एक ओपन व्यथा ६

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
14 Jul 2016 - 3:02 pm

एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054

एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086

एक ओपन व्यथा ३ - http://www.misalpav.com/node/36148

एक ओपन व्यथा ४ - http://www.misalpav.com/node/36475

एक ओपन व्यथा ५ - http://www.misalpav.com/node/36610

--------------------------------------------------

"त्याचसोबत कशाला झक मारायला गेली होतीस?" मी अतिशय संतापाने तिला विचारलं.

खूप टाळकं सरकलं होतं माझं नंतर. इतर कोणासोबतही ती गेली असती तर मला काहीच अडचण नव्हती. पण त्याच्याचसोबत?? कोणाला आवडलं असतं. अर्थात तिला काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती. तसं पाहायला गेलं तर त्यात तिची काहीच चूक नव्हती. कशी असेल? पण हे मला आज जाणवतंय पण त्यावेळेस? संतापलो होतो ना मी. आणि माझ्याकडून तिला कधीच शिवी दिली गेली नव्हती. म्हणून मी तिला जे काही म्हणालो होतो. ते ऐकून तिला धक्का बसला नसता तर नवलच होतं...

"तुला काही कळतंय का तुला काय बोलतो आहेस ते?" ती

"होय... कळतंय... चांगलंच कळतंय..."

"काय कळतंय?..... "

"मला कळायचं ते कळतंच आहे.. पण तुला नाही नाहीये ना कळत.... " मी दात ओठ खाऊन म्हणालो.

"जर तुला असं काही बोलायचं असेल तर मी जाते..." ती चिडून म्हणाली.

"चोर तो चोर आणि वर शिरजोर???"

"कोण चोर?"

"तूच आणि दुसरं कोण?... कोणी सांगितलं होतं तुला त्याच्याबरोबर जायला?"

"ओहो.... आत्ता समजलं... आंखोमे जलन आणि सीनेमे तुफान का आहे ते?" ती लाडात येत म्हणाली.

"तुला.... ना... कसं ..... समजणार...आहे???.... माझं जळणं??" मी वैतागात.

"इतका पझेसिव्ह नकोस होऊ..."

"मी पझेसिव्ह नाहीये होत... तू एक मुलाबरोबर जातियेस ह्यात मला काहीच अडचण नव्हती आणि कधीच अडचण नसणारे..."

"मग??"

"तू त्याच्यासोबत नको जायला होतं..."

"अरे त्यादिवशी मला पायाला नव्हतं का लागलं?? आणि मी पर्सपण घरीच विसरले होते. म्हणून रिक्षा नाही केली... तशीच लंगडत चालली होते, तेंव्हा त्याने विचारलं की मी सोडू का? मी हो म्हणाले... आणि गेले त्याच्यासोबत... एव्हढंच झालं.... एव्हढसंच प्रकरण.. आणि तू ताणतोस किती? जाऊ दे ना..."

"तुझ्याकडे पैसे नव्हते... मान्य.... पण मग मैत्रिणीकडे मागितले असते तर नसते का मिळाले?"

"हां........ ते लक्षातच नाही आलं.... आणि तसंही मला कोणाकडे नाही पैसे मागायला आवडत"

"ह्म्म्म ... आणि लिफ्ट घ्यायला आवडते ना?" मी प्रचंड वैतागून म्हणालो.

"तू का एव्हढा वैतागतो आहेस? खरंच मला नाहीये कळत..."

"तू त्याची लिफ्ट नकोस होती घ्यायला"

"तुला नाही का आवडत तो?"

"विषय आवडण्याचा आणि नं आवडण्याचा नाहीये..."

"मग?"

"कसं सांगू तुला...?"

"कसंही..."

"अगं आमच्यात भांडण झालं होतं.... गेल्या वर्षी... मारामारी झाली होती..."

"तुला मारलं होतं त्याने??" तिने आश्चर्यचकित मुद्रेत विचारलं.

"हो... त्याची परतफेड पण केली होती मी..."

