एका लग्नाची गोष्ट!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
25 Sep 2008 - 7:40 pm

लग्न! दाराशी केळीचे खुंट,आंब्याचे टहाळे आणि झेंडूच्या फुलांची तोरणं,पैठण्यांची सळसळ, अत्तराचा दरवळ, करवल्यांचे मिरवणे,भटजींची बोहल्यावरची लगबग, "आता मुलीला आणा... मुलीचा मामा कुठे आहे? " अक्षता, मंगलाष्टका आणि 'तदेव लग्नं..' झालं की 'वाजवा रे वाजवा..' चा इशारा! होमाचा धूर,सप्तपदी, ते ४,५ दा साड्या बदलणे,विहिणींच्या ओट्या, मानपान, रुसवेफुगवे, व्याही भेटी, पंगतीतला आग्रह, जिलेब्यांची ताटे आणि संध्याकाळचे आईसक्रीम!
असं किवा यातलं कोणतंच दृश्य जरी मानहाईमच्या चर्च च्या दाराशी अपेक्षित नव्हतं तरी इतकी सामसूम सुद्धा अपेक्षित नव्हती.३ चा मुहुर्त आणि आम्ही २.३० ला तिथे पोहोचलो म्हणजे वेळेतच होतो. नक्की आजच आहे ना लग्न? अशी शंका येऊन मी हळूच पत्रिका पाहिली. एकात एक गुंतलेली बदाम हृदयं आणि आतल्या पानावर "आम्ही लग्न करीत आहोत,तरी अगत्य येण्याचे करावे.." अशा अर्थाचा मजकूर! " आमचे येथे श्रीकृपेकरून..." असा मजकूर लग्नपत्रिकेवर वाचायची सवय असलेल्या डोळ्यांना चि. सौ.का. सुझान आणि चि. ख्रिस ने पाठवलेली आपल्या स्वतःच्याच लग्नाची पत्रिका आहे हे मान्य करायला खूप वेळ लागला होता.चर्चच्या आत डोकावून पाहिले,तर तिथेही शांतता!थोडे तिथेच रेंगाळून बाहेर आलो तर समोरच मोनिका!
करवलीबाई आणि त्यांचा नूतन नवरा फिलिप्स (यांचे १५ दिवसांपूर्वीच लगीन झालं होतं) आजचे विशेष फोटोग्राफर होते. हळूहळू वर्‍हाडी जमायला लागले.एवढ्यात एका गाडीतून ख्रिस आणि सुझानला घेऊन मटियाझ आला.मोतिया रंगाचा सॅटिनचा वेडिंग गाऊन घातलेली सुझन सोनेरी परीच दिसत होती.ख्रिसही रुबाबदार वेडिंग सूट मध्ये, "कोण तू? कुठला राजकुमार?" असे विचारावेसे वाटणारा दिसत होता.सर्वांना त्या दोघांनी अभिवादन केले आणि आम्ही सर्वजण चर्च मध्ये शिरलो.मानाच्या खुर्च्या सोडून जरा मागेच बसावे असा विचार करून तिथल्या जरा मागच्या बाकावर टेकलो तर मोनिकाताईंनी आम्हाला हाताला धरून पुढे नेले.

