ब्रायन क्लोज - द मॅन ऑफ स्टील!

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
3 Oct 2015 - 11:20 pm

ब्रायन क्लोज गेला!

कोण ब्रायन क्लोज?

असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात चमकून गेला असेल.
अगदी क्रिकेट जाणकारांच्याही!

कारण सध्याच्या ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात ८४ व्या वर्षी ख्रिस्तवासी झालेल्या क्लोजबद्दल तपशीलवार माहिती असण्याची शक्यता विरळाच! आजकालच्या हिमेसभाय, यो यो हनीसिंग (काय पण नाव!), आतिफ अस्लम (हे माणसाचं नाव आहे. मला आधी हा मुर्ग मुसल्लम सारखा खाण्याचा प्रकार वाटला होता. असो!) यांच्या गायनकले(?)वर पोसलेल्यांना जर तुम्ही तलत, मुकेश ऐकवायला गेलात तर ज्या विचित्र नजरेने आजकालची पोरं बघतील, तशाच नजरेने सुरेश रैना, सर रविंद्र जाडेजा यांच्या फॅन्सना ब्रायन क्लोजबद्दल विचारलंत तर एरंडेल प्यायल्यासारखे त्यांचे चेहरे होतील!

परंतु ज्यांना ब्रायन क्लोज ही काय चीज होती हे माहीत आहे त्यांना तो निश्चितच चटका लावून गेला असेल!

रॉडन या पश्चिम यॉर्कशायरमधल्या खेड्यात २४ फेब्रुवारी १९३१ मध्ये जन्मलेला ब्रायन क्लोज शाळेत असल्यापासूनच एक उत्तम स्पोर्ट्समन म्हणून नावजला गेला होता. शाळेत असताना सलग सहा वर्ष शाळेच्या क्रिकेट टीमचा तो कॅप्टन होता! या सहा वर्षात एकही वर्ष त्याच्या शाळेने एकही मॅच गमावली नव्हती! १९४२ मध्ये १२ व्या वर्षी रॉड्न क्रिकेट क्लबमध्ये दाखल झालेल्या क्लोजची थेट १८ वर्षांखालील मुलांच्या टीममध्ये निवड झाली! या सगळ्याबरोबरच अभ्यासातही हुशार असलेल्या क्लोजने सगळं सोडून डॉक्टर बनण्याचाही विचार केला होता! त्याच्या शाळेच्या हेडमास्तरांच्या मते त्याला केंब्रिज किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत सहज अ‍ॅडमिशन मिळाली असती!

...सुदैवाने क्लोजने क्रिकेटवरच आपलं लक्षं केंद्रीत केलं!

१९४९ साली क्लोजने यॉर्कशायरकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं ते केंब्रिज युनिव्हर्सिटीविरुद्धच! यॉर्कशायरच्या पदरी पराभव पडला असला तरी ८ विकेट्स घेणार्‍या क्लोजने सर्वांचं लक्षं वेधलं होतं. इसेक्सविरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये ५ विकेट्स घेतल्यावर त्याने ८८ रन्स फटकावल्या, परंतु टेस्ट मॅचचा सराव म्हणून खेळवण्यात आलेल्या नॉर्थ विरुद्ध साऊथ या मॅचमध्ये तो साफ अपयशी ठरला.

या मॅचमध्ये अपयशी ठरला असला तरी क्लोजच्या एकूण कामगिरीच्या आधारे प्रतिष्ठेच्या जंटलमेन्स विरुद्ध प्लेयर्स या वार्षिक मॅचसाठी त्याची निवड करण्यात आली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उठवला. प्लेअर्सच्या पहिल्या इनिंग्जमध्ये त्याने सर्वात जास्त - ६५ रन्स काढल्या, परंतु याच मॅचमुळे तो पहिल्यांदा वादात सापडला!

तत्कालीन इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळाडूंची व्यावसायिक (प्लेयर्स किंवा प्रोफेशनल्स) आणि हौशी (जंटलमेन्स) अशी वर्गवारी केली जात असे. जंटलमेन्स हे बहुतेक दिवसा ठरावीक नोकरी करून सुटीच्या दिवशी क्रिकेट खेळणारे हौशी खेळाडू होते. काही अपवाद वगळता त्यांच्यात फारशी प्रतिभा नसली तरी त्यांना प्रतिष्ठा मात्रं जास्तं होती! याला कारणीभूत अर्थातच ते दिवसा करत असलेली नोकरी आणि तत्कालीन ब्रिटीश समाजाची मानसिकता होती. स्वत:ची नोकरी सांभाळून क्रिकेट खेळणारे हौशी खेळाडू केवळ क्रिकेटवरच उपजिवीका अवलंबून असलेल्या व्यावसायिक खेळाडूंपेक्षा कमी प्रतिभावान असूनही श्रेष्ठ गणले जात! जंटलमेन्सच्या ड्रेसिंगरुममध्ये जाण्यास प्लेयर्सना मनाई असे! इतकंच नव्हे तर स्कोरकार्डवरही जंटलमेन्सच्या आडनावांच्या मागे त्यांच्या नावांची आद्याक्षरं असंत!

क्लोजच्या ५० रन्स पूर्ण झाल्यावर जंटलमेन्सचा विकेटकिपर बिली ग्रिफीथ त्याचं अभिनंदन करताना उद्गारला,

"Well played, Brian!"

"Thank you, Billy!"

क्लोज उत्तरला! परंतु आपण कोणतं वादळ ओढावून घेतलं आहे याची त्याला कल्पना नव्हती! जंटलमेन्स संघात असलेल्या ग्रिफीथशी बोलताना त्याने त्याचा उच्चार 'मिस्टर' असा केला नव्हता! रुढीवादी आणि बूर्झ्वा परंपरांना कवटाळून धरणार्‍या इंग्लिश ढुढ्ढाचार्यांच्या मते त्याच्या हातून फार मोठा अपराध घडला होता. मॅच संपल्यावर दहा दिवसांनी क्लोजला यॉर्कशायर कमिटीचा सदस्य असलेल्या ब्रायन सेलर्सपुढे हजर व्हावं लागलं! सेलर्सने क्लोजच्या 'अपराधा'बद्दल कडक शब्दांत त्याची कानउघडणी केली!

ब्रायन सेलर्सशी दोन हात करण्याची क्लोजची ही पहिलीच वेळ असली तरी पुढे अनेक वेळा दोघं समोरासमोर उभे ठाकणार होते!

त्याच मोसमातल्या तिसर्‍या टेस्टमध्ये न्यूझिलंडविरुद्ध अवघ्या १८ वर्षांच्या ब्रायन क्लोजने टेस्टमध्ये पदार्पण केलं. इंग्लंडतर्फे टेस्टमध्ये पदार्पण करणार क्लोज हा सर्वात तरूण खेळाडू होता! (क्लोजचा हा विक्रम अद्यापही अबाधित आहे!). क्लोज बॅटींगला आला तेव्हा जलद गतीने रन्स काढून इनिंग्ज डिक्लेअर करण्याचा कॅप्टन फ्रेडी ब्राऊनचा इरादा होता. कॅप्टनकडून तशा स्पष्ट सूचना घेऊन उतरलेल्या क्लोजने तिसर्‍याच बॉलवर चौकार ठोकत सुरवात चांगली केली, परंतु लगेचच फटकेबाजीच्या नादात बाऊंड्रीवर कॅच देऊन तो बाद झाला!

यॉर्कशायरचा सिलेक्टर बिल बोसचा (बॉडीलाईन फेम) सल्ला डावलून फ्रेडी ब्राऊनने ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाणार्‍या टीममध्ये क्लोजची निवड केली. बोसच्या मते खेळाडू म्हणून क्लोज अद्याप पुरेसा परिपक्व झालेला नव्हता. त्याची गुणवत्ता वादातीत असली तरी उत्साहाच्या भरात फटकेबाजीला आवर घालणं त्याला जमत नव्हतं! इतक्या तरूण वयात ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर नेल्यास त्याचा विकास खुंट्ण्याची भीती बोसला वाटत होती.

ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर क्लोजची निवडही वादाच्या भोवर्‍यात सापडलीच! क्लोज तेव्हा आर्मी ट्रेनिंग डेपोमध्ये सिग्नलमन म्हणून ब्रिटीश नागरिकांना अनिवार्य असलेली नॅशनल सर्विस बजावत होता. परंतु इंग्लिश संघात निवड झाली तेव्हा शिस्तभंगाच्या कारणावरून आपला बराकीतच राहण्याची शिक्षा त्याला फर्मावण्यात आलेली होती! यामागचं कारणही मजेदार होतं. आर्मीच्या एका क्रिकेट सामन्यात भाग घेण्यास क्लोजने नकार दिला होता, कारण त्या सामन्यातले इतर खेळाडू फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेले होते! एका पत्रकाराला क्लोजच्या या प्रकरणाचा वास लागला, परंतु एमसीसीच्या विनंतीवरुन या प्रकरणाची वाच्यता न करण्याची त्याने हमी दिली. परंतु आठवड्याभराने या प्रकाराचा बोभाटा झालाच!

