दोसतार-१३

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
30 Jun 2018 - 1:22 pm

मागील दुवा https://www.misalpav.com/node/42845

विनू अरे हात पाय धूवून घे की. आणि हे दप्तर का असे फेकले आहेस? त्या स्लीपर अगोदर नीट कोपर्‍यात काढून ठेव. आई आतून बोलावत होती.
तुला रात्री जेवायला ताम्दळाची खीर चालेल ना?
कुई कुई..........
काय? कुई कुई काय . काय म्हणतो आहेस नीट सांग.
कुई.
परत तेच.
मी त्या काळी कुत्रीच्या पिललांचा विचार करत होतो आणि त्या नादात आईला होय म्हणायच्या ऐवजी कुई कुई म्हणत होतो.
आज बहुतेक ती पिल्ले स्वप्नातही येणार.

पुस्तके नसल्यामुळे शाळेचा अभ्यास वगैरे अजून काही सुरू झालेले नव्हते. पण झोपायच्या अगोदर देवासमोर "शाम्ताकाराम भुजग शयनं " म्हंटले रात्री झोपताना स्वैपाक घरातला दिवा मालवल्यावर देवासमोरचा दिवा मिट्ट काळोख होऊ देत नाही. तो आपल्याला अचानक दिसेनासे होऊ देत नाही. त्या निरांजनाच्या उजेडात देव काही वेगळाच दिसतो. रांगणार्या बाळकृष्णाची सावली पुर्ण देवघर व्यापून रहाते. आणि त्या बालकृष्णाच्या पितळी चेहेर्यावर एक प्रकाराचे तांबूस तेज चमकत असते. शांताकारं भुजगशयनं मधले " योगिभिर्ध्यानगम्यं" म्हणजे ते तेज हे आज्जीने एकदा मला सांगितले होते. देव आपल्यासोबतच असतो. तो आपल्याला नेहमीच पहात असतो आपण जे काही करू ते जर दृढ निश्चयाने केले तर देवही आपल्याला तथास्तू म्हणतो. गाणं म्हणताना ही ते मनापासून म्हंटले की देव आपल्याला ऐकत असतो.
झोपताना कोणीतरी सोबत आहे हे समजले की मग कसलीच भिती वाटत नाही. आज्जीची गोधडी पांघरून झोपल्यासारखे वाटते.
सकाळी सर्वात अगोदर ऐकू येते ती रेडीओवरची ती धून. त्या नंतर सकाळचे सहा वाजून पंचावन्न मिनिटे होत आहेत. "इयं आकाशवाणी , सम्प्रती वार्ता: श्रुयंताम. प्रवाचक बलदेवानंद सागरः..... सुधा नरवणे आपल्याला प्रादेशीक बातम्या देत आहेत. रेडीऑवरचे हे बातम्या देणारे लोक घरी कधी जात असतील? इतक्या सकाळी बातम्या त्याना कुठून मिळत असतील? की पाटणला नागू गवळी जसा ताज्या दूधाचा रातीब घालायला जायचे म्हणून भल्या पहाटे पाच वाजता यायचा ;तसा यानाही कोणीतरी ताज्या बातम्यांचा रतीब घालत असेल.
अरेच्चा सकाळ झाली की. पण मग काळी कुत्रीची पिल्ले स्वप्नात का आली नाहीत. की त्याना काळी कुत्रीने स्वप्नातही कुणाकडे जायचे नाही म्हणून सांगीतलंय.
योग्याला विचारायला हवं. की मग रमेश ने त्या पिल्लाना त्याच्या स्वप्नात थाम्बवून ठेवलं असेल? असे होत असेल का? समजा कोणी असे कोणाला त्यांच्या स्वप्नात थांबवुन ठेवले तर त्यांचे काय होत असेल दुसर्या दिवशी.
