श्री गणेश लेखमाला २०२२ - बालकथा- चिनू आणि पिनू

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in लेखमाला
7 Sep 2022 - 7:58 am

h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.img-left {float:left;width:20%;margin-right:20px;}
.mi-badge {font-size:17px;font-weight: bold;font-family: 'Baloo 2', cursive}
hr{border:0;border-top:1px solid #ccc;margin:20px 0}

श्री गणेश लेखमाला २०२२बालकथा- चिनू आणि पिनू

चिनू, पिनू आणि वादळ

आंब्याच्या एका मोठ्या झाडावर एका चिमणा-चिमणीचं एक घरटं होतं घरट्यात चिऊताईची दोन पिल्लं होती. फारच गोंडस आणि गोजिरवाणी पिल्लं होती ती. एक होता चिनू आणि एक होता पिनू. दिवसभर दोघे भाऊ एकमेकांना चिकटून बसलेले असायचे. कधी पंख पसरून एकमेकांना ढुश्या द्यायचे आणि झोप आली की गुडुप झोपून जायचे. त्यांचे आई-बाबा रोज त्यांच्यासाठी वेगवेगळा खाऊ घेऊन यायचे. कधी ज्वारीच्या शेतातले कोवळे दाणे, तर कधी गोड गोड फळं, तर कधी कधी छोट्या छोट्या अळ्या, तर कधी कधी पोळीचे तुकडे. आणलेला खाऊ ते दोघांमध्ये सारखे वाटून द्यायचे. चौघे जण मस्त मज्जेत राहत होते त्या झाडावरच्या इवल्याश्या घरट्यामध्ये.

एक दिवस चिनू-पिनूला दिसलं की आईबाबांची काहीतरी धावपळ सुरू आहे. दोघांचं पोट भरलं होतं, तरी आई-बाबा नवा नवा खाऊ आणून घरट्यामध्ये ठेवून देत होते, तर बाबा मधून मधून जाड जाड काटक्या गोळा करून आणत होते आणि त्या घरट्यामध्ये कुठे कुठे लावत होते. बर्‍याच वेळा तर चिनू-पिनूला बाजूला ढकलून ते जिकडेतिकडे काड्या, पानं सरकवत होते.

चिनू-पिनूच्या काही लक्षात येत नव्हतं आणि आईला विचारलं तरी तिलासुद्धा बोलायला सवड नव्हती. आज ती नेहमीसारखी त्यांच्याजवळ बसतसुद्धा नव्हती. जेमतेम खायला दिलं की उडून जात होती. चिनू-पिनूला जाम कळत नव्हतं काय चालू आहे ते. आणि आता त्यांना थोडी भीतीसुद्धा वाटायला लागली होती.

संध्याकाळी अंधार पडायला लागल्यावर आई त्या दोघांच्या जवळ येऊन बसली. पण नेहमी बसायची तशी नुसती बसली नाही, तर ती त्या दोघांच्या मध्ये येऊन बसली आणि त्यांना आपल्या पंखाखाली घेतलं. मग मात्र दोघांना राहवलं नाही. त्यांनी विचारलं, "आई, सांग ना काय झालं? आम्हाला दोघांना खूप भीती वाटतेय गं." आई म्हणाली, "चिनू, पिनू, आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत खूप मोठं वादळ येणार आहे. कदाचित एक-दोन दिवस आपल्याला घराबाहेर पडता येणार नाही. मग तुम्हाला भूक लागली, तर काय करायचं? म्हणून मग तुमच्यासाठी एवढा खाऊ आणून ठेवला आहे. आणि बाबांनी ज्या काड्या आपल्या घरट्यामध्ये आणून इकडेतिकडे खुपसल्या ना, त्या आपलं घरटं आणखी भक्कम करण्यासाठी. पण तुम्ही काळजी करू नका. आपलं घरटं दोन भक्कम फांद्यांच्या बेचक्यात आहे आणि आता तर आपलं घरटं आता इतकं भक्कम झालं आहे की कितीही जोराचा वारा सुटला, तरी घराला काही होणार नाही. रात्री जोरदार वारा सुटेल, पाऊसदेखील पडेल, पण घाबरायचं नाही. आपण सगळे एकमेकांच्या सोबत आहोत, हे लक्षात ठेवा."

