स्टालिनग्राड. भाग-३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
23 Apr 2016 - 3:57 pm

स्टालिनग्राडा भाग -३

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्टालिनग्राड भाग-१
स्टालिन्ग्राड भाग-२

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्टॅलिनग्राडच्या प्रतिकाराशी सार्जंट जॅकॉब पाव्हलॉव्ह याच्याही पराक्रमाचे नाव जोडले गेले आहे. या सार्जंटने एक व्होल्गापासून तीनशे फुटांवर असलेली चार मजली इमारत अठ्ठावन्न दिवस लढवली. मशीनगन व रणगाडाविरोधी तोफ व पँझर रणगाड्यांपासून लपून या ४२-गार्डस् रेजिमेंटच्या सैनिकांनी आपल्या सार्जंटच्या नेतृत्वाखाली ही करामत केली. या सैनिकांचे कौतुक करताना चुईकॉव्ह म्हणाला, ‘पॅरिस काबीज करताना जेवढे जर्मन सैनिक ठार झाले त्याच्या कितीतरी पट जास्त ही एकच इमारत काबीज करताना ठार झाले.’ हे सैनिक रशियन, युक्रेन, उझबेग, ताजिक, तार्तार वंशाचे होते आणि त्यामुळे मातृभूमीच्या संरक्षणासाठी वंशभेद विसरून सगळी जनता उभी ठकली आहे असे चित्र निर्माण करायला रशियाच्या प्रचार यंत्रणेला चांगली संधी मिळाली. हे चार मजली घर जसे आहे तसे जतन करण्यात आले आहे आणि आजही आपण ते बघू शकतो.

पाव्हलॉव्हने लढवलेली इमारत....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

चुईकॉव्हने जर्मनीच्या सहाव्या आर्मीचे १४ ऑक्टोबरचे आक्रमण हे अत्यंत अटीतटीच्या लढाईला आमंत्रण देणारे ठरले असे म्हटले आहे. ‘आमच्यासारख्या कसलेल्या सैनिकांनाही हा दिवस आयुष्यभर आठवेल. त्या दिवशी आम्ही आकाशात तब्बल तीन हजार हवाई हल्ले मोजले. या हल्ल्यात लुफ्तवाफच्या सर्व प्रकारच्या विमानांनी भाग घेतला होता.....सूर्य आकाशात चमकत होता पण धुराने शंभर यार्डवरचे दिसणेही मुश्कील होते.’ वरून एवढ्या संख्येने बाँब हल्ले होत असताना बरिकाड विभागात जर्मन सैन्याचे १८० रणगाडे घुसले. त्यांनी झोल्युडेव्हच्या ३७-डिव्हिजनच्या बचाव फळीतून मुसंडी मारली आणि ते कर्नल गॉरिश्‍नीच्या ९५-डिव्हिजन, गुर्टिएव्हच्या ३०८-डिव्हिजनवर तुटून पडले. एक बाँब झोल्युदेव्हच्या ठाण्यावरच पडल्यामुळे तो त्याच्या खाली गाडला गेला पण त्याला तेथून बाहेर काढण्यात आले. रात्रीपर्यंत जर्मन सैन्याने ट्रॅक्टर फॅक्टरीला तीन बाजूने वेढण्यात यश मिळवले होते व त्यांनी त्याच्या उत्पादन होणार्‍या इमारतींमधे प्रवेश मिळवला होता.

स्टलिनग्राड चे भवितव्य आता काळच ठरविणार होते...

ऑक्टोबरच्या मध्यास झालेल्या जनरल पौलसच्या या आक्रमणाविरुद्ध उजव्या तीरावर रशियन सैनिक कसे पाय रोवून उभे राहिले ही एक त्यागाची, शौर्याची कहाणी आहे. रशियाची nkvd रणांगण सोडून जाणार्‍याचे काय करत होते हे समजल्यावर लढण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता हे खरे असले तरीही या लढाईत शौर्याची परिसीमा गाठली गेली हेही खरे आहे.

रशियन सैनिकांनी व्होल्गाच्या किनार्‍यावर अत्यंत उच्च दर्जाचे असामान्य धैर्य दाखविले. सहा बॅरलच्या जर्मन तोफा व्होल्गाच्या पात्रात अखंड मारा करत असताना हजारो जखमी सैनिकांना सरपटत जीवाच्या आकांताने बोट गाठावी लागत होती. चुईकॉव्हने लिहिले आहे,

‘आम्हाला कित्येकदा आमच्या सैनिकांच्या मृतदेहांवरून चालावे लागत होते कारण जमिनीवर त्यांचा सडा पडला होता व वरून सतत पडणार्‍या राखेखाली हे देह दिसतही नव्हते.’

