It's a Tie !!

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
26 Dec 2016 - 12:31 pm

१९६० सालचा डिसेंबर महिना...

फ्रँक वॉरेलचा वेस्ट इंडी़जचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आला होता. फ्रँक वॉरेल हा वेस्ट इंडीजचा पहिला कृष्णवर्णीय कॅप्टन! गोर्‍या ब्रिटीशांचा पगडा असलेल्या वेस्ट इंडी़जचे पूर्वीचे सर्व कॅप्टन्स गोरे होते. वॉरेलच्या संघात वेस्ट इंडीजचा शेवटचा गौरवर्णीय कॅप्टन आणि विकेटकीपर जेरी अलेक्झांडरचाही समावेश होता! अलेक्झांडर व्यतिरिक्त कॉनरेड हंट, सेमूर नर्स, रोहन कन्हाय, जो सॉलोमन आणि गारफिल्ड सोबर्स असे एकापेक्षा एक बॅट्समन वॉरेलच्या संघात होते. आल्फ व्हॅलेंटाईन, सनी रामाधीन, पोरसवदा लान्स गिब्ज असे हरहुन्नरी स्पिनर्स होते, चेस्टर वॉटसन, टॉम ड्वेड्नी असे फास्ट बॉलर्स होते पण ऑस्ट्रेलियनांना धडकी भरवणारा बॉलर म्हणजे वेस हॉल!

रिची बेनॉचा ऑस्ट्रेलियन संघही वेस्ट इंडी़जच्या तोडीसतोड होता. बेनॉच्या संघात कॉलिन मॅक्डोनाल्ड, बॉब सिंप्सन, नील हार्वे, नॉर्मन ओ'निल, केन मॅकाय असे बॅट्समन होते, लिंड्से क्लाईन, इयन मॅक्कीफ (चकिंगच्या आरोपामुळे अकाली करीअर संपुष्टात आलेला पहिला बॉलर), जॉनी मार्टीन, फ्रँक मिसन असे बॉलर्स होते, खुद्दं रिची बेनॉसारखा हरहुन्नरी ऑलराऊंडर होता परंतु बॉलिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा खरा आधारस्तंभ होता तो म्हणजे अ‍ॅलन डेव्हीडसन!

त्या काळातल्या ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट मॅचेसचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये ८ बॉल असत! इंग्लंडमध्येही हा प्रयोग १९३९ मध्ये करण्यात आला होता, परंतु दुसर्‍या महायुद्धाने क्रिकेटला खो बसला आणि १९४५ मध्ये महायुद्धानंतर क्रिकेट सुरु झाल्यावर पुन्हा ६ बॉलची ओव्हर करण्यात आली. ऑस्ट्रेलियात मात्रं १९३६ पासून पार १९७९ पर्यंत ओव्हर ८ बॉल्सची असे!

पहिली टेस्ट रंगणार होती ब्रिस्बेनच्या मैदानात!

फ्रँक वॉरेलने टॉस जिंकल्यावर बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅलन डेव्हीडसनने कॅमी स्मिथ, कॉनरेड हंट आणि रोहन कन्हाय यांना गुंडाळल्यावर वेस्ट इंडी़जची अवस्था ६५ / ३ अशी झाली परंतु गॅरी सोबर्सला त्याची पर्वा नव्हती! क्लाईन, मॅक्कीफ, बेनॉ, मॅकाय आणि खुद्दं डेव्हीडसन यांची धुलाई करत त्याने फ्रँक वॉरेलसह १७४ रन्सची पार्टनरशीप केली! त्यातल्या १०९ रन्स एकट्या सोबर्सच्या होत्या! १३२ रन्स झोडपल्यावर अखेर मॅक्कीफच्या बॉलवर क्लाईनने त्याचा कॅच घेतला.

पुढे बर्‍याच वर्षांनी या मॅचबद्दल बोलताना क्लाईन सोबर्सला म्हणाला,
"That wonderful innings you played, that 130 was fantastic!"

"Lindsey, it was 132!" सोबर्स शांतपणे उत्तरला!

टेस्ट्मध्ये २६ सेंचुरी ठोकणार्‍या सोबर्सच्याही स्मृतीवर कोरली गेलेली ती इनिंग्ज होती!

सोबर्स आणि पाठोपाठ वॉरेल (६५) आऊट झाल्यावरही जो सॉलोमन (६५), अलेक्झांडर (६०) आणि अनपेक्षीतपणे फटकेबाजी करणारा हॉल (५०) यांनी वेस्ट इंडीजचा स्कोर ४५३ पर्यंत पोहोचवला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंग्जमध्ये मॅक्डॉनाल्ड (५७) आणि सिंप्सन (९२) यांनी ८४ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप रचली परंतु दोघांनाही सेंच्युरी गाठता आली नाही. नील हार्वे (१५) लवकर आऊट झाला परंतु नॉर्मन ओ'निलने वेस्ट इंडीजच्या बॉलर्सना धारेवर धरत १८१ रन्स फटकावल्या! फॅवेल (४५), मॅकाय (३५) आणि डेव्हीडसन (४४) यांच्याबरोबर महत्वपूर्ण पार्टनरशीप्स करत त्याने ऑस्ट्रेलियाला ५२ रन्सचा लीड मिळवून दिला! हंट (३९), कन्हाय (५४), वॉरेल (६५) आणि सॉलोमन (४७) यांच्यामुळे वेस्ट इंडीजने दुसर्‍या इनिंग्जमध्ये २८४ पर्यंत मजल मारली. दोन्ही इनिंग्जमध्ये मिळून अ‍ॅलन डेव्हीडसनने ११ विकेट्स उडवल्या होत्या! पाचव्या दिवशी वेस्ट इंडीजची इनिंग्ज संपली तेव्हा ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकण्यासाठी चौथ्या इनिंग्जमध्ये २३३ रन्सची आवश्यकता होती.

पाचव्या दिवशी मैदानात आल्यावर बाऊंड्रीजवळचं गवत वाढल्याचं रिची बॅनोच्या चाणाक्षं नजरेने टिपलं होतं. त्याने ग्राऊंडसमन आणि क्युरेटरची गाठ घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावर सकाळी सातच्या सुमाराला पावसाची जोरदार सर येऊन गेल्याने गवत कापण्याचं मशीन आणण्यास वेळ न मिळाल्याचा ग्राऊंड्समनने खुलासा केला! बेनॉने त्याला गवत कापण्याची सूचना केली परंतु मॅच चालू होण्यास जेमतेम तासभर उरल्याने आता गवत कापणं शक्यं नाही असं ग्राऊंड्समनने स्पष्टं केलं! दोन-अडीचशेच्या दरम्यानच रन्सची आवश्यकता असल्याने फारसा फरक पडणार नाही असं त्याचं मत होतं!

या दरम्यान हॉलच्या बाबतीत एक निराळीच भानगड उद्भवली होती. हॉलच्या एका बूटाचा सोल पूर्णपणे फाटल्यामुळे त्याने नवीन बूट वापरण्यास सुरवात केली होती. या बुटांमुळे त्याच्या तळपायाला फोड आले होते! साधं चालतानाही त्याच्या पायाला वेदनेचा ठणका जाणवत होता! ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये बॉलिंगला सुरवात करण्यापूर्वी हॉलने ड्रेसिंगरुममध्ये स्वतःच हे फोड चक्कं फोडून टाकले! हे फोड इतके मोठे होते की त्याच्या पायाचं मांस त्यातून दिसत होतं! तळपायाखाली बुटाच्या सोलमध्ये चिकटपट्टीच जाडसर थर भरुन तो मैदानात उतरला होता! प्रत्येक पावलागणिक त्याला वेदना होत असणार, पण हॉलला त्याची यत्किंचितही पर्वा नव्हती! तो म्हणतो,

"I was fresh! Marvelously fresh! I hurtled into the attack with vigour which even I found a little amazing. I seemed to be propelled by a jet during that early onslaught!"

