अन्नदाता सुखी भव भाग ५ - नव विचार

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
22 Oct 2015 - 5:40 pm

या आधीचे संबंधित लेखन
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012

प्रचलित आणि रूढ विचार पद्धतीच्या विरुद्ध विचार बाळगण्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतील, याचे उत्तम उदाहरण म्हणजे Galileo Galilei (मराठी टंकताना पडलेला प्रश्न : "ग" वरचा अर्धचंद्र google मध्ये काही केल्या जमत नाही, काय करायला हवे होते?). या गणितज्ञ, तत्वज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि विचारवंत माणसाला १७ व्या शतकात प्रचलित ख्रिस्ती विचारसरणीविरुद्ध वाटणाऱ्या पण गणिताने सिद्ध करता येणाऱ्या त्याच्या विचारांकरता आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली गेली. प्रचलित ख्रिस्ती धर्मग्रंथ सांगत की "पृथ्वी स्थिर असून तिच्याभोवती सूर्य फिरतो". Galileo Galilei (आणि त्या आधी कोपर्निकस) यांचे म्हणणे होते की "पृथ्वी स्थिर नसून (इतरही ग्रहांसह) सूर्याभोवती फिरते". काही काळ कारावास भोगल्यावर त्यांची शिक्षा घरी स्थानबद्धतेत बदलली गेली. जरी या शिक्षेच्या काळांत त्यांना बरेच मौलिक विचारमंथन आणि लिखाण करता आले, तरी बहुतेक त्यांच्या ओळखीपाळखी जोरदार असल्याने जीव गमावण्याची वेळ आली नाही आणि कारावासावर भागले.

आता कोणालाही जर विचारले की जर "शेत कसे असावे" तर किती लांब रुंद असाव, किती समतल/सपाट असाव; कस नांगरलेल असाव; त्याला कसे पाणी देता याव; काय काय अवजार असावीत या सगळ्याबद्दल जे साधारणतः विचार असतील त्या सगळ्याच्या बाहेरचा विचार करणाऱ्याना सध्याचे शेतकरी काय म्हणतील? चक्रम, दूरदृष्टीचे की अवास्तव?

शेत किती लांब रुंद असाव, किती समतल/सपाट असाव या प्रश्नाला उत्तर जर मिळालं की दहा मजली तरी असावं तर असं उत्तर देणारा बहुधा "vertical farming" चा पुरस्कर्ता असेल. या जगरहाटीपेक्षा वेगळ्या तऱ्हेने विचार करणाऱ्याला जे काही म्हटलं जाईल ते जाऊ दे पण त्याचे विचार काही वादातीत वस्तुस्थितीवर अवलंबून आहेत - जमीन आणि पाणी दोन्हीही मर्यादित वस्तू शेतीकरता लागतात. त्या जसजशी लोकसंख्या वाढेल तसतशा दरडोई प्रमाणात कमी होत जातील आणि त्यामुळे या दरडोई कमी होत जाणाऱ्या साधनांचा जास्त परिणामकारक उपयोग न केल्यास त्यापासून मिळणारे दरडोई धान्यही कमी होत जाईल. नवी जमीन (उदा. समुद्रात भर घालून) आर्थिक दृष्ट्या फारच महाग ठरेल पण उपलब्ध असलेली जमीनच जर पिकाचे एकापेक्षा जास्त थर करून वापरता आली तर तसेच उपलब्ध पाण्याचा उपयोगही पुनः पुन्हा करता आला तर जमीन आणि पाणी या मर्यादित वस्तूंमुळे अन्नोत्पादनावर येणारी बंधने शिथील होतील.

