एक ओपन व्यथा ७

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
23 Jul 2016 - 10:08 am

एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054

एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086

एक ओपन व्यथा ३ - http://www.misalpav.com/node/36148

एक ओपन व्यथा ४ - http://www.misalpav.com/node/36475

एक ओपन व्यथा ५ - http://www.misalpav.com/node/36610

एक ओपन व्यथा ६ - http://www.misalpav.com/node/36653

.......................................

माझं तिसरं वर्ष... आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण मला ह्याच वर्षाने दाखवले. आणि आयुष्यातले सर्वात भयाण क्षणसुद्धा ह्याच वर्षाने दाखवले. कदाचित भयाण अनुभवांचे दालन ह्या वर्षाने खोलून दिलं असं म्हणणंच जास्त योग्य ठरेल.

तिसर्या वर्षातल्या त्याच सेमिस्टर मध्ये माझे तब्बल ७ विषय गळाले.... साSSSSSSत..... मी सात विषयात नापास झालो. पहिले दोन वर्ष ज्याने ताठ मानेने वर्गात सीआर म्हणून काढले होते, त्याच माझे सात विषय उडाले होते. कारण एकंच... जे जगजाहीर होतं. आईच्या कुशीत जाऊन किती रडलो असेन नंतर... पण ती माउली.... काही नं बोलता डोक्यावरून शांतपणे हात फिरवत बसायची. 'जातील हे दिवस, कळ काढ... चांगले दिवस येतील' म्हणायची. मी काहीच बोलायचो नाही. कारण तिला फारश्या गोष्टी माहीत नव्हत्या. आणि मला तिला काहीच गोष्टी माहिती होऊ द्यायच्या नव्हतं. माझं कॉलेज नंतर बंदच झालं... आधी तर मार खाल्ल्यामुळे कॉलेजला जायला प्रचंड लाज वाटायची. त्यात "ती" सुद्धा सोडून गेली होती. अजून चेष्टेचं कारण बनण्याऐवजी नं जाणंच माझ्यासाठी बरं होतं. ती कुठे गेली? का गेली? काही काही माहीत नव्हतं.. एकदम संपर्क तोडण्यासारखं काय झालं होतं? एव्हढं जे काही आमच्यात होतं, ज्याला आम्ही तथाकथित प्रेम म्हणायचो, ते एव्हढं तकलादू होतं? मी एव्हढा नालायक होतो? की अंगावरून कोणी झुरळ झटकावं इतक्या सहज तिने माझ्याशी असलेलं नातं तोडून टाकावं?

तू अगदी सहजरित्या विसरून गेलीस मला...
फुलं जिथे उमलतात कधी विसरतात तो मळा...

वेलीवरची फुले तोडावीत इतक्या सहज तोडलेस तू बंध...
कळलंच नाही निरांजनाची वात कधी झाली मंद...

मंद वातीनं गाभारा सारा सांग उजळणार कसा?...
इतक्या सहज विसरून गेलीस आपण घेतलेला वसा?...

अजूनही ठळक आठवते मज तुझी नि माझी भेट...
किती गं तू लाजत होतीस, नजरेला नजर नं थेट...

त्यानंतरच्या शपथा सार्या वचने सारी खोटी होती...
ती होती आश्वासनं फक्त दिली भुकेल्या पोटी होती...

भूक तुझी ती संपली परी तहान मजला लागली...
घास एकही गिळवत नाही आता माझ्या गळी...

वस्तुस्थिती ना समजून घेता धावत होतो वेड्यासम अगदी...
उधळून दिलेस सारे मनोरथ जसे की तुकडे कागदी...

तू आली नाहीसंच..... पळत मी राहिलो...
तू येणारंही नव्हतीस.... जळत मी राहिलो....

असह्य वेदना देतात मज गं काळजातल्या कळा...
.
.
.
तू अगदी सहजरित्या विसरून गेलीस मला...

दिवस रात्र मी हाच विचार करत असायचो... तेंव्हा कळत होतं की दुबळ्या व्यक्तीवर कोणीच नाही प्रेम करू शकत... जी व्यक्ती स्वतःला वाचवू नाहीये शकत ती व्यक्ती दुसऱ्याला कशी काय वाचवू शकणारे?.. पण हा विचार वळत नव्हता की दुबळ्या व्यक्तीला प्रेमसुद्धा करण्याचा अधिकार नसतो.. विचार करून करून डोकं प्रचंड शिणत होतं... वपु म्हणतात, दुबळ्या व्यक्तीला मत मांडायचा अधिकार नसतो. मला वाटतं दुबळ्या व्यक्तीला प्रेम सुद्धा करायचा अधिकार नसतो.... काय कुणाचं घोडं मारलं होतं मी?..साधी मुंगीतरी?... आणि प्रेम पण अश्या व्यक्तीवर केलं होतं जी माझ्याच जातीतली होती. दुसर्या कोणाच्याही जातीवर आक्रमण केलं नव्हतं की दुसर्या जातीतल्या कोणाच्या भावना दुखाव्यात असं वागलो नव्हतो. वैयक्तिक पातळीवरच्या नैराश्याने खूप उंची गाठली होती...

