळ जिंकून पेडण्यात उतरले. इ.स. १६६४ मध्येच डिचोली तालुका आदिलशहाकडून राजांच्या ताब्यात आला. इथे राजांनी आपला तळ उभारला. इ.स. १६६५ मध्ये राजानी ८५ युद्धनौका बरोबर घेऊन मालवणहून प्रयाण केले आणि गोव्याचा किनारा ओलांडून थेट बसरूरपर्यंत धडक मारली. तिथे अगणित लूट करून, परतीच्या रस्त्यात गोकर्ण, अंकोला आणि कारवार आदिलशहाकडून जिंकून घेतले. पोर्तुगीजांच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या सिंधुदुर्गाप्रमाणेच दक्षिण सीमेवर रामाचे भूशिर इथला मूळात रामदेवरायाचा जलदुर्ग मजबूत करून घेतला. त्यानी जणूकाही पोर्तुगीजाना त्यांची सीमा आखून दिली की याच्या पुढे तुम्ही यायचं नाही.
इ.स. १६६५ मध्ये राजांना मिर्झाराजेंबरोबर तह करून आग्रा भेटीला जावं लागलं. इ.स. १६६६च्या अत्यंत थरारक अशा आग्र्याहून सुटकेनंतर राजांनी अजिबात उसंत न घेता कोकणातून गोव्यावर स्वारी केली. टाकोटाक आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या मर्दनगडाला वेढा घातला. लगेच पोर्तुगीजांनी आदिलशाही सैन्याला मदत सुरू केली. महाराजांनी तरीही हा किल्ला जिंकून घेतला. मध्यंतरीच्या काळात वाडीच्या लखम सावंत व तळकोकणातल्या इतर देसायांनी शिवाजी राजांच्या मुलखाला उपद्रव द्यायला सुरुवात केली होती. राजे कोकणात येताच हे देसाई घाबरून पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या मुलखात पळून गेले. त्यांचं पारिपत्य करण्याच्या मिषाने आणि पोर्तुगीजाना जरब बसविण्यासाठी महाराजांचे सैन्य बारदेशात घुसले. आणि फिरून पोर्तुगिजाना दहशत बसली. इ.स. १६६७ साली पोर्तुगीज आणि महाराज यांच्यात तात्पुरता तह झाला. महाराजांनी पोर्तुगीजांना त्यांचे इन्क्विझिशन बंद करायला सांगितलं.
गोव्यातल्या जनतेला अभय देण्याच्या दृष्टीने या शिवभक्त राजाने कदंबांचं कुलदैवत श्री सप्तकोटीश्वर याचं मंदिर नार्वे येथे परत उभारलं. मलिक काफूर, आदिलशहा आणि पोर्तुगीज यानी ३ वेळा उद्ध्वस्त करून विजनवासात पाठवलेल्या सप्तकोटेश्वराला महाराजानी छप्पर दिलं. गोव्यातला डिचोलीचा तळ मजबूत करून महाराज परत महाराष्ट्रात गेले. इ.स. १६७० पर्यंत सुमारे ६०,००० पायदळ आणि ४०,००० घोडदळाची उभारणी करून महाराजानी मिर्झाराजे जयसिंगांबरोबरच्या तहात गमावलेला बहुतेक सगळा मुलुख परत मिळवला.
इ.स. १६७२ मध्ये महाराजांनी रामनगरच्या राजावर हल्ला चढवला, आणि तो पोर्तुगीजाना देत असलेली चौथाई आपल्याला द्यावी अशी त्यांनी मागणी केली. यावेळेला पोर्तुगीजांनी रामनगरच्या राजाला मदत केली. नंतर ६ जून १६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि काही काळातच महाराजांनी रामनगरच्या राजाचा पराभव करून पोर्तुगीजांकडे असलेले चौलमधले चौथाईचे हक्क मिळवले. तर आदिलशहाच्या ताब्यात गेलेले कारवार, कोल्हापूर, फोंडा-मर्दनगडही इ.स. १६७५ मध्ये परत मिळवले. ५०,००० चे सैन्य जमा करून इ.स. १६७६ मधे महाराज दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले. यावेळेला महाराजानी दक्षिणेतील राजांची एकजूट घडवून औरंगजेबाला टक्कर द्यायचं स्वप्न पाहिलं होतं. कुतुबशहाने महाराजांचा मैत्रीचा हात स्वीकारला, पण आदिलशहाने मात्र एवढी समजूत दाखवली नाही. प्रथम महाराजानी तामिळनाडूतील जिंजी आणि वेल्लोर जिंकून घेतले, जे भविष्यकाळात मराठी साम्राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतीव महत्त्वाचे ठरले.
