कथुकल्या १०

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
3 Jun 2017 - 3:39 pm

१. अपघात

रात्रीचे अकरा वाजले होते. अशोक पानसे त्याच्या अंधाऱ्या बेडरुममध्ये बसलेला. झोपणे तर दूर, गेल्या एक तासापासून तो जागचा हललाही नव्हता. तो अॅक्सीडंट राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होता.

सिग्नलचा दिवा लाल झाला पण तो घाईगडबडीत होता, दिव्याकडे लक्ष न देता त्याने गाडी सुसाट पुढे पळवली. त्याच्या उजव्या बाजूचा सिग्नल केशरी झाला. पुढच्याच क्षणाला वाहनांचा लोंढा अन त्याच्या अग्रभागी असलेला बाईकवाला वेगात समोर आला. ब्रेक दाबायचं कुणालाच जमलं नाही. धडक बसली अन बाईकवाला दूरवर फेकला गेला.

हॉर्न वाजत होते, लोक ओरडत होते.पण अशोकची दृष्टी बधिर झाली होती. त्याचा पाय आपोआप अॅक्सलेटरवर दाबला गेला. एकदाही वळून न बघता तो वाट फुटेल तिकडे सुसाट धावत निघाला.

गाडी गॅरेजमध्ये लपवून तो घरात आला तेव्हा त्याचं अंग घामाने चिंब झालं होतं, ह्रुदयाची धडधड प्रचंड वाढली होती. आतापर्यंत त्याने कोणताच गुन्हा केला नव्हता, पोलीस स्टेशनचं तोंडही पाहिलं नव्हतं. कुणीतरी नक्कीच गाडीचा नंबर नोट केला असेल, पोलीस आपल्याला शोधून काढतीलच. अशावेळी सगळ्यात सुरक्षित जागा म्हणजे आपल्या बेडरुममधला अंधारी कोपरा. पण हा अंधार त्याला वाचवू शकत होता का ? अजिबात नाही.
पोलीसांना कळाल्यास करीअर, इज्जत सगळं काही क्षणात धूळीस मिळणार होतं. त्याने जेलात चक्की पिसतानाचं चित्र डोळ्यांसमोर उभं केलं.

दरवाजावर ठकठक झाली अन त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. त्याची हिंमतच होत नव्हती दरवाजापर्यंत जाण्याची. पोलीस असतील तर ! परत एकदा ठकठक झाली. आता इलाजच नव्हता. तो दबत दबत खिडकीपर्यंत आला. पडदा जरासा बाजूला करून बाहेर पाहिलं. अन... त्याचा श्वास छातीतच अडकला. बाहेर पोलीसांची गाडी उभी होती.

त्याने मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला.
पळून जावं का ? पण त्यामुळे गोष्टी अजूनच बिघडल्या असत्या. नको त्यापेक्षा चांगला वकील लावता आला असता. पैसे दिले की सगळे निर्णय आपल्या दिशेने फिरवता येतात.

ठकठक ठक

जे होईल ते होईल. मनाचा निश्चय करून त्याने दरवाजा उघडला.

बाहेर पोलीस इन्स्पेक्टर उभे.

"अशोक पानसे तुम्हीच का ?"

त्याने एक उसासा सोडला अन होकारार्थी मान हलवली.

"मला ही बातमी सांगताना अतिशय वाईट वाटतंय. तुमच्या मुलाच्या बाईकला एका कारवाल्याने धडक दिली. तो जागीच गतप्राण झाला.
----------------------------------------------

२. काळचक्र

सागराच्या शांत लाटांकडे बघत ती एकटीच बसून होती. लालतांबूस सूर्य अस्ताला जायची तयारी करत होता. तिच्या आयुष्यातला सूर्य मात्र केव्हाच मावळला होता. तिचं एकमेव प्रेम असलेला तो, आयुष्यभर ज्याच्यासोबत चालण्याची शपथ घेतली होती असा तो बघता बघता निघून गेला. लष्करी अधिकारी असल्याने त्याच्या आयुष्याची दोर तशी कमजोरच होती. पण मृत्यू आलाच तर तो रणांगणावर यावा अशी कुठल्याही सैनिकाची इच्छा असते. तो असा अनपेक्षितपणे आल्यामुळे हे दुःख जास्त सलणारं होतं.

