कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
12 Jul 2018 - 9:43 am

‘ब’ गटातले हे जीवनसत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये कोबाल्ट हे मूलद्रव्य असून अशा प्रकारचे ते आपल्या शरीरातील एकमेव संयुग आहे. त्याचा शोध १९४८ मध्ये लागला आणि त्यानंतर जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत एकाचीही भर पडलेली नाही. निसर्गातील विशिष्ट जीवाणूच ते तयार करू शकतात. आपल्या मोठ्या आतड्यांत तसे काही उपयुक्त जीवाणू असतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला थोडे ब-१२ मिळते. अर्थात तेवढ्याने आपली गरज भागू शकत नसल्याने आपल्याला ते आहारातूनही घ्यावे लागते.

ब-१२ चे आहारस्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाची कारणे व परिणाम यांचा आढावा लेखात घेतला आहे.

आहारस्त्रोत:
ब-१२ चे बाबतीत एक मूलभूत गोष्ट म्हणजे कुठल्याही वनस्पतीत ते नसते. पण, जर पालेभाज्या सेंद्रिय शेतीतून निर्माण केल्या तर त्यांच्यात काही उपयुक्त जीवाणू राहतात आणि त्यांच्या माध्यमातून या भाज्यांत ब-१२ येते. तसेच शिळ्या अन्नातही जीवाणूंची वाढ होते आणि अशा अन्नसेवनातून ते आपल्याला मिळू शकते.

प्राणिज पदार्थ मात्र भरपूर ब-१२ पुरवतात. यकृत, अंडे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे त्याचे महत्वाचे स्त्रोत.
यीस्ट हाही एक त्याचा वैशिष्ट्यपूर्ण स्त्रोत. त्याचा वापर करून बनवलेले शाकाहारी पदार्थ हा अशा लोकांसाठी दिलासा असतो. ‘व्हेगन’ खाद्यशैलीतून मात्र ते मिळणे अवघड असते. अलीकडे ब-१२ ने ‘संपन्न’ केलेली काही खाद्यान्ने बाजारात मिळतात.

ब-१२ चे पचनसंस्थेतून शोषण:
हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. अन्नातले ब-१२ प्रथिनांशी घट्ट संयोग झालेले असते. प्रथम ते जठरात येते. तिथल्या हायड्रोक्लोरिक आम्ल आणि एन्झाइमच्या मदतीने ते सुटे केले जाते. नंतर तिथले IF नावाचे एक प्रथिन त्याच्याशी संयुग पावते. ही एक आवश्यक क्रिया आहे. पुढे हे संयुग लहान आतड्यांतून मार्गक्रमण करीत आतड्याच्या शेवटच्या भागात पोचते. तिथे त्याचे विघटन होऊन ब-१२ शोषले जाते. पुढे ते रक्तप्रवाहातून यकृतात पोचते आणि तिथे त्याचा मोठ्या प्रमाणात साठा होतो. पुढे ते गरजेनुसार सर्व शरीराला पोचवले जाते.

शरीरातील कार्य :
अन्य ‘ब’ जीवनसत्वांप्रमाणेच तेही काही रासायनिक क्रियांमध्ये सह-एन्झाईमचे काम करते.
याद्वारे ते पेशींतील DNA व RNA या मूलभूत रेणूंच्या उत्पादनात मदत करते. याकामी त्याला फोलिक अ‍ॅसिड या अन्य ‘ब’ जीवनसत्वाचीही मदत होते.
मज्जातंतूंच्या कामातही त्याचे महत्वाचे योगदान आहे.

अलीकडील संशोधनातून त्याचा हाडांच्या आरोग्यासाठीही संबंध असल्याचे दिसले आहे. ते अस्थिजनक पेशींच्या योग्य वाढीसाठी मदत करते.

अभावाची कारणे:
१. अतिशुद्ध शाकाहारी (व्हेगन) खाद्यशैली: गेल्या दोन दशकांत हा खूप कुतूहलाचा व चर्चेचा विषय झालेला आहे. येथे काही मुद्दे लक्षात घ्यावेत. सहसा जन्मल्यापासून कुणीच अशी शैली आचरत नाही. तेव्हा तथाकथित ‘शाकाहारी’ हे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खात असतात आणि त्यातून ब-१२ मिळते. त्याची रोजची गरज काही मायक्रोग्रॅम इतकीच आहे. वर आपल्या यकृतात त्याचा भरपूर साठा होत असतो. साधारणपणे हा साठा आपल्या ५ वर्षांच्या गरजेइतका असतो. तेव्हा व्हेगन शैली आचरणात आणल्यानंतर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील.

२. जठरातील पेशींची वयानुरूप झीज होते आणि त्यामुळे वृद्धांमध्ये IF चे उत्पादन कमी होऊ लागते. तसेच अन्य काही आजारांमध्येही अशी झीज होते.

३. पचनसंस्थेचे काही आजार : यांत ब-१२ चे शोषण नीट होत नाही.
४. IF ची अनुवांशिक कमतरता : हा ऑटोइम्युन प्रकारातील आजार आहे.

५. अलीकडे लठ्ठपणा कमी करण्यासाठी पचनसंस्थेवर काही शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यात जठराचा काही भाग काढून टाकला जातो. त्यामुळे IF चे प्रमाण खूप कमी होते आणि त्याचा परिणाम ब-१२ चे शोषणावर होतो.

अभावाचे परिणाम:
शरीरातील सर्वच पेशींच्या वाढीवर परिणाम होतो परंतु, तो लालपेशी आणि मज्जासंस्थेवर प्रकर्षाने दिसून येतो. रुग्णात साधारण खालील लक्षणे दिसतात:

१. रक्तक्षय आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा: हा रक्तक्षय लोहाच्या कमतरेतून होणाऱ्यापेक्षा वेगळ्या प्रकाराचा असतो. यात लालपेशी मोठ्या आणि विचित्र आकाराच्या होतात.

२. हातापायांना ‘मुंग्या’ येणे आणि चालताना अस्थिर वाटणे: मज्जारज्जू व मज्जातंतूवर दुष्परिणाम झाल्याने हे होते.
३. काही रुग्णांत मनस्वास्थ्य बिघडू शकते आणि विस्मरण होते.
वृद्धावस्थेत हाडे ठिसूळ होणे.

वृद्धावस्था आणि ब-१२ चा पुरवठा:
या अवस्थेत जठराची पचनशक्ती बरीच कमी झालेली असते. त्यामुळे नैसर्गिक आहारातील ब-१२ शरीरात नीट शोषले जात नाही. याउलट ‘संपन्न’ खाद्यांतले अथवा गोळ्यांच्या रुपातले ब-१२चे व्यवस्थित शोषण होते. त्यामुळे अशा स्त्रोतांचा वापर वृद्धांमध्ये गरजेनुसार जरूर करावा.

ब-१२ ची रक्तपातळी :

अलीकडे ही पातळी चाळणी चाचणी म्हणून बरीच चर्चेत असते. पण या चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. पण अशा सरसकटीकरणाला तसा अर्थ नाही.
***************************

आरोग्यजीवनमान

प्रतिक्रिया

व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न या धाग्यावर मागे बर्‍यापैकी चर्चा झाली होती तो दुवा संदर्भार्थ.

