हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
30 Jun 2021 - 8:29 pm

कटाक्ष-

लेखक: मुनव्वर शाह
संपादन: शुभदा गोगटे
प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन
प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७)
पृष्ठ संख्या: २००
किंमत: ₹१००

ओळख-

१९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा. 'येस, आय ॲम् गिल्टी!' ही या मुनव्वर शाहची आत्मकथा किंवा आत्मविवंचना!

आजकालच्या मम्मी-पप्पांच्या आवडत्या चौकटीत तंतोतंत बसावा असा बालवयातला हरहुन्नरी मुनव्वर ते फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार हा प्रवास एवढ्यापुरतेच हे पुस्तक मर्यादित नाही. खरेतर अगदी गुन्हा घडायच्या काही महिने आधीपर्यंत मुनव्वर सर्वांना आवडणारा, मनमिळाऊ, जो शाळा-कॉलेजात भरपूर क्षेत्रांत रमतो असा शिक्षकप्रिय विद्यार्थी होता. परंतु पुढे 'असंगाशी संग, प्राणाशी गाठ' हे अनुभवण्यासाठीच मुनव्वर जन्माला आला होता की काय असे वाटण्याइतपत तो स्वतःच्या आयुष्याचे नियंत्रण गमावून बसतो.

आयुष्यात एकदा आडमार्गाची चव चाखली की मनुष्यातला सैतान काय थैमान घालू शकतो हे मुनव्वर स्वतःच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडताना उलगडत जातो. ही कहाणी वाचताना वाचकाला आपल्याविषयी सहानुभूति उत्पन्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुनव्वर पुनः पुन्हा गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगण्याची तयारी आणि आवश्यकता व्यक्त करतो. फक्त ती फाशी(च) असावी की इतर काही हा प्रश्न तो समाजाच्या पदरात टाकतो‌. मुनव्वरने प्रकाशक शरद गोगटेंशी केलेला पत्रव्यवहार पाहिला की विश्राम बेडेकरांच्या 'रणांगण' मधील हॅर्टाने चक्रधरला पाठवलेल्या पत्रांची आठवण व्हावी, एवढा आशयगर्भ त्यांत भरलेला आहे.

पुस्तकाच्या प्रकाशनानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात उडालेल्या गदारोळाचा मागोवाही या पुस्तकाच्या शेवटी घेण्यात आला आहे. तेव्हा मुनव्वरने सहानुभूती मिळविण्यासाठी असत्याचा आधार घेत ही कहाणी रचली असाही आरोप झाला. वाद नको म्हणून ही कहाणी शंभर टक्के असत्य मानली तरी मुनव्वर ने मांडलेले विचार कोणाही सद्सद्विवेक शाबूत असणाऱ्या मनुष्याला कधीही नाकारता येणार नाहीत.

पुस्तकानंतरची शिल्लक-
एक माफीचा साक्षीदार वगळता जोशी-अभ्यंकर हत्याकांडात इतर चार आरोपींना १९८३ मध्ये फाशी चढवण्यात आले. फाशीची वाट पाहताना झालेली आयुष्याची उपरती किंवा सहानुभूती मिळवण्याचा एक फोल प्रयत्न म्हणून दुर्लक्ष करावेत असे उथळ मुनव्वरचे विचार नाहीत. काही ठिकाणी अक्षरशः हा कुणी फाशी मिळालेला गुन्हेगार नसून अध्यात्माच्या वाटेवर स्वार झालेला एक प्रेषित आहे असे वाटावे असा विचार मुनव्वर मांडतो. या पुस्तकाचे साहित्यिक मूल्य काय यावर टिप्पणी करण्याचा माझा अधिकार नाही. परंतु मूल्याधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासाठी 'येस, आय ॲम् गिल्टी!' पथदर्शक आहे हे नक्की.

वाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशिक्षणप्रतिक्रियाआस्वादसमीक्षालेखशिफारस

प्रतिक्रिया

विचार सखोल व रॅशनल बनतात पण हे स्मशानवैराग्य इतर वेळी कुठे असते ? म्हणूनच माझी यातील कोणाबाबत कसलीच सहानुभूती तयार होणार नाही... जगाला वास्तव मार्गदर्शनपर लेखन जरी अशावेळी घडले तरी...

