उर्वरित जीवनसत्वे व लेखमालेचा समारोप

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
6 Aug 2018 - 10:40 am

या लेखमालेत आतापर्यंत आपण ६ जीवनसत्वांचा स्वतंत्र लेखांतून आढावा घेतला. उरलेल्यांपैकी काहींचा धावता आढावा या लेखात घेत आहे. या सर्वांना एका लेखात कोंबले आहे म्हणून त्यांना ‘चिल्लीपिल्ली’ समजू नये ! आरोग्यदृष्ट्या ती सर्वच महत्वाची आहेत. फक्त त्या प्रत्येकावर स्वतंत्र लेख लिहीण्याइतका मजकूर नाही.

K जीवनसत्व :
जीवनसत्वांची ऐतिहासिक नावे इंग्रजी वर्णमालेनुसार A ते E अशी दिलेली होती. जेव्हा या नव्या जीवनसत्वाचा शोध लागला, तेव्हा वर्णमालेचा क्रम बिघडवून संशोधकांनी एकदम Kवर का उडी मारली असावी याचे वाचकांस कुतूहल वाटेल. Kचे शरीरातील कार्य जखमेनंतर आपले रक्त गोठण्याच्या( coagulation) संदर्भात आहे. त्याचा जेव्हा शोध लागला तेव्हा तो प्रथम एका जर्मन नियतकालिकात प्रसिद्ध झाला. त्या भाषेत coagulation हा शब्द Koagulations असा लिहीला जातो. त्यामुळे त्याला K हे लघुनाम मिळाले. Quinone हे त्याचे अधिकृत नाव.

K आपल्याला पालेभाज्या आणि नेहमीच्या तेलांतून सहज मिळते. तसेच आपल्या मोठ्या आतड्यांतील उपयुक्त जीवाणूही ते तयार करतात. त्यामुळे सहसा त्याचा अभाव दिसून येत नाही. काही नवजात बालकांत अभाव होऊ शकतो आणि त्यांना रक्तस्त्राव होतो. प्रौढांमध्ये जर काही आजारांत काही antibiotics तोंडातून दीर्घकाळ दिली गेली तर त्यामुळे आपल्या आतड्यातले उपयुक्त जीवाणू मरतात. त्यातून K चे अंतर्गत उत्पादन कमी होते.

उर्वरित ‘ब’ जीवनसत्वे :
सर्व ‘ब’ जीवनसत्वांचा एक गट करण्यामागे कारण आहे. सहसा ती विविध आहारस्त्रोतांत एकत्रित आढळतात. साधारणपणे जेव्हा ‘ब’चा अभाव होतो तेव्हा तो एकापेक्षा जास्त जीवनसत्वांचा मिळून असतो. तरीसुद्धा या गटातील काही विशिष्ट घटकांच्या अभावाने स्वतंत्र आजार होऊ शकतात.
यांतील ब- २,३,६ व ९ यांचा थोडक्यात आढावा घेतो.

ब-२ (Riboflavin):
हे मुख्यतः पेशींत ऊर्जानिर्मितीचे गतिवर्धक म्हणून काम करते. त्याचा अभाव समाजात बऱ्यापैकी दिसतो. त्याने तोंडाचा दाह (“तोंड येणे”) होतो. हा दाह मुख्यतः ओठांच्या कोपऱ्यात (angles) दिसतो. तसेच त्वचेचाही दाह होतो. चित्र पाहा:

pict

ब-३ (Niacin):
याचे कार्यही ब-२ प्रमाणेच. ते आपल्या शरीरात एका अमिनो आम्लापासून तयार होते पण तेवढे पुरेसे नसल्याने आहारातूनही आवश्यक. त्याच्या अभावाचे तीन परिणाम असे:
१. त्वचेचा दाह : याचे वैशिष्ट्य म्हणजे तो शरीराच्या कपडे न घातलेल्या भागांवर होतो. साधारण तो दोन्ही हात व मानेचा उघडा भाग इथे दिसतो.
२. जुलाब होणे
३. मानसिक ऱ्हास
या आजाराला Pellagra (= शुष्क त्वचा ) असे म्हणतात. चित्र पाहा :
pict

ब-६ (Pyridoxine) : हे ऊर्जानिर्मिती आणि अमिनो आम्लांचा चयायपचय यांत महत्वाची भूमिका निभावते. निव्वळ त्याच्या एकट्याचा अभाव सहसा दिसत नाही.

