'पागोळी वाचवा अभियान' शंका आणि समाधान

Primary tabs

सुनिल प्रसादे's picture
सुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं
30 Jul 2019 - 5:09 pm

'पागोळी वाचवा अभियान' हळूहळू पसरत चाललंय. सुरवातीला आम्हाला आमच्या दापोली तालुक्यातूनच त्याबद्दल विचारणा होत होती, परंतु सांगायला आनंद वाटतोय की आता आमच्याकडे सावंतवाडी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चीपळूण, म्हसळा, श्रीवर्धन,अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली पासून ते पुणे, नाशिक, इंदापूर, जुन्नर, नंदुरबार, शहादा, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा, सेलू, परभणी, सांगली, कोल्हापूर पर्यंतच्या लोकांकडून ह्या अभियानाबद्दलची माहिती विचारली जात आहे. आतापर्यंत नऊशेपेक्षाही जास्त लोक ह्या अभियानाशी जोडले गेले असून अभियानाची माहिती घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. दिव्याने दिवा लागत आहे. लवकरच ही संख्या एक हजारचा टप्पा ओलांडेल असं वाटतंय. 'पागोळी वाचवा अभियानाने' लोकांच्या मनात उत्सुकता, पाण्याच्या बाबतीतली त्यांची स्वतःची जबाबदारी आणि आपण हे सहजपणे करू शकतो ह्याविषयीचा आत्मविश्वास जागवला आहे, ह्याची जाणीव लोकच आम्हाला पदोपदी करून देत आहेत. हे श्रेय निःसंशयपणे लोकांच्या मनातील पाण्याविषयीच्या तळमळीचेच आहे.

लोक अभियानाबद्दल वाचत आहेत, फेसबुक आणि व्हाट्सअप्पवर टाकलेले व्हिडीओ आणि फोटो पाहत आहेत, त्यावर विचार करत आहेत, त्याचबरोबर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने त्यांच्या मनामध्ये काही शंकाही निर्माण होत आहेत, जे अगदी स्वाभाविक आहे. लोकांच्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही इथे केला आहे.

लोकांचे प्रश्न
शंका आणि समाधान
--------------------------

1. खर्च किती येईल -

प्रश्न कितीही गंभीर असला आणि इच्छा कितीही प्रबळ असली तरी साहजिकपणे कुणाच्याही मनामध्ये पहिला प्रश्न उभा राहतो तो खर्चाचा. कमी खर्चिक आणि करायला सोपा असाच पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ह्याचा खर्च सरासरी दोन ते अडीच हजार एव्हढाच येतो. तो प्रत्येकाच्या घराचा आकार, घर आणि खड्डा ह्यामधील अंतर आणि खड्डयाचे बांधकाम ह्या गोष्टींमुळे कमी जास्त होऊ शकतो. एखाद्याच्या घराला अगोदरच पन्हळी लावलेल्या असतील तर त्याचा तो खर्चदेखील कमी होऊ शकेल. कुणाला त्यासाठी एक ते दोन हजार खर्च येईल तर कुणाला चार ते पाच हजार येईल. पण त्यापेक्षा जास्त खर्च येणार नाही ह्याची काळजी घेतली आहे.