मेलबर्नच्या दुसर्‍या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या १९४ रन्सच्या उत्तरार्थ इंग्लंडची ५४ / ४ अशी अवस्था झाली असताना क्लोज बॅटींगला आला. लंचला केवळ आठ चेंडू बाकी असताना मेलबर्नच्या विकेटवरील बाऊंसचा अंदाज न आलेल्या क्लोजचा जॅक आयव्हर्सनला स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला आणि टॉप एजला लागून उडालेला कॅच बॅकवर्ड स्क्वेअरलेगला सॅम लॉक्स्टनने अगदी आरामात घेतला.

ड्रेसिंगरुममध्ये क्लोज परतला तेव्हा घनगंभीर शांतता होती. तो स्वतःवर नाखूष होताच, पण इतरही सर्वजण त्याच्यावर चिडलेले होते. क्लोजबद्दल सहानुभूती असलेल्या एका खेळाडूने त्याची समजूत घालण्याची आणि नैराश्याच्या गर्तेतून त्याला बाहेर काढण्याची कॅप्टन फ्रेडी ब्राऊनला सूचना दिली. ब्राऊन उद्गारला,

"Let the blighter stew. He deserves it!"

याच दौर्‍यावर टास्मानियामध्ये डॉक्टरने विश्रांती घेण्याची स्पष्टं सूचना दिलेली असूनही क्लोजला खेळण्याची सक्ती करण्यात आली! त्याने आपल्याला झालेल्या दुखापतीचं कारण स्पष्टं केल्यावर त्याच्यावर शिस्तभंगाचा आणि दुखापतीचं नाटक करत असल्याचा आरोप करण्यात आला! तशाच अवस्थेत पुढच्या सातपैकी सहा सामन्यांत त्याला खेळवण्यात आलं! ऑस्ट्रेलियाचा दौरा संपवून इंग्लंडला परत येताना एक-दोघांचा अपवाद वगळता इतरांशी क्लोजने बोलणं टाकलं होतं!

बिल बोसचा अंदाज अचूक ठरला होता!
ऑस्ट्रेलियन दौर्‍यामुळे क्लोजला फायद्यापेक्षा नुकसानच जास्तं झालं होतं!

इंग्लंडला परतल्याबरोबर अपेक्षेप्रमाणे त्याला संघातून डच्चू देण्यात आला. परंतु माघार हा शब्दं क्लोजच्या डिक्शनरीतच नव्हता! १९५१ च्या इंग्लिश मोसमात क्लोज पुन्हा फॉर्मात आला. इतकंच नव्हे ऑक्टोबरमध्ये त्याने आर्सेनलशी फुटबॉल खेळण्याबाबत करारही केला! क्रिकेट आणि फुटबॉल दोन्हीवर त्याने लक्षं केंद्रीत केलं होतं. यॉर्कशायरचा कॅप्टन नॉर्मन यार्डलेकडून पहिल्या मॅचसाठी गैरहजर राहण्याची परवानगी मिळाल्यावरही मॅनेजरच्या विरोधामुळे क्लोज आर्सेनलच्या सामन्याला उशीरा आला. याची परिणीती आर्सेनलमधून त्याची हकालपट्टी होण्यात झाली! १९५२ च्या मोसमात पुन्हा त्याने १००० रन्स आणि १०० विकेट्स पूर्ण केल्या, परंतु फुटबॉलच्या एका सामन्यात गुडघ्याला झालेल्या जबरदस्त दुखापतीमुळे त्याला फुटबॉलला रामराम ठोकावा लागलाच, परंतु क्रिकेट कारकिर्दही अनिश्चीततेच्या गर्तेत सापडली!

१९५३ चा मोसम दुखापतीमुळे फुकट गेल्यानंतर, १९५४ मध्ये त्याने यॉर्कशायरसाठी दमदार पुनरागमन करताना पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच मॅचमध्ये शतक ठोकलं! १९५५ मध्ये दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या एकमेव टेस्टचा अपवाद वगळता तो इंग्लिश संघापासून दूरच असला तरी सिलेक्टर्सना त्याचा विसर पडला नव्हता. १९५५-५६ च्या पाकिस्तानच्या दौर्‍यावर क्लोज गेला खरा, परंतु या दौर्‍यात एकही टेस्ट मॅच नव्हती! अखेर १९५७ च्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या सिरीजमध्ये क्लोज संघात परतला, परंतु पहिल्या दोन टेस्टमध्ये फारसं काहीही करू न शकल्याने त्याला पुन्हा एकदा नारळ देण्यात आला!

क्लोज यॉर्कशायरला परतला पण पुन्हा इंग्लिश संघात परतण्याच्या जिद्दीनेच!

१९५९ मध्ये यॉर्कशायर कमिटीने फर्स्ट क्लास क्रिकेटचा अनुभव नसलेल्या रॉनी ब्रुनेटची यॉर्कशायरचा कॅप्टन म्हणून निवड केली होती! याच्या निषेधार्थ अनेक खेळाडू कमिटीचा निषेध करुण यॉर्कशायर सोडून बाहेर पडले! पूर्वीचा कॅप्टन जॉनी वॉर्डलची शिस्तभंग म्हणून कॅप्टनपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती! क्लोजही यॉर्कशायर सोडून बाहेर पडेल असा अनेकांचा अंदाज होता, परंतु क्लोजने यॉर्कशायर सोडलं नाहीच, उलट कौंटी चँपियनशीप जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला! १९६० मध्येही पुन्हा यॉर्कशायरच विजेते ठरले होते! १९६१ मध्ये यॉर्कशायरने गमावलेलं विजेतेपद पुन्हा १९६२ मध्ये खेचून आणण्यात कॅप्टन व्हिक विल्सन आणि एव्हाना सिनीयर खेळाडू झालेला क्लोज यशस्वी ठरले होते.

१९६१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये क्लोज पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडला!

विजयासाठी चौथ्या इनिंग्जमध्ये इंग्लंडसमोर २५६ रन्सचं उद्दीष्टं होतं. जेफ्री पुलर आणि रमण सुब्बा रो यांनी ४० रन्सची सलामी दिल्यावर सुब्बा रो आणि टेड डेक्स्टर यांनी ११० रन्सची पार्टनरशीप उभारली. अर्थात डेक्स्टरच्या ७६ रन्सचा यात मोठा वाटा होता. परंतु ऑस्ट्रेलियन कॅप्टन रिची बेनॉच्या लेगस्पिनवर वॉली ग्राऊटने डेक्स्टरचा कॅच घेतल्यावर ही जोडी फुटली. डेक्स्टरपाठोपाठ तिसर्‍या बॉलवर बेनॉने इंग्लिश कॅप्टन पीटर मेची दांडी गुल केली!

कॅप्टन मे ची आपल्या बॅट्समनना स्पष्ट सूचना होती - गो फॉर द रन्स! मॅच जिंकण्याचा प्रयत्न करा! कॅप्टनची सूचना अंमलात आणण्याच्या निश्चयानेच खेळायला आला ब्रायन क्लोज!

राईट हँडेड बॅट्समनच्या लेगस्टंपच्या बाहेर असलेल्या 'रफ' मधून बेनॉचे लेगब्रेक्स चांगलेच वळत होते. परंतु डावखुर्‍या क्लोजला हे बॉल आत येणारे असल्याने खेळणं तुलनेने सोपं जाणार होतं. पीटर मे ची सूचना लक्षात घेत त्याने आक्रमक पवित्रा स्वीकारला! बेनॉच्या तिसर्‍याच बॉलवर त्याने दणदणीत षटकार ठोकला! परंतु बेनॉला पुन्हा फटकावण्याचा क्लोजचा प्रयत्न त्याच्या अंगाशी आला आणि नॉर्मन ओ'निलने त्याचा कॅच घेतला!

क्लोज परतल्यावर इतर कोणालाच काही करता आलं नाही. १५० / १ वरून इंग्लंड २०१ मध्ये ऑलआऊट झालं आणि ५४ रन्सनी पराभव त्यांच्या पदरी पडला!

सर्वात जास्तं लक्ष्यं करण्यात आलेला बॅट्समन म्हणजे ब्रायन क्लोज!

रिची बेनॉला फटकावण्याच्या नादात क्लोजने विनाकारण आपली विकेट फेकली अशी त्याच्यावर टीकेची झोड उठली! परंतु ही टीका कितपत योग्य होती?

कॅप्टन पीटर मे च्या सूचनेनुसार क्लोजने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीचा प्रयत्न केला होता. त्यातच रिची बेनॉचे लेगब्रेक्स लेगस्टंपबाहेरच्या 'रफ'मधून त्रासदायकरित्या वळत आणि उसळत होते. क्लोजनंतर येणारे केन बॅरिंग्टन, जॉन मरे, डेव्हीड अ‍ॅलन, फ्रेडी ट्रूमन हे सगळे राईट हँडेड बॅट्समन होते. बेनॉच्या लेगब्रेक्सपुढे बॅरिंग्टन वगळता यांची कितपत मात्रा चालली असती याची शंकाच होती. त्यामुळे बेनॉवर हल्ला चढवून त्याची बॉलिंग बंद पाडणं हा एकमेव उपाय होता. क्लोजचा नेमका हाच प्रयत्न होता, परंतु तो आऊट झाल्याने टी़केचा धनी झाला!

खुद्द रिची बेनॉनेही क्लोजवर करण्यात आलेली टीका अनाठायी होती असं मत व्यक्तं केलं. बेनॉ म्हणतो,

"I thought the slating of Brian was one of the most unjust things I have ever experienced".

