पीएनामा: झाडाची फांदी आणि एसीआर

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
29 Jul 2023 - 10:17 am

(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे)

(ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) .

त्यावेळी सीएसएसएस केडरमध्ये प्रमोशन दुर्मिळ होते. प्रमोशनसाठी १५ ते २० वर्ष वाट पाहत लागायची. एक पेक्षा जास्त प्रमोशन पीए लोकांच्या भाग्यात नव्हती. फक्त एक मार्ग होता विभागीय परीक्षा पास करणे. वर रिक्त जागा अत्यंत कमी असल्याने, प्रतिस्पर्धा भयंकर होती. २० टक्के मार्क असलेल्या एसीआरचे (कर्मचाऱ्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल) भरी महत्व होते. जर गेल्या पाच वर्षांची एसीआर सर्वोत्कृष्ट (outstanding) नसेल तर लिखित परीक्षा पास होऊन ही प्रमोशनची संभावना शून्य होती. त्यावेळी एसीआर ही गोपनीय होती. काही अधिकारी उत्तम एसीआर लिहली असेल तर पीएला दाखवायचे. उत्तम एसीआर मिळविण्यासाठी पीए अधिकार्‍यांना खुश करण्यासाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ-दहा वाजे पर्यन्त कपाळावर आठी न येऊ देता काम करायचे. अर्थातच मी ही त्याला अपवाद नव्हतो.

त्यावेळी माझी पोस्टिंग एक वरिष्ठ महिला अधिकारीच्या दरबारात झाली होती. तिथे पीएस आणि एक पीए आधीच होता. याशिवाय क्लार्क, एमटीएस इत्यादि. त्याकाळी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकान्श अधिकारी पीए लोकांच्या तिन्ही वर्षाच्या वार्षिक एसीआर बहुतेक शेवटच्या वर्षी लिहायचे. (मोदीजी सत्तेत आल्यानंतर हे सर्व बदलले आहे. आता प्रत्येक वर्षाची एसीआर त्याच वर्षी एका निश्चित अवधीत ऑनलाईन लिहावी लागते). माझी पोस्टिंग सप्टेंबर महिन्यात तिच्या दरबारात झाली तेंव्हा तिचे फक्त सहा महीने केंद्रीय प्रतिनियुक्तीचे उरले होते. पण पीएस आणि दूसरा पीए तीन वर्षांपासून तिच्या अधीन कार्यरत होते.

दिल्लीत डिसेंबर महिन्यात थंडी भरपूर असते. हिवाळ्यात ऊन शेकायला सर्वांनाच आवडते. साहजिक आहे तिच्या म्हातार्‍या आईला ही ऊन्हात बसायला आवडत असेलच. एक दिवस सकाळी येताच तिने पीएस साहेबांना तिच्या केबिन मध्ये बोलविले. तिने आदेश दिला, झाडांच्या फांदींमुळे घरात ऊन येत नाही आहे. त्या कापण्याचा बंदोबस्त करा. एनडीएमसी भागात पावसाळयानंतर ऑक्टोबरच्या महिन्यात झाडांच्या फांद्या छाटण्याचे सरकारी नियमांनुसार ठेके दिले जातात, त्या वेळी एनडीएमसीला फक्त विनंती केली असती तरी काम झाले असते. पण आता डिसेंबर सुरू झालेला होता. पीएस पन्नासी उलटलेला अनुभवी होता. अश्या समस्या त्याने पूर्वीही हाताळलेल्या होत्या. 'ठीक आहे मॅडम, उद्या फांद्या कापण्याचा बंदोबस्त करतो'. ती थोड्या नाराजगीने म्हणाली, कसे करणार??? पीएस- झाडांच्या फांद्या छाटणार्‍यांकडून हे काम करवून घेईल. दोन-एकशे रुपये खर्च येईल. पीएसचे उत्तर ऐकून ती भडकली. एवढ्या मोठ्या कार्यालयात काम करणाऱ्यांना गैरकानूनी काम करताना लाज वाटली पाहिजे.

