बांडगूळ - ३

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
16 Oct 2009 - 3:57 pm

बांडगूळ - १
बांडगूळ – २

महसूल राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब मंत्र्यांसाठीच्या निवासात गेले, जाताना त्यांनी एक केलं. आमदार निवासातील खोली सरकारकडून भाड्यानं घेतली आणि तिथं रावसाहेबांची व इतर काहींची सोय झाली. परिवर्तन एकच. आधी बाळासाहेब आतल्या खोलीत रहायचे, आता ती खोली रावसाहेबांना एक्स्क्ल्यूझिव्हली मिळाली.

सव्वा वर्षांनी मंत्रिमंडळात खातेपालट झाला. बाळासाहेबांचं प्रमोशन झालं ते कॅबिनेट स्तरावर. रावसाहेबांचंही ‘प्रमोशन’ झालं. ते आता बाळासाहेबांचे सरकारी वेतन घेणारे स्वीय सहाय्यक झाले. रीतसर. म्हणजे झालं असं की बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या एका कारखान्यात लावून घेतलं आणि तिथून त्यांची आपल्या सरकारी स्टाफवर आयात केली. ती करायची कशी हेही त्यांना रावसाहेबांनीच दाखवून दिलं होतं. बाळासाहेबांनीच त्यांना विचारलं होतं, “आरेस्स, तुम्ही आतमध्ये हवे. बाहेरचं काही खरं नाही. काय आहे, किती नाही म्हटलं तरी मी थोडा जुन्या वळणाचाच. त्यामुळं तुम्हाला सारं काही सांगून कामं मार्गी लावणं अवघड जातं. बांधकाम खात्यातून जाधवला घेतला आपण, पण त्याच्याकडं ते नाही...”

“साहेब, काही नाही. आपल्या एका कारखान्यात माझी नियुक्ती दाखवता येईल. तिथून इकडं डेप्युटेशनवर आणता येतं. तेवढा अधिकार तुम्हाला मंत्री म्हणून आहे.”

बाळासाहेबांना शंका होती. त्यांच्या चेहऱ्यावरच ती वाचून रावसाहेब म्हणाले, “साहेब, तसं केलं की तुमचं काम होईल. फक्त त्या बदल्यात तुम्हाला सरकारी खात्यातून कोणी स्वीय सहायक मिळणार नाही. एवढी तडजोड करावी लागेल.”

खात्याचा सचिव आडवा येणार हे रावसाहेबांना ठाऊक होतं. किती झाले तरी ते बाहेरचेच. त्यावरचा तोडगाही त्यांच्याकडे तयार होता. सीएम. बाळासाहेबांकडून प्रस्ताव येताच सीएमची मोहोर उठली. त्यांना आपल्यासोबत ठेवण्याची ती एक किरकोळ किंमत असते, इतर अनेक किंमतींबरोबरच. ती मोजायला सीएम तयार असतातच.

आणि अशा रीतीनं आर. एस. बोरसे यांच्या नावाचा एक आदेश निघाला, आणि त्यांची सोय बाळासाहेबांच्या मुंबईतील ताफ्यात रीतसर झाली. एक पोटवळण त्या प्रवासात असं झालं होतं. आणि या पोटवळणानं आपण स्थिरावतो आहोत, ही भावना रावसाहेबांच्या मनात निर्माण झाली.
***
राजकारण नेहमी बदलत असतं. सत्ता क्षणभंगूर असते, सत्तेबाहेर राहणं हेही क्षणभंगूरच असू शकतं. राजकारणातले हे 'क्षण' काही वेळा दिवसांचे असतात, काही वेळेस महिन्यांचे, काही वेळेस वर्षांचे. पण कायम काहीही नसतं. सारं काही बदलतं.

या नोकरीतील पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेस रावसाहेबांनी बाळासाहेबांच्या मतदार संघात पहिल्यांदा खऱ्या अर्थाने प्रवास केला. याआधी ते त्यांचे सहायक या नात्यानेच होते, मतदार संघाशी संबंध तसा नव्हता. तो आला पहिल्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि त्याचवेळी रावसाहेबांसमोर काही प्रश्न उभे राहिले.

बाळासाहेबांनी त्यांना एकदा सांगितलं होतं, की ते जुन्या वळणाचे आहेत. माणूस महत्त्वाकांक्षी, पण राजकारण मात्र जुनाट असा त्याचा अर्थ आहे हे मतदार संघात गेल्यानंतर त्यांना कळलं. कदाचित त्याच क्षणी त्यांनी मनाशी काही निर्णय केला असावा.

