एक दीपगृह (गौरी सावंत)

Primary tabs

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
18 Oct 2017 - 5:09 pm


हाभारतामधे एक संदर्भ सापडतो कि कौरवांशी युद्ध करण्यासाठी अर्जुन स्वतःची शक्ती वाढवण्याकरिता इंद्रदेवाच्या आमंत्रणानुसार दिव्यास्त्रांचे सखोल ज्ञान घेण्यासाठी इंद्रपुरीत गेला होता. तेथे उर्वशीचा स्वीकार न केल्यामुळे तिने अर्जुनाला शाप दिला होता की, एक वर्ष तू षंढ होशील. यावर 'बस्स एकच वर्ष?' असं म्हणत अर्जुन छद्मी हसला होता. मात्र तो शाप पुढे खरा ठरला. अज्ञातवासाचे वर्ष कुठे काढावे, ह्या जटिल प्रश्नावर यमधर्माने प्रत्यक्ष दर्शन देऊन पांडवांना आदेश दिला की, विराट राजाच्या नगरीत अज्ञातवास करा, त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

अर्जुनाने 'बृहन्नडा' हे नाव धारण करत स्त्रीवेशात विराट राजाच्या नृत्यशाळेत राजकुलातील कन्यांना नृत्यगीत शिकवत राहिला. ओळख लपवणं ही अर्जुनाचीही त्यावेळची गरज होती. किन्नर म्हणून समाज आणि राजदरबारात वावरतांना त्याला खूप क्लेश झाल्याचे उल्लेख महाभारतात कुठे आढळत नाहीत. इनफॅक्ट राजदरबारी मानाची आचार्याची नोकरी आणि यथा राजा तथा प्रजा न्यायाने प्रजेतही सन्मान बाळगून होता. अर्जुन ते सोंग अगदी आनंदाने करत होता, कारण त्याला खात्री होती हे सगळं फक्त एकच वर्ष भोगायचं आहे, त्यापश्चात फक्त सुख आणि सुखच.

मात्र असाच शाप जर एखाद्याला तू यापुढे कायम षंढ राहशील असा मिळाला तर आनंद होईल? स्वतःची 'बृहन्नडा' ओळख लपवायची नसल्यास खरेपणाबद्दल नातलग पाठीशी उभे रहातील? समाज त्यांना स्वीकारून बरोबरीने वागवेल? उत्तर नाही असंच येईल. निरोगी समाजात मिसळण्याचा न्यूनगंड, निसर्गाने केलेल्या अन्यायाचं शल्य, समाजाकडून होणारे खच्चीकरण, डावलले जाणारे न्याय्य हक्क, होणाऱ्या मानसिक कोंडमार्‍यामुळे आलेले वैफल्य अश्या दुष्टचक्रात ज्ञात असलेले जवळपास ५ लाख आणि अगणित अज्ञात भारतीय आजमितीस अडकलेले आहेत. पण यात काही अपवाद असतात जे स्वतःच्या स्त्रीकायेचा आनंद व्यक्त करतात, सत्याचा स्वीकार करून स्वतःची ओळख जगापुढे मांडतात, संघर्ष करून स्वतःबरोबर आपल्या समदुःखी बांधवांनाही हक्क मिळवून देण्याचा, त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतात. "गौरी सावंत" ही त्यातील एक.

पांडवांचा "वनवास-अज्ञातवास-युद्ध आणि मग राज्याभिषेक" हा क्रम थोडासा बदलून "अज्ञातवास-वनवास-युद्ध आणि मग राज्याभिषेक" असा केल्यास ट्रान्सजेंडर अॅक्टिविस्ट गौरी सावंत हिचा एकूण प्रवास सांगता येईल.

अज्ञातवास
हा अज्ञातवास खरं तिघांचाही होता/आहे. तिघे म्हणजे, गौरीचा स्वतःचा आयमीन तिला स्वतःतल्या स्त्रीत्वाची जाणीव होईपर्यंतचा काळ, सावंत-देसाई घराण्यांचा आणि वाचक या नात्याने तुमचा स्वतःचाही. आपण एखादी संघर्षमय बायोग्राफी वाचतो त्यात बरेचदा "घरच्यांनी हाकलून दिलं" असं एखादं वाक्य वाचलं की आपण घरच्यांबद्दल एक नकारात्मक प्रतिमा बनवतो, पांढरी साडी काळ्या बॉर्डरमुळेच उठून दिसते वगैरे मतं बनवतो, घरच्यांनीच जिथे झिडकारलं तिथे इतर समाजाने दिलेली वागणूक क्षम्य ठरते. पण हे घरचे कोण? का केलं असावं? याबद्दल सदर लेखात माहिती लिहिणं अप्रस्तुत होणार नाही किंबहुना स्वतःच्या हिमतीवर उभं राहणं आणि एक अॅक्टिविस्ट म्हणून मनात सेवाभाव उत्पन्न होण्यात सावंत-देसाई घराण्याचं सळसळणारं रक्त असावं असं माझं मत आहे. त्यामुळे गौरीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगताना होणाऱ्या अवांतराचा धोका मी पत्करून ती लिहितो. मी स्वतःही त्या कुटुंबातील एक भाग आहे हे विशेष.

