फॉलोऑन आणि नंतर..

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
28 Dec 2016 - 2:27 am

टेस्ट मॅच आणि तसं पाहयला गेलं तर फर्स्ट क्लासची कोणतीही मॅच जिंकण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या?

या प्रश्नाचं उत्तर खरंतर अगदी साधं आहे ते म्हणजे भरपूर रन्स करणारे बॅट्समन, २० विकेट्स घेऊ शकणारे बॉलर्स, बर्‍यापैकी विकेटकीपर आणि फिल्डर्स... आणि महत्वाचं म्हणजे नशिब!

कोणत्याही टेस्ट मॅचमध्ये बहुतकरुन महत्वाची ठरते ती पहिली इनिंग्ज. पहिल्या इनिंग्जमध्ये बॅटींग करणारा संघ किती रन्स करतो किंवा बॉलिंग करणारा संघ त्यांना किती रन्समध्ये रोखण्यात यशस्वी होतो यावर अनेकदा मॅचचं पारडं झुकतं. पहिल्या इनिंग्जमध्ये चांगला स्कोर करणार्‍या संघाला बहुतेकदा मॅचवर वर्चस्वं प्रस्थापित करणं सहजसाध्यं असतं. याला कारणं अर्थात दोन - एक म्हणजे बराच वेळ फिल्डींग करावी लागल्यास दुसर्‍या संघातील खेळाडूंना शारिरीक आणि मानसिक थकवा येतो आणि दुसरं म्हणजे स्कोरबोर्ड प्रेशर! पहिल्या इनिंग्जमध्ये ४५०-५०० च्या वर रन्स झालेल्या असल्या तर दुसर्‍या इनिंग्जमध्ये प्रतिस्पर्धी संघ काही प्रमाणात का होईना दडपणाखाली असतोच असतो. अशा वेळेस प्रतिस्पर्धी संघाची पहिली इनिंग्ज लवकर आटपली तर त्यांच्यापुढे उभं राहणारं संकट म्हणजे फॉलोऑन!

फॉलोऑन कधी देता येतो?

क्रिकेटच्या नियमानुसार पाच दिवसांच्या मॅचमध्ये २०० रन्सचा फरक असेल तर आणि ३ किंवा ४ दिवसांच्या मॅचमध्ये १५० रन्सचा फरक असेल तर कॅप्टन दुसर्‍या संघाला फॉलोऑन देऊ शकतो. फॉलोऑनच्या नियमात २ दिवसाच्या मॅचमध्ये १०० रन्स आणि १ दिवसात दोन इनिंग्जची मॅच असेल तर ७५ रन्सच्या फरकाने फॉलोऑन देण्याचीही तरतूद आहे!

फॉलोऑन देता येणं शक्यं असलं तरी तो नेमका कधी द्यावा? किंवा कधी देऊ नये?

The Art of Captaincy या आपल्या अप्रतिम पुस्तकात इंग्लंडचा भूतपूर्व कॅप्टन माईक ब्रिअर्लीने फॉलोऑनचे फायदे आणि तोटे सविस्तरपणे विषद केले आहेत. ब्रिअर्लीच्या मते फॉलोऑन देण्यातला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे दुसर्‍या इनिंग्जमध्ये बॅटींग करण्यापासून वाचणारा वेळ आणि प्रतिस्पर्धी संघाला मॅच वाचवण्याची शक्यता नाकारणं आणि त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचं मानसिक खच्चीकरण करणं! मात्रं हे फायदे नमूद करतानाच ब्रिअर्लीने एक महत्वाची सूचना दिली आहे ती म्हणजे फॉलोऑन देण्यापूर्वी कॅप्टनने आपल्या बॉलर्सशी सल्लामसलत करुन मगच फॉलोऑनचा निर्णय घ्यावा! पहिल्या इनिंग्जमध्ये प्रतिस्पर्धी संघाला आऊट करताना बॉलर्सना किती काळ बॉलिंग करावी लागली आहे, एखाद्या बॉलरला झालेली दुखापत तसंच दोन्ही संघांच्या स्कोरमधला फरक, हवामानाचा अंदाज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विकेटची परिस्थिती याचा सर्वबाजूने विचार केल्यावरच फॉलोऑन द्यावा किंवा देऊ नये असं ब्रिअर्लीने स्पष्टं केलं आहे.

प्रतिस्पर्ध्यांना फॉलोऑन देणं म्हणजे मॅच ड्रॉ होण्याची शक्यता निकालात काढणं. याला अपवाद म्हणजे अर्थातच १९५७-५८ च्या सिरीजमधली वेस्ट इंडीज - पाकिस्तान मॅच. वेस्ट इंडीजच्या पहिल्या इनिंग्जमधल्या डोंगराएवढ्या ५७९ रन्ससमोर पाकिस्तानची पहिली इनिंग्ज १०४ मध्ये आटपल्यावर जेरी अलेक्झांडरने पाकिस्तानला फॉलोऑन दिला तेव्हा पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. पहिल्या इनिंग्जमध्ये जेमतेम ४३ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला गुंडाळणार्‍या रॉय गिलख्रिस्ट, गॅरी सोबर्स, एरीक आणि डेनिस अ‍ॅटकिन्सन, कॉली स्मिथ, आल्फ व्हॅलेंटाईन यांना पाकिस्तानच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये तब्बल ३१९ ओव्हर्स बॉलिंग करावी लागली! हनिफ महंमदने १६ तास (९७० मिनीटं) बॅटींग करत वेस्ट इंडीजच्या तोंडाला अक्षरशः फेस आणला आणि टेस्ट वाचवली!

फॉलोऑन देण्याची संधी असूनही तो न देता पराभव पदरी आलेला संघ म्हणजे दक्षिण आफ्रीका!

१९५० च्या सिरीजमध्ये दर्बानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एरीक रोवनच्या १६६ रन्स आणि त्याने कॅप्टन डुडले नर्स (६६) बरोबर केलेल्या १६७ रन्सच्या पार्टनरशीपमुळे दक्षिण आफ्रीकेने पहिल्या इनिंग्जमध्ये ३११ पर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंग्जमध्ये ऑफस्पिनर ह्यू टेफील्डने २३ रन्समध्ये ७ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा ७५ रन्समध्ये खिमा केला! पहिल्या इनिंग्जमध्ये २३६ रन्सचा लीड घेतल्यावरही नर्सने फॉलोऑन न देता पुन्हा बॅटींगचा निर्णय घेतला परंतु नर्सचा हा निर्णय त्याच्या अंगाशी आला. बिल जॉन्स्टनने ४ तर इयन जॉन्सनने ५ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला ९९ रन्समध्ये गुंडाळलं! चौथ्या इनिंग्जमध्ये ३३६ रन्सचं टार्गेट असताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ५९ / ३ आणि नंतर ९५ / ४ अशी झाली होती, परंतु सॅम लॉक्स्टन (५४) आणि कॉलिन मॅक्कूल (३९*) या दोघांबरोबरही सेंच्युरी पार्टनरशीप्स रचत नील हार्वेने नाबाद १५१ रन्स फटकावल्या आणि ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकून दिली!

अर्थात वेस्ट इंडीज - पाकिस्तान टेस्ट किंवा दक्षिण आफ्रिका - ऑस्ट्रेलिया टेस्ट हा अपवाद असला तरी फॉलोऑन देणं शक्य असताना आणि विशेषतः फॉलोऑन दिल्यावर फॉलोऑन देणार्‍या संघानेच मॅच जिंकल्याचं सामान्यतः आढळून येतं...

...जर फॉलोऑन देणारा संघ ऑस्ट्रेलिया नसेल तर!

१८९४ चा डिसेंबर महिना...

सिडनीच्या मैदानात अ‍ॅशेस सिरीजची पहिली टेस्ट मॅच होती. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन जॅक ब्लॅकहॅमने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय ऑस्ट्रेलियावर उलटण्याची चिन्हं दिसत होती. इंग्लंडचा फास्ट बॉलर टॉम रिचर्ड्सनने जॉन लियॉन्सची दांडी उडवून ऑस्ट्रेलियाला हादरवलं. जॉर्ज ग्रिफीन बॅटींगला आल्यावर काही वेळातच रिचर्ड्सनने हॅरी ट्रॉट आणि पहिल्याच टेस्टमध्ये खेळणारा जो डार्लिंग यांचे स्टंप्स उखडून ऑस्ट्रेलियाची अवस्था २१ / ३ अशी करुन टाकली!

ग्रिफीन आणि डार्लिंगप्रमाणेच पहिल्या टेस्टमध्ये खेळणारा फ्रान्सिस आयर्डेल यांनी १७१ रन्सची पार्टनरशीप करुन ऑस्ट्रेलियाला सावरलं. आयर्डेल (८१) आऊट झाल्यावर ग्रिफीन आणि सिड ग्रेगरी यांनी इंग्लिश बॉलर्सची धुलाई करत १३९ रन्स फटकावल्या! बिल ब्रूकवेलच्या बॉलवर अखेर फ्रान्सिस फोर्डने त्याचा कॅच घेतला तेव्हा ग्रिफीनने २२ बाऊंड्री आणि बॉबी पिलला मारलेल्या सिक्सच्या जोरावर १६१ रन्स फटकावल्या होत्या! दिवसभराचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ३४६ / ५ पर्यंत मजल मारली होती!

दुसर्‍या दिवशी सिड ग्रेगरीने इंग्लिश बॉलर्सची धुलाई करण्याचं आपलं व्रत मनोभावे सुरु ठेवलं होतं. कॅप्टन जॅक ब्लॅकहॅमबरोबर त्याने १५४ रन्सची पार्टनरशीप केली! ४ तासांत २८ बाऊंड्री ठोकत २०१ रन्स तडकावल्यावर कॅप्टन अँड्र्यू स्टॉडार्डच्या बॉलवर बॉबी पीलने त्याचा कॅच घेतला तेव्हा इंग्लिश खेळाडूंनी सुटकेचा नि:श्वास टाकला! रिचर्ड्सनने ब्लॅकहॅमला (७४) बोल्ड करुन ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज आटपली तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता ५८६!

