कथुकल्या १२ अद्भुतिका ( फॅण्टसी ) विशेष

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
18 Jun 2017 - 11:39 pm

१. आयला

ऑफिसला जाण्याआधी कश मारावा या हेतूपोटी नागेशने सिगारेट बाहेर काढली. पण लायटर पेटवताच त्यातून हिरवट रंगाचा चमकदार धूर बाहेर पडला. थोड्याच वेळात धुराचा छोटासा ढग तरंगू लागला अन ढगातून जिन प्रकट झाला.

“हॅपी न्यू इयर मेरे आका. बोलीये क्या हुक्म है “

नागेश आश्चर्याने पाहू लागला
“तू जिन आहेस ?!!”

“हो हुजूर.”

नागेशने स्वतःला एक चिमटा घेतला.

“हे स्वप्न नाहीये मालिक.”

“पण तू लायटरमधे कसाकाय ? जिन तर जादूच्या दिव्यात सापडतो ना”

“बरोबर. तो मोठा जिन… बड़े भाईजान. मी छोटा जिन.”

“आयला असंही असतं का ?”

“जी हाँ.”

“तू माझ्या इच्छा पूर्ण करशील न पण ?”

“बेशक. पण एक नियम आहे.”

“कोणता ?”

“ मी फक्त तुमच्या तीनच इच्छा पूर्ण करू शकतो. प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे तीन वर्षांत तीन इच्छा. एक जानेवारीला आम्ही प्रगट होतो. चालेल का ?”

“चालेल. नॉट अ बॅड डील.”

“बहोत ख़ूब… तुमची तिसरी इच्छा सांगा.”

“तिसरी ?! पहिली असणार न.”

“हुजूर, इथे येण्याचं माझं हे तिसरं वर्ष आहे. तुमच्या दोन इच्छा मी याआधीच पूर्ण केल्या आहेत.”

“काय गोष्ट करतोस ! मग मला कसं आठवत नाही ?”

“कारण तुमची दूसरी इच्छा होती की पहिल्या इच्छेचा विसर पडावा.”

नागेश डोकं खाजवू लागला.

“लवकर सांगा, माझी रूक्सत घ्यायची वेळ जवळ आलीये.”

नागेशने विचार केला की काय मागावं. तो खानदानी श्रीमंत असल्याने पैशांची ददात नव्हती. कमी होती ती एका गर्लफ्रेंडची. त्याला मेघना तूफान आवडायची पण ती त्याला अजिबात भाव द्यायची नाही. यस्स तिलाच मिळवायचं.
“मला मेघना दे.”

“ही कोणती वस्तू ?” जिनने आपली नुडल्ससारखी दाढी ओढत विचारलं.

“वस्तू नाही रे बाबा. मेघना देशपांडे… माझ्याच ऑफिसमधे काम करते. She is my long time crush. Crush म्हणजे….“

“I know, the girl which you secretly love.”

नागेश त्याच्या पुरातन तोंडाकडे थोडावेळ पाहतच राहिला.

“ती हवीये का तुम्हाला ?”

“हो हो. तिचं आणि माझं सूत जुळवून दे ना. प्लीSSज.”

“चिंता नसावी. ग्राहकांचा संतोष हेच आमचे समाधान.”

त्याने ’झुईSS’ करत स्वतःभोवती तीन फेऱ्या मारल्या.
“आका तुमचं काम झालंय.” तो हसत म्हणाला.

“म्हणजे ती माझ्या प्रेमात…”

“पडलीच म्हणून समजा “

जिनला आता हसू कंट्रोल होत नव्हतं.

“थँक यू व्हेरी मच. पण तू हसत का आहेस ?”

“कारण तुमची पहिली इच्छापण हीच होती.”

---------------------------------------------

२. अबोल प्रेम

महानगरपालिकेने चौकाचं सुशोभिकरण केलं अन तिचं आगमन झालं. निळाशार जलाशय अन त्यात नृत्यमुद्रेत उभी असलेली ती लोहपरी. पहिल्यांदा त्याने तिला पाहिलं तेव्हा सूर्य मावळतीला आला होता, सोनेरी किरणांमधे ती नखशिखांत न्हाऊन निघाली होती. तिच्या पावलांशेजारी रंगीबेरंगी कमळ फुलले होते, चेहऱ्यावर प्रेमळ हास्य विलसत होतं. त्याने पाहिलं अन तो पाहतंच राहिला. क्षणभर विसरलाच तो स्वतःला. त्या रस्त्याने त्याची रोज एक चक्कर व्हायची, लांबची ट्रीप असली की दोन दिवसांतून एक. खांद्यांवर कितीही ओझं असलं, ट्राफिकचा कितीही कंटाळा आला तरी ती दिसताच त्याचा शिणवटा दूर पळून जायचा, त्या चौकात ट्राफिक जाम असावा असं त्याला नेहमी वाटायचं. तेवढाच जास्त वेळ तिला बघता यायचं.