सिंप्सन आणि हार्वे यांना गुंडाळत हॉलने ऑस्ट्रेलियाची अवस्था ७ / २ अशी करुन टाकली. मॅक्डॉनाल्ड - ओ'निल यांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोर ४९ पर्यंत नेल्यावर आतापर्यंत आरामात खेळणार्‍या ओ'निलचा हॉलच्या बॉलवर अलेक्झांडरने कॅच घेतला. पाठोपाठ वॉरेलने मॅक्डॉनाल्डचा ऑफ स्टंप उडवला! हॉलच्या बॉलवर जो सॉलोमनने फॅवेलचा कॅच घेतल्यावर ऑस्ट्रेलियाची अवस्था ५७ / ५ अशी झाली! मॅकाय आणि डेव्हीड्सन यांनी ३५ रन्सची पार्टनरशीप केल्यावर रामाधीनने मॅकयची दांडी उडवली! ऑस्ट्रेलिया ९२ / ६!

डेव्हीड्सन आणि बेनॉ यांनी सावधपणे बॅटींग करत टी-टाईम पर्यंत ऑस्ट्रेलियाला ११९ पर्यंत पोहोचवलं. मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या दोन तासांत ऑस्ट्रेलियाला १२४ रन्सची आवश्यकता होती. ड्रेसिंगरुममध्ये बेनॉची गाठ पडली ती डॉन ब्रॅडमनशी!

"What is it going to be?" ब्रॅडमनने विचारलं
"We are going for the win!" बेनॉ उत्तरला!
"I am very pleased to hear it." ब्रॅडमन इतकंच म्हणाला आणि ड्रेसिंगरुममधून बाहेर पडला!

टी-टाईम नंतर मैदानात उतरल्यावर डेव्हीडसन आणि बेनॉ यांनी सगळे रुढ संकेत खुंटीवर टांगले आणि वन डे प्रमाणे गॅप्समध्ये बॉल ढकलून रन्स चोरण्यास सुरवात केली! मधूनच एखादी बाऊंड्री तडकावत आणि अनेकदा रिस्क घेत रन्स काढत दोघांनी वेस्ट इंडीजच्या फिल्डर्सची झोप उडवली! याचा व्हायचा तो परिणाम झालाच! हॉलसकट इतका वेळ अचूक बॉलिंग करणार्‍या बॉलर्सची लय बिघडलीच शिवाय अनेकदा मिसफिल्डींग आणि ओव्हरथ्रोचाही ऑस्ट्रेलियाला फायदा मिळाला! १३४ रन्सची पार्टनरशीप करत डेव्हीडसन - बेनॉ यांनी मॅच ऑस्ट्रेलियाच्या आवाक्यात आणली होती! ऑस्ट्रेलिया २२६ / ६!

जेरी अलेक्झांडर म्हणतो,
"We were nervous. The match more or less appeared to have slipped out of our control."

ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरुममध्ये अत्यंत तणावाचं वातावरण होतं. सर्वात जास्तं टेन्शन आलं होतं ते पुढचा बॅट्समन असलेल्या विकेटकीपर वॉली ग्राऊटला! तो एकामागोमाग एक सिगारेट्स ओढत होता!

टेस्ट जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ ७ रन्सची आवश्यकता होती!
अद्याप दोन ओव्हर्स बाकी होत्या!

डेव्हीडसनच्या डोक्यात एक वेगळीच योजना होती. त्याला हॉलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक हवा होता! फ्रँक वॉरेलने हॉलला बंपर न टाकण्याची सूचना दिलेली असूनही तो आपल्याला बंपर टाकणार याची डेव्हीड्सनला पक्की खात्री होती! हॉलने बंपर टाकला की आपण सिक्स किंवा किमान बाऊंड्री मारु शकतो असं त्याचं साधं गणित होतं!

"We don't have to do anything silly. Just make sure I am down there to face Wes." डेव्हीड्सन बेनॉला म्हणाला.

सोबर्सच्या ओव्हरमधले पहिल्या चार बॉलवर बेनॉला एकही रन काढता आली नाही. पाचवा बॉल त्याने स्क्वेअरलेगला खेळला आणि एक रन काढण्यासाठी धाव घेतली. डेव्हीड्सन एव्हाना काहीसा दमला असावा. बेनॉच्या एक रनच्या कॉलला त्याने प्रतिसाद दिला खरा, परंतु...

२५ यार्डांवरुन जो सॉलोमनचा थ्रो अचूक स्टंप्सवर बसला होता!
८ बाऊंड्री ठोकत ८० रन्स फटकावणारा डेव्हीड्सन रन आऊट झाला!

पुढे कित्येक वर्षांनी बोलताना डेव्हीड्सन म्हणाला,
"If I'd have been Usain Bolt, I wouldn't have made my ground!"

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासा तएकाच टेस्टमध्ये १०० पेक्षा जास्तं रन्स आणि १० विकेट्स काढणारा डेव्हीड्सन पहिलाच खेळाडू होता!

वॉली ग्राऊट बॅटींगला आला खरा, पण आपले हँडग्लोव्ह्ज कुठे आहेत हेच त्याला आठवेना इतका तो नर्व्हस झाला होता! अखेर शोधाशोध केल्यावर ते आपल्या पॅडमध्ये घरंगळल्याचं त्याच्या ध्यानात आलं! भानावर आल्यावर सोबर्सच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याने एक रन काढली!

शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी ८ बॉलमध्ये ६ रन्स हव्या होत्या!

हॉलचा पहिलाच बॉल ग्राऊटच्या बॅटची कड घेत त्याच्या बरगड्यांवर आदळला आणि त्याच्या पावलांशी पडला! ग्राऊटने एका हाताने छाती आवळली आणि समोर नजर टाकली. बेनॉ तुफान वेगाने त्याच्या दिशेने धावत सुटला होता. स्वतःला कसंबसं सावरत ग्राऊटने नॉन-स्ट्रायकर एंड गाठण्यात यश मिळवलं!

डेव्हीड्सनच्या अंदाजाप्रमाणे हॉलने टाकलेला दुसरा बॉल बंपर होता!

वास्तविक बंपरला हूक मारणं ही नैसर्गिक प्रतिक्रीया असलेल्या बेनॉसारख्या बॅट्सनला तो व्यवस्थित सेट झालेला असताना बंपर टाकणं म्हणजे खरंतर आत्महत्या होती, परंतु हॉलला हे कोण सांगणार? तुफान वेगात आलेला हॉलचा बंपर पाहताच बेनॉने हूक मारण्याचा प्रयत्नं केला, परंतु त्याच्या ग्लोव्ह्जना लागून अलेक्झांडरच्या हाती कॅच गेला! बेनॉच्या ५२ रन्समध्ये ६ बाऊंड्रीचा समावेश होता! ऑस्ट्रेलिया २२८ / ८!

"All yours Wal.." ड्रेसिंगरुमकडे परतताना बेनॉ ग्राऊटला म्हणाला!
"Thanks very much!" ग्राऊट उत्तरला.

इयन मॅक्कीफने हॉलचा तिसरा बॉल खेळून काढला. पुढचा बॉल मारण्याचा त्याचा प्रयत्नं साफ फसला आणि तो विकेटकीपर अलेक्झांडरच्या हाती गेला, पण हॉलच्या हातून बॉल सुटल्याबरोबर ग्राऊट धावत सुटला होता! मॅक्कीफने नॉन स्ट्रायकर एंडकडे धूम ठोकली! फ्रँक वॉरेलने त्या परिस्थितीतही डोकं शांत ठेवून ओव्हरथ्रो जाण्यापासून रोखला!

शेवटच्या ४ बॉलमध्ये ४ रन्स उरल्या होत्या!

कॅप्टन वॉरेलची सूचना धाब्यावर बसवत हॉलने पुन्हा एकदा बंपर टाकला! ग्राऊटचा हूक मारण्याचा प्रयत्नं पार फसला आणि टॉप एज लागून बॉल स्क्वेअरलेगच्या दिशेने उडाला. विकेटकीपर अलेक्झांडर आणि त्यापेक्षाही स्क्वेअरलेगला असलेल्या रोहन कन्हायच्या हातात आरामात हा कॅच गेला असता, पण हॉलला बहुतेक या दोघांवरही विश्वास नसावा! आपल्या फॉलो थ्रूची दिशा बदलून तो कॅच घेण्यासाठी स्क्वेअरलेगच्या दिशेला धावला! परिणाम?