कॉलेजला नाही जायचं म्हटलं तरी, पूर्णपणे कॉलेज बंद करणं शक्य नव्हतं... काही सबमिशन्स किंवा पुस्तके परत जमा करायला, नवीन इश्यू करून घ्यायला जावंच लागायचं. त्याला पर्याय नव्हता... तर ह्या अशा कामासाठी मी दुपारी चार नंतर जायचो... कॉलेज बंद व्हायच्या वेळेस.... जेणेकरून कोणी मला बघू नये... सगळ्यांच्या नजरा चुकवून माझं आयुष्य कंठणं शक्य नव्हतं... कधी कधी कुठल्या मित्रांसोबत कॉलेज जवळच्या कॅंटीन मध्ये जायचो... एकदा त्या कॅंटीनमध्येपण मला उगाच चेष्टेत चेष्टेत मारलं ओ... उगाच... आले होते एकदा, मला बघितलं, बोलावलं मला... तेंव्हाही माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मी गेलो.... तेंव्हाही मला उगाच हसत हसत मला मारलं... तेंव्हाही मी खूप विचित्र अवस्थेत होतो. तसाच गालाला हात लावून घरी गेलो होतो. एकदा तर मी गच्चीत गेलो होतो. पॅरेफिटवरसुद्धा चढलो होतो. पण तेंव्हा गांडीत दम नव्हता म्हणा किंवा चक्कर आली म्हणा. किंवा अजून घडा भरायचा होता म्हणा.... किंवा आयुष्याला मला इतक्या सहजासहजी मरू द्यायचं नव्हतं म्हणा... अजून बरेच अनुभव बाकी होते म्हणा.... मी खाली उतरलो... तेंव्हा मला दरदरून घाम आल्याचं चांगलंचआठवतंय (अर्थात असल्या गोष्टी कोणी विसरतं?)

तिसऱयांदा जेंव्हा मला त्याच कॅंटीन मध्ये मारलं गेलं तेंव्हा काहीच त्रास झाला नाही, एव्हढी मनाची तयारी झाली होती. उलट नंतर घरी जाऊन पोटभर जेवलो होतो... संध्याकाळी. कारण कसंय.. मार खाण्याची भीती फक्त मार मिळोंस्तोवर असते... एकदा मारलं की काही भीती नसते. मारून झाल्यावर परत मार खायची कसली भीती?? मी माझ्या मनाला बजावलं होतं, की त्यांचा धर्म आहे मला मारण्याचा आणि माझी जात ही मार खाऊन घ्यायचीच आहे. दरवेळेस माझ्या जातीचा उल्लेख व्हायचाच व्हायचा. माझ्या जातीने त्यांचं काय वाईट केलं होतं की नुसतं मला बघितलं की त्यांचा तिळपापड व्हायचा? माझं जगणं हराम झालं होतं.... आत्तापर्यंत मला माझ्या जातीचे फायदे तर सोडाच पण त्यामुळे अवहेलनेलाच सामोरे जावे लागत होते. खूप हेवा वाटायचा मला ज्यांना ऍट्रोसिटीचा फायदा मिळतो. पण काय करणार? आम्ही पडलो ओपन. जिथे घरचे साथ द्यायला तयार नव्हते तिथे बाहेरचे काय आधार देणार?

ते टाइम-मशीन का असतं ना ते? ते असावं असं फार वाटत होतं. दोन वर्ष पुढे गेलो असतो. झटकन... ज्या गावात माझा असा अपमान झालाय, अर्थात कु-प्रसिद्धीही झाली होती. कुठल्या तोंडाने वकिली करणार होतो? ज्याला स्वतःला न्याय मिळवता आला नाही तो काय झाट दुसऱ्याला न्याय मिळवून देउ शकणार होता? अर्थात वकील कितपत दुसऱ्याला खरा खुरा न्याय मिळवून देतात हा ही एक संशोधनाचाच विषय आहे, असो....

तर माझं ठरलं... लॉ झालं की गाव सोडायचं आणि पुण्यात जायचं पुढच्या शिक्षणाला....

पुढच्याच सेमिस्टरमध्ये मी माझे सगळे विषय, आधीचे आणि चालू काढले. नंतर परत कधीच विषय नाहीत गळाले. पण कसंय ना एकदा का चिखल लागला ना तो नाही निघत. दुसर्या वर्षीच्या संगीत शेलापागोट्याच्या (म्युझिकल फिशपॉन्डमध्ये) कार्यक्रमात माझ्यावर "पाप केहते है.... बडा नाम करेगा" हे गाणं पडलं होतं... आणि त्याच्याच नंतरच्या वर्षी म्हणजे तिसर्या वर्षी माझ्यावर "तडफ तडफ के इस दिलं से आह निकलती रही.... मुझको सजादी प्यार की.... ऐसा क्या गुन्हा किया की लूट गये" हे पूर्ण गाणं पडलं.. अर्थात मी उपस्थित नव्हतोच त्या कार्यक्रमाला...

करिअरचे विषय एव्हाना घरात सुरू झाले होते. काय करायचं पुढे? काय शिकायचं? काय ऑप्शन्स आहेत? ह्याची सगळी चर्चा-चर्वितणं जोरात सुरू होती. मग ह्याला फोन कर, त्याला विचार, हे आईचं सुरू झालं होतं... मला वाटत होतं कि, तसं मी वकिली करायला नालायकच होतो... दुसर्याला न्याय मिळवून द्यायला असमर्थ होतो म्हणून मला न्यायालयाचा कोणताही संपर्क नव्हता येऊ द्यायचा.... मग ठरलं आपण पीजी करायचं... एलएलएम करायचं... मुळात मीच माझं गाव सोडायला खूप आसुसलो होतो.... तरी आई अधूनमधून मला विचारायची मी का कॉलेजला जात नाही ते.. मी उडवून लावायचो.. म्हणायचो, की टीचर्स नाहीयेत तर कशाला जाऊ? अर्थात खोटं नव्हतंच तेही, कारण त्यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये फक्त एक पूर्ण वेळ प्राध्यापक होते. बाकीचे ज्यांची प्रॅक्टिस फारशी नाही चालत ते शिकवत होते. जरा जास्त पैसे मिळावेत म्हणून.... मग असे आणि अश्यांचे लेक्चर्स कोण आणि का करेल? आईला पण पटायचं ते....