"गुड.... मग झाली की फिटंफाट"

"तुला काही समजत नाहीये की तुला समजून घ्यायची इच्छा नाहीये.... तेच मला कळत नाहीये..." माझा वैताग काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता.

"जाऊ दे ना.... तुला नाही ना आवडत... ठीके मी नाही त्याच्या गाडीवर जात यापुढे..."

" ................."

"सॉरी बाबा...."

" ................."

"बोलशील?"

" ................."

शेवटी मला माझी कळी खुलवावीच लागली... काय करणार, प्रेम होतं ना ते आमचं. आणि प्रेमात पोराला जास्त काळ रागवायचा हक्क नसतो... मला नव्हता.

कॉलेज चालू होतं... परीक्षा महिना-दीड महिन्यावर आल्या होत्या. अभ्यासाच्या नादात आमच्या भेटीगाठीपण कमी झाल्या होत्या. तरी अधूनमधून हायबाय व्हायचे. मी तिला कॅसेट रेकॉर्ड करून दिली होती, तिच्या आवडत्या गाण्याची. ती नेहमी ऐकायची ती कॅसेट. मी दिलेली गाणी ऐकून ती आम्हा दोघांना नायक आणि नायिकेत बघायची. अर्थात असं ती भेटल्यावर नेहमी सांगायची. ते ऐकून मी पण तिच्यासोबत छान पैकी लाजायचो....

अशात तिला तिच्या वर्गात काही मित्र मैत्रिणी मिळाल्या होत्या. ती तिच्या ग्रुप मध्ये खुश होती. तिचंही छान रुटीन लागलं होतं.. आमचं कॅंटीन मध्ये जाणं एव्हाना कमी झालं होतं. स्वप्नरंजन पण फारसं नसायचं. नव्याची ओढ कायम रहात नसते. पण त्या पातळीवर मी अगदी निवांत असायचो. आपण भलं आपला अभ्यास भला... असंच चाललं होतं.... अशात, अधूनमधून त्यांच्या ग्रुपमध्ये मला तो दिसु लागला होता. पण सगळ्या गोष्टी तिला स्पष्ट माहीत असल्याने ती त्याच्या नादी लागणार नाही याची मला खात्री होती. आणि आधीच माझ्या भावाने चांगलाच दम दिला असल्याने तो पुन्हा काही उचापती काढणार नाही ह्याची मला निश्चिती होती. ते सगळे मिळून कॅंटीनला जायचे. जरा जरा हसी-मजाक पण सुरू झाला होता असं कळायचं. मीच म्हणायचो जाऊ दे ना... आपण ज्याचा त्याचा स्पेस ज्याचा त्याला दिला पाहिजे... तो स्पेस मी तिला देत होतो. कितीजरी म्हटलं तरी ते प्रेम होतं माझं....

काही दिवसातंच मला त्याच्या वागण्यात जरा बदल दिसू लागला. तसं त्याचं वर्ष गेलंच होतं, त्यामुळे कधीच कॉलेजला यायचा नाही पण अशात तो कॉलेजवर दिसू लागला होता. मुद्दाम गाडीनं कट मारून जायचा. एकदातर मी सायकलीवरून पडता पडता वाचलो होतो. अधूनमधून चारचाकी पण आणायचा आणि उगाच जोरात रेसिंग केल्यासारखं करायचा माझ्यासमोर. आणि मुद्दाम तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. पुन्हा ते जिन्यात मध्येच उभं राहणं चालू झालं होतं. डोळे मोठे करून उगाच माझ्याकडे बघणं सुरू झालं होतं. ते टस्सल देणं परत चालू होतं. आता तो एकटा नाही तर त्याच्या सोबत त्याच्यासारखेच काही दोन तीन गुंड दिसू लागले होते. ती अधूनमधून त्याच्याशी बोलताना दिसली. मी तिला खडसावलं तेंव्हा तिने ते टाळलं. मी तिला अक्षरशः गयावया करत सांगत होतो की हे नाही चांगलं दिसत, अशात सगळ्या कॉलेजला माहीत झालं होतं आमचं प्रकरण, नाही बरं दिसत तिने अश्या मुलाशी बोलणं की ज्याच्याशी माझं भांडण झालं होतं. ती बरं म्हणायची.... आणि परत काही दिवसांनी त्याच्याशी बोलताना दिसायची...