तिने गालावर ओघळणारा अश्रू तसाच वाहू दिला. त्याची शेवटची आठवण असलेलं साखळीचं घड्याळ अजूनही तिच्या मुठीत बंद होतं. हे घड्याळ त्याला खूप प्रिय होतं; ही वस्तू तो कुलुपबंद ठेवायचा अन कुणालाच हात लावू द्यायचा नाही. कारण विचारण्याचा तिनेही कधी प्रयत्न केला नव्हता अन आज तेच घड्याळ तिच्या हातात होतं... सोन्यासारखं चमचम चमकणारं साखळीबंद घड्याळ.

तिने घड्याळाचं वरचं झाकण उघडलं. आत अगदी साधं डायल होतं. पांढरट काळी भस्माच्या रंगाची युद्धभूमी अन त्याभोवती घिरट्या घालणारे तीन सैनिक... असं काहीसं वाटून गेलं तिला.

तो विचार तिने बाजूला झटकला अन सहज म्हणून चाबी बाहेर ओढली... तीनही काटे निमुटपणे एकाजागी थांबले. तिचंही आयुष्य असंच, स्थिर झालं होतं जणू. बराचवेळ ती घड्याळाकडे बघत होती. पण तिच्या लक्षात आलंच एका क्षणाला की आजूबाजूचे आवाज थांबलेत... मुलांच्या गोंधळाचा, फेरीवाल्यांचा अन समुद्राचाही ! नजर वर करून तिने बघितलं अन आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले गेले, अवघड दुःख ती काहीक्षण विसरली. आसपासची प्रत्येक कृती थिजली होती, गोठली होती, बधिर झाली होती. हवेत झेप घेतलेला कुत्रा, बाळामागे धावत असलेली आई अन तिचं मूल, हातांत हात गुंफुन चालत असलेलं प्रेमीयुगुल, आजुबाजुची प्रत्येक गोष्ट जिथल्यातिथेच स्थिर झाली होती, काळ थांबला होता !

तिने चाबी आत दाबली. लगेचच घड्याळ अन तिचं भोवताल जिवंत झालं, गतिमान झालं. कुत्र्याची उडी जमिनीवर पडली, आईने बाळाला पकडलं, प्रेमीयुगुल परत चालू लागलं, मध्ये काही झालंय याची कुणाला जाणीवही नव्हती. तिने पुन्हा एकदा चाबी बाहेर ओढली, पुन्हा सगळं थांबलं. ती घाबरुन जागेवरुन उठली, त्याच्या घड्याळाकडे अविश्वासाने पाहू लागली. चाबी बाहेर ओढण्याची तिची हिंमत होत नव्हती. तरीही तिने थरथरणारा हात घड्याळाजवळ नेला अन चाबी मागे फिरवायला सुरुवात केली.

तिच्या भोवतालचा काळही त्याच वेगाने उलट फिरू लागला !

परत चाबी समोर फिरवली अन सगळं भरभर पुढे जाऊ लागलं... चित्रपटातल्या फास्ट फॉरवर्ड दृश्यासारखं. वर्तमानकाळापर्यंत वेळ आणून तिने सोडून दिला. काटे परत एकदा नेहमीच्या गतीने चालू लागले.

थोडावेळ ती बधिर पावलांनी सुन्नपणे उभी होती अन अचानक तिच्या डोक्यात तो विचार चमकला. बऱ्याच दिवसांत पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. ती त्याला वाचवू शकत होती !

मग ती थांबली नाही. धावत गेली टॅक्सीपर्यंत, लोकलने जाण्याचा धीर धरवत नव्हता. टॅक्सीवाल्याला मागेल ती किंमत देऊन तिने शक्य तेवढ्या वेगात जायला सांगितलं. पंचविसाव्या मिनिटाला ती तिथे पोहोचली. एव्हाना सूर्य अस्ताला गेला होता, काळोख दाटू लागला होता. त्याच अंधाऱ्या बोळीच्या टोकाशी ती उभी होती जिणे उत्कर्षला मरतांना पाहिलं होतं. ती रात्र तिला लख्ख आठवत होती. जवळच्याच दुकानात उत्कर्ष तिच्या आवडीचं आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेला, घरातल्याच कपड्यांवर... बंदुकीविना. याच ठिकाणी त्याला त्या आतंकवाद्याने गाठलं अन...

