एक ओपन व्यथा ५

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
9 Jul 2016 - 3:07 pm

एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054

एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086

एक ओपन व्यथा ३ - http://www.misalpav.com/node/36148

एक ओपन व्यथा ४ - http://www.misalpav.com/node/36475

-------------------------------------------------

खरं तर सह्याद्रीच्या भल्यामोठ्या कड्यासमोर पर्वती खूपच ठेंगणी वाटते. तसंच काहीसं पाटलांना वाटत होतं. इतके विचित्र विचित्र गुन्हे आणि त्यामागची अगदी साधी साधी कारणं पाहून, अनुभवून त्यांचं मन अगदी निबर झालं होतं... कुठे कोणी गुटख्याची पुडी दिली नाही म्हणून खून करतंय... कोणी दारूला पैसे नाहीत दिले म्हणून सख्ख्या आईला मारतंय... कोणी सिगारेट शेअर नाही केली म्हणून राग मनात धरून त्याचा रक्तरंजित बदला घेतंय... माझ्या बहिणीकडे पाहून साधं तरी का बघितलं म्हणून खून करण्याचे प्रकार सुद्धा त्यांना नवीन नव्हते. मार्क्स कमी पडले, आईबाबांनी अपमान केला, थोरल्याने कानाखाली वाजवली, आवडती भाजी केली नाही किंवा अजिबात नं आवडणारी भाजी केली, बाबांनी बाईक घेतली नाही, भर वर्गात सर घालून पडून बोलले.. इथपासून ते आवडीचा स्कर्ट घेतला नाही इथपर्यंत आत्महत्येची कारणंसुद्धा पाटलांना नवी नव्हती. बहुतेक वेळा आत्महत्येच्या मागचं कारण हे प्रेमभंगाशिवाय दुसरं कुठलंच नसतं. ह्या सगळया पार्श्वभूमीमुळे पाटलांची नजर ह्या असल्या प्रकरणात मेलीच होती. पण हे प्रकरण जरा वेगळं वाटत होतं.

"च्यायला आपण आतापर्यंत नाही नाही त्या भानगडी बघितल्या. पण ही असली आत्महत्या? इतक्या भयावह पद्धतीने? शक्य नाही ते.... कारणं काहीही असली तरी ही शुद्ध आत्महत्या म्हणून मान्य करणं काही पटत नाही राव...." पाटील पुटपुटले.

"साहेब स्वतःशीच काय बोलताय?" कांबळे

"नाही रे.... हे वाचत आहे... "

"अजून तेच वाचत आहात... "

"ह्म्म्म.... "

"काही धागे दोरे मिळताहेत?"

"तसं आत्ताच काही नाही सांगता येत"

"नेमकं वाचताय काय?"

"सुसाईड नोट... "

"अच्छा ती??? ... साहेब, एक विचारू?...

"विचार की रे?"

"सुसाईड नोट इतकी मोठी असते?"

" तसं पाहायला गेलं ...... तर नसते रे... पण .... अजून नाही काही सांगता येत नक्की असं"

"बरं ..."

"काही किडे.... अजून.... जरा किर्रर्र किर्रर्र ..... करत आहेत.... डोक्यात..."

"किती किडे सांभाळणार आहात सर.... "

"अं ......... ....... कांबळे... "

"सर.... "

"ते कसब्यातल्या अपघाताचे काही अपडेट्स??..."

"होय साहेब.... दोघेही ऍडमिट आहेत... जोर्रात मार लागलाय..."

"बरं..."

"ही आजची पोरं ना.... कुठं आणि का शेण खात असतात देव जाणे ... दारू पिऊन झिंगत होते दोघेही..."

"काय करावं ..... ह्या वारं पिलेल्या पोरांना..."