ते अडीच वर्ष.... आज वाटतं किती लवकर गेले... पण तेंव्हा? भयानक दिवस होते ते... प्रचंड भयानक. घराबाहेर पडायला संकोच वाटायचा आणि घरात बसलो की आई सारखं विचारायची की घरात घरात काय बसून असतोस ते... उगाच चिडायचो आईवर...

"जाईन जाईन लवकर जाईन... मग बसशील रडत.... ये रे, सोन्या ये रे.... मी येणारंच नाही तेंव्हा"... असं वैतागून म्हणायचो..

मग आई स्तब्ध होऊन, थिजून उभी राहायची... मला लगेच जवळ घ्यायची... तिचे डोळे डबडबलेले असायचे...

"नको रे... असं बोलत नकोस जाऊ... खूप लागतं रे... खूप... " मला गदगदून म्हणायची...

मला पण खूप रडू यायचं तेंव्हा... मी रडायचो नाही आईसमोर... उगाच आईला खूप काळजी वाटेल म्हणून... संडासात जायचो आणि तोंडात बोळा कोंबून रडायचो. आईचं चुकत नव्हतंच. एव्हढं तरणंताठं पोरगं घरात बसून राहिलेलं कोणत्या आईला आवडेल. खूप घुसमट होत होती. श्वास कोंडल्यासारखं होत होतं. ना धड कोणासमोर मोकळं होता येत होतं... ना धड पूर्णपणे लपवता येत होतं.. मग आईला काळजी वाटणं चुकीचं होतं होय? तिचं नव्हतं चुकत... कोणाचंच नव्हतं चुकत... फक्त माझी जात चुकली होती.

....

दोन ते अडीच वर्ष घरात बसायचं जेंव्हा निश्चित झालं ना तेंव्हा पुढचा प्रश्न .. घरात बसून काय करायचं? तर मी माझं वाचन वाढवायला सुरुवात केली. सर्व प्रकारची पुस्तकं वाचू लागलो. त्यातही माझा भर जास्तकरून चरित्रांवर असायचा. थोरांचं भोगणं आणि माझं भोगणं ह्यात समानता दिसू लागली. जरा बरं वाटायचं. सगळेच भोगतात.. आपण काही वेगळे नाही आहोत. ही भावना प्रबळ होऊ लागली. माझं भोगणं हे वैश्विक आहे. आणि ह्या विश्वात माझ्यासारखे असंख्य जीव काही ना काही भोगत आहे. अशी स्वप्नं पडू लागली. मन जरा हलकं होऊ लागलं. वेदनेची जात नसणे हीच काय ती वैश्विक गोष्ट आहे हा माझा ग्रह होऊ लागला. मी त्या आभासी जगात जास्त रममाण होऊ लागलो.

"वेदनेला जात नाही, वेदनेला धर्म नाही...
सारे विसरुनी जाती, वेदना ते वर्म वाही..
डोळ्यांतले अश्रू हाच, वेदनेचा पंथ आहे..
वेदनेला जिंकणारा, हाच खरा संत आहे.. "

ही माझी धारणा अजून पक्की होत गेली. मी मान्य करतो, त्या काळात मी जास्त वैश्विक झालो. आधी माझे विचार फक्त वैयक्तिक पातळीवर मर्यादित होते. ते काय म्हणतात ते बिंदू पासून सिंधूपर्यंत..... तसं काहीसं झालं. (अर्थात हे जरा जास्तच वाटेल... पण तेंव्हा तरी मला असंच वाटत होतं....) माझी जात त्या विश्वात जास्त महत्वाची नसायची. कदाचित म्हणूनच मी रममाण होत असायचो.....

जेंव्हा तुमच्या विचाराच्या कक्षा रुंदावतात ना तेंव्हा जे काही विचारांच्या कक्षांचं रुंदावणं असतं ना तुम्हाला ते शांत बसू नाही देत, तुम्हाला ते स्वस्थ नाही बसू देत... तुम्हाला ते अस्वस्थ करतं, बेचैन करतं... हे कुठेतरी बाहेर पडायला हवं असं अगदी आतून वाटू लागतं... मलाही तसंच वाटू लागलं... आणि मला एक प्लॅटफॉर्म सापडला. स्पर्धांचा... वक्तृत्व स्पर्धेचा.... मी भाग घेऊ लागलो. साधारण पहिलं वर्ष माझं चाचपडण्यातच गेलं... त्याची शैली, ते विचारांचं ठराविक कालावधीत मांडणं वगैरे वगैरे समजण्यात काही वेळ गेला. पण तो काळ मला माझ्या वैयक्तिक अडचणींमधून बाहेर काढणारा होता. मी काही शिकत होतो. मला थोडं थोडं जमू पण लागत होतं. उत्तेजनार्थ वगैरे बक्षिसं मिळायची... आई बाबांना पण जरा छान वाटत असावं... आणि त्याच वक्तृत्व स्पर्धेच्या प्रवासात मला एक खूप छान साहित्यप्रकार गवसला ... कवितेचा... आणि मला तो वक्तृत्वापेक्षा जवळचा वाटू लागला.. विषयाचं बंधन नाही.... कुठलीही ऐकवा... कधीही सुचू शकते... दादही सगळ्यात जास्त मिळते म्हणून मी जाणून बुजून कविता करू लागलो... ट ला ट जोडून म्हणा पण करू लागलो... तिच्या नादात प्रेमकविता तश्या करायचोच... पण ह्या स्पर्धेच्या नादात सामाजिक कौटुंबिक सुद्धा करू लागलो... सुरुवातीच्या काही सोडल्या तर नंतर खरंच जमू लागलं होतं.... दाद पण खूप छान मिळत होती... माझं भोगणं, माझं बघणं आणि माझं सोसणं मी माझ्या कवितेमधून मांडत होतो...

