स्टालिनग्राड भाग - ४ ..शेवटचा...

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 Apr 2016 - 9:35 am

स्टालिनग्राड भाग-१
स्टालिन्ग्राड भाग-२
स्टालिनग्राड भाग-३

स्टालिनग्राड भाग - ४.. शेवटचा

........हिटलरने हे विधान मानवतेला अनुसरुन केले का परिस्थितीला अनुसरुन केले हे समजायला मार्ग नाही. स्टॅलिनग्राडमधे असलेल्या मोठ्या हॉविट्झर तोफांबद्दल हिटलर म्हणाला, ‘त्या जर आपण गमावल्या तर तसल्या तोफा आपण तेथे परत पाठवू शकत नाही. त्या जर आपण तेथेच टाकल्या तर या युद्धाचा उद्देशच नष्ट झाला असे म्हणावे लागेल. स्टॅलिनग्राडमधून आत्ता माघार घेऊन आपण परत येथे येऊ हा विचारही करणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. मी येथे परत येऊ शकत नाही म्हणून आत्ता येथून जाऊही शकत नाही.’.......

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जनरल मानस्टाईनने असे ठरवले होते की हॉथचे रणगाडे स्टॅलिनग्राडपासून वीस मैलांवर पोहोचले की पौलसच्या सेनेनी वेढा फोडायचा प्रयत्न करायचा. पण १६ नोव्हेंबरला झुकॉव्हने हॉथच्या रणगाड्यांना मागे ढकलले आणि त्याचाही उपयोग झाला नाही. येथेही वेअरमाख्टच्या इटालियन सैन्यामुळे गंभीर प्रसंग ओढवला. रशियाच्या सेनेनी इटलीच्या आठव्या आर्मीचा फडशा पाडला व त्यांच्या फळीला साठ मैलांचे खिंडार पाडले. या जागेतून रशियाच्या फौजांनी मानस्टाईनच्या सेनेवर उजव्या बगलेत हल्ला चढवला. ही सेना जर रोस्टोव्हला पोहोचली असती तर जर्मनीची ‘आर्मी ग्रुप ए’ जी जनरल क्‍लिस्टच्या आधिपत्याखाली कॉकेशस मधे होती तिला धोका निर्माण झाला असता. हॉथच्या सैन्याला त्यामुळे सहाव्या आर्मीच्या मदतीला जाण्याचा विचार सोडून द्यावा लागला.

१९ डिसेंबरला मानस्टाईनने जनरल पौलसच्या सैन्याला नैऋत्य दिशेला हा वेढा तोडायचा प्रयत्न करायला सांगितले पण आता पौलसने स्टॅलिनग्राड सोडायचे नाही ही हिटलरची आज्ञा पाळायचे ठरवले. त्याच्या या आदेशाला जे उत्तर पौलसने दिले होती त्यावरून त्यावेळी जर्मन सैन्याची काय अवस्था होती हे कळते. त्याच्या उत्तराची सुरुवात या वाक्याने झाली होती, ‘ प्रिय जनरल, कागदाच्या तुटवड्यामुळे हे पत्र ज्या प्रकारच्या कागदावर व ते सुद्धा हाताने लिहिले आहे त्याकडे आपण दुर्लक्ष कराल अशी आशा आहे......’ या अशा परिस्थितीतही हे मानस्टाईनचे कमकुवत सैन्य स्टॅलिनग्राडपासून पस्तीस मैलांवर पोहोचले होते पण २३ डिसेंबरला हॉथचे रणगाडे मिश्कोव्हा नदीपाशी थांबविण्यात रशियन फौजांना यश आले आणि ऑपरेशन विंटर टेंपेस्टमधील दम निघून गेला. स्टॅलिनग्राडला युद्धाचे पारडे फिरले असे म्हणतात. ते जर खरे असेल तर तर मिश्कोव्हा नदीपाशी ते परत फिरवण्याच्या आशेला पूर्णविराम मिळाला असे म्हणायला हरकत नाही. २८ डिसेंबरला हॉथचे सैन्य वेढ्यात सापडू नये म्हणून मानस्टाईनने त्या सैन्यालाच माघार घ्यायचा आदेश दिला.

समजा जनरल मानस्टाईनला स्टॅलिनग्राड काबीज करण्यात यश मिळाले असते तर सहाव्या आर्मीचे हे नष्टचर्य टळले असते का ? याचे उत्तर ‘खात्री देता येत नाही’ हेच आहे. याचे कारण होते अत्यंत कमी रसद पुरवठा. आत्तापर्यंत सगळ्यात जास्त रसद मिळाली होती १८० टन. ती कमी होत होत आता (ख्रिसमस नंतर)दिवसाला फक्त ६० टनावर येऊन पोहोचली होती. विमानांनी टाकलेल्या डब्यातून जेव्हा फक्त मिरी व कंडोम सापडत तेव्हा जर्मन सैनिकांचे काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. मोरोव्हस्काया व तात्सिनस्काया येथील विमानतळे रशियाच्या हातात पडली तेव्हा जी काही थोडीफार रसद मिळायची तीही अनियमित झाली कारण ती आता अधिक दूरवरच्या विमानतळावरून पाठवायला लागत होते.