आता पीएस साहेब काय करणार. एनडीएमसीला पत्र लिहले. दिल्लीत मोठ्या-मोठ्या अधिकार्‍यांनाही पीडब्ल्यूडी, एनडीएमसी आणि स्थानीय प्रशासन घास टाकत नाही (भाव देत नाही). त्यांनी पीएसच्या पत्राला आणि फोनला दाद दिली नाही. वसंत ऋतुत पक्षी घरटे बांधतात त्यामुळे आता फांद्या छाटणे आता शक्य नाही. झाडाच्या फांद्या कापणे अत्यंत गरजेचे असेल तर वन विभागाची अनुमति घ्यावी लागेल, असे उत्तर आले. कागद वन विभागाकडे गेला. लालफिताशाहीत कागद फिरत राहिला. अनेक खेटे आम्ही तिघांनी घातले असेल. अखेर आमच्या प्रयत्नांना यश आले. फेब्रुवारी महिन्यात झाडाच्या फांद्या छाटण्याची अनुमति मिळाली. पीएस साहेब अनुमतिचा कागद घेऊन मॅडमच्या केबिन मध्ये गेले. मॅडमने कागद वाचला आणि त्याचे दोन तुकडे करून केराच्या टोपलीत टाकले. ती रागाने पीएस वर ओरडली. "आता फांद्या छाटण्याची गरज आहे का?" पुढच्या हिवाळ्यात मी इथे राहणार नाही. तुम्ही तीन-तीन नालायक मिळून एक साधे काम करू शकले नाही. मार्च अखेर तिने आम्हा तिघांच्या एसीआर लिहल्या. आम्हाला दाखविल्या नाही. त्या पीएची सलग तीन वर्षांची सीआर तिने लिहली होती.

त्यानंतर त्या पीएची पोस्टिंग एका वरिष्ठ अधिकार्‍यासोबत झाली. पीएच्या नौकरीत त्याचे पाच वर्ष पूर्ण झाल्याने तो पीएसच्या विभागीय परीक्षेसाठी पात्र झाला होता. त्याचा अधिकारी त्याला समोर बसवून त्याची उत्कृष्ट एसीआर लिहायचा. तरीही सतत तीन वर्ष लिखित आणि स्किल परीक्षा पास करून ही त्याचे प्रमोशन झाले नाही. अखेर चौथ्या वर्षी परीक्षा पास झाल्यानंतर त्याचे प्रमोशन झाले. अर्थात चार वर्ष 365 दिवस न चुकता त्याला स्टेनोग्राफीचा अभ्यास करावा लागला (100ची स्पीड टिकवून ठेवण्यासाठी).

अखेर एसीआरचे नियम बदलले. एसीआरची गोपनीयता संपली. एसीआर पाहण्याचा आणि त्यावर टिप्पणी करण्याचा हक्क कर्मचाऱ्यांना मिळाला. एक दिवस त्या पीएचा (आता तो पीएस होता) फोन आला, पटाईत, तुझी तिने लिहलेली एसीआर एकदा तुझ्या कार्यालयाच्या एडमिन मध्ये जाऊन बघ. मी म्हंटले, तुझी एसीआर कशी लिहली होती. तिच्या नावाचा उद्धार करत तिला दोन-चार शिव्या देत तो म्हणाला, तिन्ही वर्षांच्या एसीआरवर तिने फक्त "गुड" असा शेरा दिला होता. एक पीएसाठी 'गुड' ही निकृष्ट एसीआर असते. मी ही एडमिन मध्ये जाऊन तपासले, 39 वर्षांच्या नौकरीत मला मिळालेली एकमेव निकृष्ट '.' शेरा असलेली एसीआर होती. मला ती जुनी एसीआर दाखविणार्‍या बाबूने विचारले, पटाईत, सर, काय भांडण वैगरे केले होते का तिच्याशी. मी उतरलो, नाही रे, तिच्या बंगल्यातील झाडाची फांदी तोडू शकलो नाही. त्याला काहीच कळले नाही, तो फक्त माझ्या कडे पहात राहिला.

संस्कृतीवाङ्मयकथाआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

सरकारी अधिकाऱ्यांना वरून दट्ट्या मिळाला की काहीही क्षणात होते. अशक्य गोष्टी शक्य होतात. फक्त थोडं थांबायचं. सरकारी अधिकारी तीन गोष्टींना घाबरतो.
वरचा आदेश,
बायकोचा आदेश,
राहू काल.

विवेकपटाईत's picture

29 Jul 2023 - 12:12 pm | विवेकपटाईत

एनडीएमसी भागत आईएएस, आइपीएस आणि इतर अधिकार्यांची संख्या प्रचंड आहे। याशिवाय मंत्री ते संत्री. अशा परिस्थितीत नियमानुसार कार्य करणे जास्त रास्त. ते कुणालाच भाव देत नाही कारण एकाला दिला तर दुसऱ्यालाही द्यावा लागेल आणि काम करणे अशक्य होईल.

कुमार१'s picture

3 Aug 2023 - 8:50 am | कुमार१

छान अनुभव.

सुबोध खरे's picture

3 Aug 2023 - 12:10 pm | सुबोध खरे

या ए सी आर चा वरचा रिव्ह्यूइंग अधिकारी आणि सिनियर रिव्ह्यूइंग अधिकारी नसतो का?