कुमार१'s picture

12 Jul 2018 - 10:06 am | कुमार१

मा. सा. सं,
हा लेख जीवनसत्व-मालिकेस जोडावा ही वि.
धन्यवाद
माहितगार, आभार. बघतो.

अनुप ढेरे's picture

12 Jul 2018 - 12:32 pm | अनुप ढेरे

मला एक शंका आहे. आपल्याला महिती नाहीत/सापडली नाहीत अशी व्हिटामिन्स असण्याची शक्यता किती? आजकाल व्हिटामिन्सच्या गोळ्यांनी सर्व विटामिन्स मिळतील असं म्हटलेलं वाचलं जातं. जर आपल्याला माहिती नाहीत अशी व्हिटामिन्स असतील तर गोळ्यांवर अवलंबुन रहाणं धोक्याचं असेल असं वाटतं.

कुमार१'s picture

12 Jul 2018 - 1:03 pm | कुमार१

अनुप, चांगला प्रश्न.
१९४८ मध्ये ब-१२ च्या शोधानंतर कुठल्याही पदार्थाला जीवनसत्वाचा दर्जा दिला गेलेला नाही. तरीसुद्धा किमान एक डझन पदार्थ तरी या प्रतीक्षा यादीत नंबर लावून आहेत ! सध्या त्यांना “जीवनसत्वासारखे” इतपत म्हटले जाते.

आता जीवनसत्वे आहारातून आणि गोळ्यांतून हा मुद्दा.
आहारातून कधीही श्रेष्ठ.
आहारातून जेव्हा तुम्ही एखादे जीवनसत्व घेता त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित त्याच जातकुळीतले इतर पदार्थ (Vitamers) सुद्धा मिळतात.

उलट गोळीतून मिळणारे जीवनसत्व हे ‘शुद्ध’ एकच रसायन असते. तेव्हा एकूण पचन उत्तम असेल व वृद्धावस्था वगळता आहारच उत्तम.
विशिष्ट परिस्थितींत (गर्भावस्था, तान्हुलेपण, इ.) गरज खूप असते तेव्हा तेवढ्यापुरत्या गोळ्या द्याव्यात.

अभावाचा आजार असता मात्र गोळ्याच.

अनुप ढेरे's picture

12 Jul 2018 - 1:31 pm | अनुप ढेरे

धन्यवाद!

लई भारी's picture

12 Jul 2018 - 2:41 pm | लई भारी

मालिका चांगली होत आहे. अनुक्रमणिका झाल्यास बरे पडेल.

याउलट ‘संपन्न’ खाद्यांतले अथवा गोळ्यांच्या रुपातले ब-१२चे व्यवस्थित शोषण होते.

म्हणजे आधी आहाराच्या बाबतीत सांगितलेली गुंतागुंत इथे लागू नाही का?

वरती सांगितलेला 'आहारातून कधीही श्रेष्ठ.' हा मुद्दा अगदी पटला.

माहितगार साहेबांच्या धाग्यातून पण चांगली माहिती मिळाली.

मांसाहारी बद्दल एक डॉक्टर म्हणाले होते कि तुम्ही अगदी दररोज मांसाहार करत असाल तरच तुम्हाला कमतरता असणार नाही, अन्यथा लक्ष ठेवा आणि एकदा कमतरता जाणवल्यावर पहिल्या फेरी नंतर वर्षभराने परत औषध/इंजेक्शन घेणे सोईस्कर. शास्त्रीय दृष्ट्या अगदी बरोबर नसेल पण ढोबळमानाने 'आपण मांसाहारी म्हणजे बी-१२ ची कमतरता नाही' असा समज करून घेऊन नये.
टेस्टचा खर्च पाहता, हे व्यावहारिक वाटते. डॉ. खरे यांनी पण वरील धाग्यात हाच मुद्दा सांगितला होता.

मंजूताई's picture

12 Jul 2018 - 2:48 pm | मंजूताई

नेहमीप्रमाणे उपयुक्त लेख ! डाॅ तुम्ही म्हणता कुठलही जीवनसत्वे आहारातून घेणे योग्य आहे आणि शिळ्या अन्नातून मिळतं .... ह्यावर सविस्तर लिहा खासकरून जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी....

कुमार१'s picture

12 Jul 2018 - 2:57 pm | कुमार१

म्हणजे आधी आहाराच्या बाबतीत सांगितलेली गुंतागुंत इथे लागू नाही का? >>> पुन्हा एकदा बघा. तरुण व्यक्ती, पचन उत्तम अशा वेळी आहार उत्तम. पण म्हातारपण, त्यामुळे होणारी जठराची झीज यांत अन्नातले ब-१२ शोषले जात नाही. त्यांनाच कृत्रिम पर्याय.

शिळ्या अन्नातून मिळतं .. >>> यात जीवाणूंची वाढ होते जे ब -१२ तयार करतात. त्यातून काही प्रमाणात मिळेल. दुग्धजन्य खात असल्यास फार चिंता नको. रोजची गरज अवघी २-३ मायक्रोग्रॅम आहे.

श्वेता२४'s picture

12 Jul 2018 - 3:42 pm | श्वेता२४

तेव्हा तथाकथित ‘शाकाहारी’ हे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खात असतात आणि त्यातून ब-१२ मिळते. त्याची रोजची गरज काही मायक्रोग्रॅम इतकीच आहे. वर आपल्या यकृतात त्याचा भरपूर साठा होत असतो. साधारणपणे हा साठा आपल्या ५ वर्षांच्या गरजेइतका असतो. तेव्हा व्हेगन शैली आचरणात आणल्यानंतर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील.
जर माझ्या रोजच्या आहारात दुध, ताक, दही, हे कम्पल्सरी असंलच तर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील का

कुमार१'s picture

12 Jul 2018 - 4:39 pm | कुमार१

ती लक्षणे व्हेगन च्या बाबतीत म्हटले आहे. हे लोक दूध सुद्धा घेत नाहीत.
तुम्ही दुग्धजन्य शाकाहारी असणार, तेव्हा चिंता नको.

श्वेता२४'s picture

12 Jul 2018 - 4:44 pm | श्वेता२४

व्हेगन ही संकल्पना स्पष्ट करुन सांगाल का

अनुप ढेरे's picture

12 Jul 2018 - 4:59 pm | अनुप ढेरे

ते लोक कोणतेच प्राणीज पदार्थ खात नाहीत. मांस/अंडी तर नाहीच पण दुधाचे पदार्थदेखील खात नाहीत. मधपण खात नाहीत बहुधा.

कुमार१'s picture

12 Jul 2018 - 5:42 pm | कुमार१

या निमित्ताने आहारशास्त्रानुसारचे वर्गीकरण लिहितो. ते रोचक आहे. मूळ इंग्लिश शब्द अर्थवाही असल्याने तेही लिहितो:

१. vegan : अतिशुद्ध शा. हे फक्त भाजीपालाच खाणार.