पिकाचे एकापेक्षा जास्त थर करणे आणि उपलब्ध पाण्याचा पुनः पुन्हा उपयोग करणे या करता जरी "Vertical Farming" चा विचार करण्यात आलेला असला तरी सध्या तरी अशी फक्त काही शेते प्रत्यक्षात (पण बरीच कागदावर) असल्यांने अशा विचार करणाऱ्याचा तूर्तास तरी Galilio होण्याचे भय नाही. या "मजलेदार" (मसालेदार नव्हे, पण कदाचित मासलेदार) शेतात सगळ्यात वरच्या मजल्यावर एक सूर्य -शक्ति-संग्राहक (solar energy collector and holder जो सूर्यप्रकाश मिळेल तेव्हां काम करेल) आणि एक पर्जन्य-जल-संधारक-वाहक (rain water collector and redistributor जो फक्त पावसाळ्यात काम करेल) असतील. पावसाळ्यात मिळणारे पाणी सर्वात वरच्या मजल्यावरून खाली सोडले जावून प्रत्येक मजल्यावर शेतीला वापरत, एक एक मजला खाली उतरवले जाईल. तळमजल्यावरचे (शेतीकरता "वापरलेले" आणि म्हणून गाळ तसेच जमिनीतली पोषक द्रव्ये आणि वरून घातलेली खते यांच्या अंशाने संपृक्त) पाणी गाळ/पोषक द्रव्ये/खते वेगळी करून, "नवीन पाणी" म्हणून वापरण्याकरता सूर्यशक्ती वापरून पुन्हा सर्वात वरच्या मजल्यावर आणले जाईल. अशा प्रत्येक शेताकरता पाणीसाठा, शेतीची जागा, पर्जन्य-जल-संधारक-वाहक/सूर्य -शक्ति-संग्राहक/नवीन पाणी इ. इ. करता लागणारी जागा आणि ऊर्जा या सगळ्याचे व्यवस्थित संयोजन केल्यास अशी शेती जागा आणि उत्पादनखर्च या सगळ्याच बाबतीत किफायतशीर ठरेल. अशा शेतांत "माती" हा प्रकार बाहेरून आणून वापरावा लागत असल्यामुळे जितक्या कमी जाडीचा थर वापरता येईल तितका पातळ मातीचा थर असलेल्या पसरट खोक्यातून (किंवा अगदी चाळण्यातून) पाण्याचा निचरा खास तयार केलेल्या घळीमधूनच होईल अशा तऱ्हेने ही "शेत जमीन" एकावर एक थर रचत "तयार" केली असल्याने ("trays on racks") जर जुन्या आणि निरुपयोगी ठरवलेल्या इमारती अशा कामाकरता वापरात आणता आल्या तर त्या आणखीच फायदेशीर ठरतील. सध्या अशी "शेती" मर्यादित प्रमाणात जास्त महागडे पदार्थ (जसे हिरव्या भाज्या, ज्या खरोखरच "farm fresh" असतील तर "जाणकार" थोडी बाजार भावापेक्षा जास्त किंमत द्यायला एका पायावर तयार असतात, अगदी भारतात देखील) उगवण्याकरता केली जात आहे पण इतर बऱ्याच पदार्थांचासुद्धा विचार करून ही पद्धत काही वर्षांत मोठ्या प्रमाणांत उपयोगात आणली जाणे हे शक्य आहे. जरूरीप्रमाणे "सूर्य -शक्ति-संग्राहक" तसेच "पर्जन्य-जल-संधारक-वाहक" यांचे नियोजन करणे महत्वाचे आहे. "जमीन" तयार करणे, पिके कापणीकरता जमीन "काढून" "नवी लावणे" अशा अनेक अपारंपरिक कामांचा अशा शेतीत वापर करावा लागेल आणि अशा वारंवार करायला लागणाऱ्या कामांकरता यंत्र-मानव वापरणे देखील कदाचित उचित ठरेल. जितके पाणी प्रत्यक्ष "वापरले" जाईल (म्हणजेच गाळाबरोबर बाहेर काढले गेल्याने, बाष्पी भवन किंवा अन्य कारणांमुळे पुनःप्रसारित होऊ शकणार नाही) तेव्हढेच "नवीन" पाणी पुन्हा top up करावे लागेल. जेव्हां "सूर्य -शक्ति-संग्राहक" पुरेशी ऊर्जा देऊ शकणार नाही तेव्हां "विकतची ऊर्जा" वापरावी लागेल. अशी शेती असलेल्या इमारतीच्या आजूबाजूला मिळणारा सूर्यप्रकाश अशा इमारतीत असलेल्या "पिकांपर्यंत" पुरेशा प्रमाणात कसा पोचवता येईल, हा या प्रकारच्या शेतीकरता मोठा प्रश्न ठरेल.