ऑर्गनच्या प्रसन्न सुरांबरोबरच हातात हात गुंफून ख्रिस आणि सुझान मंद पावले टाकीत आत प्रवेशते झाले आणि येशुसमोरील जागेत ठेवलेल्या स्टुलांवर जाऊन बसले.पाद्रीबाबांनी वधूवरांना शुभाशीर्वाद दिले आणि ऑर्गनचे सूर चर्चमध्ये पसरू लागले,प्रत्येकाच्या समोर मंगलाष्टकांचे कागद ठेवले होते‌‌. सारेजण ती लग्नगाणी गाऊ लागले.मंगलाष्टका संपल्यावर त्यांनी एकमेकांना अंगठ्या घालून सुखदुःखात साथ देण्यासाठी पतीपत्नी म्हणून आजन्म स्वीकार केले.नंतर फादरनी लग्नोपदेश केला.गुलाबपाकळ्यांच्या वर्षावात नूतन दांपत्य चर्चबाहेर आले.त्यांच्या डोक्यावर तेथील लोकांनी तांदूळ टाकलेले पाहून जरा आश्चर्यच वाटले..आपल्या अक्षतांशी साम्यच की हे! फक्त आपल्या अक्षता कुंकुमाचे बोट लावून रंगीत करतात एवढाच काय तो फरक!दोघांचे आईवडिल, भावंडे यांनी गळाभेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि मग इतर सर्वांनी!
आपल्याला लग्नाच्या दिवशी सकाळी हॉलवर जाऊन उपमा खाऊन, अक्षता टाकून जिलेबी नाहीतर श्रीखंडाचे जेऊन ऑफिसला पळायची सवय! आणि सुट्टीचा वार असेल तर तिथे जरा जास्त वेळ रेंगाळून घरी येऊन 'ताणून द्यायची'... असा किरकोळ बदल! इथे तर कार्यालयच नव्हते.लग्न मानहाईमच्या चर्च मध्ये, आमची राहण्याची हॉटेले मुटरस्टाट मध्ये तर लग्नाचा बाकी सोहळा डायडेसहाईम मधील एका निसर्गरम्य, रोमँटिक ठिकाणी!सगळ्या गाड्या आता डायडेसहाईमच्या दिशेने धावू लागल्या.आमची वर्णी वधूपित्याच्या गाडीत लागली‌.श्री. ष्मिट गाडी चालवत होते आणि सौ. ष्मिट नकाशात पाहून कसे जायचे ते सांगत होत्या.आणि मध्येच मागे वळून आमच्याशी गप्पाही चालू होत्या," आम्ही पण आत्ता पहिल्यांदाच जातो आहोत ना तिथे,त्यामुळे नकाशा पहावा लागतोय!" आम्ही गाऽरच झालो.मानहाईम ते डायडेसहाईम गाडीने पोहोचायला आम्हाला साधारण १/२ तास लागला.दुतर्फा द्राक्षाचे मळे,सफरचंदाची झाडे,अजूनही असलेली गवतफुलं आणि रंग पालटू लागलेले मेपल्स होते‌. सुझनचे आईबाबा बेन्सहाईमचे, म्हणजे याच भागातले,ते उत्साहाने आम्हाला माहिती सांगत होते
डायडेशाईमच्या केटशाऊर होफ मध्ये पोहोचलो.सन १८२२ मध्ये बांधलेला तो कुण्या उमरावाचा वाडा किवा गढीच होती ती!त्याचेच आता रेस्टॉरंट+ हॉटेल केले आहे.कार्यालय,जेवणावळी असं काही नव्हतंच.त्या वाड्याच्या चौकात लहानसं फरसबंद अंगण आहे, चहूबाजूंनी अंजिराची झाडं बाळअंजिरं लेवून डोलत होती.मेपल्स आणि मयूरपंखी चवऱ्या ढाळत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत होते.अंगणातच एका मेजावर झेक्ट( जर्मन शँपेन),फळांचे रस आणि जोडीला चीजचे प्रकार आणि ब्रेत्स्झेल दिले जात होते( ब्रेत्स्झेल-एक विशिष्ठ प्रकारचा हृदयाच्या आकाराचा पाव,जी बायरिश भागाची खासियत आहे!)मागील बाजूला असलेल्या प्रशस्त हिरवळीवर एकत्रित फोटोचा कार्यक्रम झाला.हृदयाच्या आकाराचे ,प्रेमाच्या रंगाचे लाल गुलाबी फुगे ख्रिस आणि सुझन च्या हातून हवेत सोडण्यात आले.प्रत्येक फुग्यावर प्रेमवचने लिहिली होती,जणू प्रेमाचा संदेशच हवेत लहरत दूर दूर जात होता.