माझं अभ्यासावरचं लक्ष उडू लागलं होतं...

एकदा मी कॉलेज सुटल्यावर खाली आलो. ती कॉलेजला आली नव्हती.

तो त्याच्या तीन मित्रांसोबत त्यांच्यापैकी एकाच्या गाडीवर बसला होता... कॉलेजच्या पाराखाली... त्याने मला हाक मारली...

"एSSSSSS ... XXXXX (माझी जात)"

स्वाभाविकच माझी टरकली. जाऊ की नको ह्या विचारात असताना...

"आर.... तुलाच हाक मारलीय.... यी .... तूच" त्याचा एक मित्र मला म्हणाला.

मी चाचपडत गेलो. धडधड वाढत होती.

"काय रे...?? " मी विचारलं.

आणि
.
.
.
.
.

झण्ण्ण्ण्ण्ण....

लगेच पुन्हा माझ्या नाकातोंडातून गरम वाफा निघू लागल्या. पुन्हा डोळे पाण्याने डबडबले. पुन्हा क्षणभर अंधारीपण आली. पुन्हा पाय लगेच लटपट कापू लागले. पुन्हा थरथर अंगात भरली. पुन्हा सगळं त्राण गेलं. पुन्हा वाटलं खूप चक्कर येत आहे. पुन्हा आजूबाजूचं सगळं फिरू लागलं. पुन्हा तोंडातून लाळ गळू लागली. सगळं पुन्हा तेच झालं... फरक एव्हढाच होता की ह्यावेळेस त्याने नाही तर त्याच्या सोबतच्याने वाजवली होती. मी थरथरत.

"XXXXX (आमची जात) भेन्चोद... आवाज कोणावर वाढवतोस बे???" त्याने तश्शीच अजून एक ठेऊन दिली. दुसर्या बाजूने.

"मी... कुठे... काय... आवाज.... " माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच दुसर्या एकाने परत एक तशीच ठेवून दिली. बहुतेक त्यांनी ठरवलं असावं की प्रत्येकानी बारीबारीनं मारायचं. मी बधीर होत होतो.

राजाच्या थाटात तो उठला. पराक्रमच गाजवत होता ना तो. मी त्याच्याकडे बघितलं, गालाला हात लावत.

"कोणाकडे बघतोस बे.... लायकीने रहा" असं दात ओठ खाऊन म्हणत त्याने खूप जोरात पोटात लाथ दिली. मी खाली पडलो.

"मी काय केलंय?" मी अतिशय अजीजीने विचारलं...

"कोणाकडे बघतोस बे? आयघाल्या"... म्हणत एकाने पुन्हा तशीच पाठीत लाथ दिली. मी तोंडावर पडलो. सगळी धूळ तोंडाला लागली. उठत उठत ती मी पुसू लागलो. आणि तिघांपैकी एकाकडे बघितलं.

"नजर....... खाली.... " असं दरडावत एकानं त्याचा गुडघा घातला ओ पोटात. आत्यंतिक कळवळलो... कळत नव्हतं की मी काय केलंय ह्यांचं? मला का मारत आहेत?... विचारायची पण सोय नव्हती.