2. सुरवात कधी करावी -

पाऊस सुरू झाला आहे आणि आत्ता पावसात सुरवात कशी करायची असा एक संभ्रम काही लोकांच्या मनामध्ये येऊ शकतो. चांगल्या गोष्टीची सुरवात करायला कोणतीही वेळ योग्यच. सुरवातीलाच सर्व काही परिपूर्ण झालं पाहिजे असं काही गरजेचं नाही. तुमच्या घराच्या छपराच्या अर्ध्या भागातील पाणी जरी तुम्ही ह्या वर्षी खड्ड्यामध्ये सोडायला सुरवात केलीत तरी चांगली सुरवात झाली असे म्हणता येईल. कालांतराने त्याला पूर्णत्व येईलच. पावसात काही ठिकाणी एक मीटर खोल खड्डा खणताना पाणी लागू शकते आणि आणखी खोल जाणे कदाचित शक्य होणार नाही. परंतु त्यासाठी थांबायचे काही कारण नाही. खड्डा जेव्हढा खणता येईल तेव्हढा खोल खणावा आणि चाहुबाजूनी वीट बांधकाम करून घ्यावे. पाणी कमी झाल्यानंतर पुढे तो अधिक खोल करता येईल. आत्ता तुम्ही जर काही काम केलंत तर पुढच्या उन्हाळ्यात त्याचे परिणाम तुम्हाला समजून येतील आणि ते पाहून तुमच्यासह इतरांचाही हुरूप वाढण्यास मदत होईल.

3. खड्डा कसा असावा -

अभियानातील खड्डा हा महत्वाचा भाग आहे. त्याच्याविषयीचे विवेचन 'पाण्याची शेती कशी करावी ?' ह्या लेखात विस्तारित स्वरूपात केले आहे, ते पहावे. लेख सर्वांना पाठवला आहे आणि फेसबुकवरदेखील उपलब्ध आहे.

4. खड्डयातील पाण्यामुळे डास होतील का ? -

खड्डयातील पाणी सतत हलत राहिल्याने त्यामध्ये डास होण्याची शक्यता नाही. पावसाळा संपता संपता खड्डयातील पाणी हळूहळू जमिनींमध्ये जिरून खड्डा आपोआप सुकून जाईल.

5. आमच्या विहिरीचे किंवा कुपनलिकेचे पाणी नक्की वाढेल का ? आणि ह्यागोदार असे कुणी केले आहे का ? -

आम्ही जे काही सांगत आहोत त्यामध्ये नवीन असं काहीच नाही. मागील पंधरा वीस वर्षांमध्ये अनेक लोकांनी अशाप्रकारचे उपक्रम आपापल्या घर आणि आवारांमध्ये राबवले आहेत आणि त्याचा त्यांच्या विहिरीचे किंवा कुपनलिकेचे पाणी वाढण्यास निश्चितपणे हातभार लागला आहे. परंतु केवळ 'मी' आणि 'माझे' ह्या संकुचित वृत्तीने ह्या कृतीकडे कोणी पाहू नये असे कळकळीचे आवाहन आम्ही सर्वांना करतो आहोत. वर्तमानातील आपला 'मी' भविष्यातील आपल्याच 'आम्ही' ना (पुढील पिढ्या) जीवघेणा ठरू शकतो. सार्वजनिक हितामध्येच आपले वैयक्तिक हित लपलेले आहे याची जाणीव ठेवावी.

6. पाणथळ जागी हे करून काय फायदा होईल ? -

पाणथळ जागांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणी साठलेले दिसते. त्यामुळे लोकांना वाटते की अशा जागी आणखी पाणी जिरवायची गरजच काय ? अशा जागी पूर्वी शेती व्हायची, त्यावेळी ती जमीन नांगरली जायची आणि त्यामुळे त्या जमिनीमध्ये पाणी जिरण्याचा वेग हा तुलनेने जास्त असायचा. शेती बंद झाल्यामुळे अशा पाणथळ जागादेखील पडीक झाल्या. पडीक जमिनी नांगरल्या न गेल्यामुळे हळूहळू कडक होत जातात आणि त्यावर एक प्रकारचा टणक असा थर तयार होतो, जो जमिनींमध्ये पाणी जिरण्यास अटकाव करतो. त्यामूळे पाणी जिरण्याचे प्रमाण आपोआप कमी कमी होत जाते. अशा जमिनींमध्ये पाणी जरी साठलेले दिसत असले तरी नकळतपणे ते वाहत असते, जिरत नसते. त्यामुळे इतर कोरड्या जमिनी आणि अशा पाणथळ जमिनी ह्या दोघींचीही पाणी जिरवण्याची गरज समान असते.
पाणथळ जमिनींमध्ये खड्डा खणणे त्या जागेतील पाणी सुकल्यानंतरच सोयीचे होईल. त्याभोवती करायचं बांधकाम मात्र त्या जमिनीमध्ये पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याच्या पातळीच्या किमान एक फूट वरती राहील ह्याची काळजी घेऊन करावे लागेल, आणि यदाकदाचित अतिवृष्टीच्या वेळी बाहेरचे पाणी खड्ड्यामध्ये गेले तरी त्यामध्ये काळजी करण्यासारखे काहीच नाही.