छबी आत्या आणि सुरेश काका.. आम्हा सावंत-देसाई कुटुंबियातील प्रत्येकाला हेवा वाटावा असं एकमेकांना अनुरूप असलेलं सुखवस्तू जोडपं. काका डॅशिंग पोलीस सब-इन्स्पेक्टर तर प्रसन्न चेहऱ्याची आत्या हाऊसवाईफ. तीन चुणचुणीत मुलं आणि जोडीला सावंत-देसाई कुटुंबियांत आणि एकूण पंचक्रोशीत असलेला प्रचंड आदर जो पुढे जाऊन एक ओझं बनला. गौरी ज्या सावंत-देसाई आडनावाला रिप्रेझेन्ट करते त्याच्या महतीसाठी आमच्या आजोबांपासून सुरवात करावी लागेल. इंग्रजांच्या काळात पोलीस खात्यात असलेले आजोबा पुढे जमीनदारी आणि राजकारण करत रत्नागिरीचे उप-सभापती म्हणून नावारूपाला आले होते. आपल्या सगळ्या मुलींना तोडीचे जावई, मुलांना बसून खाल्लं तरी पुरेल इतकी प्रॉपर्टी आणि नातवंडांना खोत घराण्याचा जाज्वल्य अभिमान देऊन गेले होते. या घराण्यात फोरमन ग्रेडच्या खाली कुणीच नाही.. अर्धेअधिक पोलिसांत, सैन्यात, राजकारणात नाहीतर व्यवसायात, जवळपास सगळेच यशस्वी. इनफॅक्ट ज्यांनी गुंडगिरी आणि स्मगलिंग केली त्यांनीही नाव काढलं. सलूनमध्ये नाव्ह्याला दुसरा कट अगोदर नाही सांगितला तर तो बायडिफॉल्ट मिल्ट्री कट मारणार हे निश्चित. अश्या कुटुंबियांच्या समारंभात कायम शौर्याच्याच चर्चा झडायच्या. गुणसूत्रांच्या सदोष विभागणीमुळे होणारे टर्नर सिंड्रोम, क्लाईनफेल्टर सिंड्रोम असे दोष यांवर चर्चा केवळ अशक्य.

आपला जावई पोलिसातीलच असावा असा मानस असलेले सुरेशकाका आपल्या दोन मुलांच्याही बाबतीत त्यांनी पोलीस किंवा सैन्यात जावं यासाठी आग्रही होते. तसे संस्कार, ट्रेनिंग आणि खुराकही चालू होता. मोठा तर शरीर सौष्ठव स्पर्धेत नावही कमवत होता. "गौरी" म्हणजे पूर्वाश्रमीचा "गणेश" हे शेंडेफळ. इतर भावंडं वडिलांचा युनिफॉर्म घालून चोर-पोलीस खेळ खेळायचे त्या वयात गणेश आईची साडी घालून आरशासमोर रमू लागला. सुरवातीला दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र पुढेपुढे कॉन्व्हेंट शाळेच्या कोळी डान्समध्ये शिक्षकांनी तू कोळीण हो असं स्वतःहून सुचवणं यात गणेशची बायल्या म्हणून वाढत चाललेली ओळख आत्या आणि काकांच्या काळजीत भर घालत होती. सुरवातीला कौतुकाने घेतलेले मुलीसारखं वागणं पुढे पुढे राग, चिंता आणि त्रागाचं कारण बनलं.

ऐंशीच्या दशकात "गणपत पाटील" हे नाव काही आदराने घेतलं जात नव्हतं. चिडवले जाण्याऱ्या प्रत्येक क्षणाचा घाव दोघांवरही होत होता. घुसमट दोघांचीही होत होती. नैसर्गिक बदलापुढे गणेश हतबल होता तर अब्रू जाईल या भीतीने घरचे हतबल होते. नैसर्गिक बदल प्रथम पोलिसी टाचांखाली चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला, पण प्रत्येक रोपट्याला कापून एकसारखी दिसणारी झुडपे करायच्या प्रयत्नात मातृप्रेमामुळे काही रोपे सुटतात. ही रोपे हवी तशी वेडीवाकडी वाढत जातात. अनेक फांद्यांनी पसरतात. सुरुवातीला वेडेवाकडे वाटणारे असे झाड नंतर काही वर्षांनी मात्र त्याच्या त्या वेगळेपणामुळेच लोकांचे लक्ष वेधून घेते, असंच काहीसं गणेशच्या बाबतीत झालं. पुण्याहून मुंबईत नोकरीत आणि गणेशच्या शाळा-कॉलेजांत बदल करवून घेऊनही परिस्थितीत फरक पडत नव्हता. त्या चिंतेने असेल कदाचित, आत्या हार्टअटॅकने गेली. गणेश ९-१० वर्षांचा असेल कदाचित. कोलमडलेले काका मला अजूनही आठवताहेत. गणेशमध्ये होणारे बदल, पौंगडावस्थेत येणारा बंडखोरपणा, लोकलज्जेमुळे अगतिक झालेले वडील, पोलिसी विचारसरणी या सगळ्यांचा परिपाक एके दिवशी गणेशला घराबाहेर काढण्यात झाला.. अगदी कायमचा. आमच्या निरोगी सावंत-देसाई कुटुंबात गणेशला कोणतंही स्थान नव्हतं. "किन्नर" म्हणजे फक्त हार्मोनल मिस मॅच आहे. यात त्या जीवाची काहीही चूक नाहीये हे समजून घेण्याची प्रगल्भता आमच्या कुटुंबियांत नव्हती. गणेशला एकानेही मदतीचा हात दिला नाही की त्याचं पुढे काय झालं हे जाणून घेण्याची तसदी घेतली नाही. आमच्यासाठी तो अज्ञातवासात गेला आणि समाजासाठी त्याचा "गे" अज्ञातवास संपला होता.