२. Lactovegetarian ; दूध पिणारे शा.

३. Ovovegetarian : अंडे खाणारे शा.

४. Lactoovovegetarian : दूध व अंडे दोन्ही खाणारे शा.

श्वेता२४'s picture

13 Jul 2018 - 11:08 am | श्वेता२४

आपणा दोघांनाही धन्यवाद!

अनन्त्_यात्री's picture

12 Jul 2018 - 4:58 pm | अनन्त्_यात्री

कर्करोग विरोधी क्षमतेबद्दल बरेच उलटसुलट दावे
ऐकून आहे. एका वेगळ्या धाग्यातून याबद्दल व्यापक माहिती देण्याचा विचार करावा.

कुमार१'s picture

12 Jul 2018 - 5:34 pm | कुमार१

“ब-१७” हे अजिबात अधिकृत जीवनसत्व नाही. त्याच्या कर्करोगातील उपयुक्ततेबाबत उलटसुलट मते आहेत. एका अमेरिकी आहार संघटनेने तर ते धुडकावून लावले आहे.
तेव्हा माझ्या मते त्यावर चर्चा नको.

नाखु's picture

12 Jul 2018 - 7:32 pm | नाखु

उत्तम परिचय लेखमाला,

आरोग्याभिलाषी नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2018 - 7:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे लेखमाला. मिपाकरांचे प्रतिसाद आणि चर्चा पाहता, बर्‍याच जणांना या विषयात रस आहे आणि खूप जणांना उपयुक्त... आणि मुख्य म्हणजे खात्रीशीर... माहिती मिळत आहे.

हा स्पृहणिय उपक्रम असाच चालू ठेवा.

कुमार१'s picture

12 Jul 2018 - 8:01 pm | कुमार१

तुमच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनाबद्दल आभार !
चर्चेत सहभागी सर्वच सदस्यांचेही आभार.

सोमनाथ खांदवे's picture

13 Jul 2018 - 9:21 am | सोमनाथ खांदवे

' ब-१२ ची रक्तपातळी :
अलीकडे ही पातळी चाळणी चाचणी म्हणून बरीच चर्चेत असते. पण या चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. पण अशा सरसकटीकरणाला तसा अर्थ नाही '

वेगवेगळे निष्कर्ष येण्याचे कारण प्रत्येक ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या मशीन्स हे होय , आणि त्या मशीन्स प्रमाणीकरण करण्याची कुठलीही पद्धत आपल्याकडे तरी अस्तित्वात नाही .
रस्त्यावर शेकडो पंचर वाले हातातील गेज मीटर ( +/ - २० दाखवू शकतो ) ने आपल्या गाडीतील हवा चेक करत असतो आणि बरेचसे लोक त्या गेज मीटर वर विश्वास ठेवून ( जीव धोक्यात घालून ) गाड्या हाकत असतात .त्यातलाच प्रकार आहे हा .

सुबोध खरे's picture

13 Jul 2018 - 9:42 am | सुबोध खरे

त्या मशीन्स प्रमाणीकरण करण्याची कुठलीही पद्धत आपल्याकडे तरी अस्तित्वात नाही .
हि वस्तुस्थिती नाही.
कारण कोणत्याही रक्त निदान यंत्राचे प्रमाणीकरण अतिशय सोपे आहे. बी १२ जीवनसत्व असलेला प्रमाणित द्रव standardised solution उदा. एका मिलिलिटर मध्ये १० मायक्रोग्रॅम जीवनसत्व असलेला या यंत्रात तपासला जातो.
त्यात समजा ९ मायक्रोग्रॅम जीवनसत्व आढळले तर ते यंत्र परत जुळवले जाते ( adjust) आणि परत हा १० मायक्रोग्रॅम असलेल्या प्रमाणित द्रवाची चाचणी घेतली जाते. हि चाचणी अचूक येईपर्यंत असे यंत्राचे प्रमाणीकरण केले जाते.
NABL (National Accreditation Board for Laboratories) या राष्ट्रीय प्रमाणीकरण संस्थेच्या मानकाप्रमाणे प्रत्येक १०० चाचण्यांनंतर असे प्रमाणीकरण आवश्यक आहे. असे accreditation करून घेण्यासाठी त्या निदान केंद्राला फार कठीण परीक्षेतून जायला लागते.
हा प्रमाणित द्रव महाग असतो शिवाय हा चाचणी संच( test kit) पण महाग असतो. यामुळे या चाचण्या महाग असतात.

आपल्याला कोणत्याही रक्त चाचणीचे निदान अचूक हवे असेल तर या चाचण्या NABL accredited laboratory मधून करून घ्याव्यात.

कुमार१'s picture

13 Jul 2018 - 10:02 am | कुमार१

दोन "कोपर्‍यावरच्या प्रयोगशालांचे" निष्कर्ष जुळणार नाहीत. तसेच या पद्धतींत सतत नवे संशोधन होत असते. त्यामुळे प्रगत देशातली अत्याधुनिक आणि आपल्याकडची पद्धत यानुसारही फरक पडतो.

सोमनाथ खांदवे's picture

13 Jul 2018 - 10:40 am | सोमनाथ खांदवे

म्हणजे त्या प्रमाणित द्रवा मूळे विश्वास ठेवायला जागा आहे . आपल्या कडे अचूक निदान होऊ शकते पण नेहमी प्रमाणे ते तंत्रज्ञान ग्राऊंड लेव्हल वर उपलब्ध नाही अशी शक्यता वाटते . म्हणजेच मध्यमवर्गीय व गरीब जमात यांच्या रक्तचाचण्या निष्कर्षा मध्ये मटकेबाजी फुल ला वाव आहे . ग्राहकांच्या जीवा ची काळजी घेणारे वजन माप खाते स्वतःची कुठलीही लॅब नसतांना फुड प्रोसेसिंग कारखान्याच्या मशिनरीज चे धडाधड दरवर्षी नुतनीकरण प्रमाणपत्र देत असतच की .

सुबोध खरे's picture

13 Jul 2018 - 11:38 am | सुबोध खरे

साधारण पणे NABL accredited laboratory अशा भंपक गोष्टी करणार नाही. कारण एवढ्या कष्टाने मिळवलेले आपले प्रमाणीकरण( accreditation) घालवणे त्यांना परवडणार नाही. परंतु आपली भारतीय मनोवृत्ती अशी आहे कि अशी प्रमाणित प्रयोगशाळा महाग आहे म्हणून कोपर्यावरची कुणी तरी टाकलेली प्रयोगशाळाच बघा म्हणजे स्वस्तात काम होईल.

माहितगार's picture

13 Jul 2018 - 3:18 pm | माहितगार

मला वाटते कोपर्‍यावरच्या प्रयोगशाळातही प्रमाणित आणि रास्त दरात चाचण्या उपलब्ध करुन दिल्या जाण्यास हरकत नसावी. मेडीकल स्टोअर्स पर्यंत नियंत्रणे आणली जाऊ शकतात तर शासकीय यंत्रणांनी सर्व प्रयोगशाळा प्रमाणितच असतील याची खबरदारी घ्यावयास हवी.

अर्थात तुमचे म्हणणेही बरोबर आहे, मी माझ्या एका कोपर्‍यावरच्या केंद्रास भेट दिली तर तेथील रक्त घेणारा मुलगा चक्क अनट्रेन्ड होता !