एवढा प्रतिकार होत असताना अखेरीस १६ ऑक्टोबरला जर्मन सेनेनी ट्रॅक्टर फॅक्टरीवर कब्जा मिळवला. १८ तारखेपर्यंत बरिकाड फॅक्टरीत काम करणार्‍या हजारो कामगारांपैकी फक्त पाच कामगार जिवंत राहिले होते. २३ ऑक्टोबरला रशियन सेनेला रेड ऑक्टोबर फॅक्टरीच्या आवारातून हुसकावण्यात जर्मन सेनेला यश आले. पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. आठच दिवसांनी रशियन फौजांनी नोव्होसेल्स्काया रस्त्याच्या बाजूने हल्ला करून भट्ट्यांचा विभाग, कॅलिब्रेशन व प्रोफाईल विभाग परत ताब्यात घेतले.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या चढाईत चुईकॉव्हला व्होल्गाच्या डाव्या किनार्‍यावर असलेल्या रशियन तोफखान्याने मोलाची साथ दिली. तेथे रशियाच्या तोफखान्याच्या ७६.२ मि.मि.च्या २५० तोफा व ५० याहूनही मोठ्या तोफा तैनात होत्या. या तोफांनी सतत मारा करुन जर्मन सेनेवर दबाव टाकला. त्यातच त्यांना २०३ मि.मि. आणि २८० मि.मि.च्या तोफा ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात मिळाल्यावर हा दबाव अजूनच वाढला. उजव्या तीरावर रशियाच्या तोफखान्याला कात्युशा रॉकेटची वाहने मागे घेऊन जवळ जवळ व्होल्गातच न्यावी लागली कारण जर्मन सेना इतक्या जवळ पोहोचली होती की आवश्यक अंतर ठेवल्याशिवाय त्यांच्यावर या रॉकेटचा मारा करता येईना.

युद्ध संपल्यावर कुठल्या रशियन तुकड्यांनी जास्त शौर्य गाजवले या बाबतीत बरेच कडवट वाद झाले. पण शौर्याला तोटा नव्हता. चुईकॉव्हला शक्य होईल तेव्हा व शक्य होईल तेवढी मदत बाहेर असलेल्या रशियन सेनेने केली व त्याबद्दल जनरल चुईकॉव्हनेही त्यांचे आभार मानले. या युद्धात जर्मनीच्या बासष्टाव्या आर्मीला ठेचण्यासाठी तब्बल सात इन्फंट्री डिव्हिजन तैनात करण्यात आल्या होत्या. या बाहेरून होणार्‍या मदतीने जर्मन सेनेला पूर्णपणे स्टॅलिनग्राडवर लक्ष केंद्रित करता आले नाही हाही चुईकॉव्हला फायदा झालाच. ‘त्यांनी पौलसच्या सैन्याच्या हालचालींना लगाम घातला व त्यासाठी त्यांचे आभार मानलेच पाहिजेत’ चुईकॉव्हने कबुली दिली. वेअरमाख्टच्या बाजूने विचार केला तर त्यांना रशियन सैन्य कुठल्या शक्तीच्या जोरावर हे हल्ले करत आहेत हेच त्यांना समजत नव्हते, तर हिटलर हे शहर काबीज करण्यासाठी आख्खा देश पणास लावायला निघाला होता.

