आमचे गोंय - भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता

टीम गोवा's picture
टीम गोवा in जनातलं, मनातलं
18 Apr 2011 - 9:52 am

***

आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा

***

इ. स. ९६० मध्ये हळसी चा कदंब राजा कंटकाचार्य याने शिलाहार राजा भीम याच्याकडून गोवा जिंकून घेतला. पण शिलाहारांनी त्याच्याकडून गोवा परत जिंकून घेतला. कंटकाचार्य ऊर्फ षष्ट्यदेव याची पत्नी कुंडलादेवी ही कल्याणी चालुक्यांची कन्या. आणखी साधारण २० वर्षानी षष्ट्यदेवाने अपल्या सासर्‍याचीच मदत घेऊन शिलाहारांना पराभूत केले. आणि याच सुमारास राष्ट्रकूटांचा पराभव करून कल्याणी चालुक्य कुळातील राजा जयसिंह दुसरा याची सत्ता सप्तकोकणात प्रस्थापित झाली. चालुक्यांचा मांडलिक म्हणून षष्ट्यदेव चंद्रपूर येथून दक्षिण कोकण आणि गोव्याचा कारभार पाहू लागला. भोज राजांचा काळ गोव्याच्या इतिहासात सुवर्णयुग मानला जातो, तसाच कदंब राजवटीचा सुमारे ४०० वर्षांचा हा काळ गोव्याच्या इतिहासात दुसरे सुवर्णयुग म्हणून नोंदला गेला.

कदंबांना 'कदंब' हे नाव कसं मिळालं यामागे एक कथा आहे. यांचा एक पूर्वज 'मुकण्णा' हा इ. स. च्या चौथ्या शतकात, सौंदत्ती इथे कदंब वृक्षाच्या तळी बसून तपश्चर्या करत होता, तेव्हा त्याला त्रिलोचन हरिहराचा दृष्टान्त झाला. इथून या घराण्याचे नाव कदंब असे पडले. म्हणूनच कदाचित, कदंब राजे शिवभक्त होते. कदंब राजवंशाची स्थापना 'मयूरवर्मा' या दक्षिण पल्लवांच्या अमात्याने केली असं मानलं जातं. काही काळाने त्याने पल्लवांची नोकरी सोडून हल्याळ, शिर्सी, कुमठा, कद्रा या प्रदेशात आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. काही इतिहासकारांच्या मते त्याचं मूळ नाव मयूरशर्मा असं होतं आणि राज्य स्थापन करताना क्षत्रियोचित असं मयूरवर्मा हे नाव त्याने घेतलं. काही इतिहासकारांच्या मते हे घराणं नागवंशातलं होतं, तर काही त्यांना मौर्यांचे संबंधित मानतात. काही इतिहासकार त्याना यदुवंशातलेही मानतात!

कदंब राजांची सत्ता मुळात कर्नाटकातील कुंतल प्रदेशातली. तिथे त्यांचं राजचिन्ह "हनुमान" हे होतं. गोव्यात येताच त्यानी आपलं राजचिन्ह बदलून "सिंह" हे केलं. याचं कारण म्हणजे गोव्यातील कुशवनात (आताचा केंपे तालुका) तेव्हा सिंह भरपूर प्रमाणात होते. तसंच कदंब राजे स्वतःला सिंहाप्रमाणे शूर समजत असत. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर मगो पक्षाने याच सिंहाला आपल्या पक्षाची निशाणी म्हणून स्वीकारलं, तर बसवाहतूक करणार्‍या सरकारी 'कदंब परिवहन मंडळाने' कदंबांच्या नावाबरोबर त्यांचं बोधचिन्ह 'सिंह' याचाही स्वीकार केला.

शिलाहारांच्या काळात समुद्रमार्गे होणारा व्यापार अरबांच्या हातात होता. तिसवाडी बेटवर त्यांची 'हंजमाननगर' नावाची मोठी व्यापारी वसाहत होती. त्यांना शिलाहारांनी बर्‍याच बाबतीत स्वायत्तता दिली होती. षष्ट्यदेवाचा मुलगा, कदंब राजा गुहलदेव याने या अरब व्यापार्‍यांबरोबर आपल्याला फायदेशीर होईल अशा प्रकारचा करार केला. गुहलदेवाचा मुलगा षष्ट्यदेव (दुसरा) याच्या काळात गोव्यात कदंबांची सत्ता स्थिर झाली. त्याने गोव्यावर इ.स. १००५ ते इ.स. १०५० एवढा काळ राज्य केलं. त्याच्यानंतर गोव्यात त्याचे २ मुलगे जयकेशी (पहिला) आणि वीरवर्मादेव यानी राज्य केलं. पहिल्या जयकेशीच्या काळातली महत्त्वाची घटना म्हणजे इ.स. १०५४ साली गोव्याची राजधानी 'चंद्रपूर' इथून हलवून 'गोवापुरी' (गोपकपट्टण) म्हणजे आताचं गोवा वेल्हा (थोरले गोवे) इथे गेली. याचं कारण म्हणजे कुशावती नदीचं पात्र गाळाने भरून अरुंद झालं होतं आणि तिथून गलबताना ये-जा करायला त्रास होत होता. तसंच पहिल्या जयकेशीने इ.स. १०६०-६५ च्या दरम्यान उत्तर कोकणावर स्वारी करून आपल्या राज्याचा विस्तार केला.