ब-९ (Folic acid) :
हे जीवनसत्व ब-१२ च्या जोडीने DNAच्या निर्मितीत योगदान देते. किंबहुना ही दोन्ही जीवनसत्वे जोडीने काम करतात. हिरव्या पालेभाज्यांच्या मोठ्या पानांमध्ये (foliage) हे विपुल प्रमाणात आढळते. त्यामुळेच त्याला folic असे नाव मिळाले.
गर्भवती स्त्रियांत याची गरज नेहमीपेक्षा दुप्पट असते. या अवस्थेतील त्याच्या अभावाने गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणून सर्व गर्भवतीना folic a च्या गोळ्या नियमित दिल्या जातात.

ब-९ च्या अभावाने रक्तन्यूनता होते आणि ती ब-१२ च्या अभावासारखीच असते. त्याच्या अभावातून मोठ्या आतड्यांचा कर्करोग बळावू शकतो असे अलीकडील संशोधनातून वाटते आहे.

‘ब’ गटातील राहिलेली दोन जीवनसत्वे म्हणजे BiotinPantothenic acid. ऊर्जानिर्मितीत काम करणाऱ्या अन्य ‘ब’ ना ती साथ देतात एवढी माहिती पुरे.

‘ब’ कुटुंबात एकूण घटक आहेत परंतु त्यांचे क्रमांक मात्र १ ते १२ असे दिलेले आहेत. या क्रमांकांपैकी ४,८,१० व ११ हे क्रमांक कोणालाच दिलेले नाहीत याची नोंद घ्यावी. किंबहुना अशा ऐतिहासिक आकडेवारीपेक्षा प्रत्येक जीवनसत्व हे त्याच्या अधिकृत रासायनिक नावाने ओळखले जावे.
* * *

तर अशी ही १३ जीवनसत्वे. मुळात ती आपल्यासाठी आवश्यक अशी सूक्ष्म पोषणद्रव्ये आहेत. जरी ती आहारात खूप कमी प्रमाणात लागत असली तरी शरीरातील त्यांचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. मूलभूत चयापचय, शरीर-बळकटी, प्रतिकारशक्ती आणि काही महत्वाच्या इंद्रियांचे संरक्षण अशी अनेकविध कामे ती करतात. ही मूलभूत माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने ही लेखमाला आपल्यापुढे सादर केली. ती उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे.

सरतेशेवटी या लेखमालेतील वाचकांच्या सहभागाबद्दल थोडे विवेचन. नियमित वाचकांना ती आवडली आणि त्यांनी पूरक माहितीची भर घालून छान चर्चा केली. ‘क’,’ड’ आणि ब-१२ च्या चर्चा विशेष रंगल्या. ‘क’ च्या संदर्भात वाचकांचे विविध आंबट फळांबाबतचे कुतूहल दिसून आले. एकूणच फळांच्या राज्यातील ती सफर रंजक ठरली. तर ‘ड’च्या चर्चेत बऱ्याच जणांनी वैयक्तिक हाडांच्या आजारांबद्दल शंका विचारल्या. एकंदरीत समाजात वयाच्या पन्नाशीनंतर कमकुवत हाडांच्या समस्या वाढत चालल्याचे त्यातून ध्वनित होते.
ब-१२ च्या स्त्रोतांमध्ये शाकाहार/मांसाहार हा सनातन काथ्याकुटाचा विषय असल्याने इथला वाचकांचा अधिक सहभाग स्वाभाविक असतो. ब-१ हे मात्र चर्चेसाठी उपेक्षित झाल्याचे दिसले. वास्तविक शरीराच्या ऊर्जानिर्मितीत ते अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. त्यादृष्टीने त्यावर स्वतंत्र लेख लिहीला होता.
‘अ’ हे डोळ्यांच्या संदर्भातले मौल्यवान जीवनसत्व. त्याची चर्चा समाधानकारक झाली तरीही ती ‘क’ व ‘ड’ इतकी रंगली नाही. किंबहुना मी ते लेखमालेत उशीरा घेतल्यानेही तसे झाले असावे.
असो.
पुनश्च एकवार सर्व मिपाकर, सा.संपादक आणि प्रशासक यांचे मनापासून आभार !
***********************************************
सर्व चित्रे जालावरुन साभार !

