दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
2 Oct 2016 - 1:26 am

ह्याआधी- दीपशिखा
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस

.

पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो, ट्रेनमध्ये एकटी बाई बघून लुटले आणि चालत्या गाडीतून ढकलून दिले. आपण हळहळतो, चुकचुकतो.आजकाल साधं जगणंही कसं सगळं अनसेफ झालंय अशा चर्चा करतो आणि पेपरचे दुसरे पान उघडत अजून एक चहा पितो. जेव्हा एखादी मुलगी एव्हरेस्ट चढून जाते अशी बातमी वाचताना तेव्हा तिच्याकरता आपसूकच कौतुकाचे शब्द आपल्या तोंडून बाहेर येतात, आणि ती जर एका पायाने एव्हरेस्ट चढली असेल तर कौतुकाचा शिडकावा जरा जास्त होतो आणि त्या आनंदात अजून एखाद कप चहाची मागणी होते. आपल्या रोजच्या रहाटगाडग्यात ती बातमी मग नुसती एक बातमीच होऊन राहते. पण हे सगळं अनुभवणारी 'ती' मात्र नवीन आशेने अजून एका चढाईचे नवे स्वप्न पाहू लागते. हो.. तीच, अरुणिमा सिन्हा. लखनौ मधल्या एका लहानशा गावात सिन्हा कुटुंब राहत होते. दोन मुली आणि एक मुलगा. वडिल आर्मीमध्ये इंजिनिअर आणि आई आरोग्य सेवेत अधीक्षक. एकंदरीत साधं सरळ मध्यमवर्गीय जगणं.. पण छोटी अरुणिमा अवघ्या ३ वर्षांची असताना पितृछत्र हरवले. आईने हिम्मत न हरता मुलांना लहानाचे मोठे केले, चांगले शिक्षण दिले. घरात सगळ्यांनाच खेळाची आवड होती. साहजिकच अरुणिमालाही खेळात रुची होती. तिला आठवते तेव्हापासून ती सायकल चालवते आहे, फूटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळते आहे. व्हॉलीबॉल मध्ये तर ती राष्ट्रीय स्तरावर खेळली पण तरीही खेळात करियर करावं असं तिला कधी वाटलं नव्हतं. पदवी नंतर पोस्ट ग्रॅजुएशन आणि त्यानंतर कायद्याचे शिक्षण ती घेत होती. एकीकडे नोकरी करण्याचा विचार सुरू होता.

नोकर्‍यांच्या जागा कमी आणि संख्या जास्त ही झळ इतरांप्रमाणेच तिलाही बसली. ती प्रयत्न करत होती. तिने २०११ मध्ये CSIF मध्ये अर्ज केला. लवकरच तिला कॉल लेटर आले पण त्यात तिची जन्मतारीख चुकीची पडली होती. तांत्रिक कारणासाठी काही मोडता नको म्हणून तिने दिल्लीला जाऊन ती चूक दुरूस्त करून घेण्याचे ठरवले आणि पद्मावत एक्सप्रेसच्या जनरल डब्यात चढली. गाडीत गर्दी मी म्हणत होती. कशीबशी एका कोपर्‍यात जागा मिळवून तिचा प्रवास सुरू झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये लुटेर्‍यांनी चढणे आणि एकट्यादुकट्या प्रवाशांवर हल्ले करून त्यांची चीजवस्तू लुटणे हे आपण फक्त सिनेमात बघत असलो तरी उत्तर प्रदेशातल्या काही भागात ते आजही सर्रास चालते. तसेच घडले. ५-६ जणांचे टोळके तिच्या रोखाने येऊ लागले. तिची सोन्याची साखळी तिच्या गळ्याभोवतीचा फास बनू पाहत होती. अरुणिमाने प्रतिकार केला. त्यांच्या दिशेने लाथा झाडल्या. गाडीच्या डब्यात एवढी गर्दी होती पण एकही जण आडवा आला नाही. ती निकराने एकटी प्रतिकार करत राहिली आणि चिडून त्या टोळीने तिला उचलले आणि काय होते ते समजायच्या आत चालत्या गाडीबाहेर फेकले.