चिनू-पिनूचे बाबा घरट्याच्या बाहेर, पण घरट्याला अगदी चिकटून बसले होते. त्यांनीही चिनू-पिनूला सांगितलं, "रात्री विजासुद्धा चमकतील. वीज चमकली की आभाळात खूप प्रकाश पडतो आणि जोरात गडगडल्याचा आवाजदेखील येतो. अशा वेळी घाबरायचं नाही. पाऊस संपला की बघा कशी छान गार हवा सुटेल ती."

मग थोड्या वेळाने खरोखर जोराचा वारा सुरू झाला. चिनू आणि पिनू आईच्या पंखाखाली तिला अगदी बिलगून बसले होते. डोळे घट्ट बंद करून. सूं सूं आवाज करत वाहणारं वारं त्यांचं झाड गदागदा हलवत होतं. वार्‍याबरोबर उडणारी धूळ त्यांच्या घरट्यामध्येही येत होती. झाडाची वाळलेली पानं वार्‍याबरोबर सैरावैरा धावत होती. त्यातलं एखादं पान सपकन त्यांच्या अंगावर येऊन आपटत होतं. आई ते पान लगेच चोचीमध्ये धरून बाहेर टाकत होती. बराच वेळ खेळल्यानंतर वारा बहुतेक दमला आणि शांत झाला.

पण जरासाच वेळ... नंतर लगेचच जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाचे मोठे मोठे थेंब त्यांच्या घरट्यावर येऊन आदळत होते. आईच्या पंखाखाली असूनसुद्धा पावसाचे शिपकारे चिनू-पिनूच्या अंगावर पडत होते. भिजल्यामुळे दोघांना थंडी वाजायला लागली. मग आईने त्या दोघांना आपल्या आणखी जवळ ओढलं. जरा झोप लागायला लागली की ढगांचा गडगडाट व्हायचा आणि विजांचा कड्कडाट. मग दोघे जण दचकून उठायचे आणि आईला आणखी बिलगायचा प्रयत्न करायचे. पहाटे कधीतरी पाऊस थांबला. कधी थांबला, ते दोघांना समजलंच नाही.

सकाळी परत आईबाबांची लगबग सुरू झाली, तेव्हा त्यांना जाग आली. मस्त गार हवा सुटली होती आणि त्या हवेला एक वेगळाच सुगंध येत होता. त्या दोघांनी अंग झटकून कोरडं केलं. आईने चोचीने त्यांची पिसं स्वच्छ करून दिली आणि दोघांना खाऊ दिला.

तेवढ्यात बाबा घरट्यात आले आणि चिनू-पिनूला म्हणाले, "काय चिनू पिनू, विज चमकल्यावर भीती वाटली ना रात्री?" "नाही बाबा. आम्ही अजिबात घाबरलो नाही. वीज चमकली की आम्ही डोळे घट्ट बंद करत होतो आणि ढग गडगडले की कान." बाबा ह्सले आणि त्यांनी चिनू-पिनूच्या डोक्यात हळूच एक टप्पल मारली.

चिनू आणि पिनू उडायला शिकतात.

दोघा भावांमधला चिनू होता धडपड्या. आईबाबा घरात नसले, तरी त्याचे सतत काहीतरी उद्योग सुरू असायचे. आईच्या कुशीत झोपला, तरी त्याची वळवळ सुरू असायची. मग आई त्याला ओरडायची, "चिनू, नीट झोप बरं का, एकतर दिवसभर तुमच्यासाठी चारा गोळा करून मी दमलेली असते आणि आता रात्रभर तुझा दंगा नको. नीट झोपला नाहीस, तर बाहेर बाबांच्या शेजारी झोपायला पाठवीन मी तुला."

पिनू मात्र होता थोडासा आळशी. पोट भरलं की मस्त ताणून द्यायला त्याला आवडायचं. मग चिनू त्याला ढुश्या मारायचा, पंखांनी त्याला फटके द्यायचा किंवा चोचीने चिमटे काढायचा. पिनूवर याचा काहीच परिणाम व्हायचा नाही. आई कधी उठली, कधी चारा गोळा करायला गेली, याचा त्याला काही पत्ता नसायचा. आई चारा घेऊन आली की मगच तो डोळे उघडायचा.