जयकेशीचा मुलगा गुहलदेव (दुसरा) याने राजधानी परत चंद्रपूर इथे नेली ती इ.स. १०८१ मध्ये. इ.स. १०८१ ते इ.स. ११२६ पर्यंत परत चंद्रपूर हीच गोव्याची राजधानी होती. पण गोपकपट्टण इथे कदंबांचे सामंत कारभार पाहत असत. मध्येच इ.स. १०९५ साली कोकण शिलाहार राजा अनंतपाल याने गोव्यावर हल्ला करून गुहलदेवाचा पराभव केला. गुहलदेव पळून हाळसी (खानापूर) इथे गेला, तो इ.स. ११०६ मध्ये परतला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा जयकेशी (दुसरा) राज्यावर आला. त्याने आपल्या राज्याचा विस्तार पूर्ण कोकण, गोवा, धारवाड, बेळगाव, हुबळी आणि हनगल प्रांत एवढा वाढवला. इ.स. ११३८ मध्ये विक्रमादित्य चालुक्याच्या मृत्युनंतर दुसर्‍या जयकेशीने चालुक्यांचं मांडलिकत्व झुगारून दिलं. यामुळे रागावून चालुक्य राजा तिसरा सोमेश्वर याने 'अच्चुगी' नावाच्या सेनापतीला गोव्यावर स्वारी करायला सांगितलं. त्याने गोपकपट्टण जाळून भस्म केले. पण यानंतर जयकेशीने ते पूर्ववत उभे केले आणि करवीर (कोल्हापूर) वेळूग्राम (बेळगाव) हे प्रांत आपल्या राज्याला जोडले. बळंबर(हैद्राबाद)चे शिंदे, बैलहोंगलचे कदंब यांचा पराभव करून जयकेशी कोकण चक्रवर्ती बनला.

जयकेशीनंतर त्याचा मुलगा शिवचित्त परमदेव हा राजा झाला. शिवचित्त परमदेवाच्या कारकीर्दीत गोपकपट्टण इथे सप्तकोटेश्वराचे देऊळ बांधण्यात आलं. तसंच तांबडी सुर्ला इथलं महादेव मंदिर याच काळातलं आहे. या राजाची पत्नी 'कमलादेवी' ही गोव्याच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. ती अतिशय धार्मिक आणि कर्तबगार होती. या कमलादेवीने स्त्रियांसाठी एक खास न्यायालय स्थापन केल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.

यानंतर कदंबांच्या वंशात विष्णुचित्त विजयादित्य, तिसरा जयकेशी, वज्रदेव, स्वयंदेव आणि षष्ट्यदेव तिसरा हे राजे होऊन गेले. यापैकी काहींनी हाळशी, तर काहींनी गोपकपट्टण/चंद्रपूर इथून कारभार चालवला. कदंब राजानी दिलेले अनेक ताम्रपट अजून अनेक ठिकाणी पहायला मिळतात. त्यांनी गोव्यातल्या देवळांना उत्पन्नासाठी जमिनी दिल्या. गद्याण आणि डाक्मा ही सोन्याची नाणी काढली. कदंबपूर्व काळात देवळांमधे पूजाअर्चा स्थानिक लोक करत असत. कदंब राजांनी पंच द्रविड ब्राह्मणाना गोव्यात आणून वसवले आणि त्याना देवळांमध्ये पूजा करायला अधिकार दिले. हे 'जोशी' नावाचे ब्राह्मण होते आणि आर्यादुर्गा ही त्यांची कुलदेवता. अशा ब्राह्मणांसाठी कदंब राजांनी अनेक अग्रहार उभारले. गरीबांसाठी अनाथाश्रम उभारले. गोपकपट्टण इथे विद्यादानाचे केंद्र उभारले.

कदंबांचं राज्य उत्तर तसेच दक्षिण कोकणात पसरलेलं होतं. गोपकपट्टण हे महत्त्वाचं बंदर होतं. तिथून मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा. सुपे, हल्याळ, बेळगावकडून चोर्लाघाट आणि रामघाटातून गोव्यात माल यायचा, आणि गोवळकोंड्याहून हिरे निर्यात करण्यासाठी यायचे, ते याच मार्गाने. तसंच परदेशातून अरबी घोडे यायचे, ते याच मार्गाने घाटावर नेले जायचे. या रस्त्यातलं मुख्य जकात केंद्र मणिग्राम म्हणजेच आमोणा हे होतं. योग्य जकात गोळा करून सरकारी खजिन्यात जमा करणारे त्या काळातले तज्ञ दलाल घराणे कदंब राजांनीच कर्नाटकातून गोव्यात केंपे इथे आणून वसवले.

तिसर्‍या षष्ट्यदेवाच्या कारकीर्दीत देवगिरीच्या कण्णर यादवाने गोव्यावर हल्ले सुरू केले. तसेच होन्नावरच्या नवाबाने आरमारी हल्ले सुरू केले. या आरमाराच नेतृत्व इब्न बतूताने केलं असा उल्लेख आहे. षष्ट्यदेवाचा मेहुणा कामदेव याने एकदा यादवांचा पराभव करून गोव्याचे राज्य षष्ट्यदेवाच्या हवाली केले. पण त्याला ते सांभाळता आलं नाही. होन्नावरच्या सैन्याने हिंदूंची अंदाधुंद कत्तल केली आणि हे यादवांच्या आदेशावरून केलं अशी मल्लीनाथी केली. उत्तर गोव्याचा भाग यादवांच्या ताब्यात गेला. पण त्यांचं राज्य नंतर लवकरच लयाला गेलं. इ.स. १३०७-०८ मधे अल्लाउद्दिन खिलजीने आपला दख्खनचा सुभेदार मलिक काफूर याला प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत पाठवले. त्याने इ.स. १३१० साली हरपालदेव या रामदेवराय यादवाच्या जावयाचा पराभव करून देवगिरीचे राज्य धुळीला मिळवले. मग त्याची वक्रदृष्टी गोव्याच्या दिशेने वळली. त्याने इ.स. १३१५ मधे गोपकपट्टणचा सत्यानाश केला. सप्तकोटेश्वराचे देऊळ उद्ध्वस्त करून अमाप संपत्ती लुटली. सप्तकोटेश्वराचे लिंग लोकानी शेतात लपवले आणि नंतर दिवाडी बेटावर नेऊन तिथे एक लहान देऊळ बांधले. इ.स. १३२० मधे वेळ्ळी आणि रामाचे भूशिर इथले सेतुबंधेश्वराचे देऊळ धुळीला मिळवले. हिंदूंच्या कत्तली केल्या. अनन्वित अत्याचार केले. यातून जीव वाचवून षष्ट्यदेवाचा वारसदार वीरवर्मा याने राजधानी परत चंद्रपूर इथे हलवली आणि इ.स. १३२४ ते इ.स. १३४६ कसाबसा राज्यकारभार चालवला.

