'ड' जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता (पूर्वार्ध)

हेमंतकुमार जनातलं, मनातलं
शरीराच्या पोषणासाठी आपण आहारातून विविध पोषण-घटक दररोज घेत असतो. त्यापैकी कर्बोदके, मेद व प्रथिने ही मोठ्या प्रमाणात (ग्रॅममध्ये) लागतात. याउलट काही पोषण-घटक हे अल्प प्रमाणात (मिलिग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम) जरुरीचे असतात. अशा सूक्ष्म पोषणद्रव्यांमध्ये जीवनसत्वांचा(Vitamins) समावेश होतो. आजपर्यंत एकूण १३ जीवनसत्वे माहित आहेत. त्यांना ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी एकाक्षरी नावे का दिली असावीत याचे वाचकांना कुतूहल असते. गेल्या १-२ शतकांत जेव्हा त्यांचा टप्प्याटप्प्याने शोध लागला, तेव्हा त्या प्रत्येकाचे रासायनिक सूत्र निश्चित माहित नव्हते. त्यामुळे त्यांना शोधक्रमाने अ, ब, क अशी नावे दिली गेली. नंतर त्या प्रत्येकाचे सूत्र माहित झाले व त्यानुसार प्रत्येकाला त्याचे अधिकृत नाव मिळालेले आहे. तरीसुद्धा जनमानसात आणि वैद्यकविश्वात त्यांची ऐतिहासिक एकाक्षरी नावे आजही प्रचलित आहेत. या लेखात आपण ‘ड’ जीवनसत्वाचा (Cholecalciferol) विचार करणार आहोत. हाडांच्या बळकटीसाठी ते अगदी आवश्यक. ते आपल्या शरीरातही तयार होते, ही त्याची अजून एक ओळख. त्याचे उत्पादन, कार्य आणि त्याच्या अभावाने होणारे आजार यांचे विवेचन पुढे येईल. हाडांच्या दुबळेपणाव्यतिरिक्त इतर काही गंभीर आजारांचा प्रतिबंध ‘ड’ करू शकते का, हा गेल्या २० वर्षांत खूप चार्विचर्वण झालेला विषय आहे. त्याचाही आढावा शेवटी घेईन. शरीरातील उत्पादन: आपल्या त्वचेमध्ये काही प्रमाणात कोलेस्टेरॉल असते. जेव्हा उघड्या त्वचेवर सूर्यकिरण पडतात तेव्हा त्यातील ‘नीलातीत’ (UV-B) किरणांची या कोलेस्टेरॉलवर प्रक्रिया होते. त्यातून ‘ड’ तयार होते. ते रक्तात शोषले गेल्यावर पुढे यकृत व नंतर मूत्रपिंडात पाठवले जाते. तिथे त्यावर अधिक प्रक्रिया होऊन परिपक्व ‘ड’ (active D) तयार होते. जर ‘ड’ इतक्या सहज शरीरात तयार होते तर मग आपल्याला आहारात त्याची काळजी करायची गरज नाही, असे वाटेल. पण, हा मामला इतका सोपा नाही. ते त्वचेत तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे. ते असे आहेत: त्वचेचा रंग: जगभरातील लोकांच्या त्वचेच्या रंगात पांढराफटक पासून ते अगदी पूर्ण काळा अशा अनेक छटा दिसतात. त्वचेमध्ये जेवढे melanin रंगद्रव्य जास्त, तेवढा तिचा रंग अधिक काळा होतो. हे रंगद्रव्य ‘ड’ च्या उत्पादनात अडथळा आणते. त्यामुळे ‘ड’ कृष्णवर्णीयांमध्ये कमी प्रमाणात तयार होते. वय: वाढत्या वयाबरोबर ही प्रक्रिया मंदावत जाते. त्यामुळे वृद्धांमध्ये ‘ड’ कमी तयार होते. हवामान: हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात ही प्रक्रिया अधिक होते. त्यामुळे उन्हाळा संपताना सर्वात जास्त ‘ड’ त्वचेत तयार झालेले असते. पोशाख आणि व्यवसाय: ‘ड’ भरपूर तयार होण्यासाठी त्वचेचा जास्तीत जास्त भाग उघडा असायला हवा. त्यावर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंतचे उन किमान २० मिनिटे पडणे आवश्यक असते. या वेळेतील उन्हात नीलातीत किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते. यासंदर्भात पांढरपेशे आणि श्रमजीवींची तुलना रोचक आहे. पांढरपेशे या वेळांत बरेचसे शरीर कपड्यांनी झाकून कामाच्या खोल्यांमध्ये बसून असतात. त्यात जर तिथल्या खिडक्या पूर्ण बंद केल्या असतील, तर काचेतून येणारे सूर्यकिरण उपयुक्त नसतात. त्यात भर म्हणून जर खोलीच्या आतून पूर्ण पडदे लावलेले असतील तर मग थेट प्रकाशाचा संपर्कच तुटतो. याउलट एखादा बांधकाम मजूर या वेळांत बऱ्यापैकी उघड्या अंगाने उन्हात घाम गाळतो. अर्थातच त्याच्या त्वचेत ‘ड’ भरपूर तयार होते. या विवेचनातून लक्षात येईल की वृद्धाश्रमात जखडलेले लोक आणि परदानशीन स्त्रियांत ‘ड’ चा अभाव अधिक दिसतो. वरील सर्व घटकांचा विचार करता हे लक्षात येते की शरीरात तयार होणारे ‘ड’ आपल्याला पुरेसे नसते. त्यामुळे काही प्रमाणात ते आहारातून घ्यावे लागते. आहार आणि ‘ड’ ची उपलब्धता: ते मुख्यतः प्राणीजन्य पदार्थांत आढळते. तेलयुक्त मासे (salmon, mackerel), बटर आणि चीज हे त्याचे मुख्य स्त्रोत. तरीही या नैसर्गिक पदार्थांत जेवढे ‘ड’ असते ते आपल्या गरजेपेक्षा कमीच असते. म्हणून प्रगत देशांत दूध व इतर काही खाद्यांमध्ये कृत्रिम ‘ड’ घालून त्यांचे पोषणमूल्य वाढवलेले असते. शरीरातील कार्य: परिपक्व ‘ड’ (active D) हे पेशींत एखाद्या हॉर्मोनप्रमाणे काम करते. लहान आतडे, हाडे आणि मूत्रपिंड अशा तीन ठिकाणी त्याचे काम चालते. त्याचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे आहारातील कॅल्शियम आतड्यांमध्ये व्यवस्थित शोषून घेणे. आपल्या रक्तातील कॅल्शियमची पातळी स्थिर ठेवण्यात त्याचा मोठा वाटा आहे. (क्रमशः) ******************************* पूर्वप्रसिद्धी : दै. सकाळ, पुणे .
वर्गीकरण
लेखनप्रकार