त्यात त्यांचा अजून एक मित्र आला. आता सगळे मिळून मला बदडू लागले. जातीचा उध्दार करत. एक जण पोटात लाथा घालत होता. मी वाकलो की एक जण पाठीत कोपर मारत होता. कोणी खणाखण वाजवत होतं. कोणी मागून लाथा घालत होतं. चौघेही पैलवान आणि मी काडीमुडी. मी फक्त माझा शर्ट आणि पॅंट फाटू नये एव्हढी काळजी घेत होतो. आणि पडताना मातीतच पडत होतो. उगी ते रक्त बिक्त आलं तर... देव दयेनं तेव्हढी शुद्ध होती. रिंगण करून मला मारण्याचा कार्यक्रम चालू होता. चित्रपटात दाखवतात डिट्टो तसा. वाटत होतं, कोणीतरी यावं आणि मला वाचवावं... कॉलेज सुटलं होतं... गर्दी होती. सगळे छानपैकी तो कार्यक्रम बघत होते.... उत्सुकतेने.... पडद्यावर जे दिसतं ते तेंव्हा प्रत्यक्षात घडत होतं. खाली आलेले वळून वळून बघत होते. मी त्यांच्याकडे बघितलं की एक तर नजर वळवत होते किंवा जाण्याची ऍक्टिंग करत होते. पण एकही हात पुढे आला नाही मला वाचवायला. नंतर मीच डोळे बंद करून घेतले. उघड्या डोळ्यांनी, त्यांच्या षंढ नजरांनी, मला अजून त्रास दिला असता. मी निमूट मार खात होतो. कॉलेजमधे असणारे खिडकीतून बघत होते. सरलोक, शिपाई, इतर तथाकथित मित्र-मैत्रिणी, सगळे तो लाईव्ह शो बघत होते. फुकटात..... मारून मारून शेवटी त्यांचं मन भरलं आणि एक शेवटची लाथ मारून ते हसत हसत निघून गेले... आणि जाताजाता "आता उपटायचं ते उपट" असंही काहीतरी मोठ्याने बोलून गेल्याचंही आठवतंय..... ते गेल्यावर मग बघेही गेले...

काहीजणांच्या नजरा म्हणत होत्या, 'करा लफडी अजून'. काही 'अरेरे' म्हणत चुकचुकत होत्या, काही नजरा 'काही झालंच नाही' अश्या होत्या. काही 'बरंच झालं' अशा होत्या. काही नजरांनी त्या गुंडांना 'शाब्बास' पण म्हटलं असेल. सालीSSSSSS... नजर... ना वजन ना वस्तुमान... पण सगळ्यात कातिल.....

माझे शब्द खरंच अपुरे पडत आहेत त्या वेळेसची माझी अवस्था सांगायला. विचार करा, एक कानाखाली खाल्ल्यावर कसा अस्वस्थ झालो होतो. इथे तर बुकलून काढलं होतं. तेही सगळ्या कॉलेज समोर. मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. तसाच उठलो. पाण्याच्या टाकीवर गेलो तोंड धुतलं. तोंडावरून हात फिरवत असताना जाणवलं की जरा सूज आहे. एक गाडी बाजूला उभी होती. तिच्या आरशात पाहिलं. जरा सूज वाटत होती खरं. सायकल काढली. जवळच्या कॉईन बॉक्स वर गेलो. घरी फोन लावला. आईला सांगितलं की मित्राकडे चाललोय आणि तिकडेच जेवीन म्हणून. आई बरं म्हणाली. पुन्हा टाकीवर गेलो. पोटभरून पाणी प्यायलो. कॉलेजशेजारी एक बाग होती. त्या बागेत गेलो आणि अगदी आतल्या कोपर्यात एक झाड होतं त्या झाडाच्या सावलीत लपून झोपावं तसं पडलो. अजून शरीर थरथरत होतं. एकनएक जॉइंट दुखत होता. खूप जोरात मारलं होतं. अर्धा एक तास बसलो असेन त्या बागेत. मग माझ्या त्या भावाकडे गेलो, ज्याने गेल्यावेळेस माझी मदत केली होती. तुलनेनं आता प्रकरण गंभीर होतं....