दरम्यान, महमद तुघलकाने इ.स. १३४४ साली चंद्रपूरवर हला चढवून अमाप धन लुटून नेले. पुन्हा इ.स. १३४६ मधे जमालुद्दिनने चंद्रपूरवर हल्ला केला. चंद्रेश्वराच्या देवळाची वीट न वीट मोडून टाकली. तिथल्या मोठ्या नंदीचे शिर उडवले. अजून हा भग्न नंदी देवळाच्या अवशेषांसकट पहायला मिळतो. त्याच्या सैनिकांनी स्त्रियांवर अत्याचार केले. मग तुघलकाने जबरदस्तीने या स्त्रियांची लग्ने आपल्या सैनिकांबरोबर लावून दिली. त्यांची संतती म्हणजे "नायटे". राजा वीरवर्माला हाल होऊन मरण आले. त्याच्या वंशातील स्त्रियानी आपले अलंकार कुशावती नदीत टाकून दिले. सोने नाणे उधळून दिले आणि "अत्याचार करणार्‍यांचा सत्यानाश होवो," असा आक्रोश करत कुशावती नदीत ठाव घेतला. त्यानी चंद्रेश्वराच्या द्वारात आक्रोश करताना पाय आपटले त्याच्या खुणा पायर्‍यांवर उमटल्या अशी लोककथा आहे. इथे कदंबांचे वैभवशाली राज्य लयाला गेले, त्याचबरोबर चंद्रपूर राजधानीचाही अंत झाला. आज हे एक लहान गाव आहे. गावात हिंदू वस्ती जवळ जवळ नाही. आम्ही नंदीच्या शोधात गेलो तेव्हा बरोबर रस्ता सांगणारा भेटला त्यापूर्वी दहा जणाना विचारावं लागलं!

१३४६ मधे गोव्यात हसन गंगू बहामनीची सत्ता सुरू झाली. पण यापूर्वीच १३३६ मधे विजयनगरच्या साम्राज्याची सुरुवात हरिहर आणि बुक्करायाने विद्यारण्यांच्या आशीर्वादाने केली होती आणि सगळ्या दक्षिण भारतात आपल्या राज्याचा विस्तार सुरू केला होता. त्यांचा मंत्री, माधव याने इ.स. १३७८ मधे गोव्यात आपली सत्ता स्थिर केली आणि गोवा विजयनगर साम्राज्याचा भाग बनला. आतापर्यंत सप्तकोटेश्वराचे देऊळ ही गोव्यातल्या राज्यकर्त्यांची खूण बनली होती. या माधव मंत्र्याने हसन गंगू बहामनीने पाडलेले दिवाडी बेटावरचे सप्तकोटेश्वराचे देऊळ परत उभे केले. माधव मंत्र्यानंतर गोव्यात विजयनगरच्या साम्राज्याच्या सौंदे या शैव लिंगायत सुभेदारानी राज्यकारभार केला. त्यांचे वंशज इ.स. १७४५ पर्यंत कधी पोर्तुगीजांचे आश्रित तर कधी मराठ्यांचे आश्रित म्हणून गोव्यात टिकून होते.

इ.स. १४७१च्या फेब्रुवारीमधे महमूद गवनने तिसवाडी बेट जिंकले, आणि त्याचा सुभेदार किश्वरखान गोव्याचा कारभार पाहू लागला. इ.स. १४७२ मधे बेळगावच्या राजाने गोवा जिंकून घ्यायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर गोव्याचा सुभेदार गिलानी याने बंड केलं आणि इ.स. १५०१ मधे गोवा बेट आदिलशहाच्या ताब्यात आलं. गोवापुरीतल्या एका मंदिराचा विनाश करून आदिलशहाने आपला राजवाडा बांधला. त्याचं प्रवेशद्वार अजून आपल्याला जुने गोवे इथे पहायला मिळतं. आदिलशहाच्या काळात फोंडा इथे आदिलशाही मशीद बांधली असं म्हणतात. ही मशीद एखाद्या देवळासारखी दिसते. तशीच काळवत्री दगडांची. समोर दीपमाळेचे असावेत असे वाटणारे पडके खांब आहेत. बाजूला एक सुंदर दगडी बांधणीचा तलाव आहे आणि एक विशाल वटवृक्ष आहे. मशिदीच्या भिंतीत आणि तलावात महिरपी आहेत. प्रथम बघताना ते एखादं देऊळ असावं असंच मला वाटलं होतं. पण तसा, म्हणजे देवळाच्या जागी मशीद केल्याचा कुठेही उल्लेख नसल्यामुळे मी मनातली शंका मनात ठेवली!

इ.स. १४९८ मध्ये गोव्यावर दूरगामी परिणाम करणारी घटना कालिकतला घडली होती, वास्को द गामाने भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. आणि संपूर्ण भारत जिंकून घेण्याची स्वप्नं बघायला पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर अफोन्सो डी अल्बुकर्क याने सुरुवात केली होती ती इ.स. १५०३ पासून.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते)

संस्कृतीइतिहाससमाजप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

18 Apr 2011 - 10:04 am | पिवळा डांबिस

सहजपणे प्रकाशात न आलेली नवीन माहिती...
वाचतो आहे....
चालू द्या...

नगरीनिरंजन's picture

18 Apr 2011 - 10:17 am | नगरीनिरंजन

वाचनखूण साठवली आहे.

टीम गोवा तुमचे आभार मानावे तितके थोडेच !
:)
अतिशय माहितिपुर्न लेख "गोव्याचा न एकलेला , न वाचलेला ,इतिहास इत्का रोचकपने वाचायला मजा येत आहे
लिहित रहा वाचत आहे :)

सविता००१'s picture

18 Apr 2011 - 10:20 am | सविता००१

टीम गोवा तुमचे आभार मानावे तितके थोडेच !

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Apr 2011 - 10:35 am | llपुण्याचे पेशवेll

आयला आम्हाला तर शाळेपासून गोव्यात फक्त किरिस्तावच राहतात असे शिकवले आहे.