इंग्लंडच्या पहिल्या इनिंग्जमध्ये सुरवातीलाच चार्ली टर्नरने आर्ची मॅक्लॅरेनचा ऑफ स्टंप उखडला! अल्बर्ट वॉर्ड (७५), बिल ब्रॉकवेल (४९), जॉनी ब्रिग्स (५७) आणि विकेटकीपर लेस्ली गे (३७) यांनी इंग्लंडचा स्कोर ३२५ पर्यंत पोहोचवला, परंतु फॉलोऑन टाळणं त्यांना जमलं नाही. पहिल्या इनिंग्जमध्ये सेंच्युरी ठोकणार्‍या ग्रिफीनने ४ विकेट्स काढल्या! आपल्या सहकार्‍यांशी सल्लामसलत करुन ब्लॅकहॅमने इंग्लंडला फॉलोऑन दिला!

दुसर्‍या इनिंग्जमध्ये मॅक्लॅरेन परतल्यावर वॉर्ड आणि स्टॉडार्ड (३६) यांनी ७१ रन्सची पार्टनरशीप केली. स्टॉडार्ड आऊट झाल्यावर वॉर्ड आणि जॅक ब्राऊन (५३) यांनी १०२ रन्स जोडल्यावर ग्रिफीनने वॉर्डची दांडी उडवली. ११ बाऊंड्रीसह वॉर्डने ११७ रन्स फटकावल्या! फोर्ड (४८) आणि ब्रिग्ज (४२) यांनी ८९ रन्सची पार्टनरशीप करुन इंग्लंडचा स्कोर ३८५ पर्यंत आणला. बिल लॉकवूड आणि टॉम रिचर्ड्सन यांच्या फटकेबाजीमुळे अखेर इंग्लंडने ४३७ पर्यंत मजल मारली. पहिल्या इनिंग्जप्रमाणे दुसर्‍या इनिंग्जमध्येही ग्रिफीनने ४ विकेट्स काढल्या होत्या!

मॅच जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला टार्गेट होतं १७७ रन्सचं!

ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला तो बॉबी पीलने. त्याच्या बॉलवर विकेटकीपर गेने ट्रॉटचा कॅच घेतला. पहिल्या इनिंग्जप्रमाणेच ग्रिफीन सेटल होण्यापूर्वीच रिचर्ड्सनने लियॉन्सची दांडी उडवली! पण लियॉन्स आऊट झाल्यावर आलेल्या जो डार्लिंगने इंग्लिश बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता ११३ / २! ग्रिफीन आणि डार्लिंग यांनी ६८ रन्सची पार्टनरशीप केली होती. त्यातल्या ४४ रन्स डार्लिंगच्या होत्या!

सहाव्या दिवशी मॅच जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला फक्तं ६४ रन्सची आवश्यकता होती!

सहाव्या दिवशी सकाळी ग्राऊंडवर येण्यापूर्वी ग्रिफीनची कॅप्टन ब्लॅकहॅमशी गाठ पडली. आदल्या रात्री जोरदार पाऊस पडला होता! त्याकाळी आजच्याप्रमाणे विकेट कव्हर करण्याची पद्धत नसल्याने आणि जोरदार पावसानंतर सकाळी सूर्यप्रकाशामुळे विकेटचं स्वरुप पार बदलून गेलं होतं! पाचव्या दिवसापर्यंत बॅटींगसाठी आदर्श असणारी विकेट आता बॉलर्सना, खासकरुन स्पिनर्सना मदत करणार होती! ब्लॅकहॅमच्या चेहर्‍यावर त्यामुळे चिंतेचं जाळं पसरलं होतं. ग्रिफीनला मात्रं फारशी काळजी वाटत नव्हती. फक्तं ६४ रन्स बाकी होत्या. स्वतः ग्रिफीन आणि डार्लिंग नॉटआऊट होते. पहिल्या इनिंग्जमध्ये डबल सेंच्युरी ठोकणारा ग्रेगरी बॅटींगला यायचा अद्याप बाकी होता. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया मॅच जिंकणार याबद्दल ग्रिफीनच काय पण इंग्लिश खेळाडूंनाही कोणतीही शंका नव्हती! आदल्या रात्री बरेच इंग्लिश खेळाडू 'जिवाची सिडनी' करायला गेले होते!

सहाव्या दिवशी इंग्लिश खेळाडू ग्राऊंडवर आले तेव्हा बर्‍याचजणांना आदल्या रात्रीचा हँगओव्हर जाणवत होता! खासकरुन बॉबी पीलला! एकतर पहिल्या इनिंग्जमध्ये ग्रिफीन - ग्रेगरी यांनी त्याची पद्धतशीरपणे धुलाई केली होती. त्यातच दातदुखीमुळे हैराण झाल्याने त्याला पाच दात उपटून घ्यावे लागले होते! दातदुखीचा विसर पडण्यासाठी आदल्या रात्री त्याने भरपूर दारु ढोसली होती! त्यामुळे तो ग्राऊंडवर आला तो काहीसा तरंगतच! पीलची अवस्था पाहिल्यावर कॅप्टन स्टॉडार्टने त्याला थंडगार पाण्याच्या शॉवरमध्ये बसवलं! एव्हाना भानावर आलेल्या पीलला आदल्या रात्रीच्या पावसाची आणि लख्ख सूर्यप्रकाशाची कल्पना आली होती. शॉवरमधून टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत तो बाहेर आला आणि अद्यापही जड असलेल्या जीभेने अडखळतच स्टॉडार्डला म्हणाला,

“Give me the ball, Mr. Stoddart, and I’ll have the booggers out before loonch.”

ग्रिफीन आणि डार्लिंगने सावधपणे बॅटींगला सुरवात केली. एका बाजूने पील तर दुसर्‍या बाजूने जॉनी ब्रिग्जला खेळताना दोघांना कसरत करावी लागत होती. डार्लिंगने हाफ सेंच्युरी पूर्ण केल्यावर पीलच्या बॉलवर ब्रूकवेलने त्याचा कॅच घेतला. ५ बाऊंड्री आणि पीललाच मारलेल्या सिक्ससह डार्लिंगने ५३ रन्स फटकावल्या. ऑस्ट्रेलिया १३० / ३!

डार्लिंगच्या जागी खेळायला आलेला सिड ग्रेगरी सेटल होण्यापूर्वीच ब्रिग्जने ग्रिफीनला एलबीडब्ल्यू केलं! ग्रेगरी आणि आयर्डेल यांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोर १४७ पर्यंत नेल्यावर ब्रिग्जने स्वतःच्या बॉलवर आयर्डेलचा कॅच घेतला! ग्रेगरी क्रीजवर असेपर्यंत ऑस्ट्रेलियाला फारशी चिंता नव्हती. आक्रमक पवित्रा घेत त्याने पीलला दोन बाऊंड्री मारल्या, पण पीलच्या बॉलवर विकेटकीपर गेने त्याचा कॅच घेतल्यावर ऑस्ट्रेलियाला हादरा बसला. पाठोपाठ पीलला फटकावण्याच्या नादात जॉन रिडमनला गेने बेमालूमपणे स्टंप केलं! ऑस्ट्रेलिया १५९ / ७!

ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरुममध्ये पील - ब्रिग्ज यांनी घेतलेल्या प्रत्येक विकेटबरोबर कॅप्टन ब्लॅकहॅमची अस्वस्थता शीगेला पोहोचत होती. ऑस्ट्रेलियाचा होणारा पराभव त्याला असह्य होत होता. त्यातच त्याच्या हाताचा अंगठा दुखावल्यामुळे त्याला कितपत बॅटींग करता येईल याबद्द्लही शंकाच होती.

"Cruel Luck! Cruel Luck!" तो सिड ग्रेगरीला उद्देशून म्हणाला!

पीलच्या बॉलवर ब्रिग्जने टर्नरचा कॅच घेतल्यावर ऑस्ट्रेलियाची अवस्था १६१ / ८ अशी झाली. पुढच्याच ओव्हरमध्ये ब्रिग्जच्या बॉलवर मॅक्लॅरेनने अर्नी जोन्सचा कॅच घेतला. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी अद्याप १६ रन्सची आवश्यकता होती. दुखर्‍या हातानिशी ब्लॅकहॅम बॅटींगला आला खरा, जेमतेम २ रन्स केल्यावर पीलने स्वतःच्याच बॉलवर त्याचा कॅच घेतला!

११३ / २ वरुन ऑस्ट्रेलिया १६६ मध्ये ऑल आऊट झाली होती!

पीलने कॅप्टन स्टॉडार्टला कबूल केल्याप्रमाणे लंचपूर्वी ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं होतं! त्याने ६ तर ब्रिग्जने ३ विकेट्स काढल्या होत्या! शेवटच्या दिवशी सिड ग्रेगरीचा (१६) अपवाद वगळता एकाही ऑस्ट्रेलियन बॅट्समनला दहा रन्सही करता आल्या नाही! ग्रेगरीनंतर सर्वात जास्तं स्कोर होता आयर्डेलचा ५ रन्स!

फॉलोऑन दिल्यावरही पराभवाची नामुष्की ऑस्ट्रेलियाच्या पदरी पडली होती!

मॅच जिंकून इंग्लंडचे इतर सर्व खेळाडू ड्रेसिंगरुममध्ये परतले, पण आर्ची मॅक्लॅरेन मात्रं गायब होता. सुमारे तासाभराने तो प्रगटला तो २०० पौंडाच्या नोटा फडकावत! इंग्लंडच्या विजयासाठी बेटींग करणार्‍यांनी ५०:१ असा भाव दिला होता आणि मॅक्लॅरेनच्या ४ पौंडाच्या बेटचे त्याला २०० पौंड मिळाले होते!