वनवास
"मी" च्या शोधात घराबाहेर पडलेला गणेश आपण कोणत्या वाटेने गेल्यावर त्याला हवा असलेला “मी” समजेलच हे न कळून निरुद्देश भरकटण्याचे चान्सेस जास्त होते. तसं पहाता हा काळ स्वातंत्र्य उपभोगण्याचा होता. पण डोक्यावर छप्पर नाही, हातात पैसे नाही, निरोगी समाजात सामावून घेतले जाण्याची शक्यता नाही, नाकारले गेलेले सामाजिक हक्क आणि बापट म्हणून होणारी अवहेलना यातून आत्महत्या करू न शकणारे टिकून रहाण्यासाठी एकतर रस्त्यावर पथारी पसरून भीक मागून उदरनिर्वाह करतात किंवा हिजडा वस्तीत आश्रयाला जाऊन हिजडा बनून, देहविक्रय करत उदरनिर्वाह करण्याचा दुसरा मार्ग स्वीकारतात. हे दोनही मार्ग मान्य होण्याचे गणेशच्या रक्तात नव्हते.

एक संस्कृत वचन आहे की,

दुर्लभो विषयत्यागो दुर्लभं तत्त्व दर्शनम्।
दुर्लभा सहजावस्था सद्गुरोः करुणां विना।।

नेमकी वाट न समजणाऱ्या अशा या अंधकारमय अवस्थेत आपल्याला “मी” चा मार्ग दाखवणारी एकच व्यक्ती असते ती म्हणजे “सद्गुरू”. मार्गात आलेल्या संकटांना तोंड द्यायला सक्षम आणि सिद्ध करणारा प्रत्येकाचा एक गुरु असतोच. मग तो भगवी वस्त्र घातलेला साधू असेल, एखादा शिक्षक असेल किंवा एखादा गे मित्रदेखील असू शकेल. घर सोडण्यापूर्वी गणेशने लपूनछपून मुंबई सेंट्रलच्या एमजी रोडवर जमवलेल्या गे मित्र-मैत्रिणींच्या ओळखीतून "अम्मा" उपाधी असलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आला होता. हे अम्मा म्हणजे प्रसिद्ध LGBTQ अॅक्टिविस्ट आणि 'हमसफर' ट्रस्टचे संस्थापक "अशोक राव कवी". ती रात्र गणेशने त्यांच्या घरीच काढली. याच अम्माने गणेशच्या निवाऱ्याचा प्रश्न आणि हमसफर ट्रस्टचं काम सोपवून पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवला. गणेशचं इंग्रजीवरील प्रभुत्व, झोकून काम करण्याची आवड आणि उत्तरोत्तर वाढत गेलेल्या कामातील सफाईदारपणामुळे गणेश अम्माचा लाडका सहकारी बनला.

आपल्या सामान्यांच्या खिजगणतीतही नसलेल्या जगाच्या मॅपिंगचं काम गणेशकडे होतं. चर्चगेट ते बोरिवलीपर्यंत कोणत्या एरियात किती MSM (समलिंगी) किंवा हिजडे आहेत. कितीजण भीक मागतात आणि किती देहविक्रय करतात. अगदी कोणत्या मुतारीच्या जागी किती वाजता पिकअप पॉईंट असतात. सगळ्यांची नावं, गावं, पत्ता यांचा डाटाबेस बनवत असताना त्यांची दुःखं, समस्या, वैफल्य, मूलभूत हक्कांची वानवा याचीही नोंद गणेशच्या हृदयात होत होती. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्याचं मनात घर करू लागलं. चांगल्या घरांतील हुशार पण गे मुलं समाजाने काहीच पर्याय न ठेवल्याने हिजडा बनून एकतर भीक किंवा देहविक्रय करत पत्र्यांच्या घरांत पाहताना यांचा वनवास कधीतरी संपला पाहिजे ही भावना गणेशच्या मनात रुजत होती. हा बदल नुसता विचारांत होत नव्हता तर शरीरातदेखील होत होता.

आपल्याकडे लीगल ऍग्रिमेंट पेपर्सवर साधारणपणे एक वाक्य असतं की "Hereinafter referred to as "Party X” तसं यापुढे लेखात "गणेश" हे नाव बदलून "गौरी" असं लिहीत जाईन. कारण हमसफर ट्रस्टचं काम करता-करता मधल्या काळात गणेशने लिंग बदल करण्याचा निर्णय घेतला, टेस्टिकल काढल्या, स्त्री हार्मोन्स वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्या आणि पुढल्या तीन वर्षानी व्हॅजेनोप्लॅस्टी या मेडिकल सायन्सच्या आविष्काराने पूर्ण स्त्रीकाया असलेली गौरी झाला.

श्री दुर्गा सप्तशतीदेवीच्या एका माहात्म्यात एक ओळ आहे की,
"चित्ते कृपा समरनिष्ठुरता च दृष्टा त्वय्येव देवि वरदे भुवनत्रयेऽपि"

या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे, गौरीला त्या काळात प्रारब्ध-नशीब मला फक्त निष्ठुर नाही तर "समरनिष्ठुर" भासायमान होत असे पण आता त्यातून पार पडल्यावर, कळते की मूळ गाभा हा कृपेचाच होता. जसं साडेसातीबद्दल ज्योतिषी म्हणतात, शनि माणसाला पराकोटीचे जेरीला आणतो पण त्याचे दोष जावेत, निदान कमी व्हावेत, जीवनात संतुलन यावे हाच हेतू त्यामागे असतो. NGO संस्थांचं विकेंद्रीकरण होऊन विशिष्ट विषयाला वाहिलेल्या जास्तीत जास्त मदत संस्था निघाव्यात या उद्देशाने अम्माने गौरीला स्वतःची संस्था काढण्याचा सल्ला दिला. दिव्याने दिवा पेटवावा तसा शिष्यावर अनुग्रह करून गुरु जसं शिष्याला उच्च पदावर नेतात आणि लागणारं सगळं पाठबळ पुरवतात तसं अम्माने गौरीला पुरवलं आणि "सखी चारचौघी" संस्था उदयाला आली.