नंतरचा काळ स्वराज्याची घडी बसवण्यात आणि संभाजी राजांच्या काहीशा अपरिपक्व हालचालींच्या काळजीत व्यतीत होत असताना मराठी राज्याचा पाया घालणारा हा सूर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित. पोर्तुगीज दप्तरात, महाराजांनी पोर्तुगीजांना जरब बसवण्यासाठी लिहिलेली तसेच पोर्तुगीज महाराजांना किती घाबरत असत हे दाखवणारी पत्रे उपलब्ध आहेत.
महाराजांचा काळ झाल्यानंतर एक वर्ष काहीसं गोंधळाचं गेलं. संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला. त्यांच्या अटकेचा आदेश काढला गेला आणि रायगडावर घाईघाईने लहानग्या राजारामाचा राज्याभिषेक झाला. या घटनांचं कारण म्हणजे अष्टप्रधानांपैकी काहीजण सोयराबाईला पुढे करून आपल्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालत असावेत असं वाटतं. तसंच नवीन राज्य स्थापन करण्याच्या हेतूने संभाजी राजांनी दिलेरखानाच्या छावणीत सामिल होणं आणि शिवाजी महाराजांनी प्रयत्नपूर्वक त्यांना परत आणणं, यात महाराजांना झालेला प्रचंड मनस्ताप, यातूनच प्रधानमंडळांपैकी काहींचा संभाजी राजांवरचा विश्वास उडाला, हेही एक कारण असावं. संभाजी राजे आणि सोयराबाई यांच्या वादात सोयराबाईचे भाऊ सरनौबत हंबीरराव मोहिते यानी संभाजी राजे हेच राज्य चालवायला योग्य आहेत आणि अभिषिक्त युवराज आहेत या भूमिकेतून संभाजी राजांची बाजू घेतली. सरनौबतांच्या मदतीमुळे इ.स. १६८१ मध्ये संभाजी राजे छत्रपती झाले. त्यानी प्रथम स्वतःच्या गुन्हेगाराना कठोर शिक्षा दिल्या. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे याना मात्र माफी मिळाली आणि त्यानी नंतर राजांबरोबर मोहिमेत भाग घेतला.
छत्रपति संभाजी महाराज
राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसात हा २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. बरोबर पेशवे मोरोपंत आणि सरनौबत होते. त्यानी बुर्हाणपूरवर हल्ला करून २ कोटी रुपयांची लूट मिळवली. यावेळेला एका अरबी व्यापार्याकडून राजांनी घोडे विकत घेतले असा उल्लेख आहे. हा व्यापारी एवढा घाबरला होता की तो ते घोडे फुकट द्यायला तयार झाला होता म्हणे! पण सामान्य जनतेला त्रास देऊ नये हे शिवाजी राजांचं तत्त्व संभाजी राजांनीही अंगिकारलं असावं. यापूर्वीच म्हणजे इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यु होताच औरंगजेब ५ लाख सैन्य आणि ४ लाख जनावरे घेऊन स्वतः महाराष्ट्रात दाखल झाला होता, मराठी राज्य सहज चिरडून टाकू अशा हिशेबाने तो आला असेल पण आपली गाठ कोणाशी आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती! नाशिकजवळच्या रामशेजच्या एका किल्ल्यासाठी मुघल सैन्याला ७ वर्षं लढावं लागलं! तसंच पुढच्या ९ वर्षात नाव घेण्यासारखा एकही विजय मुघल सैन्याला मराठ्यांसमोर मिळवता आला नाही. संभाजी राजांच्या काही सैन्याने औरंगजेबाच्या सैन्याला गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले तर स्वतः राजे कोकणात उतरले. त्यानी प्रथम पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला पण पोर्तुगीजांनी मुघलांना मदत करणे पसंत केलं. आता राजांनी पोर्तुगीजांना संपविण्याचा निर्धार केला. मर्दनगडाची डागडुजी करून तिथे आणि भतग्राम (डिचोली) इथे सैन्याचे भक्कम तळ उभारले.
वयाच्या १६ व्या वर्षापासून संभाजी राजांनी थोरल्या महाराजांबरोबर गोव्याच्या आणि इतर मोहिमांमधे भाग घेतला होता, त्यावेळेला महाराजांचं युद्धतंत्र त्यांच्या पूर्ण अंगवळणी पडलं असावं. तसंच गोव्याच्या भूमीची संभाजी राजांना पूर्ण माहिती झाली होती. यामुळेच गोव्यात राजांचा सर्वत्र सहज संचार होत असे. इ.स. १६८३ मधे राजांनी चौल पोर्तुगीजांकडून घेतले तर ११ डिसेंबर १६८४ ला बार्देशवर हल्ला केला. बार्देशातील थिवी, चोपडे हे किल्ले जिंकले. साळशेत (मडगाव) घेतले. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचा पराभव केला आणि शिवाजी महाराजानी स्थापन केलेल्या राज्याचा आणखी विस्तार केला. राजे अवघ्या १ लाख सैन्यानिशी ५ लाखाचे मुघल सैन्य, जंजिर्या चा सिद्दी, गोव्यातले पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय एवढ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढत होते. पैकी गोव्यात त्यानी बराच काळ वास्तव्य केलं. गोव्यातलं त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यानी पोर्तुगीजांना पायबंद घातला आणि धर्मांतरित झालेल्याना परत शुद्धिकृत करून हिंदू करून घेण्याचं शिवाजी महाराजांचं कार्य त्यांच्या या पुत्रानेही पुढे चालू ठेवलं.