छान झाला आहे लेख. अधिक माहीती वाचण्यात आनंद वाटेल.

५० फक्त's picture

18 Apr 2011 - 10:36 am | ५० फक्त

धन्य झालो, आता पुन्हा गोवा बघायला तुमच्या बरोबर येईन, तुमच्या नजरेतुन तुमच्या भाषेतुन.

असं ही गोवा म्हणजे दारु / बीच / हॉटेलं असं एक समीकरण उगाचच करुन ठेवलंय व्यावसायिकांनी.

रामदास's picture

18 Apr 2011 - 10:45 am | रामदास

उत्तम चालली आहे. गोवा चमूचे अभिनंदन.

मृत्युन्जय's picture

18 Apr 2011 - 11:47 am | मृत्युन्जय

मस्तच लेख एकदम. आवडेश.

सुंदर उपक्रम..

अभ्यासपूर्ण लेख..

निनाद's picture

18 Apr 2011 - 12:17 pm | निनाद

अतिशय उत्सुकतेने वाट पाहावी अशी उत्कृष्ट लेख मालिका!
यावेळचे कथन फार वेगवान आहे. एकदम ५०० वर्षांची झेप घेतलीत!

भोज राजांचा काळ गोव्याच्या इतिहासात सुवर्णयुग मानला जातो
यावर अजून माहिती मिळू शकेल का? मराठीमध्ये आंतरजालावर भोज राजा यावर अतिशय मर्यादित माहिती मला आढळली आहे. (अपवाद फक्त भोचक यांचा ब्लॉग!)

चित्रे
कृपया चित्रा खालीच ते चित्र कशाचे आहे हे लिहाल का? उदा. नाणी नक्की कुणाची आहेत हे लक्षात येत नाहीये. वाचण्याचा प्रयत्न केला पण कळले नाही. तसेच इतर चित्रेही अजून दिलीत तर आवडेल हवे तर आकार छोटा ठेवा पण अजून भरपूर चित्रे हवीत असे वाटून गेले. जसे. अजून हा भग्न नंदी देवळाच्या अवशेषांसकट पहायला मिळतो. खरोखरच पाहायला आवडेल. हा इतिहास नाट्यमय आहे चित्रे समोर आली की त्यातले नाट्य अजूनच जीवित होते.

नकाशे
या प्रदेशाचे त्या त्या राजांच्या राज्यांचे नकाशे असते तर ऐतिहासिक भूगोल समजून घ्यायला सोपे गेले असते असेही वाटून गेले. तसेच हल्ली कुठून झाले हे चांगले समजले असते. (अगदी साधेसे हाताने काढलेलेही नकाशे चालतील!)


विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

या लेखमालेला साधी समजू नये. यामध्ये लेखक स्वतः फिरून माहिती घेत आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणांची छायाचित्रेही आहेत. स्थानिक माहितीसोबत ऐतिहासिक दाखले दिलेले आहेत. योग्य संदर्भ आणि लेखन्/पुस्तकांची नावे असतील तर कालांतराने याला आंतरजालावरील संदर्भाचे महत्त्व प्राप्त होईल याची मला खात्री वाटते.

पुढील भागाची उत्सुकता आहेच.

पक्का इडियट's picture

18 Apr 2011 - 2:39 pm | पक्का इडियट

मस्त लेखन !!!

वाचतोय...
टीम गोवाच्या मेहनती बद्दल आभार.

प्यारे१'s picture

18 Apr 2011 - 4:04 pm | प्यारे१

टीम गोवा अतिशय चांगले काम करत आहे.

पिंगू's picture

18 Apr 2011 - 4:20 pm | पिंगू

उत्तम माहिती आणि वैशिष्ट्यपूर्ण लेख. वाचताना इतिहास योग्य संक्षिप्त शब्दात मांडल्याबद्दल टीम गोवा अभिनंदनास पूरेपूर पात्र आहे.

- पिंगू

उत्तम माहीती. टीम गोवाचे आभार.

प्रियाली's picture

18 Apr 2011 - 6:39 pm | प्रियाली

सध्या वेळेच्या अभावी घाईघाईत लेख वाचला तरीही त्यातून मिळणारी माहिती नवी आणि उपयुक्त आहे हे निश्चित.

निनाद यांच्या सूचना मनावर घ्याव्यात. चित्रांखाली कॅप्शन हवीत. नकाशांची अडचण समजण्यासारखी आहे पण मिळालेच तर लेखात अवश्य लावावेत.

प्रभो's picture

18 Apr 2011 - 6:58 pm | प्रभो

मस्त लेखमाला!

श्रावण मोडक's picture

18 Apr 2011 - 7:11 pm | श्रावण मोडक

कमलादेवीने स्त्रियांसाठी एक खास न्यायालय स्थापन केल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.
याचा तपशील आहे का? संदर्भ काही असेल तर द्या. वाचायचे आहे याविषयी.

प्रचेतस's picture

18 Apr 2011 - 7:57 pm | प्रचेतस

गोव्याच्या आतापर्यंत माहित नसलेल्या इतिहासाची माहिती समजतेय.
टीम गोवा यांचे आभार.

पैसा's picture

18 Apr 2011 - 9:28 pm | पैसा

निनाद यांचा प्रतिसाद प्रातिनिधिक आहे. त्याबद्दल थोडं लिहिते.

१. लेखात उल्लेख केलेले भोज राजे म्हणजे 'धर येथील भोज राजा' नव्हे. हा राजवंश यादवकुळाशी संबंधित. इ.स. च्या ४ थ्या ते ७ व्या शतकात या कुलातले राजे गोव्यात स्वतंत्रपणे राज्य करत होते. त्यापूर्वी सातवाहनांचे मांडलिक म्हणून काही काळ गोवा त्यांच्या ताब्यात असावा असा काही इतिहासकारांचा अंदाज आहे. या कुळात देवराज, पृथ्वीमल्लवर्मन, अनिर्जितवर्मन, असंतिकवर्मा, कपालीवर्मन इ. राजे होऊन गेले. त्यांचे ताम्रपट गोवा, कारवार, खानापूर इ भागात सापडले आहेत. म्हणजेच त्यांचं राज्य कारवार खानापूर या भागातही होतं.