व्होल्गाचा किनारा...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्टॅलिनग्राडचे पहिले नाव होते झारित्सिन. या नावाचा आणि रशियन झार घराण्याचा काही संबंध नाही. हे तार्तारांच्या भाषेतले नाव आहे आणि याचा अर्थ आहे ‘पिवळी नदी’ १८२५ साली रशियन यादवीत स्टॅलिनने हे शहर यशस्वीरीत्या लढवले होते तेव्हा याचे नामकरण झाले स्टॅलिनग्राड. जर्मनी आणि रशिया या दोन्ही देशांना युद्धाच्या डावपेचांच्या दृष्टिकोनातून या शहराचे अतिशय महत्त्व होतेच पण या शहराचे नाव स्टॅलिनग्राड नसते तर या शहरासाठी, ऑक्टोबरमधे युद्धसामुग्रीची वानवा असतानासुद्धा, एवढी घनघोर लढाई झाली असती की नाही यात शंकाच आहे. या दोन हुकुमशहांच्या युद्धाला एक वैयत्त्किक शत्रुत्वाची किनारही होती. समाजवादाच्या जन्मस्थानी म्हणजे म्युनिच शहरात भाषण करताना हिटलर ८ नोव्हेंबर १९४२ मधे म्हणाला, ‘मला व्होल्गा नदीवरच्या एका विशिष्ट शहरात, विशिष्ट ठिकाणी पोहोचायचे आहे. आता या शहराचे नाव स्टॅलिनग्राड आहे त्याला मी काही करू शकत नाही.’ या सगळ्यामुळे या शहराला डावपेचात्मक महत्त्वापेक्षा एक प्रकारचे प्रतिकात्मक महत्त्व प्राप्त झाले होते. याच भाषणात हिटलरने हे शहर काबीज करायला कितीही काळ लागला तरी चालेल पण ते काबीज करणारच अशी भूमिका मांडली होती. पण हिवाळा जवळ येत चालला होता आणि मागच्या वर्षी याच हिवाळ्यामुळे त्याला मॉस्को घेता आले नव्हते. ज्या दिवशी पहिल्या महायुद्धाची युद्धबंदी झाली होती त्याच दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसहाला जर्मनीच्या सहाव्या आर्मीचे आक्रमण चालू झाले. या आक्रमणात सगळ्यात पुढे होत्या चौदावी आणि चोविसावी पँझर डिव्हिजन. यांनी बरिकाड फॅक्टरीच्या येथे तीन मैल रुंदीची आघाडी उघडली. चुईकॉव्हने आठवणीत लिहिले, ‘ या रस्त्यांवर घनघोर लढाईला तोंड फुटले. ते दिवसभर चालले. रस्त्यावर प्रत्येक फुटावरचा दगड, वीट लढविण्यात आली. संगिनी व हातबाँबचा मुक्तपणे वापर केला गेला.’

वर लिहिलेल्या हल्ल्याबरोबर स्टॅलिनग्राडमधे असलेल्या मामायेव्ह कुरगान टेकाडावरही हल्ला चढविण्यात आला. त्याच्या उंचीमुळे कोणालाच ते दुसर्‍याच्या ताब्यात असणे परवडणारे नव्हते. या टेकाडावर दोन्ही बाजूच्या तोफखान्यांनी इतका प्रचंड बाँबवर्षाव केला की शेवटी त्याचा मूळ आकार बदलला. असे म्हणतात की उष्णतेमुळे त्याच्या उतारावर बर्फही जमू शकले नाही. पाण्याच्या टाक्यांसाठी सतत एकशे बारा दिवस चकमकी उडत होत्या. या लढाईतही या भागावर कितीवेळा ताबा बदलला हे कोणी सांगू शकत नाही कारण ते सांगायला कोणी जिवंत राहिले नाही. एक वेळ अशी आली की त्या भागात लढणार्‍या सैनिकांचे सरासरी आयुष्य जास्तीतजास्त एक ते दोन दिवसांपेक्षा जास्त नसायचे. जनरल चुईकॉव्हच्या मुख्यालयाचे आणि जनरल बाटिउकच्या कार्यालयाचा संपर्क तुटल्यावर एका टिटायेव्ह नावाच्या सिग्नल विभागाच्या माणसाला तेथे पाठविण्यात आले. तो टेलिफोन चालू झाला पण नंतर त्याचे प्रेत सापडले तेव्हा त्याने त्या जोडलेल्या तारा त्याच्या दातात धरून ठेवलेल्या सापडल्या.

११ नोव्हेंबरला जर्मन फौजांना व्होल्गाचा तीर गाठण्यात यश आले. त्यांच्या ताब्यात जवळ जवळ सहाशे यार्डचा किनारा आला. यामुळे रशियन सैन्याचे दोन भाग पडले. अर्थात हे काही पहिल्यांदा झाले नव्हते. ही तिसरी वेळ होती. चुईकॉव्हच्या मते पौलसला अजूनही स्वत:च्या लष्करी ताकदीचा पुरेपूर फायदा उठवता आला नव्हता. आता पौलसच्या ताब्यात तीन चतुर्थांश स्टॅलिनग्राड आले होते पण चुईकॉव्हची बासष्टावी आर्मी अजूनही उजव्या तीरावर तग धरून होती, एवढेच नव्हे तर त्यांना कुमक व रसदही मोठ्या प्रमाणावर मिळत होती. जर्मन सेनाधिकार्‍यांनी या लढाईत अजून सैनिक उतरवायचे ठरविल्यावर त्यांनी डॉन नदीच्या विभागातील सैन्य शहरात हलवले. या फौजांची जागा इटालियन व रुमानियाच्या फौजांनी घेतली व रशियाच्या फौजा ज्याची वाट बघत होत्या ती संधी चालून आली.