भावानं ऐकून घेतलं... म्हणाला चाल जाऊ त्याच्याकडे... मी म्हणालो चल... आम्ही गेलो... तो मुलगा बाहेर बसला होता. आम्हाला बघताच माझ्या भावाला राम राम केला. भावनेपण त्याला राम राम केला. मला जरा खटकलं ते. "अबे हाच तो ज्याने मला मारलं" मी त्याला खुणावत होतो आणि तो माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. आम्ही त्या मुलाच्या मामाकडे गेलो होतो. तो मामा आणि माझा भाऊ दोस्त होते.. ते निवांत गप्पा मारत बसले...

थोड्यावेळाने भाऊ म्हणाला, "चल"

"पण... अरे" मी

"चल रे... मी बोललोय ते आता तुला त्रास नाही देणार"

"अरे पण..."

"चल बस गाडीवर.. तुला घरी सोडतो" भाऊ माझं वाक्य तोडत म्हणाला.

मी म्हणालो माझ्याकडे सायकल आहे मी जाईन... तो बरं म्हणाला आणि गेला. मी जास्त विचार नं करता माझ्या दुसर्या भावाकडे गेलो ज्याचा गावात खूप वटहोता. मी त्याला काही बोलताच त्याने झटकन हात झटकले आणि म्हणाला की याला जमणार नाही ह्या असल्या लफड्यात पडायला. त्याने मला मोलाचा सल्ला दिला की ह्या असल्या भानगडी कधी घरापर्यंत आणायच्या नसतात.बाहेरच्या बाहेर मिटवायच्या असतात. मी त्याचे मनापासून आभार मानले. माझ्या तेंव्हाच्या सर्व मित्रांचे उंबरवठे झिजवले. सगळ्यांनी काखेतले केस दाखवले. काहीजण तर मलाच म्हणत होते की गांडीत दम नव्हता तर कशाला लफडी करायची. मी त्यांचे पण मनापासून आभार मानले. आणि परत त्या बागेत गेलो.

इतक्या वेळ रोखून ठेवलेलं अजून रोखून ठेवणं माझ्या कुवतीबाहेरचं होतं. आभाळाभरून रडल्यासारखे रडलो. भावकी म्हणजे नक्की काय हे कळत होतं. ज्यांची घरं उभी राहावीत म्हणून बाबांनी प्रचंड खस्ता खाल्ल्या, डोकी फोडुस्तोवर आणि फ़ुटूस्तोवर भांडणं केली, त्यांनी जाणूनबुजून घातलेलं शेपूट त्रास देऊ लागलं. जे काही मित्र जोडले गेले होते त्यांच्याशी असलेलं नातं किती कचकड्याचं होतं ते दिसू लागलं. काही दिवस विसरलेलं माझं दुबळेपण प्रचंड प्रकर्षाने पुन्हा जाणवू लागलं.

सूर्य पश्चिमेकडे कळू लागला. संध्याकाळ जी खूप विचित्र असते. तुमच्या मनाची जशी अवस्था असते ना अगदी त्याच प्रकारे संध्याकाळ तुम्हाला प्रतिसाद देते. आनंदी असाल आनंद मिळतो, भावनिक असाल कातरता मिळते, दुःखी असाल अश्रू मिळतात आणि निराश असाल तर तुमच्या निराशेत पराकोटीची वाढ होते. माझं अगदी तसंच होत होतं.