८७ वर्षांनंतर...

१९८१ मध्ये किम ह्यूजचा ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर होता. नॉटींगहॅमशायरच्या ट्रेंटब्रिजवर झालेली पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाने आरामात जिंकली. लॉर्ड्सच्या दुसर्‍या टेस्टमध्ये इंग्लंडला पावसाने वाचवलं. या टेस्टमधल्या दोन्ही इनिंग्जमध्ये इंग्लंडचा कॅप्टन इयन बोथमला एकही रन करता आली नव्हती! मॅच संपल्याबरोबर त्याने आपण इंग्लंडचं कॅप्टनपद सोडत असल्याचं जाहीर केलं!

"He would have been fired anyway had he not resigned." सिलेक्शन कमिटीचा अध्यक्षं अ‍ॅलेक बेड्सर म्हणाला!

बोथमच्या राजिनाम्यानंतर इंग्लंडचा कॅप्टन म्हणून माईक ब्रिअर्लीची नेमणूक करण्यात आली. ३९ टेस्ट्समध्ये २३ च्या अ‍ॅव्हरेजने १४४२ रन्स ही ब्रिअर्लीची कामगिरी बॅट्समन म्हणून अगदीच सामान्यं असली तरी कॅप्टन म्हणून त्याची कामगिरी इतकी अफलातून होती की इंग्लंडने त्याला केवळ कॅप्टन म्हणून खेळवलं असावं! आपल्या सहकार्‍यांकडून योग्यवेळी सर्वोत्कृष्टं कामगिरी करुन घेण्यात तो इतका वाकबगार होता की रॉडनी हॉगने त्याच्याबद्द्ल बोलताना "He had degree in people!" असे उद्गार काढले होते!

कॅप्टन म्हणून नेमणूक होताच ब्रिअर्लीने बोथमची गाठ घेऊन त्याला विचारलं,

"Ian, you want to play at Headingly right?"

"Of course I want to!" बोथम उत्तरला.

"You will! I want you to save your best for it!"

किम ह्यूजने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतल्यावर जॉन डायसन आणि ग्रॅहॅम वूड यांनी ५५ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप रचली. बोथमने वूडला एलबीडब्ल्यू केल्यावर डायसन आणि ट्रेव्हर चॅपल यांनी ९४ रन्स जोडल्या. कमालीच्या संथपणे खेळत पावणे तीन तासात २७ रन्स केल्यावर अखेर पीटर विलीच्या बॉलवर बॉब टेलरने ट्रेव्हर चॅपलचा कॅच घेतला. चॅपल परतल्यावर डायसन आणि किम ह्यूजने ऑस्ट्रेलियाचा स्कोर १९६ पर्यंत नेल्यावर ग्रॅहॅम डिलीने डायसनची दांडी उडवली. पाच तासात १४ बाऊंड्रीसह डायसनने १०२ रन्स फटकावल्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी डिलीनेच नाईटवॉचमन रे ब्राईटला बोल्ड केल्यावर ह्यूज आणि ग्रॅहॅम यालप यांनी ११२ रन्सची पार्टनरशीप केली. ह्यूज सेंच्युरी ठोकणार असं वाटत असतानाच बोथमने स्वत:च्याच बॉलवर त्याचा कॅच घेतला. साडेचार तासांत ८ बाऊंड्रीसह ह्यूजने ८९ रन्स फटकावल्या. ह्यूज परतल्यावर यालप (५८) आणि मार्श (२८) यांचा अपवाद वगळता कोणालाच फारसं काही करता आलं नाही. ४०१ / ९ अशा स्कोरवर ह्यूजने ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज डिक्लेअर केली.

कॅप्टनपदाच्या जबाबदारीतून मोकळ्या झालेल्या बोथमने ६ विकेट्स उडवल्या होत्या! टी-टाईमच्या आधी आणि नंतर मिळून २२ ओव्हर्सच्या मॅरेथॉन स्पेलमध्ये त्याने ह्यूज, अ‍ॅलन बॉर्डर, यालप, जेफ लॉसन आणि मार्श यांना गुंडाळलं होतं!

टेरी आल्डरमनने गूचला एलबीडब्ल्यू करुन इंग्लंडला पहिला हादरा दिला. बॉयकॉट आणि ब्रिअर्ली यांनी इंग्लंडचा स्कोर ४० पर्यंत नेल्यावर आल्डरमनच्याच बॉलवर मार्शने ब्रिअर्लीचा कॅच घेतला. पाठोपाठ लॉसनने बॉयकॉटचा लेग स्टंप उडवल्यावर इंग्लंडची अवस्था ४२ / ३ अशी झाली. डेव्हीड गावर - माईक गॅटींग यांनी ४२ रन्सची पार्टनरशीप केली, पण लॉसनच्या बॉलवर मार्शने गावरचा कॅच घेतल्यावर ही जोडी फुटली. त्यातच डेनिस लिलीने गॅटींगला एलबीड्ब्ल्यू केलं. इंग्लंड ९७ / ५!

गॅटींग आऊट झाल्यावर बोथम बॅटींगला आला. कोणतंही टेन्शन नसल्याने आक्रमक पवित्रा घेत त्याने फटकेबाजीला सुरवात केली. पीटर विली, बॉब टेलर आऊट झाल्यावरही त्याचा आक्रमकपणा कमी झाला नव्हता. ५४ बॉलमध्ये ८ बाऊंड्रीसह ५० रन्स तडकावल्यावर क्रिकेटमधल्या बॉलर - विकेटकीपर या सर्वात यशस्वी काँबिनेशनने बोथमची विकेट घेतली.

कॉट मार्श बोल्ड लिली!

इंग्लंडची पहिली इनिंग्ज १७४ मध्ये आटपली. लिलीने ४ तर आल्डरमन आणि लॉसनने ३-३ विकेट्स घेतल्या.
२२७ रन्सचा लीड घेतल्यावर किम ह्यूजने इंग्लंडला फॉलोऑन दिला!

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लिलीच्या बॉलवर आल्डरमनने गूचचा कॅच घेतल्यामुळे दुसर्‍या इनिंग्जमध्ये इंग्लंडची अवस्था ७ / १ अशी झाली होती!

चौथ्या दिवशी सकाळी आल्डरमनने लिलीच्या बॉलवर ब्रिअर्लीचा कॅच घेतला. डेव्हीड गावरवर इंग्लंडची मदार होती, पण आल्डरमनच्या बॉलवर बॉर्डरने त्याचा कॅच घेतला. आल्डरमननेच गॅटींगला एलबीडब्ल्यू केलं. इंग्लंड ४१ / ४!

पीटर विली बॅटींगला आल्यावर लिलीने तिसरी स्लिप आणि गली याच्यामध्ये फ्लाय स्लिप लावण्याची मागणी केली, पण ह्यूजने नकार दिला! विलीने त्याच गॅपमधून दोन बाऊंड्री मारल्यावरही रागाने धुमसणार्‍या लिलीला फ्लाय स्लिप देण्यास ह्यूजचा नकार कायम होता! विलीने पुन्हा त्याच गॅपमध्ये दोन बाऊंड्री मारल्यावर मार्शने ह्यूजला गाठलं.

"We need a fucking fly slip there!" मार्श गरजला!

मार्शच्या सूचनेनंतर ह्यूजने फारसा विचार न करता जॉन डायसनला फ्लाय स्लिपमध्ये पाठवलं. मोजून दुसर्‍या बॉलला विलीने लिलीचा बॉल त्याच्या हातात कट् केला! कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला रिची बेनॉ आणि खुद्दं माईक ब्रिअर्लीनेही या चालीची तारीफ केली परंतु त्यामागचा मेंदू किम ह्यूजचा नसून लिली-मार्शचा होता याची त्यांना त्यावेळी तरी कल्पना नव्हती! इंग्लंड १०५ / ५!

जेफ बॉयकॉट एका बाजूने थंड डोक्याने आणि त्याच्या सुप्रसिद्ध धीमेपणाने खेळत होता. बोथमने फटकेबाजीला सुरवात केल्यावरही बॉयकॉटवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. साडेतीन तासात ४६ रन्स केल्यावर आल्डरमनने बॉयकॉटला एलबीड्ब्ल्यू केलं. पाठोपाठ बॉब टेलरचा कॅच मार्शने घेतल्यावर इंग्लंडची अवस्था झाली १३५ / ७!

इनिंग्जचा पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला अद्याप ९२ रन्सची आवश्यकता होती!

बोथमच्या जोडीला बॅटींगला आला ग्रॅहॅम डिली! बोथम त्याला म्हणाला,
“Let’s give it some humpty.”

लंचच्या दरम्यान हेडींग्लीच्या स्कोरकार्डवर बेटींगचे आकडे झळकले!
इंग्लंडने मॅच जिंकल्यास ५००:१ असा भाव होता!
डेनिस लिलीने १० पौंड आणि रॉडनी मार्शने ५ पौंड लावले...इंग्लंडच्या बाजूने!

500-1 Bet

लंचनंतर बोथम आणि डिली यांनी मनाला येईल त्याप्रमाणे फटकेबाजीला सुरवात केली! लिली, आल्डरमन, लॉसन कोणाचीही पर्वा न करता दोघांचा दांडपट्टा सुरु होता! अनेकदा बॉल बॅटची एज लागून स्लिपच्या डोक्यावरुन गेला, कित्येकदा टॉप एज लागून किंवा चुकीचा मारलेला शॉट हवेत गेला पण दरवेळी तो फिल्डर नसलेल्या जागीच नेमका जात होता! या फटकेबाजीच्या दरम्यानच बोथमने आल्डरमनला एक दणदणीत सिक्स ठोकली. रिची बेनॉ म्हणाला,

“Don’t even bother looking for that. It’s gone into the confectionery stall and out again.”