सुधीर कांदळकर's picture

13 Jul 2018 - 7:57 pm | सुधीर कांदळकर

लेख आवडलाच. नेहमीप्रमाणे माहितीत भर टाकणारा लेख.

१. वजने मापे खाते हे मुख्यता ग्राहक कायद्याखाली तयार उत्पादनाच्या वजनमाप प्रमाणासाठी आहे. बरोबर दहा गोळ्या किंवा १०० मिली व्गैरे औषध आहे की नाही एवढीच पूर्तता असते.
२. औषध उत्पादक कारखान्यात चाचणी यंत्राचे कॅलिब्रेशन हे कारखान्यातलाच क्यूसी वा क्यूए चा सरकारमान्यताप्राप्त तांत्रिक अधिकारी =अ‍ॅप्रूव्हड टेक्निकल स्टाफ करतो. त्यासाठी स्टॅन्डर्ड सोल्यूशन बनवण्यासाठी वापरायचे रसायन (इथे - बी१२) हे सरकारमान्य प्रयोगशाळेतून मागवावे लागते. फक्त पुणे, अहमदाबाद, कलकत्ता इ. मोजक्याच ठिकाणी या प्रयोगशाळा आहेत. हे कॅलिब्रेशन किमान दरवर्षी करून त्याचे अभिलेख तसेच स्टॅन्डर्ड रसायनाचा हिशेबही ठेवावा लागतो व ते फक्त कॅलिब्रेशनसाठीच वापरायचे असते. ड्रग्ज आणि कॉस्मेटीक्स अ‍ॅक्ट आणि त्याखालील अधिनियमांनुसार हे प्रोटोकॉल्स ठेवावे लागतात. कारखान्याच्या स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसीजरमध्ये तसा याचा उल्लेख असतो. सोबत गॅरट, मार्टींडेल इ. संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. यात गडबड झाल्यास कारखान्याचा मान्यताप्राप्त तांत्रिक अधिकारी जबाबदार असतो. सरकारी ड्रग इन्स्पेक्टर दरवर्षी किमान एकदा प्रत्येक कारखान्याचे तपासणी निरीक्षण करतो व पृष्ठांकित तीन प्रतीच्या निरीक्षण नोंदवहीत नोंदी करतो. नोंदीखाली निरीक्षकाच्या सहीसोबत कारखान्याच्या तांत्रिक अधिकार्‍याची देखील सही असते. जेणेकरून कारखाना ती निरीक्षणे नाकारू शकत नाही. मागील तृटींच्या पूर्ततेचा आढावा घेऊनच नव्या तपासणी निरीक्षणास सुरुवात करतो. बाजारातून विविध औषधांचे नियमितपणे नमुने घेऊन सरकारी प्रयोगशाळेत तपासले जातात. तपासणीत गडबड आढळल्यास औषध निरीक्षकाला तो औषधविभाग ताबडतोब बंद करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळेच बाजारातील औषधात सहसा गडबड आढळत नाही.

सोमनाथ खांदवे's picture

13 Jul 2018 - 9:12 pm | सोमनाथ खांदवे

सुधीर साहेब ,
थोडं विषयांतर होईल पण , पॅक केलेल्या बिस्कीट च्या वेष्टनावर त्या वस्तू च्या वजनात टोटल किती calcium , calories , fat , iron व्हिटॅमिन्स ब1 पासून ब12 , folic acid वैगेरे चें प्रमाण छापलेले असते तर मला नेहमी प्रश्न पडतो की तो बिस्कीट चा पुडा लॅब मध्ये पाठवून वरील सर्व प्रमाण चेक करता येत का ? लॅब मध्ये तशा सुविधा असतात का ?.
तसच औषधी गोळ्यांचे छापलेले कंटेंट्स त्या पाकिटातील गोळ्या काढून त्यातील कंटेंटस लॅब मध्ये चेक करता येतात का ? म्हणजे ती वस्तू बाजारात आल्यानंतर तपासण्याची सोय असते का ?.
मध्यंतरी स्कोडा कंपनी ने त्याच्या गाडी च्या सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी फेरफार करून विकल्या होत्या , त्या गाड्या प्रदूषण चाचणीत ओके दिसायच्या पण वास्तवता खूप प्रदूषण करायच्या म्हणून स्कोडा ला करोडो डॉलर्स चा दंड भरावा लागला , अशी काहीतरी केस वाचनात आली होती तेव्हां पासून पॅक वस्तू
च्या न्युट्रीशिएन माहिती बद्दल त्या वस्तूवर किती विश्वास ठेवावा प्रश्न पडतो .

ECG करताना छातीवर ज्या वायरी चिकटून ठेवतात त्यातील काही loose aahet he सांगून सुद्धा दुर्लक्ष करून report दिला गेला तर report मध्ये heart मध्ये प्रॉब्लेम आहे असा निष्कर्ष निघाला मी परत दुसऱ्या लॅब

मध्ये सर्व वायर फिट बसवण्याचा हट्ट थरला आणि report normal आला

कुमार१'s picture

13 Jul 2018 - 8:09 pm | कुमार१

तुमचेही सखोल विवेचन आवडले.

मार्कस ऑरेलियस's picture

13 Jul 2018 - 8:54 pm | मार्कस ऑरेलियस

ते अस्थिजनक पेशींच्या योग्य वाढीसाठी मदत करते.

ह्या विषयी थोडी अजुन माहीती हवी आहे !
मी अ‍ॅक्टीव्हली जिम करत होतो तेव्हा व्हे प्रोटीन रेकमेन्ड केले होते जिम ट्रेनर ने ( शरीराच्या वजनाच्या प्रति किलो ला एक ग्रॅम )
पण दुसर्‍या मित्राने सांगितले की शरीरात व्हिटॅमिन बी नसेल तर प्रोटीन डायजेस्ट होणार नाहीच, प्रोटीन अ‍ॅब्सॉर्प्शन आणि मसल रिक्व्हरी साठी काही व्हिटॅमिन बी घेणे आवश्यक आहे ! बीकोस्युल किंव्वा तत्सम काही.
हे कितपत सत्य आहे ? खरे असल्यास अ‍ॅक्टीव्ह वर्काऊट करत असतना ( म्हणजे आठवड्यातील ५-६ दिवस नित्यनेमाने १ ते दीड तास स्ट्रेचनस वर्काऊट) किती व्हिटॅमिन बी घेणे आवश्यक आहे ?

बी व्हिटॅमिन कमी पडत असल्याची किंव्वा जास्त झाल्याची लक्षणे कोणती ? ( नखाच्या इथली सालं निघणे आणि तोंड येणे ही डिफिशियन्शी ची लक्षणे आहे असे ऐकुन आहे हे खरे आहे का ? )

सुबोध खरे's picture

14 Jul 2018 - 10:19 am | सुबोध खरे

मी अ‍ॅक्टीव्हली जिम करत होतो तेव्हा व्हे प्रोटीन रेकमेन्ड केले होते जिम ट्रेनर ने

व्हे प्रोटीन हे साध्या दुधापेक्षाकिंवा कोणत्याही प्रथिन युक्त अन्न पदार्थापेक्षा जास्त चांगले आहे या विधानाला कोणताही शास्त्रीय पुरावा मला तरी आढळलेला नाही.
(आमच्या बायकोला तिच्या जिमच्या इन्स्ट्रक्टर ने ५०० रुपयाला चुना लावला ते पाहून माझे डोके ठणकले होते म्हणून मी बऱयापैकी वाचन केले होते)

कारण मुळात कोणतेच प्रथिन हे तसेच्या तसे शरीरात शोषले जात नाही. त्याचे मूळ अमायनो ऍसिड मध्ये पचन होणे आवश्यक आहे. व्हे प्रथिन पचायला हलके आहे असेही नाही.

