दीर्घकालीन रोगांचे उपचार : समज-गैरसमजातून जाणारी निर्णयप्रक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
25 Jul 2016 - 10:26 am

"दुर्धर" आणि/अथवा "दीर्घकालीन" आणि/अथवा "असाध्य" रोग हे केवळ रुग्णाच्या शरिरावरच नाही तर मनावर व जीवनशैलीवर जोरदार आघात करतात. याशिवाय ते रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांच्यावरही शारिरीक, मानसिक व भावनिक प्रभाव टाकतात. अर्थातच, अश्या रोगांचे उपचार ठरविताना रुग्णाच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीबरोबर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीचा विचार अत्यावश्यक ठरतो. हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

******

वैद्यकशास्त्रातील महत्वाची, सर्वव्यापी व सार्वकालीन सूत्रे

१. जीवनाची प्रत (कोणताही अतिरेक न करता व सुलभपणे मिळविलेला जगण्यातील आनंद व सूख) सर्वात महत्वाची, इतर सर्व त्यानंतर येते (Quality of life comes first, everything else comes thereafter).

२. रोगाचा उपाय रोगापेक्षा जास्त भयंकर असू नये... म्हणजेच दुसर्‍या शब्दांत; औषधे, व्यायाम, पथ्य आणि एकंदर जीवनपद्धतीतील बदल यांनी जीवन रोगापेक्षा जास्त खडतर बनू देऊ नये.

******

कमी त्रासांच्या व कमी मुदतींच्या आजारांत, जीवनाची प्रत व रोगावरचे उपाय यांना सखोल चर्चा करण्याएवढे महत्व क्वचितच येते. पण दीर्घकालीन किंवा आयुष्याभर साथ देणार्‍या रोगांमध्ये (उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, इ) किंवा दुर्धर/असाध्य रोगांमध्ये (उदा. कर्करोग, मज्जासंस्थेचे दीर्घकालीन {क्रॉनिक} रोग, इ) यामध्ये चर्चा आणि निर्णय हे नेहमीच कठीण आणि बर्‍याचदा वादग्रस्त असतात. याचे मुख्य कारणे अशी आहेत :

अ. दीर्घकालीन किंवा आयुष्याभर साथ देणारे रोग प्रत्येक रुग्णावर एकाच प्रकाराने आणि अथवा एकाच तीव्रतेने आघात करत नसतात. अश्या प्रत्येक आजारामध्ये दस्ताऐजांसाठी (documentation) काही ठराविक ठोकताळ्यांनुसार वेगवेगळे गट केलेले असले तरी, प्रत्येक गट हवाबंद स्वतंत्र कप्पा (airtight silo) नसून रोगाच्या निदान व उपचार यांत सुलभता यावी यासाठी केलेले एकाच वर्णपटाचे (spectrum) वर्गीकरण (classification) असते.

आ. दीर्घ मुदतीच्या व एकंदर भितीदायक असलेल्या या रोगांना तोंड देण्यासाठी लागणारी मानसिक व शारिरीक ताकद कोणत्याही दोन रुग्णात समसमान नसते... कारण अर्थातच, व्यक्ती तितक्या प्रकृती ! रुग्णाची केवळ शारिरीक स्थितीच नव्हे तर मानसिक स्थितीही रोगाच्या उपचारात फार महत्वाची असते हे सर्वमान्य आहेच. कणखर मनाच्या व्यक्तींच्या शरिरात रोगप्रतिकारक व शरीराची झीज भरून काढणारे अंतस्राव जास्त प्रमाणात होतात याला अधिकाधिक शास्त्रिय पुरावे मिळत आहेत.

इ. रोगाच्या एका गटातला आजार दुसर्‍या वरच्या गटांत केव्हा परावर्तीत होईल हे सांगण्यासाठी केवळ मोठ्या संख्येच्या रुग्णांवर केलेल्या संशोधनात सापडलेले ठोकताळे वापरले जातात... हे परावर्तन, एखाद्या रुग्णात केव्हा होईल ते १००% छातीठोकपणे सांगता येईल, असे हे एकच एक समीकरण नसते. डॉक्टरांनी आशा सोडून दिल्यानंतरही बरे झालेल्या रोग्यांच्या बर्‍याचश्या उदाहरणांमागे हे कारण असू शकते.

वरील कारणांमुळे अश्या आजारांत...