एखाद्या दिवशी मालक त्याला चकाचक करायचा, मस्त सजवायचा. त्यादिवशी त्याची चाल वेगळीच असायची. तो ऐटीत धावायचा, तिच्यासमोर आल्यावर मुद्दाम बंद पडायचा.

पण तिचं त्याच्याकडे लक्ष जाणं शक्य नव्हतं कारण त्याच्यासारखे शेकडो ट्रक जायचे रोज त्या रस्त्यावरून. मग त्याने एक युक्ती केली. तिच्यासमोर आला की तो हॉर्न वाजवायला लागला; ट्राफिक असो किंवा नसो. फार काही अपेक्षा नव्हती त्याची. आपल्या मनातलं प्रेम तिला कळावं, रोज दोन क्षण एकमेकांकडे बघावं बस एवढंच.

“च्यायला या ट्रकला काय झालंय. इथे आल्यावर आपोआप हॉर्न वाजतो.”

“मेकॅनिक को बताया पर कोई फायदा नही l”

“या पुतळ्याला पाहून तर शीट्टी नाही वाजवत न. ख्या : ख्या : ख्या :”
नेहमीच अशा चर्चा व्हायच्या अन हास्यतुषारांत उधळून जायच्या. नंतरनंतर लोकांनाही याची सवय झाली.

दिवस सरत गेले पण त्याचा नियम कधी चुकला नाही.
हळूहळू बराच काळ मागे लोटला.

आता त्याचं वय झालं होतं. पोलादी शरीराला तडे गेले होते, थोडं अंतर चाललं तरी इंजिनाला धाप लागायची, काळा धूर उचंबळायचा. त्याची ड्यूटी जवळच्याच एका कारखान्यावर लागली. रस्ता बदलल्यामुळे ती आता भेटत नव्हती. तिची आठवण यायची पण तो बरंच झालं म्हणायचा. तिने आपल्याला जर्जरावस्थेत बघावं हे त्याला कधीच आवडलं नसतं.

पुढे चालून त्याचं तेही काम बंद झालं अन तो भंगारखान्यात येऊन पडला. त्याच्या सोबतीला आता होता काळोख अन तिच्या आठवणी. दिवस उलटत गेले अन एक दिवस निराळीच गोष्ट घडली. कारखान्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात चक्क ती येऊन पडली !! तिचा रंग फिकट झाला होता, जंगाच्या बीमारीने शरीराला ठिकठिकाणी छिद्र पडले होते. पण त्याला याची पर्वा नव्हती. दुरुन का होईना, शेवटापर्यंत तो तिला रोज बघू शकत होता. आपल्याला ही ओळखेल की नाही ही भिती त्याला होती. पण त्याला बघताच तिच्या चेहऱ्यावरचं हास्य रूंदावलं, नजरेत प्रेमभाव उमटले. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. एकमेकांच्या सहवासात त्यांनी उरलासुरला प्रत्येक क्षण जगून घेतला.

एक दिवस त्यांना एका भल्यामोठ्या भट्टीजवळ नेण्यात आलं. पोलादी जबड्यांमध्ये निखाऱ्यांचं तांडव सुरू होतं. हळूहळू त्यांना भल्यामोठ्या यंत्रांच्या सहाय्याने लोटलं जाऊ लागलं. उष्णता वाढू लागली तसा तिच्या चेहऱ्याचा रंग उतरू लागला, हिंमत हरली तिची. तिला हिंमत द्यायला त्याने तिचा हात घट्ट पकडला. तो सोबत आहे हे पाहून तिचा धीर वाढला. त्याचं मालवाहू ह्रुदय तर कणखर होतंच. दोघांना आता कसलीच चिंता नव्हती. त्या भगभगणाऱ्या विशाल भट्टीत त्यांनी बिनधास्तपणे झेप घेतली.

वितळून आता ते एकजीव होणार होते.

---------------------------------------
३. सुपरसन्या

सन्या म्हणजे माझा सुपर शेजारी अन जानी दोस्त. कधीकधी तो खूपच हट्ट धरून बसतो. आज ठाम निश्चय करूनच मी त्याच्या घरात पाऊल ठेवलं. काहीही करून त्याला तयार करायचंच.

आत गेलो अन हॉलमधला टीव्ही सुरू दिसला. टीव्हीसमोरच्या सोफ्यावर सन्या गध्यासारखा लोळत पडला होता. त्याने नाड्यावाली हाफ पॅंड घातली होती, जोडीला बाय डिफॉल्ट शान्डो बनीयेन होतं. अर्धा फूट उंच केस अन रानटी बोकडासारखी दाढी असा विपुल केशसांभार.