परवा रस्त्याच्या कडेला एक प्रेत पडलं होतं
काहीतरी विचित्रच त्याच्या बाबतीत घडलं होतं

सारा देह सडलेला त्यातून येणारी भयानक दुर्घंदी
मारण्याआधी बरेच दिवस केलं असावं बहुधा जायबंदी

बलात्काराच्या खुणांवरून ठरवलं…. ते स्त्रीचं असावं
लिंग कळालं चला आता जातीचं जरा बघावं

मागासवर्गीयातलीच असावी बहुधा महार किंवा मांग
चल मोर्चा उठाव किंवा दंगलीच्या तयारीला लाग

तेव्हढ्यात कोणीतरी म्हणालं ते हिंदूचं आहे
भगव्या कफनीवरून ठरवलं ते साधूचं आहे

ते हिंदुचंही नाही असं कळालं निघता निघता
त्या प्रेताच्या खाली काला बुरखा दडला होता

मुल्ला मौलवी सारे आले म्हणाले हे मुस्लिमही नाही
कारण बाजूला आढळलं क्रुसा सारखं काही

बराच खल झाला… प्रेताची कळाली नाही जातं…
.
.
.
कशी कळेल मूर्खांनो… ते लोकशाहीचं होतं….

ह्या अश्या प्रकारच्या काही कविता होत्या... शेवटच्या ओळीपर्यंतची श्रोत्यांची उत्सुकता त्यांच्या डोळ्यातून लगेच दिसायची. आन शेवटची ओळ होताच जो काही टाळ्यांचा वर्षाव असायचा तो मला अतीव समाधान देऊन जायचा... आणि ह्या पातळीवर माझी बक्षिसं काय म्हणत होती??

उतेजनार्थ....

हे सालं बक्षीस काही माझी पाठ सोडायला तयार नव्हतं.... सुरुवातीला वाटायचं आपण नवीन आहोत. आपल्याला जमत नसेल.. म्हणून मी माझ्यावर खुप प्रयोग केले... पण काहीही म्हणजे काहीही सादर करून इतर जण पहिला किंवा दुसरा घेत होते ओ... आम्ही फक्त टाळ्यांचे आणि वाहवाचे धनी होत होतो. त्या काळात मी बऱ्याच स्पर्धा केल्या... सोबत एक फाईल आहे... काळ्या रंगाची (मुद्दाम मी काळा रंग निवडला) त्यात काही प्रमाणपत्रं ती बघा... सर्वच्या सर्व उत्तेजनार्थची आहेत... आणि प्रत्येक प्रमाणपत्रामागे त्या कवितेचं नाव लिहिलं आहे....

---------------------------------------------

पाटलांनी त्या फाईल खालची ती काळी फाईल हातात घेतली... सगळी प्रमाणपत्र उत्तेजनार्थचीच होती. आणि प्रत्येक प्रमाणपत्रामागे त्या त्या कवितेचं नाव होतं.

"साहेब अगदी बरोब्बर आहे बघा तुम्ही जे काही सांगितलं होतं... " पाटलांची तंद्री एकदम तोडत कांबळेंनी एंट्री घेतली..

"क्काय........????" एकदम दचकून पाटील म्हणाले.

"अहो साहेब.... तुम्ही चिठ्ठी दिली होती. तपासासाठी..."

"हा ... हा .... आलं लक्षात.... "

"काय साहेब... कुठे आहात??"

"अरे ,..... नाही..... ते... ते जाऊ द्या.... बोला .... "

"साहेब... तुम्ही जे काही सांगितलं होतंत ना .... एकदम बरोब्बर आहे बघा..."

"बंSSSSSर.... "

"तसं... कोणी काही सांगायला तयार नव्हतं... पण नंतर थोडा हिसका दाखवला कि कॉलेजच्या शिपायानं सांगितलं कि एक दोनदा झाली होती भांडणं... पोरीच्या पायी... पण साहेब खुप जुनं प्रकरण आहे म्हणत होता... आणि अशात त्याचा आणि ह्या खुनाचा काही संबंध असेल असं काही नाही वाटत... "

"असं कोण म्हणतं?"

"कोणी.... नाही.... पण... आपलं... असंच.... वाटलं.... म्हणून..... बोललो.... तसं ... काही .... नाही.... " कांबळे जरा दबकतच बोलले.

"अजून काही?"

"अजून..... तसं काही नाही साहेब... जरा आजूबाजूला चौकशी केली.. पोरगं सज्जन होतं म्हणतात ओ सगळे.... त्यात जेंव्हा त्यानं हे गाव सोडलं ना... नंतर बदललं होतं खूप...चांगलं शिकलेलं पण होतं .... घरचे लग्नाचं पण बघत होते.. मधेच हे अघटित घडलं बघा.... मी त्यांच्या घरी पण परत जाऊन आलो... त्यांनी परत सगळं तपासलेलं होतंच.... काही चोरी पण नव्हती झाली... का मारलं असेल? देवासच ठाऊक बघा...."

"हम्म्म..."

"काही..... धागे...दोरे.. मिळताहेत?"

"वाचतो तर आहेच.... बघू आधी पूर्ण वाचून तरी होऊ दे... आयुष्यात पहिल्यांदा हे असलं काहीतरी वाचत आहे... पण कळेल लवकरच..."

"अजून वाचून व्हायचंय?" कांबळेंनी आश्चर्याने विचारलं.

"संपतच आलंय तसं... "

"साहेब घड्याळ बघितलं?"

पाटलांनी घड्याळ बघितलं.

