गावाकडची गोष्ट (भाग 4 ) शेवटचा

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
23 Aug 2016 - 12:02 pm

भाग १: http://www.misalpav.com/node/37022

भाग २: http://www.misalpav.com/node/37041

भाग 3: http://www.misalpav.com/node/37058

भाग ४ 

ते गोदामाच्या दिशेने निघाले आणि मी त्यांच्या मागे. गोदामाच्या दारापाशी जीवा उभा होता. "आत कोणाला सोडू नकोस. मी आणि दिघे एकूण लाकडांची मोजणी करून लगेच बाहेर येतो आहोत." अस म्हणून मालक गोदामात शिरले. ते आत अगदी पहिल्या लाकडांच्या राशीपाशी जाऊन उभे राहिले आणि त्यांनी मलादेखील त्यांच्या जवळ बोलावून घेतले. मी पुरता बुचकळ्यात पडलो होतो. मालकांना हे असे अचानक लाकडे मोजण्याचे का सुचावे ते मला कळत नव्हते. 'कोणी माझ्याबद्दल तक्रार केली असेल का? माझ्यावरचा त्यांचा विश्वास उडाला असेल का?' माझ्या मनात अनेक विचार येत होते. मी देखील भराभर चालत त्यांच्याजवळ जाऊन पोहोचलो. "दिघे, मी काय सांगतो आहे ते निट एका. माझ्याकडे फार बोलायला वेळ नाही आहे. एरवी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याइतके माझे डोके देखील शाबूत आहे की नाही ते मला माहित नाही. पण हे नक्की की आज... आत्ता माझ मन आणि बुद्धी संपूर्णपणे माझ्या ताब्यात आहे. नंतरच मला माहित नाही. तुम्ही जर उद्या मला आपल्या या भेटीची आठवण करून दिलीत तर कदाचित मी सपशेल नाकारीन. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. कारण मी आपली ही भेट इथून बाहेर पडण्याच्या अगोदर मनातून पुसून टाकणार आहे. त्याच कारणही तसच आहे. तिने जर माझ मन वाचल तर तुमच आणि माझ दोघांच भविष्य धोक्यात येईल...." मालक अत्यंत हळू आवाजात बोलत होते आणि बोलताना देखील सारखे आजूबाजूला बघत होते. खर तर गोदामात आम्ही दोघेतच होतो. सगळे कामगार कधीच निघाले होते. चुकून एकखाद-दुसरा काम करत असावा.... मशीनवर शेवटचे लाकूड कापले जात असावे. कारण मशीन चालू असल्याचा आवाज मात्र येत होता. पण ते सगळ बाहेर पार लांब चालू होत. मी नक्की काय केल पाहिजे ते मला सुचत नव्हत. त्यामुळे मी मालकांच्या समोर नुसता उभा राहून ते काय बोलतात ते एकत होतो.

"दिघे, तिच आपल्याकडे बारीक लक्ष आहे. आपल्या तिघांकडे! अजून तुम्हाला काहीच माहित नाही आहे त्यामुळे तुम्हाला ती काहीच करणार नाही. किंबहुना तिला काहीच करता येणार नाही. अहो, मलादेखील जोवर या सगळ्या प्रकारची माहिती नव्हती तोवर मी खूप सुखी होतो. एकदिवस अचानक माझ्यासमोर हे सगळ उलगडल आणि मीदेखील यात माझ्या इच्छेविरुद्ध अडकलो." मालक अजूनही कोड्यातच बोलत होते आणि मी जास्तच गोधाळून जात होतो. शेवटी मी मालकांना विचारले,"तुम्ही काय म्हणता आहात मालक? मला काहीच कळत नाहीय. कोण ती? काय करणार आहे?"