बदलत्या काळात सहकारी संस्था या राजकीय सत्ताकेंद्रं बनत होत्या, पण त्याकडे सत्ताकेंद्र म्हणून पाहण्याऐवजी कुरण म्हणून पाहण्याची एक प्रथा रुजू लागली होती. बाळासाहेब, खरं तर त्यांची पिल्लावळ त्याला अपवाद नव्हती. आणि एकूणच तीनापैकी पहिल्या कारखान्याचा हिशेब रावसाहेबांसमोर अचानक आला तेव्हा त्यांच्या ते पक्कं ध्यानी आलं.

ऐन निवडणुकीची या धामधूमीतच एके दिवशी कारखान्यावर असताना रावसाहेबांना शोधत तिथल्या पोलीस ठाण्याचे फौजदार आले.

"कंट्रोल रूमवरून मेसेज आहे. सीएमसाहेबांनी औरंगाबादला आज रात्री संपर्क साधायला सांगितले आहे."

रावसाहेब उडालेच. दस्तुरखुद्द सीएम आपल्याशी बोलू इच्छितात? त्यांच्या मनात वादळं सुरू झाली. एक तर सीएमना काय बोलायचे आहे हे कळलेलेच नव्हते. धामधूम निवडणुकीची आहे. त्यात हे कशासाठी? निवडणुकीशी संबंधित काही? आपल्या हातून काही चूक तर झालेली नाही? खात्याशी संबंधित काही काम? पण त्यासाठी तर बाळासाहेबांशी बोलणं झालं पाहिजे. आपण साधे पीए...

रावसाहेंबानी एक केलं, हा विषय त्यांनी ठरवून बाळासाहेबांकडं काढला नाही. ज्याअर्थी सीएमनी त्यांच्याकरता पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून निरोप पाठवला त्याअर्थी आपण ते बोलू नये हेच उत्तम असा कौल त्यांच्या मनानं दिला होता.

मुख्यमंत्र्यांशी बोलायचं तर कोल्हापूर गाठावं लागणार होतं. जवळचं फोन नीट उपलब्ध असणारं ठिकाण तेच. संध्याकाळपर्यंत कोल्हापूर गाठायचं इतकंच त्यांच्या डोळ्यांसमोर होतं. कारखान्यावरून कोल्हापूर दोन तासांचा रस्ता. मोटरसायकलवरून तो प्रवास करतानाही त्यांच्या डोक्यात कल्लोळ सुरू होताच.

मुख्य अभियंत्याचं ऑफिस उघडून घेण्यास रावसाहेबांना उशीर लागला नाही. औरंगाबादला कॉलही झटपट लागला. पहिल्यांदा बंगल्यावर सीएम अद्याप आलेले नसल्यानं तो दुसऱ्यांदा करायला लागला.

"नमस्कार सर. आर. एस. बोरसे बोलतोय..."

"कुठं आहात आत्ता?"

"कोल्हापूर सर."

"बाळासाहेबांशी बोललात याविषयी?"

"नाही सर, तशी त्यांची गाठ झाली नाही. ते फेरीवर होते. मी त्यावेळी कारखान्यावर..."

"ठीक आहे..." रावसाहेबांना क्षणभर कळेनासे झाले. सीएमचा सूर एकदम न्यूट्रल होता. आपण केलं त्याचं सीएमनी स्वागत केलं की त्यांचा त्याला विरोध आहे की आणखी काही? ते विचारात पडले तेवढ्यात सीएमनी आपला पॉज सोडून प्रश्न टाकला.

"काय आहे तिथं परिस्थिती?"

"साहेबांना उत्तम. अडचण नाही. एकूण जिल्ह्यात दोन मतदार संघ सोडले तर आपलाच वरचष्मा असेल..."

"माझ्याकडं रिपोर्ट वेगळे आहेत. बाळासाहेबांचा विरोधक... कोण तो..."

"गोविंदराव शिंदे..."

"हां, गोविंदराव. शेकापचा ना तो... मी ऐकलं की जड जातोय. कारखान्यातील लफडी बाळासाहेबांना महाग जाणार..."

रावसाहेब पुन्हा विचारांत. आपण काय बोलावे? छ्या... आपण उगाच या निवडणुकीच्या झमेल्यात पडलो, एक क्षणभर त्यांना वाटून गेलं. सीएमच पुढं बोलले, "आरेस, मोकळेपणानं सांगा. तुम्ही बाळासाहेबांच्या व्यक्तिगत ताफ्यात असलात तरी आता सरकारमध्येही आहात..." सीएमनी वाक्य अर्ध्यावर सोडून दिलं.