चला आत्ता शाळेत जायची वेळ होईल तासाभरात बघताबघता. पुस्तकं नाहीत त्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे काहीच होत नाही. दप्तर म्हणजे नावाला एक वही आहे. ते पण गेल्या वर्षी च्या वह्यांमधून शिल्लक उरलेली कोरी पाने शिवून केलेली. सर्व विषयांसाठीची. कोणत्याही पानावर काहिही लिहा. रफ वही. या वहीत अचानक मधेच कधीतरी एखाद्या वेळेस चुकार मुलगा सापडावा तशी गेल्या वर्षी केलेल्या काही गणिते वगैरे सापडतात. एखाद्या पानावर " पक्या आज गुरुजी लैच पिदवून घेताहेत.
माझी पेन्सील आणलीस का? सुट्टीत देईन. आत्ता विसरलो आहे. तो बबन्या बघ त्याचे तोंड नेहमीच उघडे असते , शाळेच्या छोट्या फाटकासारखे." वगैरे वर्गात उघडपणे बोलता येत नाही म्हणून वहीत लिहून केलेल्या गप्पा सापडतात. असे काही सापडले की पुन्हा एकदा गेल्या वर्षाच्या वर्गात बसल्यासारखे वाटते.
आज आईने डब्यात मला नेहमी आवडणारा पोळीचा चिवडा दिलाय. मोठ्या सुट्टीपर्यंत दम निघायला हवा. मागच्या वेळेस मी तो तास चालू असतानाच संपवला होता.
वर्गात आलो . एल्प्या आणि टंप्या दोघेही दप्तरात काहितरी शोधत आहेत. काहितरी वाचताहेत. अरे हो . एल्प्या आणि तो दोघेही काहितरी भारी आणणार होते ना. खरेच की.
काय रे.
कुठे काय?
अरे तुम्ही काल शाळा सुटल्यावर एकदम बुंगाट पळत गायब झालात.
हो. कामंच तसे होतं.
तसं म्हणजे?
बुंगाट पळत जाण्यासारखं
" घाईची लागली होती? " मी
ए हॅट. घाईची लागल्यावर इतक्या जोरात पळता तरी येते का कुणाला? एल्प्या .
घाईची लागल्यावर इतक्या जोरात सोड नुसतं भरभर चालून दाखव फक्त. ते पण जमत नाही. टंप्या.
या मुकेश खाडे ला विचार. जोरदार अनुभव आहे त्याला. गेल्या वर्षीचा. ह्या ह्या ह्या.....
मग तुम्ही पळालात कशाला?
ते आमचं गुपीत आहे.
ते तुम्ही कुणाला सांगितलं नाही तर त्याचा उपयोग काय?
पहिल्याला तासाला समजेल. तो पर्यंत गुपितच
ठीक आहे बुवा. तुम्ही काय..... एवढे बोलून मी गप्प झालो पण मनात त्यांच एकाय गुपीत असेल याची उत्सूकता होतीच.
तास सुरू झाल्याची घंटा झाली, जनगनमन झाले. सोनसळे मास्तर वर्गावर आले. हजेरी झाली.
काय रे पुस्तके मिळाली का कुणाला? वर्गात शांतता. एल्प्या आणि टम्प्या चुळबुळत होते.
काय झालं पाटील. तुला मिळाली वाटते पुस्तके.
हो सर.
वर्गातल्या सगळ्यांच्या नजरा एल्प्या कडे. एल्प्या पण आज एकदम भावात. जणू काही त्याने मेरु पर्वत उचलून आणला असावा. चूक नव्हते काही त्यात. कारण जे वर्गात कोणालाही जमलं नव्हतं ते एल्प्याने केलं होतं.
बघु. इकडे आण नवीन पुस्तक कसं आहे ते तरी पाहुया.
एल्प्याने सूरतेच्या लुटीचा खजिना काढावा तसा दप्तरातून एक बाइंड केलेले पुस्तक काढले. आणि ते सोनसळे मास्तरांच्याकडे दिले.
त्यानी ते पुस्तक घेतले आणि ते उघडून चाळायला लागले. स्वतःशीच हसले आणि त्यानी ते पुस्तक टेबलावर ठेवून दिले.
वा छान..... कल्पना चांगली आहे. मास्तरंच्या या उद्गारानी एल्प्याची वर्गात एकदम हवाच झाली.
पण हे पुस्तक नाही चालणार रे. हरकत नाही. आपण आजच्या तासाला या पुस्तकातून शिकवू या.
आणि ते कविता म्हणू लागले.