एक दिवस चिनू पिनूच्या डोक्यावर उभा राहिला आणि घरट्याबाहेर डोकावून बघायला लागला. बाहेर बघितल्यावर त्याला मोठी गंमतच वाटली. त्यांच्या घरट्यातुन दिसणारं झाड खरं तर बरंच मोठं होतं आणि त्यांच्या घरट्यासारखी बरीच घरटी त्या झाडावर होती. सगळ्यांच्या आई-बाबांची आपापल्या पिल्लांसाठी चारा गोळा करण्यासाठी लगबग सुरू होती. त्या दिवसापासून चिनूला बाहेरचं जग डोकावून पाहण्याचा छंदच जडला. त्याच्या पायातली ताकद हळूहळू वाढत होती आणि तो मग घरट्याबाहेर येऊन जवळच्या फांदीवर बसायला लागला. वार्‍यावर डुलणार्‍या फांदीवर बसून झोके घेणं त्याला खूप आवडत असे.

चिनू पिनूलासुद्धा बाहेरची मज्जा बघायला बोलवायचा, पण पिनूला लोळण्यापुढे सवडच नव्हती. पिनूची आईसुद्धा पिनूला सांगायची, "तू मोठा झाला आहेस. जरा चिनूबरोबर बाहेर जात जा. बाहेर बघ किती मजा असते ते." पण पिनू कोणाचंही ऐकायचा नाही. सतत आळश्यासारखा लोळत पडलेला असायचा.

एक दिवस चिनू झाडाच्या फांदीवर बसून झोके घेत असताना एकदम जोराचा वारा आला आणि चिनूचा फांदीवरचा पाय निसटला आणि तो खाली पडायला लागला. पडताना त्याने आपले पंख जोरजोरात हलवले आणि काय गंमत झाली! तो अलगद हवेमध्ये तरंगायला लागला!

आता चिनूला हवेत भरार्‍या मारण्याचा छंदच लागला होता. पण पिनू मात्र घरट्याबाहेर पाऊल टाकायला तयार नव्हता. तो घरट्याच्या बाहेर साधे डोकावून पाहायलासुद्धा तयार नव्हता. मग त्याच्या आईबाबांनी त्याला घरट्यात खायला भरवणं बंद केलं. खायला हवं असेल तर घरट्याच्या बाहेर आलं पाहिजे, असा त्याच्या बाबांनी नियमच केला. मग पिनू नाइलाजाने घरट्याबाहेर जाऊन चारा खाऊ लागला. पण खाऊ संपला की लगेच टुणकन उडी मारून तो घरट्यात जाऊन परत झोपून जायचा.

एक दिवस चिनूने उडता उडता एक अळी पकडली आणि आईला दाखवायला घरी घेऊन आला. आईबाबांनी त्याचं खुप कौतुक केलं. तोपर्यंत आळशी पिनूने पटकन ती अळी खाऊन टाकली. चिनू त्याच्याशी खूप भांडला, पण पिनू मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत झोपून गेला.

पिनूच्या आळशीपणावर पिनूचे बाबा खूप चिडले आणि त्याला चांगला धडा शिकवायचा, असं त्यांनी ठरवलं.

दुसर्‍या दिवशी पिनूच्या बाबांना पोळीचा एक मोठा तुकडा मिळाला. त्यांनी तो पिनूला दाखवला आणि त्याला घरट्याबाहेर बोलावलं. पोळी बघून पिनू खूश झाला आणि घाईघाईने उडी मारून तो घरट्याबाहेर आला. पिनूचे बाबा पोळीचा तुकडा घेऊन घरट्यापासून जरा लांबच बसले होते आणि ते बसले ती फांदीसुद्धा जरा नाजूकच होती. वार्‍याने जोरजोरात हलत होती. "बाबा, इकडे जवळ या ना.." पिनू म्हणाला, "मला तिकडे यायची फार भीती वाटते आहे." "जर पोळी खायची असेल, तर तुला इकडेच यावं लागेल, नाहीतर मी चिनूला सगळी पोळी देऊन टाकीन." बाबा त्याला दरडावत म्हणाले. कसातरी घाबरत घाबरत पिनू त्या फांदीवर गेला आणि फांदीला घट्ट पकडून पोळी खायला लागला.