42 टिप्पण्या 46,405 दृश्ये

Comments

दीपक११७७ नवीन

नेहमी प्रमाणे हा भाग पण छान झाला आहे.

अनिंद्य नवीन

In reply to by दीपक११७७

+ १ हे जीवनसत्व डबाबंद पावडर / गोळ्या इत्यादी स्वरूपात प्रभावी नसते त्यामुळे याच्यावर संशोधन करण्यास औषधी कंपन्या फारश्या उत्सुक नसतात असे वाचले आहे, कितपत खरे आहे ?

एस नवीन

'ड' जीवनसत्त्वाविषयी हल्ली बरेच संशोधन होत आहे आणि बरीच नवीन माहिती पुढे येत आहे. एकंदरीत सामान्य व्यक्तींसाठी गोंधळाची परिस्थिती म्हणावी लागेल. याविषयी विस्तृत लिहा ही विनंती.

हेमंतकुमार नवीन

सर्वांचे मनापासून आभार! अनिंद्य, प्रभावी नसते असे नाही म्हणता येणार. बाजारातील brand नुसार त्या औषधरूपाची क्षमता ठरते. अलीकडे असा मतप्रवाह आहे की रोगप्रतिबंधासाठी ‘ड’ हे आहारातून घेतलेले अधिक चांगले. पण रोग तीव्र असेल तर औषधरुपात दयावे लागते. एस, लेखाच्या उत्तरार्धात ते सर्व येणार आहे, काळजी नसावी.