१९६२ च्या मोसमाच्या अखेर यॉर्कशायरचा कॅप्टन व्हिक विल्सन रिटायर झाल्यावर त्या जागी नेमणूक करण्यासाठी एकच योग्य माणूस होता तो म्हणजे ब्रायन क्लोज!

बिल बोस म्हणतो,

"Almost overnight it seemed that Brian Close matured! Close's field placings were as intelligent and antagonistic as any seen in the county for 25 years".

क्लोजच्याच शब्दांत सांगायचं तर,

"I've always believed that the team is more important than the individual!"

रे इलिंगवर्थने यॉर्कशायर सोडून लिस्टरशायर कौंटी संघात प्रवेश केला तेव्हा सगळ्यांच्याच मनात घर करुन असलेला एक प्रश्न त्याला विचारण्यात आला. यॉर्कशायरच्या जवळपास एकाही बॅट्समनचं अ‍ॅव्हरेज पंचवीस ते तीस रन्सपेक्षा जास्तं नव्हतं. परंतु अशा परिस्थितीतही यॉर्कशायरने चँपियनशीप जिंकण्याची करामत कशी केली होती?

इलिंगवर्थ म्हणतो,

"Closey had honed us to play the innings required at the right time: when quick runs were required, we did not play for their averages, we played for quick runs."

कोणत्या वेळी नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे हे ओळखून त्याप्रमाणे आपल्या सहकार्‍यांकडून कामगिरी करुन घेण्यात - थोडक्यात मॅच सिच्युएशन समजून घेण्यात क्लोज उस्ताद होता! त्याचबरोबर त्याच्या टीममधल्या सर्वांचा त्याच्यावर गाढ विश्वास होता! क्लोजने सांगितलेली कोणतीही गोष्ट करण्यास कोणीही मागेपुढे पाहत नव्हतं!

१९६३ मध्ये वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर आला होता. फ्रँक वॉरेलच्या या संघात कॉनरेड हंट, गॅरी सोबर्स, रोहन कन्हाई, स्वतः वॉरेल असे एकापेक्षा एक सरस बॅट्समन होते, परंतु सर्वात भीतीदायक होते ते त्यांचे ते दोन फास्ट बॉलर्स...

वेस् हॉल आणि चार्ली ग्रिफीथ!

परंतु पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडला चकवलं ते लान्स गिब्जच्या ऑफब्रेक्सनी. कॉनरेड हंट (१८२), कन्हाई(९०), सोबर्स(६४) आणि वॉरेल(७४*) यांच्या जोरावर वेस्ट इंडीजने ५०१ रन्स काढल्यावर गिब्जने दोन्ही इनिंग्जमध्ये मिळून ११ विकेट्स घेत इंग्लंडला २०५ आणि २९६ मध्ये गुंडाळलं!

ब्रायन क्लोज ही नेमकी काय चीज आहे हे लॉर्ड्सच्या दुसर्‍या टेस्टमध्ये सगळ्यांना कळून चुकलं!

चौथ्या इनिंग्जमध्ये २३४ रन्सचं लक्ष्यं घेऊन उतरलेल्या इंग्लंडला हॉलने सुरवातीला हादरवलं. त्यातच गिब्जच्या बॉलवर डेक्स्टरची दांडी उडाल्याने इंग्लंडची अवस्था ३७ / ३ अशी झाली होती. केन बॅरिंग्ट्न आणि कॉलिन कौड्री यांनी इनिंग्ज सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु ७२ / ३ अशा स्कोरवर चार्ली ग्रिफीथचा तुफान वेगाने आलेला बॉल कौड्रीच्या हातावर बसल्यामुळे कौड्रीचा हात फ्रॅक्चर झाला!

कौड्री रिटायर हर्ट झाल्यावर क्लोज खेळायला आला. बॅरिंग्टन एका बाजूने ठामपणे बॅटींग करत असताना क्लोजने बचावाचा पवित्रा घेतला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा बॅरिंग्टन ५५ तर क्लोज ७ वर नॉट आऊट होते. कौड्रीचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे तो बॅटींगला येणं शक्यं नव्हतं!

पाचव्या दिवशी सकाळी ग्रिफीथच्या बॉलिंगवर विकेटकिपर मरेने बॅरिंग्टनचा कॅच घेतला. बॅरिंग्टन बाद झाल्यावर विकेटकीपर जिम पार्क्स (१७), फ्रेड टिटमस (११) यांच्या साथीने क्लोजने इंग्लंडचा प्रतिकार सुरू ठेवला होता. एकाच वेळी हॉल आणि ग्रिफीथला सावधपणे खेळून काढताना सोबर्स आणि गिब्जला फटकावत २३४ च्या लक्ष्याच्या दिशेने क्लोजची वाटचाल सुरु होती!

क्लोजचा हा पवित्रा ध्यानात येताच हॉल आणि ग्रिफीथनी त्याच्यावर बंपर्सचा मारा आरंभला!

कल्पना करा... १९६३ च्या काळात हेल्मेट ही कल्पनेतच अस्तित्वात असताना आणि इतरही कोणतंही प्रोटेक्शन नसताना हॉल - ग्रिफीथ यांचे तुफान वेगाने आलेले बॉल डोक्यावर टोपीही न घालता खेळायचे...

हॉल - ग्रिफीथच्या बंपर्सच्या हल्ल्यावर क्लोजने काय उपाय काढला?

दोघांपैकी कोणीही शॉर्टपीच बॉल टाकला की तो बिनदिक्कतपणे क्रीज सोडून पुढे सरसावत होता! बॉल कितीही वर आला तरी डेड बॅटने कॅच जाणार नाही याची काळजी घेत खेळत होता. अनेकदा अंदाज चुकून बॉल त्याच्या कंबरेपासून खांद्यापर्यंत अनेक ठिकाणी आदळला! निश्चितच त्याला अनेकदा वेदना झाल्या असणार! परंतु आपली वेदना प्रतिस्पर्ध्याला दर्शवून त्याला इतकंही समाधान मिळू देईल तर तो क्लोज कसला?

चेहर्‍यावर वेदनेचं चिन्हं उमटू न देता तो प्रत्येक वेळी पुढचा बॉल खेळण्यास तयार होत होता!

अखेरीस ग्रिफीथच्या बॉलवर ड्राईव्ह मारण्याचा क्लोजचा प्रयत्न फसला आणि विकेटकीपर मरेने त्याच्या कॅच घेतला तेव्हा क्लोजने २३० मिनीटांत १९८ बॉल खेळून काढत ७० रन्स काढल्या होत्या!

इंग्लंडची ९ वी विकेट गेली तेव्हा मॅच संपण्यासाठी ३ बॉल बाकी होते. डॉन अ‍ॅलनच्या जोडीला एक हात प्लॅस्टरमध्ये असलेला कॉलिन कौड्री खेळायला आला! सुदैवाने कौड्रीला तशा अवस्थेत स्ट्राईक घ्यावा लागला नाही!

मॅच संपल्यावर दुसर्‍या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये क्लोजच्या उघड्याबंब देहाचा फोटो प्रदर्शित झाला! हॉल आणि ग्रिफीथच्या चेंडूंचा मार खाऊन खाऊन त्याच्या छातीवर आणि खांद्यांवर अनेक ठिकाणी काळे-निळे डाग पडले होते!

वृत्तपत्रांनी आणि समिक्षकांनी क्लोजवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. लेन हटनने त्याला पत्रं लिहून त्याच्या झुंजार खेळीबद्दल आणि लढाऊवृत्तीबद्दल अभिनंदन केलं. खुद्दं चार्ली ग्रिफीथने 'मी पाहिलेली सर्वोत्कृष्ट इनिंग्ज' अशा शब्दांत क्लोजचं अभिनंदन केलं!

ब्रायन क्लोजची वेस्ट इंडीजला पाहयला मिळालेली ही पहिली चुणूक होती!

मात्रं इंग्लिश सिलेक्टर्सच्या लहरीपणाचा क्लोजला फटका बसलाच! वेस्ट इंडीज विरुद्धच्या या सिरीजनंतर सिलेक्टर्सनी क्लोजला पुन्हा डच्चू दिला!

यॉर्कशायर कौंटीने मात्रं क्लोजच्या नेतृत्वाखाली १९६३ साली कौंटी चँपियनशीप पटकावली होती. पुढे १९६६, ६७, ६८ मध्ये यॉर्कशायरने कौंटी विजेतेपदाची हॅटट्रीक केली तेव्हाही क्लोजच कॅप्टन होता!

१९६६ मध्ये वेस्ट इंडीज पुन्हा इंग्लंडच्या दौर्‍यावर आलेले होते. पहिल्या चारपैकी तीन टेस्ट जिंकून त्यांनी सिरीजमध्ये ३ - ० अशी विजयी आघाडी घेतली होती. इंग्लिश सिलेक्टर्सवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती. तातडीचा उपाय म्हणून सिलेक्टर्सना आठवण झाली ती नुकतीच कौंटी चँपियनशीप जिंकलेल्या यॉर्कशायरच्या यशस्वी कॅप्टन क्लोजची!

पाचव्या टेस्टच्या आधी आपल्या सहकार्‍यांशी बोलताना क्लोज म्हणाला,

"I shouldn't be here if we hadn't made such a mess of the series. What's more, neither would a few of you. You are here because you are all fighters, and we are going to keep the pressure on and keep it on for five days."