मार्च १९४१मधे जेव्हा हिटलरने ऑपरेशन बार्बारोसावर चर्चेसाठी त्याच्या सेनाधिकार्‍यांबरोबर बैठक घेतली तेव्हा त्याने जर्मनीचे उद्दिष्ट काय आणि ते साध्य करायला काय करावे लागेल हे सांगितले, ‘सेनाधिकार्‍यांनी आपापसातील हेवेदावे कटाक्षाने दूर ठेवले पाहिजेत. माझ्या मनात आपल्या मित्रांबद्दल अजिबात शंका नाहीत. फिनलँडचे सैनिक शौर्याने लढतील.....रुमानियाचे सैनिक लढू शकत नाहीत. ते जास्तीत जास्त संरक्षित विभागात पोलिसाचे काम चांगले करू शकतात. जर्मन फौजांनी या असल्या फौजांवर अजिबात अवलंबून राहू नये. ते कधी रणांगण सोडतील याचा भरवसा नाही.” हा सल्ला त्याच्या सेनाधिकार्‍यांना एवढ्या अगोदर देऊन त्याने स्टॅलिनग्राडमधे स्वत:च पाळला नाही. त्याला जी भीती वाटत होती तेच आता स्टॅलिनग्राडमधे होणार होते. या इतर सैन्याने जर्मनीचे काय नुकसान झाले ते आपण बघणारच आहोत. रशियन सेनेने स्टॅलिनग्राडला उत्तर आणि दक्षिणेकडून वेढा घालायचे जे डावपेच आखले त्याचे सर्व श्रेय जनरल झुकॉव्हलाच द्यायला पाहिजे. २३ नोव्हेंबरला हा वेढा पूर्ण झाला. अर्थात जनरल मानस्टाईनच्या सैन्याने याला डिसेंबरमधे प्रतिआक्रमण करुन तो उठवण्यासाठी कडवा प्रतिकार केला पण जानेवारीपर्यंत जर्मन सेना या सापळ्यात बरोबर अडकली ज्याचा अंत जर्मन सेनेच्या शरणागतीत झाला. चुईकॉव्हच्या सैन्याला स्टॅलिनग्राडमधेच जर्मन सैन्याचे लक्ष वेधण्यासाठी ठेवण्यात आले आणि चारच दिवसांनंतर जनरल झुकॉव्हने चार आर्मी ग्रुपला या युद्धात पाठवले. या योजनेचे नाव होते ऑपरेशन युरेनस. याची तयारी गुपचुपपणे चालली होती व फारच प्रभावी होती. १६०००० सैनिक, ४४० रणगाडे, ६००० तोफा, १४००० वाहने व १०००० घोडे एवढी युद्धसामुग्री व्होल्गा पार करुन या युद्धात ओतण्यात आली होती. हे होईतोपर्यंत ही संख्या वाढत जाऊन दहा लाख होणार होती. ऑपरेशन युरेनसमधे स्टॅलिनग्राडमधे गुंतलेल्या जर्मन सैन्याला वेढा घालण्यात येणार होता तर त्याच बरोबर ऑपरेशन सॅटर्नमधे ही सेना रोस्टोव्हपर्यंतचा विभाग काबीज करणार होती. युरेनसमधे रशियाच्या तीन डिव्हिजन उत्तर स्टॅलिनग्राडवर हल्ला करणार व दक्षिणेतून स्टॅलिनग्राडवर एक डिव्हिजन हल्ला करुन जर्मन सैन्याला चिमट्यात पकडणार असा डावपेच आखला गेला.

कात्युषा... जर्मन सैनिकांनी असला रॉकेट लाँचर पाहिलाही नव्हता...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१९ नोव्हेंबरच्या सकाळी जेव्हा रशियाच्या ३५०० तोफा गर्जायला लागल्या तेव्हा तीस मैल दूर असलेल्या जर्मन सैनिकांचीही भीतीने गाळण उडाली. १९४४ पासून हा दिवस रशियामधे आर्टिलरी दिवस म्हणून पाळला जातो. पायदळाच्या आक्रमणाआधी रशियाच्या इंजिनीयर तुकड्यांनी रात्रभर काम करुन जर्मन भूसुरुंग निकामी केले होते.