"साहेब खरंय... आणि सांगतो तुम्हाला, हे जे प्रकरण चालूये ना.... नका जास्त त्या चिटोर्यान्च्या नादी लागू... आपण पडू बाहेर... नेहमीचंच काहीतरी असणारे... भानगड काहीतरी असेल... कोणीही इतक्या भयानक प्रकारे आत्महत्या करत असतं का कधी? आपण आत्तापर्यंत इतक्या आत्महत्या बघितल्या... जाळून घेऊन, गळफास लावून, पोटाला दगड बांधून पाण्यात बुडून, पोहता येत असेल तर कोरड्या विहिरीत उडी घेऊन, उंच इमारतीवरून मुद्दामून उडी घेऊन, रेल्वे ट्रॅक वर झोपून, काहीतरी पिऊन, मनगटाची नस कापून घेऊन... असे असंख्य प्रकार आपण बघितलेत... पण हे असल्या प्रकारे नाही ओ करत कोणी..."

"खरंय... तेही आहेच म्हणा... हे अश्या प्रकारे नाही कोणी करत आत्महत्या... हे प्रकरण मलाही जरा वेगळं वाटतंय खरं...

"मी पण तेच म्हणतोय साहेब..."

"....... "

"साहेब, खूनंच वाटतोय बघा मला तर... "

"आत्ताच आपण नाही कोणता निष्कर्ष काढू शकत .... पण हे आधी वाचायलाच हवं..." त्या फाईलकडे बघत पाटील म्हणाले.

ह्यांचं तर ना... अवघडे.... असं काहीसं पुटपुटत कांबळे निघाले.

"कांबळेSSSS... जरा थांबा..."

"बोला साहेब... " कांबळे थांबले.

खरं तसं पाहायला गेलं तर नुसत्या सुसाईड नोटवर कधीच पोलीस डिपार्टमेंट अवलंबून नसतं... त्याला इतर काही पुराव्यांची जोड द्यावीच लागते. तो तपास करावाच लागतो. आणि मिळालेले पुरावे जर त्या नोटच्या अनुषंगाने असतील तरंच ठाम अशा एका मुक्कामी पोहोचता येतं. एक निश्चित असा निष्कर्ष काढता येतो. पाटलांनी एक चिठ्ठीवर काहीतरी लिहिलं आणि कांबळेंना ती चिठ्ठी दिली.

"एव्हढं जरा बघून या बरं"

"हो साहेब..."

"आणि जाताना काळेंना पण घेऊन जा... नवीनच जॉईन झालेत तेव्हढंच त्यांना पण कळेल... "

"होय साहेब.... त्याला पण घेऊन जातो."

कांबळे गेले.. पाटलांनी चहावाल्याला एक फक्कड चहा बनवायला सांगितला. काही फोन करायचे होते ते केले. स्टेशन डायरी चाळली. अशात काही विशेष गोष्टी घडल्या नव्हत्या. किरकोळ भांडणं, मारामार्या, रोमिओगिरी, घरगुती कलह ह्यांनीच ती भरली होती. जी काही इतर कामं होती ती करून झाली. चहा आला. चहा घेतला. आणि पाटलांनी ती फाईल उघडली... ते वाचू लागले....

"...... आणि शेवटी ज्या गोष्टीची माझं आयुष्य अगदी आतुरतेने वाट बघत होतं तो दिवस आला. होय, आजही तो दिवस आठवतोय, कितीतरी काळ लोटलाय त्यानंतर पण तरीही आज सगळं कसं स्पष्ट दिसतंय. स्पष्ट आठवतंय. जेंव्हा कोणतंही पोरगं कॉलेजची पायरी चढतं तेंव्हा एकाच अनामिक अनुभूतीची ते अगदी मनापासून उत्सुकतेनं वाट बघत असतं. तो क्षण, तो दिवस माझ्याही नशिबात लिहिला होता.... तो दिवस होता ४ जुलैचा. मी तिसऱ्या वर्षाला होतो. खिडकीपासून चौथ्या रांगेत बसलो होतो. नुकतंच कॉलेज सुरू झालं होतं. जेंव्हा एका कॉलेज मध्ये तुम्ही असता ना तेंव्हा तुमचं लक्ष सगळ्यात आधी तुमच्या वर्गातल्यांकडे जातं. तिथे जर हवं ते मिळालं तर तुमचा शोध संपतो, अर्थात हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही पण साधारणपणे तसंच होतं. जर वर्गात हवं तसं कोणी क्लिक नाही झालं तर नजर जाते ज्युनिअर कडे. त्यातल्यात्यात नवीन ऍडमिशनकडे, पहिल्या वर्षाकडे.... मग आपसूक नजर वळतेच वळते. कोणीही नं सांगता...