युद्ध
सखी चारचौघी उदयास आल्यानंतर गौरीच्या संयमाचा, व्यवहार ज्ञानाचा, व्यक्ती-कौशल्याचा कस लागायला लागला. कारण एखाद्या संस्थेचा स्टाफ म्हणून काम करणं आणि एखादी संस्था स्वतः चालवणे यात जमीन अस्मानाचा फरक होता. सरकारदरबारी अवहेलना, सामाजिक बंधनं आणि याउपर संस्था ज्या पीडित तृतीयपंथीयांसाठी काढली होती ते स्वतः उदासीन होते. प्रलोभन दाखवून जमा करावं तर हाती पैसा असावा लागतो. बँकेत बसायला साधी खुर्चीही देत नव्हते तिथे आर्थिक पाठबळ फक्त उदार व्यक्तींच्या दान-धर्मावर अवलंबून होतं आणि ते पुरेसं नव्हतं. नाही म्हणायला NACO, MDACS, UNAIDS, DFID सारख्या संस्था होत्या पण त्यासाठी प्रोजेक्ट सादर करणं, डाटाबेस तयार करणं, संस्थेचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर तयार करणं, काउंसेलर अपॉईंट करणं, ऑब्जेक्टिव्ह, व्हिजन, कायदेविषयक ज्ञान या सगळ्या गोष्टी धीराने, निश्चयाने त्यातील खाच-खळगे समजावून घेऊन करणं गौरीसाठी एखाद्या युद्धासमान होत्या. अर्थात ती जिंकली हे वेगळे सांगायला नको. गौरीला घडवण्यात INFOSEM (The India Network For Sexual Minorities) संस्थेचा मोठा हातभार लागला हे ती बरेचदा नमूद करते.

हिजड्यांसाठी फक्त विरंगुळ्याची आणि टीव्ही बघत आराम करायची जागा असं सुरुवातीला सखी चारचौघी ट्रस्टचं स्वरूप उत्तरोत्तर हिजड्यांचं समुपदेशन करणं, त्यांच्या समस्या, तंटे सोडवणे, HIV बद्दल जागरूकता पसरवणं असं होत-होत त्यांच्या मूलभूत न्याय्य हंक्कांसाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणारं हक्काचं माहेरघर झालं. हॉस्पिटलमधे या लोकांना नीट उपचार, वागणूक मिळावी, वॉर्डमध्ये एखादा बेड नाही निदान आडोसा तरी मिळावा यासाठी गौरीने कितीतरी इस्पितळांचे उंबरठे झिझवलेत.

एप्रिल २०१४, थर्ड जेंडर हि ओळख, त्यांचं अस्तित्व मान्य करून त्यांच्या मूलभूत हक्कांना मान्यता देणारा सुप्रीमकोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयासाठीची जनहित याचिका गौरी आणि तिची सहकारी मीरा हिने फाईल केली होती आणि निर्णय येईपर्यंत नेटाने लढवली. मानसिक खच्चीकरण करणाऱ्या कितीतरी घटना यादरम्यान घडल्या पण त्या सगळ्यांना गौरी धाडसाने पुरून उरली. काही व्यक्तींमध्ये असा कमालीचा चिवटपणा कुठून येतो हे गूढच आहे.

राज्याभिषेक,
विक्सची ट्रान्सजेंडर आईची जाहिरात बघितलीत का तुम्ही? मला वाटतं इतकी वर्षे गौरी वेगवेगळ्या मंचावर घसा फोडून जे सांगायचा प्रयत्न करतेय ते या तीन मिनिटांच्या जाहिरातीने न बोलता प्रभावीपणे पोहोचवले. की बाबांनो आम्हीही तुमच्यासारखीच हाडामासांची माणसं आहोत. नाही दिसायला सुंदर आम्ही पण आमच्या हृदयात निर्माण होणारी स्पंदनं, वेदना तुमच्यासारखीच पवित्र आणि अस्सल आहेत. गतिमंद, विकलांग, गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी, रेपिस्ट, गुंड, मवाली या सगळ्यांना तुम्ही समाजात बरोबरोबरीने जगू देता. मात्र आमचा स्वतःचा कोणताही गुन्हा नसताना केवळ लिंग ठरवणारा अवयव बाद झाला म्हणून कस्पटासमान वागणूक देता. आमच्यातही हुशारी आहे. ती दाखवण्याची फक्त एक संधी द्या. तुमच्याबरोबर आम्हालाही काम करण्याची संधी द्या.

या जाहिरातीतून गौरीने समस्त ट्रॅन्सजेण्डर समाजाचा राज्याभिषेकच केलाय असं मला वाटतं. अर्थात अजून बराच पल्ला गाठायचा आहे. वृद्ध वेश्या आणि त्यांच्या अनौरस मुलांसाठी हक्काचं अनाथालय बांधायचा निर्णय तिने घेतलाय, त्यासाठी मिपाकडून हार्दिक शुभेच्छा.

नितळ सिनेमात सुनील सुकथनकरांचं एक गीत आहे,
"अंधाराच्या भवती आहे नवा नवा अंधार,
प्रकाश सगळा सोडून आला शांतशांत अंधार,
उजेडातल्या रखरखलेल्या, हटवादी अन्‌ दुर्मुखलेल्या,
अगणित चेहर्‍यांच्या गर्दीला कवेत घेई अंधार...."