आतील दालनात एका मेजावर आकर्षक रीतीने सर्वांनी आपापल्या भेटवस्तू ठेवल्या होत्या.आम्हीही आमची भेटवस्तू तिथे ठेवून आलो. चटकन आठवले ती नवरानवरीला भेटण्यासाठी स्टेजजवळ लागलेली रांग,त्यांच्या हातात भेटवस्तू/पाकिटे दिल्यावर ती झटकन आपल्या हातात घेऊन त्याची नोंद करणारा नवर्‍याचा/नवरीचा काका,भाऊ किंवा तत्सम कोणीतरी! " अहेर आणू नये.." असे लिहिले असतानाही वरवधूच्या हातात पाकिटे कोंबणारे नातेवाईक आणि आता 'याचं' काय करायचं?ते न कळून गोंधळलेले वरवधू! त्या टेबलाच्या जवळच एका फळ्यावर 'कोणी कोठे बसायचे' ते लिहिलेले होते.८ मेजे,प्रत्येक मेजावर ८ जण! गुलाबफुलांनी आणि ऑर्किडच्या सुंदर पुष्परचनांनी टेबले सजवली होती.प्रत्येकाचे नाव कलात्मक रीतीने मेणबत्त्यांवर लिहिलेले होते‌. ६० च्या आसपास निमंत्रित! एकच पंगत!सगळे एकाच वेळी जेवायला बसले,नवरानवरी इतकेच काय तर मुलीच्या आईवडिलांसकट! पंगतीत जागा पटकावण्यासाठी करावी लागणारी धडपड,पहिली पंगत उठायच्या आधीच खुर्च्यांच्या मागे उभे राहणारे लोक,मठठा,मठठा ... करत आपण वाढा म्हणायच्या आधीच धावत पुढे जाणारे वाढपी,आणि"वाढ रे यांना ४ जिलब्या अजून..काही होत नाही हो!" असे पंगतीतले आग्रह, आपल्या कडील कार्यालयातील दृश्य तरळून गेले एकदम डोळ्यांसमोर!

जेवण कोर्सेस मध्ये वाढले जाणार होते आणि प्रत्येक कोर्स च्या मध्ये काही गमतीदार कार्यक्रम होते. सांद्र की कायशा त्या संगीताने वातावरण जादूभरले झाले होते.सुझान च्या वडिलांनी सर्वप्रथम सर्व आमंत्रितांना भोजनाचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची विनंती केली आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद देऊन आपला चषक उंचावला,पाठोपाठ सार्‍यांनी चषक उंचावून 'प्रोस्ट' म्हणजे 'चिअर्स' केले.ख्रिसचे बाबा उठले,सुझन सारखी 'बहू' मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत तिला 'मुहदिखाई' म्हणून 'केझस्पेस्झट्लं' बनवण्याचे मशिन दिले.बेक मंडळी आइनस्टईनच्या आल्प्सच्या कुशीतल्या गावाची,उल्मची! आणि केझस्पेस्झटलं ही तिथली खासियत!
डायडेसहाईम हे 'वाईन लँड' म्हणून ओळखले जाते.इथे येतानाच बहरलेल्या द्राक्षांच्या मळ्यांनी ते सांगितले होतेच, त्यामुळे श्वेतवारुणी आणि रक्तवारुणीचे चषकच्या चषक भरले जात होते,रिकामे होता न होताच परत परत भरले जात होते‌. रुकोला सॅलड आणि सुतरफेणीसारख्या शेवया आंब्याच्या टक्कू सारख्या एका पदार्थाबरोबर आल्या. ते खाऊन होत असतानाच पेल्यांचा किणकिणाट झाला,संगीतही थांबले.ख्रिस आणि सुझानला अँगेला,सुझानच्या बहिणीने एका कॅनव्हास पाशी नेले,तिथे तैलरंग,कपडे खराब होऊ नयेत म्हणून लॅबकोट ठेवलेले होते. कॅनवास वर तिने चौकोन,गोल,त्रिकोण अशा आकृती आखून ठेवल्या होत्या,त्यात एक चौकोन या दोघांनी भरून इतर सर्व पाहुण्यांनी ते चित्र जमेल तसे पूर्ण करायचे होते.प्रेमाचे प्रतिक असलेल्या बदाम हृदयाने सुझन ने सुरूवात केली आणि नंतर इतरांनी मधल्या 'ब्रेक्स' मध्ये ते चित्र पूर्ण केले.

