आमचे जाधव सर

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
24 Aug 2009 - 4:15 pm

"सर बॉल प्लीज"....... मी त्यांना म्हटलं. सहा फूट उंच, भरभक्कम शरीर, नेव्ही ब्ल्यू रंगाचा ट्रॅक-सूट घातलेल्या त्या चाळिशीच्या व्यक्तीला आधी कधी शाळेत बघितलं नव्हतं. दोन धारदार घारे डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते.

"सर..... बॉल प्लीज"

"इकडे ये". त्यांचं त्या टेनिस चेंडूकडे लक्ष सुद्धा नव्हतं. मी जवळ गेल्यावर त्यांनी मला विचारलं "काय रे हिरो..... व्हॉलिबॉल खेळणार का"?

हा प्रश्न अनपेक्षित होता. "व्हॉलिबॉल"? मी विचारलं. तेवढ्यात आमचे पी टी चे लिम्हण सर आले. म्हणाले. "हे जाधव सर आहेत. तुम्हाला व्हॉलिबॉल शिकवणार आहेत. आपल्या शाळेची टीम तयार करायची आहे. बोलव तुझ्या वर्गातल्या सगळ्यांना."

आमची सदाशिव पेठेतली छोटी शाळा. प्रत्येक वर्गाची एकच तुकडी. त्यामुळे आम्ही १५-२० पोरं मिळेल ते खेळ खेळायचो. व्हॉलिबॉल खेळणं तर दूरच, कधी नीट लक्ष देऊन बघितला पण नव्हता. सकाळी ६.४५ ला शाळेत येऊन क्रिकेट खेळायचं तर व्हॉलिबॉल खेळून बघू असा विचार करून आमचा ८ वीचा वर्ग आनंदाने तयार झाला. दुसऱ्याच दिवशी झाडून सगळी पोरं बरोब्बर ६.३० ला शाळेच्या छोट्या मैदानावर हजर झाली. फरशी घातलेल्या एका भागात व्हॉलिबॉल कोर्ट आखलेलं होतं... नेट लावायला पोल होते. पण त्यांचा कधी वापर झालाच नव्हता. जाधव सर आधीच आलेले होते. आता कधी एकदा तो व्हॉलिबॉल हातात मिळतोय असं झालं होतं. सरांनी सगळ्यांना रांगेत उभं केलं अन म्हणाले "१० राउंडस इन ५ मिनिटस". "च्यायला पण व्हॉलिबॉल कुठाय"? जेमतेम १० मीटर पळाल्यावर कुंट्याची टकळी सुरू झाली. "बघू रे. देतील की"... त्याला दामटवला.

पण कसलं काय? आमचं "ट्रेनिंग" सुरू होऊन जवळपास पंधरा दिवस तरी व्हॉलिबॉल बघायला देखील मिळाला नाही. व्यायाम, भरपूर पळणे आणि व्हॉलिबॉलचं तंत्र आत्मसात करण्यासाठी 'शॅडो प्रॅक्टिस' मात्र जोरदार चालू होती. आणि मग एक दिवस पहाटे पहाटेच सर चक्क २०-२५ बॉल घेऊन आले. प्रत्येकाच्या हातात एक कोरा करकरीत चेंडू मिळाला. पण प्रत्येकाला एका चेंडूची काय गरज? मग सरांनी चेंडू घेऊन व्यायाम करायला शिकवले. खूप दिवस 'साइड प्रॅक्टिस' चालली. आणि तब्बल एका महिन्यानंतर आम्ही पहिल्यांदा सहा सहा चे दोन संघ तयार करून समोरासमोर खेळायला उभे राहिलो. आणि मग लक्षात आलं की इतके दिवसांच्या सरावामुळे प्रत्यक्ष खेळ शिकायला आम्हाला काहीच अडचण येत नव्हती. जेमेतेम आठवड्याभरात आम्ही तंत्रशुद्धपणे खेळायला लागलो होतो. आंतरशालेय स्पर्धेत आम्ही उपांत्य फेरीपर्यंत पोचलो तेव्हा जाधव सरांनी आम्हाला 'शैलेश रसवंती गृह' मध्ये जंबो ग्लास ऊसाचा रस दिला होता.