पहिला जर्मन सैनिक भुकेला बळी पडला २१ डिसेंबरला.

डिसेंबरच्या सुरुवातीला या वेढल्या गेलेल्या फौजेतील प्रत्येक सैनिकाला शिधेत दिवसाला दोनशे ग्रॅम पाव मिळत होता तो ख्रिसमसपर्यंत अजून कमी झाला. या वेढ्यातून जिवंत राहिलेल्या कर्नल डिंगलर ने सांगितले, ‘आम्हाला पाणीदार सूपही मिळायचे. गाडल्या गेलेल्या घोड्यांची मढी उकरून त्यांची हाडे या पाण्यात घालून ते उकळून आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न करायचो.’ इंधनाचा तुटवडा असल्यामुळे रणगाड्यांना सेनेच्या पिछाडीला ठेवणे भाग पडत होते. त्यामुळे जेव्हा रशियन फौजांचा हल्ला झाला तेव्हा जर्मन सैन्याच्या प्रतिकाराची धार बोथट झाली. पौलसच्या सहाव्या आर्मीचे आता तुकडे पडत होते आणि समजा जनरल हॉथच्या रणगाड्यांनी हा वेढा काही ठिकाणी भेदला असता तरीही पौलसची सेना सुरक्षित ठिकाणी पोहोचली असती का नाही ही शंकाच आहे.

वेढ्यातील जर्मन सैनिकांच्या संकटात यापुढे भरच पडत गेली. थंडीमुळे सैनिक कपडे धुवत नसल्यामुळे पिसवांचा प्रादुर्भाव झाला व वेगाने पसरला. गोठलेल्या घोड्यांची प्रेते इतस्तत: पडली होती. रात्री पहार्‍यावर असलेले सैनिक जर झोपले तर सकाळी मेलेले आढळत. ते झोपेतच गोठून मरत. आजूबाजूला बर्फच बर्फ होता पण ते वितळवून त्याचे पाणी करायला इंधन नव्हते त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही दुष्काळ पडला. गोठून कडक झालेल्या पावाकडे बघून सैनिक निराश होत कारण तो खाण्याच्या लायकीचा करण्यासाठी इंधन उपलब्ध नव्हते. या वेढ्यात सापडलेल्या सैन्याच्या परिस्थितीचे वर्णन करताना एक इतिहासकार म्हणतो, ‘सैनिक इतके अशक्त झाले होते की त्यांना नवीन खंदकही खणता येत नव्हते. त्यासाठी त्यांना बाहेर हुसकावले तर ते तसेच बर्फावर पडून रहात व अखेरीस मृत्युमुखी पडत. जखमी झाला तर नशीबवान असे समजण्यापर्यंत मजल गेली. वैद्यकीय सेवेमधे बधीर करणारी औषधे संपल्यावर फारच अघोरी उपाय करण्यात आला. जो भाग बधीर करायचा आहे त्याला मुद्दामहून हिमदंशाला उघड करण्यात येई. अर्थात याच्यावर नियंत्रण नसल्यामुळे पुढे काय होत असेल हे सांगण्याची गरज नाही.

पिटॉम्निक विमानतळावर सैनिकांना सुरक्षित जागी हलविण्याचे व जखमी जर्मन सैनिकांना जुंकर विमानातून हलवायचे प्रयत्न चालू होते. तेथे तर भयंकर दृश्य होते. जे सैनिक कुठल्याही कागदपत्राशिवाय विमानांकडे धाव घेत होते त्यांना गोळ्या घातल्या जात होत्या. दोन सैनिकांनी तर उडत्या विमानांच्या शेपटीला कवटाळून सुटायचा प्रयत्न केला पण अर्थातच ते शेवटी आकाशातून पडून ठार झाले. वेअरमाख्ट ज्या स्वयंशिस्तीसाठी प्रसिद्ध होती त्याची या विमानतळावर पार वाट लागली. या वेढ्यातून जिवंत सुटण्याच्या धडपडीत ट्युटॉनिक सभ्यतेची सगळी परंपरा विसरली गेली. एका विमानातून वीस सैनिकांना खाली उतरवण्याची वेळ आली तेव्हा काय झाले याची आठवण सांगताना ले. डिटर म्हणतो,
‘हा निर्णय समजल्यावर तेथे एकदम कोलाहल माजला. प्रत्येक जण तारस्वरात त्याचे जाणे किती महत्त्वाचे आहे हे सांगू लागला. एका सैनिकाने तो या विमानात आर्मी स्टाफच्या आदेशाने चढला आहे हे सांगितले तर डड च्या एका सैनिकाने त्याला महत्त्वाची कागदपत्रे पोहोचविण्यासाठी जाणे आवश्यक आहे सांगितले. बरेचजण त्यांच्या कुटुंबाच्या अडचणी सांगू लागले. कोणाची मुले बाँब हल्ल्यात जखमी झाली होती तर कोणाची घरे पडली होती...स्ट्रेचरवरचे जखमी सैनिक मात्र या गोंधळाकडे बघत चुपचाप शांत पडले होते पण त्यांचे घाबरलेले चेहरे बरेच काही सांगून जात होते.’