आपल्या सहकार्‍यांच्या अहंकाराला आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याच्या झुंजार वृत्तीला कॅप्टन क्लोजने नेमक्या शब्दांत हात घातला होता!

याचा परिणाम लगेच दिसून आला!

वेस्ट इंडीजच्या २६८ रन्सच्या उत्तरार्थ खेळायला उतरलेल्या इंग्लंडची इलिंगवर्थ बाद झाला तेव्हा १६६ / ७ अशी अवस्था झाली होती. बॉयकॉट, बार्बर, एड्रीच, एमिस, डॉलीव्हिएरा, इलिंगवर्थ आणि खुद्द क्लोज स्वस्तात परतले होते. परंतु एका बाजूने टॉम ग्रेव्हनी पाय रोवून उभा होता. विकेटकीपर जॉन मरेच्या सहाय्याने ग्रेव्हनीने २१७ रन्सची पार्टनरशीप करुन मॅचचा रंग पालटून टाकला! ग्रेव्हनी (१६५) परतल्यावरही, मरे (११२), केन हिग्ज (६३) आणि जॉन स्नो (५९*) यांच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने तब्बल ५२७ पर्यंत मजल मारली. हिग्ज आणि स्नो हे वास्तविक शेवटचे बॉलर्स, पण क्लोजच्या प्रोत्साहनावर त्यांनी शेवटच्या विकेटसाठी तब्बल १२८ रन्सची पार्टनरशीप केली!

इतक्यावरच क्लोजचं समाधान झालं नव्हतं!

वेस्ट इंडीजची अवस्था १३७ / ५ अशी झाली होती. हंट, मॅकमॉरीस, कन्हाई, बेसिल बुचर (६०) आणि हॉलफोर्ड बाद झाल्यावर खेळायला आला गॅरी सोबर्स!

या सिरीजमधल्या पहिल्या चारही टेस्ट्समध्ये गॅरी सोबर्स तुफान फॉर्मात होता. सोबर्सला आऊट केल्याशिवाय आपल्याला मॅच जिंकता येणार नाही हे क्लोजला पक्कं ठाऊक होतं. त्यासाठी त्याच्याकडे उपायही तयार होता!

सोबर्स हूक मारण्यात पटाईत होता. शॉर्टपीच बॉल पडला की सोबर्सचा पहिला पवित्रा नेहमी हूक मारण्याचाच असे. सोबर्सच्या याच पवित्र्याचा फायदा उठवण्याचा क्लोजने बेत केला होता!

सोबर्सला बाऊन्सर टाकण्याची त्याने जॉन स्नो ला सूचना केली. सोबर्सने हूक केल्यावर फॉरवर्ड शॉर्टलेगला त्याचा कॅच घेण्याची क्लोजची योजना होती! त्यासाठी फॉरवर्ड शॉर्टलेगला उभा होता स्वतः क्लोज!

क्लोजचा हा बेत आत्मघातकी होता!

हूकवर कमालीचा ताबा असलेल्या सोबर्सने टायमिंग साधून हूक केला असता तर हेल्मेटविना फॉरवर्ड शॉर्टलेगला फिल्डींग करत असलेल्या क्लोजला बॉल लागला तर गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता होती! परंतु क्लोजला त्याची फारशी पर्वा नव्हती! त्याचं तत्वज्ञान अगदी सरळ होतं.

"How can a cricket ball hurt you? It’s on you for less than a second!"

अर्थात फॉरवर्ड शॉर्टलेगला उभं राहण्याची क्लोजची ही पहिलीच वेळ नव्हती! यापूर्वीही यॉर्कशायरसाठी अनेकदा तो फॉरवर्ड शॉर्टलेगला बेधडकपणे उभा राहिलेला होता! एकनाथ सोळकरचा उदय होण्यापूर्वी फॉरवर्ड शॉर्टलेगचा ब्रायन क्लोज हा अनभीषिक्त सम्राट होता!

क्लोजच्या सूचनेप्रमाणे जॉन स्नोने बंपर टाकला. अपेक्षेप्रमाणे सोबर्सने हूक मारला!
दुसरा कोणताही फिल्डर असता तर त्याने बचावाचा पवित्रा घेतला असता!
किमान पाठतरी फिरवली असती!
एखादं पाउल मागे घेतलं असतं...
परंतु ब्रायन क्लोज?

क्लोज जागेवर निश्चलपणे उभा होता!
सोबर्सने हूक केलेला बॉल त्याच्या हातात आला होता!

Sobers c Close b Snow 0

क्लोजचा धाडसी बेत यशस्वी ठरला होता!
गॅरी सोबर्स पहिल्या बॉलवर बाद होऊन परतला होता!

गार्डीयनचा पत्रकार माईक सिल्व्ही म्हणतो,

As Sobers' blade whirled its intent has there ever been anyone who would not have ducked, dived for cover, turned away, covered up, or flinched? Honestly? Close was impassive. He did not blink or move a muscle. There is no one else who could have taken that catch, in that way. So the question can be repeated: is it possible for the greatest catch also to be the simplest? I think it can.

सेमूर नर्सचा (७०) अपवाद वगळता कोणीही इंग्लिश बॉलिंगसमोर टिकाव धरु शकलं नाही! वेस् हॉल (२९) आणि चार्ली ग्रिफीथ (१७) यांनी थोडाफार प्रतिकार केला, परंतु ते वेस्ट इंडीजचा पराभव मात्रं टाळू शकले नाहीत!

इंग्लंडने इनिंग्ज आणि ३४ रन्सने वेस्ट इंडीजवर मात केली होती!
खेळाडू म्हणून क्लोज अपयशी ठरला असला तरी कॅप्टन म्हणून ही मॅच जिंकण्यात क्लोजचा सिंहाचा वाटा होता!

१९६७ मध्ये भारत आणि पाठोपाठ पाकिस्तानविरुद्धच्या सिरीजमध्ये क्लोज कॅप्टन म्हणून कायम होता. भारताविरुद्ध क्लोजने ३ - ० असा आरामात विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्ध पहिली मॅच पावसामुळे ड्रॉ झाली, परंतु दुसर्‍या टेस्टमध्ये इंग्लंडने पाकिस्तानवर १० विकेट्सने आरामात विजय मिळवला होता!

तिसर्‍या टेस्टच्या आधी एजबॅस्टनच्या मैदानावर यॉर्कशायर आणि वॉरीकशायर यांच्यात मॅच होती. वॉरीकशायरला मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या १०० मिनीटांत १४२ रन्सची आवश्यकता होती. परंतु खेळ संपला तेव्हा वॉरीकशायरच्या १३३ रन्स झाल्या होत्या. परंतु या १०० मिनीटांत यॉर्कशायरच्या बॉलर्सनी केवळ २४ ओव्हर्स टाकल्या होत्या! त्यातही शेवटच्या दोन ओव्हर्ससाठी तब्बल १५ मिनीटं घेतली होती! दवामुळे ओला झालेला बॉल कोरडा करण्यासाठी अनेकदा टॉवेलला पुसणं भाग पडत होतं. परंतु प्रेक्षकांच्या आणि इंग्लिश ढुढ्ढाचार्यांच्या मते हा वेळकाढूपणा होता! त्यातच एक निराळीच भानगड उद्भवली...

वॉरीकशायरच्या चाहत्यांपैकी एकाने यॉर्कशायरच्या खेळाडूंवर वेळकाढूपणाचा आरोप केला. क्लोजच्या कानावर हा आरोप जाताच त्याने त्या माणसाला उद्देशून काही अपशब्दं उच्चारले! परंतु क्लोजचा गोंधळ झाल्यामुळे ज्या प्रेक्षकाने हा आरोप केला होता त्याच्या ऐवजी दुसर्‍याच एका माणसाला त्याने खास ठेवणीतलं सुनावलं होतं!

मॅच संपल्यावर परतताना क्लोज वॉरीकशायरचा कॅप्टन माईक स्मिथला म्हणाला,

"Bad luck, Mike, you played better than we did. But I couldn't give you the game!"

"I quite understand." स्मिथ समजून उत्तरला.

यॉर्कशायरच्या कमिटीतील ब्रायन सेलर्स प्रभृतींचा पारा मात्रं या प्रकरणामुळे चढला होता! क्लोजसारख्या वादळी व्यक्तिमत्वाला लगाम घालण्याची सेलर्सला संधीच हवी होती. त्याने ताबडतोब क्लोजकडून माफीनामा लिहून मागितला. एवढंच करुन सेलर्स थांबला नाही! त्याने तो माफीनामा एम सी सी ला पाठवला आणि वृत्त्तपत्रांत छापून येईल याचीही त्याने काळजी घेतली! परिणामी एम सी सी च्या सदस्यांनी वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर जाणार्‍या संघातून क्लोजची हकालपट्टी केलीच, शिवाय पाकिस्तानविरुद्धची टेस्ट ही कॅप्टन म्हणून तुझी शेवटची टेस्ट हे देखिल क्लोजला ठणकावलं!

निराश झालेल्या मनस्थितीतही क्लोजने पाकिस्तानविरुद्धची टेट जिंकली!
७ टेस्टमध्ये इंग्लंडचं नेतृत्व करणार्‍या क्लोजने ६ टेस्ट्स जिंकल्या होत्या तर उरलेली १ मॅच ड्रॉ झाली होती!