२. लेखातील पहिलं चित्र जयकेशी दुसरा याच्या नाण्याचं तर दुसर्‍या नाण्याचं चित्र हे शिवचित्त परमादिदेव याच्या नाण्याचं आहे. ही बहुधा नागरी लिपी असावी, पण बारीक पाहिलं तर जयकेशी आणि शिवचित्त ही नावं वाचता येतात. पहिलं देऊळ हे तांबडी सुर्ल इथलं महादेव मंदिर आहे, तर दुसरं साधं दिसणारं नार्वे इथलं सप्तकोटेश्वर आहे. शेवटचं चित्र हे फोंडा इथल्या आदिलशाही मशिदीचं आहे. पुढच्या लेखांमधे चित्राना नावं देऊ.

३. इथे २ नकाशे देते. त्यावरून जयकेशीच्या काळात त्याचं राज्य कोणत्या प्रदेशात होतं हे कळेल, तर दुसर्‍या नकाशावरून चांदोरची नेमकी जागा लक्षात येईल.

जयकेशीचं राज्य
goa

गोवा
goa

आम्ही खरंच इतिहासाचा फार अभ्यास केलेला नाही! त्यामुळे काही चुका राहून जाण्याची शक्यता आहेच. म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला आवर्जून तसं लिहितो. आमची मुख्य भूमिका शाहीराची. त्यातून जेवढी जास्त चर्चा होईल, आणि जास्त माहिती समोर येईल, तेवढा आनंद जास्त!

@श्रामो, उल्हास प्रभुदेसाई यांच्या एका पुस्तकात मला कमलादेवीबद्दल हा न्यायालयाचा उल्लेख सापडला. आणखी माहिती शोधते आहे. जमलं तर श्री प्रभुदेसाई यांच्याशी संपर्क साधून आणखी काही माहिती मिळते का पाहते.

सर्व टिमचे आभार ... खरेच हे काही माहितीच नाही ..

तुम्ही कीती अभ्यासपुर्ण अआणि मेहनतीने ही माहिती लिहिताय हे खुपच छान वाटते आहे..

निनाद's picture

19 Apr 2011 - 5:54 am | निनाद

त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद! :)

भोज राजांच्या माहिती बद्दल धन्यवाद. हा काळ सलग आणि शांततपूर्ण प्रशासनामुळे सुवर्णकाळ मानला जातो का? नक्की काय प्रगति या काळात घडत होती? काही खास असे लेखन, ग्रंथ, तत्त्वज्ञान वगैरे? कारण या सुमाराला सातवाहनांचे हिंदू साम्राज्य लुप्त झालेले दिसते. (इतिहासात अनेक भोज राजे झाल्याने भोज हे चांगले पॉप्युलर नाव असावे!)

नकाशात जयकेशीच्या काळात कदंबांचा राज्यविस्तार पाहता किती मोठे राज्य त्यांच्या ताब्यात होते हे लक्षात येते. हे जवळपास मराठ्यांच्या राज्याच्या निम्म्या आकाराचे भासते आहे.

अवांतरः
१. ज्यावेळी मुसलमानी आक्रमणे या भागावर होत होती त्यावेळी मुसलमानांची संदेशवहन पद्धती कशी असत असे? आता ११ व्या शतकात दिल्लीतल्या सुलतानाला कधी आणि कसे काय कळणार की गोव्यात आपल्या सैन्याला बदडले गेले? एकुणच अंमल कसा बसवला जात असे? म्हणजे अ‍ॅडमिनिस्ट्रेशनसाठी कशी पद्धती वापरात होती?

२. याच लेखात 'व्यापार अरबांच्या ताब्यात होता' असा उल्लेख आहे. सातवाहनांच्या काळात व्यापार त्यांच्या हातात होता असे विकी आणि इतर स्रोतांवरून वाटते. हे हस्तांतरण नक्की कसे झाले असावे? की सातवाहनांच्या काळात व्यापार नक्की कुणाच्या हाती होता; असा प्रश्न विचारायला हवा?
३. तसेच म्हणजे अरबी व्यापार्‍यांनी पुरवलेल्या माहितीवरून मुसलमानी सुलतानांना भारताचा मोह निर्माण झाला असावा असे मानता येईल का?

४. जर व्यापाराची सूत्रे स्थानिक राज्यकर्त्यांच्या हातात असतील तर नौकानयन विषयक जबाबदार्‍या कशा पार पडत? मी हा प्रश्न विचारतो आहे कारण जहाजाने घरचे बंदर सोडल्यावर त्याचे रक्षण कोण करणार आणि कसे? हे सर्व कसे घडत असेल या विषयी उत्सुकता आहे.

पैसा's picture

20 Apr 2011 - 9:37 pm | पैसा

इतिहासात अनेक भोज राजे सापडतात, याचं कारण म्हणजे महाभारतातील यादवांच्या अनेक शाखा सर्व भारतभर पसरल्या. भोज ही यादवांचीच एक शाखा होती. भोज हे गोव्यात सातवाहनांच्या काळापासून मांडलिक या स्वरूपात होते असा एक अंदाज आहे, नंतर ते स्वतंत्र राजे होते. त्यामुळे त्यांचं राज्य गोव्यात सलगपणे दीर्घकाळ चाललं. सातवाहनांचा काळ हा महाराष्ट्राचा सुवर्णकाळ होता, तसाच गोव्यात होता. सातवाहनांचा एक ताम्रपट कारवार इथे मिळाला आहे. आणि भोजांचे ताम्रपट गोव्यात अनेक ठिकाणी मिळाले आहेत ते मुख्यतः दान देण्यासाठी दिलेले आहेत.