"अरे बाप रे... आठ वाजून गेले कि"

"साहेब... ऐका... जावा घरी.... तुम्ही विसरला असाल... पण तुम्हाला एक बायको आहे.... दोन मुलं आहेत.... ती दोन्ही मुलं खूप गोंडस आहेत.... आपण पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहात... खूप कमी वेळा लवकर घरी जाता येतं. सध्या गणपती नाहीयेत, कुठल्या नेत्याचा दौरा नाहीये, निवडणूका नाहीयेत कुठल्याच, दिवाळी नाहीये, कि दंगल झाली नाहीयेत अशात... लवकर जायला मिळतंय तर जावा कि... जावा... ऐका... ते वाचा नंतर" कांबळे जबरदस्तीने पाटलांच्या हातातली फाईल बंद करत म्हणाले...

"अरे... हो... अरे"

"ते काही मला माहीत नाही..."

"अरे जातो... " पाटील फाईल परत उघडत म्हणाले.

"हे बघा... परत फाईल उघडलीत?"

"मी जातो कांबळेSSSSSS" पाटील सूर लावत म्हणाले.

"तुम्ही काही असे ऐकणार नाहीत.. थांबा मीच वहिनींना फोन लावतो...."

"अरे.... पाया पडतो तुझ्या पण तिला नकोस फोन लावू" पाटील लगेच फाईल बंद करत अजीजीने म्हणाले.

"मग निघा ...."

"निघतो रे बाबा ....निघतो"

पाटलांनी पटकन ती फाईल सोबत घेतली. आणि घरी निघाले.

साहजिकच आपला नवरा इतक्या लवकर कधी नव्हे ते आला म्हणून त्यांच्या बायकोला आनंद होणं स्वाभाविकच होतं. आज मुलांना बाबा खूप वेळ दिसणार होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांचं त्या रात्रीचं जेवण जरा जास्तंच चविष्ट झालं. समाधानाची ढेकर देऊन सारे जण झोपी गेले. पाटलांना झोप येणं जरा अस्वाभाविकंच होतं. अजून छडा लागला नव्हता. बर्या प्रकारे अंदाज तर आला होता पण तरीही... इतकया भयानक पद्धतीने आत्महत्या? ही पटणारी आणि पचणारी तर गोष्ट अजिबात नव्हती. त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत हे असलं प्रकरण कधीच घडलं नव्हतं. राहून राहून ती फाईल त्यांना खुणावत होती... अंगावरचा बायकोचा हात हळूच बाजूला करून ते हॉल मध्ये आले... फाईल घेतली... मुलांच्या स्टडीरूम मध्ये गेले... आणि वाचू लागले...

-----------------------------

मला कळायचं नाही कि काय होतंय? मग वाटलं कदाचित माझे विषय आणि त्यांची मांडणी जरा शहरी वळणाची असेल म्हणून अडचण येत असेल... म्हणून जरा ग्रामीण आणि जरा भडक विषय घेतले....वेश्येला पण नाही सोडलं....

परवा एका पोराला रस्त्यात पोलिसांनी धरलं..
चोरी का केली म्हणून बेदम मारलं..
पोरगं ओरडत होतं म्या नाय चोर... म्या नाय चोर...
लोकं बी मनत व्हती, हीच चोर कारन ही हाय येश्येचं पोर...
वरडुन वरडुन सुकनारा माझ्याच पोराचा घसा हाय...
कारन ....... म्या... येक ... येश्या हाय...

हे असलं पण लिहून बघितलं... पण सालं हे उत्तेजनार्थ काही पाठ सोडत नव्हतं... मग हळू हळू लक्षात येऊ लागलं... कि साली माझी जात इथे पण माझी पाठ सोडत नव्हती.

परीक्षक विशिष्ठ जातीचे, त्यांच्याच जातीतल्यांना प्रोत्साहन द्यायचे... अरे द्या ना.. स्पर्धेनंतर... स्पर्धेत स्पर्धक हीच एक जात असू द्या ना... खूप भांडणं सुरू झाली माझी परीक्षकांसोबत. मित्र म्हणायचे, भांडण करून काही नाही फायदा होणारे, निकाल हा अंतिम असतो आणि निकाल हा परीक्षकांचा अंतिम निर्णय असतो आणि संयोजक पण त्यात नाही ढवळाढवळ करू शकत. अर्थात संयोजक तरी कुठे माझ्या जातीचे होते म्हणा... त्यांना बोलायला काय जायचं?... पण जळत तर माझी असायची ना.. त्यांची नाही ना? ज्यांना खरंच "माझ्या कवितेची जात" कळायची ना ते मला "दलित" म्हणायचे... कारण एक सिद्धांत आहे ना अलिखित... ह्या समाजात फक्त दलितांवरच अन्याय होतो. बाकी कोणावर कधीच अन्याय होत नाही आणि म्हणून कितीतरी वर्ष मी उपहासाने एक दलित कवी म्हणून काढली आहेत.

घरून स्पर्धेच्या ठिकाणापर्यंतचा प्रवास खूप उत्साहात आणि खुशीत असायचा... स्पर्धेच्या ठिकाणापासूनच माझ्या घराकडे येणार परतीचा प्रवास तेव्हढाच किंवा त्याहीपेक्षा निराशेचा आणि अतिशय दुःखाचा असायचा. पैशापरी पैसा खर्च व्हायचा आणि परतावा खूप कमी.

ह्या अश्या वातावरणात माझं एलएलबी पूर्ण झालं.... परत कधीच विषय गेले नाहीत.