"श्श.... हळू बोल. भिंतीनाही कान असतात. मुख्य म्हणजे तिची नजर सतत माझा पाठलाग करत असते. दिघे, एक सांगू? मी हे अस दुसर लग्न केल खर. पण मला मुळात परत लग्नच करायचं नव्हत. तिने मला भाग पडल. म्हणून मग मी मुद्दाम आयत्यावेळी मालिनीच्या एवजी शालीनिशी लग्न करायचं म्हंटल. मला वाटल होत बुवा नाही म्हणतील आणि मी एक निष्पाप जीव वाचवू शकेन. पण ते जमल नाही.  तिला माझा आणि माझ्याबरोबर अनेकांचा अंत करायचा होता, हे माझ्या उशिरा लक्षात आल. मग मात्र  मला योग्य वेळेची वाट बघत बसण्याव्यातिरिक्त काही मार्ग नव्हता. दिघे, तुम्ही आलात आणि मला सुटकेची आशा वाटायला लागली. पण मग तुमच आणि मालिनीच; लग्न झाल आणि परत मला थांबायला लागेल हे लक्षात आल. पण  तुम्ही दोघे बंगल्यावर येऊन गेलात आणि माझ्या लक्षात आल की आता हा खेळ फार वेळ टिकणार नाही. तिचे विचार माझ्यापेक्षाही पुढे धावत आहेत.  मुळात जर मी स्वतःला वाचवायला गेलो तर इतर मारतील. आणि दुसऱ्यांना मरू देऊन मी जगू शकत नाही. दिघे, मला माझा अंत दिसतोच आहे... पण निदान मी निर्दोष आणि प्रामाणिक आयुष्य वाचवू शकलो तर शांतपणे मरू शकेन." 

मालक काय बोलत होते ते मला अजिबात कळत नव्हत. ते कोणाबद्दल बोलत होते? कोण होती ही ती? जिच नाव ते घ्यायला तयार नव्हते. मालिनी...की शालिनी? जिला सगळ कळत अस त्याचं म्हणण होत. अगदी मनदेखील वाचता येत होत तिला मालकांच! कदाचित शालिनीच. नाहीतर अजून कोण होत त्यांच्या बंगल्यात आणि आयुष्यात? मी मालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. "मी काही करण्यासारखं आहे का मालक?" मी विचारलं. त्यावर त्यांनी डोळ्यात पाणी आणून नाकारात्मक मान हलवली. ते अगदी हळू आवाजात पुटपुटले,"हिने देखील हट्टाने माझ्याशी लग्न केले. मी खूप समजावले होते तरी. आता ती देखील माझ्याबरोबर भोगते आहे सगळ." मी अजूनच गोंधळलो. मी अजून काहीतरी त्यांना धीर देणार बोलणार होतो तेवढ्यात जीवा आत आला आणि म्हणाला,"मालक, बंगल्यावरून फोन होता. मालकीणबाईना बर वाटत नाही. तुम्हाला लवकर बोलावल आहे." माझ्याकडे एक हेतुपूर्ण कटाक्ष टाकून मालक निघाले. 

दोन पावल पुढे जाऊन ते अचानक परत मागे फिरले आणि परत माझ्याकडे आले. म्हणाले,"दिघे तू खुप चांगला माणूस आहेस. तू इथून निघून जा तुझ्या पत्नीला घेऊन. खरच जा! मी माझ्या एका मित्राकडे तुझ्या नोकरीबद्दल बोललो आहे. बुवांचा पत्ता दिला आहे मुद्दाम. तुला त्या पत्त्यावर पत्र येईल. तू जा इथून." एवढ बोलून मला काहीही बोलायला न देता मालक तिथून निघून गेले. 