मग सर्वत्र जिम मध्ये व्हे प्रोटीन घ्या हा आग्रह का होतो याचा विचार करा.

व्हे प्रोटीन हे चीज तयार करताना बाकी राहिलेल्या टाकाऊ द्रव पदार्थात (WASTE PRODUCT) असलेले प्रथिन आहे. Whey protein is a mixture of globular proteins isolated from whey, the liquid material created as a by-product of cheese production.

कचऱ्यातून कला निर्माण करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी शोधून काढलेला हि एक क्लृप्ति आहे. आणि हे असे प्रथिन दोन हजार ते चार हजार रुपये किलोने विकले जाते आणि हे फक्त जिम मध्ये किंवा त्याचे साहित्य विकणाऱ्या दुकानातच मिळते. कोणताही डॉक्टर आपल्याला हे घ्या म्हणून सांगताना आढळत नाही.
दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये

In 2010 a panel of the European Food Safety Authority examined health claims made for whey protein. For the following claims either no references were provided on the claimed effect, or the provided studies did not test the claims or reported conflicting results:

the claims

Increase in satiety leading to a reduction in energy intake
Contribution to the maintenance or achievement of a normal body weight
Growth or maintenance of muscle mass
Increase in lean body mass during energy restriction and resistance training
Reduction of body fat mass during energy restriction and resistance training
Increase in muscle strength
Increase in endurance capacity during the subsequent exercise bout after strenuous exercise
Skeletal muscle tissue repair
Faster recovery from muscle fatigue after exercise.

On the basis of the data presented, the 2010 panel concluded that a cause and effect relationship between the consumption of whey protein and these claims had not been established.

साधे चणे खाल्ले तरी १०० रुपयात ३८० ग्राम प्रथिने मिळतात(१९ टक्के प्रथिने आणि साधारण ५० रुपये किलो).
आणि व्हे प्रोटीन मध्ये तुम्ही १५०० रुपये मोजता ते सुद्धा टाकाऊ पदार्थातून निर्माण केलेले.

मार्कस ऑरेलियस's picture

14 Jul 2018 - 7:12 pm | मार्कस ऑरेलियस

येस , या विषयीही चर्चा ऐकली आहे पण मग व्हे प्रोटिन्स ला मग पर्याय काय ?
साधारण पणे शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोला एक ग्रॅम प्रोटिन घ्या असेच सगळे सांगतात , तेही मसल्स मेन्टेन करायचे असतील तर . वाढवायचे असतील तर २ ग्रॅम.
मग माझ्या सारख्याला १२५-१५० ग्रॅम प्रोटिन म्हणजे जवळापास २००-२५० ग्रॅम चिकन किंव्वा अंडी खाण्याशिवाय पर्याय काय ? ( पण आजकाल चिकन अंडी खाताना देखील भिती वाटते . इन्डस्टीयल फार्मिंग बेक्कार आहे , वाढीसाठी , अंडी देण्यासाठी हे हरामखोर लोकं प्राण्यांना हार्मोस देतात म्हणे ! )

किंव्वा मग दुध प्या पण दुधात फॅट्स असल्याने परत मस्लस बिल्डींग ला किती उपयोग ? शिवाय गायीलाही हार्मोन्स देत नसतील कशावरुन ? शिवाय नुकतेच ए१ मिल्क ए२ मिल्क हा प्रकार वाचनात आला , हा काय नवीन झोल आहे देव जाणे !

इतर शाकाहारी पदार्थातील प्रोटिन्स शरीराला लागतात का ? कोणतीही डाळीचे पदार्थ खाल्ले थोडे जरी प्रमाणापेक्षा जास्त खल्ले की गॅसेस होतात हा स्वानुभव आहे ! जास्त सोयाबीन खाऊ नका असे आता सगळेच सांगतात .

कोणताही डॉक्टर आपल्याला हे घ्या म्हणून सांगताना आढळत नाही.

हेही खरे आहे , उलट माझ्या माहीतीतील एका आयुर्वेदीक डॉक्टारांनी व्हे प्रोटिन्स घेवु नका असे स्पष्ट सांगितलेले त्याने किडनीवर ताण पडतो , शिवाय त्या प्रोटिन्स मध्ये इतर काय मिक्स केले आहे हे खात्रीलायक सांगता येत नाही म्हणुन.

व्हिटॅमिस च्या धाग्यावर प्रोटीन आणि आहाराची चर्चा हे थोडे विषयांतर होत आहे हे खरे पण हा महत्वाचा विषय आहे म्हणुन विचारत आहे .

कुमार१'s picture

14 Jul 2018 - 7:18 pm | कुमार१

गावरान अंडी मिळवायची व खायची, एवढेच सुचवतो तूर्त.
बाकी प्रत्येकात कटकटी आहेतच

मराठी कथालेखक's picture

17 Jul 2018 - 4:27 pm | मराठी कथालेखक

मला B Protein हे माझ्या physiotherapist नी सुचवले होते. एका अपघातात माझ्या मनगटाचा जोड निखळला होता , त्यावर शस्त्रकिया करुन , प्लेटच्या सहाय्याने निखळलेले भाग जोडले गेलेत. पण नुसत्या शस्त्रक्रियेने हे बरे होत नाहीत त्याकरिता physiotherapy लागते. त्यावेळी physiotherapist ने मला सांध्यातील तंतूंची (आता तिने नेमकं काय सांगितलं ते शब्दा आठवत नाही) झीज लवकर भरुन येण्याकरिता B Protein ची भूकटी सुचवली होती. माझ्या मते मला त्याचा फायदा झाला.

कुमार१'s picture

17 Jul 2018 - 5:51 pm | कुमार१

बऱ्याच उपयुक्त पोषणघटकांचा मस्त 'मसाला' दिसतोय.
त्यात ब १२ आहे की नाही याची माहिती जालावर मिळाली नाही. तुमच्याकडे आहे का ?

मराठी कथालेखक's picture

17 Jul 2018 - 7:10 pm | मराठी कथालेखक

या दुव्यावर अधिक माहिती आहे.
यावरुन तरी b12 नाहीये असे वाटते, तरी एकदा बरणी वरील माहिती वाचून सांगतो.
Calories 6,180 Sodium 31 mg
Total Fat 284 g Potassium 1,540 mg
Saturated 36 g Total Carbs 852 g
Polyunsaturated 58 g Dietary Fiber 114 g
Monounsaturated 171 g Sugars 276 g
Trans 0 g Protein 114 g
Cholesterol 0 mg
Vitamin A 34% Calcium 46%
Vitamin C 16% Iron 293%

कुमार१'s picture

17 Jul 2018 - 7:16 pm | कुमार१

पाहिला होता. ब-१२ दिसत नाही त्यात. असो, तुम्हाला फायदा झाला हे छानच.

