एक ओपन व्यथा १

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
16 May 2016 - 12:37 pm

….

साधारण संध्याकाळची वेळ… गावातलं एक साधारण मध्यवर्ती पेठ… खूप सारी गर्दी...
एक जण (डोकावत) : काय हो?
दुसरा (तोही मान उंचावत गर्दीत बघतोय): काय?
तोच एक जण: काय झालंय?
तोच दुसरा जण: काय माहित… गर्दी दिसली म्हणून घुसलोय.. काय झालंय देव जाणे…
तो एक जण पुन्हा एका तिसर्याला: ओ…
तिसरा: काय?
एक जण: काय झालंय?
तिसरा: नाही ओ माहित काही… काहीतरी झालंय खरं…
एक जण: ते तर मलापण कळतंय…
तिसरा: बहुतेक कोणीतरी मेलंय…
पुन्हा तो एक जण: मेलंय??? कि मारलंय??
तिसरा: काय माहित… पण असंच काहीतरी झालंय खरं…

कोण मेलंय, कसं मेलंय, मुळात कोणी मेलंय का? असे असंख्य प्रश्न आजूबाजूचे आजूबाजूच्यांना विचारत होते. तशी पक्की खबर कोणालाच नव्हती.

तेव्हढ्यात एक सायरन वाजवत पोलिसांची गाडी आली. त्यातून पोलिस उतरले. आणि गर्दीतून वाट काढत पटकन दुसर्या मजल्यावरच्या "त्या" घरात गेले. आत बरेच लोक होते. शोकमग्न अवस्थेत… फार मोठा धक्का बसला होता सगळ्यांना…. पीआय पाटील आत गेले. तिथल्या एका माणसाने त्यांना एका बंद दरवाज्याकडे उद्देशून हात केला. पाटील तिथे गेले. दार उघडले. डेडबॉडी जरा विचित्रच अवस्थेत होती. एका खुर्चीवर रेललेली… तोंडात कापडाचा भला मोठा बोळा कोंबलेला होता. हात हातकडीने बांधलेले होते. हातकडी पण बरीच जुनी वाटत होती गंज ही बराच चढला होता… नाकातून फेस सगळा तोंडावर ओघळला होता… त्याचे पाय खुर्चीच्या पायाला बांधले होते करकचून… खुर्चीचे पाय टेबलाच्या पायाला बांधलेले होते. टेबल बराच जाडजूड असूनही बराच हलला होता. झटापट झाल्याची शक्यता नाकारता येत नव्हती.… त्याच्या डेडबॉडीला कोणीच हात लावला नव्हता. ती तशीच पडली होती. त्या टेबलावर बरीच पुस्तकं अस्ताव्यस्त पडलेली दिसत होती. त्यात भारताची घटना, सावरकरांची माझी जन्मठेप, ढसाळांची गोलपीठा, विवेकानंदांवरचं योद्धा सन्यासी अश्या पुस्तकांचा समावेश होता.

त्या सगळ्यावरून नजर फिरवत आणि तोंड जरा विचित्र करून पाटलांनी त्यांची टोपी उतरवून हातात घेतली. बाहेर एका कोपर्यात आई बाबा… ते धक्क्यातून सावरलेच नव्हते... कसे सावरतील?? तरणंताठं पोरगं गेलं होतं त्याचं. सगळ्यांच्याच चेहर्यावर प्रश्नांकित आणि भयांकित धक्का दिसत होता. अगदी शांत पोरगं. कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. आपण भलं आपलं आयुष्य भलं. खाली मान घालून जायचं. खालीं मान घालून यायचं. कोणाशी भांडण नाही. कोणाशी तंटा नाही. तरी पण कोण कशाला ह्याला मारेल? आणि तेही भरवस्तीत… आणि दिवसाढवळ्या… ?