..... दुसरा तास होता... सर वर्गात शिकवत होते.. आम्ही सर्व ते ऐकत होतो. मी सी आर असल्यामुळे सर माझ्याकडेच बघून शिकवत होते. त्यामुळे मला दुसरीकडे बघायची चोरी होती. मी पण मान दुखावून सरांकडेच बघत होतो. मग ते चित्रपटात दाखवत ना, नायिका यायच्या आधी काहीतरी सूचना मिळते, म्हणजे एकदम कसलातरी सुगंध सुटतो, किंवा हळवी झुळूक येते, व्हायोलिन वाजते वगैरे वगैरे... तस्सं काही काही झालं नाही. पण असंच मी खिडकीतून बाहेर बघितलं आणि.....

खस्सकन.........

खूप जोरात ओ...

खूप जोरात काळीज कापल्यागत झालं...

मी सांगू नाही शकत नक्की कसं वाटलं तेंव्हा. पण जे काही वाटलं ते खूप वेगळं, विचित्र पण तरीही खरंच सांगतो, खूप हवंहवंसं वाटलं होतं. तसं पाहायला गेलं तर मी तिला काहीच..... आईशप्पथ काहीच बघितलं नव्हतं... चॉकलेटी ड्रेस आणि तिची पोनीटेल... आणि त्या पोनीटेलमधून सुटलेली एक बट अशी कपाळावर आलेली बाजूने. त्यामुळे तिचा चेहराही फारसा दिसला नव्हता... आणि जे काही दिसलं होतं तेही अगदी मायक्रो-सेकंदासाठी.... तरीही जे काही आत झालं होतं... ते खूप वेगळं होतं.... एखादा बॉम्ब पडतो तेंव्हा त्या बॉम्बचा आणि जमिनीचा संपर्कही असाच मायक्रो-सेकंदासाठीचा असतो. पण त्यानंतर होणार परिणाम कितीतरी काळ राहतो... माझ्या अस्तित्वावर त्यादिवशीचा असाच एक बॉम्ब पडला.

खूप अस्वस्थ झालो. कधी एकदा तास संपतो आणि मी लायब्ररीत जाऊन त्या मुलीला बघतो असं झालो होतो... पण सालं घड्याळ दगा देतं ना राव अश्या वेळी.... किती हळूहळू चालतं??... त्याच्या मालकाची अवस्था किती बिकट झाली होती? काही काळजी नाही. ते आपलं अगदी निवांत चाललं होतं... सेकंदबरहुकूम.... नंतरची ती दहा मिनटं मला युगासारखे वाटली...
..... आणि ती दहा मिनिटं..... बरोब्बर दहाच मिनिटांनीच संपली. टोल वाजला... आम्ही आमचं दप्तर तसंच वर्गात टाकून लायब्ररीत पळालो.

ती बुक्स इश्यू करून घेत होती. आयुष्य किती क्रूर थट्टा करत होतं माझ्याबाबतीत. वाटलं होतं लगेच दर्शन होईल. पण ती उभी पाठमोरी. डेअरिंगचा तसा शंखच आमच्या बाबतीत. तशी तिथे रिकामी जागा होती की जिथून मी तिला सहज बघू शकत होतो. पण नाही गेलो. धाडस नाही झालं. उगाच पेपर चाळत तसाच मागे दाराशेजारी उभा राहिलो. तिचं ते बुक्स इश्यू करून झालं आणि ती वळली....