रंगात ती रंगुनी आली . लेवून सूर्य बींब भाळी
निळ्या आकाशा रंगवण्या , रंग केशरी उधळीत आली.
हिरवे माड, हिरवे गवत, हिरवा शालू सृष्टी ल्याली.
कुठे ढगांना गुलाबी साज, कुठे रुपेरी किनार आली
पूर्व दिशेला पोटासाठी बगळ्यांची ही गर्दी चालली.
पाखरांना ही जाग आली, किलबील त्यांची सुरू झाली.
प्राजक्त केशरी, झेंडू पिवळा, खुळी गुलाबी सदाफुली.
लाल जर्द कर्दळी देखणी , गुलमुक्षी ही लाली ल्याली.
पांढरा फुलोरा तगरीचा , जमिनीवर या तारकांचा
जास्वंदी ती लाल फुले, फुले गोकर्णाची निळी.
गूज केशरी सांगत बसते, ना़जूक ती बोलकी अबोली
सोन्यासम हा सुगंध लेवून चाफा होतो सोनसळी
रंग आकाशी, रंग धरतीवरी , रोजच होते रंग बावरी,
पहाट होता जग हे जागे, रंगांची ही खेळे होळी
रंग फुलांचे ,स्वप्नांचे ही जागवीत आली
फुलपाखरे बनुनी जीवन जगण्या निघाली
तुझ्या मनाचे स्वप्न दावण्या सृष्टी ही जागी झाली
जाग रे मानवा तू ही . स्वप्न पूर्तीची वेळ झाली
कामास तू लाग रे. बघ ही रम्य पहाट झाली.

कविता वाचता वाचता काय झाले कोण जाणे, सोनसळे मास्तरांनी हातात रंगीत खडू घेतले आणि ते फळ्यावर एक एक फुलांचे चित्र काढू लागले. झेंडू , गुलाब, सदाफुली, मोगरा , अबोली, जास्वंदी, सोनचाफा तगर, .... किती तरी. तळाला थोड्या थोड्या रेघा मारत हिरवे गवत काढले. इतका वेळ कलकल करणारा वर्ग शांत झाला. सोनसळे मास्तरांनी म्हंटलेली कविता फळ्यावर दिसायला लागली. त्या गवतामधे काही पांढरे ठिपके देत गवत फुले काढली. नुसत्या शब्दांनी ही आमच्या डोळ्यापुढे आली झाली होती. फळ्यावर तीच साक्षात दिसायला लागली. मला पाटणच्या घाटातली पावसाळ्यातले हिरवेगार डोंगर दिसू लागले. त्यातला ओला कच्च वारा जाणवू लागला. वार्‍याने हलणारे गवत, वार्‍याचा तो भणभण आवाज. आणि हवीहवीशी वाटणारी शांतता. कुठेतरी लांब दरीतल्या गावात लाऊड स्पीकरवरून वाजणारे गाणे.
वर्गातल्या प्रत्येकालाच जणू कुठलेना कुठलेतरी डोंगर आठवत होते, फुले आठवत होती. प्रत्येकजण कवितेच्या गावातच रहायला गेला होता जणू. मस्त तंद्री लागली होती. हा तास संपूच नये असे वाटतय. वेळ थांबवून ठेवावासा वाटतोय.
कविता इतकी छान असते हे कधी माहितीच नव्हते.
आत्तापर्यंतच्या कविता नुसत्या पाठ केल्या, फार तर " मेरा दिल ये पुकारे आजा " या गाण्याच्या चालीवर म्हंटल्या, त्यातल्या शब्दाम्कडे कधी लक्ष्यच गेले नाही.
संदर्भासह स्पष्टीकरण द्या, कोण कोणास म्हणाले, कवी असे का म्हणतो , कवीतेतला कालखंड , वृत्त, मात्रा , अक्षरगण वगैरे प्रश्नांची फोड करत डोकेफोडच करुन घेतली.
शाळेत जसा निबंध लिहायला शिकवतात तशी कविता लिहायला का शिकवत नाहीत. मधल्या सुट्टीत सोननसळे मास्तरांना कविता करायला शिकवाल का असे विचारायचे.
घण घण घण. तास संपल्याची घंटा झाली.
ऑ..................... शी!!! संपला पण तास. मुलींच्या बाकावरून वैजयंती मोठ्याने म्हणाली. प्रत्येकाच्याच मनात हे वाक्य म्हणायचे होते तीन मोठ्याने म्हंटले इतकेच.
सोनसळे सर गालात हसले. हरकत नाही आपण पुढच्या तासाला नवी कविता पाहू.
पुढच्या तास इनमादार सरांचा. ती आल्याआल्या फळा पुसतात. त्यानी फळ्यावरचे चित्र आज तरी पुसू नये म्हणून, वैजयंती , माधुरी, सोनाली , अंजी ,यांनी फळ्या भोवती उभे रहायचे ठरवले.
आम्ही पण सरांना फळा पुसू नका म्हणू विनंती करणार आहे. हे सगळं कुणीही न सांगता. न ठरवता.
अर्थात इनामदार सरांनी फळा पुसला तरी फरक पाडणार नव्हता. ती कविता आणि फळ्यावराचे चित्र मनात इतके भरून आहे की कुणीच ते पुसू शकणार नाही.