त्यांची भीती समजू शकते कारण बरेच जखमी जे सैनिक स्ट्रेचरवर विमानतळावरच्या तात्पुरत्या आसर्‍यात ठेवले होते ते तेथेच थंडीने गोठून मेलेले त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ख्रिसमसच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर फॅक्टरीतून जर्मन सैनिकांना माघार घ्यायला लागली. यात मोर्चे बांधलेल्या जर्मन सैन्याला हुसकावून लावण्यासाठी एक युक्ती वापरण्यात आली. ले. जनरल सोकोलॉव्हच्या सैनिकांनी १२२ मि.मि ची हॉविट्झर तोफ सुटी करून आत नेली व परत जोडली. या तोफेच्या काही अचूक मार्‍यानंतर त्या फॅक्टरीतील जर्मन तळ उध्वस्त झाला. या चकमकीच्या दुसर्‍या दिवशी जर्मन सैन्याचा जीवनावश्यक रसदीचा पुरवठा अजून कमी झाला. त्यांना आता फक्त ७० टनच रसद आली. एका जर्मन सैनिकाने, विल्हेम हॉफमनने त्यांचे काय हाल चालले होते याबद्दल लिहिले, ‘ सगळे घोडे मांसासाठी मारून संपविण्यात आले आहेत. मला आता एखादी मांजरही चालेल. त्याचेही मांस चवदार असते असे म्हणतात. सैनिकात आणि प्रेतांमधे आता फारसा फरक राहिलेला नाही. जे थोडेफार बरे आहेत त्यांच्या चेहर्‍यावर वेडसरपणा दिसू लागला आहे. ते आता रशियन तोफखाना चालू झाल्यावरही आसरा घेत नाहीत. त्यांच्याकडे साधी चालण्याचीही शक्ती उरलेली नाही, पळणे व लपणे तर दूरच राहिले... या युद्धाला शिव्या द्याव्यात तेवढ्या कमीच आहेत..’ याच काळात कर्नल डिंगलर आणि त्याच्या सहकार्‍यांनी वाइटात वाईट परिस्थितीत काय करावे लागेल याची चर्चा केली. ‘आम्ही आमच्या कैदेबद्दल बोललो, आत्महत्या करावी का याच्यावर चर्चा केली तसेच शेवटच्या गोळीपर्यंत लढायचे का याच्यावरही चर्चा केली. आम्हाला विचार करायला पूर्ण मुभा होती कारण आम्ही काय करावे हे सांगायला कोणीच नव्हते.....काय करायचे याचा निर्णय घ्यायचे त्यांनी आमच्यावर सोडले होते.’