रोहन कन्हायच्या डोक्यावर हॉलचा हात आपटला! कॅच तर सुटलाच, वर ऑस्ट्रेलियाला एक रन मिळाली!

"The good Lord's gone and left us!" स्क्वेअरलेग अंपायर कोल हॉयकडे पाहत हॉल उद्गारला!

"How Wes ever got there I will never know!" फ्रँक वॉरेल म्हणाला!

दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरुममध्ये शेवटचा बॅट्समन असलेल्या लिंड्से क्लाईनची एकच धावपळ उडाली होती. बेनॉ आणि डेव्हीड्सन खेळत असताना आरामात असलेल्या क्लाईनने पॅड्स बांधले, पण ग्राऊटप्रमाणेच आपले हँडग्लोव्ह्ज त्याला सापडत नव्हते! बरीच शोधाशोध केल्यावर ग्लोव्ह्ज आपल्या बुडाखाली असल्याचं त्याच्या ध्यानात आलं!

हॉलचा पुढचा बॉल मॅक्कीफने लेगला फटकावला आणि तो धावत सुटला. बेनॉच्या मते ग्राऊंड्समनने गवत कापलं असतं तर हा शॉट निश्चितच बाऊंड्रीपार गेला असता, परंतु वाढलेल्या गवतामुळे तो बाऊंड्रीपासून चार यार्डांवरच गवतात अडकला! दरम्यान मॅक्कीफ - ग्राऊट यांनी दोन रन्स काढल्या होत्या. विजयासाठी आवश्यक असलेली तिसरी रन काढण्यासाठी दोघं धावत सुटले परंतु...

कॉनरेड हंटचा ८० यार्डांवरुन तुफान वेगात आलेला वेगात आलेला थ्रो अलेक्झांडरच्या ग्लोव्ह्जमध्ये पोहोचला होता!
ग्राऊट क्रीजपासून फूटभर अंतरावर असताना अलेक्झांडरने बेल्स उडवल्या!

बेनॉ म्हणतो,
"Hunt was about eighty yards from the stumps when he picked up, turned and threw in one motion. All I could see was blurred throwing action to my right and batsmen running for three. For Grout to be run out the ball had to go directly to Alexander. Not to the right or left but directly to him.. thrown on the turn from eighty yards. It was a magnificent throw and as Alexander swept away the bails, Grout was hurtling himself to the crease.. still a foot short!"

ऑस्ट्रेलिया २३२ / ९!
दोन्ही संघांचा स्कोर समसमान झाला होता!
मॅच जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला २ बॉलमध्ये १ रन हवी होती!

लिंड्से क्लाईन खेळायला आला तेव्हा तो कमालीचा नर्व्ह्स होता. वॉरेल त्याला म्हणाला,
"I wouldn't be in your shoes for all tea in China!"

वॉरेलने आपल्या सहकार्‍यांना दक्षं राहण्याची सूचना केली. सर्वजण आपापल्या जागी परतल्यावर तो हॉलला म्हणाला,
"Whatever you do Wes, don't bowl a no-ball! They will never let you back in Barbados!"

हॉलच्या ओव्हरचा सातवा बॉल..

लेफ्ट हँडर क्लाईनने बॉल स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळला आणि तो आणि मॅक्कीफ धावत सुटले!
स्क्वेअरलेगवर फिल्डींग करणारा पीटर लॅशी बॉल पिकअप् करण्यासाठी जात असतानाच..
"Move.. Move.. Move!" लॅशीच्या कानी जो सॉलोमनचा आवाज आला!

वास्तविक क्लाईनने खेळलेला बॉल लॅशीच्या उजव्या हाताला होता तर सॉलोमनच्या डाव्या हाताला. त्या दृष्टीने विचार केल्यास लॅशीला बॉल थ्रो करणं सोपं जाणार होतं. सॉलोमनने डाव्या हाताने बॉल पिकअप् करुन उजव्या हाताने थ्रो करण्यात किंचीत जास्तं वेळ लागणार होता. क्षणभराचा हा उशीरही ऑस्ट्रेलियाला शेवटची रन काढण्यासाठी हातभार लावणारा ठरला असता! परंतु जो सॉलोमनने काही वेळापूर्वीच डेव्हीडसनला रनआऊट केलं होतं. अशा परिस्थितीत त्याच्या मार्गातून बाजूला होणंच शहाणपणाचं ठरणार होतं! लॅशीने नेमकं तेच केलं!

जो सॉलोमनने बॉल पिकअप् केला आणि क्षणार्धात समोर दिसत असलेल्या एकमेव स्टंपचा अचूक वेध घेतला!
इयन मॅक्कीफ रन आऊट झाला होता!

Tie01

लॅशी म्हणतो,
"I was likely person to pickup the ball, but he had just knocked down the stumps to run out Davidson. I heard him shouting 'Move move move', so I stopped which was unusual for me. He swooped and pick the ball up and hit the stumps again! If I had picked the ball up, there would have been no tied test!"

मॅचचा निकाल नेमका काय लागला याबद्दल सर्वांचाच गोंधळ उडाला होता. मॅक्कीफच्या मते ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. अलेक्झांडरच्या मते वेस्ट इंडीजने मॅच जिंकली नव्हती, पण हरलीही नव्हती! वेस्ट इंडी़जच्या इतर काही खेळाडूंच्या मते ऑस्ट्रेलिया ऑल आऊट झाल्याने त्यांचा विजय झाला होता. या गोंधळात रेडीओवरुन वेस्ट इंडीजने १ रनने मॅच जिंकल्याचं जाहीर झाल्यामुळे आणखीनच भर पडली!

ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरुममध्ये अखेर ब्रॅडमनने याचा खुलासा केला.

"Don't be disappointed Alan." ब्रॅडमन म्हणाला, "Today you have made a history!"

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात टाय झालेली ही पहिलीवहिली टेस्ट असल्याचं तेव्हा कुठे सर्वांच्या ध्यानात आलं!

त्या दिवशी संध्याकाळी दोन्ही संघातील खेळाडूंची जोरदार पार्टी रंगली! बेनॉ पहिल्या इनिंग्जमध्ये १० रन्सवर आऊट झाला होता. वॉरेलशी गप्पा मारताना तो म्हणाला,

"What a good thing I got out on 10 instead of making 11!"

दोन वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आलेल्या हॉलची दक्षिण नॅरेन्गो इथल्या शेतकर्‍याशी गाठ पडली. मॅक्कीफ आऊट झाल्यावर मैदानात धाव घेतलेल्या शेकडो प्रेक्षकांपैकी तो एक होता. हॉलने टाकलेला शेवटचा बॉल त्याने आठवण म्हणून हस्तगत केला होता! या बॉलवर त्याला हॉलची सही हवी होती!

क्रिकेटच्या इतिहासातल्या या पहिल्यावहिल्या 'टाय' ला चाळीस वर्ष झाल्यावर झालेल्या पार्टीत गप्पा मारताना हॉल ग्राऊटला रनआऊट करणार्‍या हंटच्या थ्रोची आणि मॅक्कीफच्या शॉटची तारीफ करताना म्हणाला,

"When I looked at it again, I was surprised how good a shot it was!"

मॅक्कीफ म्हणतो,
"I didn't tell him what I felt. It was just shut the eyes and slog!"

टेस्ट क्रिकेटमधल्या या पहिल्या टाय नंतर २६ वर्षांनी...