मी स्वतः काही अंशी वरवर अमेजिंग असणारे सखोल तत्वज्ञान मांडून लोकांना भारावून सोडणारे लोक अनुभवले आहेत पण जेंव्हा बाह्य गोष्टीवर उत्कृष्ट प्रभुत्व साधलेले हे लोक आपल्याच आतील क्षुलकशा बाबी समोर हात टेकतात प्रसंगी कमालीचे हतबल ठरतात तेंव्हा खरे वाईट वाटते पण वेळ गेलेली असते आणि सर्व तत्त्वज्ञानही मातीमोल ठरते

सौन्दर्य's picture

30 Jun 2021 - 11:21 pm | सौन्दर्य

स्मशान वैराग्य हे फक्त स्मशानांतच येते. समोर चितेवर व्यक्ती जळत असता, पैसा, अडका, माया, लोभ, प्रेम किती क्षणभंगुर आहे ह्याची प्रचिती येते. इतर वेळी मात्र ह्याच गोष्टींसाठी माणूस 'वाटेल ते' करायला तयार होतो. माझी देखील अश्या पश्चात तत्वज्ञान सांगणाऱ्या विषयी जरा देखील अनुकंपा नाही.

अनुस्वार's picture

30 Jun 2021 - 11:34 pm | अनुस्वार

भान जागेवर असणाऱ्यांनी मरणाचा दरवाजा नजरेआड होऊ न देणे हेच इष्ट.

गुल्लू दादा's picture

1 Jul 2021 - 1:25 am | गुल्लू दादा

चांगली ओळख . मिळाल्यास नक्की वाचणार. धन्यवाद.

श्याम भूतकर यांनी याविषयी स्वतःच्या आठवणीतून लिहिलेला लेख खाली देतो आहे, या प्रकरणाची नवीन बाजू समजेल.

https://filebin.net/g5cateuuk5tc7frr/pg_shyam_bhutkar.pdf

अनुस्वार's picture

1 Jul 2021 - 10:39 am | अनुस्वार

धन्यवाद. आणखी माहिती मिळाली ‌.

तुषार काळभोर's picture

2 Jul 2021 - 8:55 am | तुषार काळभोर

इतक्या भयानक घटनांच्या सानिध्यात श्याम भुतकर होते. पण नियतीने त्या घटना व भूतकर यांच्यामध्ये जणू पडदा धरला होता. एकावेळी सर्वांची आयुष्ये, घटना एकमेकांना समांतर सुरू होत्या.
अभिनवचे तेव्हाचे सर्वच विद्यार्थी. विचित्र अवस्थेतून गेले असतील सर्वच.

गुल्लू दादा's picture

2 Jul 2021 - 11:06 am | गुल्लू दादा

मनो pdf दिल्याबद्दल खूप आभारी आहे. एका दमात वाचून काढली. कधीकधी आपली चूक नसताना पण दुसऱ्याच्या चुकांचे ओझे आपल्याला आयुष्यभर मिरवावे लागणे यासारखे दुःखच नाही.

गॉडजिला's picture

2 Jul 2021 - 3:54 pm | गॉडजिला

...

चौथा कोनाडा's picture

15 Jul 2021 - 6:44 pm | चौथा कोनाडा

मनो,

ते पुस्तक तिथं दिसत नाहीय !
This bin is no longer available. असा त्रुटी सन्देश दिसतोय !
(मी हे वाचलेलं आहे ! )

इथं तो " श्यामची गोष्ट्" हा त्यांनी लिहिलेला लेख "बोभाटा" या साईटवर बुक फॉरमॅट मध्ये वाचायला मिळेल !
हा लेख मुळतः "“चिन्ह” २०१२ च्या अंकात छापून आला होता !
चिन्ह हे कला विषयाला वाहिलेले प्रख्यात नियतकालीक आहे, आणि श्याम भुतकर हे नेपथ्यकार असल्यामुळे कलेचा संदर्भ अर्थातच आहे !
लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे !

https://www.bobhata.com/lifestyle/story-joshi-abhyankar-serial-murders-2...

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jul 2021 - 8:38 am | ज्ञानोबाचे पैजार

बहुतेक त्यांना फाशी देण्याच्या आधी हे पुस्तक प्रकाशित झाले होते, त्या नंतर मात्र या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती.
पेपर मधे या हत्याकांडा विषयी सारखे वाचून या चौकडी बद्दल एक मत बनले होते त्यामुळे असेल कदाचित पण त्यावेळी तरी अजिबात आवडले नव्हते.
या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत हे माहित नव्हते.
पुन्हा एकदा वाचावे लागेल.
पैजारबुवा,

अनुस्वार's picture

1 Jul 2021 - 10:40 am | अनुस्वार

आता(२०२१) वेगळे जाणवेल अशी खात्री वाटते‌.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2021 - 8:44 am | श्रीगुरुजी

हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हाच वाचले होते. साळसूदपणाचा आव आणून आपण सज्जन असूनही मित्रांच्या नादाला लागून दुर्दैवाने या हत्याकांडात अडकलो असा आव आणला आहे.

सुरसंगम's picture

1 Jul 2021 - 1:20 pm | सुरसंगम

नाना पाटेकर आणि मोहन गोखले यांचा माफीचा साक्षीदार हा चित्रपट यावरच आहे.
मुन्नावर ची भूमिका मोहन गोखले यांनी केली होती.