मी एकटाच विचार करत तिथे कितीतरी वेळ उभा होतो. 'मालकांनी आजवर माझा एकेरी उल्लेख केला नव्हता. परंतु जाता जाता त्यांनी मला ही नोकरी आणि गाव सोडायला सांगितल आणि माझा एकेरी उल्लेख केला. अस का? मालक नक्की कोणाबद्दल बोलत होते? शालीनीची त्यांना भिती वाटत असेल का? पण तसं असत तर ते म्हणाले नसते की माझ्याशी हट्टाने लग्न करून मग ती देखील भोगते आहे. पण अस काय झाल असेल? शालिनी दिसायला मालीनिपेक्षा नक्कीच उजवी आहे.पण मी आणि मालिनी भेटायला गेलो होतो दिवाळीत तेव्हा तर मालिनी म्हणाली होती की आता शालिनी वेगळी आणि अजून चांगली दिसायला लागली आहे. हा विचार मनात आला आणि आठवलं की आम्ही जेव्हा निघण्यासाठी उठलो होतो आणि माझी पाठ होती त्यावेळी मालिनीचा आवाज एकदम बदलला होता. अचानक थोडा तुटक, गंभीर आणि काहीसा धमकावणी दिल्यासारखा आला होता. म्हणजे मालकांनी उल्लेख केलेली "ती" म्हणजे मालिनी तर नव्हे? पण मग तस असत तर मालक मला अस का म्हणाले की तुझ्या पत्नीला घेऊन निघून जा?.....एक ना अनेक विचार माझ्या मनात सारखे येत होते. माझ्याही नकळत मी विचार करत अजूनही तिथेच लाकडांच्या राशींजवळ उभा होतो. थोड्यावेळाने जीवा मी उभा होतो तिथे आला. म्हणाला,"कारखाना बंद करायचा आहे साहेब. तुम्ही निघता ना?" मी एकवेळ त्याच्याकडे बघितलं आणि काही न बोलता तिथून निघालो. 

मी घरी पोहोचलो तर संध्याकाळ होत आली होती. मालिनी घरी नव्हती. बहुतेक मला उशीर झाला म्हणून ती देवळाकडे निघून गेली होती. मी परत बाहेर पडण्याच्या मनस्थिती नव्हतो. मालिनी काहीशी उशिराच आली. बहुतेक मी दुपारी न आल्यामुळे आणि तिला काही कळवलं नसल्याने ती घुश्श्यात होती. त्यामुळे ती काहीच बोलत नव्हती. मी देखील काहीच बोललो नाही. मालकांनी मला जे सांगितलं होत ती तस धक्कादायक आणि काहीस अविश्वासनीय होत. त्यामुळे ते सगळ सांगून मालिनीला उगाच कशाला त्रास द्यायचा? हळूहळू काय सत्य आहे ते समजेलच. असा विचार मी केला. त्यादिवशी कारखान्यातल्या कामामुळे आणि मालकांनी सांगितलेल्या एकूणच सगळ्या विषयामुळे मी खूप मनाने आणि शरीराने खूप थकलो होतो. पण तरीही झोप येत नव्हती. मालिनी सगळ आवरून झोपायला आली तरी मी अस्वस्थपणे फेऱ्या मारत होतो. शेवटी तिने जवळ येऊन विचारल,"काय झालय आज तुम्हाला? आज दुपारी जेवायला देखील आला नाहीत. मी नाराजी दाखवली तरीही तुमच अजिबात लक्ष नव्हत. एकूणच कशातही अगदी लक्ष नाही तुमच आज." तिचा आवाज आर्जवी होता. म्हणाली,"चला बघू आत झोपायला. कसली एवढी काळजी करता आहात?" तिचं ते प्रेमळ आणि काळजीपोटी बोलण एकून मला माझाच राग आला. मालकांनी त्या कोणा स्त्रीबद्दल काहीतरी सांगितल आणि मी माझ्या पत्नीवर संशय घेतला होता. मनात आल किती कोत्या मनाचा होतो मी. म्हणून मग बोलण टाळायला मी म्हणालो,"मालिनी, माझ्या गावाहून पत्र आल आहे. एक छोटासा जमिनीचा तुकडा होता आमचा. त्यासंदर्भात आहे. मी जरा बुवांना भेटून येतो. तू झोप कडी लावून. काळजी करू नकोस. मी आज तिथेच राहीन. उद्या सकाळीच येतो." मालिनीला बहुतेक आवडली नव्हती ती कल्पना. पण ती काही बोलली नाही. फक्त होकारार्थी मान हलवली. मी पायात चपला अडकवून तसाच निघालो आणि देवळात जाऊन बसलो. काही गावातली मंडळी बसली होती त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्या. आणि नकळत मन थोड हलक झाल. गप्पांना चांगलाच रंग चढला होता. विषय बाजूच्या गावात आलेल्या नव्या तमाशा पार्टीचा होता. त्यामुळे किती वाजले आहेत याचं भान कोणालाच नव्हत.