दीड तासात बोथम आणि डिली यांनी ११२ रन्स झोडपून काढल्यावर अखेर आल्डरमनने डिलीला बोल्ड केलं!
बोथमच्या तोडीसतोड ९ बाऊंड्री ठोकत डिलीने ५६ रन्स फटकावल्या!

डिलीनंतर बॅटींगला आलेल्या क्रिस ओल्डनेही डिलीच्या पावलावर पाऊल टाकत बोथमच्या बरोबरीने उभे-आडवे शॉट्स मारण्यास सुरवात केली. बोथम-ओल्ड यांनी ६७ रन्स फटकावल्यावर अखेर लॉसनने ओल्डला बोल्ड केलं तेव्हा त्याने ३१ बॉलमध्ये ६ बाऊंड्रीसह २९ रन्स तडकावल्या होत्या! चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोर होता ३५१ / ९!

मॅचच्या चौथ्या दिवशी सकाळी इंग्लंडचा पराभव होईल या कल्पनेने बोथमने आपलं हॉटेल सोडलं होतं! संध्याकाळी तो हॉटेलमध्ये परतला तेव्हा हॉटेलच्या मॅनेजरने हॉटेलमधल्या सगळ्यात चांगल्या रुममध्ये त्याची विनामूल्यं राहण्याची सोय केली!

पाचव्या दिवशी सकाळी बॉर्डरने आल्डरमनच्या बॉलवर विलीसचा कॅच घेतल्यावर इंग्लंडची इनिंग्ज ३५६ रन्सवर आटपली.
साडेतीन तासात १४८ बॉलमध्ये २७ बाऊंड्री आणि आल्डरमनला मारलेल्या सिक्ससह बोथमने १४९ रन्स झोडपून काढल्या होत्या!

ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकण्यासाठी १३० रन्सचं टार्गेट होतं!

ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये अनुभवी बॉब विलीसच्या ऐवजी ब्रिअर्लीने बोथम आणि डिली यांना सुरवातीला बॉलिंगला आणलं. बोथमच्या बॉलवर बॉब टेलरने ग्रॅहॅम वूडचा कॅच घेतला, पण डायसन आणि ट्रेव्हर चॅपल यांनी कोणतीही रिस्क न घेता ऑस्ट्रेलियाचा स्कोर ५६ पर्यंत पोहोचवला. ब्रिअर्लीने विलीसला बॉलिंगला आणलं होतं पण ते वार्‍याच्या विरुद्ध दिशेने. विलीसने दुसर्‍या बाजूने बॉलिंगला आणण्याची दिलेली सूचना आधी ब्रिअर्लीने मनावर घेतली नाही, पण बोथम आणि टेलरशी सल्लामसलत केल्यावर त्याला बहुधा विलीसची सूचना पटली असावी. विलीसला दुसर्‍या बाजूने बॉलिंगला आणण्यास ब्रिअर्ली राजी झाला!

... आणि विलीसने अक्षरशः धुमाकूळ घातला!

विलीसच्या बंपरवर ट्रेव्हर चॅपलच्या तोंडासमोरच्या बॅटवर आपटून टेलरच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला. किम ह्यूज सावधपणे खेळत होता, परंतु एकही रन काढण्यापूर्वीच विलीसच्या बॉलवर बोथमने त्याचा स्लिपमध्ये अफलातून कॅच घेतला. त्याच ओव्हरमध्ये विलीसच्या बंपरवर शॉर्टलेगला गॅटींगने यालपचा कॅच घेतला. एका बाजूला विलीसने ऑस्ट्रेलियाची लांडगेतोड चालवलेली असताना दुसर्‍या बाजूला क्रिस ओल्डने ८ ओव्हर्समध्ये ११ रन्स देत ऑस्ट्रेलियाला पार जखडून टाकलं होतं. लंचला ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता ५८ / ४!

ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरुममध्ये अत्यंत तणावपूर्ण वातावरण होतं. टेस्ट जिंकण्यासाठी अद्याप ७२ रन्सची आवश्यकता होती. एका बाजूला जॉन डायसन ठामपणे खेळत होता. त्याच्या जोडीला बॉर्डर, मार्श आणि लॉसनसारखे बॅट्समन अद्याप शिल्लक असल्याने मॅच अद्यापही ऑस्ट्रेलियाच्या आवाक्यात होती. अशा परिस्थितीत लिलीचा अनुभवही लाखमोलाचा ठरणार होता. एखादी पार्टनरशीप मॅच जिंकून देण्यास पुरेशी होती.

बॉब विलीस म्हणतो,
"We had them at 58/4 at lunch. That was the shift in the balance and we realized we could actually go and win it!"

लंचनंतर ऑस्ट्रेलियाला हादरवलं ते क्रिस ओल्डने. अचूक टप्प्यावर पडलेला त्याचा इनस्विंगर बॉर्डरच्या बॅट-पॅडमधून स्टंपवर गेला. संपूर्ण मॅचमध्ये ओल्डने नेमक्या वेळी घेतलेली ही एकमेव विकेट होती! बॉर्डर पाठोपाठ इतका वेळ शांतपणे खेळणार्‍या डायसनने विलीसच्या बंपरवर हूक मारण्याचा प्रयत्न केला आणि टेलरने त्याचा कॅच घेतला. रॉडनी मार्शने ऑफस्टंपच्या बाहेर असलेला विलीसचा बंपर हूक केला खरा पण फाईनलेगला ग्रॅहॅम डिलीने बाऊंड्रीला स्पर्श होणार नाही याची दक्षता घेत त्याचा कॅच घेतला. पाठोपाठ विलीसच्याच बॉलवर टेलरने जेफ लॉसनचा कॅच घेतला! सहा ओव्हर्समध्ये विलीसने सहा विकेट्स घेतल्या होत्या! ऑस्ट्रेलिया ७५ / ८!

डेनिस लिलीने बोथमप्रमाणेच आक्रमकपणे फटकेबाजीला सुरवात केली. विलीसचा बॉल त्याच्या बॅटची एज लागून स्लिपमधून बाऊंड्रीपार गेला. ब्रिअर्लीने गूचला फ्लाय स्लिपमध्ये आणलं, पण लिलीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. विलीसचा पुढचा बॉलही फ्लाय स्लिपमध्ये असलेल्या गूचच्या बाजूने बाऊंड्रीपार गेला! दुसर्‍या बाजूने रे ब्राईटने ओल्डला मिडविकेटला दोनदा बाऊंड्री तडकावल्या! ७५ / ८ अशा अवस्थेतून लिली - ब्राईट यांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोर ११० पर्यंत आणला. पुन्हा एकदा विजय ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीपथात आला होता!

डेनिस लिली विलीसच्या वेगाचा वापर करुन स्लिप ते थर्डमॅनच्या पट्ट्यात बॉल खेळण्याचा प्रयत्नं करतो आहे ही गोष्टं चाणाक्षं माईक गॅटींगच्या ध्यानात आली. त्याने ब्रिअर्लीची गाठ घेऊन विलीसला बॉल स्टंप्सवर टाकण्याची सूचना दिली.

"Full and straight at stumps!"

विलीसचा मिडलस्टंपवर पडलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा लिलीचा प्रयत्नं पार फसला. मिडऑनला गॅटींगने पुढे झेप घेत त्याचा अफलातून कॅच घेतला! ऑस्ट्रेलिया १११ / ९!

ब्रिअर्लीने ओल्डच्या जागी बोथमला बॉलिंगला आणलं. बोथमच्या लागोपाठच्या दोन आऊटस्विंगर्सवर आल्डरमनच्या बॅट्ची एज लागली, पण दोन्ही वेळा तिसर्‍या स्लिपमध्ये असलेल्या ओल्डने कॅच ड्रॉप केला! बोथम वैतागला, पण विलीसने ऑस्ट्रेलियाला कोणतीही संधी द्यायची नाही असा जणू निश्चयच केला असावा! पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने रे ब्राईटचा मिडल स्टंप उडवला!

१३० रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज १११ वर आटपली होती!
बॉब विलीसने ८ विकेट्स उडवल्या!
इंग्लंडने १८ रन्सनी मॅच जिंकली!

८७ वर्षांनी पुन्हा एकदा फॉलोऑन देऊन ऑस्ट्रेलियाच्या पदरी पराभव पडला होता!

बोथमच्या इनिंग्जबद्दल बोलताना डेनिस लिली म्हणाला,
"Bloody lucky innings! I expected to get him virtually every ball!"

किम ह्यूज म्हणतो,
"The magic of Both! What else can you say? Everything he touched from that point onwards turned to gold!"

डेनिस लिली आणि रॉडनी मार्श दोघांनी इंग्लंडच्या विजयावर बेट लावली होती. दोघांनी मिळून ७५०० पौंड खिशात घातले!

Headingly81

हेडींग्लीनंतर २० वर्षांनी....

२००१ मध्ये स्टीव्ह वॉचा जगज्जेता ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौर्‍यावर आला होता. १९९९ पासून सलग १५ टेस्ट्स ऑस्ट्रेलियाने जिंकल्या होत्या आणि आता भारताला भारतात हरवण्याच्या वॉ आणि कंपनीचा निर्धार होता.

ऑस्ट्रेलिया सोडण्यापूर्वी स्टीव्ह वॉने जाहीर वक्तंव्यं केलं होतं,
"This is the final frontier. This is the one we need to conquer!"

मुंबईची पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाने १० विकेट्सने आरामात जिंकली. दोन्ही इनिंग्जमध्ये सचिन तेंडुलकरचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियासमोर कोणीच उभं राहू शकलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंग्जमध्ये ९९ / ५ अशा स्थितीत बॅटींगला आलेल्या अ‍ॅडम गिलख्रिस्टने तुफान फटकेबाजी करून सेंच्युरी ठोकली होती!