7. समुद्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये हे करून काय फायदा ? -

समुद्रालगत वसलेल्या गावांमध्ये कितीही पाणी जरी जिरवले तरी ते लगेचच समुद्राला जाऊन मिळाले तर त्याचा काय फायदा, असा प्रश्न मनात येऊ शकतो. परंतु पाणी एकदा का जमिनीमध्ये जिरले की त्याची दिशा कोणती असेल हे सांगणे कठीण आहे. ते जसे समुद्राच्या दिशेला जाऊ शकते तसेच ते समांतर आणि विरुद्ध दिशेलादेखील जाऊ शकते. आपण अभियानात दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे नैसर्गिक प्रभावाने जर पाणी जमिनीत जिरवले तर जमिनीखालची पाण्याची पातळी निश्चितपणे वाढेल. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्याबरोबर वाढत जाणारा पाण्याचा मचूळपणा कमी होण्याचा मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. अशा ठिकाणच्या पाण्यामध्ये असणाऱ्या क्षारांचे प्रमाण मोठया प्रमाणावर कमी होईल आणि आरोग्याच्या दृष्टीने ही जमेची मोठी बाजू ठरू शकेल.

8. आमच्याकडे नळाचे पाणी येते, मग आम्ही हे करावे का किंवा का करावे ? -

एकीकडे आपल्याकडे उपलब्ध असलेले पाण्याचे सर्व नैसर्गिक स्रोत नैसर्गिक बदलांमुळे आणि आपल्या अक्षम्य हेळसांडीमुळे वेगाने आकुंचन पावत असताना आणि दूषित होत असताना पूर्णपणे त्यावरच अवलंबून असणाऱ्या नळपाणी योजना सर्रासपणे राबवाव्यात का हा मोठा गहन प्रश्न आहे. आजच्या घडीलाच स्रोतांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्याने किंवा लवकर संपल्याने अनेक नळपाणी योजनांवर वर्षभराच्या मध्येच राम म्हणण्याची पाळी येते ही वस्तुस्थिती आपण अनुभवतोच आहोत. तेव्हा दारात नळ असला तरी घरात हंडे भरून ठेवण्यामागचा दृष्टिकोनच जमीन पुनर्भरणाच्या बाबतीत आपल्याला ठेवावा लागेल. नाहीतर जेव्हा जमिनीच्या वर पाणी उपलब्ध नसेल त्यावेळी जमिनीच्या खालीदेखील आपल्याला ते सापडणार नाही. तेव्हा केवळ वर्तमानातील गरजेचा विचार न करता आपण सर्वांनी अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने जमीन पुनर्भरणाच्या कामात सहभाग घेतला पाहिजे.