अश्या या निबिड अंधारात ढकलले गेलेल्या असंख्य तृतीयपंथियांसाठी "गौरी सावंत" एक कवडसा आहे. कवडसा म्हणजे अंधार्‍या जागी कुठूनतरी हळूवार शिरलेला प्रकाश-किरण, त्याच्या येण्याने अंधारही उजळून जातो. एक अनुभूती जी फक्त त्या अंधारालाच कळू शकते.. भरकटलेल्या जहाजांना दीपगृह बनून मार्ग दाखवणाऱ्या गौरी सावंत हिला मनाचा मुजरा. अजूनही नाराज असलेल्या वडिलांच्या शाब्बासकीसाठी आणि मायेचा हात डोक्यावरून फिरावा यासाठी आसुसलेल्या गौरीची इच्छा लवकरच पूर्ण व्हावी असं सावंत-देसाई परिवाराचा एक भाग म्हणून मनापासून वाटतं.

लेखप्रतिभासमाजव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रण

प्रतिक्रिया

दिवाळी अंकात शोभून दिसला असता हा लेख. तुम्ही का नाही दिलात माहीत नाही. पण अतिशय हृद्य लिहिलंय. गौरी सावंत यांना त्यांच्या संघर्षासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. माणसांना माणसांसारखी वागणूक मिळायला हवी हे अतिशय साधं तत्त्व माणसांनीच बनलेला समाज विसरतो बऱ्याचदा. त्यातून खचून न जाता जिद्दीनं आणि सकारात्मकतेनं वाट काढणं थोड्याच जणांना जमतं.

धन्यवाद एस भाऊ,
खरंतर माझ्याकडूनच अक्षम्य उशीर झाला.. सासं ने बऱ्यापैकी व्यक्तिगत आठवण करून दिली होती पण काही कारणास्तव मला उशीर झाला...३-४ दिवसांपूर्वी अंकात वाईल्ड कार्ड एंट्री मारायचा प्रयत्न केला पण सासंचाही नाईलाज झाला.

दिवाळी अंकासाठीच लिहिला होता... पण थर्डजेंडर्स सारखं समाजातून बाहेर फेकले जाण्याचं प्रारब्ध त्यांच्याबद्दलच्या लेखाच्याही नशिबी आलं असा एक विचार मनात चमकून गेला.

आणि गौरी सावन्त यांना त्यांच्या लढ्यात यश मिळावे, अशी मनापासून शुभकामना!

नाखु's picture

18 Oct 2017 - 6:14 pm | नाखु

चाकोरीबाहेर असलेल्या विषयावर लिहायचं धारीष्ट दाखवलं आहे, नियतीशी लढाई करण्याची परंपराच तुम्हां घराण्यांत असावी

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Oct 2017 - 6:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

समाजाच्या खर्‍या विकासासाठी, बरीच सुधारणा होणे आवश्यक असलेल्या एका गोष्टीबद्दलचा, एक अभिनिवेषरहित अप्रतिम लेख ! खरंच दिवाळी अंकात शोभून दिसला असता.

सुबोध खरे's picture

18 Oct 2017 - 7:51 pm | सुबोध खरे

अतिशय उत्तम लेख आहे. मध्यममार्गी लोकांचे आयुष्य फार खडतर असते. एकीकडे समाजाकडून घृणास्पद वागणूक मिळत असते पण आपण असे का आहोत याचे उत्तर त्यांच्या कडे नसते आणि त्यात बदल करणे शक्य हि नाही.
याची शास्त्रीय मीमांसा करणारा लेख दुव्यात देत आहे. अर्थात हा लेख थोडा लांब आणि किचकट आहे आणि त्यात जीवशास्त्राचा थोडा फार भाग येतो पण मध्यममार्गी लोकांचा प्रश्न मुळापासून समजावून घेण्याची ज्याला इच्छा आहे त्याला हा उपयुक्त ठरावा.
https://cuttingthegordianknot.wordpress.com/2015/07/30/homosexuality-and...

ट्रेंड मार्क यांनी लिहिलेल्या अविश्वसनीय सत्यकथा या लेखात मी याबद्दल प्रतिक्रिया दिली होती
http://www.misalpav.com/comment/963398#comment-963398
आपण लिहिलेल्या या लेखामुळे समाजात या निष्पाप माणसांच्या प्रश्नाबद्दल थोडीशी तरी जागरूकता आणि थोडीशी जरी सहानुभूती निर्माण झाली तर आपल्या लेखाचे सार्थक होईल.

बाजीप्रभू's picture

18 Oct 2017 - 8:04 pm | बाजीप्रभू

उपयुक्त माहिती.

फारच अप्रतिम लेख ! गौरी सावंत यांना मानाचा मुजरा...

नैसर्गिक बदल प्रथम पोलिसी टाचांखाली चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला पण प्रत्येक रोपट्याला कापून एकसारखी दिसणारी झुडपे करायाच्या प्रयत्नात मातृप्रेमामुळे काही रोपे सुटतात. हि रोपे हवी तशी वेडीवाकडी वाढत जातात अनेक फांद्यांनी पसरतात. सुरुवातीला वेडेवाकडे वाटणारे असे झाड नंतर काही वर्षांनी मात्र त्याच्या त्या वेगळेपाणामुळेच लोकांचे लक्ष्य वेधून घेते, असच काहीसं गणेश बाबतीत झालं.

किती प्रभावीपणे मांडलत... या सर्व विविधतेला अजूनही नीट स्वीकारू शकत नाहीयेत आपण. यातून त्यांची मात्र खूप घुसमट होते.