त्या आंतरशालेय स्पर्धेनंतर मी सरांच्या क्लबला; 'जिल्हा प्रशिक्षण केंद्र' ला जायला लागलो. स. प. च्या मैदानावर रोज संध्याकाळी ४ नंतर सराव चालायचा. पण शाळेतली सरावाची पद्धत आणि इथली पद्धत ह्यांत जमीन अस्मानाचा फरक होता. एन सी सी आणि आर्मीच्या ट्रेनिंग मध्ये असेल तसा. कोर्टवर पाणी मारणे, रोलर फिरवणे आणि वॉर्म अप मध्येच पाहिला तास जायचा. खेळताना सर अनेक वेळा खेळ थांबवून बारकावे सांगायचे... चुका दाखवायचे... त्या कश्या सुधारता येतील ते सांगायचे... स्वतः करून दाखवायचे. सर स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू होतेच, शिवाय भारताच्या महिला व्हॉलिबॉल संघाचे काही काळ प्रशिक्षकही होते. सर्व्हिस करून पलीकडच्या कोर्टवर ठेवलेला बॉल उडवण्याइतकी त्यांची त्या खेळावर हुकुमत होती. पण कोर्टवर मात्र ते आमच्या बरोबरीने रोलर ओढायचे, पाणी मारायचे.

आमचे जाधव सर कडक शिस्तीचे. खेळताना प्रत्येकाने ११० टक्के प्रयत्न केला पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. कोर्टवर अळमटळम केलेली त्यांना अजिबात खपायची नाही. मला एकदा गेम खेळताना जांभई देताना त्यांनी पाहिलं आणि मग हाताचे पंजे पूर्णपणे जमिनीवर टेकून आणि गुडघे न वाकवता कोर्टला ३ चकरा मारायला लावल्या. नंतर ४ दिवस मला राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं..... घरामध्ये 'कमोड' नसण्याचं ! व्यायाम करतानादेखील सर जाम पिदवून घ्यायचे. खाली आडवं पडायला लावून वरून पोटावर बास्केटबॉल मारायचे. जिम मध्ये घाम गाळायला लावायचे. पण 'गेम' खेळताना मात्र धमाल असायची. स्मॅश मारला आणि गूण मिळाला की सर 'हेय' असं जोरात ओरडायला लावायचे. खेळताना पोरं थोडी ढिली पडतायत असं वाटलं की "बायको वारली काय रे तुझी? मग आवाज देऊन खेळ की".... "अरे पंकज उदास... हातांवरून बॉल मारला त्याने तुझ्या. काही लाज आहे की नाही? " ... "नॅशनल खेळला म्हणजे काय तो सासरा झाला का तुझा.... घाल की शिव्या त्याला" असं काही म्हणून खुनशीनी खेळायला लावायचे. खेळ खऱ्या अर्थाने आनंद घेऊन खेळायला त्यांनी शिकवलं.

दहावीच्या निकालानंतर क्लबची बहुतेक सगळी पोरं स. प. मध्ये गेली. फक्त मी आणि निलेश अरगडे गरवारेत होतो. सरांना म्हणालो "सर आम्ही दोघेच आहोत गरवारेत. बाकी कोणीच खेळणारं नाहीये". त्यावर सर म्हणाले "अरे उदास ! (पंकज उदास हा सरांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय होता)... दोघं आहात ना? रडताय काय? चार पोरं जमवा... १५ दिवस आहेत.... त्यांनी नुसता 'डिफेन्स' केला तरी पुष्कळ आहे. तुम्ही दोघे 'गेम' सांभाळा की. लोकं म्हटली पाहिजेत की जाधव सरांची दोन पोरं सहा जणांना भारी पडतात! " (बाय द वे... आम्ही देखील कोणी "कुठे खेळतोस" विचारलं की DCC वर असं न सांगता "जाधव सरांकडे" असंच सांगायचो. तेव्हा DCC ची पोरं ही "जाधव सरांची पोरं" म्हणूनच ओळखली जायची). आणि खरंच आम्ही दोघांनी १५ दिवसांत संघ तयार केला. ३ सामने जिंकले. उपांत्य फेरीत स. प. लाच पुरेपूर झुंजवलं. त्या दिवशी सर सगळ्यांना सांगत होते "दोघंही माझीच पोरं आहेत! " आमच्या क्लबचे सामने म्हणजे तर अविस्मरणीय प्रकार होता. पुण्यात आमचा संघ सर्वोत्कृष्ट होताच. ज्युनियर संघातून खेळताना आम्ही भल्या भल्या वरिष्ठ संघांना झुंजवायचो. क्वचित हरवायचो देखील. आम्ही काही पोरं जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळलो. मला आठवतंय, सांगलीला झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सच्या मोरे आणि मी पुणे विभागाकडून खेळलो होतो. आम्ही अंतिम फेरी जिंकून देखील आम्हा दोघांचीही राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली नव्हती. आम्ही निराश होऊन पुण्याला परत आल्यावर सरांनी क्लबवर केक आणला होता. तेव्हा झालेलं कौतुक मी आयुष्यात विसरू शकणार नाही.