शिवाजी महाराजांच्या गोवा मोहिमेत इथल्या स्थानिक राणे, देसाई वगैरे मंडळीनी त्याना विरोधच केला होता. पण त्यांची मदत मिळवण्यात संभाजी राजे मात्र यशस्वी ठरले. असोळणा, कुंकोळी इथल्या मराठ्यांनी आणि साखळीच्या राणे घराण्याने राजांना खुल्या दिलाने मदत केली आणि त्यांचं राज्य स्वीकारलं. समाजातून बहिष्कृत झालेल्या राण्यांना संभाजी राजानी पंक्तिपावन करून घेतले आणि राणे राजांचे ऋणी झाले. गोकुळाष्टमीच्या रात्री संभाजी राजांनी मांडवी नदी पार करून पोर्तुगीजांवर हला करण्यासाठी नदीच्या पात्रात घोडे घातले, पण पावसात उधाण आलेल्या प्रवाहात घोड्याचा पाय घसरला आणि राजे वाहून जाऊ लागले. या वेळेला खंडो बल्लाळाने राजांना वाचवले अशी कथा स्थानिक लोकांच्या सांगण्यात येते. काही मराठी सैन्य साळशेतमधे ठाण मांडून बसले तर स्वतः राजांनी वेळ न गमावता कुंभारजुवे बेट पोर्तुगीजांकडून घेतले आणि तीन बाजूंनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ला चढवला. आता फक्त तिसवाडीच पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली होती.
दुसर्या दिवशी राजे स्वतः गोवा वेल्हावर हल्ला करणार हे पोर्तुगीजांनी जाणले. आताच्या ओल्ड गोवा येथून कुंभारजुवे बेट दिसते. तिथल्या सैन्याच्या हालचाली पाहून पोर्तुगीज घाबरले. त्यांनी चर्चमधलं सेंट फ्रान्सिस झेवियरचे शव बाहेर काढलं. व्हाईसरॉय काउंट डी अल्वारिसने आपला राजदंड त्याच्या शवपेटीवर ठेवला आणि "सायबा, तूच आमचं रक्षण कर" अशी करुणा भाकली. पोर्तुगीजाना हा सायब पावला की नाही माहित नाही, पण मुघल मात्र मात्र पावले! सुमारे १ लाखाचे मुघल सैन्य कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत आलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजी राजाना परत जावं लागलं.
इ.स. १६८४ मधे संभाजी राजांनी पोर्तुगीजांबरोबर तह केला. त्या अनुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोव्याचे ३ तालुके त्याना सोडून दिले. तर पोर्तुगीजानी चौल इथे कर देण्याचं मान्य केलं. पण या तहाची पूर्ण अमलबजावणी झाली नाहीच! बार्देशमधले किल्ले मराठ्यांनी परत केले नाहीत. आता औरंगजेबाची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली. पण पोर्तुगीजांनी गोव्यातल्या मराठा देसायांबरोबर तह केला आणि मुघल सैन्याच्या हाती काही लागले नाही. मराठा सैन्य आणि पोर्तुगीज यांच्या चकमकी सुरूच राहिल्या. पण संभाजी राजे पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. ते जर झालं असतं तर आज गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा राहिला असता!