गोव्यातही काही धार्मिक ग्रंथांचं लेखन प्राचीन काळात झालं होतं, पण महाराष्ट्रात तयार झालं त्या तोलाचं साहित्य गोव्यात त्या काळात लिहिलं गेलेलं सापडत नाही. (अपवाद एका कृष्णराज शामा याचा.) याचं एक कारण म्हणजे गोव्यातही मराठी संतमंडळींचं प्राकृत साहित्यच लोकप्रिय होतं, दुसरं कारण म्हणजे पोर्तुगीज काळात गोव्यात जे काही मराठी/प्राकृत ग्रंथ होते, त्यांचा पूर्णपणे नाश करण्यात आला.

सातवाहनांचं आणि भोजांचं आरमार होतं. सातवाहनांचं आरमार प्रबळ होतं. आणि समुद्रमार्गे व्यापारावर त्यांचं वर्चस्व राहिलं असेलच. त्यांच्या सत्तेचा लय झाल्यानंतर इथे येणार्‍या अरबांच्या ताब्यात गोव्यातील व्यापार गेला असावा. भोजांचं आरमार होतं. थोरले गोवे इथे बंदर नावाचा पुरातन भाग आहे. तो भोजांच्या काळातीलच असावा. पण कुठेही आरमारी लढाया झाल्याचा उल्लेख सापडत नाही. मात्र दर्यावर्दी आणि लढाऊ अशी भंडारी जमातीची वस्ती गोव्यातही समुद्रकिनार्‍यांजवळ प्राचीन काळापासून आहे.

होन्नावरच्या नबाबाने केलेलं आक्रमण वगळता गोव्यावर मुस्लिम आक्रमणे झाली ती कर्नाटकातून, जमिनीवरून. तेव्हा हे अरब व्यापारी शांततेने आपला व्यापार करत असावेत. पण इथल्या देवळांच्या आणी सुबत्तेच्या कहाण्या अशा व्यापारी आणि प्रवाशानीच इस्लामी देशात आणि युरोपात पसरवल्या असतील हे सहज शक्य आहे.

गोव्यात भोज आणि कदंब शासनाचा काळ वगळता, जेव्हा मुस्लिमांची सत्ता होती तेव्हा, सुलतानाचा एक मुख्य सुभेदार गोव्याचा कारभार पहात असे, तर त्याला मदत करणारे नायब सुभेदार, आणि इतर अधिकारी असत. हिंदू राजे असताना त्यांचे सामंत किंवा मंत्री कारभार पहात. आजच्या तालुक्याना तेव्हा "मंडल" हे नाव होतं. उदा. चंद्रपूर ही राजधानी असलेला प्रदेश तो 'चंद्रमंडळ'. काही काळाने मंडलांचे "महाल "झाले. उदा. आजच्या फोंडा तालुक्याला 'अंत्रुज महाल' असं नाव होतं.

गावगाडा चालवण्यासाठी आताच्या पंचायतींसारखी 'बाराजण' नावाची व्यवस्था होती. गावात सारा गोळा करणारे सरकारचे प्रतिनिधी 'देसाई' असत. शिवाय इतर कुलकर्णी वगैरे होतेच. गाव वसवणार्‍या सुरुवातीच्या रहिवाश्याना 'गावकार' म्हणत. राजसत्ता बदलली तरी हे गावकार आणि देसाई वगैरे कायम तेच रहात.यांच्याकडून (गावगाड्यातील अधिकार्‍यांकडून) सरकारी अधिकार्‍याना आणि त्यांच्याकडून पुढे सुभेदाराना संदेश पाठवले जात असावेत. पण आपल्या सैन्याच्या जय/पराजयाची बातमी दिल्ली/बिजापूरच्या सुलतानाकडे किती वेळानंतर पोचत असेल याचा अंदाज तुम्हीच लावा!

निनाद's picture

21 Apr 2011 - 6:02 pm | निनाद

सुंदर माहिती. धन्यवाद!

सुनील's picture

18 Apr 2011 - 10:10 pm | सुनील

चांगली माहिती.

पुलेशु.

नाटक्या's picture

18 Apr 2011 - 10:14 pm | नाटक्या

वाचतोय.. अत्यंत मेहनतीने माहिती जमा करताहात. असेच लिहीत रहा...

टीम,
लेख मालिका वाचतोय. आवडते आहे.
यादव कालाबद्दल मला ज्ञात असलेली माहिती देतोयः-

इ.स. १३०७-०८ मधे अल्लाउद्दिन खिलजीने आपला दख्खनचा सुभेदार मलिक काफूर याला प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत पाठवले.
हे थोडस्स बरोबर. सगळं नाही. देवगिरीवर सर्वप्रथम मुस्लिम दिल्लीकरांचा हल्ला झाला ११९१ मध्ये! तुम्ही सांगताय त्याच्यापेक्षा वीसएक वर्ष आधी.
तेव्हा देवगिरीवर राज्य होतं कृष्णदेवरायाचं. ह्याच्या दरबारात सुप्रसिद्ध विद्वान, पंडित, वास्तुरचनाकार व कुशल प्रशासक अशी ख्याती असलेले एक मंत्री होते, त्याचे प्रधान होते, हेमाद्री पंत/ हेमाडपंत.
देवगिरी राज्य कळसाला पोचलं होतं. जवळच पैठण, परळी वैजनाथ ही सांस्कृतिक केंद्र समृद्ध होतीच, शिवाय
नेवाशासारख्या छोट्याशा खेड्यातही एका पोरानं विद्येचा सारीपाट मांडला होता. ते बालक म्हणजे संत ज्ञानेश्वर.
११९० च्या आसपास कधीतरी त्यांनी ज्ञानेश्वरी रचली.
११९१ मध्ये दिल्लीचा सुल्तान होता जलालुद्दिन खिल्जी. त्याचा पुतण्या अल्लाउद्दिन खिल्जि प्रचंड सैन्यासह बेफाम वेगात प्रचंड क्रौर्यानं दक्षिणेच्या दिशेनं निघाला. वाटेत जमेल तिथं जमेल तितका विध्वंस करत तो देवगिरीला पोचला.
ऐन वेढ्यामध्ये किल्ल्यामध्ये धान्याची पोती आणण्याऐवजी चुकुन मीठाची पोती आणली गेली. राजधानीचा, देवगिरा किल्ला लढवता येइना आणि अवघ्या पंधरा दिवसात ही तत्कालिन महाराष्ट्रिय राजधानी पडली.
नंतर आक्रमकांनी प्रथेप्रमाणे अगणित लूट, अमाप अतर्क्य लूट वगैरे प्रकार प्रथेप्रमाणे केले. आणि सुल्तानाची मर्जी संपादन करण्यासाठी त्या दिव्य कृष्णदेवरायानं आपली मुलगीच अल्लाउद्दिनला देउ केली!
सुल्तानाचा लाडका, लाळघोट्या, पाळिव पाहुणा म्हणुन हा सत्पुरुष दिल्लीला राहु लागला. प्रजेवरचे अनव्नित अत्याचार तसेच होत असताना!
इकडे भरभराटीला आलेल्या राज्यात एकाएकी सूर्यास्त झाला. गाजलेली तीर्थक्शेत्रातील वर्दळ मंदावली.
नाशिक घाट फुटले. पंढपुरावर घाला पडला. तुळजापुरावर घणाचे प्रहार पडले. पैठण ओस पडु लागलं. परळी, वैजनाथ चा ओघ आटला. जागृत मानलं गेलेलं वेरुळमधील घृष्णेश्वर ओस पडु लागलं.
ह्या हल्ल्याच्या पाठोपाठ जनमानसात आदराचं स्थान असणार्‍या ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.
सगळाच अंधार होउ लागला.