माझं आयुष्य क्षणभरासाठी थांबलं...

हो...

श्वास एकदम वाढला.

अंग गरम झालं...

सरसरून काटा आला अंगावर...

पोटात खड्डा पडला, खूप मोठ्ठा..

अचानक घशाला कोरड पडली.

नवीन होतं ओ हे सगळं माझ्यासाठी...

एकदम सगळा शोध थांबल्यासारखा वाटला. वाटलं.... ह्याचसाठी जन्म झाला होता माझा... ती सुंदर नव्हती... मला सुंदर मुली फारश्या क्लिक नाहीत झाल्या कधीच. आवडायच्या नक्कीच पण ते क्लिक होणं नाही झालं कधी. अर्थात मला माझी लायकी माहीत होती म्हणून असेल कदाचित. पण तिच्यात कसलातरी तो एक्स-फॅक्टर म्हणतात ना तो होता. तो भावला मला. तोच क्लिक झाला मला. आणि त्यात गालावर खळी.... आह... आजही तो दिवस माझ्यापुढे घडतोय असं वाटतंय. इतका जिवंत अनुभव होता तो. तिच्या मैत्रिणीकडे बोलत बोलत तिची नजर गेली माझ्याकडे तेंव्हा अंगावर वीज पडावी तसं झालं.... ती माझ्यासमोरून निघून गेली.

मग काय जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी... तीच दिसू लागली.

मग काय कॉलेजच्या आधी पंधरा मिनटे आम्ही सायकल सायकल-स्टॅन्डमध्ये लावून तिची वाट बघत बसायचो. ती आली की लगेच सटकायचो. तिला कळू द्यायचं नव्हतं की मी तिची वाट बघायचो ते. दाराच्या फटींमधून तिला बघायचो. तिचा क्लास जर ऑफ असेल तर आपण पण क्लासला दांडी मारून लायब्ररीत बसायचो, पेपर वाचायचा अभिनय करत. तेंव्हा मला तर वाटायचं की मला अभिनयाचं कुठलंतरी पारितोषिकच मिळायला हवं होतं. एव्हढा बेमालूम तो रोल वठवायचो. (अर्थात ते फक्त मलाच वाटायचं, कारण अख्ख्या कॉलेजला माहीत पडलं होतं हे माझं प्रकरण.... एकतर्फी)

साधारण सात-आठ दिवसानंतर....

मी लायब्ररीत बसलो होतो.. आणि एकदम कुठलीही पूर्वकल्पना नं देता ती माझ्यापुढे येऊन उभी राहिली. धाडदिशी.... मी सटपटलोच ना राव...

"तू XXXXX ना रे.... " तेंव्हा मला नाव होतं.

"हो... " मी चाचरत उत्तर दिलं... उठायचा प्रयत्न करत...

"तू पहिला आला होतास ना... अरे बस बस ..." माझ्याशेजारी म्हणजे शेजारच्या खुर्चीत बसत ती म्हणाली... लगेच सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे आपसूक वळल्या. माझं कॉलेज हे साधारण ग्रामीण भागातलं. एक मुलगी एका मुलाशी बोलतीये, तेही सार्वजनिक जागी... हे पचनी पडत नाही. लगेच भुवयांच्या धनुष्यातून कितीतरी संशयाचे बाण सुटू लागतात सटासट. गॉसिप बहाद्दरांना अजून काय हवं असतं... एकदातर ह्या भानगडीपायी आमच्या वर्गातल्या दोघांना स्पष्ट सांगावं लागलं होतं की आम्ही भाऊ-बहीण आहोत म्हणून... सख्खे.

"आपण.... बाहेर.... जायचं?" मी

"अवश्य... " ती.

अवश्य? बाबोSSSS.... आम्ही बाहेर आलो.