एलएलएम ला पुण्यात जायचं ठरलं.... पुण्याला गेलो. माझ्या आर्थिक परिस्थितीनुसार दोनच जागा होत्या. एक तर पुणे विद्यापीठ किंवा भारती विद्यापीठ... दोन्हींकडे मेरीट लिस्ट होती. अर्ज टाकले. आम्ही दुसर्या विद्यापीठातले म्हणून जागा कमी. तसा नियमच आहे. स्वाभाविक आहे, त्यांच्या पदवीधारकांना प्राधान्य मिळायला हवं. मी एलएलबी केलं कोल्हापूर विद्यापीठामधून, जिथे गोल्डमेडलिस्टला कसा बसा फर्स्ट क्लास मिळतो... मग आमचा काय विषय? दोन्हींकडची मेरीट लिस्ट लागली. कुठेही नंबर नव्हता लागला. तसा अंदाज आलाच होता.भारतीमध्ये मेरीट खूप वरचं होतं. तिथला क्लार्क म्हणाला, मागच्या दाराने मिळेल ऍडमिशन... पण मागचं दार आमच्यासाठी नव्हतं. खूप पैसे द्यावे लागतात ते दार उघडायला. त्यामुळे भारतीचे दरवाजे बंद होते माझ्यासाठी.... मग मी पुणे विद्यापिठात गेलो..... माझं स्थान बघायला.

साधारणपणे दोन प्रकारची मेरीट लिस्ट लागते, कॅटेगरीची आणि ओपनची... कॅटेगरीसाठी वेगळं मेरीट असतं आणि ओपनसाठी वेगळं मेरीट असतं... माझं नाव ओपन च्या लिस्ट मध्ये नव्हतं... कपाळावर घर्मबिंदू साचले. टेन्शन आलं खूप... पाय जरा लटपट कापू लागले. आयुष्याचा प्रश्न होता. संडासला जाऊन आलो. जरा मोकळं वाटलं. जरा निवांत सगळी लिस्ट वाचून काढली. त्या लिस्ट मध्ये सगळ्यात खालची आडनावे ही ओपनची नव्हती. आडनावावरून जात लगेच लक्षात येते. मी लगेच ऑफिसमध्ये गेलो. त्यांना सांगितलं... काहीजणांनी फ्रॉड केलाय म्हणून... ते हसले.... माझ्यासोबत बाहेर आले. मी त्यांना ती लिस्ट दाखवली.

"आर.... कसला फ्रॉड रे?" त्यांनी उलट मलाच विचारलं

"अहो... बघा ... ही पोरं कॅटेगरीची ना?"

"मग?"

"ओपन मध्ये कसं काय ते अप्प्लाय करू शकतात?"

"कॅटेगरीचं किती मेरीट आहे ते बघितलंस?"

"मी कशाला बघू?"

"जाऊन बघ"

मी जाऊन बघितलं तर ते ओपन पेक्षा जास्त होतं

"ओपन पेक्षा जास्त आहे"

"म्हणून त्यांनी ओपन मधून अप्लाय केलंय"

"अहो पण हे असं कसं करू शकतात... हे चुकिचंय"

"का?"

"अहो ही चार नावं काढली कि माझा नंबर लागू शकतो... ओ..."

" ...... ..... " एक मूर्खाकडे जसं बघावं तसं माझ्याकडे ते बघत होते.

"अहो.... मी कॅटेगरी मधून नाही फॉर्म भरू शकत तर..... कॅटेगरीमधले कसे ओपनमधून फॉर्म भरू शकतात?.... हा अन्याय आहे..." मी तळमळत म्हणालो.

"ए... जा.... वर शासनाशी जाऊन भांड... उगं डोकं खातंय... माहीत नाही काही आणि हिंडायच्या दिशा दाही..... निघ" त्यांनी मला झटकलं.

अत्यंत उद्विग्न मनाने मी बाहेर आलो....

रस्त्यावर आलो. जवळच्या पीएमटी स्टॉप वर गेलो. तिथे बसून येणारी जाणारी गर्दी बघू लागलो. गर्दीची एक मानसिकता असते. गर्दीत आपलीही एक मानसिकता निर्माण होते. आपण जर निराश असू, उद्विग्न असू तेंव्हा एकांतात आपण जास्त निराश आणि उद्विग्न होऊ लागतो आणि गर्दीत आपण जरा हलके होतो. अगदी हेच हलकेपण अनुभवत मी त्या गर्दीला निरखू लागलो.
तेंव्हा त्या गर्दीतला मी एक बिंदू होतो. कोणीही मला हटकत नव्हतं. कोणीही जाणून बुजून मला धडकत नव्हतं. मुळात माझ्या अस्तित्वाची कोणाला काहीच जाणीव नव्हती. गाडी येत होती, गाडी जात होती. गर्दी त्या गाडीतून खाली उतरत होती. गर्दी त्या गाडीत चढत होती. त्या गर्दीला जात नव्हती. त्या गर्दीला नाव नव्हतं आणि आडनावाला तर जागाच नव्हती. हाच तर फरक असतो गर्दी आणि जमावामध्ये... जमावाला जात असते, जमावाला धर्म असतो, जमाव पेटू शकतो, जमाव पेटवू शकतो, जमावाला विध्वंसाशी देणंघेणं असू शकतं... पण गर्दी ला फक्त वेगाशी देणंघेणं असतं. लवकरात लवकर पाहिजे तिथे त्या गर्दीला जायचं होतं. शेजारी कोण उभंय?, त्याचं नाव काय?, त्याचं आडनाव काय? त्याची जात कुठली? त्याचा धर्म कुठला? ह्याशी कोणालाच कसलंही कर्तव्य नव्हतं... खूप हेवा वाटला मला त्या सगळ्याचा... आणि मनात झटकन एक विचार आला... आपलंही असंच असायला हवं ना....

आणि ठरवलं..... जात खोडून टाकायची आपल्यापुरती... आणि जात लिहायची "ओपन"... ज्या जातीचा मला काहीच फायदा नाही. उलट पावलोपावली जर मनःस्तापच पदरात पडत असेल तर मी का असली जात बाळगू? फुकाचा अभिमान बाळगायची माझी मानसिकता कधीच नव्हती...