पद्मावति's picture

18 Oct 2017 - 9:27 pm | पद्मावति

गौरी सावंत यांना केवळ आणि केवळ __/\__ शब्दच नाहीत आदर व्यक्त करायला.
तुम्ही अप्रतिम लिहिलं आहे, नेहमीच लिहिता.

स्वाती दिनेश's picture

18 Oct 2017 - 9:47 pm | स्वाती दिनेश

उत्तम लेख!
उंच माझा झोका पुरस्कार मध्ये ह्या वर्षी गौरी सावंत ह्यांचा सन्मान झाला होता तेव्हा प्रथम त्यांच्या बद्दल समजले.
स्वाती

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2017 - 9:48 pm | टवाळ कार्टा

या लेखाला दिवाळी अंकात आता सामील करा की

पिलीयन रायडर's picture

19 Oct 2017 - 2:21 am | पिलीयन रायडर

हेच म्हणायचे आहे. आपण काय सरकार थोडीच आहोत की नियम म्हणजे नियम. अंकात असायलाच हवा हा लेख.

ह्या की हो सासं अंकात.. नाही तरी आपला अंक अजून २ दिवस येणारे की.. शिवाय आवाहनाच्या धाग्यातच त्यांनी ह्या लेखाबद्दल लिहीले होते. मग काय हरकत आहे.

निशाचर's picture

19 Oct 2017 - 2:04 am | निशाचर

उत्तम ओळख!
खरंच हा लेख अंकात असायला हवा होता.

सुंदर लेख. गौरी सावंत ह्यांना मानाचा मुजरा!
हा लेख अंकात असायला हवा होता.

अभ्या..'s picture

19 Oct 2017 - 1:30 pm | अभ्या..

खूप सुंदर असतात माणसे, ज्यांचे विचार स्पष्ट असतात, भावना सच्च्या असतात.

खूप सुंदर लेख..तुमचे आभार..ह्यांच्या कार्याबद्दल वाचले होते पण व्यक्तीगत आयुष्याबद्दल प्रथमच वाचले.
आणि हा लेख दिवाळी अंकात यायला हवा, त्यानिमित्ताने जास्त लोकांपर्यंत पोचेल हा लेख, त्याची खूप गरज आहे.

प्रचेतस's picture

19 Oct 2017 - 3:54 pm | प्रचेतस

अप्रतिम लेख.

संजय पाटिल's picture

19 Oct 2017 - 4:04 pm | संजय पाटिल

अतिशय सुंदर ओळख!! आणि गौरी सावंत यांना मानाचा मुजरा...

मित्रहो's picture

19 Oct 2017 - 11:19 pm | मित्रहो

सुंदर ओळख करुन दिली. गौरी सावंत यांना मानाचा मुजरा.

दुर्लक्षित विषयावर चा छान लेख !

प्रास's picture

20 Oct 2017 - 4:37 pm | प्रास

उत्तम लिखाण!
खरंच दिअं मध्ये यायला हवा. लिंक देणं सोपं होतं...

मला मिपा व्यासपीठाचे विशेष धन्यवाद द्यावेसे वाटतात ते यासाठी कि... हा लेख माझ्या कुटुंबियातील बऱ्याच जणांनी वाचला.. डोळ्यांत अंजन घालणारा लेख वाचून बऱ्याच जणांना स्वतःची चूक उमगली.. त्यातल्या बऱ्याच जणांनी गौरीला घरी येण्याचं आमंत्रण देण्याचं ठरवलंय. खूप चांगली सुरवात आहे हि.. मिपाच्या संपादक मंडळाने "व्यक्ती चित्रणाचं" आवाहन करून लिहिण्यास प्रवृत्त केल्याबद्दल खूप खूप आभार.... मिपाच्या व्यासपीठाचा वैयक्तिक आयुष्यात असाही उपयोग होऊ शकतो हे पाहून मिपाबद्दलचा आदर द्विगुणित झाला.

आलेल्या आणि येणाऱ्या प्रतिसादांसाठी खूप खूप धन्यवाद..

बबन ताम्बे's picture

21 Oct 2017 - 9:32 am | बबन ताम्बे

एक वेगळी दृष्टी देऊन गेला तुमचा लेख.

चौकटराजा's picture

21 Oct 2017 - 8:23 pm | चौकटराजा

तुमचा हा लेख अस्वस्थ करणारा व प्रबोधक असा दोन्हीही आहे. मानवी समाज देखील उत्क्रांत होत आहे. मी स्वतः असे म्हणतो की " निसर्गातील सारेच " नैसर्गिक" च असते. शाकाहार जसा नैसर्गिक तसाच मांसाहार. गोरा माणूस तसाच काळा. अगदी उद्या निळा माणूस जरी जन्माला आला तरी तो असाधारण असेल पण अनैसर्गिक नाही. असा विचार माझ्या वडीलानी नक्कीच केला नसता, मी करून शकतो.
नथिंग इज अ पर्व्हर्शन अन्लेस इट हर्टस द सोल अ‍ॅट अदर एन्ड !" आमच्या तरूण पणी हस्तमैथून या प्रकाराला विकृति समजत होते. आता अबलेवर बलात्कार करण्यापरिस हस्तमैथून बरे असा दृष्टीकोन विकसित होत आहे.

वरकरणी पुरूषी दिसणार्‍या शरीरात " स्त्री " मन अशी अवस्था गौरी यांची असावी असे लेखावरून वाटते. इथे लढा स्वतः शी व समाजाशीही . गौरी याना सलाम त्यासाठी !