८ जानेवारीला डॉन फ्रंटचा (डिव्हिजन) प्रमुख जनरल रोकोसोव्हस्कीने जर्मन सैन्यावर विमानातून शरणागती पत्करण्याबद्दल पत्रके टाकली. त्यात शरण येणार्‍या सैनिकांना मानाची वागणूक, वैद्यकीय सेवा, अन्न व युद्ध संपल्यावर जर्मनीला रवानगी अशी अनेक आश्‍वासने दिली होती. या सगळ्यासाठी त्यांनी फक्त एकच अट घातली होती ती म्हणजे जर्मन सैन्याने सर्व युद्धसामग्री, शस्त्रास्त्रे नष्ट न करता रशियन सेनेच्या स्वाधीन करावीत. त्या परिस्थितीत मोह पडावा अशाच या अटी होत्या पण त्या फेटाळण्यात आल्या. कर्नल डिंगलरने जनरल मेलेंनथिनला सांगितले ‘आमचा रशियन सेनाधिकार्‍यांवर विश्‍वास नव्हता म्हणून या अटी फेटाळण्यात आल्या. आर्मी ग्रुप ए’ अजूनही त्या वेढ्यातून सुटू शकेल अशी आम्हास आशा वाटत होती पण त्यांना प्रयत्नांसाठी थोडा वेळ द्यायला हवा होता.’ जनरल रोकोसोव्हस्कीने यानंतर मात्र १० जानेवारीला ऑपरेशन रिंग नावाचे आक्रमण सुरू केले ज्यात दक्षिण व पश्‍चिम आघाडीवर आक्रमण करण्यात आले. त्यावेळच्या जर्मन सैन्याची मन:स्थिती वर्णन करताना कर्नल सेलेने म्हटले, ‘आमच्या शवपेटीचे झाकण मिटायची आता वेळ आली आहे. जर्मन सैनिकांमधे आत्महत्यांचे पेव फुटले आहे. शेवटी जनरल पौलसला या प्रयत्नांवर बंदी घालावी लागली.’ मॅरिनोव्हकावर जेव्हा रशियन सेनेचा हल्ला झाला तेव्हा तेथे असणार्‍या जर्मन सैनिकांची बोटे हिमदंशाने इतकी सुजली होती की ती बंदुकीच्या चापावर असलेल्या कडीतून आत शिरत नव्हती. बर्फ आता इतका टणक झाला होता की त्याच्या वर आपटून तोफेचे गोळे हवेतच फुटत होते व त्यात सैनिकांची जास्त हानी होत होती. पण मॅरिनोव्हका पडल्यावर जर्मन सैनिकांचे अजून हाल झाले कारण त्यांना आता उघड्यावर येणे भाग पडले. कर्नल डिगलरने त्याच्या आठवणीत लिहिले आहे, ‘तेथे लपायला खंदक नव्हते, ना रायफल टेकवायला जागा. दमलेले, थकलेले व अर्धमेले झालेले सैनिक हिमदंशामुळे चालू न शकल्यामुळे नुसतेच बर्फावर पडलेले दिसत होते. सगळ्या अवजड तोफा हातबाँबने नष्ट करायचा प्रयत्न जारी होता.’ या वेढ्यातील सैनिकांचा बाह्य जगाशी शेवटचा माहीत असलेला संपर्क २३ जानेवारीला जेव्हा रशियन फौजांनी गुमार्क विमानतळ काबीज केले तेव्हा झाला...‘बर्फाच्या त्या वाळवंटात विमाने व वाहने अस्ताव्यस्त पसरली होती. सगळीकडे जर्मन सैनिकांच्या प्रेतांचा सडा पडला होता. कित्येक सैनिक खुरडतानाच मृत्युमुखी पडलेले कळत होते.’

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

२३ जानेवारीला हिटलरने पौलसला अजून एक अपेक्षित आदेश पाठवला त्यात त्याने स्पष्टच म्हटले होते, ‘ तुला शरणागती पत्करायला परवानगी नाही. सहावी आर्मी शेवटच्या माणसापर्यंत व शेवटच्या गोळीपर्यंत त्यांच्या जागा सोडणार नाहीत. या युद्धाची धग सहन करून ते पश्‍चिम देशांच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतील.’

एकाच आठवड्यानंतर हिटलरने जनरल पौलसला बढती दिली. पण याच्या मागचे कारण भयानक होते. जर्मन सैन्याच्या परंपरेत आजतागायत कुठल्याही फिल्डमार्शलने जिवंतपणी शरणागती पत्करली नव्हती. जेव्हा जेव्हा असा प्रसंग उद्भवला होता तेव्हा शरणागती पत्करण्याऐवजी त्यांनी मृत्युला कवटाळले होते. हिटलरने जनरल पौलसने शरणागती पत्करु नये, वेळ आल्यास आत्महत्या करावी म्हणून त्याला बढती दिली. पण परंपरेत केव्हा ना केव्हा तरी खंड पडतोच या नियमाला अनुसरुन ३१ जानेवारीला जनरल पौलसने शरणागती पत्करली. त्याने त्याचे कार्यालय एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या तळघरात प्रस्थापित केले होते त्यातच त्याला व त्याच्या चीफ ऑफ स्टाफ जनरल ऑर्थर श्मिट यांना पकडण्यात आले. तुलनेने या ठिकाणी त्यांना काहीच त्रास नव्हता. आजही तेथे जनरल पौलसने रेखाटलेली काही चित्रे ठेवलेली आहेत त्यातील लाल रंगाचे हत्ती जर्मन झेंड्याला पायदळी तुडवत आहेत हे चित्र बघून त्यावेळी हे जर्मन सेनाधिकारी किती खचलेले असतील याची कल्पना येऊ शकते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या पराभवाने हिटलरची चांगलीच चिडचिड झाली, ती त्याने १ फेब्रुवारीला दुपारी वुल्फसांझमधे बोलाविलेल्या बैठकीत बोलून दाखवली,
‘भेकडांनी शरणागती पत्करली ! हे भेकड नसते तर त्यांनी सावरुन परत एकजुटीने प्रयत्न करून लढा चालवला असता आणि शेवटचा माणूस आणि गोळीपर्यंत चालू ठेवला असता. एखाद्या स्त्रीवर सुद्धा जेव्हा अत्याचार होतो, तिच्या स्त्रीत्त्वाचा अपमान होतो, तेव्हा तीही स्वत:ला एखाद्या खोलीत कोंडून घेते व आत्महत्या करते. जो सैनिक असे न करता शरणागती पत्करून युद्धकैदी होतो त्याबद्दल मला आदर असायचा कारण नाही.’