तिला कोणीतरी सांगितलं होतं मी पहिला आलो होतो म्हणून. तिला पहिलं वर्ष जरा अवघड चाललं होतं. मग माझ्याकडून मार्गदर्शन घ्यायला आली होती. म्हणजे तिच्याशी आपणहोऊन बोलायचा माझा मार्ग तिनेच खुला करून दिला होता. म्हणजे आधी मी नाही तर ती बोलली होती. त्या काळात हे समाधान मला पर्वताएव्हढं होतं. मग मार्गदर्शनाच्या नावाखाली आमचं ते वह्यांची देवाणघेवाण, अधून मधून लॅन्डलाईन वर कॉल्स वगैरे, कॉलेजमध्ये भेटीगाठी सुरू झाल्या. आम्ही जरा जवळ आलो. कॉलेजमधून घरी यायला उशीर होऊ लागला. आईच्या कपाळाच्या आठ्या जरा गडद होऊ लागल्या. अर्थात मी दुर्लक्षंच करायचो. वाढत्या भेटीगाठींच्या मागे मग ते रुसवेफुगवे, लटके राग, कधी मी चिडणार तर कधी ती. कधी मी मनवणार तर कधी ती. "मी नाही जा..." वाली पेल्यातली भांडणे तर नेहमीचीच झाली होती. कारणाने होणारे कॉल्स आता विनाकारणाने होऊ लागले.... घरून होणारे कॉल आता कॉईन बॉक्स वरून होऊ लागले. एकंदर प्रकरण जरा पुढे पुढे जात होतं...

महिना झाला असेल जेमतेम... आमच्यात एकदा जोर्रात भांडण झालं... कारण फुसकंच होतं... पण चूक माझी नव्हती...मी का म्हणून माघार घ्यायची? मी का म्हणून बोलायचं? मी चक्क दोन दिवस बोललो नव्हतो तिच्याशी.... दोन दिवस... मग माझी वही तिने तिच्या मैत्रीणीकरवी माझ्यापर्यंत पोहोचवली... कारण मी भेटणार नव्हतो तिला... मी ती घेतली आणि माझ्या बॅगमध्ये ठेवली. घरी गेलो. सगळ्यात आधी ती वही उघडली कारण मला माहीत होतं की माझी कुठलीही वही तिच्याकडे नव्हती. मला अपेक्षित असणारी चिठ्ठी त्यात मिळाली, त्यात लिहिलं होतं...

"विश्वास असेल तर प्रेम दृढ होतं...

प्रेम असेल तर आयुष्य सुंदर होतं...

आयुष्य सुंदर असेल तर जगणं सुंदर होतं...

आणि जगणं सुंदर असेल... तर... काही सांगायची गरज आहे??

चिडला असशील तर माफ कर...

राग विसर....

पण
.
.
.
.
मला नकोस विसरू"

तुझीच
मी

पुन्हा एकदा सरसरून गेलं अंगावरून.... अशात तर माझं शरीर म्हणजे शहार्याचं रान झालं होतं... तसं ती असताना शहारे यायचेच यायचे. पण आत्ताचे शहारे हा त्यांचा उच्चान्क होता. मला काहीच सुचलं नाही. आईनं ताट वाढून ठेवलं होतं. आईनं हाक मारली. मी ओरडून सांगितलं मला भूक नाहीये म्हणून. पोट टच्च भरलं होतं... आई वैतागून रूम मध्ये येत असताना दिसली तेंव्हा पटकन ती चिठ्ठी शर्टच्या खिशात टाकली आणि गपगुमान आईच्या मागे जात जेवायला बसलो...

दुसर्या दिवशी सकाळी आंघोळीचं पाणी काढत असताना आईनं विचारलं...

"काय म्हणतीये रे.... तुझीच मी"

मी लाजून पळालो...

"आईला कळालंय आपल्यातलं.... " ती कॉलेजच्या खाली आल्याआल्या मी तिला सांगितलं.

"काय??" ती गोंधळून.

"आपल्यातलं..."