शब्द अपुरे आहेत. आपल्या पासुन सुरवात करायला हवी, कि अशा लोकांंची मी हेटाळणी करणार नाही.

आपण मांडलेला विषय खूप महत्त्वाचा आहे. गौरीजीचा संघर्ष नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या संघर्षाला सलाम आणि शुभेच्छा...

शब्दबम्बाळ's picture

22 Oct 2017 - 10:24 am | शब्दबम्बाळ

काय लिहावे कळत नाहीये... vicks ची जाहिरात पण अत्यंत सुरेख आहे, नकळत डोळ्यात पाणी आलं...
मी माझ्यापरीने यांना अपमानकारक शब्द वापरण्याचे टाळतो(जे बऱ्याचदा सहजपणे वापरले जातात).
बंगलोरमध्ये काहीवेळा तृतीयपंथीय व्यक्तीशी बोलणे झाले, अर्थात हे प्रसंग नेहमी इतरांसोबत होतात त्या प्रकारचेच होते.
एका प्रसंगात मी ज्यूस पीत उभा असताना, एक तृतीयपंथीय व्यक्ती हॉटेल वाल्याकडे पैसे मागायला आली. त्याने दहा रुपये दिले(हे नंतर मी बऱ्याच वेळा पहिले, तो त्यांना न हाकलता किंवा हाड तुड न करता थोडीच पण काहीतरी मदत देत होता. कारण काही का असेना)
त्यानंतर ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि पैसे मागू लागली. मी शक्यतो कोणालाच पैसे देत नाही, मी त्यांना ज्यूस घेणार का विचारले. दोन मिनिट विचार करून त्यांनी "चल एक पोमोग्रॅनेट बोल दे" सांगितले. आतला ज्यूस बनवणारा माणूस बघतच होता त्याने हसून ज्यूस बनवायला घेतला आणि म्हणाला "चॉईस तो देखो!" हे सगळं अत्यंत सामान्यप्रकारे चाललं होत.
पण आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात आलं कि प्रत्येक जण आमच्याकडेच बघत होता. त्यांना कदाचित अशा नजरांची सवय असावी पण मला मात्र नव्हती मी जरासा अवघडलो. पण, त्यांना त्याचा काही फरक पडला नाही कदाचित इतकी वर्ष अशा नजरा झेलून एक प्रकारचा बेरका स्वभाव बनला असावा.
"क्या करता हे इधर? कन्नडा आता है?" समोरून असे मोठ्या आवाजात प्रश्न आले. मला खरतर आता बघणाऱ्या लोकांमुळे जास्त संभाषण वाढवायचं नव्हतं पण तरीही मी उत्तर दिली. एक पाऊल माग सरकलो आणि तसाच ज्यूस पीत उभा राहिलो.
मी जवळपास माघार घेतली होती. ते त्यांच्या पण लक्षात आले आणि पुढचे प्रश्न आले नाहीत. थोडावेळ ज्यूस पिला आणि मग अर्धा तसाच ठेऊन "थँक यु" म्हणून पुढे निघून गेले. मी तोंडातल्या तोंडात "वेलकम" म्हणालो.
बाजूला उभ्या असलेल्या मुलं-मुली कुत्सित हसत होत्या, कसा बकरा झाला हा म्हणून! पण मला त्यांनी स्वतः मागून घेतलेला ज्यूस तसाच सोडून गेल्यानं आतून कसतरीच झालं.
बराच वेळ हे असच असायला हवं का याचा विचारचक्र सुरु होत पण उत्तर नाही मिळालं...

पुंबा's picture

23 Oct 2017 - 11:11 am | पुंबा

फार सुंदर लेख..
धन्यवाद..

दुर्लक्षित विषय, त्यात टॅबू असलेला, पण तुम्ही फार छान लिहिले आहे बाजीप्रभू ! जवळचे व्यक्तिगत संबंध असूनही फार संतुलित पद्धतीने विषय मांडलाय.

गौरीसारख्या व्यक्ती ठामपणे स्वतः आणि स्वतःसारख्या अन्य लोकांना बळ देत आहेत, समाज बदलतोय आणि हे वेगळेपण सामावून घ्यायला हळूहळू का होईना तयार होतोय हे फार संतोषकारक आहे.

उत्कृष्ट आणि उत्कट लेखाबद्दल अभिनंदन.

आणि हो, शीर्षकात ते 'दी'पगृह केलेत त्याबद्दल विशेष आभार. :-)

अनिंद्य

चिगो's picture

23 Oct 2017 - 5:00 pm | चिगो

गौरीजींना सलाम.. 'केबीसी'मध्ये त्या आल्या तेव्हा त्यांच्या लढ्याचीच नव्हे, तर हळव्या मनाचीही कल्पना आली. त्यांच्या पुढील लढ्यासाठी शुभेच्छा..

फार आनंद झाला हे वाचून -

हा लेख माझ्या कुटुंबियातील बऱ्याच जणांनी वाचला.. डोळ्यांत अंजन घालणारा लेख वाचून बऱ्याच जणांना स्वतःची चूक उमगली.. त्यातल्या बऱ्याच जणांनी गौरीला घरी येण्याचं आमंत्रण देण्याचं ठरवलंय. खूप चांगली सुरवात आहे हि..

आपल्या लिखाणाचा प्रभाव पाहून अजून लिहिण्याचा हुरूप येतो.