एकीकडे पुढचा कोर्स आला,टोमॅटो पोखरून त्यात झुचिनी,वांगं इ. भरले होते आणि परत टोमॅटोच्याच टोपीने ते बंद करून उकडले होते.प्रोजेक्टरवर ख्रिस आणि सुझन चे बालपणापासूनचे आतापर्यंतचे फोटो दिसू लागले आणि त्या निवडक फोटोंची खासियत वेचक शब्दांत वर्णन करत होत्या, वधूमाय आणि वरमाय!
बटाट्याचे ग्राटिन म्हणजे बटाट्याचे भज्यांना करतो तसे काप करून मेयॉनिजमध्ये बुडवून परत एकावर एक ठेवून पूर्ण बटाटा करून तो अवन मध्ये भाजला होता,सोबत गाजर,काकडी,कांद्याची पात इ. भाज्या चीजसॉस मध्ये घालून आणल्या होत्या, पावाचे विविध प्रकार ही त्याच्या बरोबर होते. हा प्रकार फारच चविष्ठ होता.आग्रह करकरून वाढपी वाढत होते.रिकामे चषक न सांगताच भरले जात होते.केटररला सांगायला लागत नव्हते की वाढप्यांकडे लक्ष द्यायला लागत नव्हते.वधू वर मात्यापित्यांसकट सारे जण एकाच वेळी निश्चिंतपणे भोजनाचा आस्वाद घेत होते.ख्रिस आणि सुझन ला दोन टोकांना उभे करून त्यांच्या बहिणींनी एकमेकांबद्दल प्रश्न विचारले, बरोबर उत्तर आले की एक पाउल पुढे टाकायचे, असे करत करत दोघे मध्यावर आले आणि मग ख्रिसने सुझन ला आलिंगन दिले.आता ख्रिस आणि सुझनने सर्व आमंत्रितांची ओळख करून देताना प्रत्येकाची काही खासियत एखाद्या वाक्यात सांगितली.आपल्याकडे लग्नात आलेले पाहुणे कोण? हे नवरानवरीला कितीतरीदा माहितच नसते, इथे प्रत्येक आमंत्रिताची इतर सर्वांना ओळख खुद्द नवरानवरीच करून देत होते.
आतील दालनात 'डेझर्ट बुफे' लावला होता, वेगवेगळ्या प्रकारची पुडिंग्ज,चीज,फळे आणि कॉफीचे वेगवेगळे प्रकार, दुसऱ्या एका मेजावर कॉकटेल्स चे प्रकार आणि बिअर! प्रत्येकाला खास उल्म हून आणलेली चॉकलेटस दिली गेली.आता प्रोजेक्टरवर वेनिसचे गोंडोला दिसायला लागले,नवरानवरीला सहलीचे कपडे देण्यात आले आणि ख्रिसच्या हातात एक गाण्याचा कागद कोंबला, सुझन गोंडोलात बसली आहे आणि ख्रिस प्रणयगीत म्हणतो आहे अशी 'सिच्युएशन' देण्यात आली. ख्रिस आमचा चांगलाच बेसुरा तर सुझन ओपेरात गाणे म्हणणारी,त्यामुळे 'रोल्स' ची आलटापालट करून सुझनने गाणे म्हणून मधुर सुरांनी वातावरण भारून टाकले. एकीकडे डीजे चालू होतेच.नवदांपत्याने आता 'वेडींग केक' कापला, प्रेमाचा गुलाबी रंग स्ट्रॉबेरी केक मध्येही उतरला होता.

'ब्रायडल डान्स' सुरू झाला, नवे जोडपे प्रथम पारंपरिक पद्धतीने नाचले,पाठोपाठ दोघांचे आईवडिल,भावंडे आणि मग सार्‍यांचेच पाय थिरकायला लागले, एकीकडे कॉफी,केक,पुडींग इ. चालूच होते.रात्र चढत होती, वातावरण नशिलं होते.ही आठवण मनात जपत सर्वांचा निरोप घेऊन एकेक जण परतू लागले होते.

समाजजीवनमानलेख

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2008 - 7:55 pm | प्रभाकर पेठकर

फारच धावते वर्णन गावांच्या आणि पदार्थांच्या नावांना ठेचकाळत वाचले. दमच लागला.
पण मजा आली एक 'गोरे' लग्न अनुभवले. धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 10:14 pm | विसोबा खेचर

पण मजा आली एक 'गोरे' लग्न अनुभवले. धन्यवाद.

हेच म्हणतो..!

स्वाती, मस्त लिहिलं आहेस, फोटूही झकास..

आपला,
(अविवाहीत) तात्या.

टारझन's picture

26 Sep 2008 - 3:00 pm | टारझन

जबरा आहे राव लग्न.... हादडाअयला लग्न एकदम बेष्ट स्पॉट आहे.
आणि थोडा आनंद जाहला नवर्‍या नवरीच्या उंचीतला फरक पाहून... एकटे नाही आपण असे... उत्तम आहे :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

रेवती's picture

25 Sep 2008 - 8:20 pm | रेवती

लग्नाचं वर्णन बारकाव्यांनिशी केलंय. आवडलं!
त्यांची शिस्त पाहून बरंही वाटतं पण आपल्याकडच्या लग्नात जो उत्साह, जल्लोश असतो तोही आवडतो.