दुसरी टेस्ट होती कलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर!

स्टीव्ह वॉने टॉस जिंकल्यावर बॅटींगचा निर्णय घेतला. हेडन आणि स्लेटर यांनी १०३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर झहीर खानच्या बॉलवर विकेटकीपर मोंगियाने त्याचा कॅच घेतला. स्लेटर परतल्यावर हेडन आणि जस्टीन लँगर यांनी भारतीय बॉलर्सना धारेवर धरत ९० रन्स जोडल्या. टी-टाईमपूर्वी जेमतेम काही मिनीटं हरभजनसिंगला फटकावण्याचा हेडनचा प्रयत्नं फसला आणि मिडविकेट बाऊंड्रीवर शिवसुंदर दासऐवजी फिल्डींगला आलेल्या हेमंग बदानीने त्याचा कॅच घेतला. १४ बाऊंड्री आणि ३ सिक्ससह हेडनने ९७ रन्स फटकावल्या! ऑस्ट्रेलिया १९३ / २!

पुढचा इतिहास कोणाला माहीत नाही?

हरभजनसिंगने पाँटींग, गिलख्रिस्ट, वॉर्न यांना लागोपाठच्या बॉलवर आऊट करत हॅटट्रीक घेतली. २६८ / ८ अशा अवस्थेतून स्टीव्ह वॉने जेसन गिलेस्पी (४६) बरोबर १३३ रन्सची पार्टनरशीप केली. ग्लेन मॅकग्राथबरोबर ४३ रन्सची पार्टनरशीप करत त्याने आधीच दमल्याभागल्या भारतीय बॉलर्सच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम व्यवस्थित पार पाडलं! हरभजनच्या बॉलवर अखेर स्टीव्ह वॉ एलबीडब्ल्यू झाला तेव्हा त्याने ११ बाऊंड्री आणि वेंकटपती राजूला मारलेल्या सिक्ससह ११० रन्स फटकावल्या होत्या!

२६९ / ८ वरुन ऑस्ट्रेलियाने ४४५ पर्यंत मजल मारली होती!

भारताच्या पहिल्या इनिंग्जमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणच्या ५९ रन्स वगळता कोणाच्याच हाती काही लागलं नाही. मॅकग्राथ, गिलेस्पी, कॅस्प्रॉविच यांनी भारताची पहिली इनिंग्ज १७१ मध्ये गुंडाळली. ऑस्ट्रेलियाकडे २७४ रन्सचा लीड होता!
Final Frontier जिंकण्याच्या इराद्याने आलेला स्टीव्ह वॉ ही संधी सोडणं शक्यंच नव्हतं! त्याने भारताला फॉलोऑन दिला!

राहुल द्रविड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सिरीजमध्ये आतापर्यंत साफ अपयशी ठरला होता. तीन इनिंग्जमध्ये मिळून त्याने जेमतेम ७५ रन्स काढल्या होत्या. भारताचा कोच जॉन राईट आणि सचिनशी सल्लामसलत केल्यावर द्रविडच्या जागी पहिल्या इनिंग्जमध्ये ५९ रन्स फटकावणार्‍या लक्ष्मणला वन डाऊन पाठवण्याचा गांगुलीने निर्णय घेतला होता!

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोर होता २५४ / ४.
लक्ष्मण १०९ तर द्रविड ७ रन्सवर नॉटआऊट होता!

अद्यापही ऑस्ट्रेलियाच्या २७४ रन्सच्या लीडपासून भारत २० रन्सनी मागे होता.

चौथ्या दिवशी भारताला झटपट गुंडाळून मॅच आणि सिरीज जिंकण्याच्या हेतूने स्टीव्ह वॉ आणि कंपनी ईडन गार्डन्सवर उतरली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी शँपेनच्या बाटल्याही ड्रेसिंगरुममध्ये आणल्या होत्या!

"It's matter of time!" फिल्डींगला येताना स्टीव्ह वॉ ऑस्ट्रेलियाचा कोच जॉन बुकाननला म्हणाला!

चौथ्या दिवशी ईडन गार्डन्सवर जे काही झालं....

लक्ष्मण आणि द्रविड यांनी सावधपणे बॅटींगला सुरवात केली. एकदा सेट झाल्यावर लक्ष्मणच्या बॅटमधून एकापेक्षा एक अफलातून शॉट्सची बरसात सुरु झाली. दुसर्‍या बाजूने द्रविडनेही तितक्याच समर्थपणे पण सावधपणे ऑस्ट्रेलियाला फटकावण्यास सुरवात केली. मॅकग्राथ, गिलेस्पी, कॅस्प्रॉविच, वॉर्न यांना पद्धतशीरपणे फटकावत लक्ष्मण आणि द्र्विडचा कारभार सुखेनैव सुरु होता. कोणत्याही प्रकारे लक्ष्मण आणि द्रविड आवरत नाहीत हे पाहिल्यावर वॉर्नने आपलं ठेवणीतलं अस्त्रं बाहेर काढलं. राऊंड-द-विकेट जात आणि लेगस्टंपच्या बाहेर असलेल्या 'रफ' पॅचमध्ये बॉलिंग करायला त्याने सुरवात केली. परिणाम?

लक्ष्मणने पुढे सरसावत वॉर्नला मिडऑनमधून बाऊंड्री तडकावली!
जवळपास त्याच स्पॉटवर पडलेल्या पुढ्च्या बॉलवर लक्ष्मणने पुढे सरसावत यावेळी कव्हर्समधून बाऊंड्री ठोकली!
पुढच्या बॉलवरही लक्ष्मण पुन्हा क्रीजबाहेर येऊन खेळेल अशा अपेक्षेने वॉर्नने बॉल किंचीत शॉर्ट टाकला आणि बॅकफूटवर गेलेल्या लक्ष्मणने मिडविकेटमधून पुल करत बाऊंड्री मारली!

"What the fuck.. how do I bowl to this bloke?" वॉर्न हताशपणे स्टीव्ह वॉला म्हणाला!

मार्क वॉच्या बॉलवर कव्हरड्राईव्ह मारत लक्ष्मणने २०० रन्स पूर्ण केल्या!
स्टीव्ह वॉने अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि स्वतःशिवाय सर्वांना बॉलिंगला आणून पाहिलं, परंतु काहीही उपयोग झाला नाही! रिकी पाँटींगच्या बॉलवर द्रविडविरुद्धचं एलबीडब्ल्यूचं जोरदार अपिल अंपायरने फेटाळून लावलं.

पाँटींग म्हणतो,
"Even to this day, I am sure I had got Rahul Dravid, but the ump didn't agree!"

द्रविड आणि लक्ष्मणने ऑस्ट्रेलियन बॉलर्सना अक्षरशः धारेवर धरलं होतं! एकापाठोपाठ एक रेकॉर्ड्स मोडत दोघं मॅकग्राथ आणि कंपनीची धुलाई करत होते! सुनिल गावस्करचा टेस्ट क्रिकेटमधला २३६ रन्सचा रेकॉर्ड आणि रोहन कन्हायचा ईडन गार्डन्सवरचा २५६ रन्सचा रेकॉर्ड लक्ष्मणने मोडीत काढला! ऑस्ट्रेलियाविरुद्धची दिलीप वेंगसरकर - रवी शास्त्री यांची २९८ रन्सची पार्टनरशीप आणि वेंगसरकर - गावस्कर यांची ईडन गार्डन्सवरची ३४४ रन्सची पार्टनरशीप इतिहासजमा झाली!

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लक्ष्मण २७५ तर द्रविड १५५ वर नॉटआऊट होता!
दिवसभरात ऑस्ट्रेलियन बॉलर्सची धुलाई करत दोघांनी ३३५ रन्स फटकावल्या होत्या!
भारताचा स्कोर होता ५८९ / ४. भारताकडे ३१५ रन्सचा लीड होता!

Eden2001

ऑस्ट्रेलियन ड्रेसिंगरुममधल्या शँपेनच्या बाटल्यांचं काय झालं स्टीव्ह वॉच जाणे!

पाचव्या दिवशी सकाळी एकच उत्सुकता होती ती म्हणजे लक्ष्मण ट्रिपल सेंच्युरी ठोकतो का? पण ४४ बाऊंड्रीसह २८१ रन्स फटकावल्यावर मॅकग्राथच्या बॉलवर पाँटींगने लक्ष्मणचा कॅच घेतला. लक्ष्मणप्रमाणेच द्रविडलाही डबल सेंच्युरी ठोकण्यात अपयश आलं. २० बाऊंड्रीसह १८० रन्स केल्यावर तो रनआऊट झाला! अखेर ६५७ / ७ अशा स्कोरवर गांगुलीने भारताची इनिंग्ज डिक्लेअर केली आणि ऑस्ट्रेलियाला पाच तासात ३८४ रन्स काढण्याचं अशक्यप्राय आव्हान दिलं!

लक्ष्मण आणि द्रविड यांनी तब्बल १०४ ओव्हर्समध्ये ३७६ रन्सची पार्टनरशीप केली होती!

पाचव्या दिवशी टी-टाईमला हेडन आणि स्टीव्ह वॉ हे दोघं नॉटआऊट असल्याने मॅच ड्रॉ होईल अशी जवळपास प्रत्येकाची खात्री होती. पण टी-टाईमनंतर दुसर्‍याच ओव्हरमध्ये हरभजनच्या बॉलवर शॉर्टलेगला हेमंग बदानीने स्टीव्ह वॉ आणि त्याच ओव्हरमध्ये पाँटींगचा विचित्रं स्वीप शॉट दासने आरामात पकडल्यावर ऑस्ट्रेलियाला हादरा बसला.