इकडे, ११९५ च्या आसपास तो(कृष्णदेवराय) दिल्लीला गेल्यावर हा अपमान असह्य होउन शेवटी कृष्णदेवरायाचा मुलगा शंकरदेवराय ह्यानं देवगिरी स्वतंत्र असल्याची पुनर्घोषणा केली. स्वतःला राजा घोषित केलं. लगेच सुल्तानी सैन्य आलं. दोन्ही बाजुत एकुण दोन लढाया झाल्या. पहिल्यात पराभूत होउनही शंकरदेवरायानं जीव वाचवला. खंडणी कबुल करुन मुकुटही वाचवलं.
सुल्तानी सैन्याची पाठ फिरताच त्यानं पुन्हा स्वातंत्र्य घोषित केलं. पुन्हा लढाई झाली. युद्धात शंकरदेवराय मारला गेला.
ह्या दरम्यान , आपलाच काका आणि सासरा असणार्‍या जलालुद्दिनला मारुन अल्लाउद्दिन नवा सुलतान झाला होता.
त्याच्या दिग्विजयी मोहिमा थेट दिल्लीपासुन ते गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा इतका अफाट प्रदेश पायाखाली तुडवीत होत्या.
ह्या भागात प्रथमच मुस्लिम सत्ताधारी आले होते. आता देवगिरीत अधिकृत राजवंश संपुष्टात आला होता.
निर्नायकी राज्यात परकीय आक्रमकांच्या अत्याचाराला सीमा राहिली नव्हती.
एक दशक उलटत आलं. आणि पुन्हा एक निखारा भडकला.
ह्या वेळेला, १३०८ मध्ये देवगिरीत प्रचंड मोठं बंड झालं. हरपाल यादव , कृष्ण्देवरायाचा एक जावई केंद्रस्थानी ठेउन उठाव झाला. हरपालानं आसपासचा बराच इलाका फटाफट जिंकुन घेतला.
आणि ह्याची खबर लागताच, आजवर झाला नसेल इतका मोठा हल्ला करण्याच्या इराद्यानं सुलतानी फौज सज्ज झाली.
त्यांचं नेतृत्व होतं एका क्रूर, विकृत व महापराक्रमी व्यक्तिकडे. ही व्यक्ती पूर्वायुष्यात हिंदु जाट किंवा राजपुत होती असा अंदाज आहे. पन अल्प वयातच खिल्जीच्या हाती हे आकर्षक व्यक्तिमत्व लागलं.
त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेउन ह्या व्यक्तिनं अधिकाधिक अधिकार मिळवले. आणि ही व्यक्ती आता जणु सवाई - खिल्जीच मानली जाउ लागली. हिचं नाव महादेव कपूर किंवा मलिक काफूर.
ह्यानं हल्ला करुन आख्ख्या देवगिरीचा, शिल्लक राहिलेल्या राज्याचा बट्ट्याबोळ केला , तो कायमचाच.
ही घटना १३०८ ते १३१० मधली.

तुम्ही उल्लेख केलेल्या हल्ल्यामागे पार्षभूमी ही अशी आहे.

पाठोपाठ ज्ञानेश्वरांनी

त्याने इ.स. १३१० साली तिसर्‍या सिंघणदेव यादवाचा पराभव करून देवगिरीचे राज्य धुळीला मिळवले.
ह्या वाक्याशी सहमत नाही. सविस्तर माहिती वरतीच दिली आहे.

पैसा's picture

19 Apr 2011 - 12:10 am | पैसा

त्याने इ.स. १३१० साली हरपालदेव या रामदेवराय यादवाच्या जावयाचा पराभव करून देवगिरीचे राज्य धुळीला मिळवले.

चुकीची दुरुस्ती केली आहे. तुम्ही जी पार्श्वभूमी दिलीय त्यावर सहज स्वतंत्रपणे लेख लिहू शकाल! खूपच महत्त्वाची माहिती मिळाली. (सिंघणदेव यादव हा इ.स. १२१० मध्ये देवगिरीच्या राज्यावर होता, म्हणजे या घटनांच्या १०० वर्षे आधी.)

तसंच कदंबांचं राज्य लयाला गेल्यानंतर काही काळाने कदंबांचा जो वशज वीरवर्मा कसाबसा राज्यावर आला, "तो हरपालदेवाचा मुलगा होता" असं गोवा म्युझियममधील एका शिलालेखात म्हटलं आहे. पर्यायाने स्वतः हरपालदेव हा कदंब-चालुक्य वंशीय असावा.

