http://www.misalpav.com/node/46054
१.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........
———————॰————
२.बऱ्याच दिवसांनी हे काका परत आले होते , तपासलं आणि फाईल बघीतल्यावर औषधांसंबधी बोललो, पुढे हे विचारलं की बीडी बंद केली की नाही ? सध्या लाॅकडाऊनमुळे बीडी मिळत नसेल म्हणून सुटली असेल तर काका म्हणाले नाही हो डाॅक्टर अजून चालू आहे. मी आश्चर्यानी विचारलं की पण सगळी दुकान/टपऱ्या तर बंद आहे मग कसं काय बीडी पिताय ? त्यावर थोडंस ओशाळून म्हणाले माझंच बीडीचं दुकान आहे ..... मी त्यांना फक्त नमस्कार केला .
———————-॰———————
३.हा २८ वर्षांचा तरूण कोव्हिड निगेटिव्ह टेस्ट असा डिस्चार्ज पेपर घेऊन आला होता. त्याला तपासतांना तक्रार करत होता की ज्या दवाखान्यात ॲडमिट होतो तिथे कोणीच लक्ष देत नव्हतं म्हणून डाॅक्टरांच्या सल्ल्याविरूद्ध सुटी घेऊन आलो! मी तपासणी झाल्यावर त्याचाशी बोललो “ तुला कल्पना आहे का की तू किती नशिबवान आहेस ? तुला न्युमोनियासाठी ॲडमिट केलं गेलं होतं आणि रिपोर्ट निगेटिव्ह आलाय, तुझा रिपोर्ट जर पाॅझिटिव्ह आला असता तर डाॅक्टरांनी सतत लक्ष ठेवलं असतं कदाचित वाॅर्ड मध्ये न ठेवता आयसीयूत ठेवावं लागलं असतं! बाकी गोष्टींचा तर विचारच करू नको आणि तुला सकाळ संध्याकाळ तपासणाऱ्या डाॅक्टर्स चा विचार केलास का ? कश्या परिस्थित कामं करत आहेत, त्यांच्या घरच्यांना किती काळजी वाटत असेल त्याहीपेक्षा त्या डाॅक्टरांना सतत ही धाकधूक आहे की आपल्यामुळे घरी कोणाला तर लागण होणार नाही ना ? ह्या नंतर परत कधीही डाॅक्टर लक्ष देत नव्हते हे बोलायचं नाही.”
मी सहसा रागावणं टाळतो पण हा ॲटिट्यूड मी अजिबात सहन करू शकलो नाही.
————————-॰——————-
४.नवरा बायको दोघही ताणातच होते, बायकोला दिड महीन्यापासून खोकला आणि घश्याचा त्रास होता , त्यासाठी त्यांच्या गावातल्या ५-६ दवाखान्यांमध्ये दाखवूनही फरक पडलेला नव्हता म्हणून माझ्यानावाची चिठ्ठी घेऊन आले होते. सविस्तर माहिती घेतल्यावर लक्षात आलं की बाई प्रचंड ताणात होती , नवरा नुकताच जिवघेण्या अपघातातून वाचला होता आणि करोनाचं थैमान ही दोन मुख्य कारणं स्पष्ट दिसत होती. तिचा ॲसिडीटीचा त्रास कैक पटीनी वाढला होता
आणि फक्त तेवढ्यामुळे तिचा खोकला घश्याचा त्रास सुरू झालेला होता, नेमकं हे कोणालाच जाणवलं नाही ह्याचं मला वाईट वाटलं. मी त्या दोघांनाही समजावून सांगितलं की हा त्रास नेमका काय आहे, आपण ह्यानंतर काय ईलाज करणार आहोत; सगळ्यात महत्वाचं की आजपर्यंत केले गेलेल्या सगळ्या रक्ताच्या तपासण्या , एक्स रे चे रिपोर्ट नाॅर्मल आहेत. आज तरी तुम्हाला करोनाची लागण झालेली नाही व जिवाला धोका नाहीये. त्या दोघांच्या चेहेऱ्यावरचा ताण निवळतांना दिसला आणि निघतांना बाई एवढंच बोलली की आताच ५०% बरं वाटायला लागलंय.