ती समोरच्या ट्रॅकवर पडली. पलिकडून दुसरी गाडी येत होती. जीव वाचवायला ती उठली पण तिचा पाय रुळांवरच राहिला आणि काही सेकंदातच गाडी तिच्या पायांवरून धडधडत निघून गेली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. वेदनेनी ती तळमळत होती. बरेली जिल्हा रुग्णालयात तिला तेथल्या स्थानिकांनीच दाखल केले. अनेक सोपस्कारांनतर एकदाचे तिच्यावर उपचार सुरू झाले. तोवर भरपूर रक्त वाहून गेले होते. तिचा पाय गुडघ्यातून कापावा लागणार होता पण हॉस्पिटलात अ‍ॅनास्थेशियाच नव्हता. तिने डॉक्टरांना बिनाभूलीचे ऑपरेट करायला सांगितले. हॉस्पीटल मध्ये उपकरणांची, साधनांची कमी होती पण तेथल्या सर्वांनी जे करता येणं शक्य होते ते सर्व केले. रक्त द्यायची वेळ आली, हॉस्पिटलमध्ये रक्त नव्हतेच, तर तेथील केमिस्ट बी. सी. यादव यांनी रक्त दिले. पूर्ण शुध्दीत, अपार वेदना सहन करत तिने हे दिव्य पार पाडले. खरी वेदना तर ऑपरेशन नंतर तिच्या मनाला झाली. जेव्हा तिला ओ टी तून बाहेर वॉर्डात आणले तेव्हा एक भटके कुत्रे तो नुकताच कापलेला पाय खाताना तिला दिसले आणि तिला भडभडून आले.

एव्हाना पत्रकारांना आणि टीव्ही चॅनल्सना एक ब्रेकिंग न्यूज मिळाली होतीच. पण निदान त्यामुळे उत्तरप्रदेशच्या प्रशासनाला जाग आली आणि तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये हलवले गेले. खरी लढाई पुढे लढायची होती. मनाशी, शरीराशी आणि इतरांशीही.. मिडियाने तिचा प्रश्न प्रशासनापुढे आणि लोकांपुढे मांडताना विचित्र पध्दतीने मांडला. कोणी म्हटले ती विनातिकिट प्रवास करत होती आणि तिकिट तपासायला टीसी आल्यामुळे तिने उडी मारली लगेच दुसरीकडे ती तिकिटाच्या रांगेत उभी असल्याचे सीसीटीव्ही फूटेज दाखवले गेले. कोणी म्हटले तिने आत्महत्या करण्यासाठी गाडीबाहेर उडी घेतली. लोकांच्या चर्चांना ऊत आला. पण अरुणिमा शांत राहिली. ओरडून जगाला सत्य सांगण्याची ताकद तिच्याकडे नव्हती आणि गरज तर मुळीच नव्हती. पण ह्या सगळ्या गोष्टींचे ओरखडे तिच्या मनावर होत होते. डावा पाय गुडघ्यातून कापून काढला होता. तेथे कृत्रिम पाय बसवला गेला. उजव्या पायात रॉड घातला होता. पलंगावर पडून त्यातून बाहेर आल्यावर काय करता येईल याचा तिच्या मनाशी सतत विचार चालू होता.आणि स्वत:ला सिध्द करण्याचा तिचा निश्चय पक्का होत चालला. एक दिवस तिला जगाला दाखवून द्यायचे होते की ती आत्महत्त्या करायला निघालेली भ्याड नव्हती किवा लुटेर्‍यांची आणि परिस्थितीची गरीब बिच्चारी बळी नव्हती. ती एक सक्षम, सुशिक्षित सबला आहे.