सामान्यनागरिक's picture

1 Jul 2021 - 1:50 pm | सामान्यनागरिक

आणि तुमच्या सारखे/आमच्यासारखे लोक असलं तत्वज्ञान (?) वाचुन त्यांचं उदत्तीकरण करतात.
अश्या माणसांनी लिहीलेली पुस्तके वाचण्याची इच्छा झालीच कशी ?

असेच लोक मग संजय दत्त, अफ़्झल गुरु अश्यांना नंतर सहानुभूती दर्शवतात...... आणि त्यांना चूप करण्या ऐवजी आपण चर्चा करतो.

दोन्हींची सरमिसळ नको. ऋग्वेदात 'आमच्याकडे सर्व दिशांनी ज्ञान यावे' अशी प्रार्थना आहे. विचार व्यक्त करणे कुणालाच निषिद्ध असू शकत नाही.

तुषार काळभोर's picture

1 Jul 2021 - 2:48 pm | तुषार काळभोर

यांच्या प्रतिसादांशी सहमत.
करून सवरून तत्वज्ञान सांगायला काही जात नाही.
अशी पुस्तके आवडणे-न आवडणे ही वैयक्तिक आवड झाली.
मात्र, अशा व्यक्तींनी पुस्तके लिहूच नयेत, ही बळजबरी नको. दुसरी बाजू, कितीही अयोग्य, चुकीची असली तरी ती उपलब्ध होणे काही अयोग्य नाही.

स्पार्टाकस's picture

1 Jul 2021 - 7:09 pm | स्पार्टाकस

मुनव्वर शहाचं हे पुस्तक म्हणजे स्वत:च्या कृत्याचं समर्थन करण्याचा निर्रगल प्रयत्न आहे.
या केसमागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर नारायण पुरोहित यांचं 'ओ. के. बॉस' हे पुस्तक वाचा.

हे पुस्तक कुठे मिळेल? Online तरी काही मिळत नाहीये.

योगेश कोलेश्वर's picture

14 Jul 2021 - 4:53 pm | योगेश कोलेश्वर
बबन ताम्बे's picture

2 Jul 2021 - 7:09 am | बबन ताम्बे

मला वाटते 1983 की 84 साली हे पुस्तक आले. त्यावेळी वाचलेय मी. त्यातली खुनाची वर्णने अंगावर काटा आणतात.

बबन ताम्बे's picture

2 Jul 2021 - 7:09 am | बबन ताम्बे

मला वाटते 1983 की 84 साली हे पुस्तक आले. त्यावेळी वाचलेय मी. त्यातली खुनाची वर्णने अंगावर काटा आणतात.

आंद्रे वडापाव's picture

2 Jul 2021 - 10:02 am | आंद्रे वडापाव

5

Paanch (English: Five) is an 2003 Indian crime thriller film written and directed by Anurag Kashyap and starring Kay Kay Menon, Aditya Srivastava, Vijay Maurya, Joy Fernandes and Tejaswini Kolhapure. The film is "loosely" based on the 1976–77 Joshi-Abhyankar serial murders in Pune.

गॉडजिला's picture

2 Jul 2021 - 3:57 pm | गॉडजिला

म्हणुनच या सिनेमाला सेन्सोरने परवानगी नाकारली होती मग कश्यपने स्वताच हा चित्रपट ओनलाइन लिक केला. यातील केके मेननचे मै खुदा गाणे अफलातुन रॉक आहे.

कश्यपने परत याच चित्रपटाचा शैतान नामक रिमेक केला होता... पण माफिचा साक्षिदार हा चित्रपट वास्तवतेच्या ज्यास्त जवळ जातो.

अनुस्वार's picture

6 Jul 2021 - 11:02 pm | अनुस्वार

नुकताच 'माफीचा साक्षीदार' आणि 'पांच' पाहिला. दोन्ही चित्रपट जबरदस्त आहेत. माफीचा साक्षीदार जवळपास पूर्णपणे जक्कलच्या टोळीवर आधारित आहे. पांच तर या प्रकरणाशी अजिबात संबंधित वाटला नाही. आणि हो, "मै खुदा.." अफलातून गाणे आहे.

गामा पैलवान's picture

15 Jul 2021 - 7:21 pm | गामा पैलवान

अनुस्वार,

पुस्तकपरिचय करवून दिल्याबद्दल आभार. पुस्तक वाचतांना ते घडलेल्या घटनांचं वर्णनात्मक स्पष्टीकरण म्हणून वाचलं पाहिजे, समर्थन म्हणून नव्हे. असं एकंदरीत वाटतं चर्चा वाचून.

आ.न.,
-गा.पै.