9. आमच्या भागात खूपच कमी पाऊस पडतो, तिथे ह्याचा काय फायदा -

ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागातच ह्या अभियानाची सर्वात जास्त गरज आहे. कमी प्रमाणात पडणारा पाऊस जास्तीत जास्त प्रमाणात साठवण्यासाठी ह्या अभियानासारखे दुसरे प्रभावी साधन वर्तमानात उपलब्ध असलेले दिसत नाही. मुळातच कमी प्रमाणात पडणारा पाऊस जर आपण तसाच विखरू दिला तर ते पाणी जमिनीवरून वाहून जाणे, केवळ जमिनीच्या वरवरच्या थरापर्यंतच जिरणे आणि थोड्याच काळात त्याचे बाष्पीभवन होऊन जाणे ह्यातच संपून जाते. पाण्याचा एकही थेंब फुकट न घालवता ते जमिनीत खोलवर जिरवले आणि वाहून जाणे व बाष्पीभवन होणे ह्यापासून वाचवले तर घराच्या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या शंभर टक्के पाण्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. मोठ्या प्रमाणात पाणी एकत्र करणे आणि ते जोरकसपणे जमिनीत जिरवणे हे काम अभियानाने सुचवलेल्या मॉडेलपेक्षा प्रभावीपणे करणारे दुसरे कोणतेच साधन सध्याच्या काळात उपलब्ध असलेले दिसत नाही.

10. पन्हाळीला फिल्टर्स लावावेत का ? -

पन्हळीला कसलेही फिल्टर्स लावण्याची आवश्यकता नाही. पन्हळीचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आल्यानंतर ते जमिनीतून फिल्टर होऊनच सगळीकडे पसरणार आहे. आपली जमीन हीच सर्वोत्तम फिल्टर आहे.

11. तुम्ही देत असलेल्या माहितीचा वापर करण्यासाठी काही पैसे द्यावे लागतात का ? -

हे 'पागोळी वाचवा अभियान' आणि त्याअंतर्गत दिली गेलेली सर्व माहिती, व्हिडीओ, फोटो इत्यादी सर्व गोष्टी संपूर्णपणे विनामूल्य आहेत. उलटपक्षी ह्या माहितीचा उपयोग करून जमिनीखालचे संपलेले पाण्याचे साठे पुन्हा पाण्याने समृद्ध करण्याचे सामूहिक उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा हाच ह्या अभियानाचा उद्देश आहे.

12. ही माहिती आम्ही पुढे आणखी काही लोकांना पाठवली तर चालेल का ? -

अभियानांतर्गत दिलेली माहिती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी ह्याच उद्देशाने दिली गेली आहे. तेव्हा ती तुम्ही जेव्हढी जास्त प्रसारित कराल तेव्हढे आपल्या सर्वांच्याच फायद्याचे ठरणार आहे.

13. त्याचे काही पेटंट वगैरे तुम्ही घेतले आहे का? -

नाही ! अशाप्रकारचे कसलेही ओझे मनावर न घेता सांगितलेल्या गोष्टी आमलात कशा आणता येतील ह्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

14. ह्या अभियानाचे मालक कोण आहेत -

हे अभियान आपल्या सर्वांच्या मालकीचे आहे.

16. प्रत्यक्ष अंमलबजावणी न करू शकणाऱ्यांनी अभियानामध्ये कशाप्रकारे सहभागी व्हावे -

अभियानामध्ये सहभागी होण्याची इच्छा निर्माण होणे ही भावनाच अभियानापोटीच्या सदिच्छा व्यक्त करणारी आहे. कोणत्याही कामाला सदिच्छांची आवश्यकता ही असतेच. अशा लोकांनी आपले हे 'पागोळी वाचवा अभियान' जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे ह्यासाठी प्रयत्न करावेत.
-------- --------- ------- ---------
वरील वेगवेगळ्या प्रश्नांव्यतीरिक्त पुढीलप्रमाणे आणखी दोन प्रश्नांची विचारणा आमच्याकडे झाली आहे.
पैकी एक तरुणांच्या काही संघटनांकडून आणि काही महिला बचत गटांकडून "पागोळी वाचवा अभियान" त्यांच्या गावांमध्ये कशा प्रकारे राबवता येईल ह्या संदर्भात विचारला गेला आहे.
आणि दुसरा प्रश्न दोन महाविद्यालयांकडून विचारला गेला आहे. "पागोळी वाचवा अभियान" अंतर्गत पाहिलेला प्रकल्प त्यांना आवडल्यामुळे त्यांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सदरचा प्रकल्प कशा प्रकारे राबवावा जेणेकरून त्यांच्यामध्ये जलसंवर्धनाबद्दलची जबाबदारी, आपुलकी आणि कृतिशील जागृती निर्माण होईल.
हे दोन्ही प्रश्न संस्था आणि संघटनात्मक पातळीवर विचारलेले असल्याने जागेअभावी इथे त्याचे विवेचन करणे अस्थायी ठरू शकेल. त्या त्या संस्थांना त्यांचे उत्तर वैयक्तिक पातळीवर दिले जाईल. भविष्यात त्याबद्दलची विचारणा वाढली तर सर्वांसाठीच ते आपल्याला खुलेपणाने करता येईल.
--------- -------- --------- ---------
तुमच्याही मनामध्ये काही शंका असतील तर त्या विनासंकोच विचारा. कारण समाधान न झालेल्या मनातील शंका हेच आपल्या निष्क्रियतेच मूळ असतं.