इंजिनियरिंगला आल्यानंतर देखील कॉलेजची टीम तयार केली. दोन वर्षं खेळलो. पण टीई नंतर खेळणं मागे पडत गेलं. जाधव सर सध्या कुठे असतात कोणास ठाऊक. आज आमच्या जाधव सरांची खूप आठवण येतेय. कारण? कारण आज ऑफिस मध्ये माझ्या कामगिरीबद्दल माझं कौतुक झालं. माझ्या 'टीम स्पिरिट' आणि 'लीडरशिप क्वॉलिटीज'चा विशेष उल्लेख करण्यात आला. आणि हे शब्द ऐकले की पहिल्यांदा जाधव सरच डोळ्यांसमोर येतात. माझ्या सुदैवाने आमच्या छोट्या शाळेत आम्हाला खूप चांगले आणि मायेने शिकवणारे शिक्षक मिळाले. पण आमच्या जाधव सरांइतकं कोणीच आम्हाला 'घडवलं' नसेल. आज लक्षात येतं की ते खरंच एक चालतं बोलतं विद्यापीठ होते. संघभावना, जिद्द, चिकाटी, शेवटापर्यंत हार न मानण्याची वृत्ती त्यांनी आमच्यात बाणवली होती. "अरे काही लाज आहे की नाही"...."घाल की शिव्या त्याला" म्हणताना त्यांनी आम्हाला आमचं काम जीव ओतून करायला शिकवलं होतं. "चार पोरं जमवा.. दोघे 'गेम' सांभाळा म्हणताना आमच्यात नेतृत्वगुण रुजवले होते. डझनावारी राष्ट्रीय खेळाडू निर्माण करणाऱ्या आमच्या सरांचं झारी घेऊन कोर्टवर पाणी मारण आठवलं की त्यांची नम्रता आज जाणवते. आम्हाला ब्राझील, क्यूबा, हॉलंडच्या मॅचेस व्हिडिओवर दाखवण्यामागे त्यांचा सर्वोत्तम बनण्याचा ध्यास आज ध्यानात येतो. अक्षरशः रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या कोणाही उंच मुला मुलीला "व्हॉलिबॉल खेळणार का"? विचारणाऱ्या आमच्या जाधव सरांची खेळाबद्दलची तळमळ आज जाणवते. एखाद्या गोष्टीसाठी 'आयुष्य वेचणं' म्हणजे काय ते आमच्या जाधव सरांकडे बघून समजतं.

सर... ह्या 'शिक्षक दिनाला' नक्की तुम्हाला भेटायला येईन. तुम्हाला शोधणं अवघड नसेल. कारण तुम्ही संध्याकाळी कुठल्या न कुठल्या व्हॉलिबॉल कोर्टवरच असाल.

क्रीडामौजमजाप्रकटनसद्भावनाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

24 Aug 2009 - 4:26 pm | विसोबा खेचर

डझनावारी राष्ट्रीय खेळाडू निर्माण करणाऱ्या आमच्या सरांचं झारी घेऊन कोर्टवर पाणी मारण आठवलं की त्यांची नम्रता आज जाणवते.

सुरेख...!

सुंदर व्यक्तिचित्र...

आपला,
(व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.

स्वाती दिनेश's picture

24 Aug 2009 - 4:32 pm | स्वाती दिनेश

सुरेख लिहिलं आहे,
स्वाती

चतुरंग's picture

24 Aug 2009 - 4:43 pm | चतुरंग

मला आमच्या मल्लखांबाच्या गोपाळे सरांची आठवण झाली.

(मल्ल)चतुरंग

महेश हतोळकर's picture

24 Aug 2009 - 5:27 pm | महेश हतोळकर

लै भारी!
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

अवलिया's picture

24 Aug 2009 - 6:07 pm | अवलिया

सुरेख...! सुंदर व्यक्तिचित्र... :)

--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2009 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख...! सुंदर व्यक्तिचित्र...