१९८६ मध्ये अ‍ॅलन बोर्डरचा ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौर्‍यावर आला होता. ग्रेग चॅपल, डेनिस लिली, रॉडनी मार्श यांच्या निवृत्तीनंतरच्या काळात ऑस्ट्रेलियन संघ कठीण परिस्थितीतून जात होता. त्यातच किम ह्यूजच्या नेतृत्वात ग्रॅहॅम यालप, स्टीव्ह स्मिथ, जॉन डायसन, टेरी आल्डरमन, रॉडनी हॉग, कार्ल रॅकमन आणि मूळचा दक्षिण आफ्रीकन असलेला केपलर वेसल्स या प्रमुख ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वर्णद्वेषी दक्षिण आफ्रीकेचा दौरा करण्यास होकार दिल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावर बंदी घातली होती! त्यातच ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सनी न्यूझीलंडच्या दौर्‍यावर गेलेल्या वेन फिलीप्सला बाहेरचा रस्ता दाखवला होता!

बॉर्डरच्या अननुभवी संघात खुद्दं बॉर्डरचा अपवाद वगळता एकही अनुभवी बॅट्समन नव्हता. त्यातल्यात्यात २४ टेस्ट्स खेळलेला ग्रेग रिची हा एक आधार! रिची, डेव्हीड बून, जेफ मार्श, डीन जोन्स, माईक व्हॅलेटा आणि स्वतः बॉर्डर यांच्यावर ऑस्ट्रेलियन बॅटींगची मदार होती. ग्रेग मॅथ्यूज आणि स्टीव्ह वॉ हे दोघे ऑलराऊंडर होते. फास्ट बॉलर क्रेग मॅकडर्मॉट, ब्रूस रीड, डेव्ह गिल्बर्ट, स्पिनर रे ब्राईट यांचाही ऑस्ट्रेलियन संघात समावेश होता. वेन फिलीप्सच्या जागी टीम झोहररची विकेटकीपर म्हणून निवड करण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताचा संघ अनुभवी होता. गावस्करसारखा ओपनर भारतीय संघात होता. त्याच्या जोडीला मोहींदर अमरनाथ, दिलीप वेंगसरकर, अझरुद्दीन, श्रीकांत, शास्त्री असे बॅट्समन भारताकडे होते. कपिलसारखा ऑलराऊंडर आणि त्याच्या जोडीला चेतन शर्मा, शिवलाल यादव, मणिंदर सिंग, शिवरामकृष्णन आणि 'वेडा थॉमसन' म्हणून ओळखला जाणारा राजू कुलकर्णी असे बॉलर्स होते. चंद्रकांत पंडीतच्या जोडीला विकेटकीपर म्हणून किरण मोरेचाही संघात समावेश होता. इंग्लंडच्या दौर्‍यात टेस्टमध्ये २-० अशा विजयामुळे भारतीय संघ चांगलाच जोशात होता.

पहिली टेस्ट होती मद्रासला चेपॉकवर!

पहिल्या टेस्टपूर्वी भारताला एक धक्का बसला. दुखापतीमुळे दिलीप वेंगसरकर या मॅचमध्ये खेळण्यास असमर्थ ठरला होता! वेंगसरकरच्या ऐवजी चंद्रकांत पंडीतला निव्वळ बॅट्समन म्हणून तर किरण मोरेला विकेटकीपर म्हणून खेळवण्याचा भारताने निर्णय घेतला. मद्रासच्या असह्य उकाड्यात - जवळपास ४० डिगी तापमान आणि ८०% आर्द्रता - अ‍ॅलन बॉर्डरने टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला!

डेव्हीड बून आणि जेफ मार्श यांनी ४८ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर शिवलाल यादवच्या बॉलवर कपिलने मार्शचा कॅच घेतला. बून आणि डीन जोन्स यांनी भारतीय बॉलर्सना दाद न देता १५८ रन्सची पार्टनरशीप केली! साडेपाच तासात २१ बाऊंड्री ठोकत १२२ रन्स फटकावणार्‍या डेव्हीड बूनचा चेतन शर्माच्या बॉलवर कपिलने कॅच घेतल्यावर अखेर ही पार्टनरशीप संपुष्टात आली. डीन जोन्सच्या जोडीला नाईटवॉचमन रे ब्राईट नॉटआऊट होता.

ग्रेग मॅथ्यूज म्हणतो,
"Ray Bright nearly collapsed half way back to the pavilion. His toes were dragging on the ground as he walked off and I was thinking, this poor bloke has to go out there and bowl too!"

दुसर्‍या दिवशी जोन्स आणि ब्राईट दोघांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोर २८२ पर्यंत पोहोचवल्यावर यादवच्या बॉलवर शास्त्रीने ब्राईटचा कॅच घेतला. ब्राईट आऊट झाल्यावर जोन्सची जोडी जमली ती कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डरशी. जोन्स - बॉर्डर यांनी भारतीय बॉलर्सना धारेवर धरत १७८ रन्सची विक्रमी पार्टनरशीप केली! याच दरम्यान...

डीन जोन्स १८० रन्सवर खेळत होता. मद्रासच्या असह्य उकाड्याचा त्याला भयानक त्रास होत होता. त्याच्या हातापायात क्रॅम्प्स येत होते! डी-हायड्रेशनमुळे त्याची भयानक अवस्था झाली होती. अर्ध्या तासापासून दर दोन-तीन ओव्हर्सनंतर त्याला उलट्या होत होत्या! अखेर वैतागून त्याने बॉर्डरकडे रिटायर हर्ट होऊन बाहेर जाण्याची परवानगी मागितली. बॉर्डरने काय करावं?

"You weak Victorian! I need someone tough out here! May be a queenslander!"

बॅटींगला येणारा पुढचा बॅट्समन होता ग्रेग रिची. क्वीन्सलँडच्या रिचीचा मुद्दाम उल्लेख करुन बॉर्डरने जोन्सला डिवचलं होतं!
अंतर्बाह्य व्हिक्टोरीयन असलेल्या जोन्सच्या नाकाला मिरच्या झोंबल्या नसत्या तरच नवल!
एखादा क्वीन्सलँडर व्हिक्टोरीयनपेक्षा जास्तं सक्षम असल्याचं जोन्सला कधीच मान्यं होणार नव्हतं.
पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा विचार सोडून जोन्स भारतीय बॉलिंगवर तुटून पडला!
शास्त्रीचा बॉल मिडविकेट वरुन फटकावत जोन्सने डबलसेंच्युरी पूर्ण केली!

टी-टाईमला जोन्स पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा त्याने २०२ रन्स फटकावल्या होत्या! त्यातल्या दुसर्‍या १०० रन्स त्याने केवळ ६६ बॉल्समध्ये झोडपून काढल्या होत्या!

जोन्स म्हणतो,
"My last 100 runs I got in 66 balls because I could not run at all! I told myself 'block, block and I'm going to slog this one for four'. Then I'd block until I have energy to have another go!"

ऑस्ट्रेलियाचा कोच बॉब सिंप्सन म्हणतो,
"I have never seen a brave innings than Dino/s innings in Madras. During break we would have designated players to take off his gloves, pads, boots, shirt, pants. We would also have an ice bath waiting for him. His eyes would nearly pop out, but after every break he went back in and continued!"

अखेर टी-टाईमनंतर शिवलाल यादवने जोन्सची दांडी उडवल्यावर त्याची इनिंग्ज संपुष्टात आली!

तबल साडेआठ तास - ५०२ मिनीटं मद्रासच्या उकाड्याला तोंड देत २७ बाऊंड्री आणि दोन सिक्स ठोकत जोन्सने २१० रन्स फटकावल्या!

जोन्स ड्रेसिंगरुममध्ये परतल्यावर सिम्प्सनने पुन्हा त्याची रवानगी आईसबाथमध्ये केली. सुमारे अर्ध्या तासाने आईसबाथमध्ये असेपर्यंत तो व्यवस्थित वाटत होत. पण आईसबाथमधून बाहेर पडताच काही क्षणांतच तो बेशुद्ध होऊन कोसळला! सिम्प्सनने जोन्सची ताबडतोब मद्रासच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये रवानगी केली. हॉस्पिटलमध्ये रात्रभरात जोन्सला एकापाठोपाठ एक सात बाटल्या सलाईन चढवण्यात आलं! दिवसभरात त्याचं सात किलो वजन कमी झालं होतं!