सुनिल प्रसादे.
दापोली.
दि. 30 जुलै, 2019.
अधिक माहिती-
https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448

#PagoliWachawaAbhiyan
#RainwaterHarvesting

समाजविचारप्रतिसादलेखमाहिती

प्रतिक्रिया

एका सिव्हिल इंजिनियरने केलेली कमाल !
आज आपल्या आजु बाजूला जर बघितले तर चिरटाचे व डासांचे साम्राज्य आहे पण तेच नष्ट झाले तर....
✅डासांना हद्दपार करणारी गावं!✅

शहरं असोत वा खेडी किंवा वाड्या-वस्त्या...‘डास आमच्याकडं नाहीत’, असं कुणालाही खात्रीनं सांगता येणार नाही. मात्र, मराठवाड्यातल्या काही गावांनी हा चमत्कार घडवून आणला आहे. तिथं डासच काय, पण दुर्गंधीयुक्त पाण्यामुळं निर्माण होणारे कसलेही कीटक नाहीत. कसा घडवला गावकऱ्यांनी हा चमत्कार, कोणतं तंत्र वापरलं याची ही रोचक कथा...

मुक्काम टेंभुर्णी (ता. हिमायतनगर, जि. नांदेड). वेळ संध्याकाळची. पैजेचा विडा उचलूनच आम्ही या गावात डेरेदाखल झालो होतो. ‘आमच्या गावात एकही डास नाही; चावायचे दूरच, कानात नुसता आवाज आला तरी वाट्टेल ती पैज हरायला तयार आहोत’, सरपंच प्रल्हाद पाटलांचं हे आव्हान स्वीकारलं होतं. कारण डासाविना गाव, कुणालाही केवळ बाताच वाटतील.

टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या जवळच हातपंप आहे. तेथील कोरडेठाकपणा पाहून सहजच विचारलं, ‘याला पाणी नाही का येत?’ तेवढ्यात एक चड्डीतलं पोर पुढं आलं आणि हापसू लागलं. काही सेकंदांतच पाणी वाहू लागले. पाण्याच्या स्रोताभोवती एवढा कोरडेपणा कसा काय, असा सवाल पाटलांना केला असता, चला ग्रामपंचायतीत बसून सांगतो, असे म्हणत ते चालू लागले.

टेंभुर्णी गाव : येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे नाहीत. ‘मॅजिक पिट’मुळे गटारांवरील खर्च वाचला.

टेंभुर्णी हे १९५४ च्या पुरानंतर या ठिकाणी पुनवर्सित झालेले गाव. पूर्वीपेक्षा जागा कमी मिळाली, तरीदेखील आम्ही ‘ॲडजेस्ट’ करून राहू लागलो, अशी गावकऱ्यांची व्यथा. पूर्वीपासून गावात पाण्याचं दुर्भिक्ष. गावात बोअरवेल खोदल्या तरी त्या कोरड्याच जायच्या. दूरवरून पाणी आणावं लागायचं. १९८६-८७ च्या दरम्यान गावातला एक तरुण इंजिनिअर (बी.ई.) झाला. तो गावचा पहिला उच्चशिक्षित. खूप प्रयत्न करूनदेखील त्याला नोकरी लागली नाही. कारण तेव्हाचं ‘झिरो बजेट’ आडवं आलं. शेवटी गावातच राहून विकासकामांना जुंपण्याची त्यानं प्रतिज्ञा केली. तो तरुण म्हणजेच गावचे सरंपच प्रल्हाद पाटील. गेल्या २० वर्षांपासून निर्विवादपणे ते गावासाठी राबत आहेत.