आणखी सतत ४ वर्षे मुघलाना हुलकावण्या देत जेरीला आणणारा हा शूर छत्रपती १ फेब्रुवारी १६८९ ला कपटाने कैद झाला. त्यांच्या सख्या मेव्हण्याने, गणोजी शिर्क्याने विश्वासघात केला आणि नंतर तब्बल ४० दिवस हालहाल करून शेवट औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला राजांचा वध केला. पण एवढे हाल होत असतानाही या छाव्याने औरंगजेबाचा कोणताच प्रस्ताव मानला नाही आणि वीराचे मरण पत्करले. महाराष्ट्राच्याच नाही तर गोव्याच्या इतिहासात या राजाचं स्थान अद्वितीय आहे. त्याच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा झुंजण्याचा निर्धार आणखीच पक्का झाला आणि नंतर एकजुटीने पण निर्नायकी अवस्थेत मराठ्यांनी मुघलांना जी झुंज दिली तिला इतिहासात तोड नाही. पराक्रमात बापसे बेटा सवाई असलेल्या या तरूण राजाने अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात विजेसारखं थोड्या काळासाठी लखलखून आत्मार्पण केलं आणि सामान्य शेतकर्यांना औरंगजेबाशी भांडण्याचं पहाडाचं बळ दिलं. गोव्यात पोर्तुगीजांना बसलेला दणका एवढा प्रचंड होता की त्या ३ तालुक्याच्या पलिकडे आणखी प्रदेश आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्नसुद्धा त्यानी नंतर केला नाही. एवढ्या सततच्या धामधुमीतही 'बुधभूषण' आणि इतर काही संस्कृत रचना करणार्या या तेजस्वी राजाच्या नावावरून 'वास्को द गामा' शहराचं नाव 'संभाजीनगर' करावं असा प्रस्ताव काही काळापूर्वी आला होता, पण...
छत्रपती संभाजीच्या वधानंतर महाराणी येसूबाईने राजारामाला रामचंद्रपंत अमात्यांच्या हाती सोपवून प्रतापगडावर पाठवले. रायगडावर सूर्याजी पिसाळ फितूर झाला आणि येसूबाई आणि शाहू मुघलांच्या हाती लागले. खंडो बल्लाळ राजारामाला महाराष्ट्रातून सुखरूप जिंजीला घेऊन गेला. तिथे ९ वर्षं वेढ्यात काढून गणोजी शिर्केच्या मदतीने राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परत आला. इ.स. १७०० साली राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईने राज्याची सूत्रे हातात घेतली. आता सावंतवाडी इथे लखम सावंताचा धाकटा भाऊ फोंड सावंत याची सत्ता होती. ताराबाईच्या प्रदेशाला लागून असल्याने त्याने ताराबाईचे वर्चस्व मान्य केले. तर ताराबाईने त्याला कुडाळ, बांदा, पेडणे, साखळी, डिचोली आणि मणेरी या ६ तालुक्यांचा मोकासा लिहून दिला.
फोंड सावंताचा मुलगा खेम सावंत हे गोव्याच्या आणि सावंतवाडीच्या इतिहासातलं मोठं मजेशीर प्रकरण आहे. त्याची कारकीर्द बरीच मोठी म्हणजे इ.स. १६७५ ते इ.स. १७०९ पर्यंत. त्यानेच 'सुंदरवाडी' अर्थात 'सावंतवाडीचा' पाया घातला. त्यापूर्वी सावंतांचं प्रमुख ठाणं कुडाळ होतं. या काळात त्याने प्रथम ताराबाई नंतर शाहू महाराज, म्हणजे ज्या कोणाचं वर्चस्व दिसेल त्याची प्रभुसत्ता बिनतक्रार मान्य केली. शाहू राजानी त्याला या ६ तालुक्यांचं वतन दिलं. म्हणजेच, छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांच्या काळात बंद झालेली वतनाची पद्धत शाहूच्या काळात परत सुरू झाली होती आणि हे छोटे वतनदार आपापल्या मुलुखात आपापल्या पद्धतीने सत्ता चालवीत होते. मूळ कर्नाटकातील शिरसीजवळचे, पण गोव्यात फोंडा इथे स्थायिक झालेल्या सोंदेकरांबरोबर खेम सावंताचा ३६ चा आकडा होता. जमेल तेव्हा सोंदेकरांच्या कुरापती काढण्याचे उद्योग त्याने आयुष्यभर चालू ठेवले. जिथे यश मिळणार नाही असं दिसलं तिथे सरळ माघार घेतली. मराठ्यांचं पारडं हलकं होतंय असं वाटलं की पोर्तुगीजांची मदत घेतली. हेतू साध्य होताच परत पोर्तुगीजांना अंगठा दाखवला. या सोंदेकरानीही वेगवेगळ्या वेळी मुघल, पोर्तुगीज, मराठे यांच्याबरोबर आपल्या रक्षणासाठी तह केलेले आढळून येतात. गोव्यातल्या सध्याच्या पक्षबदलांच्या राजकारणाची सुरुवात फार पूर्वी झालेली होती असं दिसतंय!
फोंड्याच्या मर्दनगडासाठी या काळात दरवर्षी एक लढाई लढली गेली. आणि किल्ल्याची मालकी आलटून पालटून कधी खेम सावंत, तर कधी सोंदेकर, कधी मराठे तर कधी मुघल अशी बदलत राहिली. पोर्तुगीजाना मराठे किंवा मुघलांसारखे प्रबळ शत्रू सीमेवर नको होते, त्यामुळे त्यानी खेम सावंत आणि सोंदेकर याना आपल्या सीमेवर राहू दिले. आणि शक्य तितके आपसात झुंजत ठेवले. अर्थातच फोंडा, डिचोली हे भाग अप्रत्यक्षपणे मराठ्यांच्याच ताब्यात राहिले.