नेमक्या या वेळेस हरभजनच्या जोडीला गांगुलीने बॉलिंगला आणलं सचिनला!

दोन्ही इनिंग्जमध्ये बॅटींगमधलं अपयश भरुन काढण्याच्या इराद्यानेच सचिन बॉलिंगला आला असावा. पहिल्याच ओव्हरमध्ये गिलख्रिस्टचा स्वीप मारण्याचा प्रयत्नं पार फसला आणि तो एलबीडब्ल्यू झाला! पहिल्या इनिंग्जप्रमाणे दुसर्‍या इनिंग्जमध्येही पहिल्याच बॉलला आऊट झालेल्या गिलख्रिस्टला 'किंग पेअर' मिळाली! गिलख्रिस्टपाठोपाठ पुढच्याच ओव्हरमध्ये सचिनने हेडनलाही स्वीपच्या सापळ्यात अडकवून एलबीडब्ल्यू केलं आणि गुगलीवर वॉर्नला! सचिनच्या या पराक्रमाने ऑस्ट्रेलियाची अवस्था १७४ / ८ अशी झाली!

८ विकेट्स गेल्यावर मॅच जिंकलीच आहे अशा अविर्भावात बहुतेक बॉलर्सचं लक्षं विचलित झालं असावं. गिलेस्पी आणि कॅस्प्रॉविच यांनी सुमारे ८ ओव्हर्स खेळून काढल्या. हरभजनच्या बॉलवर दासने गिलेस्पीचा कॅच घेतल्यावर मॅकग्राथ आणि कॅस्प्रॉविच यांनी भारताला अर्धा तास तंगवलं. याच दरम्यान सचिनच्या बॉलवर बाऊंड्री मारल्यावर मॅकग्राथच्या चेहर्‍यावर त्या परिस्थितीतही मिस्कील हास्याची लकेर उमटली.

हरभजनचा टॉपस्पिनर मॅकग्राथने पॅडवर घेतला आणि तो एलबीड्ब्ल्यू झाला!

ईडन गार्डन्स वर हजर असलेल्या ७५००० प्रेक्षकांचा आवाज टीपेला गेला होता! ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज २१२ वर आटपली! तब्बल १७१ रन्सनी भारताने मॅच जिंकली! हरभजनसिंगने हॅटट्रीकसह मॅचमध्ये १३ विकेट्स घेतल्या होत्या! आपल्या पहिल्या टेस्ट पासून सलग १५ मॅचेस जिंकणार्‍या गिलख्रिस्टला १६ च्या टेस्टमध्ये किंग पेअरसह पराभवाची चव चाखावी लागली. ऑस्ट्रेलियाची सलग १६ टेस्ट्सची विजयमालिका रोखण्यात भारत यशस्वी झाला होता!

पहिल्या इनिंग्जमध्ये फॉलोऑन दिल्यावर दुसरी इनिंग्ज डिक्लेअर करुन मॅच जिंकण्याचा पराक्रम भारताने केला होता.
फॉलोऑननंतर मिळालेला हा सर्वात मोठा विजय होता.

फॉलोऑन दिल्यावर तिसर्‍यांदा टेस्ट गमावण्याची आपत्ती ऑस्ट्रेलियावर ओढवली होती!

स्टीव्ह वॉ म्हणतो,
"Laxman and Dravid just kept on batting on that fourth day. We threw all we could at them, but they didn't give us any chance! It was a truly magnificent partnership!"

वॉर्न म्हणतो,
"To be honest, I was totally confused about how to bowl to Laxman! I don't think I bowled that bad, but he and Dravid were unbelievably good that day!"

ईडन गार्डन्समधल्या या टेस्टमधला एक अंपायर होता १९८१ च्या हेडींग्ली टेस्टमध्ये खेळलेला पीटर विली!

"On the fourth morning the new ball was due. We thought we could be finished by the next morning. As an umpire, if a team is forced to follow-on, you want to get a day free ideally. But that was not to be the case!" विली म्हणतो, "Easily they were two of the best innings you will ever see in cricket, in the context of the game. As much as Laxman's double-century was great, I reckon Dravid's 180 was equally great. Also, those were valuable runs for Dravid, who had not scored for a while and had entered the series with his place on the line, somewhat. Importantly, Dravid and Laxman made batting look easy."

फॉलोऑन दिल्यावर प्रतिस्पर्धी संघाने जिंकलेली ही तिसरी टेस्ट होती. तीनही टेस्ट्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या वाट्याला पराभव आला. या टेस्टनंतर जगभरच्या क्रिकेट कॅप्टन्समध्ये फॉलोऑन देण्याची अशी काही दहशत बसली की कित्येकदा सहज शक्य असूनही फॉलोऑन न देता पुन्हा बॅटींग करण्याचं तंत्र जगभराच्या कॅप्टन्सनी अंमलात आणलं!

परंतु या तीनही टेस्ट्सच्या वरताण प्रकार घडला तो वॉरीकशायर - हँपशायर या कौंटी मॅचमध्ये!

१४ जून १९२२ - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

हँपशायरचा कॅप्टन होता ऑनरेबल (पुढे लॉर्ड) लिओनेल टेनिसन! सुप्रसिद्ध कवी टेनिसनचा हा नातू अत्यंत रंगेल आणि बिनधास्त होता. पहिल्या महायुद्धात तीन वेळा जखमी होऊनही प्रत्येक वेळी तो पुन्हा लढायला हजर झाला होता! १९२१ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये एक हात जखमी झालेला असताना केवळ एक हाताने बॅटींग करत त्याने जॅक ग्रेगरी (सिड ग्रेगरीचा चुलतभाऊ) आणि टेड मॅक्डोनाल्ड यांना झोडपून काढत ६३ रन्स फट्कावल्या होत्या! अशक्यं कोटीतल्या पैजा लावण्यात आणि जुगारात त्याचा हात धरणं निव्वळ अशक्यं होतं. एकदा तर लावलेल्या पैजेचे पैसे चुकवण्यासाठी त्याला आपली नवी कोरी रोल्स राईस विकावी लागली होती! अर्थात त्यामुळे त्याच्या रंगेलपणात काडीचाही फरक पडला नाही हा भाग वेगळा.

Tennyson
लिओनेल टेनिसन

एजबॅस्टनच्या ढगाळ वातावरणाचा फायदा घेण्यासाठी टॉस जिंकल्यावर टेनिसनने फिल्डींगचा निर्णय घेतला.

"We will bat!" वॉरीकशायरचा कॅप्टन ऑनरेबल फ्रेड्रीक कॅलथॉर्पला उद्देशून तो म्हणाला आणि मिस्कीलपणे त्याने पुस्ती जोडली, "After you!"

फास्ट बॉलर जॅक न्यूमनने लेन बेट्स, टायगर स्मिथ आणि बिली क्वेफ यांना झटपट गुंडाळल्यावर वॉरीकशायरची अवस्था ४४ / ३ अशी झाली. पण फ्रेड सॅन्टाल आणि कॅलथॉर्प यांनी १२२ रन्सची पार्टनरशीप रचत वॉरीकशायरची इनिंग्ज सावरली. गे दोघं हँपशायरला सतावणार अशी चिन्हं दिसत असतानाच अ‍ॅलेक्स केनेडीच्या बॉलवर स्ट्युअर्ट बॉयेसने कॅलथॉर्पचा (७०) कॅच घेतला. कॅलथॉर्प आऊट झाल्यावर सॅन्टाल (८४) आणि जॅक स्मार्ट (२०) यांच्याव्यतिरीक्तं कोणालाच बॉयेस आणि न्यूमन यांचा मुकाबला करता आला नाही. १६६ / ४ वरुन वॉरीकशायरची इनिंग्ज २२७ मध्ये आटपली!

हॅम्पशायरच्या इनिंग्जच्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये विकेटकीपर टायगर स्मिथने कॅलथॉर्पच्या बॉलवर केनेडीचा कॅच घेतला. तिसर्‍या ओव्हरमध्ये हॅरी हॉवेलने अ‍ॅलेक्स बॉवेलची तर चौथ्या ओव्हरमध्ये कॅलथॉर्पने हॅरॉल्ड डेची दांडी उडवली! हँपशायर ० / ३!

पाचव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर फिल मीडने १ रन काढली. हँपशायरच्या इनिंग्जमधली ही पहिली रन होती! पुढचा बॉल टेनिसनच्या बॅटची एज घेऊन थर्डमॅनला बाऊंड्रीपार गेला. पण तिसर्‍या बॉलवर कॅलथॉर्पने हॉवेलच्या बॉलवर त्याचा कॅच घेतला. पुढच्याच बॉलवर हॉवेलने जॉर्ज ब्राऊनचा ऑफ स्टंप उडवला. ५ ओव्हर्सनंतर हँपशायर ५ / ५!

मीडने कॅलथॉर्पची सहावी ओव्हर पूर्णपणे खेळून काढली. कॅलथॉर्पच्या बंपरवर त्याने हूकची बाऊंड्रीही ठोकली. सातव्या ओव्हरमध्ये हॉवेलच्या दुसर्‍या बॉलवर सिरील स्मार्टने न्यूमनचा कॅच घेतला तर आठव्या ओव्हरच्या दुसर्‍या बॉलवर जॅक स्मार्टने बिल शर्लीचा! त्याच ओव्हरमध्ये कॅलथॉर्पने आर्थर मॅकइन्टायरला एलबीड्ब्ल्यू केल्यावर ८ ओव्हर्समध्ये हँपशायरची अवस्था १० / ८ अशी झाली!

९ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर मिडने एक रन काढली. हॉवेलचा पुढचा बॉल लेगस्टंपच्या इतका बाहेर गेला की विकेटकीपर टायगर स्मिथला तो पकडता आला नाही. हँपशायरला ४ बाईज् मिळाल्या! पण पुढच्या दोन बॉलमध्ये हॉवेलने विकेटकीपर वॉल्टर लिव्हसी आणि स्टुअर्ट बॉयेस यांना गुंडाळलं!