'मॅजिक पिट’ची माहिती देताना नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे.

गाव स्वच्छ ठेवण्याचा पहिला संकल्प त्यांनी केला. प्रत्येक घराच्या मोरीतून वाहणारं पाणी हा कळीचा विषय होता. पाटलांनी शोषखड्ड्याबाबत खूप वाचलं होतं. त्यांनी हा प्रयोग राबवला. मात्र काही दिवसांनी शोषखड्डे भरले आणि पुन्हा दुर्गंधी. त्यावर पाटलांनी नवी शक्कल लढवली, संशोधन केलं असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळं हा प्रश्‍न कायमचा सुटला. गेल्या सहा वर्षांपासून मोरीच्या पाण्याचा थेंबदेखील रस्त्यावर आलेला नाही. आज प्रत्येक कुटुंबानं नव्या पद्धतीचे शोषखड्डे करून अख्खं गाव गटारमुक्त केले आहे. गाव गटारमुक्त झाल्यानं डास गायब झाले. पाटील सांगतात, ‘‘साऱ्या गावाला यासाठी राजी करणं खूप अवघड काम होतं. आधी मी माझ्या घरी हा प्रयोग केला. तरीही आमच्या भिंतीत पाणी मुरेल, घर पडेल अशी भीती व्यक्त केली जायची. मात्र माझ्या प्रयोगाला काही काळ लोटल्यानंतर लोकांना अखेर पटलं आणि त्यांनी स्वखर्चाने हा प्रयोग राबवला.’’

डासांना गावातून पिटाळणं हा चमत्कारच नव्हे का? त्याचे इतरही अनेक फायदे गावाला झाले. डासजन्य आजार संपले, गावाला गटारांची गरजच उरली नाही आणि जमिनीतून पाणी मुरल्यामुळं गावातल्या कुपनलिका आणि विहिरीला पाणी आलं. २००८ पासून गावात टॅंकर सुरू होते; मात्र २०१३ पासून त्याची गरजच संपली. असे चमत्कारावर चमत्कार एका आधुनिक शोषखड्ड्यानं केले.

चारशेंवर गावांमध्ये प्रयोग
पाटलांचा हा प्रयोग हिमायतनगर, हदगाव, भोकर, लोहा आदी तालुक्‍यांतील चारशेंवर गावांमध्ये पोचल्याची माहिती मिळाली. या साऱ्यामागे कोण आहे याचा शोध घेण्याचे ठरवले आणि एक अत्यंत उत्साही व प्रचंड धडपड्या अशा वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट झाली. पाटलांचा प्रयोग डोक्‍यावर घेऊन त्याची तोंडभरून तारीफ करताना त्याला देशपातळीवर कसे पोचवलं याची इत्यंभूत माहिती त्यांनी दिली. हे अधिकारी म्हणजे नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे. चारशेंवर गावे येत्या तीन महिन्यांत डासमुक्त करण्याचा संकल्प सोडून संपूर्ण जिल्हा डासमुक्त करण्याचं स्वप्न पाहणारे अधिकारी.
त्यांना या चमत्कारामागील पार्श्‍वभूमी विचारली असता, अधिक न बोलता त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीच अवगत करून देतो म्हणून थेट गावांना भेटी घडवून आणल्या. भालकी, कारवाडी (ता. नांदेड), लहान, लहान तांडा (ता. अर्धापूर), अमदरी (ता. भोकर), टेंभुर्णी, मोरगाव (ता. हिमायतनगर), धन्याची वाडी (ता. हदगाव) आदी गावांचा फेरफटका आम्ही मारला. प्रत्येक गावाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख होती. पण एक समान धागा होता, प्रत्येक घराची मोरी शोषखड्ड्यांना जोडलेली होती.