घाटावरचे भट's picture

24 Aug 2009 - 6:15 pm | घाटावरचे भट

फारच छान व्यक्तिचित्र.

वेदश्री's picture

24 Aug 2009 - 6:44 pm | वेदश्री

अप्रतिम आठवणी आणि आठवणीतले जाधव सरही. शिक्षक दिनाला आशिर्वाद घ्यावेसे वाटावे असेच शिक्षक. :) अनुभवकथनासहित व्यक्तीचित्र मस्तच रेखाटलेय.

व्हॉलीबॉलच्या एखाद्या रंगलेल्या सामन्याचे असेच रेखाटन वाचायला खूप आवडेल मला. जमवाच लिहायचे. पुलेशु.

आम्हाला खो-खो शिकवणार्‍या लांडगे सरांची आठवण आली हे अनुभवकथन वाचतावाचता. त्यांनी आणि आईने खूप समजूत घालूनही बाबांनी आंतरशालेय खो-खो स्पर्धेत खेळू दिले नाही मला, या फाल्तू गोष्टीत मी वेळ दवडायला नको नावाखाली. बाबांचा कडवा विरोध असूनही लांडगे सरांनी शाळेतल्या शाळेत होणार्‍या स्पर्धांसाठीच्या टीममधून मला काढले नाही, हेच खूप होते तेव्हा! खो-खो म्हणजे धम्माल होती अगदी.

जे.पी.मॉर्गन's picture

25 Aug 2009 - 4:00 pm | जे.पी.मॉर्गन

प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद वेदश्री. आधी मी अश्या एका सामन्याचं वर्णन "ते दोन क्षण - भाग १" ह्या लेखात केलं आहे. आपण तो http://www.misalpav.com/node/8716 ह्या दुव्यावर जरूर वाचा आणि आपली प्रतिक्रिया द्या. खळानी आयुष्यात काय आणि किती दिलं आहे ह्याची मोजदाद करणं अशक्य आहे हो... म्हणून मनातलं कागदावर उतरवायचा प्रयत्न करतो बस !

प्राजु's picture

24 Aug 2009 - 9:55 pm | प्राजु

खूप आवडलं जाधव सरांचं व्यक्तिचित्र!! उत्तम लेखन आहे.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

24 Aug 2009 - 11:57 pm | संदीप चित्रे

व्यक्तिचित्रण आवडलं.
स्वानुभवावरून सांगतोय -- शक्य असेल तर (किंवा शक्य करवून) जाधवसरांना शोधून भेटा. अशी माणसं एकदा दृष्टीआड झाली की मग आयुष्यभराची बोच लागते.

>> तेवढ्यात आमचे पी टी चे लिम्हण सर आले
लिम्हण सरांशी संपर्कात आहात का? ते महाराष्ट्रीय मंडळात होते का?

जे.पी.मॉर्गन's picture

25 Aug 2009 - 4:06 pm | जे.पी.मॉर्गन

धन्य्व्वाद संदीप. लिम्हण सर पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात कुस्ती शिकवायचे. जाधव सरांइतकेच पूजनीय शिक्षक. त्यांच्यामुळे आमची शाळा गेली तब्बल ३०-३२ वर्षं सलग पुण्यात आंतरशालेय कुस्ती स्पर्धेचम अजिंक्यपद मिळवत आली आहे.

आणि हो... जाधव सरांना भेटणार तर नक्की आहे ! जाणीव करून दिल्याबद्दल खरंच धन्यवाद !

बहुगुणी's picture

25 Aug 2009 - 12:25 am | बहुगुणी

फार छान लिहिलेलं व्यक्तिचित्रण वाचून तुमच्या जाधव सरांना शोधून काढावंसं वाटलं, आंतर्जालावर 'Jadhav, volleyball, Pune' अश्या शोधानंतर नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या जागतिक स्पर्धेची ही बातमी मिळाली, त्यात K. J. Jadhav, president, म्हणून उल्लेख सापडला. हेच का ते जाधव सर?

Federation Internationale De Volleyball (FIVB) has selected Pune to be the host of the 15th World Junior Volleyball Men's Championships. The championships will be held from July 31 to August 9, 2009 at the Shiv Chatrapati Stadium at Balewadi and will be organised by the Volleyball Federation of India , The Maharashtra Volleyball Association , the Poona District Volleyball Association and the United Western Sports Foundation. ........