मी गडद अंधार पडण्याची वाट पाहात होतो. कोणालाही माझा चेहरा दिसू नये असं वाटत होतं. लोक काय म्हणतील ह्याचं भय वाटत होतं.. चार चौघात मारलं होतं ना मला. कसा विचित्र आहे ना आपला समाज? मारणारा उजळ माथ्याने वावरू शकतो. मार खाणारा नाही तसा वावरू शकत. अंधार पडला. 'घरी कसा जाऊ?, आईला कळालं तर... तिच्या चिंतेत अजून भर पडेल.... बाबा खूप चिडतील.... उगा परत भावकीत भांडणं सुरू व्हायची.... फायदा तर काही होणार नाही.... त्यांचे संबंध जन्माचे तुटतील.... तसे माझ्याकडून तुटलेच होते....' त्यांच्याकडूनपण तुटावेत असं नव्हतं वाटत. घरी फोन केला आणि सांगितलं की मित्राकडेच आहे, अभ्यास करतोय, यायला उशीर होईल, जेवायला थांबू नकोस. आई बरं म्हणाली. मी पुन्हा बागेत गेलो. बसलो. थोड्यावेळाने तिथला रखवालदार आला. त्याने सगळ्यांना बाहेर हाकललं. तिथले कपल्स पाहून मला तिची आठवण आली. खूप आली. वाटलं तिला फोन करावा. पण परत म्हटलं नको, इतक्या रात्री नको. अर्थात फोन केला असता तरी काय बोललो असतो... म्हणा. बाहेरच्या कठड्यावर बसलो, शून्यात नजर लावून. जसे जास्त डास चावू लागले तसा भानावर आलो. शेजारच्या दुकानात बघितलं. साडे-नऊ वाजत आले होते. घराच्या शेजारच्या मंदिरात गेलो. अकरा वाजेपर्यंत तिथेच बसलो, एका खांबाच्या आड. कीर्तन चालू होतं. कीर्तनकार सांगत होता.

तुकोबा म्हणतात... 'भले त्यासी देऊ, गांडीची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी' आयुष्य जगताना जशास तसे वागले पाहिजे. नालायकाशी नालायकाप्रमाणे सज्जनांशी सज्जनाप्रमाणे. चांगल्या व्यक्तीला प्रसंगी आपलं अंडरपँट पण काढून देऊ.... भलेही रूपाची असली तरी पण देऊ.... काय म्हणता बाबा?? (सगळे हसले... मी सोडून) देऊन टाकू आपण काय?... पण जर व्हिलन जर आला तर त्याचं डोकं फोडून टाकू.... काय म्हणता बाबा?? (इथे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.... मी पण)...

आता काय टाळ्याच वाजवायच्यात असं पुटपुटलो आणि उठलो. अकरा वाजले होते आणि मी घराकडे निघालो. बाहेर उभा राहून अंदाज घेतला. आई बाबा झोपले होते. हळूच बाहेरून आतली काडी काढली. हात पाय धुवून हळूच बाबांच्या शेजारी जाऊन झोपलो. बराच वेळ झोप नाही आली. एक कुशीवरून दुसर्या कुशीवर वळत होतो रात्रभर...अचानक बाबांचा हात पडला अंगावर... खूप सुरक्षित वाटलं.... क्षणभरच... परत प्रचंड भीती वाटली आणि पाय पोटात घेऊन मी गच्च डोळे दाबले. खूप उशिरा कधीतरी झोप लागली.

तेंव्हापासून माझं कॉलेज बंद झालं... खूप अपमान वाटायचा... कुठले तोंड घेऊन कॉलेजला जाऊ वाटायचं... दुसर्याच दिवशी तिचा फोन आला. खूप चिंतेत दिसत होती ती खूप. भेटायचं म्हणत होती. मी म्हणालो भेटू कधीतरी... ती सॉरी म्हणायची नेहमी..ती म्हणायची, मी नको होतं त्याच्याशी बोलायला, मी तुझं ऐकायला हवं होतं वगैरे वगैरे.. मी इट्स ओके म्हणायचो... परीक्षा जवळ येत होती. आमच्यातले फोन बंद झाले. कधीतरी संध्याकाळी मला तिची खूप आठवण यायची तेंव्हा मे तिला फोन करायचो.. दुसरं कोणीतरी उचलायचं. मी लगेच ठेवायचो. असं खूपदा व्हायचं... शेवटी मी पण कमी कमी करत तिला फोन करणं बंद केलं... मी म्हटलं कशाला उगाच तिच्या अभ्यासात व्यत्यय आणायचा...

एकेदिवशी मला माझ्या मित्राचा फोन आला... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली...
.
.
.
.
.
.
तिने कॉलेज मधून ट्रान्सफर घेतली होती.... मला काहीही नं सांगता.....
(क्रमशः)

कथा

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

14 Jul 2016 - 3:17 pm | संजय पाटिल

वाचतोय...