झटक्यात रावसाहेबांमधली कोणत्याही परिस्थितीत स्वतःला तगवण्याची इच्छाशक्ती जागी झाली. बोरविहीर ते धुळे, धुळे ते मुंबईत आमदार निवास आणि तिथून आज कोल्हापूर. प्रवास नुसताच झालेला नव्हता. सीएमनी दिलेला संदेश पुरेसा होता.

"सर, अडचण आहे थोडी हे नक्की. गोविंदरावांचा रेटा पाहता ते विरोधी पक्षाचे आहेत की सत्ताधारी हेच कळत नाहीये..."

"तेच म्हणतोय मी..." सीएमनी पुन्हा एक पॉज घेतला. आपण काही बोलावे का या विचारात रावसाहेब काही क्षण होते. पण सीएमनीच त्यांची सुटका केली. "आरेस, असं करा, निकालानंतर येऊन भेटा. तुमच्या कौशल्याचा अधिक चांगला वापर करता येईल..."

"सर, आत्ता काही स्पेसिफिक करण्याजोगं..."

सीएम हसले, "काही नाही आरेस. बाळासाहेबांकडं लक्ष राहू द्या. चिरंजीव त्यांचे काय करतात याकडे लक्ष राहू द्या. ते आले निवडून तर आपल्याला हवेच आहेत."

ते आले निवडून तर... रावसाहेब विचारांत आणि काही वेळातच सारं काही त्यांच्या लक्षात येऊ लागलं.
***
निवडणुकीचा निकाल ते रावसाहेबांची राज्य लोकसेवा आयोगावर झालेली नियुक्ती यातलं अंतर तसं मोठं, पण रावसाहेबांच्या स्तरावर फारशा घडामोडी नसणारं. राज्याच्या स्तरावर मात्र त्यावेळी घडामोडी झाल्या होत्या. जोरदारच.

सीएमचा पुन्हा शपथविधी झाला. त्यावेळी त्यांनी अवघ्या ८ मंत्र्यांचाच समावेश केला होता मंत्रिमंडळात आणि त्याता बाळासाहेबांचं नाव नव्हतं. बाळासाहेब निवडणुकीत विजयी झाली होते, पण फक्त आठशे मतांनी. निकालापाठोपाठ लगेचच गोविंदरावांनी त्यांच्या इतर काही साथींसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आणि ते पाहता बाळासाहेबांच्या भविष्याविषयीच प्रश्न निर्माण झाला होता. कारखान्यातील गैरप्रकारांनी निवडणुकीत फक्त त्यांची बोलीची किंमत घेतली होती, खरी वसुली यापुढे सुरू होणार हे स्पष्ट झालं.

सीएमच्या शपथविधीनंतरच रावसाहेब सीएमना भेटले, तेव्हा सीएमनी त्यांना फक्त इतकंच सांगितलं होतं, "राज्याची यंत्रणा उभी करण्यासाठी भरती आयोगाच्या कामात अधिक गतिमानता आणायची आहे आणि तिथे तुमचा उपयोग होऊ शकतो. विचार करा आणि सांगा."

रावसाहेबांना विचार करण्याची गरजच नव्हती. कारखाना ते सरकार असा बेभरवशाचा प्रवास करण्यापेक्षा, बाळासाहेबांची हुकमत कमी होत असताना, थेट सरकार हा पर्याय चांगलाच होता.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात बाळासाहेबांचं मंत्रिपद गेलंय, हे नक्की झालं.

कॉंग्रेसमध्ये आलेल्या गोविंदरावांची लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली होती.

रावसाहेबांनी सीएमची पुन्हा भेट मागितली तेव्हा त्यांना तीन दिवस थांबावं लागलं. ठोका चुकलाच. पण तीन दिवसांनी बोलणं झालं आणि सारं स्थिर झालं.

"आरेस, या यंत्रणेला आकार द्यायचा असेल तर आपली मराठी माणसं मोठ्या संख्येनं सरकारमध्ये शिरली पाहिजेत... त्यांना हेरायचं, त्यांच्याकडून तयारी करून घ्यायची आणि पुढं आणायचं हे काम झालं पाहिजे. त्यासाठी तुमच्यासारख्यांची गरज आहे. तुमचा प्रवास मी पाहिलाय. बोरविहीर ते मुंबई. तुम्ही इथं जनसंपर्क अधिकारी म्हणून या. बरंच काही करता येईल..."