स्पर्धेची आधिक माहिती

या स्पर्धेत भारतीय संघाने म्हणे उत्तम कामगिरी केली. तुमच्यासारखे खेळाडू आणि तुमच्या जाधव सरांसारखे प्रशिक्षक लाभले की हे साहजिकच आहे असं वाटतं!

जे.पी.मॉर्गन's picture

25 Aug 2009 - 4:17 pm | जे.पी.मॉर्गन

आमचे जाधव सर ते नव्हेत. आमच्या सरांचं नाव देविदास जाधव. ते देखील त्या स्पर्धेच्या संयोजनात असणार ह्याबद्दल शंका नाही. पण तुम्हाला सांगतो.... ब्राझील वि भारत सामन्याच्यावेळी पाहिलेला थरार मी आयुष्यात विसरू शकणार नाही. व्हॉलिबॉलसाठी इतकं खच्चून भरलेलं प्रेक्षागृह आधी बघितलं नव्हतं !

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Aug 2009 - 12:57 am | बिपिन कार्यकर्ते

व्यक्तिचित्र आवडले. छानच लिहिले आहे.

बिपिन कार्यकर्ते

अजिंक्य पोतदार's picture

25 Aug 2009 - 3:34 am | अजिंक्य पोतदार

लेख आवडला..फरच छान !!

स्वाती२'s picture

25 Aug 2009 - 4:25 am | स्वाती२

व्यक्तिचित्र आवडले.

पाषाणभेद's picture

25 Aug 2009 - 4:41 am | पाषाणभेद

तुमचे भाग्य, तुम्हाला असे सर लाभले. आमचे दुर्भाग्य आम्हाला असे खेळाचे सर लाभले नाही.

रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

शाहरुख's picture

25 Aug 2009 - 6:59 am | शाहरुख

छान लिहिले आहे..

शाळांमधून खेळाचे शिक्षक बरेचदा अशा स्वभावाचे असतात असे आढळते.

यशोधरा's picture

25 Aug 2009 - 8:29 am | यशोधरा

मस्त लिहिलंय एकदम!

शैलेन्द्र's picture

25 Aug 2009 - 9:08 am | शैलेन्द्र

सुंदर लेखन..

विशाल कुलकर्णी's picture

25 Aug 2009 - 9:28 am | विशाल कुलकर्णी

सुरेख व्यक्तिचित्रण !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विंजिनेर's picture

25 Aug 2009 - 11:02 am | विंजिनेर

सुरेख रंगवलंय चित्र ... अजून येऊद्या...

ज्ञानेश...'s picture

25 Aug 2009 - 11:31 am | ज्ञानेश...

छानच आहे लिखाण..

मॉर्गनसाहेब, तुम्ही सुंदर लिहिता.

"Great Power Comes With Great Responsibilities"

विजुभाऊ's picture

25 Aug 2009 - 1:19 pm | विजुभाऊ

व्वा ! सुंदर व्यक्तीचित्रण.
एकदम डोळ्यासमोर इभे राहिले
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

गणपा's picture

25 Aug 2009 - 2:09 pm | गणपा

मॉर्गन साहेब, जाधव सर एकदम आमचेच वाटले.

sneharani's picture

25 Aug 2009 - 2:17 pm | sneharani

सुरेख व्यक्तिचित्रण. खूप आवडलं जाधव सरांचं व्यक्तिचित्र!! उत्तम लेखन आहे.

श्रावण मोडक's picture

25 Aug 2009 - 10:34 pm | श्रावण मोडक

५ सप्टेंबरला त्यांना भेटून या. त्यानंतर त्यांच्याविषयी अधिक लिहा. हे व्यक्तिचित्र, सुरेख लिहिलेले असले तरी, अपुरे वाटते आहे. अजून येऊ द्या त्यांच्या जगण्याविषयी.

सुप्रिया's picture

2 Sep 2009 - 11:32 am | सुप्रिया

व्यक्तिचित्र आवडले. तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला अश्या सरांचे मार्गदर्शन मिळाले.

सुप्रिया's picture

2 Sep 2009 - 11:34 am | सुप्रिया

दोनदा आल्याने प्र.का.टा.आ.

मदनबाण's picture

2 Sep 2009 - 12:58 pm | मदनबाण

व्वा ! सुंदर व्यक्तीचित्रण...

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html