लग्न! दाराशी केळीचे खुंट,आंब्याचे टहाळे आणि झेंडूच्या फुलांची तोरणं,पैठण्यांची सळसळ, अत्तराचा दरवळ, करवल्यांचे मिरवणे,भटजींची बोहल्यावरची लगबग, "आता मुलीला आणा... मुलीचा मामा कुठे आहे? " अक्षता, मंगलाष्टका आणि 'तदेव लग्नं..' झालं की 'वाजवा रे वाजवा..' चा इशारा! होमाचा धूर,सप्तपदी, ते ४,५ दा साड्या बदलणे,विहिणींच्या ओट्या, मानपान, रुसवेफुगवे, व्याही भेटी, पंगतीतला आग्रह, जिलेब्यांची ताटे आणि संध्याकाळचे आईसक्रीम!

बरं वाटलं वाचून. लांब असल्याने भारतातल्या लग्नांना जाता येत नाही. वर्णनामुळे लग्नाला गेल्यासारखं वाटलं.

रेवती

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Sep 2008 - 9:54 pm | बिपिन कार्यकर्ते

स्वातीताई, वर्णन तर मस्तच केलंय... लग्ना सारख्या घरगुती समरंभांची गंमत कुठेही गेलं तरी तशीच असते नाही?

एक छोटी शंका: तिथे 'कृपया अहेर आणू नये' असं' पत्रिकेवर लिहितात का?

बिपिन.

स्वाती दिनेश's picture

26 Sep 2008 - 11:36 am | स्वाती दिनेश

'कृपया अहेर आणू नये'
असं न लिहिता त्यांना काय काय हवं आहे त्याची यादी इमेलने पाठवतात आणि मग आपण आपल्याला त्यांना त्यातले काय द्यायचे आहे ते कळवायचे म्हणजे एक वस्तू डबल होत नाही.
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 12:03 pm | बिपिन कार्यकर्ते

हे मस्तच...

यशोधरा's picture

25 Sep 2008 - 10:04 pm | यशोधरा

मस्त लिहिलस स्वातीताई..

घाटावरचे भट's picture

25 Sep 2008 - 11:08 pm | घाटावरचे भट

लेख झकासच. गोर्‍यांच्या लग्नात नक्की काय करतात ते पयल्यांदा समजलं....
असो, फक्त त्यांच्या प्रत्येक रिवाजासोबत आपल्या रिवाजांच्या केलेल्या वर्णनामुळे लेख थोडा लांबला असे वाटले (या गोष्टी आपोआप डोळ्यासमोर येतातच). एक सुंदर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

भाग्यश्री's picture

25 Sep 2008 - 11:22 pm | भाग्यश्री

एकदम मस्त लेख!! गोर्‍या लग्नात काय काय करतात ते कळलं! मला वाटायचं तो पाद्री काहीतरी बोल्णार मग एक किस, आणि मग संपलं लग्न! ( चित्रपटांचा प्रभाव! :()
चित्राची आयडीआ खूपच आवडली मला! मस्तच दिसतंय ते चित्र..
बाकी, दोघांच्याही लहानपणापासूनचे फोटो प्रोजेक्टरवर दाखवणे हा प्रोग्राम आमच्या लग्नातही झाला होता! :) मस्त वाटतं!

सागररसिक's picture

26 Sep 2008 - 9:06 am | सागररसिक

गोर्य च्या लग्न चि चगलि महिति अहे

जैनाचं कार्ट's picture

26 Sep 2008 - 9:13 am | जैनाचं कार्ट (not verified)

मस्तच अनुभव शब्दबध्द केला आहे !
मागे मी देखील एका अशाच चर्च मधील लग्न समारोह मध्ये गेलो होतो त्याची आठवण आली !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

पद्मश्री चित्रे's picture

26 Sep 2008 - 9:18 am | पद्मश्री चित्रे

एकदम ओघवते वर्णन.
छान वाटलं वाचून

सुनील's picture

26 Sep 2008 - 9:53 am | सुनील

सुरेख वर्णन! विशेषतः खाद्यपदार्थांचे तर खासच!

श्वेतवारुणी आणि रक्तवारुणीचे चषकच्या चषक भरले जात होते,रिकामे होता न होताच परत परत भरले जात होते‌
हे खूप आवडलं.