तेवढ्यात त्याचे बाबा तिकडून जोरात उडाले आणि उडताना त्यांनी पिनूला जोरात धक्का मारला. पिनूचा तोलच गेला आणि तो खाली पडायला लागला. तेवढ्यात कुठूनतरी चिनू तिकडे आला आणि म्हणाला, "जोरात पंख हलव, नाहीतर जोरात खाली पडशील." पिनूच्या पोटात मोठा गोळा आला होता. वेगाने जवळ येणारी जमीन बघून त्याने डोळेच बंद करुन घेतले होते. चिनूचा आवाज ऐकल्यावर त्याने तो जिवाच्या आकांताने पंख हलवायला सुरुवात केली. बराच वेळ पंख हलवल्यावर काहीच झालं नाही, म्हणून त्याने डोळे उघडले, तर.. तो पिसासारखा हवेत तरंगत होता. मग चिनू त्याला आपल्या मागे एका फांदीवर घेऊन गेला.

पिनू धडपडत चिनूच्या मागे त्या फांदीवर जाऊन बसला. त्याच्या छातीमध्ये फार जोरात धडधड होत होती. घाबरल्यामुळे सगळं अंगही थरथर कापत होतं. पण चिनू शेजारी बसला होता, त्यामुळे त्याला थोडा धीर आला. थोडा वेळ तिकडे बसल्यावर् त्याच्या लक्षात आलं की ती फांदी त्याच्या घरट्यापासून खूप दूर होती.

तेवढ्यात त्याची आई चोचीमध्ये ज्वारीचे दाणे घेऊन आली. रिकामं घरटं बघून खूप घाबरली आणि पिनूला जोरजोरात हाका मारायला लागली. पिनूनेही मग ओरडून तिला तो इकडे फांदीवर बसला आहे असं सांगितलं आणि म्हणाला, "आई, तूच इकडे ये आणि मला इकडून घेऊन जा. मला एकट्याला तिकडे यायची खूप भीती वाटते आहे." तोपर्यंत बाबासुद्धा तिकडे आले होते. त्यांनी आईला सगळं सांगितलं. मग आई त्याला म्हणाली, "जसा गेलास तसाच परत ये. तुला काहीही होणार नाही. मी आणि बाबा आहोत इकडे तुझ्याकडे बघायला." चिनूही त्याच्याभोवती घिरट्या मारत त्याला तिकडून उडायला सांगत होता. पण पिनू फांदी घट्ट धरून बसला होता. बराच वेळ झाला, तरी तो तिकडून उडायला तयार नव्हता. उलट आईलाच आपल्या जवळ बोलावत होता.

तेवढ्यात चिनू एकदम जोरात ओरडला, "पिनू, सांभाळ" आणि पिनूला काही समजायच्या आत एक कावळा जोरजोरात काव काव असे ओरडत त्याच्या अगदी जवळून उडत गेला आणि पिनू घाबरून तिकडून उडाला आणि घरट्याजवळ येऊन बसला. तो त्या फांदीवरुन कसा उडाला आणि घरट्याजवळ कसा येऊन पोहोचला, त्याचं त्यालाच समजलं नाही.

पिनूच्या आईने मोठ्या कौतूकाने त्याला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून पंख फिरवला आणि त्याचा एक मोठा गालगुच्चा घेतला. त्याला मोठ्या प्रेमाने ज्वारीचे दाणे भरवले आणि प्रेमाने म्हणाली, "मोठं झाल गं माझं बाळ...." बाबा आणि चिनू लांबच्या फांदीवर बसून मायलेकरांचा हा कौतुकसोहळा बघत होते.