“सन्या S” मी आवाज दिला. पण माझा आवाज टीव्हीने गिळून टाकला. मी अजून जवळ गेलो. टीपॉयवर तीन चतुर्थांश पिझ्झा होता. त्यावर केचपच्या सगळ्या पुड्या पिळवटलेल्या होत्या.

“सन्या S” मी परत आवाज दिला

“बॉल म्योत्रा.” तोंडातल्या पिझ्झामुळे तो बंगाली स्टाइल बोलू लागला.

“मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय.”

“कॉय ?”

“तू मराठीत बोल आधी.”

त्याने कोल्ड्रिंकचा एक घोट मारला अन तोंड वेडंवाकडं करत पिझ्झा स्वाहा केला.
“अंS बंS… हा बोल आता.”

“ शहरात काय चाललंय याची खबर आहे की नाही तुला.”

“काय झालं ?” त्याने टीव्हीवरची नजर न हटवता विचारलं.

“या महिन्यातला तिसरा दरोडा पडला. आधीचे दोन बँकांवर होते काल आमच्या संशोधन संस्थेवर पडला.”

“अरे वा ! तुमच्या भुक्कड संस्थेतपण चोरण्यालायक काहीतरी आहे म्हणायचं.”

“पीजे मारू नको. त्या चोरांना जाऊन पकड.”

“पोलीस स्टेशन मागच्या आळीत आहे... आता थँक्यु म्हणू नकोस प्लीज.”

“सन्या, अरे तुझ्याकडे एवढ्या पॉवर्स आहेत. त्यांचा कधी फायदा होणार. शहरात एवढा क्राइम वाढलाय अन तू इथे रुकरुक खानचे मुव्हीज पाहत बसलाय. तुझ्याकडे…”

“एक मिनीट थांब.” त्याने मला गप्प केलं अन टीव्हीचा आवाज वाढवला.
नाईलाजाने मीही तिकडे मान वळवली.
चित्रपट रोमांचक वळणावर आला होता. अनिल शेट्टीचे गुंड भरधाव वेगाने स्कॉर्पियो पळवत होते अन रुकरुक सायकल रिक्षावरून त्यांचा पाठलाग करत होता ! सोबत चारचार गुन्ड्याच्या गोळ्या हुकवत, स्वतः आडवातिडवा होत गोळ्या मारत होता. दरम्यान एक ट्रक आला, त्यातले लाकडं कोसळले. रुकरुक सर्कशीतले स्टंट करत त्यातून बाहेर पडला. मधेच त्याने हँडल सोडलं अन दोन्ही हात पसरवले. मी घाबरलो की हा इथेच क क क क किरती म्हणतो की काय. पण सुदैवाने त्याने तसं केलं नाही स्कॉर्पियोचं स्पिडोमीटर इकडे तुटायला आलं तरी हा गाडीच्या धुरांड्याजवळच. मी मात्र वाकून वाकून त्या रिक्षाला असं कोणतं रॉकेट लावलय हे बघत होतो. बिचाऱ्या अनिल शेट्टीचं नशीब की तो कसाबसा सुटला. रुकरुक पासून काहीतरी शिक असं मी सन्याला बोलणार होतो पण मग तो फक्त बायकांच्याच मदतीला गेला असता.

“जाहिराती लागल्या. बोल काय म्हणत होतास.”

“माझं असं मत आहे, किंबहुना मानवतेची हाक आहे की तू तुझ्या शक्तींचा वापर घ्यावास. मला सतत असं जाणवतं की काहीतरी महान कार्यासाठी तुझा जन्म झालाय.”

सन्याने मान तिरपी केली अन डाव्या डोळ्यातून लेझर सोडला. त्याच्या कानाजवळचा डास चर्रकन जळून गेला.

“तुझ्या भावनांचा मी आदर करतो रे पण सुपरहीरो न बनण्याचे माझेही काही कारणं आहेत.”

“कोणते ?”

तो लोटांगणावस्था त्यागून बैठ्या स्थितीत आला. चॉकलेट अन वेफर्सचे रिकामे पॅकेट्स कुरकुरले.
“पहिलं कारण हे की मला फुलपॅंडच्या वर अंडरपॅंड घालायला आवडत नाही.”

“मग आतून घाल.”

“मुळात मला फिट्ट कपडेच घालायला आवडत नाहीत. यू नो, मी ओपन माइंडेड पर्सन आहे.”

“तू फक्त मास्क घाल अन आहे तशा अवतारावर पळ. फार फार तर काय होईल… लोक तुला बनीयेन मॅन म्हणतील.”