१९६९ च्या मोसमात दुखापतीमुळे क्लोज केवळ १९ मॅचेस खेळू शकला होता. परंतु वन डे क्रिकेटची चँपियनशीप - जिलेट कप त्याने यॉर्कशायरला जिंकून दिला होता. परंतु असं असूनही वन डे बद्दल क्लोजचं मत कायमच प्रतिकूल होतं! खेळाडूच्या क्षमतेचा खरा कस वन डे मध्ये लागत नाही असं त्याचं स्पष्टं मत होतं!

१९७० मध्ये क्लोज पुन्हा एकदा वादात सापडला!

काऊंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायर आणि लँकेशायर हे एकमेकांचे हाडवैरी म्हणून ओळखले जातात! ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरच्या मैदानावर लँकेशायरविरुद्धच्या वन डे मॅचमध्ये पराभव पदरी पडल्यावर आधीच क्लोज घुश्श्यात होता. नेमका त्याचवेळी लँकेशायरचा प्रेसिडेंट असलेला लिओनेल लिस्टर यॉर्कशायरच्या ड्रेसिंगरुममध्ये आला. लिस्टर कोण आहे हे अर्थातच क्लोजला माहीत नव्हतं. दोघांची जोरदार खडाजंगी झाली! आपल्या फटकळ स्वभावाला अनुसरुन क्लोजने त्याला चार शब्दं सुनावलेच!

लिस्टरने यॉर्कशायरच्या प्रेसिडेंटकडे क्लोजची तक्रार केली!
यॉर्कशायरचा प्रेसिडेंट होता क्लोजचा जुनाच वैरी ब्रायन सेलर्स!

आपली चूक ध्यानात आल्यावर क्लोजने लिस्टरची बिनशर्त माफी मागितली. पण या संधीचा फायदा न घेईल तर तो सेलर्स कसला? क्लोजला हाकलण्यासाठी टपलेल्या सेलर्सने १९७० च्या नोव्हेंबरमध्ये त्याच्यासमोर दोन पर्याय ठेवले.

एक म्हणजे क्लोजने स्वतः कॅप्टनपदाचा राजीनामा द्यावा
किंवा
यॉर्कशायरची कमिटी क्लोजची हकालपट्टी करेल!

क्लोजने आधी राजीनामा देण्याचं मान्यं केलं खरं, पण आपल्या वकिलाचा सल्ला घेतल्यावर त्याने तो बेत रद्दं केला!

अर्थातच यॉर्कशायरने त्याची हकालपट्टी केली!

मात्रं हकालपट्टी करताना दिलेलं कारण अगदीच विसंगत होतं! क्लोज कर्णधार म्हणून आपल्या सहकार्‍यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यास कमी पडला असल्याचं आणि तरूण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात अपयशी ठरला असल्याचं यॉर्कशायरच्या कमिटीच्या सदस्यांनी नमूद केलं!

परंतु क्लोजने लिहीलेला बिनशर्त माफीनामा कमिटीच्या सदस्यांपर्यंत पोहोचलाच नाही!

ब्रायन सेलर्सने तो मध्येच दडपला!

क्लोजसारखा अनुभवी आणि यशस्वी कॅप्टन आपल्या संघात यावा यासाठी कोण प्रयत्न करणार नाही? लँकेशायर, ग्लॅमर्गन, मिडलसेक्स, लिस्टरशायर या सर्वांनी क्लोजला साकडं घातलं, पण क्लोजने निवड केली ती सॉमरसेटची!

१९७२ मध्ये क्लोजची सॉमरसेटचा कॅप्टन म्हणून नेमणूक झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सिरीजसाठी कॅप्टन म्हणून इंग्लंडनेही क्लोजला पुन्हा आवतण दिलं. क्लोजने ही मालिका २ - १ अशी जिंकली खरी, पण चाळीशी ओलांडलेला क्लोज कसोटीपासून दूरच राहिला होता.

जागतिक क्रिकेटच्या दृष्टीने क्लोजचं यॉर्कशायरहून सॉमरसेटला जाणं उपकारक ठरलं!

क्लोज सॉमरसेटचा कॅप्टन असताना दोन तरूण खेळाडू त्याच्या संघात आले होते!

एक कॅप्टन म्हणून क्लोजच्या विचारसरणीचा त्यांच्यावर कायमचा प्रभाव पडला होता! या दोघांनाही आपापल्या क्षमतेची पूर्ण जाणिव करुन दिली ती क्लोजनेच! त्यांच्यातील कच्चे दुवे शोधत आणि त्यावर मात करण्यासाठी त्यांना सतत प्रोत्साहन देत त्याने क्रिकेटकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन आमुलाग्रपणे बदलून टाकला! क्लोजच्या पंखाखाली आल्यामुळे एक क्रिकेटर म्हणून दोघंही खूपच लवकर परिपक्वं झाले होते!

कोण होते हे दोघं?

व्हिव्हियन रिचर्ड्स आणि इयन बोथम!

बोथम म्हणतो,

"There was a genuine enthusiasm for cricket which rubbed off on all those playing alongside him. You couldn't help but get excited by the game."

इंग्लंडला पुन्हा ब्रायन क्लोजची आठवण झाली ती १९७६ साली!

१९७६ साली वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर येणार होता. क्लोजचा चेला असलेला व्हिव्हियन रिचर्ड्स अर्थातच या संघात होता. लॉईड, रिचर्ड्स, ग्रिनीज, कालीचरण, रॉय फ्रेड्रीक्स असे एकापेक्षा एक बॅट्समन वेस्ट इंडीजकडे होते आणि बॉलर्स?

अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डींग, वेन डॅनियल, व्हॅनबर्न होल्डर!

त्यातच हा दौरा सुरू होण्यापूर्वीच एक वाद निर्माण झाला होता!

इंग्लंडच्या कॅप्टनपदावर असलेल्या टोनी ग्रेग साहेबांनी वेस्ट इंडीजच्या संघाचा उल्लेख करताना तारे तोडले होते!
एका मुलाखतीत टोनी ग्रेग म्हणाला,

The West Indians, these guys, if they get on top are magnificent cricketers. But if they're down, they grovel, and I intend, with the help of Closey and a few others, to make them grovel!

टोनी ग्रेगच्या या मुलाखतीमुळे गहजब झाला!

Grovel हा शब्दं वेस्ट इंडीयन लोकांच्या दृष्टीने अत्यंत अपमानास्पद आहे. त्याचा थेट संबंध गुलामगिरीशी आहे. वेस्ट इंडीजमधील बहुतेक सर्वांची पार्श्वभूमी गुलामगिरीची असल्याने नेमक्या या शब्दाचा उल्लेख झाल्याने तो त्यांच्या जिव्हारी लागला होता! त्यात टोनी ग्रेग हा मूळचा वर्णद्वेषी दक्षिण आफ्रीकेत जन्मलेला असल्याने या वक्तव्याला वर्णद्वेषाची वेगळीच किनार लाभली होती! वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला तो इंग्लंडची धूळधाण उडवण्याच्या हेतूनेच!

वास्तविक Grovel हा शब्दं वापरण्यामागे टोनी ग्रेगचा हेतू वर्णभेदाचा किंवा मुद्दाम वेस्ट इंडीयनांचा अपमान करण्याचा नव्हता हे पुढे खुद्दं मायकेल होल्डींगने ठणकावून सांगितलं! परंतु त्यावेळी मात्रं व्हायचा तो परिणाम होऊन गेला होता! होल्डींग, रॉबर्ट्स, रिचर्ड्स, लॉईड सर्वांचे हात नुसते शिवशिवत होते!

एम सी सी च्या संघाविरुद्धच्या सराव सामन्यात वेस्ट इंडीजच्या बॉलर्सनी जवळपास टेस्ट खेळाडूंचा संघ असलेल्या एम सी सी च्या संघाची अक्षरशः वाताहात केली होती! इंग्लंडच्या संघातील सध्याच्या कोणत्याही खेळाडूची वेस्ट इंडीजच्या या तोफखान्यासमोर उभं राहण्याची क्षमता नव्हती असं सिलेक्टर्सचं मत पडलं. अत्यंत थंड डोक्याच्या पण तितक्याच धाडसी आणि झुंजार खेळाडूच या बोलिंगचा मुकाबला करु शकेल यावर त्यांचं एकमत झालं होतं.

.... आणि इंग्लंडला आठवण झाली ती ब्रायन क्लोजची!

क्लोज एव्हाना ४५ वर्षांचा होता!

१९४७-४८ मध्ये वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर गेलेल्या कॅप्टन गबी अ‍ॅलनचा (४७ वर्षे!) अपवाद वगळता क्लोज दुसर्‍या महायुद्धानंतर इंग्लंड्कडून टेस्ट खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार होता!

(टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वयस्कर खेळाडू अर्थात ५२ व्या वर्षी टेस्ट खेळलेला विल्फ्रेड र्‍होड्स!)

टोनी ग्रेगच्या इंग्लिश संघात वयस्कर खेळाडूंचा भरणा होता! ४५ वर्षांच्या क्लोजच्या जोडीला ३९ वर्षांचा जॉन एड्रीच, ३४ वर्षांचे माईक ब्रेअर्ली आणि डेव्हीड स्टील हे दोघं होते! इंग्लंडच्या संघात आपली निवड होण्याची शक्यता असल्याचं कळल्यावर क्लोज उद्गारला,

"It is not so much a case of Dad's Army as Grandad's Army!"