जेव्हा रशियाचे आक्रमण सुरू झाले तेव्हा रुमानियाच्या सैनिकांनी प्राणपणाने प्रतिकार केला पण रशियाच्या रणगाड्यांनी जनरल ड्रयुमिट्रेस्क्यूच्या फळीला सात मैल रुंदीचे खिंडार पाडले आणि रशियन फौजा त्या खिंडारातून आत घुसल्या आणि डॉन नदी जेथे वळण घेते तेथे जर्मनीचे पाच डिव्हिजन सैन्य वेढले गेले. या गोंधळाचा फायदा उठवून जेथे जेथे शक्य असेल तेथे सैन्य आत घुसवण्यात आले आणि जर्मन सैन्यावर मोठी कठीण परिस्थिती ओढवली. तीन आठवड्यापूर्वीच जनरल झाईट्झ्लरने हिटलरला ग्वाही दिली होती की ‘रशियाचे सैन्य कुठल्याही प्रकारचे धाडस करण्याच्या परिस्थितीत नाही.’ आता ही बातमी हिटलरला सांगायची जबाबदारी त्याच्यावर पडली. २० नोव्हेंबरला रशियाच्या दक्षिणस्थित फौजांनी रुमानियाच्या चौथ्या आर्मीच्या फळीलाही असेच मोठे भगदाड पाडले. या सतरा मैल रुंदीच्या भगदाडातून रशियाची चौथी कॅव्हलरी आणि चौथी चिलखती दले आत शिरली व त्यांनी तेथे मोठा हाहा:कार उडवला. रणगाडादलांच्या न थांबता केलेल्या वेगवान हालचाली, मधे येणार्‍या शत्रूचा नाश करून मोठमोठी अंतरे कापणे ही ऑपरेशन युरेनसची वैशिष्ठ्ये होती. आपल्याला आठवेल, ऑपरेशन बार्बारोसाचीही हीच वैशिष्ठ्ये होती. २३ नोव्हेंबरला ही दोन्ही सैन्यदले सोव्हिएटस्कि येथे एकामेकांना भेटली आणि स्टॅलिनग्राडचा वेढा पूर्ण झाला. त्या विशाल भूभागावर हा वेढा आवळताना होणार्‍या हालचाली त्यांच्या इतर फौजांना कळाव्यात म्हणून ते आकाशात हिरव्या रंगाचे खुणेचे गोळे उडवत होते. या दोन सेनेच्या तुकड्यांनी त्यांच्या हालचाली इतक्या वेगाने केल्या की त्यांच्या भेटीचे छायाचित्रणच करायचे राहिले जे दुसर्‍या दिवशी एक छोटेसे तेच नाटक करुन पार पाडण्यात आले.

विचार केला तर, स्टॅलिनग्राडची लढाई जर्मन सैनिक हरले नाहीत असेच म्हणावे लागेल. जर्मन सैन्याने उजव्या किनार्‍यावरच्या काही जागा सोडता जवळ जवळ सगळे शहर काबीज केले होते. ही लढाई जर्मनी हरली रुमानियाच्या तिसर्‍या आणि इटलीच्या आठवी आर्मी या दोन सैन्यामुळे. या सेना स्टॅलिनग्राडच्या अनुक्रमे उत्तरेला आणि दक्षिणेला तैनात होत्या आणि तेथेच घात झाला. रशियन सेनेच्या पुढे या सेना पाय रोवून उभ्या राहू शकल्या नाहीत. हिटलर जे म्हणाला ती भीती शेवटी खरी ठरली. हा वेढा आवळल्यावर जनरल पौलसचे २७५००० सैनिक या वेढ्यात अडकले. हा वेढा आवळणार्‍या रशियन फौजा अजून काही ठिकाणी विरळ होत्या व त्यातून हे सैन्य सहज निसटू शकत होते. हिटलरने त्यांना तशी परवानगी द्यायला हवी होती पण त्याने ती दिली नाही कारण त्याला असे वाटत होते की एकदा का मानस्टाईनने दक्षिण आघाडीचे नेतृत्व स्वीकारले की तो तेथे असलेल्या जर्मन सेनेला एकत्र करुन परत चढाई करेल व तोपर्यंत लुफ्तवाफ पौलसच्या सैन्याला रसदीचा पुरवठा करेल.