शरणागती....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हिटलर या मताला शेवटपर्यंत चिकटून राहिला असे म्हणायला हरकत नाही. अर्थात त्याला तसे करणे क्रमप्राप्त होते कारण मुसोलिनीचे काय झाले हे त्याने पाहिले होते. असो. याच सुमारास म्हणजे १५ जानेवारीला लाल सैन्यात सेनाधिकार्‍यांच्या पदाची पुनर्रचना करण्यात आली व त्यांची अधिकार चिन्हेही अमलात आणण्यात आली. ही जी पद्धत अमलात आणली होती तीच झारच्या वेळी, क्रांतीअगोदरही होती पण अर्थातच असे म्हणण्याचे त्यावेळी कोणाचे धाडस नव्हते हे वेगळे.
जनरल पौलसच्या शरणागतीनंतर दोनच दिवसांनी उत्तरेतील जर्मन फौजांनीही शरणागती पत्करली. वेढल्या गेलेल्या जर्मन सैनिकांची अंदाजे संख्या होती दोन लाख पंचाहत्तर. त्यातील जिवंत राहिलेल्या ९१,००० सैनिक व २४ सेनाधिकार्‍यांनी शरणागती पत्करली. जर्मनीच्या ताब्यातील रशियामधे चार वर्षात जेवढे रशियन सैनिक मेले त्याच्या कितीतरी जास्त रशियाच्या ताब्यातील जर्मन युद्धकैदी फक्त दोन वर्षातच मेले. या ९१००० शरण आलेल्या सैनिकातील फक्त ९६२६ सैनिकांनी परत त्यांचे घर पाहिले. या सैनिकातील काही सैनिक तर दहा वर्षाने जर्मनीत पोहोचले.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१७ जुलै १९४२ ते २ फेब्रुवारी १९४३ या कालावधीत रशियाचे ४७९,००० सैनिक ठार किंवा गंभीररित्या जखमी झाले व ६५१,००० आजारी किंवा किरकोळ जखमी झाले. जनरल चुईकॉव्हने लिहिले, ‘स्टॅलिनग्राडचा हा प्रतिकार इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल’. असे प्रत्येक सेनाधिकारी त्याने लढलेल्या युद्धाबद्दल म्हणतो पण या युद्धाच्या बाबतीत ते खरे होते. जनरल चुईकॉव्हने त्याचे या युद्धावरचे पुस्तक शीतयुद्धाच्या काळात लिहिले आहे त्यामुळे त्यात पश्‍चिम राष्ट्रांबद्दल बराच कडवटपणा दिसतो. जनरल चुईकॉव्हला पश्‍चिमी इतिहासकारांचा राग येत असे कारण त्याच्या मते त्यांनी स्टॅलिनग्राडच्या युद्धाला त्यांच्या लेखनात कमी महत्व दिले. त्याचा विशेष राग होता तो फुलर, चर्चिल, ब्रॅडले, गुडेरियन या सारख्या लेखकांवर ज्यांना तो साम्राज्यवादी म्हणून हिणवायचा. ज्या अल्-अलामिनच्या युद्धाचे हे इतिहासकार एवढे कौतुक करतात त्या युद्धाचे आणि स्टॅलिनग्राडच्या युद्धाची तुलना करताना जनरल चुईकॉव्ह म्हणतो,

‘अल्-अलामिनच्या युद्धात ब्रिटिशांच्या समोर जर्मनीच्या चार डिव्हिजन आणि इटलीच्या आठ डिव्हिजन उभ्या ठाकल्या होत्या. यात जर्मनांच्या मुख्य फौजांचा पराभव झालाच नाही. व्होल्गा आणि डॉन नद्यांच्या किनार्‍यावर झालेल्या युद्धात रशियाने केलेल्या हल्ल्यात १९ नोव्हेंबर १९४२ ते २ फेब्रुवारी १९४३ या काळात जर्मनीच्या आणि तिच्या इतर सहयोगी देशांच्या एकूण बत्तीस डिव्हिजन नष्ट करण्यात आल्या. याखेरीज शत्रूच्या अजून सोळा डिव्हिजनचा दारुण पराभव करण्यात आला......स्टॅलिनग्राडच्या युद्धात मानवतेचा फॅसिझमवर विजय झाला.’