चिनू-पिनूला भेटल्या मीना आणि टीना

चिनू आणि पिनू आता त्यांच्या घरट्याच्या आजूबाजूला उडायला शिकले होते. आईबाबा बाहेर गेले की दोघे जण घरट्याबाहेर पडत. आईबाबा आले की परत घरट्याकडे उडत येत आणि आईबाबांनी आणलेला खाऊ खात.

एकदा असेच त्यांच्या घरट्याच्या आसपास उडत असताना त्यांना कुठूनतरी रडण्याचा आवाज आला. कोणीतरी हमसून हमसून रडत होतं. तो आवाज एका घरट्याच्याच दिशेने येत होता. चिनू आणि पिनू त्या घरट्याजवळ उडत गेले आणि आत डोकावून पाहिलं, तर दोन छोट्या चिमण्या एकमेकींना बिलगून बसल्या होत्या. त्यांच्याच रडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता.

"काय झालं? तुम्ही दोघी का रडताय?" चिनूने विचारलं. चिनू आणि पिनूला घरट्यात डोकावताना बघून त्या दोन छोट्या चिमण्या आणखीनच जोरात रडायला लागल्या. पिनू घाबरून लांबच्या फांदीवर जाऊन बसला. चिनू मुळीच घाबरला नाही. तो म्हणाला, "हे बघा, तुम्ही का रडताय हे समजलं, तर आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करता येईल. नसेल सांगायचं तर बसा रडत अशाच."

"खूप वेळ झाला, तरी आमचे आईबाबा परत आले नाहीत." त्या दोघी रडत रडत म्हणाल्या. "आम्हाला दोघींना खूप भूक लागली आहे"

"माझ्याकडे आहे खाऊ, मी एका फांदीच्या बेचक्यामध्ये लपवून ठेवला आहे. तुम्ही दोघी रडू नका, मी माझा खाऊ तुम्हाला देतो." चिनू म्हणाला.

"दुसर्‍या कोणी काहीही दिलं तरी घ्यायचं नाही, असं आईबाबांनी सांगितलंय. आम्हाला तुझा खाऊ नको. आम्ही आईबाबांची वाट पाहू. येतीलच ते इतक्यात." त्या दोघी एका सुरात म्हणाल्या.

"तुमच्या आईबाबांचं बरोबरच आहे, माझ्या आईनेसुद्धा मला हेच सांगितलं आहे, त्यांनी तर मला हेसुद्धा सांगितलंय की कोणत्याही अनोळखी प्राण्याबरोबर किंवा पक्ष्याबरोबर बोलायचंसुद्धा नाही. आता आईला समजलं की मी तुमच्याशी बोलत होतो, तर ती मलासुद्धा ओरडेल. ए, चला, मी जातो इकडून." चिनू म्हणाला.

"ए, नको ना रे जाऊस, माझी आई परत येईपर्यंत थांब ना, आम्हाला दोघींना एकट्यांना खूप भीती वाटते आहे." एक छोटी चिमणी जोरजोरात रडत म्हणाली. "हो, नाही जात इकडून, पण तुम्ही दोघी प्लीज रडू नका आणि एक मिनिट थांबा. मी पिनूला घेऊन येतो." चिनू म्हणाला. "हा पिनू कोण?" एका चिमणीने डोळे पुसत विचारलं. "माझा भाऊ. आणि माझं नाव सांगितलं नाही मी तुम्हाला. मी चिनू. इकडे पलीकडच्याच फांदीवर आमचं घरटं आहे. तुमची नावं काय??"

"मी मीना आणि ही माझी बहीण टीना." छोटी मीना म्हणाली.

"ए पिनू, इकडे ये, या बघ मीना आणि टीना, त्यांचे आईबाबा घरात नाहीत म्हणून घाबरल्या आहेत. ये ना इकडे, त्यांचे आईबाबा परत येईपर्यंत आपण त्यांच्या घराजवळ त्यांना सोबत म्हणून बसू या."

"मी येणार नाही, तू खाऊ कुठे लपवला आहेस ते पहिले मला सांग, नाहीतर आई आल्यावर मी आईला तुझं नाव सांगणार आहे." पिनू म्हणाला.

"तू माझ्या सगळा खाऊ खाऊन टाकतोस, म्हणून मी तो लपवला आहे. मी नाही सांगणार तुला कुठे ठेवलाय ते." चिनू म्हणाला.