तिने घड्याळ बाहेर काढलं अन चाबी उलट दिशेने फिरवायला सुरुवात केली. आधी हळूहळू, नंतर वेगाने. सेकंद मिनीटं तास भराभर हरवत चालले. दिवसांमागून दिवस मागे पडू लागले. दुपार झाली वर्दळ वाढली, सकाळ झाली सगळं शांत, बाजार बसले उठले, रणरणतं ऊन पडलं मध्ये एक दिवस पाऊस पडून गेला. अन थोड्याच वेळात पंचवीस दिवसांपूर्वीची ती रात्र उगवलीच.

गल्लीच्या दुसऱ्या टोकाकडून अॅम्बुलंस निळाशार उजेड फेकत आली, त्यातून भराभर वार्डबॉय उतरले अन त्याची डेडबॉडी.... हे दृश्य ती बघू शकत नव्हती. परत थोडावेळ ती मागे गेली अन थांबली.

हातामध्ये छोटीशी बॅग घेऊन उत्कर्ष चालत येत होता... आपल्याच धुंदीत स्वतःशी गुणगुणत. खराखुरा जिवंत असलेला तो. एक क्षण तिला वाटलं की धावत जावं अन त्याला घट्ट मिठी मारावी, सांगावं त्याला की जा इथून निघून पण... ऐनवेळी तिने स्वतःला रोखलं. तीपण एका शूर सैनिकाची पत्नी होती. त्या आतंकवाद्याला धडा शिकवल्याशिवाय ती शांत बसणार नव्हती, तेसुद्धा तिच्या नवऱ्याच्या हातून. त्याच्या नजरेस पडणार नाही अशा पद्धतीने ती लपून बसली.

उत्कर्ष त्या ठिकाणापर्यंत आला अन अचानक, कुठून कोण जाणे एका माणसाने त्याच्या अंगावर झडप मारली. हाच तो आतंकवादी असणार, आडदांड दिसणारा. लढण्याच्या बाबतीत दोघंही तुल्यबळ होते, थोडावेळ भयंकर हाणामारी झाली अन एका गफील क्षणी शत्रूने खिशातली पिस्तुल काढली. उत्कर्ष झडप घेणार त्याच्या आतच बंदुकीतून गोळी सुटली होती.

तिने चाबी बाहेर ओढली, थोडावेळ मागे फिरवली अन परत आत दाबली.

दोघांमध्ये झटापट झाली, शत्रूने बंदूक बाहेर काढली, गोळी सुटली अन त्याचक्षणी तिने चाबी खेचली. पण उशीर झाला, गोळीने तिचं काम केलंच.

परत एक प्रयत्न, दुसरा प्रयत्न.

दोघांमध्ये झटापट झाली, शत्रूने बंदूक बाहेर काढली अन ट्रिगरवरचं बोट दबणार त्याचक्षणी तिने चाबी बाहेर ओढली. चाबी ओढायला सेकंदापेक्षाही बराच कमी वेळ लागलेला पण तेवढ्या वेळात बंदुकीतून गोळी सुटली. पण लक्षाचा वेध घेण्याच्या आधीच काळ थांबला होता... उत्कर्षअन शत्रुच्या मध्ये ती गोळी हवेतच स्थिर झाली होती !!

ती चालत चालत दोघांपर्यंत गेली अन बंदुकीची गोळी चिमटीत पकडून जमिनीवर फेकून दिली. चार पावलं मागे येऊन तिने घड्याळ समोर धरलं अन चाबी आत दाबली.

ट्रिगर दबला पण गोळी समोरच्याला का लागली नाही यामुळे शत्रु गोंधळला, आवाज न आल्यामुळे ही गोष्ट उत्कर्षला मात्र माहीत नव्हती. तो लगेच सावरला अन झडप घालून शत्रुच्या हातातली बंदूक हिसकावुन घेतली. क्षणात बाजी पलटली होती, तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पण शत्रु लवकर सावरला, बंदूक ओढायला बघू लागला. ती शांतपणे पाहत होती काय निर्णय लागतो याच्याकडे. काही बिघडलं असतं तरी चिंता नव्हती. काळचक्राला ती हव्या तितक्या वेळा मागे फिरवू शकत होती, आतंकवाद्याला मारण्याच्या कित्येक संधी उत्कर्षला देऊ शकत होती.

दोघेही प्राणपणाने बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करत होते, समोरच्याला संपवायचं एवढंच फक्त उद्दिष्ट होतं प्रत्येकाचं. अन तेवढ्यात मिट्ट अंधाराला चिरत एक प्रकाशशलाका उमटली. तिच्या दिशेने वळालेल्या बंदुकीच्या नळीतून गोळी सुटली.

सरसरतआलेली ती गोळी तिच्या हातातल्या घड्याळावर येऊन आदळली.