लई भारी नवीन

अजून एका चांगल्या विषयाबद्दल विस्तृत माहिती देत असल्याबद्दल आभार.

निशाचर नवीन

छान माहिती. पुभाप्र अवांतरः UV साठी नीलातीत हा शब्दप्रयोग माहित नव्हता, अतिनील माहित आहे.

हेमंतकुमार नवीन

वीणा व निशाचर, नियमित प्रतिसादाबद्दल आभार. नीलातीत >>>>> ‘अति’ पेक्षा ‘अतीत’ हा ultra साठी योग्य शब्द वाटतो. हा जालकोशात आहे. तसेही ‘नीलातीत’ नादमधुर आहे !

Nitin Palkar नवीन

In reply to by हेमंतकुमार

१९६६ - ६७ साली सहावी,सातवीत असणाऱ्या मुलांना सामान्य विज्ञानाच्या पुस्तकांत 'सूर्य प्रकाशातील अतिनील किरणे' असा शब्दप्रयोग होता. त्या वेळेस अणू आणि रेणू होते कालांतराने ते रेणू आणि परमाणू झाले....असो. वैज्ञानिक संज्ञांमध्ये नादमाधुर्यापेक्षा अचूक अर्थ अधिक महत्वाचा. लेख नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण आहे. पुभाप्र.

सुमीत भातखंडे नवीन

माहितीपूर्ण लेख

खिलजि नवीन

छान माहितीपूर्ण लेख डॉक्टर साहेब . धन्यवाद . अशा उपयुक्त लेखमालिकांमुळे आपण एक प्रकारे समाजप्रबोधनाचेच कार्य करत आहात . सिद्धेश्वर विलास पाटणकर

झेन नवीन

उपयोगी माहितीपुर्ण धागा. सहजसोपी मांडणी. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

हेमंतकुमार नवीन

झेन व नितीन, अभिप्रायाबद्दल आभार. वैज्ञानिक संज्ञांमध्ये नादमाधुर्यापेक्षा अचूक अर्थ अधिक महत्वाचा. >>>> अगदी बरोबर ! तसे infrared चे अवरक्त हे भाषांतर फारसे मनाला भिडत नाही. कोणी अजून छान शब्द सुचवेल का ?

चौकटराजा नवीन

आजच्या सकाळ मध्ये तुमचा लेख आला आहे का ?

हेमंतकुमार नवीन

होय, तो या लेखाचा उत्तरार्ध आहे. लवकरच तो मिपावर घेईन. आभार !

माहितगार नवीन

माझ्या या धागा लेखाचा अंशतः 'ड' जिवनसत्वाशी येतो पण त्या लेखात फारशी चर्चा होऊ शकली नाही, एनीवे 'ड' जीवनसत्वा अभावी होणर्‍या परिणामा बाबत हा ७ जूनचा टाईम्स ऑफ ईंडिया वृत्त दुवा

सप्तरंगी नवीन

तुमचे लेख नेहमीच उत्तम असतात. तुम्ही मॅग्नेशियम, कॅल्शिअम intakeबद्दलसुद्धा कुठे लिहिले आहे का? असल्यास लिंक द्याल pls

palambar नवीन

सध्या हा अगदी माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, सहा महिन्यापूर्वी जिना उतरतांंना अचानक गुडघा फिरल्यासारखा झाला व चालता येईना, डाॅॅक नी सांंगितले, डी, बी12व कॅॅल्शिअम तिन्हीची कमतरता आहे, मग आधी इंंजक्शनचा कोर्स करावा लागला.

हेमंतकुमार नवीन

साधारण पन्नाशी नंतर बऱ्याच जणांना हा त्रास होतो. तुमच्या उपचारांचा फायदा कसा आहे ते बघा: १. ब १२ हाडातील अस्थीजनक पेशींना मजबूत करेल. २. 'ड' आहारातील कॅल्शियम चे शोषण वाढवेल आणि ३. कॅल्शियम हाडांना मजबूत करेल. असा सुरेख त्रिवेणी संगम आहे !