८.४ ओव्हर्समध्ये हँपशायर १५ रन्समध्ये ऑल आऊट झाले होते!
फिल मीड सर्वाधीक १२ बॉल खेळून ६ रन्स काढून नॉटआऊट राहीला!
मीड, टेनिसन आणि शर्ली यांच्याव्यतिरीक्तं इतर ८ जणांना एकही रन काढता आली नाही!
हॅरी हॉवेलने ६ तर कॅलथॉर्पने ४ विकेट्स घेतल्य!

पहिल्या इनिंग्जमध्ये २२७ रन्स करुनही २१२ रन्सचा लीड मिळाल्यावर कॅलथॉर्पने हँपशायरला फॉलोऑन दिला!

“Never mind, we’ll get 500 this time.” टेनिसन आपल्या सहकार्‍यांना म्हणाला!

"Nobody bowled me anything I couldn't play in the middle. It's not that bad!" फिल मीड उद्गारला!

पहिल्या इनिंग्जनंतर जेमतेम पाऊण तासात केनेडी - बॉवेल हँपशायरची दुसरी इनिंग्ज सुरु करण्यासाठी बॅटींगला आले! कॅलथॉर्पने केनेडीची दांडी उडवली तेव्हा हँपशायरचा स्कोर होता १५! केनेडी परतल्यावर बॉवेल आणि डे यांनी हँपशायरचा स्कोर ६३ पर्यंत नेल्यावर बिली क्वेफच्या बॉलवर बेट्सने डेचा कॅच घेतला. मीड सेटल होण्यापूर्वीच क्वेफच्याच बॉलवर हॉवेलने बॉवेलचा कॅच घेतला! पहिल्या दिवसाचा खेळ एकदाचा संपला तेव्हा मीड आणि टेनिसन नॉटआऊट होते. हँपशायर ९८ / ३!

वॉरीकशायरकडे अद्यापही ११४ रन्सचा लीड होता, त्यामुळे हँपशायरने कितीही प्रयत्नं केले तरी दुसर्‍याच दिवशी आपण मॅच जिंकणार याबद्दल कॅलथॉर्पला पक्की खात्री होती. ड्रेसिंगरुममध्ये परत येताना तिसर्‍या दिवशी दोन्ही संघातील खेळाडूंसह गोल्फ खेळण्याचा टेनिसनपुढे प्रस्ताव मांडला!

कॅलथॉर्पच्या या प्रस्तावावर टेनिसन रागाने लालबुंद झाला! धुमसतच तो म्हणाला,
"No matter what, we will win the match!"

कॅलथॉर्पच काय वॉरीकशायरचे इतर खेळाडूही वेड्यासारखे टेनिसनकडे पाहत राहीले!
पण एवढ्यावरच समाधान मानेल तर तो टेनिसन कसला?
त्याने कॅलथॉर्पला १० पौंडांची पैज लावण्याचं चॅलेंज दिलं!

१९२२ च्या काळात १० पौंडाला आजच्या किमान १००० पौंडाइतकी किंमत होती. मॅचची परिस्थिती पाहता हे १० पौंड सहजच आपल्या खिशात पडतील या हिशेबाने कॅलथॉर्पने टेनिसनची पैज स्वीकारली!

दुसर्‍या दिवशी सकाळी टेनिसनच्या नावाने पोस्टाने एक कार्ड आलं. त्यावर लिहीलं होतं,
"You and your team should be better of painting spots and rocking horses rather than insulting the game of cricket."

टेनिसनचं माथं भडकलं!

आक्रमक पवित्रा घेत त्याने हॉवेल, कॅलथॉर्प प्रभृतींची धुलाई करण्यास सुरवात केली. हॉवेलने मीडचा ऑफस्टंप उखडल्यावरही टेनिसनचा आक्रमकपणा यत्कींचितही कमी झाला नाही. कॅलथॉर्पच्या बॉलवर सिरील स्मार्टने त्याचा कॅच घेतला तेव्हा त्याने ९ बाऊंड्रीसह ४५ रन्स फटकावल्या होत्या. टेनिसननंतर बॅटींगला आलेला न्यूमनही क्वेफच्या बॉलवर कॉट अ‍ॅन्ड बोल्ड झाला. हँपशायर १७७ / ६!

एव्हाना वॉरीकशायरला दुसरा नवीन बॉल उपलब्धं झाला होता! नवीन बॉलवर हॉवेल आणि कॅलथॉर्पला तोंड देणं निश्चितच कठीण जाणार होतं. जॉर्ज ब्राऊन आणि शर्ली त्याच चिंतेत होते. पण एवढ्यात एक अनपेक्षित प्रकार घडला...

टेनिसन आणि कॅलथॉर्प यांच्यातल्या पैजेची बातमी एव्हाना षटकर्णी झाली होती. त्यामुळे एजबॅस्टनच्या मैदानावर प्रेक्षकांची गर्दी वाढत होती. या गर्दीवर डोळा ठेवून आणि चांगली कमाई होण्याच्या हेतूने वॉरीकशायरच्या सेक्रेटरीने कॅलथॉर्पला मैदानात संदेश पाठवला,

"We need the game to continue for a while!"

हा निरोप मिळताच नवीन बॉल घेण्याचं टाळून कॅलथॉर्पने जॉन फॉक्स आणि फ्रेड सॅन्टाल या पार्टटाईम बॉलर्सना बॉलिंगला आणलं! ब्राऊन आणि शर्ली यांनी त्यांना आरामात खेळून काढत हँपशायरचा स्कोर २६२ पर्यंत नेल्यावर फॉक्सच्या बॉलवर शर्ली (३०) एलबीड्ब्ल्यू झाला! पाठोपाठ मॅकइन्टायरला हॉवेलने एलबीडब्ल्यू केलं. हँपशायर २७४ / ८!

जॉर्ज ब्राऊनच्या जोडीला विकेटकीपर लिव्हसी आल्यावर ब्राऊनने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली! हॉवेल, कॅलथॉर्प, क्वेफ, जॅक स्मार्ट यांच्यावर त्याने बिनदिक्कतपणे हल्ला चढवला! दुसर्‍या बाजूला लिव्हसी चिवटपणे बॅटींग करत होता. ब्राऊनच्या फटकेबाजीने वॉरीकशायरचे खेळाडू पार गोंधळून गेले होते. चाणाक्षं लिव्हसीने त्यांच्या या गोंधळाचा फायदा घेत हात धुवून घेण्यास सुरवात केली. अखेर सिरील स्मार्टला फटकावण्याच्या नादात ब्राऊन बोल्ड झाल्यावर कॅलथॉर्पने सुटकेचा नि:श्वास टाकला! हँपशायर ४५१ / ९!

पावणेपाच तासात १८ बाऊंड्रीसह ब्राऊनने १७२ रन्स फटकावल्या!

ब्राऊन आऊट झाल्यावरही हँपशायरची इनिंग्ज झटपट गुंडाळण्याच्या कॅलथॉर्पच्या इराद्याला वाटाण्याच्या अक्षता लावत लिव्हसी आणि स्टुअर्ट बॉयेस यांनी दुसर्‍या दिवसाअखेरीस हँपशायरचा स्कोर ४७५ / ९ पर्यंत पोहोचवला!

तिसर्‍या दिवशी सकाळी लिव्हसीने ब्राऊनच्या पावलावर पाऊल टाकत फटकेबाजीला सुरवात केली! हॉवेल - कॅलथॉर्प यांनी आकांती प्रयत्नं करुनही लिव्हसी आणि बॉयेस आऊट होत नव्हते! अखेर हॉवेलच्या ५३ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बॉयेस (२९) बोल्ड झाल्यावर वॉरीकशायरच्या खेळाडूंनी सुटकेचा नि:श्वास टाकला!

वॉल्टर लिव्हसी ११० रन्स फटकावून नॉटआऊट राहीला!
हँपशायरने दुसर्‍या इनिंग्जमध्ये ५२१ रन्स फटकावत ३१३ रन्सचा लीड घेतला होता!
कॅप्टन टेनिसनचे शब्दं खरे झाले होते!

जॅक न्यूमनच्या बॉलवर मीडने बेट्सचा कॅच घेतल्यावर वॉरीकशायरला पहिला हादरा बसला. पण टायगर स्मिथ आणि कॅप्टन कॅलथॉर्पने कोणतीही रिस्क न घेता वॉरीकशायरचा स्कोर ७७ पर्यंत नेला. हे दोघं सहजपणे बॅटींग करत असल्याने
मॅच ड्रॉ होण्याची चिन्हं दिसत होती. पण केनेडीच्या बॉलवर शर्लीने स्मिथचा (४०) कॅच घेत ही पार्टनरशीप संपुष्टात आणली.

.... आणि न्यूमन उधळला!

तीन ओव्हरमध्ये कॅलथॉर्प, सॅन्टाल, मिक वॅडी, जॅक स्मार्ट या चौघांच्याही दांड्या उडवत त्याने वॉरीकशायरची ७७ / २ वरुन ८९ / ६ अशी घसरगुंडी उडवून दिली! बिली क्वेफ आणि सिरील स्मार्टने वॉरीकशायरचा स्कोर ११३ पर्यंत नेल्यावर बॉयेसने स्वतःच्याच बॉलवर स्मार्टचा कॅच घेतला. बर्नाड क्वेफही स्मार्टप्रमाणेच केनेडीच्या बॉलवर कॉट अ‍ॅन्ड बोल्ड झाला! पाठोपाठ केनेडीने फॉक्सचा लेग स्टंप उडवला! हॅरी हॉवेलने केनेडीला लागोपाठ २ बाऊंड्री फटकावल्यावर केनेडीनेच न्यूमनच्या बॉलवर त्याचा कॅच घेतला.