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

6 Aug 2018 - 11:29 am | कुमार१

मा सा. सं,
माझा आजचा उर्वरित जीवनसत्वाचा शेवटचा लेख यापूर्वीच्या जीवनसत्वांच्या लेखांस जोडून अनुक्रमणिका करावी ही विनंती.

आभार !

अभ्या..'s picture

6 Aug 2018 - 6:23 pm | अभ्या..

साध्या सोप्या भाषेत पण अप्रतिम माहीतीने युक्त अशी झाली लेखमाला.
मानाचा तुराच जणू.
ह्याची भरपूर वाचने होतील भविष्यात.

कुमार१'s picture

6 Aug 2018 - 6:27 pm | कुमार१

तुमच्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार !

हि लेखमालिका सुद्धा खूपच सुंदर. धन्यवाद.

उत्तम लेखमाला. धन्यवाद..

उत्तम माहितीपूर्ण लेखमाला , स्तुत्य उपक्रम डॉक्टरसाहेब . मंडळ आभारी आहे .

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2018 - 12:30 am | डॉ सुहास म्हात्रे

एक माहितीपूर्ण आणि अत्यंत उपयोगी लेखमाला... अगदी सर्वांनी वाचनखूण साठवून ठेवावी अशी !

महत्वाच्या आरोग्यविषयक विषयांवर लेखमालांच्या प्रसिद्ध करण्यासाठी "कुमार१" यांचे हार्दीक अभिनंदन व आभार !

सुधीर कांदळकर's picture

7 Aug 2018 - 6:29 am | सुधीर कांदळकर

आदि आणि अंत असतोच. तरीही लेखमाला अचानक संपल्यामुळे वाईट वाटले. ब-४,८,९,१० ११ आणि ११ बद्दल काहीच माहीत नव्हते. त्यामुळे त्यांबद्दलचे कुतूहल आणि प्रतीक्षा होती. बायोटीन असलेले उत्पादन कधी बनवले नव्हते. फॉलीक अ‍ॅसिड हेच ब-९ हेही ठाऊक नव्हते. कदाचित फार्माकोपियल मोनोलॉगमध्ये तसा उल्लेख नव्हता असेल किंवा माझ्या नजरेतून सुटला असेल. माहितीबद्दल धन्यवाद.

गावठी कोंबडीच्या अंड्याच्या बलकात रिबोफ्लॅव्हीन असल्यामुळे तो पिवळा दिसतो. विदेशी कोंबडीच्या अंड्याच्या बलकात ते फारच कमी असल्यामुळे बलक गर्द पिवळा दिसत नाही असे ऐकून आहे. हे खरे काय?

एका अप्रतिम मालिकेबद्दल अनेक धन्यवाद. तेवढं माझ्या फर्माईशीचं ध्यानात ठेवा आणि माझ्या रिकाम्या घागरीत काही थेंब शिंपडा.

अनेक, अनेक धन्यवाद.

कुमार१'s picture

7 Aug 2018 - 8:07 am | कुमार१

आणि ज्येष्ठ मिपाकर यांचे पुनश्च एकदा मनापासून आभार. चर्चेतील तुमचा सहभाग हा जीवांसत्वांसारखाच महत्वाचा आहे.

@ सुधीर,
होय, अंड्याच्या बलकाचा रंग रिबोफ्लेविनमुळेच असतो. त्यामुळे त्या रंगाचा गडदपणा व ब-२चे प्रमाण यांचा संबंध असू शकेल.
तुमच्या फर्माइशी वर विचार करतो. पण तूर्त वेगळा विषय पटलावर आहे. जीवनसत्वांची चुलत भावंडे म्हणजे खनिजे.
तर अशा काही जीवनावश्यक खनिजांवर पुढील लेखमाला असेल.
लोभ असावा .