"काय?"

भांडण झाल्यावरचं आमचं हे पहिलं संभाषण होत होतं....

"तू पाठवलेली चिठ्ठी आईने वाचली..."

"तू मूर्ख आहेस??" ती जवळजवळ किंचाळलीच.

"मी नाही दाखवली... तिलाच कुठून मिळाली माहीत नाही"

"मग?"

"मग काय?? नाही काही म्हणाली..."

"काहीच नाही?"

"नाही ग काही... "

"बंर... बाय द वे... आपल्यात काय आहे बरं?"

"तुला नाही माहीत?"

"नाही बुवा..."

"नसेल माहीत तर जाऊ दे.... मी जातो वर" मी वर जाण्याचा अभिनय करत म्हणालो.

"तुला नाही जमत अभिनय वगैरे... "

"तरीही विचारतेस?"

"काय?"

"जाऊ दे ना... नसेल बाबा अजिब्बात आपल्यात... मीच चुकीचा असेन"

"नाही रे... तू चुकीचा नाहीयेस अजिब्बात.... समजतंय का तुला? तू...... चुकीचा..... नाहीयेस.... अज्जिब्बाSSSSSSSत" ती अज्जिब्बात वर जोर देऊन म्हणाली.

कॉलेजच्या खालीच तिला अगदी कडकडून मिठी मारावी असं वाटलं होतं. प्यार किया तो डरना क्या? वगैरे फिल्मी डायलॉग पण डोक्यात आले होते. पण नाही मारली. मन मारलं आणि कॅंटीन मध्ये एक कॉफी दोघात पिली.... एकाच कपातून...

अश्या प्रकारे आयुष्यात एक अतिशय सुंदर असं प्रकरण सुरू झालं होतं. ज्या व्यक्तीच्या शोध आयुष्यभर चालू असतो अशी व्यक्ती मला कॉलेजच्या तिसर्याच वर्षी मिळाली होती. एव्हाना कविताही करू लागलो होतो. अर्थात प्रेमात पडल्यावर जर पोरगं किंवा पोरगी जर कवी किंवा कवयित्री झाली नाही तर त्या प्रेमाचा अपमान असतो.

"फुल बनून कळीशी कधीतरी बोलावं..
तिच्यासवे वार्यावरती मनसोक्त डोलावं..
पाखरांची कुजबुज पानांच्या कानांनी ऐकावी..
आपल्याही प्रतिभेला कवितेची फळं पिकाची..
रोज एक नवं वादळ काळजामध्ये साठत असावं....
.
.
वयात आलेल्या बर्याच जणांना बहुदा असंच वाटत असावं...!!"

अजून सांगायचं म्हणजे

"तुझ्या डोळ्यात अश्रूंची
माझ्या उसळावी लाट
तुझ्या घराची दिसावी
भिजलेली पायवाट"

.
.
तुझ्या हातावर म्हेन्दी
माझ्या नावानं सजावी
किती पाहायची स्वप्ने
कधीतरी खरी व्हावी"

हे असलं काहीतरी ट ला ट जोडून लिहायलाही लागलो होतो... तिला खूप आवडायचं ती म्हणायची खूप छान लिहतोस. मला पण भारी वाटायचं. अजून खूप लिहावं वाटायचं. ती म्हणायची कधीही फोन कर आणि ऐकवत जा... खूप छान वाटतं, तुझ्या कवितेत मला स्वतःला शोधायला. मी हो म्हणायचो. काही सुचलं की लगेच तिला कॉईन बॉक्सवरून फोन करून ऐकवायचो. तिला ऐकवायचं म्हणून मला काहीतरी सुचणं भाग असायचं... आणि सुचायचंपण मला बरं....

ती एकदा मला म्हणाली होती मला लग्नानंतर पण ऐकवणार ना रे? मी लाजून हो म्हणालो होतो.

