आंजा-टोळ

चामुंडराय's picture
चामुंडराय in जनातलं, मनातलं
28 May 2018 - 2:17 am

संवाद हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे मग तो संवाद शब्दाने, स्पर्शाने, लिखित व अन्य कोणत्या का स्वरूपात असेना. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी आणि इतरांचे विचार जाणून घेण्यासाठी संवाद अतिशय महत्वाचा आहे. त्याची सुरवात बालपणापासून होते. बोबडे बोल शिकत हा प्रवास सुरु होतो आणि पुढे शाळेमध्ये अक्षर ओळख होऊन वेगवेगळ्या भाषा लिखित स्वरूपात शिकता येतात. आपला संवाद कुटुंबात, मित्रमंडळीत, समाजामध्ये मुख्यत्वेकरून तोंडी स्वरूपात होत असतो.

समाजामध्ये वावरताना, कुठलीही कृती करताना किंवा विचार मांडताना स्वतःच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये, आजूबाजूची परिस्तिथी आणि समाजभान या गोष्टींचा आपल्यावर मोठा प्रभाव असतो. आपण मांडत असलेले विचार हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतात आणि हा संवाद एकास एक किंवा एकास अनेक अश्या स्वरूपात प्रत्यक्ष घडत असल्याने आपली प्रवृत्ती, कल आणि विचारधारा इतरांना कळू शकतात. त्यामुळे विचार मांडताना कित्येकजण आपल्या जसे वाटते तसेच विचार मांडतातच असे नाही. असे बुरखेधारी समाजामध्ये बहुसंख्येने दिसतात. प्रत्येकवेळी सडेतोड बोलणारी व्यक्ती विरळाच आणि त्याची किंमत देखील मोजावी लागते.

आता जर मानवाला संवाद साधताना ओळख लपवायची संधी असेल तर काय होईल? व्यक्त करत असलेल्या विचारांच्या परिणामाची फिकीर करण्याची फारशी गरज नसेल तर? मानवाच्या मनातील खरेखुरे विचार व्यक्त होतील कि नाही? हे म्हणजे गर्दीच्या मानसिकतेसारखे असावे. गर्दी मध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाची फिकीर करायची गरज नसते आणि मानवाची वागणूक त्याच्या व्यक्तिमत्वाला सुसंगत असतेच असे नाही.

आजकालच्या जगात आंतरजालाने नेमकी हीच संधी उपलब्ध करून दिली आहे आणि त्यामुळे आंजा-टोळांचा जन्म झाला आहे. कि-बोर्डाच्या मागे लपणे सहज शक्य असल्याने आंजा-टोळांना मोकळे रान मिळाले आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या प्रमाणे उचलले बोट आणि लावले कि-बोर्डाला सहज आणि सोप्पे झाले आहे. ओळख लपवणे शक्य असणे, सहजतेने मत मांडतात येणे, व्यक्त होता येणे, तुम्ही मांडलेला विचार दीर्घ काळ टिकून राहणे आणि सर्वात मुख्य म्हणजे जागतिक व्यासपीठ व वाचक उपलब्ध असणे या सर्व गोष्टींमुळे आंतरजालावर या आंजा-टोळांची टोळधाड आली आहे.

सर्वसाधारणपणे आंजा-टोळ हे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असणारे, आपापला अजेंडा रेटणारे, मीच केवळ शाना असे समजणारे, इतराना त्रास देण्याची प्रवृत्ती असणारे, विरोधी मतांचा आदर नसणारे, असमंजस आणि भांडखोर किंवा केवळ टाइम पास होण्यासाठी ट्रोल करून मजा बघणारे असतात. असे हे आंजा-टोळ मग त्यांच्या वैयक्तिक मताच्या पुष्टीकरणासाठी लागणारे लेख, माहिती, बातम्या आणि इतर समविचारी टोळांच्या शोधत असतात. एकदा का समविचारी टोळ मिळाले कि त्यातून कंपू तयार होतात आणि इतरांचे साहाय्य मिळाल्याने मोठ्या जोमाने ट्रोलिंग सुरु करतात आणि अश्या रीतीने आंतर जालावर या टोळांची टोळधाड येते. या कंपूंमध्ये एकमेकांच्या आधीच समविचारी असलेल्या मतांचे समर्थन करून असे ब्रेन वॉश करतात कि आंजा-टोळांसाठी कंपूचा विचार हेच अंतिम सत्य ठरते आणि अश्या कम्पूधारकाचे मतपरिवर्तन करणे अशक्यप्राय होऊन बसते. दुसऱ्या बाजूने कित्येकदा हे आंजा-टोळ राजकीय पक्षांनी आणि वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी किंवा समाज विघातक शक्तींनी स्पॉन्सर केलेले पेड आंजा-टोळ असू शकतात.