"दीर्घ मुदतीचे पण (स्वतःसाठी व इतरांसाठी) कठोर/शिस्तबध्द/रुक्ष/परावलंबी इत्यादीपैकी एक किंवा अनेक पदर असलेले जीवन"

आणि

"तुलनेने कमी मुदतीचे पण (स्वतःसाठी व इतरांसाठी) तुलनेने सुसह्य/वेदनारहित/तुलनेने स्वावलंबी/तुलनेने आनंदी इत्यादीपैकी एक किंवा अनेक पदर असलेले जीवन"

या दोन पर्यायांतून योग्य ती निवड करणे किंवा दोघातल्या काही पर्यायांचा संगम करून तो मारग स्विकारणे बर्‍याचदा सोपे नसते. शिवाय, वरच्या कारणांमुळेच हा निर्णय, वरवर रोगाची समान स्थिती दिसत असलेलेल्या अनेक रुग्णांत, वेगवेगळा असू शकतो.

हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत वैद्यकीय व्यावसायिकाने त्या विषयातला तज्ञ, सहृदय आणि उपचारातला साथिदार अश्या विविध भूमिका एकाच वेळी पार पाडणे अपेक्षित असते... सर्व माहिती मिळाल्यावर अंतिम निर्णय मात्र रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाने घेणे आवश्यक असते, कारण सरतेशेवटी सर्व काही त्यांनाच निभाऊन न्यायचे असते.

दुर्दैवाने, कारणे काही का असेनात पण, (अ) कधी वैद्यकीय व्यावसायिक रुग्णाला सर्व परिस्थिती समजून देण्यात कमी पडतात तर (आ) कधी रुग्ण व त्याचे नातेवाईक त्यांचे पूर्वग्रह आणि ऐकीव माहितीचा प्रभाव विसरून मोकळ्या मनाने विचार करण्यात कमी पडतात तर (इ) कधी या दोन्हीही गोष्टी घडतात. मग, संवाद थांबतो आणि समज-गैरसमज, आरोप-प्रत्यारोप सुरू होता... जे सर्वांच्याच तोट्याचे असते.

******

अनेक दीर्घकालीन रोग रुग्णाची आयुष्यभर साथ करतात, संपूर्ण रोगमुक्ती कधीच होत नाही. जास्तीत जास्त म्हणजे त्यांना उपचार (आहार, विहार, सवयी, औषधे, इ) करून ताब्यात ठेवता येतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, इ रोग याच प्रकारात मोडतात.

अश्या रोगांत, (अ) कालमानाप्रमाणे होणार्‍या रोगाच्या प्रगतीमुळे आणि / किंवा (आ) वयोमानामुळे रुग्णाच्या शरिरात होत असलेल्या बदलांमुळे, रोगाच्या स्थितीत चढ-उतार (दुर्दैवाने, बर्‍याचदा केवळ उतार) होत राहतात. त्यामुळे आज योग्य असलेली उपचारपद्धती काही दिवसांनी योग्य राहीलच असे नाही. त्यामुळे, उपचारात, बदलत्या परिस्थितीला साजेसे बदल करावे लागतात. अर्थातच, रोगाच्या बदलत्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सतत सजग रहावे लागते. शारिरीक जाणीव/त्रास होत नसला तरी, मधुमेहामध्ये रक्तातील साखर तपासणे व उच्च रक्तदाबात रक्तदाब तपासणे या गोष्टी वेळोवेळी व जन्मभर कराव्या लागतात त्या यामुळेच.

(हा मुद्दा ठासून सांगण्यासाठी जरासे एकांगी पण पूर्णपणे शास्त्रिय उदाहरण : फ्लू बरा झाल्यानंतर त्यासाठी वेळोवेळी वर्षानुवर्षे शरीराचे तापमान मोजण्याची जरूर राहत नाही. कारण, तो बरा झालेला असतो, केवळ ताब्यात आणलेला नसतो.)

तेव्हा अश्या रोगांत, (अ) आपल्या रोगाच्या स्थितीबद्दल सतत जागरूक राहणे आणि (आ) आपल्याला मानवेल अश्या (पक्षी : आपल्याला आवडणार्‍या पण कोणताही अतिरेक नसलेल्या) जीवनशैलीवर कमीत कमी प्रभाव होईल अश्या उपचारांची जागरूकतेने निवड करणे हेच श्रेयस्कर असते.

