स्टालिनग्राड भाग -२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Apr 2016 - 10:45 am

==================================================================

स्टालिनग्राड : भाग - १...

==================================================================

..........२३ ऑगस्टला व्होल्गा नदीवर पोहोचल्यावर जर्मन सेनेनी पहिल्यांदा शहरातील तेलाच्या टाक्यांवर तुफानी बाँबवर्षाव केला. त्या टाक्यांना आग लागल्यावर जे दृश्य दिसत होते त्याचे वर्णन ‘क्राज्न्या झिवेझदा’ वर्तमानपत्राच्या एका व्हॅसिली ग्रॉसमन नावाच्या रशियन पत्रकाराने असे केले आहे,
‘आगीच्या ज्वाळा हजारो फूट आकाशाच्या दिशेने झेप घेत होत्या. त्या ज्वाळांबरोबर तेलाच्या वाफेचे ढगही वर जात होते व वर जाऊन फुटत होते. ही आग इतकी प्रचंड होती की त्यात असणार्‍या हायड्रोकार्बनच्या कणांना जळण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायूचा पुरवठा कमी पडून काळ्याकुट्ट धुराचा एक जाड थर आकाश आणि जमिनीला अलग करायचा. त्या धुराच्या दाट आवरणातून तेल ठिबकताना बघणे हा एक भयानक अनुभव होता........

रशियन सैनिक प्रत्येक इमारत लढविताना....

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे तेल जवळजवळ आठवडाभर जळत होते व त्या धुराचे पट्टे कुठूनही दिसत होते. एक क्षण असा आला की व्होल्गा नदीत पडलेल्या तेलामुळे नदीलाच आग लागली. स्टॅलिनग्राडच्या रशियन फौजांचा कमांडर जनरल व्हॅसिली इव्हानॉव्ह चुईकॉव्हने त्या लढाईची आठवण सांगताना म्हटले,
‘आमच्या डोक्यावर काळ्याकुट्ट रंगाचे धुराचे ढग तरंगत होते. त्यातून आमच्यावर राख व काजळीचा अखंड वर्षाव होत होता. आमच्या कार्यालयातील प्रत्येक गोष्ट त्यामुळे काळी पडली होती.’

लुफ्तवाफने विमानातून फक्त बाँबच टाकले असे नाही तर ज्याने ज्याने खाली नुकसान होऊ शकेल अशा अनेक गोष्टी ते विमानातून खाली टाकत उदा. लोखंडाचे तुकडे, करवती, चाकाच्या रीम्स्. ड्रम्स्. ग्रॉसमनने स्टॅलिनग्राडच्या युद्धात भाग घेतलेल्या अनेक सेनाधिकार्‍यांच्या मुलाखती घेतल्या. त्याने लिहिलेल्या ‘लाइफ अँड फेट’ या पुस्तकात जनरल चुईकॉव्हने म्हणलेले खालील वाक्य बरेच काही सांगून जाते.
‘आमच्या बंकरवर या आकाशातून पडणार्‍या लोखंडी वस्तूंचे वादळ सतत घोंघावत असे. वर डोके काढायचा अवकाश त्यातील काही वस्तू मृत्युचे रूप धारण करत असत.’

वर उल्लेख केलेला जनरल चुईकॉव्ह वयाच्या अठराव्या वर्षी १९१८ मधे रशियन फौजेत भरती झाला होता. त्याने रशियातील यादवी युद्धात आणि पोलंडबरोबर झालेल्या युद्धात भागही घेतला होता. त्याने नंतर फ्रुंझा मिलिटरी अ‍ॅकॅडमीमधे काम केले व त्यानंतर त्याची नेमणूक चीनमधे रशियाच्या वकिलातीमधे लष्करी अधिकारी म्हणून झाली होती. रशियन क्रांतीची वादळी वर्षे त्याने चीनमधे व्यतीत केली. जनरल झुकॉव्हच्या या आवडत्या अधिकार्‍याने फिनलँडच्या युद्धातही भाग घेतला होता. त्यानंतर त्याला रशियाच्या स्टॅलिनग्राडमधे असणार्‍या बासष्टाव्या आर्मीचे आधिपत्य देण्यात आले. हा एक कणखर, अनुभवी, व राकट अधिकारी म्हणून ओळखला जाई. तो काम न करणार्‍या त्याच्या अधिकार्‍यांना त्याच्या छडीने मारायलाही मागेपुढे बघत नसे. हे गुण असोत किंवा दुर्गुण, एक मात्र खरे की व्होल्गाच्या त्या किनार्‍यावर त्याने आपले सर्वस्व पणाला लावले होते.

एक कारखाना...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जर्मनीच्या दुर्दैवाने त्यांना वाटले होते तसे काही झाले नाही ना रशियन सैन्यात गोंधळ माजला ना सामान्य नागरिकांमधे. ही लढाई चालू असतानाच रशियाने आपले शस्स्त्रांचे कारखाने हलविण्यास सुरवात केली. पण शेवटच्या क्षणापर्यंत या कारखान्यांमधे काम चालू होते. कित्येकदा रशियन सैनिक लेथवर काम करत असताना हातात बंदुक घेऊन जर्मन सैनिकांशी सामना करण्यास बाहेर पडायचे व परत येऊन परत मशीनवर उभे रहायचे. लेखाच्या पहिल्या परिच्छेदात ज्या कारखान्यांबद्दल उल्लेख झाला आहे त्यांच्या इमारती आता अवाढव्य सिमेंट कॉन्क्रीटच्या बंकरचे काम करु लागल्या. रेड ऑक्टोबर फॅक्टरीमधे भंगार वितळवून त्याचे रूपांतर परत धातूत करायचे काम चालायचे. बरिकाडमधे शस्त्रास्त्रांचे उत्पादन चालायचे तर ट्रॅक्टर फॅक्टरीत अर्थातच ट्रॅक्ट्ररचे उत्पादन चालायचे व आजही होते. या कारखान्याचे नाव बोल्शेव्हिक सिक्रेट पोलीसचा प्रमुख ‘आयर्न फेलिक्स झिरन्स्की’ याच्या नावावरून ठेवले आहे व त्याचाच एक भला मोठ्ठा पुतळाही तेथे उभा केलेला आहे. १९४२ मधे या कारखान्यात रणगाड्यांच्या चासिस बनवायचे काम चालत असे. याच कारखान्यांच्या आसपास कामगारांच्या वस्त्या बर्‍याच अंतरावर पसरल्या होत्या व कारखान्यांना कच्च्या रस्त्यांनी जोडलेल्या होत्या. हे रस्ते डांबरी नव्हते. त्या काळी रशियामधे म्हणच होती ‘आमच्या कडे रस्ते नाहीत फक्त दिशा असतात’.