कालिंदी नवीन

तुम्हि व्यवस्थित आढावा घेतला आहे. फक्त , हया विधानात थोडी भर घआलावी असे सुचवीन."‘ड’ भरपूर तयार होण्यासाठी त्वचेचा जास्तीत जास्त भाग उघडा असायला हवा. त्यावर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंतचे उन किमान २० मिनिटे पडणे आवश्यक असते. या वेळेतील उन्हात नीलातीत किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते." २० मि. कॉकेशिअन (गोर्‍या वंशासाठी). भारतीय त्वचेसाठी त्याच्या दुप्पट ते तिप्पट म्हणजे ४५ मि ते १ तास एवढा वेळ लागेल. त्वचेतील मेलॅनिन चे प्रमाण जितके ज्यास्त तितका हा वेळ वाढत जाइल कारण मेलॅनिन हे नैसर्गिक सन्स्क्रीन आहे जे अतिनिल किरणांना अटकाव करते. संदर्भः Vitamin D and Child Health in the 21st Century NARENDRA RATHI AND *AKANKSHA RATHI

charming atheist नवीन

UV penetration च्या बाबतीत गोरा रंग आणि भारतीय रंग असे वर प्रतिसादात वाचले.तो अगदी योग्य मुद्दा होता. पुरुषांची त्वचा स्त्रीयांपेक्षा जास्त जाड असते(३०%) त्यामुळे पुरुषांना जास्त वेळ उन्हात काढावा लागेल असे माझ्या मंदबुद्धीला वाटत आहे. स्त्रीयांसाठी जो वेळ ४५ मिनिटे आहे तो पुरुषांसाठी ६० मिनीटे असू शकतो. vitamin D poisoning विषयी ऐकले होते ,ते काय आहे ? पुढल्या भागात येणार आहे का?

हेमंतकुमार नवीन

तो अनुक्रमणिकेतून पाहता येईल. तुम्ही म्हणता त्याला poisoning नाही म्हणत; त्याला Hyper vitaminosis D म्हणतात. त्यात Caचे अतिरिक्त शोषण होऊन त्याची रक्तपातळी वाढते. परिणामी मुतखडे इ होऊ शकते.

विश्वजित रामदास जाधव नवीन

ड जीवनसत्वासाठी कोवळ्या उन्हात बसावे (सकाळी १० पर्यन्त आणि सन्ध्याकाळी ५ नन्तरचे उन्ह) असे नेहमी ऐकत आलोय. वैयक्तिक मला, कोवळे उन्ह घेणे किन्वा जास्त वेळ घेणे शक्य आहे. कोवळे उन्ह आणि ११ ते ३चे उन्ह, यातला फरक, फायदेतोटे समजले तर बरे होईल. धन्यवाद! वयानुसार उन्हाची जास्त फायदेशीर वेळ, असे काही असते का?

हेमंतकुमार नवीन

In reply to by Yesnee

दुपारी ११ ते २ या वेळेतील उन्हात नीलातीत- ब (UV-B) या प्रकारच्या किरणांचे प्रमाण जास्त असते. म्हणून ही वेळ फायदेशीर. युरोपीय वंशाच्या त्वचेला रोज वीस मिनिटे पुरे, पण आपल्यासारख्या त्वचेला 30 ते ४० मिनिटे वेळ असावा.

चामुंडराय नवीन

मश्रुम स्लाइस करून कडक उन्हात वाळवायचे आणि त्याचे सूप करून प्यायचे असा डी जिवनसत्वासाठी उपाय एका ठिकाणी वाचण्यात आला. हे खरे आहे का?

हेमंतकुमार नवीन

In reply to by चामुंडराय

सहमत. shiitake हा कच्चा मशरूमचा विशिष्ट प्रकार औषधी म्हणून पूर्व आशियात प्रसिद्ध आहे. त्यात चांगले ‘ड’ असते. ते बऱ्यापैकी वाळल्यानंतर त्यातील ड चे प्रमाण बऱ्यापैकी वाढते. Shiitake मशरूम : चित्र ok