‘अ’ जीवनसत्व : निरोगी दृष्टीचा मूलाधार

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
2 Aug 2018 - 9:44 am

सामान्यजनांना ‘अ’ या नावाने परिचित असलेल्या या रासायनिक घटकाला जीवनसत्वांच्या यादीत ग्रस्थान द्यायला काहीच हरकत नाही. त्याचे अधिकृत नाव Retinol आहे. आपल्या निरोगी दृष्टीसाठी ते अत्यावश्यक असते. याव्यतिरिक्त इतरही अनेक महत्वाची कार्ये ते शरीरात करते. गरीब देशांतील दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्यांमध्ये त्याचा आहारातील अभाव बऱ्यापैकी आढळतो. त्यामुळे अनेक राष्ट्रीय आरोग्यसेवांच्या माध्यमातून ‘अ’ च्या गोळ्यांचा पुरवठा वंचितांना केला जातो.
अशा या महत्वाच्या जीवनसत्वाचा परिचय या लेखात करून देत आहे.

शोधाचा इतिहास:
रातांधळेपणाची समस्या प्राचीन काळापासून माहित होती. तेव्हा इजिप्तमध्ये यावर संशोधन चालू झाले. सुरवातीस आहारातील एखाद्या पदार्थाने त्यावर फरक पडतो का यावर लक्ष केंद्रित केले गेले. प्रयोगांती असे आढळले की मांसाहारातील यकृताचा भाग अशा रुग्णास नियमित दिल्यास त्याला बराच फरक पडतो. नंतर काही वैज्ञानिकांनी दुधामधून काही ‘मेदरुपी घटक’ शोधले आणि ते शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यावेळेस या घटकांना ‘अ’ असे तात्पुरते नाव देण्यात आले. पुढील संशोधनात हे घटक डोळ्याच्या दृष्टीपटलात (retina) असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांचे रासायनिक नामकरण Retinol असे झाले. हेच ते ‘अ’ जीवनसत्व. ते केवळ एक रसायन नसून अनेकांचे मिळून एकत्र कुटुंब आहे (Retinoids).

नंतर ते वनस्पतींत शोधण्यात आले. तेव्हा असे आढळले की नारिंगी रंगाच्या भाजीपाल्यांत ते Carotene या रुपात आढळते. किंबहुना गाजरामध्ये (Carrot) ते विपुल असल्यानेच त्याला हे नाव पडले. Carotene हे Retinol चे पूर्वरूप (precursor) आहे. अशा भाज्यांमधून ते शरीरात गेल्यावर त्याचे पक्क्या ‘अ’ मध्ये रुपांतर होते.

आहारातील स्त्रोत:
१. शाकाहार: गाजर, तांबडा भोपळा, रताळे, हिरव्या पालेभाज्या, इ.
२. प्राणीजन्य आहार: यकृत, मासे, दूध, अंडे.

आता या दोन्ही प्रकारच्या स्त्रोतांमधील फरक पाहू. शाकाहारातून Carotene मिळते आणि शरीरात त्याचे ‘अ’ होते. ही प्रक्रिया होताना एक महत्वाचा बदल होतो. जर आपण Caroteneचे १० भाग खाल्ले तर शरीरात त्यापासून फक्त १ भाग Retinol (‘अ’) तयार होते. शुद्ध शाकाहारीन्नी हा मुद्दा ध्यानात घ्यावा. म्हणून त्या भाज्या भरपूर खाल्ल्या पाहिजेत. याउलट प्राणीजन्य आहार थेट Retinol पुरवतो.
आहारातून शोषलेल्या ‘अ’ चा बऱ्यापैकी साठा आपल्या यकृतात केला जातो. तिथून गरजेप्रमाणे ते सर्व शरीराला पुरवले जाते. त्यातील डोळ्याचा वाटा महत्वाचा आहे.
अलीकडे तेलासारख्या खाद्यांमध्ये कृत्रिम ‘अ’ घालून त्यांना ‘संपन्न’ केले जाते. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकातून ते सर्वांना मिळू शकते.

शरीरातील कार्य:
१. त्याचे सर्वात महत्वाचे कार्य आपल्या दृष्टीसंदर्भात आहे. दृष्टीपटलामध्ये Rhodopsin हे प्रथिन असते ज्यामध्ये ‘अ’चा समावेश असतो. प्रकाशकिरण या प्रथिनावर पडल्यावर अनेक रासायनिक क्रिया होतात. त्यातून आपल्या मेंदूला ‘दृष्टीसंदेश’ पाठवला जातो. निरोगी दृष्टीसाठी आपल्या दृष्टीपटलात Rhodopsin चा भरपूर साठा असावा लागतो.