साधारण इ.स. १७०० ते इ.स. १७०९ या ९ वर्षात खेम सावंताने गोव्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने पोर्तुगीज जहाजांवर हल्ले करून लूटमार सुरू ठेवली. त्याने संधी मिळतच बार्देश, फोंडा वळवई या भागात छापे मारून लुटालूट, जाळपोळ करणे, किल्ले ताब्यात घेणे यांचे सत्र सुरू ठेवले. किल्ल्यांच्या आश्रयाने शत्रूवर हल्ला करण्याचे शिवाजी महाराजांचे तंत्र खेम सावंताने वापरले. पोर्तुगीजानी या प्रकाराला वैतागून आमोणा, डिचोली, वळवई इथले किल्ले आपल्या ताब्यात येताच पाडून टाकले. डिचोलीचा किल्ला पाडल्यानंतर पोर्तुगीज व्हॉईसरॉयने असे उद्गार काढले की,"खेम सावंताला दुसरा शिवाजी होऊ देणार नाही!" तरी खेम सावंताचे उपद्व्याप सुरूच होते. शेवटी इ.स. १७०९ साली खेम सावंत मरण पावला. त्याला ३ मुलीच होत्या. त्यामुळे त्याच्या मागून त्याचा पुतण्या फोंड सावंत गादीवर आला. यानेही खेम सावंताप्रमाणेच पोर्तुगीजांबरोबर कधी मैत्री, कधी भांडण चालू ठेवले. कान्होजी आंग्रेंच्या आरमाराबरोबर त्याच्या चकमकी सतत चालू असत. इ.स. १७२९ मधे कान्होजींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा सेकोजी याने पोर्तुगीज आणि फोंड सावंताबरोबर लढाया चालू ठेवल्या.
इ.स. १७२० नंतर बाजीराव पेशव्यांच्या सरदारानी उत्तर गोव्यात हल्ले चालू ठेवले. आता फोंड सावंत बाजीरावाच्या बाजूने पोर्तुगीजांवर हल्ले करू लागला. बाजीराव आणि चिमाजी, पोर्तुगीजांविरुद्ध वसई आणि गोव्याच्या दोन्ही आघाड्यांवर लढत होते. पोर्तुगीजांनी वसईला गोव्यातून मदत पाठवू नये म्हणून इ.स. १७३९ साली दादाजी भावे नरगुंदकर, वेंकटेशराव घोरपडे आणि जिवाजी शिंदे यांनी गोव्यावर पुर्या ताकदीने हल्ला चढवला. राशोल आणि मार्मुगोव्याचा किल्ला सोडून उरलेला साळशेत तालुका मराठ्यांच्या ताब्यात आला. तर फोंड सावंतानंतर गादीवर आलेला त्याचा नातू रामचंद्र याने बारदेश तालुका घेतला. मराठ्यांनी फोंडा, सुपे आणि सांगे तालुके ताब्यात घेतले. संभाजी राजांनंतर परत एकदा पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त तिसवाडी राहिली. आता पोर्तुगीजांनी बाजीरावाकडे तहाची याचना केली. बाजीरावाने इन्क्विझिशन बंद करा, हिंदूंचा छळ बंद करा या आणि आणखी मागण्या पोर्तुगीजांपुढे ठेवल्या. इ.स. १७४० मध्ये चौल आणि कोर्लाईचा किल्ला देऊन पोर्तुगीजानी गोव्यात आपलं अस्तित्त्व कसंबसं राखलं. मराठ्यांनी कुंकोळी आणि असोळणा परत केले, पण रामचंद्र सावंताने बार्देश मात्र परत केला नाही! रामचंद्र सावंत आणि मराठे विरुद्ध पोर्तुगीज अशा चकमकी सुरूच राहिल्या. सोंदेकर आणि राणे यानी या वेळेला पोर्तुगीजाना मदत करायचं मान्य केलं.