अनुभवी आणि झुंजारवृत्तीच्या वयस्कर खेळाडूंची निवड करण्याची इंग्लंडची चाल सुरवातीला तरी यशस्वी ठरली. एड्रीचने पहिल्या टेस्टमध्ये अर्धशतक झळकावलं तर क्लोजने दुसर्‍या. खराब हवामानाचा फायदा मिळाल्यामुळे दोन्ही टेस्ट्स ड्रॉ करण्यात इंग्लंडला यश आलं असलं, तरी टोनी ग्रेग मात्रं साफ अपयशी ठरला होता!

पहिल्या दोन्ही टेस्ट्समध्ये ओपनर म्हणून माईक ब्रेअर्ली अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्या जागी क्लोजने सलामीला यावं अशी सिलेक्टर्सनी सूचना दिली! सिलेक्टर्सची ही अपेक्षा कॅप्टन टोनी ग्रेगने क्लोजच्या कानावर घातल्यावर क्लोज उद्गारला,

"You must be bloody crackers. I haven't opened the innings in a first-class match for several years!"

बॉब वूल्मर हा दुसरा ओपनिंग बॅट्समन संघात होता. असं असूनही आपल्याला ओपनिंगला जाण्याची सूचना का केली जात आहे हा क्लोजचा प्रश्न होता!

"What's the matter with Bob Woolmer?"

"'We don't want him killed off!" ग्रेग उत्तरला, "There is a lot of Test cricket left in him!"

"Anything could happen with the new ball against West Indies and I had pulled the team out of trouble in the first two Tests at Trent Bridge and Lord's. It's stupid asking me to open the innings!"

अर्थात संघहिताला कायम प्राधान्य देणारा क्लोज एड्रीचच्या जोडीला सलामीला येणार यात टोनी ग्रेगसकट कोणालाच शंका नव्हती!

गॉर्डन ग्रिनीजच्या १३४ रन्सच्या जोरावर वेस्ट इंडीजने पहिल्या इनिंग्जमध्ये कशीबशी २११ पर्यंत मजल मारली. कॉलीस किंगचा (३२) अपवाद वगळता कोणालाच फारसं काही करता आलं नाही!

रॉबर्ट्स आणि होल्डींगच्या तोफखान्याचा सामना करण्यासाठी उतरले ३९ वर्षाचा जॉन एड्रीच आणि ४५ वर्षांचा ब्रायन क्लोज!

सुमारे अर्था तास रॉबर्ट्स आणि होल्डींगला तोंड दिल्यावर क्लोजला डॅनियलने एल बी डब्ल्यू पकडलं! अर्ध्या तासात क्लोजने २ रन्स काढल्या होत्या! एड्रीचने सुमारे पावणेदोन तासात ६९ चेंडूत ८! अर्थात डेव्हीड स्टीलचा (२०) अपवाद वगळता कोणाला १० रन्सही करता आल्या नाहीत! होल्डींगने ५, रॉबर्ट्सने ३ आणि डॅनियलने २ विकेट्स घेत इंग्लंडचा ७१ रन्समध्ये खिमा केला!

वेस्ट इंडीजच्या बॅट्समनना पहिल्या इनिंग्जमधलं अपयश चांगलंच खुपलं असावं! इंग्लिश बॉलर्सवर सूड उगवण्याच्या इराद्याने खेळत त्यांनी फटकेबाजीला सुरवात केली. ग्रिनीजने (१०१) पहिल्या इनिंग्जप्रमाणे दुसर्‍या इनिंग्जमध्येही सेंचुरी ठोकली, तर रिचर्ड्सनेही (१३५) वाहत्या गंगेत हात धुवून घेतला! ग्रिनीजचा सलामीचा जोडीदार रॉय फ्रेड्रीक्सनेही ५० रन्स फटकावून घेतल्या!

...अर्थात क्लोजच्या बेडरपणाची आणि चाणाक्षपणाची झलक फिल्डींग करतानाही दिसलीच!

डावखुर्‍या अल्वीन कालीचरणला स्वीप मारण्याची विशेष आवड होती. अर्थात स्वीप शॉटवर त्याची हुकूमतही जबरदस्तं होती. पण क्लोजने त्याला स्वीपच्याच जाळ्यात अडकवण्याचा प्लान आखला! ऑफस्पिनर पॅट पोकॉकला त्याने लेगस्टंपच्या दिशेने बॉलिंग करण्याची सूचना दिली. पोकॉक आणि विकेटकीपर अ‍ॅलन नॉटला आपला प्लान समजावताना क्लोज म्हणाला,

'He will sweep. I'll field at short leg, I'll block the shot with my chest and Knotty you take the catch!'

४६ व्या वर्षी हेल्मेट किंवा इतर कोणत्याही संरक्षक गोष्टीविना फॉरवर्ड शॉर्टलेगला उभं राहण्याची क्लोजची जिगर कोणत्या तागडीने तोलायची?

पोकॉकच्या बॉलिंगवर कालीचरणने स्वीप मारला, पण तो टॉप एज झाला आणि क्लोजच्या हाती आरामात कॅच आला! छातीने बॉल अडवण्याची त्याला जरुरच पडली नाही!

परंतु ब्रायन क्लोजच्या करिअरचा कळसाध्याय अद्याप बाकी होता!

तिसर्‍या दिवशी टी टाईमनंतर वेस्ट इंडीजने ४११ / ५ या स्कोरवर आपली दुसरी इनिंग्ज डिक्लेअर केली. इंग्लंडला जिंकण्यासाठी अशक्यप्राय असं ५५२ रन्सचं लक्ष्यं होतं!

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपायला अद्याप ८० मिनीटं बाकी होती.

रॉबर्ट्स, होल्डींग आणि डॅनियल यांचा सामना करण्यासाठी मैदानात उतरले होते जॉन एड्रीज आणि ब्रायन क्लोज!

पुढ्ची ८० मिनीटं क्लोज आणि एड्रीच रॉबर्ट्स, होल्डींग आणि डॅनियलच्या बाँबगोळ्यांसमोर अचलपणे उभे होते!

क्लोज म्हणतो,

"That was the worst Test wicket, Old Trafford, at the time we played on! It was very dry. The groundsmen weren't allowed to use water while preparing wickets. Therefore the faster you bowled, the ball went through the top surface and lifted and did all kinds of things. I remember one Roberts ball pitched short of a length and nearly rolled along the floor."

बॉलिंग जितकी घातक होत गेली तितकाच एड्रीचने बचावात्मक पवित्रा स्वीकारला. परंतु क्लोज?

यॉर्कशायरचा खडूसपणा आणि जिगर पुरेपूर मुरलेला क्लोज एक पाऊलही मागे हटण्यास तयार नव्हता! मायकेल होल्डींगने टाकलेला प्रत्येक भयानक बॉल तो सरळ आपल्या अंगावर घेत होता किंवा शेवटच्या क्षणी सोडून देत होता!

कोणत्याही परिस्थितीत डिफेन्सिव पद्धतीने बॉल खेळून कॅच जाऊ द्यायचा नाही हे क्लोजने पक्कं ठरवलं होतं! १९६३ मध्ये हॉल आणि ग्रिफीथ विरुद्ध हेच डावपेच त्याने यशस्वीपणे वापरले होते!

१९७६ मध्ये एका ओव्हरमध्ये किती बाऊन्सर्स टाकावेत यावर काही बंधन नव्हतं! डेली टेलीग्राफमध्ये वेस्ट इंडीज बॉलर्सच्या आकडेवारीची जी जंत्री आली होती त्यावरुन एक गोष्टं कळून आली ती म्हणजे रॉबर्ट्स, होल्डींग आणि डॅनियल यांच्या ७८ बॉल्सपैकी केवळ १० बॉल स्टंपला लागू शकतील असे होते!

बाकी सर्व बंपर्स होते!

क्लोजच्या सर्वांगावर अनेक वेळा बॉल आदळला होता! परंतु केवळ दोन वेळा वेदनेची किंचितशी झलक त्याच्या चेहर्‍यावर उमटली! होल्डींगचा बॉल एकदा मांडीवर लागल्यावर आणि एकदा छाताडावर आपटल्यावर! अर्थात जिथे बॉल आदळला होता तिथे साधं चोळण्याचेही कष्टं त्याने घेतले नाहीत. डॉक्टरकडून उपचार करुन घेणं तर खूप दूर राहिलं! काहीही झालं तरी प्रतिस्पर्ध्याला आपल्या वेदना दर्शवायच्या नाहीत! त्याला यत्किंचीतही मानसिक समाधान मिळता कामा नये हे क्लोजचं ब्रीद होतं!

व्हिव्हियन रिचर्ड्स स्लीपमध्ये उभा होता. कितीही झालं तरी क्लोज सॉमरसेटमध्ये त्याचा कॅप्टन आणि मार्गदर्शक होता. आपल्या सहकार्‍यांना क्लोजला आपण सहानुभूती दर्शवत आहोत याची यत्किंचीतही जाणिव न देता दोन ओव्हर्सच्या मध्ये क्लोजच्या बाजूने जाताना रिचर्ड्सने हळूच त्याची चौकशी केली,

"Are you all right, cappy? Are you all right?"