Σ ( वर्तमानकाळ + भूतकाळ + भविष्यकाळ ) ^ infinity

-----------------------------------------------

३. दोन वैमानिक

डोळ्यांवर काळा चष्मा चढवलेले दोन वैमानिक विमानात शिरले, दोघांच्याही हातांत दोन काठ्या होत्या अन ते चाचपडत चालत होते.

त्यांना बघून सगळे प्रवासी घाबरले, काही पळून जायला लागले. एअर होस्टेसने दरवाजा लावून घेतला.

"सर्वांनी कृपया आपल्या जागेवर बसावे, दोन्ही वैमानिक अतिशय कुशल आहेत, तुम्हाला काहीच होणार नाही."

कुणालाच विश्वास बसला नाही पण इलाज नव्हता. विमानाचं इंजिन सुरू झालं अन थोड्याच वेळात धावपट्टीवरून पळू लागलं. धावपट्टी जिथे संपते तिथे एक उंच इमारत होती. विमान त्या इमारतीच्या जवळ, अगदी जवळ गेलं अन त्याचबरोबर खिडकीतून बाहेर बघत असणारे प्रवासी जोरात ओरडले. पण इमारतीच्या जवळ गेलेल्या विमानाने शिताफीने हवेत झेप घेतली. इमारतीच्या अगदी काही फूटांवरून विमान घोँघावत निघून गेलं.
प्रवासांच्या जिवात जिव आला, आंधळ्या वैमानिकांचं कौशल्य पाहून सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

(कॉकपिटमध्ये) एक वैमानिक दुसऱ्याला : जॉन्या, एखाददिवशी जर प्रवासी नाही ओरडले तर आपण मेलो बेट्या

------------------------------------------------

कथाशब्दक्रीडाkathaaप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

जबरदस्त कथा !! एकाहून एक !!
येऊ द्या अजून विनय भाऊ..

अॅस्ट्रोनाट विनय's picture

6 Jun 2017 - 12:18 am | अॅस्ट्रोनाट विनय

तिन्ही कथा मस्त जमल्या आहेत.

प्रीत-मोहर's picture

3 Jun 2017 - 3:59 pm | प्रीत-मोहर

आवडल्या

विनिता००२'s picture

3 Jun 2017 - 4:11 pm | विनिता००२

फुटेल तिकडे सुसाट धावत निघाला. >>> कार घेवून धावेल कसा??

बाकी कथा छान!!

पद्मावति's picture

3 Jun 2017 - 4:25 pm | पद्मावति

शेवटची कथा खतरनाक =))

स्रुजा's picture

3 Jun 2017 - 6:09 pm | स्रुजा

शेवटची कथा भन्नाट ... a

जव्हेरगंज's picture

3 Jun 2017 - 6:33 pm | जव्हेरगंज

जबरी आहेत all !!!!

तिसरी कथा एका इंग्लिश विनोदांच्या पेजवर जोक म्हणून वाचली होती . त्यामुळे सुरुवातीच्या दोन तरी तुमच्या ओरिजिनल कल्पनेतून निर्माण झाल्या आहेत का असा प्रश्न पडला आहे . अनुवाद असेल तर उत्तम जमला आहे .

nishapari's picture

3 Jun 2017 - 11:30 pm | nishapari

Two men dressed in pilots' uniforms walk up the aisle of the aircraft. Both are wearing dark glasses, one is using a guide dog, and the other is tapping his way along the aisle with a cane.

Nervous laughter spreads through the cabin, but the men enter the cockpit the door closes, and the engines start up. The passengers begin glancing nervously around, searching for some kind of a sign that this is just a little practical joke. None is forthcoming.

The plane moves faster and faster down the runway, and the people sitting in the window seats realize they're headed straight for the water at the edge of the airport property. Just as it begins to look as though the plane will plow straight into the water, panicked screams fill the cabin.

At that moment, the plane lifts smoothly into the air. The passengers relax and laugh a little sheepishly, and soon all retreat into their magazines and books, secure in the knowledge that the plane is in good hands.

Meanwhile, in the cockpit, one of the blind pilots turns to the other and
says, 'You know, Bob, one of these days, they're gonna scream too late and we're all gonna die' !!

प्राची अश्विनी's picture

4 Jun 2017 - 8:03 am | प्राची अश्विनी

मस्त.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

4 Jun 2017 - 8:22 am | अॅस्ट्रोनाट विनय

तिसरी कथा एका इंग्लिश विनोदांच्या पेजवर जोक म्हणून वाचली होती .