"मग मी आईला तुझं नाव सांगणार, दोन अनोळखी चिमण्यांशी बोलत होतास म्हणून." पिनू.

"सांग जा, आईने सांगितलं आहे की अनोळखी पक्ष्यांशी बोलायचं नाही; पण या तर माझ्या फ्रेंड आहेत. मीना आणि टीना. उलट आईने असं शिकवलं आहे की जे संकटात असतात त्यांना मदत करायची. आई मला काहीच म्हणणार नाही. पिनू, इकडे ये ना, त्या दोघी तुलासुद्धा बोलावतायत." चिनू म्हणाला.

"माझ्याशी बोलायचं असेल, तर पहिल्या घरट्यामधून बाहेर या म्हणावं त्या दोघींना. मी काही तिकडे येणार नाही." पिनू म्हणाला.

"आम्ही दोघी घरट्याबाहेर कधीच पडलो नाही, आम्हाला घराबाहेर यायची भीती वाटते." टीना म्हणाली. "हॅ, त्यात काय घाबरायचं? आम्ही बघ तुमच्याएवढेच आहोत, पण कसे मस्त भटकतोय बाहेर." पिनू तिकडूनच ओरडून म्हणाला.

"अगं, घाबरण्यासारखं काही नाही. तुम्ही एक करा - घरट्यामधून बाहेर पडू नका, पण बाहेर डोकावून तर बघा आपलं झाड केवढं मोठं आहे ते." चिनू त्या दोन चिमण्यांना म्हणाला.

"नको, आम्ही घरट्यामधून पडलो तर?" टीनाने शंका काढली. "हॅ, काही होणार नाही. आणि काही झालं तर आम्ही आहोत ना. आम्ही परत तुम्हाला तुमच्या घरट्यात आणून ठेवू." चिनू जोरात म्हणाला.

बराच वेळ त्यांना आग्रह केल्यावर त्या घ्रट्यामधून थोडंसं डोकावून बघायला तयार झाल्या. घाबरत घाबरत त्यांनी घरट्याबाहेर डोकं काढलं. आणि बाहेरचं दृश्य बघून त्या आश्चर्यचकित झाल्या. त्यांचं झाड केवढंतरी मोठं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी त्या झाडावर राहत होते. झाड चिंचांनी लगडलेलं होतं.

"ए चिनू, मला आपल्या झाडाची एक चिंच दे ना," टीना म्हणाली "टीना, गाभुळलेली चिंच फार मस्त लागते. खाल्ली आहेस का कधी तू?" चिनू म्हणाला आणि एक चिंच घेऊन आला. मीना-टीनाच्या आईबाबांनी त्यांना एक-दोन वेळा चिंचासुद्धा दिल्या होत्या खाऊ म्हणून, ते त्यांनी चिनूला सांगितलं.

तेवढ्यात मीना-टीनाची आई परत आली. ती चिनू-पिनूच्या आईबाबांना ओळखत होती. मीना-टीनाच्या आईने त्यांना सांगितलं की "तुम्ही रोज मीना-टीनाशी खेळायला येत जा." मग तिने त्या चौघांना खाऊ खायला दिला. "चिन्या, आईला विचारल्याशिवाय खाऊ नकोस, नाहीतर आई ओरडेल" पिनू तेवढ्यात चिनूवर डाफरला. मग चिनूने मीना-टीनाच्या आईला सांगितलं की ते दोघे घरी जाऊन तो खाऊ खातील आणि ते दोघे त्यांच्या घरी आले. त्यांच्या मागोमाग मीना-टीनाची आई त्यांच्या घरट्याजवळ आली आणि चिनू-पिनूने मीना-टीनाला कशी मदत केली, ते तिने चिनू-पिनूच्या आईला सांगितलं.

चिनू-पिनूच्या आईबाबांनी त्या दोघांचं कौतुक केलं आणि त्यांना जास्त खाऊ खायला दिला.

पैजारबुवा

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

7 Sep 2022 - 8:31 am | कपिलमुनी

खूप छान

कुमार१'s picture

7 Sep 2022 - 8:42 am | कुमार१

खूप छान.
आवडली ...