मराठी कथालेखक's picture

19 Jul 2018 - 12:26 pm | मराठी कथालेखक

त्यात 30g serving मध्ये 3 mcg B12 आहे.
लवकरच बरणीवरचे आवरण काढून त्याचे छायाचित्र टाकण्याचा प्रयत्न करतो.

कुमार१'s picture

13 Jul 2018 - 9:06 pm | कुमार१

तुमच्या प्रतिसादात बऱ्याच मुद्द्यांची सरमिसळ आहे. एकेक दमाने घेतो
१. "ब" हे मुळात एक जीवनसत्व नसून ते ८ जणांचे कुटुंब आहे.

२. तुमच्या व्यायामासंदर्भात 'ब-१' चा वाटा जास्त आहे. तरुणपणी ते आहारातून घेतले तरी चालेल, गोळ्यांची सक्ती नाही.

३. 'ब-१२ हे म्हातारपणातील हाडांच्या झीजे साठी देतात; तुमच्या बाबत नाही
क्रमशः....

कुमार१'s picture

13 Jul 2018 - 9:30 pm | कुमार१

आता अभावाची लक्षणे बघा:

ब-१ : खूप अशक्तपणा, स्नायू दुःखी
ब-२: तोंड व जीभेचा दाह
ब-१२: हाता पायांना मुंग्या येणे

ब१ वर स्वतंत्र लेख पुढे येईलच. तेव्हा अधिक चर्चा करू.

कुमार१'s picture

13 Jul 2018 - 9:53 pm | कुमार१

अजून एक ..

ब च्या गोळ्या गरजेपेक्षा जास्त खाल्ल्या तर लघवी मस्तपैकी जर्द पिवळी होईल, बाकी काय भ्यायचे काम नाही !

शाम भागवत's picture

13 Jul 2018 - 10:50 pm | शाम भागवत

आमच्या फॅमिली डॉक्टरने (बी ए एम एस) सांगितले की दूध पाश्चराईज्ड केले की त्यातले ब१२ नष्ट होते. हे खर आहे का?

सुबोध खरे's picture

14 Jul 2018 - 9:37 am | सुबोध खरे

दूध पाश्चराईज्ड केले की त्यातले ब१२ नष्ट होते.
During the pasteurization process there is a minimal loss (approximately 10%) of thiamine and vitamin B12. But because losses are small in comparison to the large amounts of the B vitamins in milk, milk is still considered a source of these nutrients.
About 20% of vitamin C is lost during pasteurization, but this loss is not nutritionally significant since milk is not an important source of vitamin C to begin with.
https://www.dairynutrition.ca/facts-fallacies/product-quality/raw-milk

कुमार१'s picture

14 Jul 2018 - 9:41 am | कुमार१

दूध पाश्चराईज्ड करतात ते तापमान 63 Cअसते. त्यामुळे ब 12 चे फारसे नुकसान होणार नाही.

शाम भागवत's picture

27 Jul 2018 - 8:23 am | शाम भागवत

मी शाकाहारी असल्याने माझा दुधावर भरवसा होता. तो तुमच्यामुळे परत प्रस्थापित झाला.
डॉ. सुबोध खरे व तुम्हाला धन्यवाद.

कुमार१'s picture

27 Jul 2018 - 8:28 am | कुमार१

शाकाहार आरोग्यासाठी चांगलाच असतो. सर्व पोषणघटक मिळतात.
अतिशुद्ध शाकाहार मात्र टोकाचे पाऊल वाटते.

सुधीर कांदळकर's picture

14 Jul 2018 - 6:34 am | सुधीर कांदळकर

@ खांदवेसाहेबः बिस्कीटचा पुडा वा बहुतेक सर्वसामान्य खाद्यपदार्थ हे ड्रग्ज अ‍ॅन्ड कॉस्मेटीक्स अ‍ॅक्टच्या कार्यकक्षेत येत नाहीत. ते अन्न भेसळ प्रतिबंधक आणि नियंत्रण विषयक कायद्याच्या कार्यकक्षेत येतात. त्यात जाहीर केलेल्या पदार्थांच्या +_ मर्यादा किती आहेत ठाऊक नाही. परंतु विविध घातक रसायनांचा उदा हेवी मेटल्स, विविध विषारी कार्बनी पदार्थ यांचा अंतर्भाव विशिष्ट मर्यादेच्या बाहेर नाही हे तपासून पाहणे हा मुख्य उद्देश असावा.

जाहीर केलेले पदार्थ हे फक्त एकदाच तपासून पाहिलेले असतात की दर बॅचमध्ये तपासले जातात हे ठाऊक नाही. तसे ते बहुधा आढळणारच. जसे गव्हातून बिस्कीटात ब जीवनसत्व येणे. फक्त भाजण्यासारख्या प्रक्रियेत प्रमाण कमी होईल. पण जाहीर घटकांच्या मर्यादेची शिथिलता किती आहे ५-१० टक्के की २० टक्के यासंबंधी अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यात उल्लेख नसल्यास उत्पादक कायद्यात सापडणार नाही. असली तरीही मर्यादेचे उल्लंघन झाल्यास होणारी अन्न निरीक्षकाची कारवाई कोणताही शहाणा उत्पादक ओढवून घेणार नाही. शिवाय उत्पादनाची प्रतिष्ठा, ब्रॅन्ड व्हॅल्यू कोणीही निष्कारण पणाला लावणार नाही.

कोणत्याही अन्नपदार्थात असलेले पोषक घटक हे त्याच्या कच्च्या मालात नव्हे तर जे उत्पादन विकले जाते त्यात असणे आवश्यक आहे. याच्या प्रत्येक घटकाचे पृथक्करण करून त्याचे प्रमाण ठरवलेले असते.

उदा. येथे बी १२ जीवनसत्वाचे पृथक्करण करायचे असेल तर १० ग्रामचे बिस्कीट पाण्यात पूर्ण विरघळवून त्या पाण्याचे स्पेकट्रोफोटोमीटर मध्ये प्रमाणित बी १२ च्या द्रावणाशी तुलना करून प्रमाण ठरवता येते.

किंवा एलिसा Enzyme-linked immunosorbent assay या तंत्राने अन्न घटकातील बी १२ चे प्रमाण ठरवता येते
http://www.rapidtest.com/index.php?i=Food-ELISA-test-kits&id=196&cat=104

किंवा NMR SPECTROSCOPY या तंत्राने त्यातील कोबाल्टचे प्रमाण ( बी १२ म्हणजे सायनोकॉबालमिन हे कोबाल्टचे एक संयुग आहे) ठरवता येते. आणि या कोबाल्टच्या प्रमाणावरून त्यातील बी १२ ची मात्र ठरवता येते.