बून, जोन्स यांच्यापाठोपाठ बॉर्डरनेही भारतीय बॉलर्सची धुलाई करत सेंच्युरी ठोकली. १०६ रन्स फटकावल्यावर शास्त्रीच्या बॉलवर गावस्करने त्याचा कॅच घेतला. ड्रेसिंगरुममध्ये परत येईपर्यंत त्याला जोन्सची काय अवस्था आहे याची अजिबात कल्पना नव्हती. जोन्सला हॉस्पीटलमध्ये नेल्याचं कळल्यावर तो हादरलाच!"

"I expected few expletives directed to me when I suggested to get a tough queenslander, but when I came back to dressing room and Simmo told me Dino being taken to hospital, I thought 'Fuck! I had killed the young man!"

तिसर्‍या दिवशी सकाळी ५७४ / ७ वर बॉर्डरने ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज डिक्लेअर केली!

भारताच्या पहिल्या इनिंग्जमध्ये श्रीकांतने नेहमीप्रमाणे आक्रमक पवित्रा घेत मॅकडरमॉट - रीड यांची धुलाई करण्यास सुरवात केली. गावस्करबरोबर त्याने पहिल्या विकेटसाठी ६२ रन्सची पार्टनरशीप केली त्यात गावस्करच्या रन्स होत्या फक्तं ८! ग्रेग मॅथ्यूजने स्वतःच्याच बॉलिंगवर गावस्करचा कॅच घेतल्यावर ही जोडी फुटली. पाठोपाठ मोहींदर अमरनाथ रन आऊट झाला! हे कमी होतं म्हणून की काय मॅथ्यूजला फटकावण्याच्या नादात रिचीने श्रीकांतचा कॅच घेतला! भारत ६५ / ३!

अझरुद्दीन आणि शास्त्री यांनी ७७ रन्सची पार्टनरशीप करुन भारताची इनिंग्ज सावरली. हे दोघे आरामात खेळत असताना रे ब्राईटने अझरला (५०) कॉट अ‍ॅन्ड बोल्ड करत भारताला हादरा दिला. शास्त्रीने चंद्रकांत पंडीतसह ६२ रन्स फटकावल्या पण मॅथ्यूजच्या बॉलवर विकेटकीपर टीम झोहररने त्याचा कॅच घेतला. ८ बाऊंड्री आणि मॅथ्यूजला तडकावलेल्या सिक्सच्या जोरावर शास्त्रीने ६२ रन्स फटकावल्या होत्या. शास्त्रीपाठोपाठ मॅथ्यूजला फटकावण्याच्या नादात स्टीव्ह वॉने पंडीतचा कॅच घेतला. स्टीव्ह वॉच्या बॉलवर झोहररने किरण मोरेचा कॅच घेतल्यावर दिवसाअखेरीस भारताची अवस्था २७० / ७ अशी झाली होती!

ड्रेसिंगरुममध्ये परत आल्यावर कपिल संतापाने अक्षरशः धुमसत होता. गावस्करसह सर्व खेळाडूंची त्याने चांगलीच तासडंपट्टी केली! भारतासमोर फॉलोऑनचं संकट आSS वासून उभं असताना बॅट्समननी वन-डे सारखी फटकेबाजी करावी याबद्दल त्याने कोणाचाही मुलाहीजा न बाळगता सर्वांवर आगपाखड केली. कपिलचा संताप वाजवी असल्याने सर्वजण निमूटपणे त्याच्या सरबत्तीला तोंड देत होते!

गावस्कर म्हणतो,
"Kapil was furious! He sat us down and gave us a through lecture. You guys think this is one day or what.. we are facing follow on..left and right we were blasted. And he was right, so we all kept quiet. Next morning, Steve Waugh opened the bowling, and first 3 balls went up in the air - Midoff, Midon and over square leg 3 fours all over the top in the air, exactly the kind of shots he had criticized us previous evening, but that was just Kapil!"

कपिलने ऑस्ट्रेलियन बॉलिंगची धुलाई करत चेतन शर्मासह भारताचा स्कोर ३३० पर्यंत पोहोचवल्यावर ब्रूस रीडच्या बॉलवर झोहररने चेतनचा कॅच घेतला. चेतन परतल्यावर कपिलने शिवलाल यादवबरोबर ५७ रन्स फटकावत फॉलॉ ऑन टाळला! मॅकडरमॉटला हूकची बाऊंड्री ठोकत कपिलने सेंच्युरी पूर्ण केली. ग्रेग मॅथ्यूजच्या बॉलवर बॉर्डरने कपिलचा कॅच घेतला तेव्हा त्याने २१ बाऊंड्रीसह ११९ रन्स झोडपल्या होत्या! ग्रेग मॅथ्यूजने १०३ रन्समध्ये ५ विकेट्स घेत भारताची इनिंग्ज ३९७ वर रोखली!

ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये बून - मार्श यांनी आक्रमक सुरवात केली, परंतु शास्त्रीने मार्शची दांडी उडवली. बून - जोन्स यांनी ५० रन्सची पार्टनरशीप केल्यावर मणिंदरसिंगच्या बॉलवर अझरने जोन्सचा कॅच पकडला. मणिंदरने जवळपासा बाऊंड्रीपर्यंत जोन्सबरोबर चालत जात त्याला व्यवस्थित 'सेंड ऑफ' दिला! जोन्स परतल्यावरही बून, बॉर्डर, रिची, मॅथ्यूज यांनी फटकेबाजी करत चौथ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाचा स्कोर १७० / ५ पर्यंत पोहोचवला!

पाचव्या दिवशी सकाळी तासभर - किमान अर्धा तासतरी बॅटींग करण्याचा बॉर्डरचा विचार होता. बॉर्डरच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या अननुभवी संघाला यशाची फारशी संधी कधी मिळाली नव्हती. आताही मॅच जिंकण्यापेक्षा पराभव टाळण्याकडे बॉर्डरचा कल होता. परंतु ऑस्ट्रेलियाचा कोच बॉब सिंप्सनने मॅच जिंकण्याच्या इराद्याने बॉर्डरला इनिंग्ज डिक्लेअर करण्याची सूचना दिली. बॉर्डरने अखेर शेवटच्या दिवशी भारताला ३४७ रन्सचं आव्हान देत ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग्ज डिक्लेअर केली!

कपिलने भारताची दुसरी इनिंग्ज सुरु होण्यापूर्वी सर्वांना एकच सूचना दिली.
"No matter what, we are going for it!"

श्रीकांतने नेहमीप्रमाणेच आक्रमकपणे फटकेबाजीला सुरवात केली. सुरवातीच्या जेमतेम चार ओव्हर्सनंतर ग्रेग मॅथ्यूज बॉलिंगला आला तो लांब हातांचा शर्ट आणि त्यावर दोन स्वेटर घालून! जवळपास ४० डिग्री तापमानात चक्कं दोन स्वेटर्स घालून आणि डोक्यावर टोपी घालून बॉलिंग करण्यास त्याने सुरवात केली!

स्टीव्ह वॉ म्हणतो,
"He was bowling with full sleeves jumper and with two woolen sweats on! We just shook our heads in disbelief! It was 40 degree and 90% humidity, but as usual he had a theory. He had seen nomadic herders wearing woolen coats in desert in a documentary. It kept cool air in and hot air out, acting sort of an air conditioner! Whatever it was it was unbelievable!"

मॅथ्यूजच्या बॉलवर स्टीव्ह वॉने लाँग ऑफपासून लॉग ऑनपर्यंत धाव घेत श्रीकांतचा (३९) कॅच घेतल्यावर गावस्कर आणि अमरनाथ यांनी दुसर्‍या विकेटसाठी १०३ रन्सची पार्टनरशीप केली. गावस्करच्या स्ट्रेट ड्राईव्हचा मॅकडरमॉट, रीड, स्टीव्ह वॉ तिघांनाही प्रसाद मिळला. ग्रेग मॅथ्यूजला त्याने मिडविकेटला सिक्स ठोकल्यावर बॉर्डरच्या चेहर्‍यावर चिंतेच्या छटा चमकण्यास सुरवात झाली.