सीएमच्या या शब्दांनी रावसाहेबांसमोर मुंबईतील पहिला दिवस उभा राहिला. स्टेशनवरून बाहेर आल्यानंतरचे ते क्षण. त्या पोलिसाला विचारेपर्यंतची धास्तावलेली स्थिती, त्यानंतर टाकलेली पावलं, तिथून बाळासाहेब, मग कारखान्यामार्गे सरकार... आपलं जीवनकार्यच गवसल्यासारखं रावसाहेबांना वाटू लागलं आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी आलं...

"सर..."

"आय अंडरस्टँड. इतक्या संघर्षानंतर इथं पोचताना असं वाटणं स्वाभाविक आहे. पण महत्त्वाचं काम पुढं आहे - जनसंपर्क अधिकारी म्हणून तुम्ही तिथं बरंच काही करू शकाल, पण त्याहीपलीकडं तुमच्याकडून अपेक्षा आहेत. सत्ता राबवणं हे महत्त्वाचं असतं सरकारमध्ये. त्यात तुम्ही इतरत्रही उपयुक्त आहात. तुम्ही कारखाना ते सरकार हा मार्ग जो काढला स्वतःसाठी, असे पर्याय इथं आवश्यक असतात. नवी मंडळी आता मंत्री आहेत. त्यांच्यासाठीही तुमचा उपयोग होईलच..."

हे तर रावसाहेबांच्याच भाषेत 'ओसरी-पसरी' होतं. आपल्याकडं असं आहे तरी काय की ही संधी यावी? रावसाहेबांच्या मनात उमटलेल्या या प्रश्नाचं उत्तर सीएमनी दिलं,

"आरेस, तशी ही गोष्ट खूप छोटी आहे, पण मी तुमच्याशी थेट बोलतोय त्यातच समजून घ्या. तुमच्याकडं क्षमता आहेत. त्या योग्यवेळी योग्य पद्धतीनं आपण उपयोगात आणू. सध्या तुमची गरज आहे ती सुधाकररावांना..."

सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री सुधाकर मुळक. रत्नागिरी - कोकण. सीएमचा माणूस. त्यांनी स्वतःच पुढे आणलेला. लोकसेवा आयोग ही केवळ सोय? रावसाहेबांनी प्रश्न मनात अगदी खोलवर गाडून दिला आणि ते उठले. टेबलाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सीएमचे पाय धरले...

आर. एस. बोरसे यांच्या आयुष्यातील हे चौथं वळण!
क्रमशः

कथासमाजजीवनमानराजकारणअनुभव

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

16 Oct 2009 - 4:10 pm | मदनबाण

व्वा...एकदम झक्क्कास्स्स्स....
ही वळणा वळाणावरची वाट सुंदरच मांडली आहे... :)

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

दशानन's picture

16 Oct 2009 - 4:12 pm | दशानन

असेच म्हणतो...

जबरदस्त चालू आहे.... वेग पण अफाट

प्रसन्न केसकर's picture

16 Oct 2009 - 4:13 pm | प्रसन्न केसकर

उत्तम प्रवाही मांडणी आहे. पण अजुन जरा खोलात शिरा ना राव! रावसाहेब कथेचा गाभा असलेलं पात्र आहे. ते अजुन सशक्तरित्या उभं करता येईल का याचा विचार करावा अशी विनंती.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Oct 2009 - 4:19 pm | llपुण्याचे पेशवेll

प्रसनदाशी सहमत आहे. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

निखिल देशपांडे's picture

16 Oct 2009 - 6:15 pm | निखिल देशपांडे

मोडक मोडक, मस्तच चालु आहे हो...
असेच चालु द्या...

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

स्वाती२'s picture

16 Oct 2009 - 6:38 pm | स्वाती२

चालू दे प्रवास.

अनिल हटेला's picture

16 Oct 2009 - 7:09 pm | अनिल हटेला

पू भा प्र.............:-)

बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

शैलेन्द्र's picture

16 Oct 2009 - 8:09 pm | शैलेन्द्र

सुंदर

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Oct 2009 - 9:42 pm | बिपिन कार्यकर्ते

गोष्ट रंगतेय... पहिले भाग परत वाचले... मस्त चालू आहे.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Oct 2009 - 10:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढे काय झालं?

स्वप्निल..'s picture

17 Oct 2009 - 3:04 am | स्वप्निल..

वाचतोय......

स्वप्निल