"Fuck off! Go to hell!" क्लोज उत्तरला!

त्याबद्दल बोलताना नंतर रिचर्ड्स म्हणाला,

"I was amazed! It was that moment I realized how tough man he was! No sympathies please!"

मायकेल होल्डींगच्या एका भन्नाट ओव्हरमध्ये तर त्याने क्लोजला लागोपाठ तीन बंपर्स टाकले! एका बॉलवर तर अगदी एक शतांश सेकंद आधी क्लोजने आपलं डोकं बाजूला घेत दुखापत टाळली! हा बॉल त्याच्या डोक्याला लागला असता तर क्लोज भयानक जखमी होण्याची शक्यता होती कारण तो डोक्याच्या मागच्या बाजूस लागला असता!

लागोपाठ तीन बंपर्सनंतर मात्रं अंपायर बिल अ‍ॅलीने होल्डींगला बंपर्सचा मारा आवरता घेण्याची सूचना दिली! अर्थात होल्डींगवर त्याचा काही परिणाम झाला नाही हा भाग वेगळा! परंतु अंपायरच्या या सूचनेवर क्लोज मात्रं नाखूश दिसला! शॉर्टपीच बॉल स्टंपला लागू शकत नाही आणि त्यामुळे आपण आऊट होत नाही हे त्याचं साधं गणित होतं!

बी बी सी चा पत्रकार जोनाथन अ‍ॅगन्यू म्हणतो,

"A 45-year-old man up against a lithe, magnificent young fast bowler, bowling at his very fastest. No helmet, no chest pad, no arm guard and he had a little thin towel tucked over his right thigh to try to prevent the bruising!"

पॅट पोकॉक म्हणतो,

"Close no longer had the technique to play Test cricket. He just had the most guts of anyone who walked onto a cricket field!"

तिसर्‍या क्रमांकावर येणार्‍या डेव्हीड स्टीलला मायग्रेनचा त्रास होत असल्यामुळे त्याच्या जागी बॉब वूल्मरची वर्णी लागली होती! क्लोज आणि एड्रीचना वेस्ट इंडीजचा मुकाबला करताना पाहून वूल्मर मनातून हादरला होता. आपल्या जागी वूल्मर तिसर्‍या क्रमांकावर खेळण्यास तयार आल्याबद्दल स्टीलने त्याचे आभार मानले.

"I would repay the favour one day!" स्टील वूल्मरला म्हणाला.

"I hope I live to see that day!" वूल्मर शांतपणे उत्तरला!

अखेरीस दिवसाचा खेळ एकदाचा संपला!

मायकेल होल्डींगची ती भयानक ओव्हर
https://www.youtube.com/watch?v=w-f5pfBgpNE

वेस्ट इंडीजच्या तोफखान्याला ८० मिनीटं नैनं धिन्दन्ती शस्त्राणी नैनं दहती पावकः च्या थाटात तोंड देऊन क्लोज आणि एड्रीच दोघंही नॉटआऊट होते!

दोघं ड्रेसिंगरुममध्ये परतले तेव्हा तिथे स्मशानशांतता पसरलेली होती!
इतर सर्वजण भूत पाहिल्यासारखे क्लोजकडे पाहत होते!

एड्रीचच्या खदखदून हसण्याने अखेरीस शांतता भंगली...

"Closey, do you know what your score is?" कसंबसं हसू आवरत एड्रीचने स्कोरबोर्डकडे बोट दाखवत विचारलं, "One. Was it worth it?"

क्लोजने उत्तरादाखल आपला शर्ट काढला!

जागोजागी बॉल लागल्याच्या खुणा होत्या!
अनेक ठिकाणी काळपट डाग उमटले होते!
काही ठिकाणी बारीक जखमाही झाल्या होत्या!

सर्व जण अवाक् होऊन क्लोजकडे पाहत होते!

आणि क्लोजच्या चेहर्‍यावर स्मितहास्यं झळकत होतं!

"He stood there, no teeth, no hair and a big grin," डेव्हीड स्टील म्हणतो, "He loved it. He bloody loved it."

"You should see the state of the ball.." क्लोज थंडपणे आपल्या सहकार्‍यांना म्हणाला, "There's no shine on it. It's all on me."

काय बोलावं हे कोणालाच कळत नव्हतं!

इंग्लंड संघाच्या डॉक्टरने क्लोजला हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. क्लोज त्याला इतकंच म्हणाला,

"I'll be all right, lad! Just give me a Scotch!"

माईक सिल्व्ही म्हणतो,

"I can't speak too highly of Closely that night. Everybody, myself included, used to regard him as a bit of a joke, a caricature. He was mad, I don't mean in a derogatory way. But what we saw was an extremely brave man. He went up massively in my esteem, as did Edrich."

इंग्लिश वृत्तपत्रांनी वेस्ट इंडीज बॉलर्सच्या बंपर्सच्या अतिरेकाबद्दल टीकेची झोड उठवली. त्यांच्या टीकेचं मुख्य लक्ष्यं होता अर्थातच कॅप्टन क्लाईव्ह लॉईड! आपल्या बॉलर्सच्या बंपर्सच्या अतिवापराबद्दल आणि त्यांना लगाम घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल वृत्तपत्रांनी लॉईडलाच जबाबदार धरलं.

लॉईड म्हणाला,

"Our fellows got carried away. They knew they had only 80 minutes that night to make an impression and they went flat out, sacrificing accuracy for speed. They knew afterwards they had bowled badly."

काही वर्षांनी त्या घटनेबद्दल बोलताना लॉईड म्हणाला,

"Close and Edrich were just past it and couldn't get out of the way of the ball. They were just paralysed!"

टोनी ग्रेगने मात्रं सर्वस्वी बॉलर्सना दोष दिला नाही. तो म्हणतो,

"Two of the bravest English batsmen of my time were reduced to wrecks by a short-pitched assault unparalleled in its danger, in my experience. Maybe the bowlers were allowed too many bouncers, but on a respectable wicket the threat would have been halved."

लॉईडने वृत्तपत्रांच्या टीकेला फारसं महत्वं दिलं नसलं तरी त्याच्यावर आणि एकूणच वेस्ट इंडीज टीमवर काहीतरी परिणाम निश्चितच झाला होता. चौथ्या दिवशीच्या खेळात बंपर्सचं प्रमाण जवळपास नगण्य होतं!

एड्रीच आणि क्लोजने सकाळी इंग्लंडचा स्कोर ५४ पर्यंत नेल्यावर अखेर डॅनियलच्या बॉलवर एड्रीच बोल्ड झाला! क्लोज आणि एव्हाना मायग्रेनमधून सावरलेला स्टील या धक्क्यातून सावरत असतानाच रॉबर्ट्सने क्लोजच्या स्टंप्सवर झडप घातली!

ज्या बॉब वूल्मरला वाचवण्यासाठी क्लोजला सलामीला पाठवलं होतं, त्या वूल्मरची पुढच्याच बॉलला रॉबर्ट्सने दांडी उडवली! इंग्लंड ६० / ३!

पावणेतीन तासात १०८ बॉलमध्ये २० रन्स काढून क्लोज परतला!

इंग्लंडच्या उरलेल्या बॅट्समनपैकी स्टील (१५), फ्रँक हेस (१८) आणि नॉट (१४) यांच्याशिवाय कोणीच काही करु शकलं नाही! वेस्ट इंडीजने इंग्लंडचा १२६ मध्ये खुर्दा केला आणि ४२५ रन्सनी मॅच गुंडाळली!

हीच क्लोजची शेवटची टेस्ट ठरली!

इंग्लिश सिलेक्टर्सनी पुढच्या दोन टेस्ट्ससाठीच्या टीममधून एड्रीच आणि क्लोज दोघांनाही ड्रॉप केलं! वेस्ट इंडी़जने उरलेल्या दोन टेस्ट्स आरामात जिंकून सिरीज ३ - ० अशी खिशात टाकली!

१९७७ च्या मोसमात क्लोज म्हणजे एक जिवंत दंतकथा बनला होता. मोसमाअखेर तो क्रिकेटमधून रिटायर झाला तेव्हा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ३५००० रन्स करण्यापासून तो अवघ्या ६ रन्सनी मागे होता!

यॉर्कशायर विरुद्ध न्यूझीलंडच्या मॅचमध्ये आपल्या शेवटच्या इनिंग्जमध्ये क्लोज खेळायला आला तेव्हा त्याच्या ३४९९० रन्स झाल्या होत्या. परंतु ४ रन्स केल्यावर लेग ग्लान्स करण्याच्या प्रयत्नात क्लोजच्या बॅटला लागून बॉल विकेटकिपरकडे गेला. न्यूझीलंड खेळाडूंच्या जोरदार अपीलनंतरही अंपायरने नॉट आऊट दिलेलं असूनही क्लोज सरळ ड्रेसिंगरुममध्ये परतला!

ग्लेन टर्नर म्हणाला,

"If we'd known how near he was to the landmark, we would have let him stay!"

क्लोजला मात्रं हे अर्थातच नामंजूर होतं!

तो एवढंच म्हणाला,

"It's an honourable game and that's the way I was brought up."

क्लोज हा टिपीकल यॉर्कशायरमन होता! खडूस तितकाच झुंजार, कमालीचा धाडसी आणि वज्रदेही!