बॉर्डर म्हणतो,
"I had never seen Sunny batting the way he did on that last day in Madras. One shot that sticks out in my mind is a cracking drive against McDermott, down on one knee through covers. That made it clear to me that these guys were going for it!"

ग्रेग मॅथ्यूजच्या बॉलवर बूनने अमरनाथचा (५१) कॅच घेतल्यावर ही पार्टनरशीप संपुष्टात आली. टी-टाईमला भारताचा स्कोर होता १९३ / २!
शेवटच्या सेशनमध्ये भारताला विजयासाठी १५५ रन्सची आवश्यकता होती!

दिवसाच्या सुरवातीला स्टेडीयममध्ये जेमतेम ८-१० हजार प्रेक्षक होते, परंतु टी-टाईमपर्यंत भारत मॅच जिंकण्याची शक्यता बरीच वाढल्याने चेपॉकवर सुमारे ४५००० प्रेक्षकांची गर्दी झाली होती!

टी-टाईमनंतर काही वेळातच भारताला सर्वात मोठा धक्का बसला. रे ब्राईटचा बॉल फटकावण्याच्या नादात जोन्सने कव्हरमध्ये गावस्करचा कॅच घेतला. १२ बाऊंड्री आणि मॅथ्यूजला मारलेल्या सिक्सच्या जोरावर गावस्करने ९० रन्स फटकावल्या! भारत २०४ / ३!

गावस्कर परतल्यावरही अझर आणि पंडीत यांनी ४७ रन्स फटकावल्यावर ग्रेग रिचीने ब्राईटच्या बॉलवर बॅकवर्ड पॉईंटला अझरचा कॅच घेतला. भारताची सर्व मदार आता कॅप्टन कपिलवर होती, परंतु मॅथ्यूजला स्वीप मारण्याचा त्याचा प्रयत्नं पार फसला आणि शॉर्ट फाईनलेगला ब्राईटने त्याचा कॅच घेतला! भारत २५३ / ५!

कपिलनंतर बॅटींगला आला रवी शास्त्री!

"I waited for him to walk in from one side of the sight screen and I walked out from the other side." शास्त्री म्हणतो, "I did not want any message from him at that time. In my mind, it was very clear, we are still going for it!"

शास्त्रीने पहिल्याच बॉलपासून आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. पहिल्याच बॉलवर रेबब्राईटला बाऊंड्री ठोकल्यावर त्याने ग्रेग मॅथ्यूजला लागोपाठ दोन बाऊंड्री आणि पुढच्याच ओव्हरमध्ये मिडविकेटवरुन दणदणीत सिक्स ठोकली! शास्त्रीच्या या पवित्र्याने बॉर्डर तर गडबडलाच पण मॅथ्यूज, झोहरर यांचाही संयम संपुष्टात आला! त्यातच तीव्र उष्णतेचा त्रास असह्य झाल्याने रे ब्राईट पॅव्हेलियनमध्ये परतला!

विकेटकीपर झोहररने आता ऑस्ट्रेलियाचं ठेवणीतलं शस्त्रं उपसलं ते म्हणजे स्लेजिंग! शास्त्रीवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता, पण तुलनेने अननुभवी असलेला पंडीत मात्रं त्याच्या बडबडीने चांगलाच वैतागला होता. अखेर झोहररला अपेक्षित परिणाम झालाच! ग्रेग मॅथ्यूजचा बॉल पंडीतने लेगस्टंपच्या बाहेर जात थेट स्टंप्सवर कट केला!

पंडीत परतल्यावर बॅटींगला आलेल्या चेतन शर्मानेही फटकेबाजीचंच धोरण स्वीकारलं होतं. पंडीतप्रमाणेच चेतन आणि शास्त्रीलाही स्टंपमागून स्लेजिंग करण्याचा झोहररचा उद्योग सुरुच होता. परंतु शास्त्रीने ऑस्ट्रेलियाचं स्लेजिंगचं अस्त्रं त्यांच्यावरच उलटवलं. चेतन शर्माने आणि स्वतः मारलेल्या प्रत्येक बाऊंड्री आणि सिक्सनंतर प्रेक्षकांना जास्तीत जास्तं टाळ्या वाजवण्यास आणि आवाज करण्यास उद्युक्तं करण्यास त्याने सुरवात केली! त्याच्या या पवित्र्याने झोहरर, मॅथ्यूज प्रभृतींचं माथं भडकलं नसतं तरच नवल!

बॉर्डर म्हणतो,
"Ravi played a brilliant innings that day! He got the crowd involved! Kept talking to the guy at the other end and kept hitting those massive sixes to keep India in the game! It was a terrific innings!"

मॅथ्यूजच्या बॉलवर चेतन विरुद्धचं स्टंपिंगचं अपिल अंपायर दारा दोतिवालाने फेटाळून लावल्यावर झोहररने जोरात बॉल आपटला! दोन बॉलनंतर झोहररची बडबड चेतनला असह्य झाली. दोघांचा चांगलाच वाद झाला. चेतनने बॅटचं हँडर स्वतःच्या हातावर आपटत ते झोहररच्या पार्श्वभागात खुपसण्याची धमकी दिली!

"I will stick it in your arse!" रागाने धुमसत चेतनने धमकावलं!

झोहररने काय करावं?
त्याने चक्कं कमरेत वाकत आपला पार्श्वभाग चेतनच्या दिशेने वर केला आणि म्हणाला,

"Come on.. go ahead!"

एव्हाना ऑस्ट्रेलियनांनी वेळकाढूपणा करण्यास सुरवात केली होती. अंपायर दोतीवालाने ऑस्ट्रेलियनांची ही चाल ओळखून बॉर्डरला स्लो ओव्हररेटवरुन खडसावलं! आधीच वैतागलेल्या बॉर्डरची दोतीवालाशी चांगलीच खडाजंगी झाली. बॉर्डरच्या मताप्रमाणे एका क्षणी दोतीवालाने ड्रेसिंगरुमकडे बोट दाखवत बॉर्डरला सुनावलं,

"I will send you off!"

दोतीवालाच्या या वक्तव्याने बॉर्डर उडालाच! व्हाईसकॅप्टन असलेल्या डेव्हीड बूनकडे वळून त्याने विचारलं,
"He can't send me off.. may be he can! What do you think Boonie?"

"Buggered if I know!" बून थंडपडे म्हणाला आणि आपल्या फिल्डींग पोझीशनच्या दिशेने निघून गेला!

दोतीवालाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने बॉर्डरला ड्रेसिंग रुमकडे बोट दाखवून "I will report you to the dressing room!" असं सुनावलं होतं!

या भानगडीत ड्रेसिंगरुममध्ये असलेल्य रे ब्राईटनने बाराव्या खेळाडूमार्फत बॉर्डरला मी बॉलिंगला येण्याची आवश्यकता आहे का अशी विचारणा केली बॉर्डर उत्तरला,

"Ask tha bugger to get his arse up and come out and fucking bowl for me!"

ब्राईट मैदानावर आल्यावर सर्वात आनंद कोणाला झाला असेल तर तो ग्रेग मॅथ्यूजला! तो म्हणतो,
"When he came out, I would have started crying if I had any moisture left! It gave me a big lift. I was swearing at AB if he wanted to take ball out of my hand! I knew it was my bloody job to bowl us to victory!"

रे ब्राईटला फटकावण्याच्या प्रयत्नात चेतन शर्माचा लाँग ऑफला मॅकडरमॉटने कॅच घेतला. पुढच्याच बॉलला किरण मोरेच ब्राईटला स्वीप मारण्याचा प्रयत्नं फसला आणि तो एलबीडब्ल्यू असल्याचा अंपायर दोतीवालाने निर्णय दिला! भारत ३३४ / ८!

शास्त्रीच्या जोडीला आता बॅटींगला आला शिवलाला यादव!