इ.स. १७५६ साली पोर्तुगीज व्हॉईसरॉय कॉण्डे डी अल्वाने मराठ्यांच्या ताब्यातील मर्दनगडावर हल्ला केला. या लढाईत स्वतः व्हॉईसरॉय मरण पावला! गोंधळाचा फायदा घेत सावंतांनी पेडणे, सांगे आणि मणेरी तालुके घेतले. २४ डिसेंबर १७६१ ला तह झाला आणि पोर्तुगीजांनी सावंतांच्या ताब्यात असलेल्या सर्व प्रदेशावर सावंतांचा हक्क मान्य केला. याच सुमाराला पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि पेशवाई दुबळी झाली. याचा फायदा घेत पोर्तुगीजांनी इ.स. १७६३ मध्ये मर्दनगड जिंकून सोंदेकरांच्या ताब्यात दिला. पण एवढ्यात म्हैसूरच्या हैदर अलीने सोंदेकरांवर हल्ला केला. सोंदेकर पळून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला आले. आता कसलीच जबाबदारी नको म्हणून सोंदेकरानी फोंडा, केंपे आणि काणकोण तालुके पोर्तुगीजांच्या हवाली केले. इ.स. १७७१ साली सोंदेकरानी गोव्यातल्या त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावरचा हक्क सोडून दिला. इ.स. १७८५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीनी सावंतांवर हल्ला केला. आता घाबरून सावंतानी पोर्तुगीजांकडे मदत मागितली आणि त्या मदतीची परतफेड म्हणून पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या हवाली केला.
अशा प्रकारे इ.स. १७८८ मध्ये पूर्ण गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आला. पोर्तुगीजांनी इ.स. १५६० साली जिंकलेल्या तिसवाडी, बार्देश आणि साळशेत (साष्टी) तालुक्याना 'जुन्या काबिजादी' तर इ.स. १७७१ आणि इ.स. १७८८ मध्ये ताब्यात आलेल्या उरलेल्या प्रदेशाला 'नव्या काबिजादी' हे नाव मिळालं.
क्रमशः
**
विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.
- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )
प्रतिक्रिया
21 Jun 2011 - 11:32 am | गणपा
वाह सुरेख चालू आहे मालिका.
काय भर भरून माहिती देताय रे तुम्ही. पेश्शल धन्स २ टीम गोवा.
21 Jun 2011 - 5:22 pm | मिहिर
असेच म्हणतो.
21 Jun 2011 - 5:49 pm | सूड
माहितीपूर्ण लेखमालिका. पुभाप्र.
21 Jun 2011 - 7:32 pm | आनंदयात्री
वाह, हा भाग पण अप्रतिम झालाय. दरवेळेस नविनच, जनसामान्यांना माहित नसलेलीच माहिती द्यावी हा अतिशय प्रशंसनीय शिरस्ता टिम गोवा ने राखला आहे. याचकरिता तुमचे अभिनंदन करावे तितके थोडे.
आज जरी ललित स्वरुपात असले तरी भविष्यातल्या एका एतिहासिक पुस्तकाचे उत्तम फ्रेमवर्क तयार होत आहे हेही जाणवते.
लेखमालेच्या विषयाशी अवांतर असले तरी गणोजी शिर्के, सुर्याजी पिसाळ या लोकांचे पुढे काय झाले हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. या अवसानघातक्यांना पुढे कोणी शासन दिले ?
22 Jun 2011 - 11:17 pm | अलख निरंजन
असहमत! ललित लेखन म्हणून ठीक. ऐतिहासीक लिहायला बरेच कष्ट घ्यायला हवेत. संदर्भ ग्रंथांची सुची दिली पाहिजे. इतर बरेच बारकावे हवेत. संशोधन हवे.
अर्थात महाराष्ट्रात 'सहा सोनेरी पाने वगैरे' पुस्तकांनाही ऐतिहासीक दस्तावेज मानणारा एक वर्ग आहे त्यांच्यासाठी हेही ऐतिहासीक लेखन म्हणून खपुन जाईल.
23 Jun 2011 - 9:07 am | आनंदयात्री
असहमत! ललित लेखन म्हणून ठीक. ऐतिहासीक लिहायला बरेच कष्ट घ्यायला हवेत. संदर्भ ग्रंथांची सुची दिली पाहिजे. इतर बरेच बारकावे हवेत. संशोधन हवे.
अर्थात महाराष्ट्रात 'सहा सोनेरी पाने वगैरे' पुस्तकांनाही ऐतिहासीक दस्तावेज मानणारा एक वर्ग आहे त्यांच्यासाठी हेही ऐतिहासीक लेखन म्हणून खपुन जाईल.
24 Jun 2011 - 5:51 pm | शैलेन्द्र
ऐतीहासीक मात्रा उगळुन देताया जणु..
21 Jun 2011 - 7:49 pm | गणेशा
अप्रतिम लेखमाला ..
हा भाग सर्वात जास्त आवडला मला.. कदाचित मला माहित असलेल्या इतिहासातील बराचसा भाग यात असल्याने जास्तच छान वाटले वाचुन...
हा भाग संपुच नये असे वाटत होते ...
एक खंत :
क्रुपया वरती अपरिपक्व हालचाली असा जो उल्लेख केला गेला आहे तो कृपया काढुन टाकावा, हि कळकळीची विनंती..