******

काहीही असले तरी,

फायदा झालेल्या एका रुग्णाचा किंवा आपल्या माहितीतील काही रुग्णांचा (बहुतांश वेळेस केवळ ऐकीव असलेला) अनुभव म्हणजे त्या रोगाच्या सर्व रुग्णांसाठी उत्तम उपाय समजणे हे सर्वसामान्यपणे आढळणारे वर्तन (अ) रोगाबद्दल सामाजात पसरणार्‍या गैरसमजूतीला कारण होते आणि (आ) वैयक्तीकरित्या एखाद्या रुग्णाला धोकादायक ठरू शकते.

असा निर्णय करताना त्या उपचारांनी फायदा न झालेल्या (कदाचित, फायदा झालेल्या रुग्णांपेक्षा जास्त संख्येने असलेल्या) रुग्णांचा अनुभव दुर्लक्षित होतो व हे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे, रुग्णाने व त्याच्या नातेवाईकांनी हे नक्कीच टाळावे.

केवळ "कोणी एखाद्याने सहा महिने कडक डायेट आणि जोरदार व्यायाम करून फायदा मिळवला म्हणून मीही ते करेन" हा विश्वास खरा असेलच असे नाही, आणि असला तरी तो प्रत्येक शरिराला परवडेलच असे नाही, आणि परवडला तरी त्यामुळे बनलेली जीवनाची अंतिम प्रत प्रत्येकाला सुखकारक होईलच असे नाही.

याचा अर्थ दुसर्‍यांचे अनुभव ऐकू नयेत असा अजिबात नाही. मात्र...

(अ) मिळालेली प्रत्येक माहिती किती विश्वासू व शास्त्रिय आहे हे जरूर पडताळून पहावे... कानाला गोड वाटणारी प्रत्येक गोष्ट त्या रोगाच्या प्रत्येक रुग्णाला फायदेशीर ठरेलच असे नाही.

(आ) मिळालेली प्रत्येक माहिती आपल्या वैयक्तीक रोगाची स्थिती व आपली वैयक्तीक मानसिकता यांना कितपत लागू पडते हे प्रामाणिकपणे ताडून पहावे व त्यासाठी तज्ञाची मदत घ्यावी...

मगच स्वतःसाठी योग्य वाटणारा निर्णय घ्यावा.

******

तंत्रऔषधोपचारमतशिफारससल्ला

प्रतिक्रिया

बराच त्रोटक आणि विस्कळीत वाटला लेख

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jul 2016 - 10:44 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

पहिल्या परिच्छेदात लिहिल्याप्रमाणे लेखाचा उद्द्येश "व्यावहारीक निर्णयात उपयोगी पडणारे काही विचार" इतकाच सीमीत आहे...

हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

राही's picture

25 Jul 2016 - 10:39 am | राही

अतिशय सुंदर लेख. मधुमेह बरा होण्याच्या धाग्यात हा जीवनशैली बदलून अधिक खडतर होण्याचा मुद्दा मला वाटते श्री घासकडवी यांनी पुढे आणला होता. माझ्याही मनात ही शंका होतीच.
या लेखामुळे बर्‍याच गोष्टींबाबतचा संभ्रम दूर झाला आणि माहीत असलेल्या काही गोष्टी अधिक ठाशीवपणे कळल्या. आभार.

सामान्य वाचक's picture

25 Jul 2016 - 10:43 am | सामान्य वाचक

प्रत्येकाने अपल्याया आवडेल आणि जमेल असा मार्ग चोखळला पाहिजे

लेख दुर्धर रोगांच्या बाबतीत आहे आणि >>सर्व माहिती मिळाल्यावर अंतिम निर्णय मात्र रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाने घेणे आवश्यक असते, कारण सरतेशेवटी सर्व काही त्यांनाच निभाऊन न्यायचे असते.>>हे अगदी खरे आहे.