गोअरींगनेही त्याच्या नेहमीच्या भाषेत इतर सेनाधिकार्‍यांच्या विरोधाला न जुमानता हिटलरला ग्वाही दिली की लुफ्तवाफ दररोज ५०० टन रसदीचा पुरवठा स्टॅलिनग्राडवर टाकेल . या कामासाठी २२५ जुंकर्स-५२ विमाने उपलब्ध होतील या गृहितकावर हे गणित आधारित होते. प्रत्यक्षात फक्त ऐंशीच विमाने उपलब्ध होती. हेंकेल विमानांच्या दोन स्क्वाड्रनच्या संरक्षणाखाली ही विमाने एका वेळेस फक्त दीड टन रसद नेऊ शकत होती. गोअरींग इतर युद्धभूमीवरची विमाने हलवून या आघाडीवर आणायच्या प्रयत्नात होता, नाही असे नाही, पण ऐन हिवाळ्यात दोन लाखाच्या वर संख्या असलेल्या सैन्याला विमानांच्या पुरवठ्यावर पोसणे हे अशक्यच होते. शिवाय या रसदीचा पुरवठा या मार्गाने किती काळ चालू ठेवायला लागेल याचा कसलाही अंदाज कोणीही देऊ शकत नव्हते. रसद पुरवठ्याची मागणी व पुरवठा याचा जर मेळ घातला तर सहाव्या आर्मीचा नाश अटळ होता हे निश्‍चित. जनरल पौलसने मागितला होता रोज ७५० टन युद्धसहित्याचा पुरवठा. गोअरींगने ५५० टनाचे आश्‍वासन दिले. त्याच्या अधिकार्‍यांनी ते शक्य नाही परंतु ३५० टन रसद टाकता येईल असा खुलासा केला आणि प्रत्यक्षात दररोज १५० टनच रसद स्टॅलिनग्राडवर टाकण्यात आली. एवढेच नाही तर जेव्हा हवामान खराब झाले व जेव्हा जास्त रसद लागत होती तेव्हा फक्त १०० टन रसद टाकण्यात येत होती.

पौलसला हा वेढा भेदण्यासाठी वेगवान हालचाली करून ईशान्य दिशेने येणार्‍या मानस्टाईनच्या सैन्याला गाठणे आवश्यक होते पण हिटलर महाशयांनी याला परवानगी नाकारली व जनरल पौलसलाही हिटलरच्या विरोधात जाऊन तसले काही करायची मनापासून इच्छा नव्हती. न्युरेंबर्गच्या खटल्यादरम्यान जनरल मानस्टाईनने सांगितले, ‘शेवटी मी हा वेढा फोडायचा प्रयत्न करावा असा आदेश काढला. पण जनरल पौलसने आता उशीर झाला आहे व ते आता शक्य नाही असे उत्तर दिले. हिटलरला तर सहाव्या आर्मीने हा वेढा फोडावा असे बिलकुल वाटत नव्हते. त्याचे आपले नेहमीचे पालुपद चालू होते की शेवटच्या माणसापर्यंत स्टॅलिनग्राड लढवायला हवे. एका क्षणी मला आठवते हिटलर असेही म्हणाला की सहाव्या आर्मीचे हा वेढा फोडायचा प्रयत्न केला तर त्यांचा नाश अटळ आहे.’ जेव्हा सांगायची जरुरी होती तेव्हा न सांगता, युद्धानंतर जनरल झाईट्झ्लरने थोडा उद्धटपणाचा दोष पत्करून अखेरीस सांगितले, ‘मी स्वत: हिटलरला स्टॅलिनग्राडमधे असलेल्या अडीच लाख सैन्याचा निकाल लागला तर रशियाच्या आघाडीवरच्या आपल्या सैन्याचा कणाच मोडेल असे बजावले होते.’ खरे म्हटले तर हिटलरला स्टॅलिनग्राडचे महत्त्व कोणी सांगायची आवश्यकता नव्हती. २६ नोव्हेंबरला त्याच्या सहाव्या आर्मीला व चौथ्या आर्मर्ड आर्मीला बजावून सांगताना तो म्हणाला होता,
‘स्टॅलिनग्राडची लढाई आता त्याच्या परमोच्च बिंदूवर पोहोचली आहे. अशा अडचणीच्या काळात मी व जर्मन जनता आपल्यामागे ठामपणे उभी आहे. काहीही झाले तरीही तुम्ही स्टॅलिनग्राड तुमच्या ताब्यात ठेवले पाहिजे. हे विसरू नका की ते जिंकताना तुमच्या अनेक बांधवांनी रक्त सांडले आहे. खारकॉव्हच्या युद्धात तुम्ही जो खंबीरपणा दाखवला तसाच येथे दाखवाल अशी अपेक्षा आहे. रशियाचे हे आक्रमण लवकरच निकालात काढण्यात येईल व त्या दिशेने पावलेही टाकण्यात आलेली आहेत. माझ्या अधिकारात मी आपल्याला सर्वतोपरी मदत करत आहे हे लक्षात ठेवा......’