.... तर माझी जात ठरली फक्त ओपन.... ओपन...

नंतर विचार आला, नावाचा आणि आडनावाचा...... मस्टवाली गोष्ट.... नाव आणि आडनावावरून लगेच जात कळते. मला असं नाव आणि असं आडनाव हवं होतं कि ज्यावरून कोणीच माझी जात नाही ठरवू शकणार... मुळात मलाच माझ्या नावाची आणि जातीची प्रचंड चीड आणि किळस आली होती...
.
.
.
.
.
.
.
.
आणि त्याच वेळेस एक नाव डोळ्यासमोर आलं... अज्ञात आडनावे
(क्रमशः)

कथा

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

23 Jul 2016 - 10:23 am | सामान्य वाचक

खूप ताकदीने लिहिताय

जगप्रवासी's picture

23 Jul 2016 - 12:15 pm | जगप्रवासी

वाचताना देखील त्या मुलाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता, त्याच्या मनाची घालमेल, होणारी चिडचिड सगळं कसं स्वतः अनुभवल्यासारखं वाटतंय इतकं सशक्त लिखाण आहे तुमचं.

उडन खटोला's picture

23 Jul 2016 - 12:26 pm | उडन खटोला

+१११
एका क्षणी ते डायरी वाचत आहेत हेच विसरलो होतो, असं वाटलं जणू लेखक मनोगत सांगत आहेत.

संजय पाटिल's picture

23 Jul 2016 - 11:35 am | संजय पाटिल

वाचतोय...

लालगरूड's picture

23 Jul 2016 - 1:27 pm | लालगरूड

open चं दुखणं ओपनलाच माहित.... :(

नीलमोहर's picture

23 Jul 2016 - 3:19 pm | नीलमोहर

कसं रिऍक्ट व्हावं तेही कळत नाहीय,
पुभाप्र

वरुण मोहिते's picture

23 Jul 2016 - 3:57 pm | वरुण मोहिते

सॉल्लीड लिहिलंय

मितभाषी's picture

23 Jul 2016 - 4:19 pm | मितभाषी

नुसते जातीवरून कोणी कोणाला मारील असे वाटत नाही.

अभ्या..'s picture

23 Jul 2016 - 4:25 pm | अभ्या..

सहमत आहे.
नुसत्या जातीवरुन कोणी कुणाला मारेल असे वाटत नाही. पण...
प्रेमप्रकरणे, राजकीय वैमनस्ये आणि उसळती जवानी हे प्रकार असे असतात ना की करायचे असतेच पण तोंडीलावण म्हणून जात लै उपयोगी पडते. ती मीठासारखी असतीय. ज्याची प्रवृती अळणी तो गप्प बसतो. ज्याचे मीठ जास्त त्याचे रक्त उफाळते. ती तेवढ्यापुरतीच असावी म्हणजे जीवन रुचकर होते.
.
च्यायची लैच सुविचार झाले का? सोडा जाउ द्या.
लिहिलेय भारी शब्दात हे महत्त्वाचं. पुलेशु.

अस्वस्थामा's picture

23 Jul 2016 - 6:30 pm | अस्वस्थामा

नुसत्या जातीवरुन कोणी कुणाला मारेल असे वाटत नाही.

अजिबात सहमत नाही. शाळेत असताना, आमच्या वाडीच्या गुरवाच्या पोराला ४-५ वर्षे फक्त तो त्याची आणि त्याच्या घरच्यांची केलेली चेष्टा ऐकत नाही म्हणून मार खात असलेला पाहिला आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा मध्ये पडायचो. नंतर बरोबरच असायचा तेव्हा ठिक, पण त्या मारणार्‍या वांड पब्लिकला सापडला की त्याला फटके हे बसायचेच. जास्त कुणाला समजवायची सोय नव्हती कारण यांची भावकी गावातली. (सध्या सगळेच मोठे झालेत, गुरव अजून वाडीत गुरवच आहे आणि मारणारेपण तिथेच आहेत. आता वैर असं नसलं तरी त्याच्यासाठी लहानपणचे वळ आहेतच.)

प्रेमप्रकरणे, राजकीय वैमनस्ये आणि उसळती जवानी हे प्रकार असे असतात ना की करायचे असतेच पण तोंडीलावण म्हणून जात लै उपयोगी पडते. ती मीठासारखी असतीय. ज्याची प्रवृती अळणी तो गप्प बसतो. ज्याचे मीठ जास्त त्याचे रक्त उफाळते.

हे मान्य पण म्हणून "ती (जात) तेवढ्यापुरतीच असावी म्हणजे जीवन रुचकर होते" हे अजिबात मान्य नाही. जात ही कीड आहे, ती मीठापुरती पण नको. तुम्ही बहुजन असा-नसा, सवर्ण असा-नसा, ते जात नावाचे प्रकरण मुळासकट नष्ट झाले पाहिजे हेच खरं.
...
>>लिहिलेय भारी शब्दात हे महत्त्वाचं. पुलेशु.
असेच म्हणतो. :)

भरपूर प्रतिवाद आहेत माझ्याकडे. विषय ज्वलंत आहे. आपल्या दोघांना मिळालेल्या अनुभवात फरक असणार. मलाही जात नकोशी वाटते पण टाकताही येत नाही की टाकू देत नाहीत. शेवटी ती राजाची चपलेची गोष्ट आहे बघ. तसेच वागतो बस्स.
माझ्या स्वतःच्या जगात जात नाही. ज्या जगात राहतो तिथे नवीन जग घडवायची माझी ताकद नाही.
असो...
तुझ्या आदर्शाला आणि स्वप्नांना सलाम. प्रत्य्क्षात येवोत हीच प्रार्थना.