अचानक मालकांच्या बंगल्याच्या बाजूने ओरड एकू आली. आम्ही सगळेच गोंधळून गेलो आणि धावत बंगल्याच्या दिशेने निघालो. जाऊन बघतो तर काय संपूर्ण बंगला पेटला होता. मला काय कराव सुचेना. मी आउट हाउसच्या दिशेने धावलो. मालिनीला बाहेर काढण महत्वाच होत. ती एकटीच होती आत. आणि मी येणार नाही अस सांगितल्याने कडी लावून झोपली होती. माझ्या जीवाची घालमेल होत होती. मी धावतच आमच्या त्या छोट्याश्या आउट हाउसकडे पोहोचलो. पण आग आउट हाउस पर्यंत पोहोचली देखील होती. मी मालिनीच्या नावाने हाका मारायला सुरवात केली.  पण मला तिच्या ओरडण्याचा आवाज एकू येत नव्हता. बरोबर आलेले गावकरी जमेल तिथून पाणी आणून आउट हाउसवर मारत होते. मी दाराकडे धावलो. पण दराने पेट घेतला होता. लोकांनी मला अडवलं. माझ्या डोळ्यासमोर संपूर्ण बंगला आणि आउट हाउस जळून गेल. मी काहीही करू शकलो नाही. आग आटोक्यात येईपर्यंत पाहाट झाली होती. पाणी मारणाऱ्या लोकांनी जरा उसंत घेतली... त्याचवेळी कोणीतरी सांगत आल की काल रात्री कारखाना सुद्धा पेटला होता.... आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मालकांनी कारखान्यासामोरच्या झाडाला लटकून गळफास लावून घेतला होता. 

मी धावत कारखान्याकडे गेलो. कारखाना धगधगत होता आणि समोरच्या झाडाला मालकांचा मृतदेह लटकत होता. लोकांनी पुढे होऊन त्यांचा देह खाली उतरवला. कोणीतरी गावातल्या पोलीस चौकीवर जाऊन वर्दी दिली होती. त्यामुळे पोलीस पाटील तिथे येऊन पोहोचले होते. मी एकूण झालेल्या घटनाक्रमामुळे सरभरीत झालो होतो. डोक्याला हात लावून मी मट्कन तिथेच बसलो. बुवा आणि माझ्या सासूबाई देखील तिथे येऊन पोहोचले होते. सासुबाईना बायकांनी आवरून धरले होते. परंतु त्या छाती पिटून पिटून रडत होत्या आणि मोठमोठ्याने म्हणत होत्या,"मी आई नाही कैदाशीण आहे. सोन्यासारख्या मुलीना मी स्वतःच्या हाताने मरणाच्या दाढेत लोटलं. कुठे फाडू हे पाप." बुवा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले,"जावईबापू चला माझ्याबरोबर. आता इथे काहीच उरलेले नाही."