याच महिन्याच्या सुरवातीला हिटलरने अल्-अलामिन च्या लढाईत जनरल रोमेललाही ‘जिंका किंवा मरा‘ असा आदेश दिलाच होता. दुर्दैवाने आता यापुढे असे अनेक आदेश निघणार होते. हे आदेश हिटलर आंधळेपणाने सैनिकांच्या इच्छाशक्तीला वेठीस धरून काढणार होता हे स्पष्टच होते. पण नुसती इच्छाशक्ती असून चालत नाही हे त्याला लवकरच कळून चुकणार होते. त्याच्या या वेडगळ आदेशांमुळे आग व शस्त्रास्त्रांच्या पुढे इच्छाशक्ती, रक्त व हतबल माणसे उभी ठाकणार होती.
स्टॅलिनग्राड वाहतुकीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. औद्योगिक शहर व तेलाच्या शुद्धीकरणाच्या कारखान्यांसाठी ते प्रसिद्ध होते पण सर्वस्व पणाला लावण्याइतके निश्‍चितच महत्त्वाचे नव्हते. हिटलरने अट्टाहासाने जनरल पौलसला स्टॅलिनग्राडमधे राहण्याची आज्ञा दिली होती पण खरे तर त्याने कॉकेशसमधील ‘आर्मी ग्रुप ए’ च्या सैन्यालाही माघारीचे आदेश देणे आवश्यक होते.

जनरल मेलेंथिनने म्हटले आहे, ‘हिटलरने जनरल पौलसच्या सैन्याचा वेढा फोडण्याच्या सूचनेबाबतीत नकाराधिकार वापरला. तो अत्यंत घाईघाईने घेतलेला निर्णय होता. विशेषत: ज्या सहाव्या आर्मीच्या बाबतीत हा निर्णय घेतला होता ते बघितले तर हा निर्णय विचार करुन घ्यायला पाहिजे होता घिसाडघाईने नव्हे. सहावी आर्मी हे जर्मनीची एक अत्यंत महत्त्वाची सेना होती. वेअरमाख्टने ही सेना शेवटच्या निर्णायक युद्धासाठी उभी केली होती. स्टॅलिनग्राडचे युद्ध निर्णायक नव्हते असे म्हणता येणार नाही पण मग जनरल मानस्टाईनच्या या सेनेला वाचविण्याच्या प्रयत्नांना जी खीळ घालण्यात आली ती समजण्याच्या पलीकडची आहे. हवाईमार्गाने लुफ्तवाफच्या तुटपुंज्या रसदीमुळे लवकरच पौलसचे सैन्य हिमदंशाने मृत्युमुखी पडायला लागले. मृत्युमुखी पडणारे सैनिक, रोगराई, थकावट, उपासमार आणि अशक्त करणारी थंडी या कारणांनी वेढा उठविण्यात जर्मन सैन्याला यश मिळाले असते की नाही याचीही शंकाच आहे.

जनरल चुईकॉव्हच्या पुढे आता अजून एक आव्हान उभे राहिले. १२ नोव्हेंबरला व्होल्गा नदी गोठायला सुरुवात झाली. स्टॅलिनग्राडचे तापमान या काळात उणे ४५ सेल्शियस एवढे खाली जाते. जर्मन सैनिक गोठलेल्या प्रेतांच्या भिंती उभ्या करुन आडोसे तयार करण्यात मागेपुढे पहात नसत. नदीच्या पाण्याचे तापमान उणे १५सेल्शियसला पोहोचले की पुढे त्याची बर्फ होण्याची क्रिया वेगाने व्हायची पण या मधल्या काळात नदीच्या पाण्यात बर्फाच्या लाद्या वाहत व त्यात कुठल्याही प्रकारची बोट चालणे अशक्य होत असे. साधारणत: १७ डिसेंबरच्या आसपास ही नदी पूर्णपणे गोठते. नदी पूर्ण गोठेपर्यंत त्यावरून वाहतूक करणे शक्य नव्हते त्यामुळे रशियन सैन्याचाही रसदीचा पुरवठा अनियमित झाला होता. एका रशियन सेनाधिकार्‍याने म्हटले, ‘आता आम्हाला दोन आघाड्यांवर लढायचे होते, एक जर्मन सैन्य व दुसरी म्हणजे व्होल्गा.’ जनरल चुईकॉव्हने त्याच्या आठवणीत लिहिले आहे, ‘दारूगोळा व अन्नाचा पुरवठा जसा कमी होत गेला तसा त्या नदीतील आवाज करणार्‍या बर्फाने आमच्या अंगावर काटा येत असे’. बर्फ कडक झाल्यावर मात्र लगेचच वाहतूक चालू झाली आणि वेढ्यातील रशियन सैन्यापर्यंत १८,००० ट्रक व वीस हजार इतर वाहने भरून रसद पोहोचविण्यात आली.