अनिंद्य's picture

7 Aug 2018 - 11:31 am | अनिंद्य

@ कुमार१,

आणखी एक माहितीपूर्ण लेखमाला झाली ही. फोटो 'आवडले' असे म्हणण्याची सोय मात्र नाही इथे :-)

पुढची मालिका खनिजांबद्दल असेल हे ही योग्यच. त्याला तुम्ही 'खनिजांचा खजिना' असे शीर्षक द्याल असे वाटते (कारण - जरा 'ई'कडे लक्ष द्या हे तुमचे खास कुमार टच असलेले शीर्षक)

तुमचे अनेक आभार _/\_

अनिंद्य

कुमार१'s picture

7 Aug 2018 - 11:53 am | कुमार१

फोटो 'आवडले' असे म्हणण्याची सोय मात्र नाही इथे :-) >>>>
अगदी मार्मिक शेरा ! सहमत.

पुढची मालिका खनिजांबद्दल असेल हे ही योग्यच. त्याला तुम्ही 'खनिजांचा खजिना' असे शीर्षक द्याल>>>>>

सुरेख सूचना. तुम्ही हे शीर्षक सुचवून त्या खजिन्याची किल्ली तुमच्या हातात असल्याची जाणीव करून दिली आहे . धन्यवाद ☺️

प्रमोद देर्देकर's picture

8 Aug 2018 - 1:31 pm | प्रमोद देर्देकर

अत्यंत माहितीपूर्ण लेखमाला
धन्यवाद

नाखु's picture

8 Aug 2018 - 8:51 pm | नाखु

सत्व युक्त माहीतीपूर्ण लेखमाला आवडली

अखिल मिपातात्त्विक विंबल्डन+फुटबॉल+खो-खो कबड्डी प्रेक्षक नाखु

ट्रेड मार्क's picture

10 Aug 2018 - 8:15 am | ट्रेड मार्क

या लेखांचे प्रिंट काढून भिंतीवर लावून ठेवावे. घरातल्या सर्वांसाठी महत्वाची माहिती सहज डोळ्यासमोर राहील.

खनिजांच्या लेखमालेच्या प्रतीक्षेत. खनिजेसुद्धा जीवनसत्वांइतकीच महत्वाची आहेत असं ऐकून आहे पण तरी त्यांना तेवढं महत्व दिलं जात नाही.

तुमच्या पाठबळावर च पुढची लेखमाला सुरू करेन.

लई भारी's picture

28 Aug 2018 - 11:55 am | लई भारी

जरा उशिराने वाचन होतंय.
आपले आभार मानावेत तितके थोडेच आहेत या सर्व लेखमालांसाठी!
पुलेशु आणि नवनवीन माहितीच्या प्रतीक्षेत!

वाचनखूण साठवत आहेच!

कुमार१'s picture

28 Aug 2018 - 12:05 pm | कुमार१

तुमच्यासारख्या उत्साही वाचकांचे नेहमीच स्वागत आहे !
शुभेच्छा.

अनुप ढेरे's picture

28 Aug 2018 - 12:29 pm | अनुप ढेरे

लेखमाला आवडली!

K व्हिटॅमिन आणि हृदयविकार यांचा काही संबंध असतो का?

कुमार१'s picture

2 Dec 2018 - 8:37 pm | कुमार१

चांगला प्रश्न.

K चे दोन प्रकार असतात. K1 पालेभाज्यातून मिळते तर K2 हे आपल्या आतड्यातले जिवाणू, आंबवलेले पदार्थ व दुधातून मिळते.

K2 चे एक विशेष कार्य आहे. चयापचय बिघडलेल्या रुग्णांत त्यांच्या रक्तवाहिन्यात कॅल्शियम चे थर बरेच साठू लागतात. त्यातूनच पुढे वाहिन्या अरुंद होतात.

K2 असे थर साठू देत नाही. त्यामुळे करोनरी व अन्य वाहिन्यांचे आरोग्य चांगले राहते.

रागो's picture

3 Dec 2018 - 12:54 pm | रागो

माहितीपूर्ण लेखमाला

कुमार१'s picture

5 Oct 2019 - 8:41 pm | कुमार१

या लेखमालेत बेरीबेरी आणि पेलाग्रा या अनुक्रमे ब-१ आणि ब-३ यांच्या अभावाने होणाऱ्या रोगांचा उल्लेख आलेला आहे. भारतात आदिवासी भागांत या रोगांचे उच्चाटन करण्यात डॉ. के. गोपालन यांच्या संशोधनाचा वाटा महत्वाचा होता. त्यांच्या याबाबतीतील अतुलनीय कामांमुळे लोक त्यांना ‘न्यूट्रिशन गोपालन’ याच नावाने ओळखत असत. नुकतेच त्यांचे वयाच्या शंभरीत असताना निधन झाले.