स्टालिनग्राडमधेल सैनिकांचे मृतदेह...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जर्मनीच्या लुफ्तवाफने बाँबिंग करून स्टॅलिनग्राडची अवस्था एखाद्या परग्रहावरच्या खाचखळग्यासारखी करून टाकली खरी, पण शेवटी याचा फायदा रशियन फौजांनाच झाला. शहरात जे काही दगड विटा मातीचे ढीग पडले होते त्याच्या आडून आता रशियन सैनिक प्रतिकार करू लागले. असा प्रत्येक ढीग जर्मन सैनिकांना जिंकावा लागत होता. ही युद्धभूमी संख्येने जास्त असणार्‍या रशियन सेनेच्या फायद्याची ठरली. जर्मन सैन्य येण्याअगोदर या शहराची संरक्षण व्यवस्था बेताचीच होती. रस्त्यात जे अडथळे उभे केले होते ते छोट्या ट्रकच्या धक्क्याने सहज बाजूला होत होते. बासष्टाव्या आर्मीचा प्रमुख जनरल क्रिलॉव्ह व कोमिसार गुरॉव्ह यांनी ही व्यवस्था हास्यास्पद होती याची कबुली एका मुलाखतीत दिली. या व्यवस्थेचे वर्णन करताना जनरल चुइकॉव्हने म्हटले, ‘स्टॅलिनग्राडच्या संरक्षणात माझे अधिकारी काटेरी कुंपणांपेक्षा रक्तावर जास्त अवलंबून होते.’

हातबाँब फेकताना एक रशियन सैनिक...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या रस्त्यावर झालेल्या लढाईमुळे जनरल चुईकॉव्हने स्टॅलिनग्राडचे नाव ठेवले,

'‘स्टॅलिनग्राड अ‍ॅकॅडमी ऑफ स्ट्रीट फायटींग’.

या अ‍ॅकॅडमीत भरती होणार्‍या जर्मन व रशियन सैनिंकांमधे रशियन सैनिक अत्यंत उच्च श्रेणीने उत्तीर्ण झाले असे म्हणता येईल.

या क्रूर, कसलीही दयामाया न दाखवता लढल्या गेलेल्या हातघाईच्या लढाईला जर्मन सैनिक ‘रॅटनक्रीग‘ असे म्हणत. याचे मराठीत स्वैर भाषांतर करायचे झाल्यास त्याला ‘अन्नासाठी झगडणार्‍या घुशी एकमेकात मारामार्‍या करतात, त्याप्रकारचे युद्ध’ असे म्हणता येईल. युद्धवार्ताहर ग्रॉसमनने एका हकिकतीत सांगितले, ‘एका इमारतीत वरच्या मजल्यावर रशियन सैनिक होते व खालच्या मजल्यावर जर्मन सैनिक. दोन्ही तुकड्यांना याची कल्पना नव्हती. युद्धाला कंटाळलेल्या जर्मन सैनिकांनी तेथे पडलेल्या ग्रामोफोनला किल्ली दिल्यावर वरच्या मजल्यावरील रशियन सैनिकांना जर्मन सैनिक तेथे आहेत हे कळले. त्यांनी शांतपणे त्या जमिनीला भोक पाडले व त्यातून खाली फ्लेम थ्रोअरचा मारा केला. थोडक्यात ही लढाई अशी, इतक्या जवळून चालली होती. इतक्या जवळून की मेजर जनरल झोल्युडेव्ह च्या ३७-गार्डस् इन्फंट्री डिव्हिजनच्या सैनिकांनी त्यांची इतर हत्यारे बाजूला ठेवून सुरे हातात घेतले.

स्टालिनग्राड...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

व्होल्गाच्या उजव्या किनार्‍यावर असलेल्या जर्मन सैन्याकडे भारी शस्त्रास्त्रे असल्यामुळे सुरुवातीला त्यांची सरशी होत होती पण जेव्हा रशियन सैन्याच्या हातात लांब रणगाडाविरोधी तोफा आल्या तेव्हा हे जर्मन सैन्यही थबकले. या तोफांनी रशियन सैनिक पँझर रणगाड्यांच्या बाजूंवर मारा करत व त्यांना निकामी करत. जर्मन रणगाड्यावर हा तोफेचा गोळा जाऊन आदळला की काय होत असे याचे वर्णन एका ३८ वर्षाच्या, ग्रोमॉव्ह नावाच्या सैनिकाने वार्ताहर ग्रॉसमनसमोर केले ‘रणगाड्यावर गोळा आदळला की तेथे प्रकाशाचा भडका उडायचा. त्याच्या आवाजाने आम्ही बहिरे व्हायचो. मी तेथेच जागा पकडली होती. तेवढ्यात मला ‘ते येत आहेत, येत आहेत’ अशा आरोळ्या ऐकू आल्या. मी डागलेला दुसरा गोळा त्या रणगाड्यावर जाऊन आदळला. त्यातील जर्मन सैनिक जिवाच्या आकांताने किंचाळत होते. आम्हाला ते स्पष्ट ऐकू येत होते. मला कशाचीच भीती वाटत नव्हती. माझ्या अंगात युद्धज्वर संचारला होता.....’

रशियन सैनिकांना व्होल्गाच्या डाव्या किनार्‍यावर रेल्वेने रसद आली की ती बोटीत घालून या किनार्‍यावर आणायला लागायची. व्होल्गा पार करताना या बोटींचे लुफ्तवाफने आतोनात नुकसान केले. ग्रॉसमनने लिहिले आहे की या काही मिनिटातच या बोटींची चाळण झालेली असायची. जेव्हा या बोटी दुसर्‍या किनार्‍यावर पोहोचायच्या तेव्हा त्यात रक्ताचा सडा पडलेला असायचा. या वार्ताहराने स्वत: या बोटीतून ही नदी एकदा अनुभवासाठी पार केली. बोटीत अनेक लाकडांच्या खालीे लपून हा प्रवास करायला लागायचा.