>> Dailyheadlines च्या Writer's community चा मी सदस्य आहे. मागच्या वर्षी Short humorous fiction चं challenge त्यांनी आमच्यासमोर ठेवलं होतं, त्यावेळी मी ही कथा त्यांना पाठवली होती. काही मोजक्या कथा त्यांनी प्रकाशित केल्या, पुढे काही लोकांनी त्या जोक म्हणूनपण फिरवल्या.

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2017 - 8:27 am | टवाळ कार्टा

तिसरी कथा लोलवा पण पहिली आणि दुसरी वाचल्यासारख्या वाटत आहेत
आणि टाइम मशीन असणाऱ्या प्रत्येक कथेत शेवट टाइम मशीन नष्ट होण्यातच होतो त्यामुळे इतकी खास वाटली नाही

अत्रे's picture

6 Jun 2017 - 7:55 am | अत्रे

कोणत्या साली तुम्ही ती कथा त्यांना पाठवली होती?

इथे बघा - या पुस्तकात आहे

https://books.google.com/books?id=ru44DoIgdqMC&lpg=PA180&dq=Two%20men%20...'%20uniforms%20walk%20up%20the%20aisle%20of%20the%20aircraft.&pg=PA180#v=onepage&q=Two%20men%20dressed%20in%20pilots'%20uniforms%20walk%20up%20the%20aisle%20of%20the%20aircraft.&f=false

हे पुस्तक २००८ मध्ये प्रकाशित झाले आहे.

http://www.lulu.com/shop/mark-chandler/the-laughter-file/paperback/produ...

ISBN 9781409223498
Copyright Mark Chandler (Standard Copyright License)
Publisher Mark Chandler
Published August 21, 2008
Language English

दशानन's picture

6 Jun 2017 - 8:52 am | दशानन

सरळ सरळ धापाढापी???

अत्रे's picture

12 Jun 2017 - 7:07 am | अत्रे

हो.

कानडाऊ योगेशु's picture

4 Jun 2017 - 12:55 pm | कानडाऊ योगेशु

तिन्ही कथा उत्कृष्ठ आहेत पण तिसरी भन्नाट आहे.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

4 Jun 2017 - 3:23 pm | अॅस्ट्रोनाट विनय

तिसरी कथा लोलवा पण पहिली आणि दुसरी वाचल्यासारख्या वाटत आहेत
>> :))

आणि टाइम मशीन असणाऱ्या प्रत्येक कथेत शेवट टाइम मशीन नष्ट होण्यातच होतो
>> असं अजिबात नाही

अॅस्ट्रोनाट विनय's picture

4 Jun 2017 - 3:28 pm | अॅस्ट्रोनाट विनय

दुसऱ्या कथेत फक्त टाईम मशीन नष्ट नाही झाली तर टाईमसुद्धा नष्ट झालाय / गडबडलाय.

nanaba's picture

4 Jun 2017 - 8:42 pm | nanaba

Tumachya prayoganche ani satatyache kautuk vatate!

जगप्रवासी's picture

5 Jun 2017 - 3:06 pm | जगप्रवासी

पहिली कथा इथेच आपल्या मिपावर वाचाल्यासारखी वाटतेय.

तीनही कथा मस्त आहेत..

रघुनाथ.केरकर's picture

5 Jun 2017 - 4:50 pm | रघुनाथ.केरकर

छान ल्हिलय :-)

अॅस्ट्रोनाट विनय's picture

6 Jun 2017 - 12:13 am | अॅस्ट्रोनाट विनय

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार _/\_

शब्दशः भाषांतर व उचल गिरी आहे तिसरी कथा. वर अत्रे यांनी पुरावा दिलाच आहे अजून एक लिकं येथे देतोय
https://www.jokesandhumor.com/jokes/189.html

माझ्या एका फॅमिली मेंम्बर ची " लग्नाच्या गाठी" म्हणून कविता खुशाल वपुंच्या नावावर फिरायची...
आणि ती ताजी लिहिली तेव्हा आम्ही वाचलेली.
तेव्हा इंटरनेट च प्रस्थ इतकं नव्हतं.. त्यात एका सिरियल्सचा रेफरन्स आहे ती सुरू झाली तेव्हा वपु नव्हते..
वपुंनी ढापली अर्थातच नव्हती ती कारण ते नव्हतेच तेव्हा पण लोकांनी फिरवली.