आंतरजालावर ओळख लपवणे सहज शक्य असल्याने हे आंजा-टोळ त्यांच्या काहि कारणास्तव इतरत्र मांडू न शकणाऱ्या मतांचे प्रदर्शन अगदी सहजतेने करतात. हे विरोधी मत असणाऱ्यांना डिवचतात, हेत्वारोप करतात किंवा सरळ सरळ त्रास देतात. कित्येकदा आंजा-टोळ मांडत असलेली मते हि त्यांची मते असतीलच असे नाही किंबहुना नसतातच. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे आंजा-टोळ आंतर जालावर धुमाकूळ घालतात. या सर्व प्रकरणात प्रामाणिकपणे लिहीणाऱ्या, मत मांडणाऱ्यांना विनाकारण त्रास होऊ शकतो.

आंतरजाल जगात सर्वत्र असल्याने आणि आंजा-टोळ हे जगात कुठेही असू शकत असल्याने कित्येकदा त्यांना कायद्याचा बडगा दाखवणे अवघड होऊन बसते. याचा हि लोकं फायदा उठवतात. तरीही कित्येक देशांमध्ये तिरस्कारणीय आणि द्वेषपूर्ण अभिव्यक्ती हा गुन्हा मानला जातो त्यामुळे आंजा-टोळांवर कायदेशीर कारवाई शक्य होऊ शकते.

बऱ्याचवेळा आंजावर चाललेल्या चर्चेमध्ये आपल्याकडे असलेल्या माहिती, ज्ञाना नुसार भाग घेण्याचा मोह होतो तेव्हा आपल्या मताचे विनाकारण खंडन करणारे, उसकवणारे, शाब्दिक प्रहार करणारे हे आंजा-टोळ ओळखता आले पाहिजेत. आणि असा प्रसंग आला तर तात्काळ व्यक्त न होता आपली प्रतिक्रिया लिहून ती काही वेळाने डोके शांत झाल्यावर पुन्हा तपासून पाहावी आणि पुढे असे काही लिहिल्याबद्दल पस्तावा होणार नाही याची खात्री करून आंजा-वर प्रकाशित करावी. यासाठी स्वयं-नियंत्रण आणि थोडीफार गेंड्याची कातडी असणे गरजेचे आहे.

जर यदाकदाचित कोणास आंजा-टोळांकडून त्रास झाला तर दुर्लक्ष करणे किंवा मिपाच्या भाषेत फाट्यावर मारणे या पलीकडे आपण काय करू शकतो, नाही का?

टीप : या धाग्याचा माहितीस्तोत्र आंजा वरील आंजा-टोळांसंदर्भातील विविध संकेत स्थळे.

मांडणीमुक्तकविचारप्रतिक्रियामाहिती

प्रतिक्रिया

गर्दीला चेहरा नसतो. आणि जिथेइथे बिनचेहऱ्याने वावरणे शक्य असते तिथेतिथे माणसांच्या स्वभावातील वाईट किंवा विकृत कंगोरे, जे एरव्ही समाजात वावरताना संस्कार आणि प्रतिष्ठा यांच्या रूपाने झाकलेले असतात, ते वर उफाळून येतात.

ट्रोलिंग करणं हा एक मनोविकार आहे असं मी मानतो. ट्रोलांना 'बरे व्हा' एव्हढ्याच शुभेच्छा आपण देऊ शकतो. त्यांच्यावर यापेक्षा जास्त वेळ आणि ऊर्जा घालवणे निरर्थक असतं.

जेम्स वांड's picture

28 May 2018 - 7:21 pm | जेम्स वांड

तुमच्या उत्तम अन नीट मांडणी असलेल्या लेखाला साजेसे एक व्यंगचित्र मिळाले आहे, ते खालीलप्रमाणे

.