जे युवराज वयाच्या चौदाव्या वर्षा आधीच "बुधभुषण" लिहु शकतात, येव्हड्या कमी वेळात आणि कमी वयात त्यांनी लढलेल्या सर्व लढाया जिंकतात.. कधीही हार न पत्करलेला तेजस्वि राजपुत्र आणि आपल्या धर्मासाठी आपल्या तेजपुर्ण आयुष्याचा ते त्याग करतात.. ते अपरिपक्व होते हा खोटा इतिहास माझे मन कधीच मान्य करत नाही.
आपला तसा उद्देश नाहिये हे पुढिल लेखनातुन कळतेच आहे, त्यामुळे अनावधानाने असुद्या किंवा इतर इतिहासाच्या वाचनातुन , येथुन तो उल्लेख काढवा असे वाटते.
21 Jun 2011 - 9:10 pm | गणपा
एक खंत : शी सहमत.
23 Jun 2011 - 11:26 am | नन्दादीप
+१...
सहमत...!!!!
आजही महाराजां एवढाच आदर संभाजी राजांबद्दल सुद्धा वाटतो.
21 Jun 2011 - 7:53 pm | योगप्रभू
टीम गोवा,
नाराज होऊ नका, लिखाणाचा प्रथमपासून चाहता आहे, पण पुढील मजकूर अनावश्यक आहे. गोव्याच्या इतिहासाशी शिवाजीराजे व संभाजीराजे यांचा जितका संबंध आला तेवढाच नमूद करणे उचित राहील.
<<महाराजांचा काळ झाल्यानंतर एक वर्ष काहीसं गोंधळाचं गेलं. संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला. त्यांच्या अटकेचा आदेश काढला गेला आणि रायगडावर घाईघाईने लहानग्या राजारामाचा राज्याभिषेक झाला. या घटनांचं कारण म्हणजे अष्टप्रधानांपैकी काहीजण सोयराबाईला पुढे करून आपल्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालत असावेत असं वाटतं. तसंच नवीन राज्य स्थापन करण्याच्या हेतूने संभाजी राजांनी दिलेरखानाच्या छावणीत सामिल होणं आणि शिवाजी महाराजांनी प्रयत्नपूर्वक त्यांना परत आणणं, यात महाराजांना झालेला प्रचंड मनस्ताप, यातूनच प्रधानमंडळांपैकी काहींचा संभाजी राजांवरचा विश्वास उडाला, हेही एक कारण असावं. संभाजी राजे आणि सोयराबाई यांच्या वादात सोयराबाईचे भाऊ सरनौबत हंबीरराव मोहिते यानी संभाजी राजे हेच राज्य चालवायला योग्य आहेत आणि अभिषिक्त युवराज आहेत या भूमिकेतून संभाजी राजांची बाजू घेतली. सरनौबतांच्या मदतीमुळे इ.स. १६८१ मध्ये संभाजी राजे छत्रपती झाले. त्यानी प्रथम स्वतःच्या गुन्हेगाराना कठोर शिक्षा दिल्या. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे याना मात्र माफी मिळाली आणि त्यानी नंतर राजांबरोबर मोहिमेत भाग घेतला.
राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसात हा २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. बरोबर पेशवे मोरोपंत आणि सरनौबत होते. त्यानी बुर्हाणपूरवर हल्ला करून २ कोटी रुपयांची लूट मिळवली. यावेळेला एका अरबी व्यापार्याकडून राजांनी घोडे विकत घेतले असा उल्लेख आहे. हा व्यापारी एवढा घाबरला होता की तो ते घोडे फुकट द्यायला तयार झाला होता म्हणे! पण सामान्य जनतेला त्रास देऊ नये हे शिवाजी राजांचं तत्त्व संभाजी राजांनीही अंगिकारलं असावं. यापूर्वीच म्हणजे इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यु होताच औरंगजेब ५ लाख सैन्य आणि ४ लाख जनावरे घेऊन स्वतः महाराष्ट्रात दाखल झाला होता, मराठी राज्य सहज चिरडून टाकू अशा हिशेबाने तो आला असेल पण आपली गाठ कोणाशी आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती! नाशिकजवळच्या रामशेजच्या एका किल्ल्यासाठी मुघल सैन्याला ७ वर्षं लढावं लागलं! तसंच पुढच्या ९ वर्षात नाव घेण्यासारखा एकही विजय मुघल सैन्याला मराठ्यांसमोर मिळवता आला नाही.>>
21 Jun 2011 - 7:58 pm | आनंदयात्री
असहमत आहे, अनावश्यक वाटले नाही.