कुमार१'s picture

14 Jul 2018 - 11:15 am | कुमार१

या लेखमालेदरम्यान खाद्यान्नातील “जीवनसत्वांचा उष्णतेने होणारा नाश (heat stability )” हा मुद्दा चर्चेत येणार आहे.
हा विषय रसायनशास्त्राच्या अखत्यारीत येतो. वरवर गुगलून येणारे संदर्भ वाचून नीटसे समजत नाही. काहीसा गोंधळही होतो.

तरी आपले अनुभवी मत वाचायला आवडेल.

सुधीर कांदळकर's picture

15 Jul 2018 - 7:24 am | सुधीर कांदळकर

या विषयावरील माझा अनुभव शून्य आहे. माझ्या सर्वसामान्य नजरेतून प्रामुख्याने घटकांच्या विघटनासाठी तीन घटक कारण असलेले दिसतात.
१. भोवतालचे माध्यम (गोळी मध्ये स्टार्च, टाल्कम, इ. द्रव्ये, प्यावयाच्या औषधात पाणी, अल्कोहोल, साखर इ. द्रव्ये, पेरेन्टरल्समध्ये मॅनिटॉलसारखी द्रव्ये आणि पीएच राखण्यासाठी घातलेली द्रव्ये) तापमान आणि आर्द्रता.
२. विशिष्ट सहघटकांचे अस्तित्त्व.

घटकांचे स्थैर्य दोन प्रमुख कारणांमुळे धोक्यात येऊ शकते.
१. उष्णतेमुळे वाफ होऊन उडून जाणे.
२. उष्णता, प्रकाश, आर्द्रता वा इतर कारणांमुळे रेणूंचे विघटन होणे. जसे अ‍ॅस्पिरीनच्या बाबतीत अ‍ॅसिटाईल सॅलिसायलीक अ‍ॅसिडचे पाण्याच्या रेणूमुळे हायड्रोलायसीस होऊन सॅलिसायलिक अ‍ॅसिड हे घातक द्रव्य तयार होणे.

व्हिटॅमीन अ चा उष्णतेमुळे र्‍हास होतो असे वाचल्याचे आठवते परंतु कायिक की रासायनिक आणि रासायनिक असेल तर रासायनिक सूत्रे आठवत नाहीत.

एका कंपनीत केलेला एक अभ्यास आठवतो. त्यांनी जुनी तीन वर्षांपूर्वीची कन्ट्रोल सॅम्पल्स काढून त्यांच्या चाचण्या घेतल्या होत्या. %ज र्‍हास काढून टाईम स्केलवर ग्राफ काढला होता. आणि नंतर नवीन उत्पादन ४५ अंश सें तापमानात अतिआर्द्रतेसाठी डब्यात पाणी घालून सील करून ठेवली होती (अ‍ॅक्सीलरेटेड डायनॅमिक कन्डीशन्स). नंतर दर तीन महिन्याने ते (या स्टोरेज कन्डीशन्समधल्या नमुन्यांच्या) चाचण्या घेऊन निष्कर्ष काढणार होते. र्‍हासाची टक्केवारी नंतर त्यांनी अभ्यासली असेलच. निष्कर्ष बहुधा खाजगी असलयामुळे मी त्यात कुतूहल वाटूनही फाजील स्वारस्य दाखवले नव्हते.

गुगलून बघितल्यावर

In general, many physical and chemical factors can have a negative effect on stability of vitamins. Water-soluble vitamins are prone to degradation in solutions, particularly when exposed to light. B Vitamins are sensitive to factors such as: light, heat, moisture, oxidizing and reducing agents, acids and or bases. There is plenty of literature concerning the poor stability of vitamin B12 and it has been reported that the optimum pH for stability of this vitamin is 4-6.5 pH value.2-13 It is well known that aqueous solutions of cyanocobalamin are photoliable and some B and C vitamins accelerate the photodegradation.

हा प्रमुख निष्कर्ष आढळला. सर्वसामान्यांसाठी (डॉक्टर्ससाठी नाही) तात्पर्य काय तर प्यावयाचे जीवनसत्त्वांचे अर्भकासाठींचे थेंब आणि छोट्यांसाठीचे औषध हे गडद रंगाच्या बाटलीतले असावे, थंड, कोरड्या जागी प्रकाशापासून दूर ठेवावे आणि डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण झाल्यानंतर फेकून द्यावे. एक्सपायरी तारीख पुढची असली तरी उघडलेली बाटली कोर्स पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा वापरायची गरज पडल्यास नवे औषध आणावे. मोठ्यांनी गोळ्यास खाव्यात आणि प्यावयाचे औषध लिहून द्या असा डॉ. कडे हट्ट धरू नये.

असो. लेखक डॉक्टरसाहेब आपली जिज्ञासा पूर्ण करू शकेल असा अनुभव माझ्यापाशी नसल्यामुळे मनात निराशा दाटली.

खिलजि's picture

17 Jul 2018 - 7:00 pm | खिलजि

मला हा प्रतिसाद आवडला सुधीरसाहेबांचा . मी स्वतः अस्पिरीनवर काम केलेले आहे . ते एका ठराविक तापमानावरच नियंत्रि राहते अन्यथा त्याचे त्वरित सॅलिसिलिक ऍसिडमध्ये रूपांतर होते . सुमारे २०१० मध्ये हा प्रोजेक्ट आला होता आणि मी स्वतः त्यावर काम करत होतो . जवळजवळ सहा महिने काम झाल्यावर आम्हाला असे आढळले कि एका नियंत्रित तापमानात आणि एका विशिष्ट सामूमध्येच ऍस्पिरिन राहू शकतो . आता सांगायची गोष्ट अशी कि आम्ही आमच्या परीने तो प्रोजेक्ट पूर्ण केला आणि सूपूर्दही केला आणि नंतर तो एफ दि ए ला मान्यही झाला . सांगायची मेख अशी कि ऍस्पिरिन जो घेत असेल त्याने जर ते व्यवस्थित शीतकपाटात ठेवले नाही तर सर्व गोंधळच आहे . तो नक्की काय खात असेल ऍस्पिरिन कि त्याचा मेटॅबोलाईट सॅलिसिलिक ऍसिड हा देखील संशोधनाचा मुद्दा आहे .

सुबोध खरे's picture

17 Jul 2018 - 8:39 pm | सुबोध खरे

मुळात ऍस्पिरिन हे ऍसेटील सॅलिसिलिक ऍसिड आहे. ते तयार करतात ते सुद्धा सॅलिसिलिक ऍसिड आणि ऍसेटिक ऍनहायड्राइड याच्या संयोगाने. ते जठरात / आतड्यात/ यकृतात सॅलिसिलिक ऍसिड मध्ये आणि ऍसेटिक ऍसिड मध्ये विघटन पावते. सॅलिसिलिक ऍसिड हेच मुळात औषध आहे. त्यामुळे जरी ऍस्पिरिन विघटन पावलेले असले तरी मागे राहणाऱ्या सॅलिसिलिक ऍसिडमुळे रुग्णाला फायदा सुद्धा मिळतोच. फरक एवढाच आहे कि नुसत्या सॅलिसिलिक ऍसिडमुळे जठराचा दाह ऍस्पिरिनपेक्षा जास्त होतो

सुबोध खरे's picture

17 Jul 2018 - 8:40 pm | सुबोध खरे

Aspirin is used in the treatment of mild to moderate pain, inflammation, and fever. It is also used as an antiplatelet agent to prevent myocardial infarction, stroke and transient ischemic episodes.