चौकटराजा's picture

25 Jul 2016 - 11:05 am | चौकटराजा

हा लेख बारकाईने वाचल्यास फारच बदल आपल्या रोगाला व्यवस्थापित करण्यात होईल. रोगाबरोबरच घरातील इतर लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यात होईल. अल्झायमर (सौम्य) झालेल्या माझ्या आईकडे ती एकदा "रूग्ण" आहे . अल्झायमर दुरूस्त होणारा नाही हे कळल्यावर माझी मनोभूमिका बदलली व ताण कमी झाला. मला डायबेटीस झाला व रक्तदाबही सुरू झाला याचा मला अजिबात मानसिक धक्का बसला नाही. कारण मी खवय्या नाही व मला भटकणे हे आनंदाचे निधान वाटते. आता "आम्ही जायाचं तर की कवातरी पटदिशी " या वसंत बापटांच्या कविते प्रमाणे मृत्यूकडेही पहाण्याचा दृष्टीकोन आहे. देव दयेने मला लाभली जगावेगळी श्रीमंती अशी मनोधारणा होण्यासाठी ग्लास किती भरला आहे हे पहावे लागते रिकाम्याच्या विचार अस्वस्थता या पलिकडे काहीही देत नाही. आनंदी वृती 'तो' दिवस जवळ आल्यावर शारिरीक वेदनांवर किती मात करते यावर आपण खरंच काही कमावले आहे का याचे उत्तर मिळेल.

कंजूस's picture

25 Jul 2016 - 11:21 am | कंजूस

निग्रही आणि आनंदी रुग्ण सर्वांचेच काम सोपे करतात.
चौराकाका +१

कंजूस's picture

25 Jul 2016 - 11:21 am | कंजूस

निग्रही आणि आनंदी रुग्ण सर्वांचेच काम सोपे करतात.
चौराकाका +१

अप्पा जोगळेकर's picture

25 Jul 2016 - 12:20 pm | अप्पा जोगळेकर

मस्त. कठोर शिस्त पाळताना मनावर ताण येऊन आजार झाले तर ती कठोर शिस्त काय कामाची ?

विटेकर's picture

25 Jul 2016 - 12:58 pm | विटेकर

उत्तम लेख !
दुर्दैवाने सगळेच डोक्टर असा विचार करत नाहीत. रोग व्यवस्थापन हा मोठा विषय आहे.

साधा मुलगा's picture

25 Jul 2016 - 1:24 pm | साधा मुलगा

डॉ म्हात्रे, डॉ खरे, डॉ अजया डॉ साती, डॉ आनंदी गोपाळ अश्या डॉ लोकांचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि उपयुक्त असतात, या आणि अश्या मिपावरील सर्व डॉ लोकांनी एक आरोग्य विशेषांक लिहावा असे वाटते, कोणी हॉस्पिटल मध्ये नर्स किंवा NGO बरोबर काम केले असेल तर त्यांचेही अनुभव/ लेख वाचायला आवडतील.

साधा मुलगा's picture

25 Jul 2016 - 1:24 pm | साधा मुलगा

डॉ म्हात्रे, डॉ खरे, डॉ अजया डॉ साती, डॉ आनंदी गोपाळ अश्या डॉ लोकांचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि उपयुक्त असतात, या आणि अश्या मिपावरील सर्व डॉ लोकांनी एक आरोग्य विशेषांक लिहावा असे वाटते, कोणी हॉस्पिटल मध्ये नर्स किंवा NGO बरोबर काम केले असेल तर त्यांचेही अनुभव/ लेख वाचायला आवडतील.

साती's picture

25 Jul 2016 - 10:22 pm | साती

डोळे उघडवणारा आणि उत्तम लेख.
यातल्या प्रत्येक ठाशीव मुद्द्यावर एक एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.

खटपट्या's picture

25 Jul 2016 - 10:37 pm | खटपट्या

कामाचा लेख...

राजेश घासकडवी's picture

31 Jul 2016 - 8:31 pm | राजेश घासकडवी

उत्तम लेख. दीर्घ मुदतीचं खडतर जीवन आणि कमी मुदतीचं सुसह्य/आनंददायी जीवन यांमधला 'योग्य' पर्याय निवडण्याची गरज असते. ही निवड सोपी नसते, आणि प्रत्येकासाठी त्या खडतर/सुसह्य/आनंददायी या शब्दांची व्याख्या वेगळी असते. पण किमान या दोन पर्यायांचा विचार व्हायला हवा हा मुद्दा चांगल्या रीतीने अधोरेखित केलेला आहे.

फक्त स्वतःच्या आणि इतर काहींच्या अनुभवावर आधारित असलेल्या मतापेक्षा अधिकारी व्यक्तीच्या संकलित ज्ञानावर आधारित असलेल्या विचारपूर्व आणि संयत सल्ल्याला अधिक महत्त्व मिळायला हवं.

सोनू's picture

31 Jul 2016 - 11:12 pm | सोनू

उत्तम लेख. आताचे काही धागे व प्रतिक्रीया पाहता खरच गरज होती याची.