मराठी आंतरजालावर बऱ्यापैकी हालचाल असते, अन फेसबुक ट्विटर इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थळांवर सुद्धा मराठी अभिव्यक्ती बऱ्यापैकी असते. मराठी आंतरजालावर तुम्ही म्हणताय तसे आपापले 'अल्टर इगो' कुरवाळायला पडीक बरीच जनता असते. जिथे ते दुखावले जातात तिथे कित्येकवेळा नवीन संस्थळेच्या संस्थळे जन्माला आलेली पण उदाहरणे आहेत. ह्या सोयीनुसार मग अमुक संस्थळ अमुक पक्षाचे, तमुक संस्थळ तमुक विचारधारेचे वगैरे तट पडतात. प्रसंगी उघड उघड अन बहुतेक वेळी लपूनछपून आपल्या अल्टर इगोला भाव न देणाऱ्या व्यक्ती/आयडी/संस्थळ/पोस्ट/धागे ह्यांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात. खोटे कश्याला बोला पण हल्लीहल्ली पर्यंत मिपा सुद्धा एका खास राजकीय विचारसरणीला बांधील आहे का का अशी शंका येत असे. सुदैवाने संस्थळ संचालक आणि मालक श्री नीलकांत ह्यांनी त्याला वेळीच आवर घालून मिपा अजूनही एक वेगळ्या कोटीतली साईट असल्याचे फॅक्ट नीट पुनर्स्थापित केले आहे. तूर्तास तरी मला इथे टोळ कमी दिसतायत. एखाद दोन अमुक एखाद्या राजकीय पक्षाची/धर्माची भलामण करणाऱ्या लोकांना सोडले तर (वरच्या कॉमेंट मध्ये म्हणल्याप्रमाणे मनोरुग्ण) सोडून बाकी सामसूम आहे. संबंधित लोकांचे मूर्खपण सत्यपित असल्यामुळे दुर्लक्ष करणे सुद्धा सोपे झाले आहे.

श्री नीलकांत ह्यांचे पुन्हा एकदा आभार, लेख लिहिल्याबद्दल तुमचेही खास आभार मी मानतो.

@ एक्काभाऊ आणि वांडोपंत प्रतिक्रिये बद्दल आबार.

ते व्यंगचित्र तर खासच. त्या प्रश्नातील आमंत्रणाला टाळून वास्तव्यातील जगापेक्षा आभासी जगात रमणारा करंटाच.

या आंजा-टोळांसारखी आणखी एक जमात म्हणजे उठसुठ प्रतिक्रिया देणारे. पूर्वी एक मिपा सदस्य होते. ते सध्या दिसत नाहीत. ते मेगा मेगा प्रतिसादासाठी प्रसिद्ध होते. धागाकर्त्याची ट्यार्पी नको पण प्रतिसाद आवर किंवा धाग्या पेक्षा प्रतिसाद जड अशी अवस्था करायचे. दुसरे एक अजेंडाधारी. ते येन केन प्रकारेण आपला अजेन्डा पुढे रेटायचे.

शिरेल्स बिंज करणारी आणि ते कौतुकाने सांगणारी मंडळी जशी असतात तशी हि प्रतिसाद बिंज करणारी मंडळी देखील ग्रेट असतात. मुख्य म्हणजे एव्हढा वेळ कसा मिळतो देव जाणे (क्षमस्व यनावाला सर).

नाखु's picture

30 May 2018 - 3:33 pm | नाखु

मी तुमच्या धाग्याला चांगलं म्हटलं तर:

  • मी तुमचा लाडका आहे असा शिक्का मोर्तब झाले च पाहिजे का
  • किंवा तुम्ही माझे लाडके मिपाकर आहात असा शिक्कामोर्तब करण्यात आले पाहिजे

कुणाच्याही चांगल्या कामासाठी कौतुक केले तर भक्त म्हणून हेटाळणी चा शिक्का बसेल म्हणून गप्प बसले पाहीजे अशीच विचारवंतांची कायमची अपेक्षा असते काय?

चांगल्या ला चांगलं म्हणण्याची वाईट्ट खोड असलेला जुनाट नाखु