तिच्या मनात विचार पक्का झाला, उंची गाठायची, कर्तृत्वाची उंची गाठायची. एव्हरेस्ट हेंगायचे. लोकांनी तिला वेड्यात काढले. जिथे सर्वसामान्य माणसाला एव्हरेस्टचा विचार चहा आणि मसाल्यांपुरताच डोक्यात येतो तिथे ही असा विचार करत होती. एका पायात रॉड आणि दुसरा कृत्रिम पाय घेऊन हिला नीट चालता आले, स्वतःची कामे करता आली, कोणावर अवलंबून राहवे नाही लागले म्हणजे मिळवली. असा विचार करणारी आजूबाजूची मंडळी हिच्या डोक्यावर परिणाम झाला की काय? असे भाव घेऊन होती. जितका लोकांचा तिच्याबद्दलचा बिच्चारेपणाचा भाव, कीव जास्त तितकी तिची जिद्दही वाढत चालली. त्या कृत्रिम पायाशी जुळवून घ्यायला पेशंटना काही दिवस, काही महिने लागतात. काहीजणांचे तर वर्षही जाते. पण तिने मनाचा इतका दॄढनिश्चय केला होता की ही पठ्ठी जयपूरफूट बसवल्यावर दोन दिवसात उभी राहून पावले टाकायला लागली. आता एव्हरेस्ट चढाईच्या दृष्टीने पावले टाकायची होती. त्याकरताची माहिती गोळा करायला तिने सुरूवात केली. तिने थेट बंचेंद्री पालनाच गाठले. एव्हरेस्टवर चढाई करणारी भारताची पहिली स्त्री!

बंचेंद्री तिला पाहून, तिची कहाणी आणि जिद्द ऐकून चकित झाल्या पण तिचा ध्यास पाहून त्यांनी तिला नाउमेद केले नाही की तिची कीव केली नाही. एक कानमंत्र मात्र दिला. "तू स्वत:च्या आतमधले एव्हरेस्ट पादाक्रांत केले आहेस आता तुला फक्त जगाला दाखवून देण्यासाठी पर्वतशिखरावर जायचे आहे." तिच्या कुटुंबियां व्यतिरिक्त हे ध्येय्य ती गाठू शकेल असा विश्वास दाखवणार्‍या बचेंद्री पाल यांच्या पाठिंब्याने तिला हुरुप आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अरुणिमाची तयारी सुरू झाली. उत्तरकाशी मधील नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ मांऊटनेरिंग मध्ये तिने बेसिक कोर्स पूर्ण केला. त्यानंतर दीड वर्षाची तपश्चर्या सुरू झाली. मेहनत, कष्ट आणि जिद्द यांच्या हातात हात घालून हे १८ महिने ती चालली. चढाई करताना तिच्या डाव्या पायाचा घोटा आणि टाच सुजू लागे, त्याने तिची ग्रिप सैल होई. उजव्या पायातला रॉड त्रास देत असे. पण तिचा ध्यास कायम होता. सुरूवातीला लहान लहान पर्वत चढली. लहान असले तरी ते खतरनाक होते. तेव्हा मॄत्यू तिने अगदी जवळून पाहिला. एव्हरेस्टच्या चढाईची तयारी म्हणून २०१२ मध्ये नेपाळच्या मधले हिमालयाचे ६१५० मीटरवर असलेले आइसलँड पिक ती चढली.