क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

30 Jun 2018 - 3:50 pm | शाम भागवत

मस्त.

Ram ram's picture

30 Jun 2018 - 6:41 pm | Ram ram

liked very much.

सस्नेह's picture

1 Jul 2018 - 4:06 pm | सस्नेह

सुंदर.

विजुभाऊ's picture

2 Jul 2018 - 4:29 pm | विजुभाऊ

धन्यवाद

शलभ's picture

3 Jul 2018 - 1:55 am | शलभ

सुंदर लिहिताय.

सुधीर कांदळकर's picture

3 Jul 2018 - 6:53 pm | सुधीर कांदळकर

मस्त जमलेली मैफल, संपूच नये अशी वाटणारी. धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

10 Jul 2020 - 4:12 pm | चौथा कोनाडा

वाह, सुरेखच लिहिताय विजुभाऊ !

झोपताना स्वैपाक घरातला दिवा मालवल्यावर देवासमोरचा दिवा मिट्ट काळोख होऊ देत नाही. तो आपल्याला अचानक दिसेनासे होऊ देत नाही. त्या निरांजनाच्या उजेडात देव काही वेगळाच दिसतो. रांगणार्या बाळकृष्णाची सावली पुर्ण देवघर व्यापून रहाते. आणि त्या बालकृष्णाच्या पितळी चेहेर्यावर एक प्रकाराचे तांबूस तेज चमकत असते. शांताकारं भुजगशयनं मधले " योगिभिर्ध्यानगम्यं" म्हणजे ते तेज हे आज्जीने एकदा मला सांगितले होते. देव आपल्यासोबतच असतो. तो आपल्याला नेहमीच पहात असतो आपण जे काही करू ते जर दृढ निश्चयाने केले तर देवही आपल्याला तथास्तू म्हणतो. गाणं म्हणताना ही ते मनापासून म्हंटले की देव आपल्याला ऐकत असतो.
झोपताना कोणीतरी सोबत आहे हे समजले की मग कसलीच भिती वाटत नाही. आज्जीची गोधडी पांघरून झोपल्यासारखे वाटते.

क्या बात है ! क्लासिकच !
कविता आणि मास्तरंनी काढलेलं चित्र, चित्र पुसू नये ही भावना हा प्रसंग सुंदर रंगवलाय !