आणि तितकाच वादग्रस्तं!

यॉर्कशायरचंच आणखीन एक कमालीचं वादग्रस्तं व्यक्तिमत्वं म्हणजे जेफ बॉयकॉट! बॉयकॉट आणि क्लोज यांचे वाद होणं अपरिहार्य होतं आणि तसे ते झालेही!

मायकेल होल्डींगने शेवटच्या टेस्टमध्ये क्लोजवर बंपर्सचा भितीदायक आणि संहारक हल्ला चढवला होता. अर्थात क्लोजच्या मनात होल्डींगबद्दल आढी असणं शक्यंच नव्हतं! निवृत्तीनंतर क्लोज आणि होल्डींग दोघं खूप जवळचे मित्रं झाले होते!

क्लोजला श्रद्धांजली वाहताना होल्डींग म्हणतो,

"His toughness was legendary! The mere fact that England thought that Brian Close at the age of 45 was the right man to be coming back to face the West Indies in 1976, with their four-pronged pace attack, just shows what they thought of him.

But even before that time, everyone knew of his toughness. There were famous pictures of him with all those bruises on his body when he batted against Wes Hall, when he just stood there and took the blows.

He was never one to shirk an issue, he was never one to back down, when they called him back at 45 to face West Indies he didn't say to anyone 'No, I am too old', he went out there and tried to do his best, and gave everything for his country.

Not just the toughest batsman, he was one of the toughest people around in the game!"

रेस्ट इन पीस ब्रायन क्लोज!
द मॅन ऑफ स्टील!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

शिवोऽहम्'s picture

3 Oct 2015 - 11:39 pm | शिवोऽहम्

लेख आवडला.

समीर_happy go lucky's picture

3 Oct 2015 - 11:42 pm | समीर_happy go lucky

जबरदस्त

बोका-ए-आझम's picture

3 Oct 2015 - 11:45 pm | बोका-ए-आझम

मस्त लेख स्पार्टेशअण्णा!

पैसा's picture

4 Oct 2015 - 12:03 am | पैसा

खूपच छान लिहिलंय!

प्रीत-मोहर's picture

4 Oct 2015 - 7:56 am | प्रीत-मोहर

Khup mast sparta

अद्द्या's picture

4 Oct 2015 - 9:28 am | अद्द्या

जबर लेख .

क्लोज साहेबाना सलाम :)

मुक्त विहारि's picture

4 Oct 2015 - 10:28 am | मुक्त विहारि

निव्वळ अप्रतिम...

सुधीर कांदळकर's picture

4 Oct 2015 - 10:48 am | सुधीर कांदळकर

जागवल्यात. धन्यवाद.

या सामन्याचे धावते वर्णन आम्ही रेडिओवर ऐकत होतो. टीव्हीमुळे रेडिओ आमच्या हातात सापडला होता म्हणून आम्ही टीव्हीला धन्यवाद दिले होते. ब्रायन जॉन्स्टन एक समालोचक होता. जॉन आर्लोट होता की नाही आठवत नाही. पण बहुधा पिअर्सन सुरीता, डिकी रत्नागर, ख्रिस्तोफर मार्टीन जेनकिन्स होते आणि बहुधा रिची बेनॉ देखील एक्सपर्ट असावा. आता फारच अंधुक आठवते.

जिगर कितीही असली तरी क्लोजचे तंत्र कच्चेच होते. इंग्लंडचे कोचिंग फलंदाजांचे तंत्र सुधारण्यात कमी पडले असे बर्‍याच जणांचे मत होते.

पण व्यक्तिश। आमच्या कोंडाळ्यात यात आमचे तीर्थरूप आणि एक शेजारी देखील होते ... तीन म्हातारे घेतल्यावर इंग्लंड हारणारच नाही तर काय होणार, इंग्लंडने आता केवळ टेनिस बॉल क्रिकेट खेळावे वगैरे... अशी इंग्लंडची टिंगल केली जात होती. शिवाजी पार्कला क्रिकेट खेळणार्‍या (सीझन बॉल क्रिकेट कधीही न खेळलेल्या) पोरांत देखील असेच बोलले जात होते.

यानंतरच्या एका मालिकेतल्या एका कसोटीत शेवटच्या दिवशी चहापानाला दुसर्‍या डावात केवळ दोन बळी गेले होते. मात्र चहापानानंतर तब्बल आठ गडी होल्डिंग आणि कंपनीने उखडले होते आणि इंग्लंडला धूळ चारली होती.

उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करून नकारात्मक डावपेच लढवणार्‍या गोर्‍यांना हारवल्याबद्दल आम्हाला बरेच वाटले होते. हॉकीतल्या अंडरकटिंगवर जे कधीच धोकादायक नव्हते आणि बॅडमिंटनमधल्या मिसबून सिडेकच्या स्पिनिंग सर्व्हीसवर गोर्‍यांनी बंदी आणलीच होती नंतर क्रिकेटमधल्या बाउन्सरवर देखील मर्यादा आणली आणि क्रिकेटमधला एक थरार कमी झाला. तेव्हा अनेक फलंदाज हेच बाउन्सर हेल्मेटशिवाय आणि जखमी न होता व्यवस्थित खेळू शकत असत. आपले गावस्कर, विश्वनाथ, चौहान, (श्रीकांत पण हेल्मेटशिवाय खेळू शकला असता). इंग्लंडचे ग्रेग, नॉट, वूल्मर, स्टील, ऑस्ट्रेलियाचे छॅपेल बंधू, रेडपाथ, गॅरी कोझियर, अष्टपैलू गिलमोर देखील. बाउन्सरवरच्या या मर्यादेमुळे प्रतिभावंत वेस्ट इंडियन तरूण इतर खेळांकडे वळले आणि आता तर वेस्ट इंडीज क्रिकेट जवळजवळ मृत्यूपंथाला लागले आहे. आता हाताच्या सांध्याच्या १५ अंशाच्या मर्यादेमुळे स्पिनही धोक्यात आले आहे. फक्त ग्रॅन्ट फ्लॉवरला गोरा असल्यामुळे यातून सूट मिळाली.

मस्त लेखाबद्दल पुन्हा धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

4 Oct 2015 - 10:53 am | चांदणे संदीप

स्पार्टाकस या नावाप्रमाणेच भव्य-दिव्य अचाट लेखन! ____/\____

योग्य माहिती संकलीत करून तिला रोचक वाचनीय रंग देणे हे या लेखावरून दिसते!

आजच्या पाच-पन्नास गार्डांसहित खेळणारे फलंदाज पाहून इथे त्या व्रणांसहित असलेल्या हस-या चेह-याच्या 'स्टील मॅन'ला एक कडक सलाम गेला! ____/\____
Sandy

चाणक्य's picture

4 Oct 2015 - 9:00 pm | चाणक्य

अभ्यासपूर्ण आणि रंजकपणे लिहिलेले स्पार्टाकस यांचे लेख म्हणजे मेजवानीच असते.

chetanlakhs's picture

5 Oct 2015 - 8:53 am | chetanlakhs

क्लोज चा फोटो बघून अनिल कुंबळे ची आठवण झाली..जबडा फ्राक्चर असूनपण त्याने सलग १४ ओवेर्स केलेली बोलिंग आणि लाराची विकेट..अफलातून

पैसा's picture

5 Oct 2015 - 10:13 am | पैसा

तेव्हा अनिल कुंबळे बॉलिंगला परत आलेला बघून लाराच्या चेहर्‍यावर जे भाव आले होते ते अजून लक्षात आहेत!

नाखु's picture

5 Oct 2015 - 10:20 am | नाखु

आणि पनरागमनाबाद्दल खास अभिनंदन.

मस्त आणि माहितिपुर्ण लेख

मस्त लेख. काही दिवसांपूर्वी या साहेबांबद्दल थोडे वाचले होते त्याची उजळणी झाली, लय आवडलं. आशेच ल्हीत र्‍हा.

नया है वह's picture

5 Oct 2015 - 2:01 pm | नया है वह

+१

ऋतुराज चित्रे's picture

6 Oct 2015 - 4:03 pm | ऋतुराज चित्रे

सोबर्ससारखा फलंदाज बॅटिंग करत असताना फॉ.शॉ.लेगला फिल्डींग करणे धोकादायकच होते, कारण सोबर्सची शॉर्टपीच बॉल हूक करण्याची आगाळीवेगळी शैली होती. सर्वसाधारण फलंदाज शॉर्टपीच बॉलला हूक करताना खालुन फटका मारुन हवेत भिरकावतात, परंतू सोबर्स शॉर्टपीच बॉलला वरुन खाली फटका मारुन बॉल जमिनीवर ठेवत असे त्यामुळे फॉ.शॉ.लेगला फिल्डींग करणे धोकादायक होते. परंतू निधड्या छातीच्या क्लोजने तो धोका समर्थपणे पेलला.

त्या कॅचबद्दल-
तो शॉर्टपीच बॉल हूक करताना सोबर्सचा अंदाज चुकला व बॉलने बॅटची खालची कडा स्पर्शुन पॅडवर आदळून फॉ.शॉ.लेगला उभ्या असलेल्या क्लोजच्या हातात विसावला.

राघव's picture

2 Dec 2018 - 9:51 pm | राघव

छान व्यक्तीचित्रण! :-)

वैमानिक डग्लस बेडर ची आठवण झाली!