२. आपल्या त्वचेवर आणि सर्व पोकळ इंद्रियांमध्ये एका पातळसर संरक्षक पेशींचे (epithelium) अस्तर असते. या सर्व पेशींना ‘अ मजबूत करते. या पेशी श्वसनमार्ग, मूत्रमार्ग, आतड्यांमध्ये आणि अन्यत्रही संरक्षक असतात. असे हे अखंड अस्तर आणि त्वचेवरील थर रोगजंतूना रोखण्याचे काम करतात.

३. सर्व पेशींमध्ये ‘अ’ सूक्ष्म पातळीवर काम करते. त्याद्वारे ते अनेक जनुकांच्या नियंत्रणात भाग घेते. परिणामी ते पेशींची वाढ आणि विकास या मूलभूत गोष्टींचे नियंत्रण करते.

४. त्याचा antioxidant हा अजून एक महत्वाचा गुणधर्म. पेशींमधील रासायनिक क्रियांतून free radicals प्रकारची अस्थिर रसायने तयार होतात. ती जर जास्त प्रमाणात साठू लागली तर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. त्यातून कर्करोगादिंचा धोका संभवतो. पेशीतले antioxidant पदार्थ या घातक अस्थिर रसायनांचा नायनाट करतात. या कामी ‘अ’ च्या जोडीने ‘इ’ व ’क’ या जीवनसत्वांचे योगदान महत्वाचे आहे.

अभावाचा जागतिक प्रादुर्भाव:

जगातील ७५ देशांमध्ये हा मोठा आरोग्य-प्रश्न आहे. त्यातले बरेचसे देश दक्षिणपूर्व-आशियाई व आफ्रिकी आहेत. प्रौढांच्या तुलनेत मुलांत ‘अ’ चा यकृत-साठा बराच कमी असतो. त्यामुळे त्यांच्यात अभावाची लक्षणे लवकर दिसतात. आज जवळपास २५ कोटी मुले या अभावाची शिकार झाली आहेत. त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चिंताजनक आहे. त्यापैकी सुमारे चार लाख मुले दरवर्षी अंध होतात. यावरून या प्रश्नाचे गांभीर्य कळेल.

आहारातील अभावाखेरीज आतड्यांच्या व स्वादुपिंडाच्या काही आजारांमध्ये ‘अ’ चे शोषण नीट न झाल्याने अभावाची लक्षणे दिसू शकतात.

अभावाचे परिणाम:
१. दृष्टीवरील दुष्परिणाम सर्वात महत्वाचे. रोगाच्या सुरवातीस जेव्हा Rhodopsinचा साठा कमी होऊ लागतो तसे रुग्णास अंधुक प्रकाशात कमी दिसते. पुढे रातांधळेपणा होतो. या स्थितीतच ‘अ’ चे उपचार सुरु करायचे असतात. जर दुर्लक्ष केले तर मग दृष्टी हळूहळू अधू होत जाते. त्याचबरोबर डोळ्यातील अस्तराचा ऱ्हास होऊन डोळा कोरडा पडतो. याही स्थितीत दुर्लक्ष केल्यास डोळ्याची अवस्था खराब होत शेवटी पूर्ण अंधत्व येते.
अभावाच्या सुरवातीस जर डोळ्यांची तपासणी तज्ञाने केली तर त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण ठिपके (Bitot spots) दिसू शकतात.

२. त्वचेवरील परिणाम : ती कोरडी पडते. जाड, लालसर व खवले पडल्यासारखी दिसते आणि खूप खाजते.

३. जंतूसंसर्ग : रक्तक्षय आणि दुबळ्या प्रतिकारशक्तीमुळे शरीरात जंतू सहज शिरतात आणि विविध दाह होतात.

उपचार:
अभावाची लक्षणे दिसू लागताच त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार चालू करावेत. त्यासाठी ‘अ ’च्या गोळ्या मिळतात. गंभीर रुग्णांमध्ये इंजेक्शनचा पर्याय वापरला जातो.
रोगप्रतिबंध:
आपल्या देशातील बालकांना शालेयपूर्व वयात रोगप्रतिबंधक म्हणून ‘अ’ चे मोठे डोस देण्याची पद्धत अवलंबली जाते.