21 Jun 2011 - 9:34 pm | चेतन
हा भागही मस्त झालायं मराठे आणि पोर्तुगिज यांच्यातील लढायांचं थोडं अधिक तपशिलवार वर्णन आवडलं असतं
सप्तकोटेश्वरचं मंदीर खुप आत मध्ये आहे मी खुप वर्षापुर्वी गेलो होतो तेव्हा दोन्ही बाजुंनी खडा चढ आणि मध्येच गाव असं होतंम ते आठवायचं कारण म्हणजे गाडी नादुरुस्त झाल्याने तेथे ६ तास थांबावे लागले होते.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
चेतन
22 Jun 2011 - 1:42 pm | शैलेन्द्र
कसं जायच सप्तकोटेश्वराला? राहुन गेलय माझं...
22 Jun 2011 - 6:52 pm | परिकथेतील राजकुमार
सुरेख लेखमाला.
वाचतोय...
22 Jun 2011 - 8:36 pm | प्रचेतस
खूपच सुरेख लेखमाला, टीम गोवा, तुमच्या कष्टाला तोड नाही.
23 Jun 2011 - 7:41 am | ५० फक्त
मस्त छान लेखमाला चालु आहे. अतिशय धन्यवाद टिम गोवा.
23 Jun 2011 - 10:35 pm | पैसा
गणेशा, गणपा आणि नंदादीप,
तुमची खंत कळतेय, पण १६७८ साली, म्हणजे संभाजी राजे २० वर्षांचे असताना दिलेरखानाला जाऊन मिळाले होते. त्यांचा उद्देश वडिलांप्रमाणे स्वतंत्र राज्य स्थापन करायचा होता, संभाजीराजानी प्रत्यक्ष मरारठी सैन्याविरुद्ध लढाई केली नव्हती पण त्याचा परिणाम म्हणून भूपालगड मराठ्यांच्या हातून गेला.साधारण एक वर्षानंतर दिलेरखानाने त्याना पकडायची तयारी चालवली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजानी तडफेने हालचाली करून संभाजी राजाना दिलेरखानाच्या छावणीतून सोडवले. एका २० वर्षाच्या तरुणाच्या अपरिपक्व हालचाली याच दृष्टीने छत्रपती शिवरायानी या घटनेकडे पाहिले असावे, नाहीतर कोणाचाही न्याय करताना शिवाजीमहाराजानी नातंसुद्धा कधी आड येऊ दिलं नाही. पुढच्या आयुष्यात संभाजी राजानी असा काही पराक्रम गाजवला आणि अपूर्व त्याग केला की या गोष्टीची आठवणही राहू नये.
योगप्रभू,
तुम्ही लेखमाला बारकाईने वाचताय याबद्दल धन्यवाद! या लेखात कोणत्या घटनांचा समावेश करावा याबद्दल आम्ही संभ्रमात होतो, पण त्या काळात महाराष्ट्र आणि गोवा अशी एकतर विभागणी झालेली नव्हती. तरी पूर्ण शिवचरित्र आणि संभाजी राजांचा काळ विचारात घेतला तर विस्तार खूप झाला असता आणि मुख्यतः गोव्यात त्या दोघांचं काय कार्य होतं याबद्दलच आम्हाला लिहायचं होतं. त्याचवेळी कथन सुसूत्र राहिलं पाहिजे हे ही पाहणं आवश्यक होतं. तुम्ही म्हणता तो भाग गाळला असता तर इतिहासाचं सलग वर्णन आलं नसतं. त्यामुळे अगदी थोडक्यात या सर्व घटना लिहिल्या आहेत.
25 Jun 2011 - 10:14 am | सौप्र
गोवा मालिका आवडते आहे. उत्तम संकलन. यात थोडा तट्स्थ दृष्टीकोन आणता आला तर अजून आवडेल.
29 Jun 2011 - 3:29 pm | निनाद
फार छान लेखमाला!
टिम गोवा, या पुस्तकाच्या प्रतीक्षेत असेन नक्की...
त्यातही अशीच भरपूर चित्रे द्या! आवडते आहे लेखन.
29 Jun 2011 - 9:44 pm | प्रियाली
लेखमालिका चांगली होत आहे. नवी माहिती बरीच कळली.
तरीही वर योगप्रभूंनी म्हटल्याप्रमाणे मूळ कथानकात एक समांतर कथानक घुसडलेलं असतं तसा मराठी राज्याचा इतिहास येतो आहे. तो अनावश्यक आहे. शिवाजी, संभाजी, पेशवे वगैरेंचे उल्लेख गोव्याच्या अनुषंगानेच व्हायला हवेत. तसे न झाल्याने मराठेशाहीच्या इतिहासात गोव्याचा इतिहास निवडून घ्यावा लागत आहे.
बाकी योगप्रभूंनी वर लिहिले आहेच. एवढी त्रुटी वगळता भाग उत्तम झाला आहे.