जर्मन स्टुकांपासून वाचण्यासाठी ही नदी मध्यरात्रीच पार करावी लागत असे. कित्येक नौका दिवसभर काठावरच्या वाळूत पुरून ठेवत व रात्री बाहेर काढत. NKVD चे पोलीस या बोटी सुटायच्या जागांवर देखरेख करत व पळून जाणार्‍यांना गोळ्या घालत. सामान्य नागरिकांना नदी पार करायला परवानगी नाकारली जायची. स्टॅलिनचा असा विश्‍वास होता की जर सामान्य नागरिक शहरात राहिले तर त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून का होईना सैनिक अधिक त्वेषाने लढतील. पण जेव्हा लुफ्तवाफच्या हवाई हल्ल्यात नागरिक जास्त संख्येने ठार व्हायला लागले तेव्हा मात्र तीन लाख नागरिकांना हलविण्यात आले. पन्नास हजार शहरातच राहिले. दुर्दैवाने यातील फक्त दहा हजारच युद्धानंतर जिवंत राहिले. नशिबाने ९०४ मुले जिवंत राहिली पण यातील फक्त नऊ मुलांचे आई वडील सापडले.

२८ ऑगस्टला स्टॅलिनग्राड विभागाच्या संरक्षणाची जबाबदारी जनरल जॉर्जी झुकॉव्हवर टाकण्यात आली. त्याचे जे चरित्र नंतर लिहिण्यात आले त्याचे नाव आहे,‘द मॅन हू बीट हिटलर-ज्याने हिटलरचा पराभव केला’ या पुस्तकाचे नाव किती सार्थ आहे हे आपण बघणारच आहोत. झुकॉव्हचा जन्म एका साधारण शेतकरी कुटुंबात झाला होता. १९१४ साली त्याने रशियन लष्करात नोकरी पत्करली व त्यानंतर तो ऑक्टोबर १९१८ मधे लाल सैन्यात भरती झाला. पहिल्यांदा त्याने कॅव्हलरीमधे काम केले व नंतर आर्मर्ड रेजिमेंटमधे. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. पुढे त्याची नेमणूक उच्चस्तरीय समादेशात झाली (हाय कमांड). ऑगस्ट १९३९ मधे साली झालेल्या खालकिन गॉलच्या लढाईत जनरल झुकॉव्हने अर्धमेले झालेले रशियन सैन्य, जपानच्या उत्कृष्ट, आधुनिक सैन्याचा पराभव करू शकते हे सिद्ध करून दाखविले. मंगोलियात जबाबदारी स्वीकारल्यामुळे त्याने फिनलँडच्या युद्धात भाग घेतला नाही हे खरे आहे पण जून १९४१ मधे त्याने लेनिनग्राडच्या संरक्षणात जनरल व्होरोशिलॉव्हबरोबर चांगली कामगिरी बजावली. स्टॅलिनने त्याला जून १९४१ मधे परत मॉस्कोला बोलावले व १९४१च्या रशियाच्या प्रतिआक्रमणात समन्वय राखण्याची जबाबदारी दिली. हा एवढा अनुभव गाठीशी असल्यावर स्टॅलिनग्राडच्या संरक्षणाची जबाबदारीही त्याच्यावर न पडती तर नवलच. जरी झुकॉव्हने युद्धाचा सगळा काळ रशियन हाय कमांड-स्टाव्हकामधे घालवला असला तरी त्याच्या वाहनचालकाच्या म्हणण्यानुसार त्याने वेगवेगळ्या आघाड्यांना भेट देताना जवळजवळ पन्नास हजार मैल प्रवास केला होता आणि त्याला तीन विमाने बदलायला लागली होती. (ठराविक मैल प्रवास झाल्यावर विमान भंगारात काढतात).

मार्शल झुकॉव्ह...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जनरल झुकॉव्ह हा एक निर्दय, शूर, त्वरित पण ठाम निर्णय घेणारा, प्रसंगी सैनिकांवर हात उगारणारा आणि त्याच्या पळपुट्या सैनिकांच्या फाशीला हजर राहणारा असा सेनाधिकारी होता. त्याचे नियोजनातील कौशल्य वादातीत होते व त्याला नेहमीच अंतिम विजयाची खात्री असे. मनुष्यहानीने त्याच्यावर कसलाही परिणाम होत नसे. स्टॅलिनच्या कर्तव्यकठोरतेची जशी रशियाला जरुरी होती तशीच गरज हे अस्तित्वासाठी चाललेले युद्ध जिंकण्यासाठी जनरल झुकॉव्हसारख्या सेनापतीची होती.

इकडे जर्मन सैन्यात जनरल फ्रान्झ हाल्डरने आपल्या रोजनिशीत ३० ऑगस्टला हिटलरच्या विचित्र स्वभावावर नोंद केली. कारण होते तो आता स्वत:च्या ताकदीचा विचार न करता शत्रूच्या ताकदीचा विचार करून त्याच्या योजना तयार करायला लागला होता. ‘आजच्या बैठकीत फ्युररने परत लष्करी सेनाधिकार्‍यांवर तोंडसुख घेतले. बौद्धिक घमेंड आणि त्याच वेळी युद्धभूमीला जुळवून घेण्याची अनिच्छा व या युद्धाची मूलभूत तत्त्वे समजून घेण्यात आलेले अपयशी सेनानी असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले. दुसर्‍याच दिवशी हिटलरने जाहीर केले की हे सगळे आपण कणखर नसल्यामुळे झाले आहे. तुमच्या लक्षात येत नाही की शत्रूला त्यांच्या लष्करी ताकदीचा र्‍हास परवडणारा नाही त्यामुळे त्यांच्या हालचालीत जोपर्यंत त्यांचे नुकसान होत आहे, त्यांच्या ताकदीचा र्‍हास होत आहे, तोपर्यंत त्याला त्या हालचाली करू देत. कोणीतरी शेवटी कोलमडून पडणार आहे पण ते आपण असणार नाही याची मला खात्री आहे. लेनिनग्राड आपल्या हातात आले की आपल्या सात आठ डिव्हिजन मोकळ्या होतील.’ त्यानंतर त्याने पहिल्या महायुद्धाच्या परिस्थितीची माहिती दिली. पुढे त्याने हेही सांगितले की खंदकातील युद्ध टाळायचे आहे कारण रशिया फक्त याच प्रकारचे युद्ध जर्मनीविरुद्ध जिंकू शकतो. दुर्दैवाने हिटलर जे सांगत होता त्याच्या बरोबर विरुद्ध प्रकारे युद्ध चालवत होता. स्टॅलिनग्राड सारख्या शहरात जर्मन सैन्य अडकून पडले होते आणि फक्त त्याला खंदकातील युद्ध म्हणता येत नव्हते पण ते ‘ब्लिट्झक्रीगही’ नव्हते.