योग्य त्या सुचना देऊन पीआय पाटील बाहेर आले.
"कधी झालं हे?"
"अहो… काहीच कल्पना नाही ओ"
"म्हणजे?"
"अहो… काल आम्ही लग्नाला गेलो होतो. ह्यालापण विचारलं तर म्हणाला कि नको तुम्हीच जावा. मी थांबतो इथे… आम्हाला वाटलं… काहीतरी काम असेल.. आम्ही सगळे बाजूच्या गावात, वैरागला गेलो होतो. संध्याकाळी आलो… दार ठोठावलं… काही प्रतिसाद नाही आला. मी म्हणालो अभ्यासात दंग असेल.. पुन्हा ठोठावलं… तरीही शांत प्रतिसाद… कसलीच हालचाल नाही. अर्ध्या तासानं पुन्हा ठोठावलं, वाटलं झोपला असेल… पुन्हा काहीच प्रतिसाद नाही. दोन-तीनदा आवाज दिला. एकदाही ओ दिली नाही. काळजाचे ठोके चुकायला कितीसा वेळ लागतो? आम्ही दोघेही हाका मारू लागलो. शेजार्यांना बोलावलं. दार तोडलं… आणि… हे… … हे… असं..."
मोठ्ठा आवंढा गिळत त्याच्या बाबांनी डोळ्याला रुमाल लावला.
"काही समान, पैसे वगैरे चोरीला गेलेत?" पाटलांनी विचारलं.
"अजून… तरी…. काही नाही…. बघितलं" बाबा.
"काही… प्रेमप्रकरण … वगैरे?"
"अहो… नाही ओ वाटत, खोटं वाटत असेल तर ह्या त्याच्या मित्रांना विचारा" बाबा त्याच्या मित्रांकडे अंगुलीनिर्देश करत म्हणाले.
"हम्म…"

आत्ताच जास्त चौकशी करणं बरं दिसणार नाही म्हणून पाटलांनी अजून काही विचारलं नाही.
पाटील पुन्हा त्या रूम मध्ये गेले. रूम व्यवस्थित लावलेली होती. डेडबॉडीचे फोटो काढणं वगैरे चालू होतं. हवालदार काही पुरावा वगैरे सापडतो का ते पहात होते. ते सगळं निरखत असताना.
"साहेब… हे… " कांबळे हवालदारांनी एक चावी पाटलांना दिली
"हातकडीची दिसतीये... " पाटील तिला निरखत म्हणाले…
"होय साहेब… ह्या कोपर्यात होती.."
बॉडी पासून कोपरा बराच लांब होता… घाईघाईने खून करणार्यांने तिथे फेकली असावी असा विचार करत असताना पाटील म्हणाले.
"अजून काही सापडतंय का बघा..."
"साहेब ह्या पिशवीत बरंच काही दिसतंय…"
असं म्हणत ती पिशवी काम्बळेंनी पाटलांच्या हातात दिली. त्यात एक फाईल, बर्याच डायर्या, फोटो, सर्टिफिकेटस…. वगैरे होते.
ती पिशवी हातात घेऊन, ती फाईल वरवर चाळत पाटील बाहेर आले.
"हे अक्षर…??"
"हो… त्याचंच…" बाबा म्हणाले.
"कांबळे… हे सगळं… गाडी मध्ये टाका बरं… आणि घ्या बॉडी… पोस्टमार्टम ला… "

जशी बॉडी उचलली गेली, कित्येक हंबरडे फुटले. "श्री राम" चा गजर झाला. गर्दीतून वाट काढत बॉडीला खाली आणलं गेलं. अम्बुलन्समधून बॉडीची रवानगी पीएम साठी ग्रामीण रुग्णालयाकडे झाली… त्या जाणार्या अम्बुलन्स कडे बघत….

"दिवसाढवळ्या, भरवस्तीत पण असे प्रकार घडायला लागलेत…. कसं रहावं??" एक जण

"मला तर हे आत्महत्येचंच प्रकरण वाटतंय…. त्यांच्या शेजारचा

"चला तिच्या आयला, पोरांना नाय काय धंदे… सतराशे साठ लफडी करायची… नाय नाय ते धंदे करायचे… निस्तरणं अवघड दिसलं कि कर आत्महत्या…" एक दुसरा

"आई बाबांच्या पोटी असली अवलाद नकोच… काय करावं त्या मायबापांनी?" दुसरी

"निपुत्रिक असणं परवडलं…. त्यापेक्षा…" तिसरा

"अहो… आत्महत्या केलीये असं तुम्हाला कोणी सांगितलंय… उगं काहीतरी… " त्यांचा शेजारी.

"तुमच्या कानात येउन सांगितलं वाटतं… खुन्यानी… मी खून केलाय म्हणून" तोच एक जण

"काय तर… हल्लीची पिढी ना…" चौथा

"अहो मला तर ना हे प्रेमप्रकरणातलंच असल्याच्या संशय येतोय….… दाट" पाचवा

"नाही ओ… दरोड्याचा पण प्रयत्न असू शकतो" त्यांचा शेजारी.