झेन's picture

24 Oct 2017 - 11:53 am | झेन

टाळल्या जाणाऱ्या विषयावर अतिशय संतुलित लिहिले आहे. गौरींचा लढा शब्दापलिडचा असावा, ह्यासाठी लागणारी मानसिक ताकत..सलाम.
पण समहाऊ कळतं पण वळत नाही. प्रामाणिक पणे सांगायचं तर मी अश्या व्यक्तींचा तिरस्कार कधीच करत नव्हतो पण संपर्क टाळायचो. कदाचित समाजात जास्तिजास्त किन्नर ज्याप्रकारे समोर येतात त्यामुळे असेल. पण आता नक्की फरक पडेल.

लई भारी's picture

24 Oct 2017 - 5:08 pm | लई भारी

धन्यवाद!
विक्स च्या जाहिराती नंतर त्यांच्याविषयी त्रोटक माहिती वाचली होती. आपण एवढं संतुलितपणे मांडलंय आणि मला वाटत, त्याची खरी पावती म्हणजे जवळच्या लोकांनी त्यांना आमंत्रण देणे.
फॉरमॅट पण आवडला.

सप्तरंगी's picture

24 Oct 2017 - 5:36 pm | सप्तरंगी

अप्रतिम लेख

अभिजीत अवलिया's picture

24 Oct 2017 - 6:26 pm | अभिजीत अवलिया

लेख आवडला.

नावातकायआहे's picture

25 Oct 2017 - 8:48 am | नावातकायआहे

अप्रतिम लेख.

किसन शिंदे's picture

25 Oct 2017 - 11:04 am | किसन शिंदे

दीपगृह हा शब्द चपखल आहे गौरी सावंत यांच्यासाठी. लेख अतिशय संतुलित आणि प्रामाणिकपणे लिहीलेला वाटला.

मंजूताई's picture

25 Oct 2017 - 4:14 pm | मंजूताई

गौरी सावंत यांना केवळ आणि केवळ __/\__ शब्दच नाहीत आदर व्यक्त करायला.
तुम्ही अप्रतिम लिहिलं आहे, नेहमीच लिहिता.>>>>+१

मनिमौ's picture

27 Oct 2017 - 2:19 pm | मनिमौ

उघडणारा लेख. खरंच अतिशय संतुलित शब्दात तुम्ही गौरीची गाथा मांडली आहे. गौरी ला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा

सविता००१'s picture

31 Oct 2017 - 3:00 pm | सविता००१

नि:शब्द करणारा लेख आहे. फार फार सुरेख. यांच्या वैयक्तिक आयुष्यातलं काहीच माहिती नव्हतं. किती सोसलंय ... बापरे.
त्यांच्या पुढील आयुष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा!

खरंच दिवाळी अंकातच शोभून दिसला असता हा लेख.. नव्हे या लेखाने दिवाळी अंकाला एक वेगळी उंची मिळाली असती.

पाटीलभाऊ's picture

1 Nov 2017 - 6:23 pm | पाटीलभाऊ

गौरी सावंत याना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...!

अजया's picture

1 Nov 2017 - 9:22 pm | अजया

अप्रतिम लेख _/\_

अॅमी's picture

3 Nov 2017 - 2:03 pm | अॅमी

गौरीला _/\_ आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

लेख आवडला. फक्त गे, समलिंगी हे शब्द चुकीचे वापरले आहेत असे वाटते. गौरी ट्रान्स आहे...

===
शब्दबम्बाळ यांचा प्रतिसाददेखील आवडला.

मुलींना हे शक्यतो त्रास देत नाहीत. असे बर्याचजणींकडून ऐकले आहे आणि माझा स्वतःचा एकदोन वेळचा अनुभवही तसाच आहे. पण दहाएक वर्षांपूर्वी कर्वेंनगर, कमिन्सपाशी यांचा त्रास झालेल्या मुलीही भेटल्या आहेत.... अर्थात यांचे नीट पुनर्वसन झाले, समाजाकडून अकॅसेप्टन्स मिळाला की ते बंद होईलच पण तरी....

अॅमी's picture

3 Nov 2017 - 2:47 pm | अॅमी

बादवे पहिला पूर्णपणे अँड्रॉजिनिस मॉडेल आंद्रेज पेजीक माहित असेलच. आता तो ट्रान्स आहे; आंद्रेजा नाव. मला तो/ती दोन्ही अवतारात आवडतात.

===
आणि हा लेख दिवाळी अंकात असायला हवा होता याला सहमती. गेल्यावर्षीपण कोणीतरी फार छान पाककृती दिवाळी दरम्यानच टाकलेल्या. उशीरा पाठवल्या म्हणूनअंकात घेतल्या नव्हत्या. खरंतर अंकातल्यापेक्षा याच पाककृती जास्त चांगल्या होत्या :D :-P

अप्रतिम लिहिलंय.. या लेखासाठी धन्यवाद!

प्राची अश्विनी's picture

4 Nov 2017 - 10:55 am | प्राची अश्विनी

+11__/\__

विनिता००२'s picture

6 Nov 2017 - 12:28 pm | विनिता००२

वाचून डोळे पाणावले. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना पण आयुष्यात बरेच काही सहन करावे लागते तर अशा शापीत आयुष्यांचे काय बोलायचे!
किन्नरांचा कधी त्रास झाला नाही. बरेचदा त्यांच्यांशी बोलावेसे वाटायचे, त्यांची मनोव्यथा जाणून घ्यावीशी वाटायची, पण त्यांना वाईट तर वाटणार नाही ना? या विचाराने पाय मागे ओढला जायचा. त्यांना नेहमी माणूसच समजले, आणि असे समजण्याची बुध्दी दिली या बद्दल देवाचे आभार!

माबोवर हा एक चांगला लेख आला आहे ट्रान्सबद्दल
https://www.maayboli.com/node/64572