टर्मीनेटर's picture

7 Sep 2022 - 8:51 am | टर्मीनेटर

चो क्युट 😍
बालकथा लैच आवडली!

विजुभाऊ's picture

7 Sep 2022 - 9:34 am | विजुभाऊ

मस्तच आहे. क्षणभरासाठी मी लहान झालो वाचताना

सरिता बांदेकर's picture

7 Sep 2022 - 11:31 am | सरिता बांदेकर

मस्त!
बालकथा वाचायला नेहमीच आवडतात.
लिहीत रहा.
मिसळपाववर बालकथा सुखद धक्का आवडला.
☺☺

कर्नलतपस्वी's picture

7 Sep 2022 - 11:42 am | कर्नलतपस्वी

अखंडित कथा प्रवाह, न थांबता वाचली.

वाटले होते की शेवट असा काहीतरी होईल.

They lived happily ever after,
किंवा
ती सध्या काय करते

संगम चित्रपट आठवला.

शेवटी आशोक मामसारखं,

चिनू मी आणी पिनू कोण?

तुच्.....

मस्त

चौथा कोनाडा's picture

7 Sep 2022 - 12:02 pm | चौथा कोनाडा

खूप छान. ओघवती.
शैलीही झकासच
❤️ ❤️ ❤️
बाळकथा आवडली ..

चला लेकीला सांगायला छान निरागस बालकथा मिळाली!

चांदणे संदीप's picture

7 Sep 2022 - 1:28 pm | चांदणे संदीप

+१

छान आहे कथा. सांगता सांगता झोपही लागेल मस्त. :)

सं - दी - प

नचिकेत जवखेडकर's picture

7 Sep 2022 - 1:41 pm | नचिकेत जवखेडकर

+१
माझ्या पण मुलीला खूप आवडतील या गोष्टी!

खेडूत's picture

7 Sep 2022 - 1:37 pm | खेडूत

आवडली कथा..
आता 'शिकवेल' म्हणून दिवाळी अंकात लहान आणि मोठ्यांसाठी ( प्रौढांसाठी नव्हे!) अजून एक भाग येऊद्या.

गाभुळलेल्या चिंचा बघितल्यावर आपलं सांगितलं हो..!

तुषार काळभोर's picture

7 Sep 2022 - 1:46 pm | तुषार काळभोर

लेकाकडून फीडबॅक : "त्यांच्या अजून गोष्टी दाखवा ना..!"

प्रचेतस's picture

7 Sep 2022 - 2:56 pm | प्रचेतस

खूप सुंदर कथा.

सतिश गावडे's picture

7 Sep 2022 - 3:26 pm | सतिश गावडे

मिपावर तशीही बालकथा अभावानेच वाचायला मिळते. या विशेष लेखमालेच्या निमित्ताने एक सुंदर बालकथा वाचायला मिळाली.

अनन्त्_यात्री's picture

7 Sep 2022 - 7:48 pm | अनन्त्_यात्री

बालकथा

मुक्त विहारि's picture

8 Sep 2022 - 7:40 pm | मुक्त विहारि

छान लिहिल्या आहेत...

विवेकपटाईत's picture

10 Sep 2022 - 10:59 am | विवेकपटाईत

मस्त आहे रे

पर्णिका's picture

13 Sep 2022 - 3:16 am | पर्णिका

कित्ती गोsड आहेत या बालकथा... 😀 पहिल्या दोन विशेष आवडल्या.

MipaPremiYogesh's picture

13 Sep 2022 - 5:45 pm | MipaPremiYogesh

काय गोड कथा आहे मस्तच

श्वेता व्यास's picture

22 Sep 2022 - 1:19 pm | श्वेता व्यास

खूप छान बालकथा, आवडली.

श्रीगणेशा's picture

23 Sep 2022 - 1:02 pm | श्रीगणेशा

आवडली बालकथा, खूप छान!
आणि खूप दिवसांनी एखादी बालकथा वाचली.

अभिजीत अवलिया's picture

24 Sep 2022 - 5:59 am | अभिजीत अवलिया

छान बालकथा.