साधा शोषखड्डा ते मॅजिक पिट
साध्या शोषखड्ड्यांची योजना यापूर्वीही महाराष्ट्रात राबविण्यात आली होती, अगदी शासकीय परिपत्रक काढून. मात्र ही योजना फार काळ टिकली नाही. त्यातले दोष पाटील यांनी दूर केले आणि काळे यांनी तिला आधुनिक रूप दिलं आणि त्यांनी तिचं नामकरण केलं ‘मॅजिक पिट’. खरोखरच हा नव्या स्वरूपातील खड्डा जादूई असाच म्हणावा लागेल. त्यामुळं नांदेडच्या ग्रामीण भागातून नव्या क्रांतीचा उदय होत आहे. ही क्रांती आहे गटारमुक्ती अन्‌ डासमुक्तीची. या क्रांतीचा ध्यास घेऊन ‘अभिमन्यू’ आपल्या सहकाऱ्यांसमवेत लढत आहे. डासमुक्तीच्या जोडीलाच घरोघरी स्वच्छतागृह, प्रत्येक मूल शाळेत हे उपक्रमदेखील अभिनव पद्धतीने राबवले जात आहेत. ही मोहीम जनतेच्या सहभागाशिवाय शक्‍य नव्हती. त्यांचं मनपरिवर्तन घडवून आणणं मोठं आव्हान होते. लोकांचे अनेक प्रश्‍न आणि शंका होत्या. परंतु डोईला गाडगे, हातामध्ये झाडू स्वच्छतेने गाडू अंधश्रद्धा या संत गाडगेमहाराजांच्या विचारांप्रमाणे ते शंका-कुशंकांचं निरसन करत गेले आणि ही मोहीम आता मोठी चळवळ बनली आहे. त्याची दखल केंद्र सरकार, राज्य सरकारनंच नव्हे, तर कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा इत्यादी राज्यांनी घेतली आहे. त्यांची शिष्टमंडळे डासमुक्त गावांना भेटी देऊन ‘मॅजिक पिट’चा पॅटर्न आपल्या राज्यांकडे घेऊन जात आहेत.

नेमका फरक काय?
शोषखड्डे आणि या मॅजिक पिटमध्ये नेमका फरक काय, हे समजावून सांगण्यासाठीही काळे यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. लहान नावाच्या गावामध्ये त्यांनी एक खड्डा उकरायला सांगितला आणि ते स्वत: त्यात उतरले आणि हातात फावडे घेऊन मॅजिक पिट्‌सचा उलगडाच केला. पूर्वीच्या शोषखड्ड्यांमध्ये खड्डे घेऊन त्यात वाळू, विटा, मोठे दगड भरले जात. मात्र ते गाळाने लवकर भरत आणि पाणी मुरण्याऐवजी वर येऊन रस्त्यावर वाहत असे. ‘मॅजिक पिट’मध्ये चार बाय चार वर्तुळाकार खड्डा घेऊन त्यात सिमेंटची टाकी बसवतात. टाकीच्या बाजूचा भाग दगडगोट्यांनीच भरलेला असतो. मोरीचा पाइप टाकीत सोडून ती बंद केली जाते आणि त्यावरून मातीचा थर दिला जातो. त्यामुळे येथे मॅजिक पिट आहे हे कोणाला सांगितल्याशिवाय समजणारही नाही. टाकीच्या वरच्या बाजूला छिद्रे असल्यानं पाणी त्याद्वारे जमिनीत मुरते. गाळ खाली जाऊन बसतो. तीन-चार वर्षांनी टाकी स्वच्छ केली म्हणजे झाले. अत्यंत कमी खर्चात खूप मोठा परिणाम ‘मॅजिक पिट’मुळं साधला जात आहे. हा उपक्रम काळे यांनी शासकीय योजनेमध्ये बसवून त्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदान देऊ केल्याने त्याला आता मोठा प्रतिसाद मिळत आहे.