झोहररने चेतनप्रमाणेच आपल्या स्लेजिंगकचा प्रयोग यादववरही करण्यास सुरवात केली, पण त्याचा नेमका उलटा परिणाम झाला. यादवने ग्रेग मॅथ्यूजला मिडविकेट बाऊंड्रीवर असलेल्या जेफ मार्शच्या डोक्यावरुन सिक्स मारली!

रे ब्राईटचची ओव्हर सुरु झाली तेव्हा भारताला मॅच जिंकण्यासाठी दोन ओव्हर्समध्ये ७ रन्सची आवश्यकता होती!

ब्राईटच्या पहिल्याच बॉलवर शास्त्रीने एक रन काढली. दुसर्‍या बॉलवर यादवने बॅकवर्ड पॉईंटला बॉल प्लेस करत दोन रन्स काढल्या. मॅच जिंकण्यासाठी आता केवळ ४ रन्स हव्या होत्या. हा मोका सोडेल तर तो झोहरर कसल?

"Come on mate! Hit a four! That's all you need! Go for it mate!"

शिवलालच्या डोक्यातही नेमका हाच विचार असावा. बाऊंड्री मारून मॅच जिंकण्याच्या आणि मुख्य म्हणजे झोहररची बडबड बंद करण्याच्या इराद्याने त्याने ब्राईटचा बॉल स्वीप केला, परंतु त्याच्या पॅडला लागून बॉल स्टंपवर गेला! भारत ३४४ / ९!

भारताचा अखेरचा बॅट्समन मणिंदरसिंग मैदानात उतरला!
मॅच जिंकण्यासाठी भारताला ९ बॉलमध्ये ४ रन्सची आवश्यकता होती तर ऑस्ट्रेलियाला शेवटच्या विकेटची!
रे ब्राईटच्या ओव्हरचे उरलेले तीन बॉल मणिंदरने खेळून काढले!

शेवटच्या ओव्हरमध्ये ग्रेग मॅथ्यूजसमोर होता ३७ बॉलमध्ये ४५ रन्स फटकावून खेळत असलेला रवी शास्त्री!

शास्त्रीने आतापर्यंत मॅथ्यूजलाच दोन सिक्स तडकावल्या होत्या. आणखीन एक अचूक बसलेली सिक्स किंवा बाऊंड्री भारताला मॅच जिंकून देण्यास पुरेशी होती! शास्त्रीच्या डोक्यात नेमके हेच विचार सुरु होते. पण तरीही त्याने मॅथ्यूजचा पहिला बॉल शांतपणे खेळून काढला!

अ‍ॅलन बॉर्डरला जबरदस्तं टेन्शन आलं होतं. तो म्हणतो,
"I was panicking that he would just basically wait for the right ball and just hit it out of the ground and that would be the end of the game!"

मॅथ्यूजचा दुसरा बॉल शास्त्रीने स्क्वेअरलेगला खेचला! बाऊंड्रीवर असलेल्या आणि उत्कृष्ट फिल्डर असलेल्या स्टीव्ह वॉच्या हातून बॉल सुटला आणि शास्त्रीला २ रन्स मिळाल्या!

"I always say Steve Waugh cost us that test!" मॅथ्यूज म्हणतो, "His midfield allowed Ravi to get 2 from that ball and more importantly get back the strike!"

मॅच जिंकण्यासाठी आता ४ बॉलमध्ये २ रन्स बाकी होत्या!
तिसर्‍या बॉलवर शास्त्रीने एक रन काढली!

दोन्ही संघांचा स्कोर सारखाच झाल्याने भारत मॅच हरणार नाही हे निश्चित होतं, पण ग्रेग मॅथ्यूजसमोर स्ट्राईकवर होता मणिंदरसिंग!

रवी शास्त्रीने आपल्या करीयरमध्ये असंख्य वेळा भारतीय प्रेक्षकांच्या शिव्या खाल्ल्या, परंतु त्यापैकी सर्वात जास्तं शिव्या त्यालायया एक रनमुळे पडल्या असाव्यात! आपल्या एक रन काढण्याचं स्पष्टीकरण करताना शास्त्री म्हणतो,

"The last thing that Alan Border wants me is to take a single, so that India can not loose, rather Australia can not win. And then anything can happen, the bowler may bowl a no ball, there could be a top edge falling safe, absolutely anything is possible!"

शास्त्री गावस्करचा 'खास' माणूस! त्याचा बचाव करताना गावस्कर म्हणतो,
"After coming so close, it would have been a tragedy if we had lost, so in that circumstances it was a right decision to level the scores!"

मात्रं याच बचावात्मक मानसिकतेमुळे शास्त्रीने मॅथ्यूजसमोर मणिंदरसिंगला सोडलं होतं!

मॅथ्यूजच्या ओव्हरचा चौथा बॉल मणिंदरने खेळून काढला!
दोन बॉलमध्ये भारताला १ रन हवी होती तर ऑस्ट्रेलियाला १ विकेट!

"Don't hit it to me!" स्टीव्ह वॉ मनातल्या मनात प्रार्थना करत होता!

मॅथ्यूजच्या ओव्हरचा पाचवा बॉल..
फ्रंटफूटवर खेळणार्‍या मणिंदरच्या बॅटच्या कडेला लागून तो पॅडवर आदळला आणि सिलीपॉईंटच्या दिशेने गेला.
मॅथ्यूज आणि झोहररने एलबीड्ब्ल्यूसाठी जोरदार अपिल केलं!
अंपायर विक्रम राजूचं बोट क्षणार्धात वर गेलं!

नॉन स्ट्रायकर असलेल्या शास्त्रीने बॉर्डरने बॉल पिकअप् केल्याचं टिपलं होतं. त्यामुळे रन काढण्यापासून मणिंदरला परावृत्त करण्यासाठी त्याचा हात आपसूकच वर गेला होता. मणिंदरच्या बॅटला बॉल लागल्याची बॉर्डरलाही कल्पना आली होती, त्यामुळे अपिल करण्याच्या भानगडीत न पडता त्याने बॉल उचलला होता.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या जल्लोषाने गोंधळलेल्या शास्त्री आणि मणिंदरला अंपायरने एलबीडब्ल्यू दिल्याचं ध्यानात आल्यावर ते स्तंभितच झाले!

"Bad luck son!"

बॉर्डर मणिंदरला उद्देशून म्हणाला आणि आपल्या सहकार्‍यांपाठोपाठ ड्रेसिंगरुमच्या दिशेने धावत सुटला!
न जाणो अंपायरने आपला निर्णय बदलला तर?

क्रिकेटच्या इतिहासातली ही दुसरी टाय टेस्ट होती!

Tie02

डीन जोन्स बाऊंड्रीवर फिल्डींग करत होता. मैदानातल्या दोन स्कोरबोर्डस् वर दोन वेगवेगळे निकाल दिसत होते! एक स्कोरबोर्ड ऑस्ट्रेलिया जिंकल्याचं दर्शवत होता तर एक स्कोरबोर्ड मॅच ड्रॉ झाल्याचं! डेसिंगरुममध्ये बॉब सिंप्सनची गाठ पड्ल्यावर अखेर मॅच टाय झाल्याचा खुलासा झाला!

"Its a tie!" सिंप्सन म्हणाल, "And I have been to both!"

मणिंदरला चुकीचं आऊट देणार्‍या अंपायर विक्रमराजूवर शास्त्री जबरदस्तं भडकला होता. मैदानातून परतल्यावर ड्रेसिंगरुमध्ये परतण्याऐवजी त्याने अंपायर्सची रुम गाठून विक्रमरा़जूला फैलावर घेतलं! परंतु अंपायर विक्रमराजू आपल्या निर्णयावर ठाम होता!

"It is a correct decision!" विक्रमराजू उत्तरला, "And we are proud to be part of history! To be involved in only second tied test ever!"

"I was at square leg and didn't see it" दारा दोतिवाला नंतर त्याबद्दल बोलताना म्हणाला, "But I had confidence in my partner. I was confident he would have made a correct call."