ते होते दगडमातीच्या ढिगार्‍यांतील युद्ध जे खंदकातील युद्धापेक्षाही भयंकर होते.

स्वत:च्या नावाचे शहर जर जर्मन सैन्याच्या ताब्यात गेले तर सामान्य जनतेत हाहा:कार उडेल हे ओळखून स्टॅलिनने हे शहर कोणत्याही परिस्थितीत आपल्याच ताब्यात राहिले पाहिजे असा आदेश स्टाव्हकाला दिला. जर्मन सेनेच्या सहाव्या आर्मीने दुसर्‍याच दिवशी पहाटे हल्ला चढवला व त्यांच्याच २९५-इन्फंट्री डिव्हिजनने सरळ मामायेव्ह कुरगनवर हल्ला चढवला. आज या टेकाडावर जर्मनीच्या व रशियाच्या ३५००० सैनिकांची थडगी उभी आहेत त्यावरून हे युद्ध कसे लढले गेले असेल याची कल्पना येऊ शकते. १३ तारखेच्या संध्याकाळी जर्मन सेनेच्या ७१-इन्फंट्री डिव्हिजनने रशियन सैन्याचा बचाव भेदून शहराच्या मध्यभागी मुसंडी मारली. १४ तारखेला मुख्य रेल्वे स्टेशन पाच वेळा यांच्या ताब्यातून त्यांच्या ताब्यात गेले. पुढच्या तीन दिवसात या मुख्य स्टेशनचा ताबा तेरा वेळा बदलणार होता.

मामायेव्ह कुरगनचे भव्य स्मारक.....

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
आपले दुर्दैव की भारतात असे एकही भव्य स्मारक सैनिकांसाठी उभे केलेले नाही... भव्य मंदीरे आहेत पण सैनिकांची स्मारके नाहीत. जी छोटी छोटी आहेत त्यांची अवस्था पाहिल्यास ती उभी केली नसती तर चालले असते असे वाटल्या शिवाय रहात नाही.

इतर अनेक युद्धांप्रमाणेच स्टॅलिनग्राडच्या या लढाईबद्दल अनेक कहाण्या प्रसृत झाल्या. त्यातील अनेक अतिरंजित, सैनिकांनी बढाया मारलेल्या होत्या व त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. शिवाय याला प्रसिद्धी मिळवून देण्यात रशियाच्या प्रचार यंत्रणेचा बराच सहभाग होता. याच्या उलट कितीतरी शौर्याच्या कथा अप्रकाशित राहिल्या कारण त्यात भाग घेणारे या जगात नाहीत किंवा त्यांना तसा वावही मिळाला नाही. स्टॅलिनग्राडसारखी अनेक युद्धे लढली गेली व त्यातही बरेच पराक्रम घडलेच की !

युद्धाच्या काळात जसे घडते तसे याही वेळी सेनाधिकार्‍यांचे वैयक्तिक हेवेदावे प्रकाशात आले. सगळ्यात उठून दिसत असे तो म्हणजे त्यांना एकमेकांच्या प्रसिद्धीचा वाटणारा मत्सर. या सेनाधिकार्‍यांचे राजकारणातही पाठीराखे असत आणि मग कुठली हकिकत उजेडात आणायची व कुठली दडपायची हे यांच्या हातात असे. शेवटी शीतयुद्धाच्या काळात तर काय छापून आणायचे हे राजकारणीच ठरवत. शिवाय लढाई जिंकल्यावरच प्रसिद्धी द्यायची अशी एक चुकीची पद्धतच पडून गेली आहे. अशीच एक हकिकत दडपली गेली. १४ सप्टेंबरला संध्याकाळी तेराव्या गार्डस् रायफल डिव्हिजनने व्होल्गा पार करून जर्मन सैन्यावर त्वेषाने हल्ला चढवला. या डिव्हिजनचा प्रमुख होता स्पॅनिश सिव्हिल वॉरमधे चमकलेला अलेक्झांडर रॉडिमत्सेव. या डिव्हिजनमधे १०००० सैनिक होते आणि या लढाईत त्यांच्यातील फक्त ३२० सैनिक जिवंत राहिले. वार्ताहर ग्रॉसमनने व्होल्गा पार करण्यात काय काय धोके होते हे सांगितले आहे......त्यातील एक परिच्छेद...
‘तो पाण्यात चाललाय ! कोणीतरी ओरडले. आमच्या बोटीजवळ पाणी उसळून त्याचा एक स्तंंभ तयार झाला. त्याच क्षणी अवतीभोवती पाणी उसळले आणि व्होेल्गावर उसळणार्‍या पांढर्‍या फेसामुळे ती जखमांनी भरून गेल्याचा भास होऊ लागला. आता आसपास बाँब फुटत होते आणि त्यातील छर्रे बोटीच्या बाजूत घुसत होते. जखमी माणसांच्या तोंडातून अस्फुट किंकाळ्या उमटत होत्या. तोपर्यंत पाण्यावर बंदुकीच्या गोळ्यांचा पाऊस पडायला चालू व्हायचा.