Aspirin is absorbed rapidly from the stomach and intestine by passive diffusion. Aspirin is a prodrug, which is transformed into salicylate in the stomach, in the intestinal mucosa, in the blood and mainly in the liver. Salicylate is the active metabolite responsible for most anti-inflammatory and analgesic effects (but acetylsalicylate is the active moiety for the antiplatelet-aggregating effect). Gastrointestinal intolerance to salicylate observed in some patients has prompted the development of formulations with enteric coating.

Salicylate distributes rapidly into the body fluid compartments. It binds to albumin in the plasma. With increasing total plasma salicylate concentrations, the unbound fraction increases. Salicylate may cross the placental barrier and distributes into breast milk.
https://sepia.unil.ch/pharmacology/index.php?id=83

कुमार१'s picture

17 Jul 2018 - 9:06 pm | कुमार१

एक विनंती…

चर्चेदरम्यान जालावरचे इंग्लिश परिच्छेद इथे जसेच्या तसे डकवणे टाळल्यास बरे होईल

अपरिहार्य तांत्रिक शब्द वगळता मराठीतच लिहावे ही विनंती.
आपल्या संस्थळाचे मराठीपण आपणच जपूयात.
धन्यवाद

कुमार१'s picture

15 Jul 2018 - 8:10 am | कुमार१

आपण कोणीच परिपूर्ण नाही. जे काही अनुभवाचे बोल असतात ते एकमेकास जरूर सांगायचे. काही विषय हे २-३ ज्ञानशाखांच्या सीमेवरील असतात. तिथे वाचकाच्या प्रत्येक शंकेला एकच तज्ञ उत्तर नाही देऊ शकत.
दरवेळेस त्या ‘गुगलराजा’तून बोध होतोच असे नाही. तेव्हा एकमेकांची मदत घेण्यात आनंद वाटतो.
धन्यवाद !

कुमार१'s picture

16 Jul 2018 - 11:25 am | कुमार१

आणि पूरक माहितीबद्दल सर्वांचे आभार .

कुमारसाहेब आपले लेख फारच छान असतात . मला खरंच खूप खूप आवडतात . मुळात आपली लेखन शैली इतकी सहज आहे कि मी ते व्यवस्थितपणे माझ्या बायकोला देखील समजावून सांगू शकतो . मागे मी नमूद केल्याप्रमाणे हे आपले लिखाण म्हणजे एक उत्कृष्ट समाजसेवा आहे असे माझे पक्के मत बनत चाललेय . धन्यवाद कुमारसाहेब

कुमार१'s picture

17 Jul 2018 - 7:11 pm | कुमार१

तुमचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन माझ्या भावी लेखनासाठी उर्जा पुरवते.
तुमच्यासारख्या अभ्यासू वाचकांच्या सहभागानेच ही चर्चा परिपूर्ण होते.

सुधीर कांदळकर's picture

18 Jul 2018 - 7:16 am | सुधीर कांदळकर

यांच्या संदर्भातली माहिती जीमेलवर पाठविली आहे.

कुमार१'s picture

19 Jul 2018 - 6:26 pm | कुमार१

या मालिकेतील पुढचे जीवनसत्व इथे आहे:

https://www.misalpav.com/node/43031

ट्रेड मार्क's picture

20 Jul 2018 - 2:48 am | ट्रेड मार्क

आणि चांगली माहिती आहे.

दुकानात मिळणाऱ्या गोळ्या किंवा द्रावण स्वरूपातील व्हिटॅमिन बी१२ मध्ये दोन वेगवेगळे मूलभूत घटक असतात. जे सर्वसाधारण सहज आणि कमी किमतीत उपलब्ध असते त्यात Cyanocobalamin असते. हे प्रयोगशाळेत तयार केलेले बी१२ आहे.

तर दुसऱ्या प्रकारात Methylcobalamin असते जे प्राकृतिक स्वरूपात मिळवले जाते असे म्हणतात. त्यामुळे याची किंमत थोडी जास्त असते. या दोन्हीपैकी कुठलं चांगलं यावरून डॉक्टर मंडळींमध्ये मतभिन्नता आहे.

डॉ. कुमार, डॉ. खरे किंवा मिपावर अजून कोणी औषधशास्त्रातले असतील त्यांनी कृपया यावर थोडी अधिक माहिती द्यावी.

सुबोध खरे's picture

20 Jul 2018 - 9:20 am | सुबोध खरे

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दोन्हीच्या कार्यक्षमते मध्ये फारसा फरक नाही. दोनातील कोणतेहि द्रव्य घ्या. काही फरक पडणार नाही.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5370327/

कुमार१'s picture

20 Jul 2018 - 8:01 am | कुमार१

Methyl C हे प्रत्यक्ष पेशींत काम करणारे सह-एंझाइम आहे. त्यामुळे वरवर पाहता ते श्रेष्ठ असेल असे वाटते.

तरी पण दोहोंची तुलना करण्यासाठी औषध शास्त्रातील व्यक्ती चे मत घ्यावे लागेल.

Rajesh188's picture

28 Apr 2019 - 9:27 am | Rajesh188

वर्णनाच्या सुलभतेकरिता जीवनसत्त्वांचे विद्राव्यतेप्रमाणे वर्गीकरण सर्वसामान्य झालेले आहे. परंतु ते अगदी काटेकोर आहे असे नव्हे. कारण काहींची विद्राव्यता मेद व जल या दोन्हींतही आढळली आहे. ‘जलविद्राव्य ब’ हा एकच पदार्थ नसून आणखी काही विशिष्ट पदार्थांचा मिळून बनल्याचे समजल्यानंतर त्याला ‘जीवनसत्त्व ब समूह’ असे नाव मिळाले. या समूहास थायामीन (ब१ जीवनसत्त्व किंवा ॲन्युरीन), रिबोफ्लाविन (ब२ जीवनसत्त्व ), निॲसीन (निॲसीनामाइड किंवा निकोटिनिक अम्ल), ब६ जीवनसत्त्व, पँटोथेनिक अम्ल, बायोटीन, फॉलिक अम्ल, ब१२ जीवनसत्त्व, इनॉसिटॉल, कोलीन इ. पदार्थांचा समावेश होतो. या लेखात फक्त प्रचलित नावांचाच उल्लेख करण्यात आला आहे.

कुमार१'s picture

28 Apr 2019 - 9:58 am | कुमार१

जीवनसत्वांच्या ‘ब’ गटात एकूण ८ घटक आहेत : थायमिन, रिबोफ्लाविन, निअसीन, पायरीडोक्सीन, बायोटीन, pantothenic acid, फोलिक a व कोबालामीन.

इनॉसिटॉल व कोलीन यांना जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत स्थान दिलेले नाही
. असे बरेच पदार्थ ‘जीवनसत्वासारखे’ (vitamin-like sub.) म्हणून ओळखले जातात. त्यांची यादी बरीच आहे.

एकूण अधिकृत जीवनसत्वे १३ च आहेत. ( ‘ब’ गटाची ८, क आणि अ, ड, इ आणि K).