मराठी कथालेखक's picture

14 Jul 2016 - 3:27 pm | मराठी कथालेखक

छान लेखन.. पण त्रास होतो वाचताना. लवकर पुर्ण करा.

सामान्य वाचक's picture

14 Jul 2016 - 3:45 pm | सामान्य वाचक

खरच कळवळायला होते आहे
नका लिहू असले काही

नाखु's picture

14 Jul 2016 - 4:33 pm | नाखु

पु भा प्र

कपिलमुनी's picture

14 Jul 2016 - 4:52 pm | कपिलमुनी

अतिशय प्रभावी मांडणी ! कथेचा वेग एकदम खिळवून ठेवणारा
( सर्व धाग्यांवर पोच देता आली नाही, पुलेशु)

अभ्या..'s picture

14 Jul 2016 - 5:22 pm | अभ्या..

परफेक्ट. कथाविषय, मांडणी, पात्रे अन स्वभावविशेष, भाषा, प्रकटने. सारे काही परफेक्ट. १०० पर्सेंट.
भयानक ताकद आहे लेखणीत.

राजाभाउ's picture

14 Jul 2016 - 6:58 pm | राजाभाउ

+१ असेच म्हणतो.

शिद's picture

14 Jul 2016 - 7:05 pm | शिद

+१००

सालीSSSSSS... नजर... ना वजन ना वस्तुमान... पण सगळ्यात कातिल.....

जबराट... _/\_

पु.भा.प्र.

नावातकायआहे's picture

15 Jul 2016 - 7:18 am | नावातकायआहे

ताकत आहे लिखाणात......

शलभ's picture

22 Jul 2016 - 8:54 pm | शलभ

+१११११

जगप्रवासी's picture

14 Jul 2016 - 5:57 pm | जगप्रवासी

ताकद आहे तुमच्या लेखणीत.

अभिजीत अवलिया's picture

14 Jul 2016 - 11:26 pm | अभिजीत अवलिया

उत्तम लिहिताय.

अभिजीत अवलिया's picture

14 Jul 2016 - 11:53 pm | अभिजीत अवलिया

पण एक शंका आहे. ज्या भावाने त्याला अगोदर मदत केली होती त्याने ह्या वेळी केली नाही. असे का बरे ?

रातराणी's picture

15 Jul 2016 - 10:08 pm | रातराणी

:( पुभाप्र.

झेन's picture

17 Jul 2016 - 11:34 am | झेन

लेखकाची कथेवरती पकड छान आहे आणि वेगवान असल्यामुळे कुठेही कंटाळवाणी होत नाही, ^_^ पुढच्या भागाची वाट बघतोय

सर्व प्रतिसादकांचा मनापासून आभारी आहे..
घरच्या वायफाय कनेक्टिव्हिटीमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे उशीर लागत आहे... तरी पुढील भाग लवकरच टंकतो आणि टाकतो.

मोहनराव's picture

19 Jul 2016 - 8:49 pm | मोहनराव

सगळे भाग वाचुन काढले. कथानक चांगले आहे.

खुप मस्त लिहितो आहेस, यातला काही भाग जगलो आहे त्यामुळे लवकर रिलेट करता आले, अर्थात शेवट अजुन झालेला नाही म्हणुन इथं टायपु शकतो आहे.

धन्यवाद.

शि बि आय's picture

21 Jul 2016 - 10:26 am | शि बि आय

छान सुरू आहे कथा. सगळे भाग वाचून काढले.
पु भा ल टा

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Jul 2016 - 1:49 pm | भाग्यश्री कुलकर्णी

भारी लिहलंय. अंगावर येतेय कथा. "जात" प्रकरण खरच खुप अवघड असते.

वटवट's picture

23 Jul 2016 - 10:35 am | वटवट

सर्व प्रतिसादकांचा मनापासून खूप आभारी आहे..
प्रतिसाद हुरूप वाढवणारे आहेत...
नवीन भाग टाकला आहे.