डिसेंबरच्या मध्यास सहाव्या आर्मीची बिकट परिस्थिती सुधारायचे काम मानस्टाईनच्या सेनेला करता आले असते. त्याचे सैन्य कागदावर तरी ताकदवान दिसत होते. दोन पँझर डिव्हिजन, जनरल हॉथचे रणगाडे, एक इन्फंट्री डिव्हिजन व काही रुमानियाच्या सैन्याच्या डिव्हिजन अशा या सैन्याने १२ डिसेंबरला सहाव्या आर्मीला मदत करण्यासाठी आक्रमण सुरू केले. या योजनेचे नाव होते ऑपरेशन ‘विंटरगेविटा’. यांना स्टॅलिनग्राडला पोहोचण्यासाठी फक्त ६२ मैल प्रवास करायचा होता. त्याच दिवशी दुपारी त्याच्या ‘वुल्फसांझ’नावाच्या मुख्यालयात बसून हिटलर जनरल झाईट्झ्लरला म्हणाला,
‘झाईट्झ्लर मला एक समजले आहे......
...व्यापक दृष्टीने या युद्धभूमीकडे बघितल्यास मला वाटते स्टॅलिनग्राडचा ताबा आपण कुठल्याही परिस्थितीत सोडायला नको. एकदा का हे आपल्या हातून गेले की ते आपल्याला परत जिंकता येणार नाही. माघार घेताना बरेच युद्धसाहित्य तेथेच टाकून यावे लागेल. घोडे ही थकले आहेत आणि सामानाच्या गाड्या ओढू शकणार नाहीत. मी एकाही घोड्याला आता पोसू शकत नाही. एक रशियन दुसर्‍या रशियन सैनिकाला खाऊ शकतो पण मी एक घोडा दुसरा घोड्याला कदापिही खायला घालणार नाही’

हिटलरने हे विधान मानवतेला अनुसरुन केले का परिस्थितीला अनुसरुन केले हे समजायला मार्ग नाही. स्टॅलिनग्राडमधे असलेल्या मोठ्या हॉविट्झर तोफांबद्दल हिटलर म्हणाला, ‘त्या जर आपण गमावल्या तर तसल्या तोफा आपण तेथे परत पाठवू शकत नाही. त्या जर आपण तेथेच टाकल्या तर या युद्धाचा उद्देशच नष्ट झाला असे म्हणावे लागेल.

स्टॅलिनग्राडमधून आत्ता माघार घेऊन आपण परत येथे येऊ हा विचारही करणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. मी येथे परत येऊ शकत नाही म्हणून आत्ता येथून जाऊही शकत नाही......

पण....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

क्रमशः

जयंत कुलकर्णी.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

23 Apr 2016 - 5:14 pm | बोका-ए-आझम

मध्ये ज्याला Flanking Attack म्हणतात - शत्रूला समोरासमोर भिडण्यापेक्षा त्याच्या कमकुवत बाजूंवर हल्ला करुन त्याला वेढ्यात अडकवणं - त्याचा स्टॅलिनग्राडच्या लढाईतला आॅपरेशन युरेनस नावाचा जो टप्पा आहे - नोव्हेंबर १९४२ ते जानेवारी १९४३ - हा आदर्श वस्तुपाठ आहे. Soviet Deep Battle Theory जी आपल्या सैन्यानेही बांगलादेश युद्धात ढाका जिंकताना वापरली - तिचा स्टॅलिनग्राडची लढाई हा एक फार अप्रतिम case study आहे.
जयंतकाकांनी हे पैलू फार छान आणि त्यांच्या मानवी दृष्टिकोनातून मांडले आहेत. पुभाप्र!

लालगरूड's picture

23 Apr 2016 - 5:21 pm | लालगरूड

फोटो :-( :-(

यशोधरा's picture

23 Apr 2016 - 5:36 pm | यशोधरा

काका, वाचते आहे...

एस's picture

23 Apr 2016 - 6:08 pm | एस

वाचतोय, पुभाप्र.

तुषार काळभोर's picture

23 Apr 2016 - 6:16 pm | तुषार काळभोर

शेवटचा फोटो अंगावर काटा आणणाऱ्या या भागाच परमोच्च बिंदू आहे.

जयंत काका सलाम तुम्हाला आणि त्या सैनिकांना.

स्वीट टॉकर's picture

24 Apr 2016 - 3:47 pm | स्वीट टॉकर

कधी एकदा पुढचा भाग येतो असं होतं. येवू द्यात.

नया है वह's picture

25 Apr 2016 - 12:31 pm | नया है वह

+१११

पैसा's picture

25 Apr 2016 - 1:46 pm | पैसा

उदास करणारे आहे सगळे.