————————-॰——————
५.रूटिन ओपिडी चालू होती तेव्हा एक पेशंटचा फोन आला आणि त्या बाईंनी खूप काळजीच्या आवाजातच विचारलं “डाॅक्टर गेले दोन महीने सारखा खोकला आहे, बऱ्याच ठिकाणी फोन करून विचारलं तर दाखवायला नका येऊ म्हणताहेत तुम्ही बघाल का ?” मला त्यांची अडचण लगेच कळाली म्हणून म्हणालो “या कधीही या, हवं तर आता येऊ शकता. मी खोकल्याचे पेशंट रोजच पाहतो आहे.”
त्या बाईंना तपासलं एक्सरे व रक्ताच्या टेस्ट करून औषधं दिली आणि आधार देतांना एवढंच म्हणालो काळजी करू नका १-२ दिवसात पूर्ण आराम पडेल.
———————-॰———————-
गेल्या अडीच महीन्यात जवळ जवळ ८००-८५० पेशंट बघीतले , त्यापैकी केवळ दोन पेशंटनी आवर्जून म्हटलं डाॅक्टर फार अवघड परिस्थित काम करत आहात , तुमचे खूप आभार... बरेच जणांनी जरी म्हटलं नसलं तरी त्यांचे डोळे बोलून गेले ... माझं हे म्हणणं नाहीये सगळ्यांनी असं म्हणायला पाहीजे किंवा सोशल मिडीयावर लिहावं,पण जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. मला त्या दोन पेशंट व्यक्त केलेल्या भावनांनी भरून पावल्यासारखं झालं _/\_.
_____________________________________
प्रतिक्रिया
28 Jun 2020 - 9:00 pm | गवि
सुंदर लेखन. खरोखरच खूप अवघड परिस्थितीत काम करत आहात. __/\__
28 Jun 2020 - 9:39 pm | प्रशांत
+१
29 Jun 2020 - 1:47 pm | राजाभाउ
खरच +१
29 Jun 2020 - 1:50 pm | मूकवाचक
+१
28 Jun 2020 - 9:13 pm | शलभ
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.
28 Jun 2020 - 10:50 pm | सौ मृदुला धनंजय...
खूप खूप धन्यवाद डॉक्टर
29 Jun 2020 - 7:07 am | भ ट क्या खे ड वा ला
फारच कठीण परिस्थितीत सतत काम करत आहात तुम्ही सर्वच आरोग्य सेवक. दंडवत तुम्हा सर्वाना .
29 Jun 2020 - 7:11 am | दिगोचि
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.
29 Jun 2020 - 8:14 am | प्रमोद देर्देकर
लेख बऱ्याच दिवसांनी का आला त्याचे कारण समजले. खूप खूप धन्यवाद.
या दिवसांत सेवा देणाऱ्या तुम्हा सर्वच लोकांना सादर प्रणाम.
29 Jun 2020 - 12:43 pm | रातराणी
+1
आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_
29 Jun 2020 - 12:04 pm | अरिंजय
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे.
सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.
29 Jun 2020 - 2:11 pm | सोत्रि
थॅंक्यू डाॅक्टर!
- (आभारी) सोकाजी
30 Jun 2020 - 1:50 am | वीणा३
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.
30 Jun 2020 - 3:23 pm | जेम्स वांड
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो
ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड
5 Jul 2020 - 3:58 pm | palambar
डाक्ट्रर खरच तुम्हि आहात म्हणुन जग सुरळित चाललयं.
6 Jul 2020 - 1:34 pm | चौथा कोनाडा
खूप खूप धन्यवाद डॉक्टर !
तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद !
असेच अनुभव लिहीत रहा !
10 Jul 2020 - 9:48 am | शित्रेउमेश
_/\_ खूप मस्त लेखमाला..
डॉक्टर तुम्हाला मनापासुन धन्यवाद....
11 Jul 2020 - 3:50 pm | सविता००१
खरंच फार सुंदर लिहिलय.
आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे.
ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक.
_________/\__________
5 Aug 2020 - 1:46 pm | स्वराजित
__/\__