स्टॅलिनग्राडच्या युद्धात सर्वात जास्त प्रसिद्ध कोण झाले असेल तर स्नायपर्स. अ‍ॅनातोली चेकॉव्ह व व्हॅसिली झेत्सेव सारखी स्नायपर्सची नावे ज्याच्या त्याच्या तोंडात खेळू लागली. (‘आपण एनिमी अ‍ॅट द गेटस्’ हा सिनेमा पाहिला असेल.) पडलेल्या असंख्य इमारतीत लपून दोन्ही बाजूच्या स्नायपर्सला हलणारी कुठलीही वस्तू उडवणे सहज शक्य होते. स्नायपर्समधील चकमकींच्या आख्यायिका याच काळात तयार झाल्या. एखाद्या स्नायपरला त्याच्या जागेवरून हुसकावून लावणे फार कठीण काम होते. तेराव्या गार्डस् रायफल डिव्हिजनचा चेकॉव्ह म्हणाला ‘ मी आठ दिवसात चाळीस जर्मन मारले’ त्याच्या चाहत्यांनी ही संख्या १४९ पर्यंत वाढवली. दुसरा एक स्नायपर झिकान याने २२४ जर्मन सैनिक मारले असेही सांगितले जाऊ लागले. जर्मन सैनिक खाऊचे आमिष दाखवून, व्होल्गातील पाणी आणण्यासाठी लहान मुलांना पाठवू लागले तेव्हा या स्नायपर्सनी या लहान देशद्रोह्यांनाही टिपले. या रशियन स्नायपर्सचे आकडे खरे होते का हे आता तपासणे शक्य नाही पण त्यांच्या या पराक्रमांच्या कथांनी निराश झालेल्या रशियन जनतेला थोडा दिलासा मिळत असे हे मात्र खरे. स्त्री स्नायपर्सही यात मागे नव्हत्या. २८४-सायबेरियन डिव्हिजनच्या तान्या चेर्नोव्हाने तीन महिन्यात ८० जर्मन ठार मारल्याचा दावा केला.

व्हॅसिली झेत्सेव्ह...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्टॅलिनग्राडच्या लढाईत रशियाच्या NKVD ने स्वत:च्याच तेरा हजार पाचशे सैनिकांना गोळ्या घातल्या म्हणजे जवळ जवळ एक डिव्हिजन त्यांनी ठार केली. याची कारणे दिली गेली होती - देशद्रोह, पळपुटेपणा, कामाची जागा सोडून जाणे, दारू पिणे व सरकारच्या विरोधात भाष्य करणे. या सैनिकांना ठार मारायच्या अगोदर त्यांचे गणवेष उतरविले जात कारण ते परत वाटण्यात येणार होते आणि त्यांच्या मते गोळ्यांनी भोके पडलेले गणवेष सैनिकांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम करण्याची शक्यता होती. स्टॅलिनचा जो २२७ क्रमांकाचा ‘एकही पाऊल मागे नाही’ अर्थाचा आदेश होता त्यात त्याने प्रत्येक कमांडला एक हजार सैनिकापर्यंत रणांगणावर कच खाण्यासाठी कारवाई करायला परवानगी दिली होती. ज्या प्रकारचे युद्ध स्टॅलिनग्राडमधे चालले होते त्यात हे आवश्यकच होते कारण नाहीतर सैनिकांनी बंड पुकारले असते आणि असंख्य सैनिक लष्करातून पळून आपल्या गावी गेले असते. या फायरींग स्क्वाडला सामोरे जाण्याच्या शिक्षेतून सूट मिळवायची असेल तर एकच मार्ग होता तो म्हणजे मरेपर्यंत लढणे.

शहीद झालेल्या सैनिकांचे रात्रीच्या अंधारात दफन केले जायचे व त्या वेळी मानवंदना देताना गोळ्या आकाशात झाडण्याऐवजी जर्मन फौजांच्या दिशेने झाडल्या जायच्या. जनरल चुईकॉव्हने जर्मन फौजांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचे धोरण जाहीर केले होते. यामुळे दोन गोष्टींचा फायदा व्हायचा. एक तर जर्मन विमाने स्वत:चे सैनिक ठार होण्याच्या भीतीने अंदाधुंध बाँबवर्षाव करत नसत व दुसरा म्हणजे याचा जर्मन सैनिकाच्या मनोधैर्यावर विपरित परिणाम होई. रशियायमधे त्या काळात उपरोधिक विनोदांची बरीच चलती होती..उदा. हल्ला करायला निघताना रशियन सैनिक सहजपणे म्हणत, ‘चला उघडली एकदाची दुसरी आघाडी’ एवढ्या जवळ समोरासमोर सैन्य उभे ठाकल्यावर ते एकामेकांना हाकाही मारू शकत. त्याकाळी रशियन सैन्यातील उझबेगी सैनिकांबद्दल कोणी खात्री देत नसे. त्याचा संदर्भ देत एका जर्मन सैनिकाने एका रशियन सैनिकाला हाक मारली ‘रुस, तुला उझबेकच्या ऐवजी रुमानी पाहिजे का ?’ जर्मन सैन्यात रुमानियाचा सैनिकही त्यावेळी बेभरवशाचा समजला जात असे. हातबाँब तर बर्‍याच वेळा स्फोट होण्याआधी अगोदर चेंडूसारखे इकडून तिकडे उडवले जात.

व्होल्गा नदीपासून पाण्याने पडलेल्या अनेक घळी स्टॅलिनग्राड शहरात येतात. या घळींना या युद्धात फार महत्त्व प्राप्त झाले होते कारण या घळी सैनिकांना खंदक म्हणून उपयोगी पडत. साहजिकच या घळींवर ताबा मिळवण्यासाठी भयंकर चकमकी उडत होत्या. या घळी ज्याच्या ताब्यात त्याला अजून एक फायदा होई तो म्हणजे शत्रूच्या बगलेत त्यांना मारा करता येई. ग्रॉसमनने लिहिले, या घळीत कमांड पोस्ट असत, चौक्या असत, यातून दूरध्वनीच्या तारा जात, यातून दारुगोळ्याची वाहतूक होई. या घळींवर चोवीस तास बाँबवर्षावही होत असे. या घळीमधे असंख्य सैनिक ठार झाले असतील.जनरल चुईकॉव्हने त्याच्या ‘द बिगिनींग ऑफ द रोड’ या पुस्तकात २७ सप्टेंबरच्या जर्मन हल्ल्याचे वर्णन केले आहे. तो म्हणतो,‘आमची संदेश यंत्रणा कोलमडून पडली होती, दाट धुरामुळे समोरचे काही दिसत नव्हते. स्टाफ ऑफिसर आणि सिग्नल ऑफिसर ठार झाले होते. माझ्या मुख्यालयावर सतत बाँबवर्षाव होत होता आणि प्रत्येक हल्ल्यानंतर आम्ही म्हणायचो ‘बस्स अजून असा एक जरी हल्ला झाला तर आपल्याला व्होल्गातच बुडावे लागेल’. असे अनेक हल्ले झाले आणि चुईकॉव्हच्या मुख्यालयाला आपले कार्यालय एकदा हलवायलाही लागले पण एकंदरीत रशियन फौजांनी जर्मन सेनेच्या नाकावर टिच्चून उजव्या किनार्‍यावर काही भागांवरचा ताबा ही लढाई संपेेपर्यंत सोडला नव्हता.