डीन जोन्सच्या असह्य उकाड्याशी मुकाबला करत काढलेल्या २१० रन्सचं अफाट कौतुक झालं, परंतु ग्रेग मॅथ्यूजला मात्रं ते अवाजवी वाटत होतं! मॅथ्यूज म्हणतो,

"He was 23, in his prime, fit as a mallee bull! If you are not fit enough to walk out there and fucking bat, don't come fucking whining to me! Boonie got 122, AB 106, Kapil made a blistering 100, Dino got a double. He just batted bit longer! It was an absolute road to bat on! 1488 runs for the loss of 32 wickets!"

स्वतः मॅथ्यूजने पाचव्या दिवशीच्या त्या उकाड्यात तब्बल ३९.५ ओव्हर्स बॉलिंग केली होती आणि ती देखिल पूर्ण बाह्यांच्या शर्ट आणि दोन स्वेटर्स आणि टोपी घालून! दोन्ही इनिंग्जमध्ये मिळून त्याने १० विकेट्स घेतल्याच शिवाय सत्तरच्या वर रन्सही फटकवल्या होत्या!

स्टीव्ह वॉ म्हणतो,
"Greg Matthews was most unsung hero of that last day! His stamina and resilience was absolutely staggering when he bowled 39.5 overs just about consecutively to keep us in the game an ultimately tie it. He wore two sleeveless sweaters all day, actually wearing one while fielding and having both on while bowling! We couldn't believe what he was doing!"

डीन जोन्स म्हणतो,
"Matthews bowled unbelievably well on that last day! And then he would go and field right in front of the Indian dressing room, talking to the players. At one point he said to Sunny, 'It's not hot, we love it like this!' and then started to yabber away at them! He would stir up and mess with everyone in the dressing room, with the spectators. He grew an extra leg that day!"

अंपायर विक्रमराजूवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली, पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहीला! पुन्हा कधीही तो टेस्टमध्ये अंपायर म्हणून उभा राहीला नाही!

मॅचनंतर काही दिवसांनी बोलताना तो म्हणाला,
"We wanted to prove to the visitors that we are not partial to Indian team!"

नेमक्या याच भावनेतून त्याने मणिंदरला आऊट देण्याचा चुकीचा निर्णय दिल्याची गावस्कर, कपिलपासून खुद्दं मणिंदर पर्यंत सर्वांना खात्री होती. शास्त्री आणि मणिंदरला बॅटची कड लागून बॉल पॅडवर गेल्याबद्द्ल कोणतीही शंका नव्हती.

ग्रेग मॅथ्यूजने विक्रमराजूचं Very courageous umpire on the face of earth अशा शब्दांत वर्णन केलं आहे!

विक्रमराजू आपल्या निर्णयावर ठाम होता! काही वर्षांनी माईक कॉवर्डशी बोलताना तो म्हणाला,
"The bat was not near the pad, the ball never came near to the bat! He was plumb in front of the stumps! Even to this date, I am confident that I made a correct decision! They wanted to win and when they could not do so, we were scapegoated!"

अ‍ॅलन बॉर्डर म्हणतो,
"There was a definite inside edge onto Maninder's pad! I was not even appealing but was going to pick up the ball so that they can not get the run. We got away with it!"

मणिंदर म्हणतो,
"At that time I lost my head, Ravi lost his head, but now when I look at it again, I realize the amount of pressure that was their on the umpire. He was extremely nervous and that showed in the haste with which he raised the finger to give me out! Its a part of the game!"

क्रिकेटच्या इतिहासातल्या दोन टाय टेस्ट्सची ही कहाणी..
आता वाट पाहयची ती तिसरी टेस्ट कधी टाय होती याची!

कथालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

26 Dec 2016 - 12:50 pm | गॅरी ट्रुमन

जबराट.

पहिल्या टाय मॅचची विशेष माहिती नव्हती. दुसरी टाय मॅच मी फारच इंटरेस्ट घेऊन बघितली होती त्यामुळे तेव्हाचे स्कोअर्स वगैरे लक्षात आहेत. पण पडद्याआड इतक्या गोष्टी झाल्या होत्या (कपिलने इतरांना फैलावर घेणे, शास्त्री अंपायरवर संतापणे, डिन जोन्स इतका आजारी असणे वगैरे) हे माहित नव्हते.

लेख प्रचंड आवडला आहे.

बोका-ए-आझम's picture

26 Dec 2016 - 3:30 pm | बोका-ए-आझम

दोन्ही टाय टेस्टस् आणि प्रतिस्पर्ध्याला फाॅलो आॅन देऊनही हरणे (तेही २ वेळा) या सर्व प्रसंगांमध्ये आॅस्ट्रेलिया हा एक सामायिक मुद्दा आहे. त्या फाॅलो आॅन टेस्टस् वर पण लिहावे अशी विनंती!

स्पार्टाकस's picture

26 Dec 2016 - 11:21 pm | स्पार्टाकस

बोकोबा,

ऑस्ट्रेलिया फॉलोऑन देऊन दोनदा नाही तर तीन वेळा हरली आहे.

१८९४-९५ च्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला फॉलोऑन दिल्यावर चौथ्या इनिंग्जमध्ये बॉबी पील आणि जॉनी ब्रिग्ज यांनी ऑस्ट्रेलियाला गुंडाळत १० रन्सनी मॅच जिंकली होती.

१९८०-८१ च्या अ‍ॅशेसमध्ये बोथमने फॉलोऑननंतर १४९ रन्स झोडपून काढल्या होत्या. ५००-१ असं बेटींग झालेली हीच ती टेस्ट. दुसर्‍या इनिंग्जमध्ये बॉब विलीसने ८ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचे दात घशात घातले होते.

तिसरी टेस्ट अर्थातच २००१ ची ईडन गार्डन्स टेस्ट! (बस इतनाही काफी है!)

नया है वह's picture

26 Dec 2016 - 4:10 pm | नया है वह

+१

कपिलमुनी's picture

26 Dec 2016 - 4:31 pm | कपिलमुनी

टाय आणि ड्रॉ !
अश्विनने विंडीजविरूध एक टेस्ट टाय आणि ड्रॉ केलेली आठवत आहे

स्पार्टाकस's picture

26 Dec 2016 - 10:07 pm | स्पार्टाकस

दोन्ही संघांच्या रन्स सारख्या झाल्या पण दुसर्‍या संघाच्या सर्व विकेट्स गेल्या नाहीत तर ती मॅच ड्रॉ झाली असं धरलं जातं.
दोन टेस्ट्स अशा रितीने ड्रॉ झालेल्या आहेत.

पहिली म्हणजे १९९६ ची बुलावायो टेस्ट. इंग्लंडला मॅच जिंकण्यासाठी २०५ रन्स हव्या असताना त्यांनी २०४ / ६ रन्स केल्या. शेवटच्या बॉलवर मॅच जिंकायला ३ रन्स हव्या अस्ताना तिसरी रन काढताना निक नाईट रन आऊट झाला.

दुसरी टेस्ट अर्थात भारत - वेस्ट इंडीजमधली २०११ ची मुंबई टेस्ट. २४३ रन्सचं टार्गेट असताना शेवटच्या बॉलवर दुसरी रन काढताना रविचंद्रन अश्विन रन आऊट झाला होता.

या दोन्ही मॅचेस ड्रॉ म्हणूनच गणल्या जातात.

चैतू's picture

27 Dec 2016 - 11:54 pm | चैतू

थरारक!!

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी

छान लेख!

क्रिकेटच्या इतिहासात आजवर फक्त दोन सामने बरोबरीत सुटले. परंतु अनेक एकदिवसीय सामने बरोबरीत सुटले आहेत..

लोनली प्लॅनेट's picture

30 Dec 2016 - 9:50 am | लोनली प्लॅनेट

जबरदस्त लिखाण .. वाचताना डोळ्यासमोर सर्व दिसत होते you are a genuine cricket fanे

पैसा's picture

30 Dec 2016 - 11:02 am | पैसा

मस्त लिहिलय!

नया है वह's picture

7 Mar 2017 - 7:30 pm | नया है वह

ऑस्ट्रेलियन संघ भारतात आल्यावर टेस्ट्स क्रिकेट चा पारा जाम वाढतो.