गोवा आणि महाराष्ट्राचा इतिहास एकामेकांपासून वेगळा काढता येणं कठीण आहे. त्यामुळे इतिहासातल्या घटनांपैकी गोव्याशी संबंधित घटना आम्ही जास्त ठळक मांडल्या आहेत. ही आम्ही या लेखमालिकेसाठी स्वीकारलेली मर्यादा आहे. पण तुम्ही इतक्या सुंदर प्रकाराने ही सगळी पार्श्वभूमी लिहिलीय, त्यासाठी शतशः धन्यवाद! यापुढील लेखांतही असाच सहभाग ठेवा ही विनंती.

निनाद's picture

19 Apr 2011 - 5:57 am | निनाद

तुम्ही जी पार्श्वभूमी दिलीय त्यावर सहज स्वतंत्रपणे लेख लिहू शकाल! खूपच महत्त्वाची माहिती मिळाली.

पिसाताईंशी सहमत आहे - हेच म्हणतो मना, सत्वर लेखमाला लिहिण्याचे करावे ही विनंती!

मन१'s picture

19 Apr 2011 - 8:27 pm | मन१

लेखमाला वाचतोच आहे.
कधी कधी प्रतिसाद द्यायला थोडासा उशीरही होतोय, पण हरेक भाग वाचुन काढलेला आहे.
टीम गोवा च्या ह्या अप्रतिम उपक्रमाबद्दल त्यांचं प्रचंड कौतुक वाटतय. सोप्या,ओघवत्या भाषेत आपल्याकडे असलेली माहिती नुसती शब्दबद्ध नाहीतर चित्रबद्धही कशी करावी हे ह्या मालिकेकडुन शिकायला मिळतय.
बाकी, सध्या मध्यपूर्वेच्या लेखमालेवर व्यस्त आहे. ती होताच इकडं वळायचा प्रयत्न करतो.

-- "आमचे गोयं" ही आंतरजालावरील सर्वाधिक आवडती मालिका असणारा
मनोबा.

मन१'s picture

19 Apr 2011 - 8:37 pm | मन१

लेखमाला वाचतोच आहे.
कधी कधी प्रतिसाद द्यायला थोडासा उशीरही होतोय, पण हरेक भाग वाचुन काढलेला आहे.
टीम गोवा च्या ह्या अप्रतिम उपक्रमाबद्दल त्यांचं प्रचंड कौतुक वाटतय. सोप्या,ओघवत्या भाषेत आपल्याकडे असलेली माहिती नुसती शब्दबद्ध नाहीतर चित्रबद्धही कशी करावी हे ह्या मालिकेकडुन शिकायला मिळतय.
बाकी, सध्या मध्यपूर्वेच्या लेखमालेवर व्यस्त आहे. ती होताच इकडं वळायचा प्रयत्न करतो.

-- "आमचे गोयं" ही आंतरजालावरील सर्वाधिक आवडती मालिका असणारा
मनोबा.

योगप्रभू's picture

19 Apr 2011 - 12:02 am | योगप्रभू

देवगिरीवर रामदेवराय या यादव राजाची सत्ता होती .
कृष्णदेवराय हा विजयनगरचा सम्राट.

प्राजु's picture

19 Apr 2011 - 12:24 am | प्राजु

सुरेख!!
कुठेही वाचलेलं नव्हतं हे सगळं. अप्रकाशित अशीच ही माहिती आहे असे म्हणावेसे वाटते.
अभिनंदन टीमगोवा!

उत्तम माहिती! सुरेख लेखमाला!

आनंदयात्री's picture

19 Apr 2011 - 6:34 am | आनंदयात्री

हा भाग उत्कृष्ट झाला आहे. रोचक इतिहास इतका मुद्देसुद वाचायला मिळणे विरळाच. आताशा या लेखमालेच्या स्कोपचा अंदाज येतोय. पुढील भाग वाचायला अत्यंत उत्सुक आहे.
ही सगळी माहिती जमवायला केलेल्या सिन्सिअर कष्टांबद्दल शतशः धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

20 Apr 2011 - 6:36 am | भडकमकर मास्तर

रोचक इतिहास ....मुद्देसूद .... संदर्भाचे कष्ट घेऊन...

धन्यवाद

ज्योतीताई, छान लिहिते आहेस. माहितीबद्दल धन्यवाद.

sneharani's picture

19 Apr 2011 - 12:23 pm | sneharani

मस्त लेख! येऊ दे पुढचा भाग!

धनंजय's picture

19 Apr 2011 - 8:38 pm | धनंजय

चांगली माहिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Apr 2011 - 11:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आधीचे भागही वेळेच्या अनुपलब्धतेमुळे आधी वाचले नव्हते. सवडीने वाचण्यायोग्य अभ्यासपूर्ण लेखमालिका.

मालोजीराव's picture

11 Feb 2013 - 12:07 pm | मालोजीराव

मस्त माहिती....संभाजी राजांसाठी गोव्याला येणे आहे :)
...हे कदंब राजघराण्याचे राजचिन्ह घ्या...शिवकालातील सरदार कदम यांचेच वंशज (असं निदान ते तरी म्हणतात)

.

दिपस्तंभ's picture

20 Feb 2013 - 7:18 pm | दिपस्तंभ

आणखी एक...

विजयनगरच्या साम्राज्याच्या सौंदे या शैव लिंगायत सुभेदारानी राज्यकारभार केला. त्यांचे वंशज इ.स. १७४५ पर्यंत कधी पोर्तुगीजांचे आश्रित तर कधी मराठ्यांचे आश्रित म्हणून गोव्यात टिकून होते".

हेच आमचे पुर्वज....

रघुनाथ.केरकर's picture

30 Aug 2013 - 11:54 pm | रघुनाथ.केरकर

येगळाच गोया दाखयलास.......

अतिशय सुंदर, माहितीपूर्ण लेखमाला.
टीम गोवा यांच्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अन्य सदस्यांनी पण असे आणखी काही चमू बनवून त्या त्या भागातल्या ऐतिहासिक, संस्कृतिक इ.इ. गोष्टींबद्दल लेखन करावे, असे वाटले.
मध्यप्रदेश, दिल्ली इ. बद्दलच्या चमूत मी भाग घेऊ शकतो.