‘अ’ चे उपचार नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. अनावश्यक जास्त डोस घेतल्यास त्याचे यकृत, मेंदू व त्वचेवर दुष्परिणाम होतात.
* * *

आरोग्यजीवनमान

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

2 Aug 2018 - 9:48 am | कुमार१

मा सा. सं,
माझे 'इ' आणि 'अ' जीवनसत्वाचे लेख यापूर्वीच्या जीवनसत्वांच्या लेखांस जोडून अनुक्रमणिका करावी ही विनंती.

आभार !

पैलवान's picture

2 Aug 2018 - 10:07 am | पैलवान

अतिशय छान लेखमाला.

रोगाच्या सुरवातीस जेव्हा Rhodopsinचा साठा कमी होऊ लागतो तसे रुग्णास अंधुक प्रकाशात कमी दिसते. पुढे रातांधळेपणा होतो........

'अ" जीवनसत्व व चष्मा यांचा संबंध आहे का? म्हणजे पुरेसे/भरपूर या जीवनसत्व सेवन केले गेले तर चष्मा लागायला प्रतिबंध होऊ शकतो, असं?
किंवा चष्मा आहे आणि अ जीवनसत्त्वाच्या सेवनाने त्याचा नंबर कमी होऊ शकतो असे काही आहे का?

कुमार१'s picture

2 Aug 2018 - 10:34 am | कुमार१

'अ" जीवनसत्व व चष्मा यांचा संबंध आहे का? >>>

नाही ,थेट संबंध नाही. ‘चष्मा लागणे” हा प्रकार ‘Refraction errors’ यात मोडतो. त्याची करणे अन्य आहेत. ‘अ’ हे डोळ्याच्या विविध पेशींना निरोगी ठेवते.

जेव्हा ‘अ’ चा शरीरसाठा उत्तम असतो तेव्हा आपण खूप कमी प्रकाशात सुद्धा नीट पाहू शकतो. याला ‘Dark adaptation’ म्हणतात. साठा कमी झाला की हे आधी बिघडते.

जेव्हा ‘अ’ चा शरीरसाठा उत्तम असतो तेव्हा आपण खूप कमी प्रकाशात सुद्धा नीट पाहू शकतो.....

मला ही सिद्धी लहानपणापासून आहे, त्यामुळे माबदौलतांची 'बोकोबा' आणि 'उल्लू' अशी संभावना करण्यात येत असे ते आठवले. सिद्धीचे नेमके कारण मात्र आज तुमच्यामुळे समजले :-) :-)

उत्तम लेख, पु भा प्र.

अनिंद्य

कुमार१'s picture

2 Aug 2018 - 11:48 am | कुमार१

बोकोबा !
भारी आहे हो हे तुमचे विशेषण.
आवडले.
तसे तुम्ही दर्दी वाचक आहातच !

फारच हळहळ वाटली कुमार साहेब हे वाचून कि दरवर्षी ४लाख मुले अंध होतात . भारतामधील आकडा कळू शकेल काय ? नेहेमीप्रमाणेच सुंदर समाजसेवा/ एक उत्कृष्ट मार्गदर्शन तेही सहजसुंदर शैलीमध्ये .. धन्यवाद डॉक्टरसाहेब

कुमार१'s picture

3 Aug 2018 - 8:01 am | कुमार१

दरवर्षी आशियात अडीच लाख मुलांना असे अंधत्व येते. त्यापैकी ५२००० भारतातली असतात.

वकील साहेब's picture

2 Aug 2018 - 12:58 pm | वकील साहेब

नेहमीप्रमाणेच अभिनिवेशशून्य व माहितीपूर्ण लेख,
डॉक्टर मलाही अगोदर अंधुक प्रकाशात उत्तम दिसत असे. पण आताशा लाईट लावली तरच स्पष्ट दिसते. हल्ली डोळेही चूरचुरतात यामागे असेल की मोबाईल, पीसी चा अतिवापर हे कारण असेल ?
थोडं पर्सनल होतंय त्याबद्दल क्षमस्व

भारतामधील आकडा कळू शकेल काय >>>
शोधून बघतो. साधारण आपला ‘हिस्सा’ बऱ्यापैकी असावा असे वाटते.

डोळेही चूरचुरतात यामागे अ असेल की मोबाईल, पीसी चा अतिवापर हे कारण असेल ? >>
विविध इलेक्ट्रॉनिक ‘स्क्रीन्स’ मुळे डोळ्यांना कोरडेपणा येतो आणि त्यातून चुरचुरणे होऊ शकेल.
दृष्टीबाबत मात्र नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा हे उत्तम. तपासणी केल्यावरच सांगता येईल.