मला एकूणच परिस्थितीचे भान राहिले नव्हते. त्यामुळे ते 'चला' म्हणाले आणि मी त्यांच्याबारोबार निघालो. बायकांनी सासुबाईना धरून घराकडे चालवले. सासूबाईच्या अंगातली शक्ती आता पूर्णपणे संपली होती. त्या आधार घेऊन निमुटपणे चालत होत्या. फटफटीत उजाडले होते आणि थंडीचे दिवस असूनही एकूणच प्रचंड उष्मा जाणवत होता. घराकडे पोहोचताच बुवांनी पडवीमध्ये एक घोंगडी अंथरली आणि मला आडवं व्हायला सांगितल. मी निमुटपणे  त्यांनी सांगितल्या प्रमाणे आडवा झालो. तोपर्यंत मी मनाने आणि शरीराने इतका दमलो होतो की मनात दु:ख दाटून आल होत तरी आडवं होताक्षणीच मला झोप लागली. जेव्हा जाग आली तेव्हा उन्ह उतरणीला लागली होती आणि जाग आल्यावर लक्षात आल की समोर पोलीस पाटील उभे आहेत आणि बुवा माझ्याकडे हात करून त्यांच्याशी काहीतरी बोलत आहेत. मी उठून बसलो आणि त्यांच्या दिशेने गेलो. मला पहाताच बुवा गप्प झाले. पोलीस पाटील माझ्याकडे बघत होते. मी त्याना नमस्कार केला. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले,"हे बघा, बंगल्याला आग लागली आणि ती आउट हाउसपर्यंत पोहोचली तरी तुम्हाला कळल नाही ही खर तर आश्चर्याची गोष्ट आहे. कारण तिथे असणारी सर्वच माणस आज मृत्यूमुखी पडली आहेत. वाचलेले असे तुम्ही एकटेच आहात. अर्थात आता एकूण सगळच संपल आहे. तुमच्या पत्नी आणि मेव्हणी दोघीही लागलेल्या आगीत जळून गेल्या आहेत. पोलिसांच्या दृष्टीकोनातून सांगायचं तर तुमच्या मालकांनी बंगल्याला आणि कारखान्याला आग लावून स्वतःला गळफास लावून घेतला आहे, असा अहवाल लिहून आम्ही एकूण ही केस बंद केली आहे. कारण समोर हेच एक सत्य दिसत आहे. त्यामुळे तुमच्यावर कोणतेही बालंट येणार नाही आहे. मुख्य म्हणजे आमच आणि गावातल्या लोकांच तुमच्या बद्दलच मत चांगलंच असल्याने आग लागली तेव्हाच नेमके तुम्ही देवळात कसे होतात अस कोणीच विचारलेल नाही. मात्र मी एक गोष्ट सुचवू का तुम्हाला? हे गाव सोडून लवकरात लवकर निघून जा तुम्ही." एवढ बोलून पोलीस पाटील परत जायला निघाले. 

मी आणि बुवा देखील घराकडे निघालो.  थोड पुढे जाऊन पाटलानी मला हाक मारली म्हणून बुवाना पुढे व्हायला सांगून मी परत पोलीस पाटलांकडे गेलो. त्यांनी एकवार पाठमोऱ्या बुवांकडे बघितले आणि घाईघाईने माझ्या हातात एक कागद दिला. मग मात्र काही एक न बोलता झपझप चालत ते तिथून निघून गेले. एव्हाना संध्याकाळ पुरती कलली होती. त्यांनी कागद मला बुवांच्या समोर दिला नव्हता, म्हणजे कदाचित तो कागद केवळ माझ्यासाठी होता, असा कयास मी केला आणि पटकन तो कागद सदऱ्याच्या खिशात घालून मी बुवाना गाठले. रात्री शेजाऱ्यांनी आणून दिलेलं पिठलं भात कसतरी पोटात ढकलून मी परत पडवीत येऊन बसलो. बुवांनी येऊन एक कंदील माझ्याशेजारी ठेवला आणि गारठा जाणवत असल्याने ते परत घरात घेले. थोडी सामसूम झाल्यावर मी पाटलांनी दिलेला कागद खिशातून बाहेर काढला.  

ती एक चिट्ठी होती.... मालकांनी माझ्या नावाने दिलेली. त्यात त्यांनी लिहील होत,"दिघे जे घडल आहे त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करू नकोस. जे घडल आहे त्याचा विचारही  आयुष्यात कधीही मनात आणू नकोस. कारण जोवर तू भीत नाहीस तोवरच तू जगणार आहेस, हे लक्षात ठेव. मी आयुष्यभर भिती मानात येऊ दिली नाही. पण कधी कशी कोण जाणे मनात भिती डोकावली आणि आता तू माझ पत्र वाचत असताना मी या जगात नाही." 