वॉरीकशायरची दुसरी इनिंग्ज १५८ रन्सवर आटपली!
हँपशायरने १५५ रन्सनी मॅच जिंकली!
पहिल्या इनिंग्जमध्ये १५ रन्समध्ये ऑलआऊट झाल्यावर आणि फॉलोऑनची आपती ओढवल्यावर!

टेनिसनने कॅलथॉर्पकडून पैजेचे १० पौंड वसूल केले हे सांगायला नकोच!
मॅच जिंकल्यावर शँपेनची बाटली फोडताना तो मिस्कीलपणे म्हणाला,

“I’d love to meet the chap who sent me the postcard!”

कथालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

28 Dec 2016 - 11:02 am | आनन्दा

मस्तच

प्रसन्न३००१'s picture

28 Dec 2016 - 11:12 am | प्रसन्न३००१

फारच अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक लिहीलंयत. फक्त एकच दुरुस्ती सुचवावीशी वाटते

जर फॉलोऑन देणारा संघ ऑस्ट्रेलिया नसेल तर!

या ऐवजी जर फॉलोऑन देणारा संघ ऑस्ट्रेलिया असेल तर!, असं हवं होतं

तुषार काळभोर's picture

28 Dec 2016 - 11:30 am | तुषार काळभोर

फॉलोऑन देणं शक्य असताना आणि विशेषतः फॉलोऑन दिल्यावर फॉलोऑन देणार्‍या संघानेच मॅच जिंकल्याचं सामान्यतः आढळून येतं...

...जर फॉलोऑन देणारा संघ ऑस्ट्रेलिया नसेल तर!

फॉलोऑन देणारा संघ ऑस्ट्रेलिया नसेल, तर सामान्यतः फॉलोऑन देणार्‍या संघानेच मॅच जिंकल्याचं आढळून येतं!

प्रसाद भागवत's picture

28 Dec 2016 - 11:15 am | प्रसाद भागवत

1971च्या सुप्रसिद्ध वेस्टईंडिज दौर्यातील किंगस्ट्न येथील कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाला. सामना पाच दिवसाऐवजी चार दिवसांचा झाल्याने फॉलोऑन देण्यासाठी २०० नव्हे तर १५० घावा पुरेशा आहेत ही गोष्ट वेस्टईंडिजचा कप्तान सोबर्स विसरला आणि त्याने फॉलोऑन ची न्युज द्यायला गेलेल्या भारतीय कप्तान वाडेकरलाच वेड्यात काढले..असा काहीसा किस्सा मी ऐकला आहे

mayu4u's picture

28 Dec 2016 - 12:38 pm | mayu4u

"गॅरी, यू मे फॉलो ऑन!"

"आर यू क्रेझी?"

"यू कॅन चेक विथ थे अम्प!"

तुषार काळभोर's picture

28 Dec 2016 - 11:35 am | तुषार काळभोर

पहिल्या दोन मॅचेस रेकॉर्डपुरत्या ऐकून माहिती होत्या. तिसरी तर अजून 'काल घडल्यासारखी' डोळ्यांपुढे आहे!
चौथी तर एकदम भन्नाट! (अवांतरः बाकी टेनिसन फोटोत तर एकदम तुम्ही केलेल्या वर्णनाप्रमाणाचे रगेल व रंगेल वाटतो)

पुन्हा एकदा स्पार्टाकस यांच्या प्रभावी लेखणातून खेळाचा आनंद लुटता आला.. धन्यवाद!!

नरेश माने's picture

28 Dec 2016 - 12:25 pm | नरेश माने

मस्त माहितीपुर्ण लेख!

रोचक माहितीने खच्चून भरलेला लेख..
अतिशय आवडला..

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2016 - 2:32 pm | श्रीगुरुजी

पुन्हा एकदा जबरदस्त लेख!

१९८१ मधील इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया ही ६ कसोटी सामन्यांची मालिका बॉथमची मालिका म्हणून ओळखली जाते. परंतु या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा रॉडनी हॉग व टेरी आल्डरमन या द्रुतगती गोलंदाजांनी मालिकेत अनुक्रमे ३६ व ४० बळी घेऊन जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु त्यांची ही कामगिरी मालिका जिंकण्यास अजिबात पुरेशी पडली नाही.

२००१ च्या कलकत्त्यातील भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यातील एक आठवण. चौथ्या दिवशी ऑसीज द्रविड व लक्ष्मणला बाद करण्याचा आटापिटा करीत होते. एकदा द्रविड फलंदाजी करीत असताना त्याचा एक झेल मिडविकेटच्या दिशेने गेला. तिथे क्षेत्ररक्षण करीत असलेल्या मायकेल स्लॅटरने जमिनीलगत झेल पकडला. त्याने झेल पकडल्यावर ऑस्ट्रेलियन्सनी जोरदार आनंद व्यक्त करायला सुरूवात केली. परंतु त्याने नीट झेल पकडला आहे का नाही याविषयी पंचांना खात्री नव्हती कारण झेल अगदी जमिनीलगत घेतला होता. त्यामुळे पंचांनी द्रविडला थेट बाद देण्याऐवजी तृतीय पंचांकडे विचारणा केली.

द्रविडला अजून बाद दिले नाही हे पाहून स्लॅटर प्रचंड भडकला. तो तावातावाने द्रविडपाशी गेला व त्याला रागारागाने काहीतरी सांगू लागला. अत्यंत त्वेषाने उजव्या हाताची मूठ व कधी तर्जनी डाव्या तळहातावर आपटत तो अतिशय संतापाने द्रविडला काहीतरी सांगत होता. तो काय बोलत होता ते माईक नसल्याने ऐकू येत नव्हते. परंतु तो अतिशय संतप्त अवस्थेत द्रविडशी भांडत आहे हे स्पष्ट दिसत होते. बाद होऊन सुद्धा इथे कशाला थांबला आहेस? सरळ पॅव्हेलियनचा रस्ता का धरत नाहीस? कशाला खोटा खेळ करतोस? अशा अर्थाचे तो काहीतरी मोठमोठ्याने सांगत असावा. त्याचा चेहरा अतिशय संतप्त दिसत होता. सुरवातीला एकदिड मिनिटे द्रविड काही न बोलता त्याची संतप्त बडबड ऐकून घेत होता. द्रविड हा सुरवातीपासून अतिशय सभ्य असल्याने स्लॅटरशी भांडण करण्यापेक्षा तृतीय पंचाच्या निर्णयाची वाट पहावी असे त्याने ठरविले असावे. द्रविड कर्नाटकचा होता. कर्नाटक संघामध्ये चंद्रशेखर, विश्वनाथ, कुंबळे, प्रसन्ना, द्रविड अशा सभ्य व प्रगल्भ खेळाडूंची परंपरा आहे.

एकदिड मिनिटे स्लॅटरचे संतप्त वाक्ताडन शांतपणे ऐकल्यावर शेवटी द्रविडचा संयम संपला. त्याने रागारागाने प्रत्त्युत्तर देण्यास सुरूवात केली. दोघांचेही चेहरे संतापाने फुलले होते व दोघेही एकमेकांना सुनावत होते. दरम्यान तृतीय पंचांनी रिप्लेमध्ये अनेक कोनातून झेलाचे प्रक्षेपण पाहिले. स्लॅटरने जमिनीलगत झेल हातात घेण्यापूर्वी चेंडूचा जमिनीला स्पर्श झाल्याचे रिप्लेत अगदी स्पष्ट दिसत होते. त्यामुळे पंचांनी द्रविडला नाबाद ठरविले. हा निर्णय ऐकल्यावर स्लॅटर अजून भडकला व अजून जोरात बडबड करायला लागला. शेवटी दोन्ही पंच व पाँटिंगला मध्ये येऊन वाद थांबवावा लागला. स्लॅटर शेवटी आपल्या जागेवर परत गेला तरीसुद्धा तो बराच वेळ धुमसतच होता. द्रविडच्या त्याच्या कारकिर्दीत इतका संतापून वाद घालताना अगदी क्वचितच दिसला.

फेरफटका's picture

28 Dec 2016 - 8:54 pm | फेरफटका

ही आठवण बरोबर आहे, पण ती त्या प्रसिद्ध कोलकता टेस्ट मधली नाहीये. हे मुंबई मधे पहिल्या टेस्ट मधे घडलं होतं. स्लेटर ने नंतर अधिकृत माफी मागून (ऑस्ट्रेलियन पद्धतीनं - म्हणजे चुकलं काहीच नाहीय, पण सॉरी म्हणतोय) त्यावर पडदा पाडला होता.

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2016 - 8:57 pm | श्रीगुरुजी

ओह! दुरूस्तीबद्दल धन्यवाद.

फेरफटका's picture

28 Dec 2016 - 8:54 pm | फेरफटका

ही आठवण बरोबर आहे, पण ती त्या प्रसिद्ध कोलकता टेस्ट मधली नाहीये. हे मुंबई मधे पहिल्या टेस्ट मधे घडलं होतं. स्लेटर ने नंतर अधिकृत माफी मागून (ऑस्ट्रेलियन पद्धतीनं - म्हणजे चुकलं काहीच नाहीय, पण सॉरी म्हणतोय) त्यावर पडदा पाडला होता.

अशी मी जोरदार शिफारस करतो. सर्वांनी या निर्णयावर follow on, I mean follow up करावा!

पैसा's picture

28 Dec 2016 - 10:10 pm | पैसा

झकास लेख

चावटमेला's picture

29 Dec 2016 - 12:47 am | चावटमेला

फॉलोऑन न दिल्यामुळे अंगाशी आलेली अजून एक मॅच म्हणजे नुकतीच झालेली ऑस्ट्रेलिया पाकिस्तान टेस्ट..