असा ए सी आर दिल्यावर आपण तो ए सी आर पूर्वग्रहदूषित आहे म्हणून रद्दबातल (EXPUNGE) करण्यासाठी अर्ज देऊ शकतो.

विवेकपटाईत's picture

5 Aug 2023 - 10:21 am | विवेकपटाईत

सीएसएसएस केडर मध्ये फक्त अधिकारी सीआर लिहतो. रिव्ह्यू होत नाही. सिक्स पे कमिशन रिपोर्ट पूर्वी सीआर ही गोपनीय असायची. वाईट सीआर वर कर्मचारी कडून प्रतिक्रिया मागविल्या जात असे आणि योग्य वाटले तर सीआर मध्ये दुरूस्ती होत होती. पण गुड सीआर ही वाईट नाही. पण विभागीय परीक्षेत २० टक्के वजन(१००%) सर्वोत्तम आणि गुड मध्ये आठ ते नऊ गुणांचा फरक पडतो.

सुबोध खरे's picture

7 Aug 2023 - 7:41 pm | सुबोध खरे

सीएसएसएस केडर मध्ये फक्त अधिकारी सीआर लिहतो. रिव्ह्यू होत नाही.

हायला

हा तर सरळ सरळ अन्याय आहे.

लष्करात आपले INITIATING OFFICER ( IO) रेव्ह्यूइंग ऑफिसर (RO) आणि सिनियर रेव्ह्यूइंग ऑफिसर (SRO) असे तीन वेळेस गोपनीय अहवाल तपासले जातात आणि जर ADVERSE ACR असेल तर त्यावर त्या कर्मचाऱ्यांची सही घेऊनच तो पुढे RO आणि SRO कडे पाठवावा लागतो.अन्यथा तो परत पाठवला जातो.

याशिवाय ए सी आर( ANNUAL CONFIDENTIAL REPORT) हा त्याच वर्षी लिहिला जाणे आवश्यक आहे अन्यथा वरिष्ठ माणसाला जबाबदार धरले जाते.
तीन वर्षांनी ए सी आर लिहिणे याला काहीच अर्थ नाही.

याशिवाय एका हुद्द्यावरून दुसऱ्या हुद्द्यावर बढती असेल तर उदा. लेफ्टनंट कर्नल वरुन कर्नलच्या बढती साठी जितके रिपोर्ट असतील तितके म्हणजेच जर १० वर्षांनी बढती असेल तर दहाच्या दहा रिपोर्ट घेतले जातात त्यातील सर्वात उत्तम आणि सर्वात वाईट रिपोर्ट काढून टाकला जातो आणि इतर रिपोर्ट ची सरासरी करून गुणांकन केले जाते.

यामुळेच बऱ्याच वेळेस एखादा खडूस वरिष्ठ असेल आणि तो आपल्याला वैयक्तिक कामे सांगत असेल तर तर त्याला साफ फाटा मारता येतो.

कारण दर तीन वर्षांनी बदली होत असते म्हणजे हा वरिष्ठ तुमचा एक किंवा फार तर दोन ए सी आर लिहू शकतो. म्हणजेच आपले एकंदर अनेक वर्षांच्या कामाचा दर्जा लक्षात घेऊन आपली बढती होत असते.

मी तर लष्कराच्या विरुद्ध कोर्टात केस केली होती आणि मी माझ्या वरिष्ठांचे कोणतेही नियमबाह्य काम करण्यास साफ नकार देत असे

तरीही शेवटची चार वर्षे (निवृत्त होण्याअगोदर) माझा ए सी आर उत्तमच होता.

कंजूस's picture

3 Aug 2023 - 12:31 pm | कंजूस

अशी एक बंगाली कथाही आहे. घराचे सांडपाणी जिथे नगरपालिका गटाराला मिळते तिथे उगवते पिंपळाचे झाड. ते काढण्यासाठी घरमालक नगरपालिकेच्या खात्याला अर्ज देतो ते काढा. पण काहीच होत नाही. कोणीच येत नाही. मग तो खात्यात विचारतो सायबाला.
"ऑर्डर मी केव्हाच काढली आहे पण तुम्हीच ते झाड काढा आणि सांगा मला म्हणजे मी शेरा मारीन की झाड काढले."
.
.
"तुम्हाला माहितीच असेल ना पिंपळाचे झाड काढले की त्याचा निर्वंश होतो असं मानतात. कर्मचारी कुणीच काढायला तयार नाही. "

.
.
घरमालकच झाड काढून टाकतो.