ती दोन ओळींची चिट्ठी वाचून मी हबकून गेलो. भिती? मालकांच्या मनात केवळ भिती होती म्हणून हे सगळ घडलं? मालकांनी मनात भिती बाळगली होती महणून त्यांनी स्वतःला आणि स्वतःबरोबर माझ्या संसाराला संपवलं? या  गावात आल्यापासून मी स्वतःला भाग्यवान समजायला लागलो होतो. परंतु गेल्या दोन दिवसात माझ्या आयुष्य जे जे घडल होत त्याचा विचार करता मी ते गाव सोडून जायचा निर्णय घेतला. मात्र मालकांनी माझ्यासाठी जिथे नोकरीच बोलण केल होत त्याचं पत्र येईपर्यंत मी तिथेच बुवांच्या घरी राहिलो. नोकरीच पत्र येताक्षणी मात्र बुवांचा निरोपही न घेता मी ते गाव सोडल."

दिघे बोलायचा थांबला आणि त्याची कहाणी ऐकणारे जेटली आणि काणे थरारून गेले. दोघांच्याही तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. दिघे शांतपणे त्यांच्याकडे बघत होता. त्याचं पिण कधीच थांबल होत आणि जी काही चढली होती ती देखील पुरती उतरली होती.

जेटली अगोदर भानावर आला. त्याने दिघेचा हात हातात घेतला आणि गच्च धरला. तो प्रचंड घाबरला होता. त्याचा हात थरथरत होता. आवाजही कापत होता. त्याने आजूबाजूला बघितल आणि म्हणाला,"दिघ्या साल्या खर सांग... काहीतरी गोष्ट रचून सांगतो आहेस ना? भडव्या.... तुझ्या आयुष्यात इतकं काही घडलं आणि तरीही तू इतका शांत असतोस? भेनच्योद आपण इथे मजा करायला आलो आहोत ना?.आणि अशा अनोळखी जागी रात्रीच्यावेळी तुला असल्या कहाण्या सुचताहेत काय?" जेटलीची जाम फाटली होती. भितीने मनाचा पुरता पगडा घेतला होता. मात्र दिघे शांत होता. त्याच शांतपणे त्याने जेटलीकडे बघितल. त्याची नजर थंड होती. जेटलीचे दिघेच्या डोळ्यांकडे लक्ष नव्हते. तो उगाचच आजूबाजूला काही दिसत आहे का ते बघत होता. मात्र काणे दिघेकडेच बघत होता. त्यामुळे त्याच्या डोळ्यातले भाव बघून तो हबकून गेला. दिघ्याने जेटलीच्या हातातला आपला हात सोडवून घेतला आणि तीच थंड नजर खिडकीबाहेर वळवली.

दिघ्या खिडकी बाहेर बघायला लागला त्यामुळे नकळत जेटली आणि काणेची नजर देखील खिडकीबाहेर वळली............ जेटली आणि काणे दोघांचे डोळे मोठे झाले..... खिडकी बाहेरच्या झाडावर दिघेच्या मालकाचे शव लटकत होते. डोळे सत्ताड उघडे होते, जीभ बाहेर आली होती........ आणि आजूबाजूला आग लागल्या प्रमाणे ज्वाळा जाणवत होत्या. त्या परिस्थितीत देखील मालकांच्या त्या हिडीस सुजलेल्या चेहेऱ्यावर केविलवाणे हसू होते. ते पहाताच जेटली आणि काणे दोघेही छातीवर हात दाबत खाली पडले.

ते दोघे खाली पडल्याचा आवाज एकून दिघेने खोलीत नजर वळवली. दोघांनाही पडलेले पाहून तो तोंडातल्या तोंडात स्वतःशीच पुटपुटला.... "मूर्ख लेकाचे! सगळ लक्ष आग कशी लागली, मालक कसे मेले आणि ते मारताना कसे दिसत होते या वर्नानामाध्येच होत. मी मालकांच्या शेवटच्या चिट्ठीतला मजकूर सांगूनही दोघेही काहीतरी विचार करायला लागले वाटत? आता देखील मी सहज खिडकी बाहेर बघत होतो ...... बहुतेक यांनी काहीतरी अपेक्षा करत भीत भीत बाहेर बघितलेलं दिसत आहे..... आणि त्यामुळेच त्यांची अपेक्षा पूर्ण झाली आहे. हम्म! ठीक आहे......स्साले.... माझी चेष्टा करत होते? मला कमी लेखात होते ना! घ्या!!! किंमत मोजावी लागलीच शेवटी. जाउदे! मात्र हे बर झाल......चला पुढच्या वेळी दुसऱ्या कोणाबरोबर बाहेर जाईन तेव्हा जर त्यांनी माझी थट्टा केली तर या दोघांची गोष्ट तर सांगता येईल ना. स्साले, वरच्या पोस्टवर होते म्हणून माज दाखवत होते ना......... घ्या आता.... 