अन्याय...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

न्याय...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जनरल चुईकॉव्हने हे आकडे लिहिताना जरा अतिशोयक्त्तिच केली होती आणि हेही सांगितले पाहिजे की या मानवतेच्या रक्षकांनी मानवतेचे सर्व संकेत धुडकावूनही लावले होते. शत्रूच्या विरुद्ध तर जाऊ देत, त्यांच्या स्वत:च्या नागरिकांच्या बाबतीतही हे संकेत पायदळी तुडवले गेले होते. रशियन सैन्यातील पळून गेलेले किती सैनिक जर्मनीच्या सैन्यात रुजू झाले होते ही संख्या कधीच उघडकीस येणार नाही पण जर्मनीच्या पदरी असले दीड लाख लोक होते. यांना हिविस म्हणत.

हिविस - भरती.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ही संख्या हिमनगाचे टोक होते असे मानायला जागा आहे. या लोकांचा इतिहास रशियन सरकारला अडचणीत टाकणारा असल्यामुळे यावर विशेष चर्चाही झाली नव्हती. पण अंदाजे वीस हजार (हा आकडा रशियन सरकारने दिलेला आहे) हिविस स्टॅलिनग्राडमधे पकडण्यात आले. त्यांचे पुढे काय झाले हे ज्ञात नाही. पण गोळ्या वाचवण्यासाठी यांना बदडून ठार मारण्यात आले असेही ऐकिवात आहे.

जर्मनीचे वीस डिव्हिजन सैन्य, तीन चिलखती दले, एक विमानविरोधी तोफखान्याचे दल या युद्धात नष्ट झाले. याचबरोबर दोन रुमानियाच्या रेजिमेंट, एक क्रोएशियाचे रेजिमेंट व बांधकाम करणारी जर्मनांच्या ‘ऑर्गनायझेशन टॉड‘च्या काही सेना, याही नष्ट झाल्या. जनरल मेलेंथीनने या नुकसानीने पूर्वेच्या आघाडीवर ताकदीचा समतोल ढळला याची कबुली दिली. जनरल झाईट्झलरनेही याला दुजोरा देताना म्हटले, ‘स्टॅलिनग्राडचे युद्ध दुसर्‍या महायुद्धाला कलाटणी देणारे ठरले’. इतिहासकार निगेल निकोलसनने नेपोलियनच्या रशियाच्या युद्धापेक्षाही हे युद्ध भयंकर होते असे म्हटले ‘कारण नेपोलियन माघार तरी घेत होता. येथे स्टॅलिनग्राडमधून माघार घ्यायचा प्रश्‍नच नव्हता. जर डंकर्कमधे दोस्त राष्ट्रांचे सगळे सैन्य नष्ट झाले असते तर कदाचित त्याची स्टॅलिनग्राडच्या युद्धाशी तुलना करता आली असती.’ जर्मनीच्या सहाव्या आर्मीचे उरलेले बहुतेक सैन्य युद्धबंदी झाल्यावर जर्मनांची दक्षिणेकडे लष्करी ताकद निम्म्याने घटली. शिवाय जनरल झुकॉव्हने जे पाच लाख सैन्य स्टॅलिनग्राडमधे वापरले होते ते मोकळे झाल्यामुळे इतर ठिकाणी वापरता येणार होते. विशेषत: मानस्टाईनच्या सैन्याविरुद्ध. मानस्टाईनचे सैन्य आता माघार घेत होते. त्याने अगोदर माघारीला सुरुवात केली आणि मग जर्मन मुख्यालयाकडे त्यासाठी परवानगी मागितली, म्हणून त्याला माघार तरी घेता आली. (मानस्टाईनकडे एक पाळलेला कुत्रा होता जो ‘हाईल हिटलर’ ऐकल्यावर त्याचा पंजा वर उचलत असे पण स्वत: मानस्टाईन मात्र बर्‍यापैकी स्वतंत्र वृत्तीचा माणूस होता.)

ज्याप्रमाणे पाकिस्तानने बांगलादेशमधे त्यांचे ९०००० सैनिक युद्धबंदी झाले आहेत हे त्यांच्या जनतेपासून लपवून ठेवले होते त्याचप्रमाणे येथेही नाझींनी सहावी आर्मी युद्धात बंदी झालेली नसून लढाईत शहीद झाली आहे असा समज पसरवायचा प्रयत्न केला. OKH ने ३ फेब्रुवारीला एका प्रसिध्दीपत्रकात म्हटले, ‘शेवटच्या श्‍वासापर्यंत लढण्याच्या शपथेनुसार सहावी आर्मीे फिल्डमार्शल पौलसच्या नेतृत्वाखाली शहीद झाली. भयंकर वातावरणात या सैन्याने शेवटच्या गोळीपर्यंत ही लढाई लढली. त्यांचा हा त्याग वाया जाणार नाही’

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

दुर्दैवाने जेव्हा मॉस्कोतील रस्त्यांवरून जेव्हा या युद्धकैद्यांची धिंड काढण्यात आली व त्याची छायाचित्रे प्रकाशात आली तेव्हा जर्मन जनतेला खरे काय झाले ते कळले व त्यांचा सरकारी प्रसिध्दीपत्रकांवरचा विश्‍वास कायमचा उडाला.