काही काळातच जनरल हाल्डरला आपल्या पदावरुन जावे लागले त्यामागे या रशियन सैन्याला मागे ढकलण्यात आलेले अपयश हेही एक कारण आहे.२४ सप्टेंबरला पदच्युत झाल्यावर त्याने आपल्या रोेजनिशीत नोंद केली, ‘आज परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत मला फ्युररने निरोप दिला. माझा धीर सुटत चालला आहे तसाच हिटलरचाही. आता निरोप घ्यायचीच वेळ आली आहे. हिटलरने त्याच्या भाषणात जनरल स्टाफच्या अधिकार्‍यांसाठी नाझी तत्त्वांचे प्रशिक्षण राबवायची आवश्यकता प्रतिपादन केली. त्याने लष्करावर स्वत:ची सत्ता प्रस्थापित करायचा निर्णय घेतलेला आहे हे निश्‍चित.’ हिटलरने हाल्डरच्या जागी नुकतीच बढती मिळालेल्या ब्रिगेडियर जनरल कूर्ट झाईट्झलरची नेमणूक केली. हा माणूस त्याच्या हाताखालच्या अधिकार्‍यांना निर्दयतेने वागविण्यासाठी प्रसिद्ध होता व हिटलरची चमचेगिरी करण्यात हा सगळ्यात पुढे असे. हिटलरचा गुलाम असल्यासारखी त्याची वागणूक असे.

जेव्हा नंतर न्युरेंबर्गच्या खटल्यात हाल्डरला हिटलर संबंधीमाहिती विचारण्यात आली तेव्हा तो म्हणाला,
‘आमची त्या काळात रोज भांडणे होत होती. आमचा शेवटचा खटका उडाला तो कॉकेशस आणि स्टॅलिनग्राडवर आक्रमण करण्याचा निर्णय घेते वेळी. तो निर्णय म्हणजे एक घोडचूक होती पण हिटलरने त्याबाबतीत झापडे लावली होती. मी त्याला सांगितले की १९४२ मधे रशिया या युद्धात अजून दहा लाख सैनिक उतरवेल व १९४३ मधे अजून दहा लाख उतरवेल. हे ऐकून हिटलरने मला मूर्खात काढले व रशिया संपलेले आहे असे ठासून सांगितले. मी जेव्हा त्याला रशियाच्या आयुधे निर्माण करायच्या क्षमतेबद्दल (विशेषत: रणगाड्याच्या चिलखताबद्दल) सांगितले तेव्हा त्याला रागाचा झटका आला आणि त्याने माझ्याकडे बघून मुठी आवळल्या. हिटलर या आघाडीवर युद्धव्युहरचनाकारांच्या सल्ल्याविरुद्ध अनेक आदेश काढायचा. तो आदेश त्याच्या विरुद्ध गेल्यावर तो त्या अपयशासाठी सेनाधिकार्‍यांना जबाबदार धरायचा आणि ते हे मुद्दाम करत आहेत हा आरोप करायचा. असा आरोप झाल्यावर मात्र माझाही राग अनावर झाला आणि मीही टेबलावर माझी मूठ आपटली......मला राग आला कारण माझ्या वीस वर्षाच्या नोकरीत मी सगळ्यात जास्त काळ जनरल स्टाफ कार्यालयात अनेक थोर सेनाधिकार्‍यांबरोबर काम केले होते आणि माझे सगळ्यांशीच पटत आले होते.’

हिटलरला त्याच्या अनुभवी सेनाधिकार्‍यांच्या शिष्ठपणाचा संताप यायचा. तो त्यांच्या निष्ठेवर संशय घेई आणि त्यांनी दिलेल्या सावधगिरीच्या इशार्‍यांचा तिरस्कार करे. युद्धाचा आढावा घेण्याची नाझी पद्धत फारच विचित्र होती. रशियन स्टाव्हकामधे यासाठी तज्ञांची कायमस्वरूपी नेमणूक केली गेली होती. हे नीट अभ्यास करून सद्यपरिस्थितीचा अहवाल व पुढील योजनांचा तपशील ठरवायचे. लंडनमधे चीफ ऑफ स्टाफचे कार्यालय हे काम करायचे तर वॉशिंग्टनमधे जॉईन्ट चीफचे कार्यालय. नाझी जर्मनीमधे या कामासाठी दुपारी फक्त एक बैठक व्हायची त्याला ते लॅगव्होरट्रॅग म्हणायचे. यात जनरल जोडल वॉर्लिमाँटने तयार केलेले रोजचे अहवाल वाचायचा. हिटलर जनरल जोडल आणि जनरल कायटेला यांच्या मार्फत काम करायचा कारण त्याचा त्यांच्यावरच विश्वास होता व ते त्याच्यापुढे काहीही बोलत नसत. या दोघांच्या भ्याडपणामुळे OKH चे बाकीचे जनरल या दोघांचा मनस्वी तिरस्कार करू लागले होतेे. सगळ्यात मोठा विनोद म्हणजे जो प्रत्यक्ष लढाईत होता त्या कमांडर-इन-चीफ जनरल ब्राउस्टिश बरोबर कुठल्याही आदेशाची चर्चा होत नसे. त्याला फक्त दिलेला आदेश पाळायचे एवढेच काम होते. जर्मन सेनेतील बुद्धिमान सेनाधिकार्‍यांच्या अनुभवाचा व बुद्धीचा योग्य वापर ही व्यवस्था हेतुपुरस्सर टाळत होती व त्याला जबाबदार होता हिटलर.