खिलजी व वकीलसाहेब, नियमित प्रतिसाद व प्रोत्साहनासाठी आभार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Aug 2018 - 1:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण लेख... नेहमीप्रमाणेच !

मराठी कथालेखक's picture

2 Aug 2018 - 3:08 pm | मराठी कथालेखक

जगातील ७५ देशांमध्ये हा मोठा आरोग्य-प्रश्न आहे

यात भारत पण आहे का ?

कुमार१'s picture

2 Aug 2018 - 3:42 pm | कुमार१

माझा वैद्यकीय शिक्षणा दरम्यानचा अनुभव सांगतो. आम्ही जेव्हा ग्रामीण भागात शालेय आरोग्य तपासणीस जायचो तेव्हा दर तिसऱ्या विद्यार्थ्यात आम्हाला अ च्या अभावाची लक्षणे त्याच्या डोळ्यात दिसायची.

आता परिस्थिती सुधारली असली तरीही समाधानकारक नाही.

डॉक्टर आहात का ?

कुमार१'s picture

3 Aug 2018 - 2:21 pm | कुमार१

आणि म्हणूनच इथे आरोग्य लेखमाला लिहीत असतो.

"अ" जीवनसत्वाच्या महत्वाबद्दल नेहेमीसारखाच माहितीपूर्ण लेख. आहारात "Golden Rice" (नेहमीच्या तान्दळात genetic modification करून beta caroteneचे उत्पादन करणे, हे तान्दूळ सोनेरी/पिवळे असतात) वापरून आहारातील "अ" जीवनसत्वाचा अभाव दूर करण्याचे प्रयत्न बरेच यशस्वी झालेले आहेत.

कुमार१'s picture

2 Aug 2018 - 6:29 pm | कुमार१

चांगला प्रयोग.
नेहमीची खाद्यान्ने ‘संपन्न’ केल्याने एकंदरीत सर्व जनतेला पोषणघटक सहज मिळणे सोपे जाते.

चाणक्य's picture

2 Aug 2018 - 10:03 pm | चाणक्य

माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख. _/\_

सुधीर कांदळकर's picture

3 Aug 2018 - 5:27 pm | सुधीर कांदळकर

नेमक्या शब्दातला छान मांडलेला माहितीचा विश्वासार्ह स्रोत. बरेच समज/गैरसमज दूर करणारा म्हणूनच डोळ्यात अंजन घालणारा लेख आवडला. खुशीच्या गाजरात पण कॆरोटीन किंवा ’अ’ असते काहो?

कुमार१'s picture

3 Aug 2018 - 6:34 pm | कुमार१

ते सांगता का जरा ? ऐकले नाही मी

चौकटराजा's picture

3 Aug 2018 - 5:39 pm | चौकटराजा

अति विशिष्ट कार्य करण्यास हातभार लावणारे घटक म्हणून जीवशास्त्र जीवनसत्वे या अन्नघटका कडे पहाते . त्यासाठी हा लेख महत्वाचा आहे . चाकवत या भाजीतून हे द्रव्य मिळते खास करून . गाजर हे ही आहेच म्हणा . गाजराची कोशिबीर आठवड्यातून एकदा खावी त्यासाठी . पी सी सतत पहाण्याने डोळे चुरचुरतात अशा वेळी पाच मिनिटे डोळे मिचकवण्याचा व्यायाम केल्यास ते पुन्हा " ओले" होतात असा नेत्र तज्ञाचा सल्ला असतो .

सहभागाने ही चर्चा परिपूर्ण व छान होत आहे. पूरक माहितीबद्दलही आभार.

कुमार१'s picture

4 Aug 2018 - 2:43 pm | कुमार१

मूळ लेखात 'अ' च्या अभावाची ही प्रतिमा देणे जमले नव्हते ती अशी:
pict

सुधीर कांदळकर's picture

4 Aug 2018 - 5:20 pm | सुधीर कांदळकर

काहीही न करता बसल्या ठिकाणी स्वर्गसुखाचा हव्यास धरणे. शब्दकोषात वाक्प्रचार सापडला नाही. परंतु लहानपणापासून उडाणटप्पू मुलांना असे टोमणे मारलेले ऐकत आलो आहे. भारत क्रिकेट सामना हरायला आला तरी मी भारतच जिंकणार असे म्हटले की मला भगिनीवर्गाकडून उगाच गाजरं खाऊं नकोस असे ऐकावे लागे.

कुमार१'s picture

4 Aug 2018 - 5:51 pm | कुमार१

छान आहे वाक्प्रचार. मग खुशीच्या गाजरांत कसले आलेय जीवनसत्त्व ☺️