स्टॅलिनग्राडच्या युद्धाबद्दल लिहिताना इतर युद्धांच्या तुलनेत हे युद्ध किती भयंकर होते हे लिहिणे टाळता येत नाही. या युद्धात दोन प्रचंड ताकदवान लष्करी सत्ता एकमेकांना भिडल्या व युद्धाचे सर्व कायदे कानून पायदळी तुडवण्यात आले. १९४२ च्या युद्धात जेथे त्या जीवघेण्या थंडीत हिमदंश न होता जिवंत रहाणे हीच एक लढाई होती, तशा वातावरणात या दोन देशांचे सैनिक जिवाच्या आकांताने प्राण घेऊ किंवा देऊ या निर्धाराने मिळेल त्या शस्त्राने लढत होते. या युद्धात अंदाजे एकूण अकरा लाख मृत्यु झाले. स्टॅलिनग्राडच्या पाच लाखाच्या आसपास असलेली लोकसंख्या आता हजारांच्या संख्येत मोजता येऊ लागली.

चार्लस्-द्-गॉलने जेव्हा मॉस्कोला स्टॅलिनची भेट घेण्यासाठी १९४४ मधे भेट दिली तेव्हा या युद्धभूमीलाही भेट दिली. तेव्हा त्याने उद‍्गार काढले, ‘ अं गहाँ पेप्ल’ मराठीत त्याचे भाषांतर असे होऊ शकते...."धन्य ते लोक..." पण हे वाक्य त्याने जर्मन सैनिकांना उद्देशून म्हटले होते. एवढ्या दूरवर व अशा वातावरणात हे सैनिक लढले हे बघून तो अचंबित झाला होता. आज या युद्धाकडे त्रयस्थ नजरेने बघताना, व जर्मनीच्या हाय कमांडने - हिटलरने कितीही चुका केल्या असल्या तरीही आपल्याला द गॉलशी सहमतच व्हावे लागते. स्टॅलिनग्राडच्या रस्त्यात लढल्या गेलेल्या या युद्धात आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी प्राणपणाने लढताना सामान्य रशियन सैनिकाने जर्मन सैन्यावर वर्चस्व गाजवले असेच म्हणावे लागेल. या सामान्य सैनिकांच्या त्यागानेच रशियाला हा विजय मिळाला. ऑपरेशन बार्बारोसा सुरू व्हायच्या अगोदर हिटलरने दर्पोक्तीने म्हटले होते, ‘बार्बारोसा सुरू झाल्यावर सगळे जग आपला श्‍वास रोखून धरेल’. स्टॅलिनग्राडच्या या युद्धानंतर जगाने आता हळूहळू नि:श्‍वास टाकायला सुरुवात केली. . .

समाप्त.
जयंत कुलकर्णी.
आंतरराष्ट्रिय राजकारणात आपल्या देशांचे हीत जपताना, आपली उद्दिट्ये साध्य करताना जागतिक समुहाविरुद्ध जाऊन चालत नाही. तलवारीच्या पात्यावरची कसरतच असते ती. अ‍ॅडमिरल डोनिट्झला जेव्हा अटक करुन नेण्यात येत होते तेव्हा त्याने अटक करणार्‍या अमेरिकन अधिकार्‍याची हेटाळणी केली की हे कसले शौर्य....सगळ्यांनी जर्मनीला एकटे पाडून त्यांचा पराभव केला....असे म्हणतात त्या अधिकार्‍याने उत्तर दिले, " जगाच्या विरुद्ध गेल्यावर दुसरे काय होणार तुमचे...''

अशा रितीने मॉस्को व स्टालिनग्राडवर कबूल केल्याप्रमाणे लिहून ही लेख मालिका संपवित आहे....राम ! राम !

इतिहासलेख

प्रतिक्रिया

स्पा's picture

25 Apr 2016 - 9:55 am | स्पा

__/\__

DEADPOOL's picture

25 Apr 2016 - 11:04 am | DEADPOOL

संपली?
:(

प्रचेतस's picture

25 Apr 2016 - 11:13 am | प्रचेतस

जबरदस्त लेखमाला.
हॅट्स ऑफ.

चांदणे संदीप's picture

25 Apr 2016 - 11:31 am | चांदणे संदीप

जबरदस्त लेखमाला.
हॅट्स ऑफ.

+१
याहून वेगळे शब्द आत्ता कुठेतरी दूर निघून गेले आहेत. __/\__

Sandy

बोका-ए-आझम's picture

25 Apr 2016 - 4:43 pm | बोका-ए-आझम

पण फार लवकर संपली मालिका :( आता काहीतरी अजून लिहा दुस-या महायुद्धावर, कारण तुमच्या लेखणीतून ते वाचायला मिळणं हा अनुभव अविस्मरणीय आहे!