हल्ली बऱ्याच क्षेत्रांत " IT Enabled" विचार वापरल्याने जशी प्रगती झाली आहे तसेच शेतीतही " IT Enabled Agriculture (ITEA)" प्रगत झालॆले आहे. या संकल्पनेचा आवाका बराच मोठा असल्याने ती सहज लक्षांत येण्याकरता आपण एखाद्या काल्पनिक शेताचा विचार करू. आपले हे काल्पनिक शेत जरुरीप्रमाणे लहान मोठे होऊ शकेल आणि या शेतावर आपल्याला हवे तेव्हढे मजूर आणि हवी तेव्हढी यंत्रे ठेवता येतील - हो कल्पनेत कशाला दरिद्री असावे ? या काल्पनिक शेताच्या मालकाने सगळे निर्णय घ्यायचे आहेत आणि त्याकरता लागणारी सर्व माहिती नोकरांकडून मिळवायची आहे. प्रत्येक नोकरावर शेताच्या एका भागाची संपूर्ण जबाबदारी आहे आणि त्याला जे जे काय वेळोवेळी लागेल ते त्याने मालकाला सांगितल्यावर मालकाने त्याची तजवीज करायची आहे, समजा या आपल्या काल्पनिक शेतात प्रत्येक हेक्टरमध्यॆ जर १०० माणसे तैनात केली तर प्रत्येकाला १०० वर्ग मीटरची सर्व तऱ्हेची देखभाल करावी लागेल. आता कल्पना करा - जवळजवळच्या तुकड्यावर काम करणाऱ्या माणसांच्या जेव्हां हे लक्षात येईल की आपण मालकाच्या नजरेच्या टप्प्याबाहेर आहोत तेव्हां असे काही तरी सुखसंवाद सुरू होतील : " ये गणपा, ये वाईच बिडी प्यायला" किंवा "शिरपा ओ SSS, कायतरी पान तंबाकू काडा की". हे मंडळी अधून मधून थांबत थबकत काम करतील. त्यांच्या देखरेखीखालील यंत्रेदेखील अशीच कधी उपयोगात असलेली तर कधी थांबलेली अशी असतील नाही का? आता हे शेत जर आणखी मोठे असेल तर आणखीनच माणसे लागतील आणि त्यामुळे शेतमालकाला या सगळ्या काम करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवणे आणखीनच कठीण होईल कारण शेवटी शेतमालकालाच वेळोवेळी कधी प्रेमाने कधी रागाने लक्ष ठेवत सगळ्यांकडून कामे करवून घ्यावी लागतील. प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने मालकाला त्याच्या देखरेखीखालील जमिनीबद्दलची माहिती देत असल्याने मालकावर योग्य ते प्रश्न विचारण्याची आणि अग्रक्रम ठरवण्याची जबाबदारी पडेल (उदा. "काय रे गण्या, तू आलास तेव्हां पंप होता का चालू" "व्हय जी" "पाणी होत का जोरात" " त्ये काय मी न्हाई बघटल, निस्ता पंपाचा आवाज अयकला"). प्रत्येकजण आपापल्या मगदुराप्रमाणे उत्तम, साधारण किंवा टुकार काम करेल आणि काही काही झालेल्या/केलेल्या चुका निस्तरणे कठीण असेल (उदा. शेताच्या एका भागात दुर्लक्ष केल्याने जर जास्त पाणी दिले गेले तर दुसरीकडे कमी तर पडेलच पण जिथे जास्त पाणी दिले जाईल तिथे कदाचित पिकाचा काही भाग कुजणे असे गैरप्रकारही शक्य आहेत). माणसे वाढल्याने वाढणारा गोंधळ आणि अपव्यय टाळण्यासाठी जर प्रत्येक माणसाकडे जास्त जमीन सोपवली तर माणसांचे लक्ष अपुरे पडणे हा धोका सम्भवतो. महागडी यंत्रे जितकी बिन-वापरती रहातील (कुठल्याही कारणाने जसे त्याला काम ठरवून न दिल्याने किंवा त्याचे इंधन वेळेवर आणि पुरेसे उपलब्ध न झाल्याने) तितके एकीकडे त्याचा व्याज ,घसारा अशा तऱ्हेचा खर्च चालूच राहिल्याने शेतमालकाच्या खिशाला चाट पडतच राहील आणि दुसरीकडे कामे साचल्यामुळे शेताची नुकसानीही होऊ शकेल.

अशा पार्श्वभूमीवर हजारो एकराचे "शेत" ("शेत" या शब्दाने साधारणतः दर्शवल्या जाणाऱ्या आकाराच्या अनेक पट मोठे) कसे कसावे या करता ITEA प्रणाली वापरली जाते. अशा अवाढव्य शेतावर माणसे कमीत कमी असतील आणि सगळी यंत्रे (यंत्रांसारखी) न थकता, न कंटाळता आणि न थांबता पण एकमेकांशी "बोलत आणि जुळवून घेत" काम करत असतील. त्यामुळे उत्पादन खर्च नक्कीच कमी होईल आणि उपलब्ध जमीन आणि पाण्याचा पुरेपूर उपयोग केला जाईल (जसे "vertical farming" मध्ये देखील अपेक्षित असते). अर्थात त्यासाठी लागणारी गलेलठ्ठ गुंतवणूक केल्यानंतर!