आजारी माणसाचा आजार हा केवळ त्या माणसावर घाव घालत नाही. तो कुटुंबातल्या इतरांना हि त्रास देत असतो . आणि इतरांचे स्वभाव पण त्यामुळे बदलतात. डॉक्टर साहेबांनी उदाहरणे घेतलेली योग्य आहेत. जास्तीत जास्त समाजात अशी मंडळी सापडतातच (मधुमेह असणारी किंवा रक्त दाब असणारी ). आणि त्या बाबत आता समाज जागृत पण झाला आहे.

पण दुर्धर रोगांचेबाबतीत आपण फारच मागे असतो. लोकांना नेमके काय झाले आहे हेच माहिती नसते. पूर्वग्रह जबरदस्त असतो . माहितीतली उदाहरणे हि अपूर्ण माहितीचे अड्डे असतात .

कर्क रोग बाबत थोडेसे सांगतो . मला जेवढे कळते त्यावरून हा रोग म्हणजे एका रोग नाही . अनेक प्रकारचे कर्क रोग असतात . आणि त्यांवर उपाय म्हणून आज पर्यंत तरी किमो आणि रेडिएशन हेच माहिती होते. आता इम्युनो थेरपी म्हणून नवा प्रकार आहे. पण आज पर्यंत मी कोठलाच डॉक्टर सरसकट सगळे कर्क रोग मिटवून देतो म्हणून प्रसिद्धी पावलेला पाहिलेला नाही आहे.

पण जवळच्या एका व्यक्तीस हा रोग झाल्यावर गंडे ताईत यांपासून अंगारे धुपारे येथे पर्यन्त सगळे उपाय सांगणारे येऊन गेले. आमचे औषध कुठलाही कर्क रोग लगेच बारा करते असे सांगणारे येऊन गेले. झाडाच्या सालीचे औषध देणारे झाले. टोमॅटो चा जूस प्या म्हणणारे झाले .केवळ हळदी घ्या सांगून झाले. पण ह्या पैकी कोणीही हे औषध का लागू पडेल हे सांगत नाही . बरे तसे विचारले तर औषध देणाऱ्यांपेक्षा त्यांची माहिती सांगणारच जास्त दुखावतो.

हे सगळे उपाय करत असताना रोगी सोडून घराचे इतर लोकांना किती भोगावे लागत असेल ह्याचा कोठेच हिशोब नसतो . अमका बाबा म्हणाला कि 'दही खाऊ नका' कि पुढचे दोन आठवडे दही बंद. मग दुसरा कोणीतरी येतो तो सांगतो कि केवळ दही खाऊनच कोणाचा कर्क रोग गेला . कि दही जोरात. तेच नारळ पाण्याचे. कोणीतरी सांगितले कि डाळ कुकर मध्ये शिजवली कि सत्व जाते. कि गेला कुकर माळ्यावर . चार आठवड्यांनी परत खाली आला.

पण ह्या सगळ्या मागे एका मोठे कारण आहे . ते म्हणजे अज्ञान . आपल्याला जीव शास्त्रात गती नसणे . ज्या माणसाला कर्क रोग कशाने होते हे जराजरा कळले तो माणूस उगाच कुकर माळ्यावर चढवत नाही.

तेव्हां डॉक्टर साहेब , विषय खूप चांगला आहे पण गरज आहे ती समाज प्रबोधनाची. कर्करोग म्हणजे माणसाचा डी एन ए मध्ये होणारे असाध्य बदल . हे जर लोकांना सोप्या भाषेत समजावू शकलो तर कितीतरी त्रास वाचू शकेल . आणि आपण आपले आयुष्य / जीवन समजू शकू . आणि जसा कर्क रोग तसाच दुसरा कोठलाही दुर्धर रोग, हे सांगणे ना लगे .

मंजूताई's picture

1 Aug 2016 - 6:59 am | मंजूताई

अतिशय सुंदर लेख. मधुमेह बरा होण्याच्या धाग्यात हा जीवनशैली बदलून अधिक खडतर होण्याचा मुद्दा मला वाटते श्री घासकडवी यांनी पुढे आणला होता. माझ्याही मनात ही शंका होतीच.
या लेखामुळे बर्‍याच गोष्टींबाबतचा संभ्रम दूर झाला आणि माहीत असलेल्या काही गोष्टी अधिक ठाशीवपणे कळल्या. आभार.<<<< +1
डोळे उघडवणारा आणि उत्तम लेख.
यातल्या प्रत्येक ठाशीव मुद्द्यावर एक एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.+ साती , मनावर घ्याच