सौंदाळा's picture

25 Apr 2016 - 11:14 am | सौंदाळा

__/\__

एस's picture

25 Apr 2016 - 12:13 pm | एस

वाचनखूण साठवली आहे.

शलभ's picture

25 Apr 2016 - 3:07 pm | शलभ

+१
खूप मस्त लिखाण. _/\_

नया है वह's picture

25 Apr 2016 - 2:36 pm | नया है वह

+११११११११११

कपिलमुनी's picture

25 Apr 2016 - 3:09 pm | कपिलमुनी

अप्रतिम लेखन !

एवढी हिंसा झालेली पाहून वाईट वाटले ! बुद्धाचे तत्वज्ञान किती महान होते यची आठवण येते

मार्गी's picture

25 Apr 2016 - 8:26 pm | मार्गी

ह्या अप्रतिम मालिकेबद्दल खूप खूप धन्यवाद सर! अगदी जीवंत केली ती महागाथा! :)

नरेश माने's picture

26 Apr 2016 - 10:57 am | नरेश माने

जबरदस्त लेखमालिका!!!

पिंगू's picture

26 Apr 2016 - 11:13 am | पिंगू

अतिशय जबरदस्त लेखमाला..
युद्ध हे नेहमीपेक्षा किती जास्त भीषण असू शकते याचा जिवंत पुरावा म्हणजे ही लेखमाला..

जयंत कुलकर्णी's picture

26 Apr 2016 - 11:37 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

जेपी's picture

26 Apr 2016 - 12:05 pm | जेपी

जबरदस्त लेखमालिका!!
आता पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.

जगप्रवासी's picture

26 Apr 2016 - 5:01 pm | जगप्रवासी

जबरदस्त लेखमालिका!!

स्वराजित's picture

26 Apr 2016 - 5:41 pm | स्वराजित

काका आज सगळे भाग परत वाचले.
तुमच्या लेखनशैलीला सलाम.
__/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2016 - 6:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम लेखमाला !

यशोधरा's picture

27 Apr 2016 - 3:53 am | यशोधरा

लेखमाला आवडली.

राहुल०८'s picture

27 Apr 2016 - 9:14 am | राहुल०८

अतिशय बोलके लेखन.
कृपया भारतीय युद्धा बद्दल सुद्धा लेखमाला लिहावी, हि विनंती !
आम्हाला भारत चीन, भारत पाकिस्तान, कारगिल विषयी युद्धकथा वाचायला आवडेल.

सुबोध खरे's picture

27 Apr 2016 - 9:28 am | सुबोध खरे

अतिशय जबरदस्त लेखमाला.
सर्व सामान्य माणूस आणि सामान्य सैनिक युद्धात आणि नेत्यांच्या युद्धखोरीत कसा होरपळला जातो याचे भीषण पण यथातथ्य वर्णन.

गामा पैलवान's picture

27 Apr 2016 - 7:15 pm | गामा पैलवान

जयंतराव,

फक्कड मालिका आहे. समारोपातला दोएनित्झच्या अटकेचा प्रसंग जणू भविष्यदर्शीच आहे.

>> त्या (अमेरिकी) अधिकार्‍याने उत्तर दिले, " जगाच्या विरुद्ध गेल्यावर दुसरे काय होणार तुमचे...''

आज बघितलं तर अमेरिका कसलाही विधिनिषेध न बाळगता जगाच्या विरुद्ध जाते आहे. नियतीने त्या अमेरिकी अधिकाऱ्याच्या मुखे स्वदेशाचं भवितव्य वर्तवलं होतं जणू,

आ.न.,
-गा.पै.

जुइ's picture

28 Apr 2016 - 7:47 pm | जुइ

तुमच्या पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.

राजू's picture

29 Apr 2016 - 8:45 pm | राजू

मराठीत असल्याने शब्द मनाला भिडत होते.

जयंत कुलकर्णी's picture

29 Apr 2016 - 9:54 pm | जयंत कुलकर्णी

जसे प्रेमकाव्य इंग्रजीमधे मनाला भिडते तसे मला वाटते मराठी ही भाषा युद्धकथांना अत्यंत योग्य आहे....
काय म्हणता ? मला तरी असेच वाटते... :-)

पैसा's picture

1 May 2016 - 8:56 pm | पैसा

उदास करणारे वास्तव...

हिटलर फक्त ज्यूंच्या नव्हे तर दोस्त राष्ट्रांसोबत जर्मन सैनिकांच्याही इतक्या लाखोंच्या संख्येत मृत्यूला कारणीभूत झाला.

भंकस बाबा's picture

1 May 2016 - 10:20 pm | भंकस बाबा

फारच छान,

दीपक११७७'s picture

28 Nov 2016 - 5:05 pm | दीपक११७७

नेहमी प्रमाणे अप्रतिम..
लेख मनाला भिडला
एकदम छान लेख
धन्यवाद.