३० सप्टेंबरला आकाशवाणीवर जर्मन जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात हिटलरने खात्री दिली की लवकरच स्टॅलिनग्राड पडेल. त्याच दिवशी रात्र पडल्यावर ३९-गार्डस् इन्फंट्री डिव्हिजनच्या मे. जनरल स्टिपन गुनिएव्हने रेड ऑक्टोबर फॅक्टरीच्या संरक्षणासाठी व्होल्गा पार केली. त्याने त्याच्या कार्यालयात पाऊल टाकले तेव्हाही जर्मन सैनिक त्याच्या दरवाजावर गोळ्यांचा वर्षाव करत होते. दुसर्‍या दिवशी म्हणजे १ ऑक्टोबरला चुईकॉव्हच्या मुख्यालयात धूर, ज्वाळा इतक्या प्रचंड प्रमाणात भडकल्या होत्या की त्यात श्वास घेणेही कठीण जात होते. चुईकॉव्हने आठवणीत सांगितले, ‘फुटणार्‍या बाँबचा आवाज इतका मोठ्याने येत होता की ओरडून बोलले तरी ऐकू येत नव्हते. हातात मायक्रोफोन असतानाच रेडिओ ऑपरेटचा मृत्यु झाला होता आणि तिकडून कोणीतरी मोठ्याने आमची जागा विचारत होते.त्याला उत्तर मिळाले, ‘जेथे तुला जास्त आग व धूर दिसतो आहे, आम्ही तेथे आहोत असे समज’ आणि ही परिस्थिती जर्मनीचा जनरल पौलस याचे आक्रमण सुरू व्हायच्या अगोदरची होती. पुढे अजून काय वाढून ठेवले आहे याची कोणालाच कल्पना नव्हती.

ते तीन कारखाने आणि त्यांच्या आसपासच्या कामगार वस्त्या म्हणजे एक कत्तलखानाच झाला होता. चुईकॉव्हच्या अंदाजानुसार कर्नल गुर्टिएव्हच्या ३०८-इन्फंट्री डिव्हिजनने या लढाईत जर्मन सैन्याचे जवळ जवळ शंभर हल्ले परतवले असतील. ट्रॅक्टर फॅक्टरीत चोवीस तास चाललेल्या लढाईत लढता लढता कर्नल मार्केलॉव्हच्या रशियन रेजिमेंटचे फक्त अकरा सैनिक जिवंत राहिले. पौलसच्या सैन्याचे १४ ऑक्टोबरचे आक्रमण होईपर्यंत या कारखान्यात रणागाडे व त्यांच्या तोफा दुरुस्तीचे काम तेथील तंत्रज्ञ करतच होते. हा कारखाना आकाराने प्रचंड होता व त्यातील अनेक विभागांनी युद्धभूमीचे रूप धारण केले. म्हणजे आज जुळणी विभाग जर्मनांकडे असे तर उद्या रशियन फौजांकडे आणि अशातही तेथे काम चालले होते. ५ ऑक्टोबरला दोन हजार विमानहल्ले झालेले रशियन सैनिकांनी मोजले तर तेथील सार्वजनिक स्नानगृहाची मालकी एका दिवसात पाच वेळा बदलली. या युद्धाच्या धावपळीत चुईकॉव्हला एक महिनाभार स्नान करता आले नव्हते. झालेल्या मनुष्यहानीने डगमगून न जाता तो म्हणाला, ‘ आमची माणसे मरत आहेत पण आम्हाला लढाईचा अनुभवही मिळत आहे. माणसे मरणे केव्हाही वाईटच पण युद्ध जर अटळ असेल तर त्यात हेहीे अटळच आहे’.

१४ ऑक्टोबरच्या सूर्याच्या पहिल्या किरणांनी जर्मनीच्या सहाव्या आर्मीचे आक्रमण सुरू होताना बघितले ज्याचा प्रमुख होता अर्थातच जनरल पौलस. रशियाच्या बासष्टाव्या आर्मीला व्होल्गाच्या उजव्या किनार्‍यावरून हुसकावून लावण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले होते. तीन इन्फंट्री डिव्हिजन्स, ३०० रणगाडे, फक्त त्या तीन कारखान्यांच्या भागात पाठविण्यात आले. चुईकॉव्हने सर्व बायका मुले व ३५०० जखमी सैनिकांना व्होल्गापार पाठवायचे ठरवले. १५ ऑक्टोबरच्या रात्री या जखमी सैनिकांना स्ट्रेचर व वैद्यकीय सहाय्यक नसल्यामुळे जमिनीवरून सरपटत व्होल्गाचा किनारा गाठावा लागला. व्होल्गा नदी किनारी (क्रॉसींग ६२) एक इमारत अजून या लढाईचे स्मारक म्हणून जतन करून ठेवली आहे ज्या इमारतीच्या प्रत्येक विटेवर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आजही बघायला मिळतात. बारिकाडच्या वस्तीच्या संरक्षणाची लढाई ४१ दिवस लढली गेली. यात रशियाची १३८-रेड बॅनर रायफल डिव्हिजन मागे रेटली जाऊन वर उल्लेख केलेल्या इमारतीजवळ तीनही बाजूने वेढली गेली. त्यात भाग घेतलेल्या सैनिकांच्या शौर्यासाठी या लढाईचेही नाव अजून घेतले जाते.