तिच्या शेर्पाच्या मते हे अगदी आत्मघातकी विचार घेऊन ही बया कुठे आली एव्हरेस्ट चढायला? धडधाकट माणसांना सुध्दा जे सहजपणे साध्य होत नाही त्या शिखराच्या पासंगाला ही कशी पुरी पडणार? शेर्पा तर तिच्या बरोबर जायला आणि रहायलाही तयार नव्हता. शिखरावर जाण्याच्या रस्त्यावर चार छावण्या आहेत. शेवटच्या चौथ्या छावणीला मृत्यूचे घरच म्हणतात. भले भले येथवर येतात आणि शिखरावर पोहोचण्याआधीच, तेथे दॄष्टी लावून शेवटचा श्वास घेतात. येथे पोहोचतानाच यमाचे राज्य दिसायला लागते. आजूबाजूला धारातिर्थी पडलेले देह दिसतात आणि धीर गोळा करण्यातच बरीच शक्ती खर्च होते. भीतीला दूर सारत अरुणिमाने एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत न पोहोचता मरणं हा पर्यायच तिच्यापुढे नाही असं स्वत:ला बजावले आणि जिद्दीने पुढे चढायला सुरूवात केली. वाटेत तिच्याकडचा ऑक्सीजनसाठा कमी होत चालल्याचे लक्षात आले. तिचा शेर्पा म्हणाला, आत्ता तुझा जीव वाचव, परत कधीतरी एव्हरेस्ट चढशील तू. पण एव्हरेस्ट न चढता इथूनच परत गेले तर ते मरण्यापेक्षा काही वेगळे नसेल असे त्याला सांगून ती पुढे निघाली. अखेर ५२ दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर २१ मे २०१३ रोजी तिने एव्हरेस्टवर भारताचा झेंडा फडकावला, तिच्याकडचा ऑक्सीजनसाठा आता अगदीच थोडा असल्याचे शेर्पाने तिच्या लक्षात आणून दिले. पण आता तिला त्याची पर्वा नव्हती. तिने तिचे साध्य पूर्ण केले होते. मरण्याआधी आपला तेथे फोटो व व्हिडिओ घेऊन तो क्षण कायमचा स्मृतीत बंदिस्त करण्याचा तिचा प्रयत्न होता. भारताचा झेंडा तिने रोवला, झेंड्याला सलामी दिली आणि विवेकानंदांच्या फोटोला वंदन करून त्यांचाही फोटो तिने तेथे ठेवला. जेमतेम पन्नास पावले गेली असेल नसेल तिच्याकडचा ऑक्सीजन पूर्ण संपला पण तिचा प्राणवायू तिची जिद्द, तिचा ध्यास होता. ती त्यातून तरली. एव्हरेस्टवर चढाई करणारी ती पहिली अपंग आणि पहिली स्त्री ठरली. तिच्यावर जगभरातून कौतुकाचा, अभिनंदनाचा आणि पारितोषिकांचा वर्षाव झाला. भारतसरकारने ह्या गिरीकन्येचा पद्मश्री देऊन गौरव केला. आपल्या ह्या सार्‍या प्रवासाची कहाणी तिने 'बॉर्न अगेन ऑन द माऊंटन' ह्या पुस्तकात सांगितली आहे. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.

हिला अपंग म्हणणार्‍यांची मनेच अपंग आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एव्हरेस्ट्चे शिखर गाठले तरी यशाची अनेक शिखरे तिला अजून गाठायची आहेत. सातही खंडातली सर्व उंच शिखरे तिला पादाक्रांत करायचे तिचे स्वप्न आहे. आशियातले एव्हरेस्ट, युरोपातले एलब्रुस, अफ्रिकेतले किलिमानजारो/किलिमानयारो/किलिमानदारो आणि ऑस्ट्रेलियातले कोत्स्झिउस्को ही चार तिने जिंकली आहेत. अमेरिकेतले डेनली पिक आणि अंटार्टिकाचे विन्सॉन मासिफ आता तिला खुणावत आहेत. तिच्या ह्या पुढच्या साहसी मोहिमांसाठी खूप सार्‍या शुभेच्छा!

समाजजीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

अरुणिमाची मुलाखत पाहिली होती आधी. आताही लेखातून ती किती जिद्दीची आहे हे जाणवले. अफाट मुलगी आहे ही!

पिशी अबोली's picture

2 Oct 2016 - 1:53 am | पिशी अबोली

बापरे..
____/\____

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Oct 2016 - 8:06 am | कैलासवासी सोन्याबापु

शिरसाष्टांग दंडवत असल्या व्यक्तिमत्वासमोर __/\__

टवाळ कार्टा's picture

2 Oct 2016 - 9:22 am | टवाळ कार्टा

++++११११११११११

अरुणिमाची जिद्द केवळ अफाट आहे!

एस's picture

2 Oct 2016 - 9:34 am | एस

अरुणिमाला सलाम!