सन्या यावर फक्त मोनालीसा सारखा गूढ हसला.
“दुसरं कारण हे आहे की सध्याचे क्रिमिनल्स एवढे डेंजर नाहीत. साध्या चोराचिलटांना तर पोलीसही पकडू शकतात. त्यांची वाढलेली ढेरी बघता तेवढा व्यायाम गरजेचा आहे नाही का. ख्या : ख्या : शिवाय कसंय की मी जर बाहेर पडलो तर हे व्हीलन लोक जास्त हुशार बनतील. अजून भारीभारी ट्रिक्स शोधतील, जास्त मोठे गुन्हे करतील. म्हणतात ना चोर पोलिसांच्या दोन पावलं पुढं असतो.”

“धन्य आहे बाबा. पण माझ्या म्हणण्यावर सिरीयसली विचार कर.”

“तशीच गरज पडली तर बघू.” तो दोन्ही हात ताणून जांभई देत म्हणाला. त्याने आंघोळ केलेली नाहीये हे स्पष्ट झालं.

“जाऊदे रे. पिझ्झा खा अन मुव्ही पहा. अपना फेवरेट है “

“सनी S “ वहिनींचा आवाज कानांवर पडला.

“या बेबी”

“पावसामुळे कपडे ओलेच आहेत, सूकवतोस का ?”

“कमिंग बेबी.”

सन्या उठला, कमरेखाली घसरणारी हाफपॅंड वर ओढली अन… एका झेपेत डुप्लेक्सच्या गॅलरीत. तिथे दोरीवर कपडे टांगले होते. सन्या फुंकर मारून कपडे सुकवू लागला. मी त्याला कोपरापासून हात जोडले अन बाहेर पडलो.

आजचा प्रयत्नही वाया गेला होता पण सन्याला तर मी घराबाहेर काढणारच. शहराला त्याची गरज आहे.

त्यासाठी माझा जुना रिसर्च पुन्हा सुरू करावा लागणार.
काही महीने मेहनत करावी लागणार. मग मला कुणालाही डिमटेरीयलाईज करून गायब करणं अशक्य नसणार. कुणालाही.
.
.
अगदी रुकरुक खानला सुद्धा.

------------------------------------------

कथाशब्दक्रीडाविनोदkathaaप्रतिभा

प्रतिक्रिया

अत्रे's picture

19 Jun 2017 - 6:49 am | अत्रे

A man was sitting alone at home one night when a genie suddenly appeared.

"And what will your third wish be?"

The man looked at the genie and said, "What? How can I be getting a third wish when I haven't had a first or second wish yet?"

"You have had two wishes already," the genie said, "but your second wish was for me to put everything back the way it was before you made your first wish. Thus, you remember nothing, because everything is the way it was before you made any wishes. You now have one wish left."

"Okay," said the man, "I don't believe this, but what the hell, I've always wanted to understand women. I'd love to know what's going on inside their heads."

"Funny," said the genie as it granted his wish and disappeared forever, "That was your first wish, too!"

http://asepco.com/pubjokes/humor_third_wish.htm

पण तुमचे व्हॅरीएशन सुद्धा आवडले.

तुषार काळभोर's picture

19 Jun 2017 - 7:42 am | तुषार काळभोर

हे अजून एक

An elderly man was sitting alone on a dark path. He wasn’t sure of which direction to go, and he’d forgotten both where he was traveling to…and who he was.
He’d sat down for a moment to rest his weary legs, and suddenly looked up to see an elderly woman before him.
She grinned toothlessly and with a cackle, spoke: “Now your third wish. What will it be?”
“Third wish?” The man was baffled. “How can it be a third wish if I haven’t had a first and second wish?”
“You’ve had two wishes already,” the hag said, “but your second wish was for me to return everything to the way it was before you had made your first wish. That’s why you remember nothing; because everything is the way it was before you made any wishes.” She cackled at the poor man. “So it is that you have one wish left.”
“All right,” he said hesitantly, “I don’t believe this, but there’s no harm in trying. I wish to know who I am.”
“Funny,” said the old woman as she granted his wish and disappeared forever. “That was your first wish…”

ज्योति अळवणी's picture

19 Jun 2017 - 9:29 am | ज्योति अळवणी

कथकल्या आणि त्यावरच्या दोन्ही comments आवडल्या

अॅस्ट्रोनाट विनय's picture

19 Jun 2017 - 10:41 am | अॅस्ट्रोनाट विनय

आयला पुर्णपणे स्वयंविचाराने लिहलेली कथा आहे ही जिनिची.... अशा कथा आहेत हे पाहून आश्चर्य वाटतंय !!