त्या दोन कलेवरांच्या बाजूला बसून दिघे स्वतःशीच बडबडत होता............ आणि खिडकी बाहेरच्या झाडावर..................................................................................

कथा

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

23 Aug 2016 - 12:26 pm | लालगरूड

काय कळेना :-(

योगेश कोकरे's picture

23 Aug 2016 - 12:45 pm | योगेश कोकरे

डरना मना है सारखी कथा वाटली .

टवाळ कार्टा's picture

12 Sep 2016 - 9:03 pm | टवाळ कार्टा

+१

ज्योति अळवणी's picture

23 Aug 2016 - 1:07 pm | ज्योति अळवणी

खरी भीती मनात असते. त्यामुळेच आपण आपल्या कल्पनेतील चित्र सत्य समजतो हे सांगायचा प्रयत्न केला आहे.

दिघेने केवळ जेटली आणि काणेच्या मनात भीती निर्माण केली आणि त्याच्या कासिम होत असलेल्या अपमानाचा विचित्र प्रकारे सूड घेतला

दिपुडी's picture

23 Aug 2016 - 1:14 pm | दिपुडी

ज्योती ताई माफ़ करा पण
तुमच्या कथा खुप आवडतात पण शेवटचा भाग मात्र एकतर कळत नै नैतर आधीच्या भागापेक्षा एकदम सपक वाटतात

ज्योति अळवणी's picture

23 Aug 2016 - 2:24 pm | ज्योति अळवणी

ओह.. ok... अजून सुधारायचा प्रयत्न करेन. तसे हरवलेले विश्व या कथेच्या शेवटाला चांगला प्रतिसाद होता.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

एस's picture

23 Aug 2016 - 2:44 pm | एस

फारच छान!

जगप्रवासी's picture

23 Aug 2016 - 6:49 pm | जगप्रवासी

तुम्ही खूप छान लिहिता पण शेवट इतका घाईत का करता? तुमचे तीन भाग एकदम भारी होते पण शेवट गुंडाळल्यासारखा वाटला. माफ करा तुमचे लेखन आवडते म्हणून हे स्पष्टपणे सांगितलं.

ज्योति अळवणी's picture

23 Aug 2016 - 7:22 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद. पुढच्यावेळी लिहिताना नक्की विचार करेन

जव्हेरगंज's picture

23 Aug 2016 - 7:20 pm | जव्हेरगंज

डिटेलिंग काय मस्त जमले आहे!
मान गये!!

ते कारखाना वगैरे, बापरे!!

मानसी१'s picture

24 Aug 2016 - 11:12 pm | मानसी१

अजीबात कळली नाही. :-(
जेटली काणे मालीनी शालीनी काही संदर्भ नाही.

एक एकटा एकटाच's picture

12 Sep 2016 - 8:36 pm | एक एकटा एकटाच

चांगली होती....

आवडली

पुढील लिखाणास शुभेच्छा

एक एकटा एकटाच's picture

12 Sep 2016 - 8:36 pm | एक एकटा एकटाच

चांगली होती....

आवडली

पुढील लिखाणास शुभेच्छा

सुचिता१'s picture

19 Apr 2017 - 1:21 pm | सुचिता१

लकश खिलवुन ठेवणारी कथा ,... पण शेअध्रर। शेवट अर्धवट राहीला आहे,. शालीनी ला काय दुख,: होते ... मालक कोणा विषयी बोलत होते ,.... काहीच संदर्भ लागत नाहीये पुर्नन लेखनाला वाव आहे. पुलेशु