ती जर कॉलेजला येणार नसेल तर मला आधी सांगायची. मग मी पण कॉलेजला जाणे टाळायचो. तिच्याशिवाय कॉलेज? शक्य नव्हतं. तिच्या वर्गात बसायची परवानगी नव्हती नाहीतर तिच्याच वर्गात बसलो असतो.... तिच्याच शेजारी जाऊन. मी ऍडिक्ट झालो होतो.

जाणून बुजून केलेले वा झालेले निसटते स्पर्श, खुणवा-खुणवीची ती भाषा, चोरटे कटाक्ष, घरी वाढू लागलेले ब्लँक कॉल्स, ती आतुरता, ते फुलणं, तिचं हसणं.... तिची ती स्पेशल खळी...

आह

"काय सांगू तिची खळी, बळी माझा रोज घेई
दाद द्यावीच लागेल, सारं सहनही होई..

हे असं चाललं होतं एकंदरीत... आयुष्यातला सगळ्यात सुंदर आणि अति-उत्कृष्ट काळ

ती माझ्या गावची नव्हती... शेजारच्या गावची होती. बस ने ये-जा करायची. बर्याचदा गाडी जर असेल तर मीच सोडवायला जायचो तिला. अगदीच आणिबाणीच्या वेळेस ती रिक्षा करायची पण दुसर्या कोणाच्या गाडीवर नाही जायची. हे तिनेच स्वतःच ठरवलं होतं.

एकदा मला तिचा फोन आला. तिच्या पायाला काहीतरी लागलं होतं. आणि तिची रिक्षानं जायची इच्छा नव्हती. मी म्हणालो की ठीक आहे, येतो गाडी घेऊन. आणि ऐन निघायच्या वेळी बाबांनी एक काम सांगितलं. विचार केला, काम करतो आणि मग तिला सोडायला जातो. कामाला उशीर झाला. कॉलेजला जायला उशीर झाला. कळालं ती गेली खूप वाट पाहून कोणासोबत तरी... स्वाभाविक होतं... किती वेळ वाट बघणार? खूप उशीर झाला होता. पण त्यानंतर जे काही कळालं ते मला पूर्णपणे अनपेक्षित, धक्कादायक आणि अतिशय मनस्ताप देणारं होतं......
.
.
.
.
.
.
.
.
.

ज्याच्या गाडीवर ती गेली तो, दुसरा तिसरा कोणी नसून ज्यांच्यासोबत गेल्या वर्षी माझं भांडण झालं होतं तोच होता...

कथा

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

9 Jul 2016 - 3:25 pm | संजय पाटिल

छान..
वाचतोय..

अभ्या..'s picture

9 Jul 2016 - 3:36 pm | अभ्या..

आह्ह्ह्ह्ह,
अप्रतिम लिहिताहात.
लव्हस्टोरी चटका लावणारीय.

नाखु's picture

9 Jul 2016 - 5:20 pm | नाखु

पुभाप्र

टवाळ कार्टा's picture

10 Jul 2016 - 11:18 am | टवाळ कार्टा

लव्हली

सामान्य वाचक's picture

10 Jul 2016 - 3:51 pm | सामान्य वाचक

प्रत्येक भागा वर प्रतिसाद नाही दिला गेला
पण पुढच्या भागा ची वाट पाहत आहे

रातराणी's picture

11 Jul 2016 - 5:00 am | रातराणी

+१.
सुंदर लिहीत आहात. पुभाप्र.

कृपया कथेखाली क्रमशः, समाप्त इत्यादी लिहिलेत तर आमच्यासारखे वाचक जे कथा पूर्ण झाल्यावरच अखंड वाचणे पसंत करतात.. त्यांची फार सोय होईल. धन्यवाद.

वटवट's picture

11 Jul 2016 - 3:28 pm | वटवट

ह्यापुढे लक्षात ठेवीन....
सुचनेबद्दल आभारी आहे.

शि बि आय's picture

13 Jul 2016 - 9:48 am | शि बि आय

छान लिहिताय.. पुभाप्र