त्यांना भावपूर्ण आदरांजली !

जालिम लोशन's picture

5 Oct 2019 - 10:50 pm | जालिम लोशन

हाही लेख ऊत्तम, बायोटीन, अल्फा लिपोइक अॅसिड आणी अमाइनो अॅसिडस असलेली ऊत्पादने बाजारात केस गळणे थांबवण्यासाठी विकली जातात त्यामागची रॅशनली बाबत पण चांगला लेख होईल.

कुमार१'s picture

6 Oct 2019 - 9:43 am | कुमार१

धन्यवाद. उपयुक्त सूचना.

‘केसगळती’ वरील उपचार हा एक चमत्कारिक विषय आहे ! अनेक शास्त्रीय तसेच अशास्त्रीय उपचारांची या क्षेत्रात रेलचेल आहे. जवळपास निम्मी जीवनसत्वे आणि काही खनिजे उपयुक्त असल्याचे दावे केले जातात.
बायोटीनच्या अभावाने काही रुग्णांत केस गळतात हे खरे आहे. पण, तो या त्रासावरील उपचार होऊ शकतो का यासंदर्भात पुरेशा क्लिनिकल ट्रायल्स झालेल्या नाहीत. त्यामुळे ठाम मत देता येत नाही.

Rajesh188's picture

6 Oct 2019 - 10:14 am | Rajesh188

तुमच्या लेख मालेमधून बरीच नवीन माहिती मिळाली .
आणि बऱ्याच प्रश्नाची ठाम उत्तरे सुधा मिळाली .
तुमचे खूप आभार डॉक्टर .
लवकर नवीन विषयासह भेटीला या .
प्रतीक्षेत

कुमार१'s picture

6 Oct 2019 - 10:19 am | कुमार१

राजेश, धन्यवाद.

तुमच्या शुभेच्छांमुळेच लेखनाचा उत्साह टिकून राहतो.

चौकटराजा's picture

8 Oct 2019 - 11:04 am | चौकटराजा

गेले दोन तीन महिने मी कोरडे तोन्ड, बिटर टेस्ट व ओरल अल्सर अशा सिंड्रोम ने त्रस्त आहे. आता त्यात ओरासेप, ग्लीसरीन ,तवकीलाची लापशी ई प्रकार करून झाले. पण बी कोम्प्लेक्स च्या गोळ्या राहिल्यात . खरे तर असे म्हणतात की ज्याना लांब काळ मधुमेह आहे त्यानी रोज एक बीकॉम्प्लेक्स ची गोळी घ्यावी !

कुमार१'s picture

8 Oct 2019 - 11:16 am | कुमार१

तुमच्या त्रस्ततेबद्दल सहानुभूती आहे !

ज्याना लांब काळ मधुमेह आहे त्यानी रोज एक बीकॉम्प्लेक्स ची गोळी घ्यावी !

बरोबर. अजून एक विशेष मुद्दा . मधुमेह उपचारासाठी Metformin ही गोळी बहुसंख्य रुग्णांना दिली जाते. तिच्यामुळे ब-१२ चे नैसर्गिक शोषण कमी होते व त्यामुळे त्याची कमतरता होते.

कुमार१'s picture

20 Jan 2022 - 12:49 pm | कुमार१

ही माध्यमे काहीही फेकाफेकी करतात आणि गैरसमज पसरवतात. त्याचे हे एक उदाहरण :

"व्हिटॅमिन के : प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन के देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन के शरीराला शक्ती देते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते"

के जीवनसत्वाचा रक्त गोठण्याशी (आणि फार तर हाडांच्या बळकटीसाठी अप्रत्यक्ष) संबंध आहे.
.... यावरून अभ्यास न केलेला विद्यार्थी लेखी परीक्षेत जशी फेकाफेकी करतो त्याची आठवण होते :)