चुईकॉव्हने त्याच्या पुस्तकात कबुली दिली आहे, ‘या लढाईत स्त्रियाही शौर्यात कुठे कमी पडल्या नाहीत’.या भयंकर युद्धात स्त्रिया आघाडीवर अगदी पुढे रशियन सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होत्या. काहींनी तर प्रत्यक्ष युद्धात भागही घेतला. स्त्रियांनी निभावलेल्या कामांची यादी बघितल्यास वरील विधानाची सत्यता पटावी. स्त्री डॉक्टर आघाडीवर शस्त्रक्रिया करत होत्या, पंधरा वर्षाच्या तरुण मुली स्ट्रेचर उचलायचे काम करत होत्या तर काही जखमी सैनिकांची जड शस्त्रे वाहून नेत होत्या. आघाडीवरचे दूरध्वनी चालविण्यात यांचा सहभाग मोठा होता. एक बाई तर दिवसातून दोनदा विटांच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली होती, पण बाहेर येऊन तिने परत काम चालू केले होते. व्होल्गात चालणार्‍या बोटी या स्त्रिया चालवत असत तर काही विमानविरोधी तोफाही. काही स्त्रिया विमानेही उडवत ज्यांना जर्मन पायलट ‘उडणार्‍या हडळी’ म्हणून संबोधत. या सगळ्या स्त्रिया रक्तदानात आघाडीवर होत्या. स्टॅलिनग्राड एक मोठा कत्तलखानाच झाला होता पण यात स्त्रीपुरुषांना नोकरीची समान संधी होती. दुसर्‍या महायुद्धात जवळजवळ पाच लाख रशियन स्त्रिया प्रत्यक्ष आघाडीवर काम करत होत्या तर तीन लाख इतर कामे करत होत्या. हे असले काही वेअरमाख्टमधे घडणे अशक्य होते. आघाडीेवरच्या डॉक्टरांपैकी चाळीस टक्के स्त्रिया होत्या, सेंट्रल वुमेन्स स्कूल ऑफ स्नायपरमधून प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेल्या स्नायपर स्त्रियांनी जवळजवळ बारा हजार जर्मन सैनिक ठार मारले. २२१-अ‍ॅव्हिएशन कोअरच्या तीन रेजिमेंट स्त्रियांच्या होत्या व ३३ स्त्री सैनिकांना ‘हिरो ऑफ सोव्हिएट युनियन’ हा सन्मान मिळाला होता.

शौर्याचे एक उदाहरण म्हणून मरीन मिखाईल पॅनिकॅको याचे नेहमी नाव घेतले जाते. याच्या पराक्रमाचे चित्रण स्टॅलिनग्राडमधील युद्धसंग्रहालयात १६० फूट लांब अशा भव्य तैलचित्रात केलेले आढळते. या सैनिकाच्या पराक्रमाचे वर्णन खुद्द जनरल चुईकॉव्हनेच केलेले आहे, ‘मिखाईल एका रणगाड्यावर मोलोटोव्ह फेकण्याच्या तयारीत असताना त्या बाटलीलाच एक गोळी चाटून गेली. ती बाटली फुटल्यावर त्यातील इंधन त्याच्या अंगावर पसरले व त्याने पेट घेतला. त्याही अवस्थेत मिखाईलने दुसरा मोलोटोव्ह हातात घेऊन त्या रणगाड्याकडे धाव घेतली व त्याच्या इंधनाच्या टाकीवर तो फोडला. तेथे मोठा स्फोट झाला व एकाच क्षणात तो रणगाडा व मिखाईल त्या आगीत भस्म झाले.’

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

शीतयुद्धाच्या काळात रशियाच्या प्रचार माध्यमांचा प्रभाव व थोडीफर अतिशयोक्ती लक्षात घेतली तरी तोंडात बोटे घालायला लावणारे शौर्य दोन्ही बाजूच्या सैनिकांनी गाजवल्याची नोंद इतिहासात केली गेली.

क्रमशः

जयंत कुलकर्णी.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

नया है वह's picture

19 Apr 2016 - 11:54 am | नया है वह

हाही भाग आवडला!

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Apr 2016 - 12:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

अक्षरशः थरारक!! रुस्का ___/\___

रघुपती.राज's picture

19 Apr 2016 - 12:13 pm | रघुपती.राज

छान लिहिले आहे

मुक्त विहारि's picture

19 Apr 2016 - 12:50 pm | मुक्त विहारि

आधीच्या भागाची लिंक देत आहे...

http://www.misalpav.com/node/35695

ह्या लढाईचे वर्णन झपाटून टाकते. पुभाप्र.

नरेश माने's picture

19 Apr 2016 - 1:18 pm | नरेश माने

मस्त चालू आहे लेखमाला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.......

अभ्या..'s picture

19 Apr 2016 - 2:33 pm | अभ्या..

बापरे.
भयानक.
जयंतराव, इतकी प्रभावी आणि प्रवाही लेखमाला लिहिताय आपण की कुठेही अडखळायला होत नाही. भरपूर संदर्भांचा योग्य वापर करुन केलेले अप्रतिम लेखन, उत्तम मराठीचा उपयोग.
आपल्या लेखमालेचा उपयोग करुन लगेच गुगुलवर सर्च करुन चित्रे पाहतो. परफेक्ट अंदाज येतोय महायुध्दाच्या व्याप्तीचा.

विजुभाऊ's picture

19 Apr 2016 - 3:56 pm | विजुभाऊ

जयंत भाऊ. लेखन अत्यंत चित्रदर्शी आहे.
पण वाचल्यावर एकच भावना मनात आली. माणसे मारायचा कारखाना होता हा.

दुसरं नसेल! असेल तर ते बहुतेक जयंतकाकांनीच लिहिलेलं असेल. नरमेध हाच शब्द मनात येतो.

पिंगू's picture

20 Apr 2016 - 11:48 am | पिंगू

+१

स्वीट टॉकर's picture

20 Apr 2016 - 2:14 pm | स्वीट टॉकर

जबरी लिहिलं आहेत. दुसर्या महायुद्धाचा इतिहास वाचला की असं पटतं की जर्मनीला नेस्तनाबूत करणारा खरा रशियाच!
रशियाला त्याची भयानक किंमत मोजायला लागली खरी, पण शेवटी विजय त्यांच्या एकट्याचाच झाला. महायुद्धानंतर ब्रिटनचं साम्राज्य मावळलं, अमेरिका जेवढी होती तेवढीच राहिली. रशियानी मात्र संपूर्ण पूर्व यूरोप गिळला.

मार्गी's picture

20 Apr 2016 - 4:30 pm | मार्गी

अतिशय जोरदार आणि जबरदस्त! धन्यवाद सर.

वीणा३'s picture

20 Apr 2016 - 9:01 pm | वीणा३

तुमचं नाव दिसलं कि लेख वाचायचं सोडतं नाही. मागे एकदा (मला मिपा वर एका लेखकाचे सगळे लेख कसे शोधायचे ते माहित नाही) मी लेखकावर sort करून तुमचं नाव येईपर्यंत "पुढे " वर click करत गेले होते.