घरचे सांडपाणी जमिनीत मुरवल्यानं बोअरवेल आणि विहिरीचे पाणी वाढले खरे; पण ते कितपत पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य आहे, असा प्रश्‍न अर्थातच पडला. ही शंका दूर करण्यासाठी नांदेडच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे (जीएसडीए) अभियंता एच. एम. संगनोर यांच्याशी चर्चा केली. टेंभुर्णीतील पाण्याच्या त्यांनी सर्व चाचण्या घेतल्या असता, त्यांनीही आश्‍चर्याने तोंडात बोट घातले. हे पाणी केवळ वापरण्यायोग्यच नव्हे, तर पिण्यायोग्यही होते. मात्र तरीही गावकऱ्यांच्या मनात कसलीही शंका राहू नये म्हणून ‘मॅजिक पिट’ योजना राबविणाऱ्या ४१० गावांमध्ये ‘आरओ वॉटर प्युरिफायर’ दिले जाणार असून, तीन महिन्यांत ते बसवले जाणार आहेत. टेंभुर्णी गावचे वॉटर प्युरिफायर गेल्याच महिन्यात कार्यान्वित झाले. एका ‘मॅजिक पिट’मुळे किती फायदे झाले पाहा. डास गेले, आजार कमी झाले, गटारांची गरज संपली, त्यावरील लाखोंचा खर्च वाचला आणि पाणी समस्यादेखील सुटली. याला क्रांती म्हणायचे नाही तर काय?

---------------------------------------------------------------
कुणी विश्‍वास ठेवायलाच तयार नव्हतं
मॅजिक पिट्‌सचं सादरीकरण दिल्ली, मुंबई आदी ठिकाणी केलं. सर्वांच्या बुद्धीला सारे पटायचे; परंतु त्यावर कोणी विश्‍वासच ठेवायला तयार होत नव्हतं, अशी खंत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची. अनेक अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन गावांची पाहणी केली, तरीदेखील त्यांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्‍वास बसत नव्हता. ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी डासमुक्त गावांचा नुकताच दौरा केला. सादरीकरणावर सादरीकरण आणि अधिकाऱ्यांच्या भेटी वाढल्या, राज्य; तसेच देशपातळीवरील संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. अखेरीस सरकारनं दखल घेतली आणि ‘मॅजिक पिट पॅटर्न’चा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यात आला. तसेच चौदाव्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचीमध्येही त्याचा समावेश झाला.

---------------------------------------------------------------
केंद्रीय स्वच्छता मंत्र्यांवरही मोहिनी
या ‘नांदेड पॅटर्न’ची खबर केंद्रीय पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री राव वीरेंद्र सिंह यांच्या कानावर गेली. त्यांनी हरियाना सरकारला योजनेची पाहणी करण्याची सूचना केली. त्यानुसार हरियानाच्या मुख्य अतिरिक्त सचिव नौराज सिंधू यांच्यासमोर अभिमन्यू काळे यांनी सादरीकरण केल्यानंतर त्यांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ नुकतेच नांदेड भेटीवर आले होते. त्यांनी या योजनेचे खूप कौतुक केले.

https://www.facebook.com/photo.php?fbid=1063736650335094&set=pcb.1063736...

लेख वाचला. प्रश्नोत्तरे देऊन शंकांची उत्तरे दिली आहेत, हे उत्तम केले आहेत. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jul 2019 - 6:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम माहिती. यामुळे लोकांच्या मनातिल अनेक प्रश्नांची उत्तरे मिळून सहभाग वाढायला मद्त होईल यात शंका नाही.