मी-सौरभ's picture

13 Oct 2016 - 6:51 pm | मी-सौरभ

सहमत

सौन्दर्य's picture

2 Oct 2016 - 9:40 am | सौन्दर्य

शब्दच थिटे पडले हो. पुन्हा _/\_
लेख देखील एकदम सुंदर कोठेही अतिशयोक्ती नाही.

जबरदस्त इच्छाशक्ती...!! सलाम __/\__

या लोकांच्या इच्छाशक्तीकडे बघून आपण किती लहान लहान गोष्टींचा बाऊ करतो ते आठवत राहते..

बादवे - हा लेख वाचून डॅनिएला गार्सिया आणि मार्क इंग्लिस आठवले.

.

मितान's picture

2 Oct 2016 - 10:30 am | मितान

तीनही लेखांसाठी दंडवत !!!

पैसा's picture

2 Oct 2016 - 11:16 am | पैसा

केवळ अफाट! तिने मृत्यूला दोन वेळा हुलकावणी दिली आहे. ग्रेट!

प्रीत-मोहर's picture

2 Oct 2016 - 11:41 am | प्रीत-मोहर

बाव डाउन. हाही लेख सतत आठवण करुन देत राहिल की आयुष्यात कधीही हार मानली नाही तरच यश लाभतं.
स्वातीतै धन्यु ग खुप सारे

गिरिजा देशपांडे's picture

2 Oct 2016 - 4:14 pm | गिरिजा देशपांडे

काय एक एक अफाट व्यक्तिमत्व आहेत जगात, आपण मात्र आपल्याच छोट्या छोट्या दुखण्याचा किती बाऊ करतो.
अरुणीमाच्या साहसाला आणि जिद्दीला दंडवत आणि इतक्या सुंदर लेखमालिकेसाठी धन्यवाद!!

वरुण मोहिते's picture

2 Oct 2016 - 5:11 pm | वरुण मोहिते

जबरदस्त !!

स्मिता_१३'s picture

2 Oct 2016 - 5:36 pm | स्मिता_१३

अफाट व्यक्तिमत्व आणि जिद्दी ला दंडवत !!!

पद्मावति's picture

2 Oct 2016 - 5:40 pm | पद्मावति

जबरदस्त!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2016 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जिद्दीची परिसिमा म्हणावं असं अफाट व्यक्तीमत्व.

स्वाती दिनेश, लेखन शैली. सुरेख.

-दिलीप बिरुटे

अफाट व्यक्तीमत्व! स्वाती फार सुरेख लिहले आहेस.खूप सारे धन्यवाद ही मालीका सुरू केल्याबद्दल!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2016 - 7:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रेरणादायी जीवन !

हिला अपंग म्हणणार्‍यांची मनेच अपंग आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
+१०००

अजया's picture

2 Oct 2016 - 8:39 pm | अजया

साष्टांग _/\_

नमकिन's picture

3 Oct 2016 - 9:12 am | नमकिन

लुटेरे पकडले गेले का? शिक्षा झाली?
याचा उल्लेख करता कायद्याचे राज्य आहे की नाहीं याचा उलगडा झाला असता.
परिवर्तनीय लेख!

शिव कन्या's picture

3 Oct 2016 - 9:59 pm | शिव कन्या

केवळ अफाट.

पाटीलभाऊ's picture

4 Oct 2016 - 12:50 am | पाटीलभाऊ

_/\_
केवळ अशा अवलियांसाठीच कुसुमाग्रजांनी लिहिले आहे...
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला"

जबरदस्त!

फारच प्रेरणादायी!

नरेंद्र गोळे's picture

7 Oct 2016 - 6:53 pm | नरेंद्र गोळे

“ढूँढे राह, जला सकूँ उन युवाओं के खयालात में ।
अच्छे काम कि आग”, ये ’अरुणिमा’, सोचे खयालात में ॥
“वो होगा सहि मायने समिट मेरा” था कहा बात में ।
ले स्फूर्ती, मन हिंदवी, उड चले, हो सूर्य वो विश्व में ॥ - नरेंद्र गोळे २०१४०११७

रातराणी's picture

7 Oct 2016 - 8:48 pm | रातराणी

_/\_ !!