"असू शकतो… तरीच मला ह्या वस्तीत काही संशयास्पद हालचाली दिसत होत्या काही जणांच्या…" सहावी

"अहो … मग त्यावेळेसच सांगायचं ना…" त्यांच्या बाजूचा...

"मी तुम्हाला सांगते पोलीसांचेपण लागेबांधे असतात ह्या चोरांशी…. जाऊ द्या… फुकट आपला वेळ गेला… कित्ती कामं खोळंबली आहेत म्हणून सांगू... उगंच इथे आले…" सहावी

आपापल्यापरीने मुक्ताफळे मुक्तपणे उधळून बघ्यांनी आपापला रस्ता पकडला.

स्थळ: पोलिस स्टेशन.
"कांबळेSSSS …"
"येस्स्स्स्स्स्सर…"
"फक्कड चहा सांगा बरं पिंट्याला…
"सांगतो साहेब"
"आणि ती फाईल पण येऊ द्या इकडं"
"कोणती साहेब?"
"अरे आत्ताची… त्या मर्डरची "
"अच्छा ती होय… आणतो"
"सांगू का साहेब मला तर ही मर्डरचीच केस वाटतीये बघा… आजच्या पोरांच्या टाळक्यात काय चाललेलं असतंय. देवालाबी माहित नसंल बगा…" फ़ाइल पाटलांकडे देत कांबळे म्हणाले.
"ह्म्म्म … बघू ही कागदं काय बोलतायेत… तेव्हढं चहाचं"
"लग्गेच चाललो बघा…" पाटलांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी कांबळे निघाले.

पाटलांनी ती पिशवी उघडली आणि एक व्यवस्थित लावलेली फाईल त्यांच्या हातात आली

पाटलांनी फाईल उघडली… आणि अत्यंत मोत्यासारख्या अक्षरांनी त्यांचं अनपेक्षितरित्या स्वागत केलं….
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"नमस्कार…. मी अज्ञात आडनावे…."

कथा

प्रतिक्रिया

चिनार's picture

16 May 2016 - 1:40 pm | चिनार

वाचतोय !!
पु.भा.प्र.

रंजक सुरूवात. पुभाप्र.

मराठी कथालेखक's picture

16 May 2016 - 6:23 pm | मराठी कथालेखक

रंजक.. .ए़कूण किती भाग असतील ते ही कृपया जाहीर करावे..

वटवट's picture

17 May 2016 - 10:31 am | वटवट

चार ते पाच भाग असतील..

राजाभाउ's picture

16 May 2016 - 6:47 pm | राजाभाउ

उत्तम सुरवात. पुभाप्र.

पुढचा भाग लवकरच टंकतो... आणि टाकतो..

रातराणी's picture

17 May 2016 - 11:45 am | रातराणी

पुभाप्र.

मितान's picture

17 May 2016 - 11:52 am | मितान

छान ! पु भा प्र ..

संजय पाटिल's picture

17 May 2016 - 11:57 am | संजय पाटिल

वाचतोय !!
पु.भा.प्र.

कपिलमुनी's picture

17 May 2016 - 2:10 pm | कपिलमुनी

उत्कंठावर्धक सुरुवात

बोका-ए-आझम's picture

17 May 2016 - 3:53 pm | बोका-ए-आझम

क्रमशः टाका ना हो शेवटी. पुभाप्र.

विटेकर's picture

17 May 2016 - 2:52 pm | विटेकर

येऊ दे

विवेकपटाईत's picture

17 May 2016 - 8:00 pm | विवेकपटाईत

मस्त आवडली, पुढची प्रतीक्षा...

मुक्त विहारि's picture

17 May 2016 - 9:53 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

वटवट's picture

18 May 2016 - 6:22 pm | वटवट

सर्व प्रतिसादकर्त्यांचा मनापासून आभारी आहे परीक्षेच्या अभ्यासात जरा गुंतलो असल्याने टंकायला जरा वेळ लागत आहे. पुढचा भाग लवकरच टाकतो. धन्यवाद…

वाचतोय, मेल्या म्हशीला मणभर दूध म्हणीचा प्रत्यय ह्या अशाच केसेस मधून येतो.

वातावरण निर्मिती चाम्गली झालिये. पुढील लेखन लवकर टाका.

नाखु's picture

19 May 2016 - 2:36 pm | नाखु

पुभाप्र

वटवट's picture

19 May 2016 - 5:42 pm | वटवट

नवीन भाग टाकला आहे..

पैसा's picture

17 Jul 2016 - 1:53 pm | पैसा

दमदार सुरुवात. मात्र त्रासदायक असणार आहे