राजाभाउ's picture

25 Jul 2016 - 5:38 pm | राजाभाउ

+१

तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे...
मी अज्जिब्बात नाकारत नाही...
तश्या समाजात बर्याच गोष्टी असतात कि जोपर्यंत आपण त्या अनुभवत नाहीत तोपर्यंत आपला विश्वास नाही बसत त्यावर...

मृत्युन्जय's picture

26 Jul 2016 - 7:48 pm | मृत्युन्जय

बरीच उदाहरणे माहिती आहेत. ओपन वाल्यांनी पुर्वी दलितांना मारले आता उलटे प्रकार चालु आहेत. आणि हे काही गेल्या २ - ५ वर्षातले प्रकार नाहित. माहितीतल्या बर्याच मुलांना अश्या मानहानीला सामोरे जावे लागले होते. शारिरीक सुद्धा आणी मानसिक सुद्धा. त्यामुळे त्यात काही नवल नाही वाटले.

शब्दबम्बाळ's picture

23 Jul 2016 - 8:00 pm | शब्दबम्बाळ

जबरदस्त लिहीलय, कथेवर उत्तम पकड आहे तुमची!
ही फक्त काल्पनिक कथाच असावी असे मनोमन वाटते पण आजुबाजूला पाहील की वास्तव नाकारतादेखील येत नाही...

दुर्गविहारी's picture

23 Jul 2016 - 8:32 pm | दुर्गविहारी

सुन्न. खुप ताकदीच लिहीता. प्रणाम घ्या. हे असे लिखाण वाचायसाठी इथे यायचे.

अभिजीत अवलिया's picture

24 Jul 2016 - 7:14 am | अभिजीत अवलिया

एका ओपन कॅटेगरी मधील मुलाला जातीवरून उल्लेख करून सतत मारहाण केली जाऊ शकते हे पटण्या पलीकडचे आहे.

मी अज्जिब्बात नाकारत नाही...
तश्या समाजात बर्याच गोष्टी असतात कि जोपर्यंत आपण त्या अनुभवत नाहीत तोपर्यंत आपला विश्वास नाही बसत त्यावर...
मला इतर जिल्ह्यांबद्दल फारशी माहीती नाही.. पण सोलापूर जिल्ह्याबद्दल मी खात्रीशीर सांगू शकतो.
माझाच वैयक्तिक अनुभव आहे... बहुतेक मी मोहोळ मध्ये का पंढरपूरशेजारच्या भाळवणीमध्ये होतो, (गाव निश्चितरित्या सांगू शकत नाही). स्पर्धेनिमित्त गेलो होतो. तिथे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान ठेवले होते. माझ्या मित्रांनी मला आधीच सावध केलं होतं... "भावा.. निघ तुला पटणार नाही" आमचाच कंड भारी... आम्ही थांबलो... खोटं नाही सांगत चांगली हातभार फाटली होती... नशीब, माझं नाव तिथे कोणाला फारसं माहीत नव्हतं... एव्हढ्या खालच्या पातळीवरचा एकाच जाती बद्दल द्वेष आहे तिथे... आणि बर्याच ब्रिगेडी त्यामागे हात धुवून लागल्या आहेत... जिणं हराम बऱ्याच जणांचं झालंय वा होतंय...
शेवटी कसंय... लव्ह जिहाद बद्दल तेच लोकं प्रश्न उठवत आहेत, ज्यांनी काहीच भोगलं नाहीये, ज्यांच्या मुली सुरक्षित आहेत...
असो... मला कोणत्याच जातीच्या विरोधात लिहायचं नाही.... फक्त एक कॉन्सेप्ट सुचली त्याअनुषंगाने लिहायचा प्रयत्न करतोय... कोणत्याच जातीचा उल्लेख म्हणूनच मी टाळलाय... सो... कृपया गैरसमज नसावा....
(बाय द वे.... मी स्वतः मार खाल्लाय.... पोटभरून)

कपिलमुनी's picture

25 Jul 2016 - 5:53 pm | कपिलमुनी

एका ओपन कॅटेगरी मधील मुलाला जातीवरून उल्लेख करून सतत मारहाण केली जाऊ शकते हे पटण्या पलीकडचे आहे.

असा मार खालेल्ली बरेच जैन , ब्राहमण मुले डोळ्यासमोर आहेत .
फक्त ओपन असल्यानेच हा मार खातोय हे चुकीचा आहे . ** मधे दम नाही ते मार खातात.
१०० मारल्यावर एक तरी मारायची ताकद हवी . मग जात कोणतीपण असो .

वटवट's picture

26 Jul 2016 - 7:22 pm | वटवट

सहमत ...

राजाभाउ's picture

25 Jul 2016 - 5:43 pm | राजाभाउ

सुन्न करणार आहे. जबरदस्त लिहीताय. पुलेशु.

मोदक's picture

25 Jul 2016 - 6:07 pm | मोदक

+१११

पैसा's picture

25 Jul 2016 - 5:51 pm | पैसा

:(

किसन शिंदे's picture

26 Jul 2016 - 12:31 am | किसन शिंदे

जबरदस्त लिहिलंय! आधीचे सगळे भाग आता लागोपाठ वाचून काढले. बाकी जातीव्यवस्थेवर प्रतिसाद देण्यापेक्षा तुमच्या लिखाणावर प्रतिसाद देईन. राग, चिडचिड या सगळ्या भावना दाटून आल्या हे लेखन वाचताना. हे काल्पनिक नसावं बहुदा.

यशोधरा's picture

26 Jul 2016 - 8:03 am | यशोधरा

वाचते आहे..