फारा वर्षांपूर्वी मुंबईच्या मॅक्समुल्लर भवनात जर्मन शिकत असताना तेथे एका समारंभात जाण्याचा योग आला. तेथे पिंपात भरून ठेवलेल्या बियरची आठवण झाली! एक ग्लास संपला की दुसरा तयार!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ's picture

26 Sep 2008 - 10:49 am | विजुभाऊ

स्वाती तै मस्त लिहिले आहेस
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले
सांद्र की कायशा त्या संगीताने वातावरण जादूभरले झाले होते
बरेच वर्षा नन्तर हा शब्द वाचण्यात आला. नंदा प्रधान मधे "त्या सांद्र वातावरणात सगलेच गोरे दिसत होते" असे एक वर्णनाहे त्याची आठवण झाली

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

शाल्मली's picture

26 Sep 2008 - 3:13 pm | शाल्मली

स्वाती ताई,
लेख छानच लिहिला आहेस. एक 'गोरे' लग्न अनुभवायला मिळाले.
फोटोंमुळे अजून मजा आली. :)
-- शाल्मली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Sep 2008 - 3:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मजा आली लग्नाला!

स्वातीताई, माझ्या मैत्रीणीनी तिचा लग्नाचा प्लॅन पुढे ढकलल्यामुळे मलाही "गोरं" लग्न बघता आलं नव्हतं. आता नाही असं वाटणार.

मनस्वी's picture

26 Sep 2008 - 3:44 pm | मनस्वी

लग्नसोहळ्याचे वर्णन खूपच छान!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

शितल's picture

26 Sep 2008 - 4:59 pm | शितल

लग्नाची सचित्र गोष्ट आवडली स्वाती ताई.
:)

झकासराव's picture

26 Sep 2008 - 5:01 pm | झकासराव

एका लग्नाची गोष्ट प्रेक्षणीय आणि वाचनीय झाली आहे. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Sep 2008 - 7:18 pm | ब्रिटिश टिंग्या

एका लग्नाची गोष्ट प्रेक्षणीय आणि वाचनीय झाली आहे. :)

अवांतर - मीदेखील एका अशाच लग्नाला गेलो होतो......पण खरं सांगायच तर आपल्याला नाही आवडत हे असं लग्न! अरे ज्या लग्नात गडबड-गोंधळ, मानापमान, रुसवे-फुगवे नाहीत ते लग्न कसलं? साला मुलीकडच्यांनी एक साधा टोपी-टॉवेलसुद्धा नाय दिला मला ;)

प्राजु's picture

26 Sep 2008 - 8:34 pm | प्राजु

स्वातीताई,
मला वाटतं तू मागेही एकदा एका लग्नाचा वृत्तांत लिहिला होतास का?
असो..
हे वर्णन एकदम खास स्वातीताई ष्टाईल... फोटोंमुळे काहीही म्हणा पण लेखनाला एक प्रकरचा गेट अप येतो..
एकदम खास वाटलं लग्न.. आम्ही ही उपस्थित होतो तिथे असंच वाटलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

26 Sep 2008 - 8:36 pm | नंदन

लग्नसोहळ्याचे आणि खाद्यपदार्थांचे (खासकरून ग्राटिन) वर्णन आवडले. फोटोजही मस्तच. कॅनव्हास कोलाजची कल्पनाही छानच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अनिंद्य's picture

26 Sep 2017 - 11:36 am | अनिंद्य

@ स्वाती दिनेश,

झेक्ट-प्रोस्ट-ब्रेत्स्झेल...... लग्नाची पार्टी जोरात आहे :-) जर्मन यजमान असूनही पार्टीत शाकाहारी पदार्थांची रेलचेल दिसते आहे - व्हिच इज अक्चुअली अ रिलीफ ! नाहीतर आमचा एक पाकिस्तानी मित्र जर्मनांना 'गोश्तखोर' म्हणतो ;-)

मला ह्या जर्मनांचे कौतुक वाटते - आधी शॅम्पेन, मग रक्तवारुणी, मग जर्मनीचे 'पहिले प्रेम' असलेली बिअर आणि परत 'वन फॉर द रोड आहेच' :-)

लग्न-सोहळा आवडला.

-अनिंद्य

गम्मत-जम्मत's picture

26 Sep 2017 - 1:26 pm | गम्मत-जम्मत

छान लिहिले आहे. आपण च लग्न अटेंड केल्याचा 'फील' आला. इतके मस्त पदार्थ ते ही शाकाहारी.. तोंपासू.

आपण च लग्न अटेंड केल्याचा 'फील' आला. >> अगदी असेच वाटले.. खूप छान लिहिलंय!