John Deere या अमेरिकन कंपनीने Kaiserslautern, Germany येथे काही काळापूर्वी सुरू केलेले European Technology Innovation Center (ETIC) हे ITEA आणि त्याकरता लागणाऱ्या सेवांचे उत्तम उदाहरण आहे. ज्यांच्याकडे हजारो एकरात पसरलेली शेते आहेत अशा शेतकरी वर्गाला त्यांच्या सगळ्याच जमिनीत प्रत्येक ठिकाणी काय परिस्थिती आहे हे प्रत्यक्ष पाहून मग जरूर तशी यंत्रे वापरून लागेल ते काम जसे जसे लागेल तसे करवून घेणे हे अशक्य असल्याने त्यांनी जर ITEA प्रणाली वापरायचे ठरवले तर त्यांच्या पुढे असलेल्या अनेक पर्याय पडताळून त्यांनी कुठला मार्ग घ्यावा हे ठरवायला ETIC मदत करतो. साधारणतः त्यांच्या "शेताचे" mapping झाल्यावर एकूण जमीन वेगवेगळ्या प्रतीत, तसेच उंच-सखल भागांप्रमाणे वेगवेगळ्या grid मध्ये विभागली जाते. त्यांच्या शेतातील जमिनीतील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तऱ्हेची संवेदनाशील आयुधे (probes) गाडली जातात, ज्यामुळे हजारो एकर पसरलेल्या जमिनीतील प्रत्येक आखीव चौकोनातील (cell in the grid) आर्द्रता, खतांचे प्रमाण, सूक्ष्म क्षारघटकांचे प्रमाण आणि इतर निर्धारित मोजमापे घेणे तसेच आकाशस्थित उपग्रहाना त्या चौकोनाची (किंवा आजुबाजूच्या चौकोनांचीही) छायाचित्रे/मोजमापे पाठवणे अशा अनेक प्रकारे प्रत्यक्ष पहात असल्याप्रमाणेच सर्व माहिती तर "२४ x ७" मिळतेच पण अशी सर्व माहिती संगणकामार्फत संकलित होऊन त्या माहितीचा कसा उपयोग करावा याबद्दलच्या सूचना देखील मिळतात. ही सगळी माहिती एका मध्यवर्ती ठिकाणी मिळाल्यामुळे हे "शेतकरी" त्यांचा अनुभव, संगणकांनी दिलेल्या सूचना आणि हाताशी असलेली यंत्रे आणि नोकर माणसे वापरत प्रत्येक क्षणाला शेताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जे जे काही व्हायला हवे ते सगळे या मध्यवर्ती ठिकाणीच वेगवेगळी बटणे दाबून करवून घेऊ शकतात (जसे जमिनीमधली आर्द्रता अपुरी असलेल्या भागातले पाण्याचे फवारे चालू करून जरूर तेव्हढे पाणी देऊन झाल्याबरोबर पाणी अपुरे पडू न देता तसेच वायाही जाऊ न देता लगेच फवारे बंद करणे, जरूर असल्यास याच पाण्यांत खत किंवा इतर द्रव्ये मिसळणे, कापणी चालू असतानाच हातांत येत असलेल्या धान्याचा साठा, विक्री किंवा इतर प्रकारे विनियोग कसा करावा हे ठरवणे इ. इ.). या पद्धतीत यंत्रे देखील एकमेकांशी "बोलत" असल्याने ("internet of things"), एका यंत्राचे काम संपल्यावर लगेचच दुसऱ्या यंत्राला पाचारण केले जाऊन कामाला लावणे आणि पहिल्या यंत्राची पाठवणी त्याची जरूर असलेल्या इतर भागात करणे आणि त्यामुळे सगळीच यंत्रे - ठराविक दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वेळाखेरीज - अविरत चालू ठेवून त्यांच्याकडून त्यांच्या क्षमतेच्या १०० % काम करवून घेणे हे शक्य होते. John Deere ही कंपनी त्यांनी बनवलेली यंत्रे जशी एकमेकांशी "बोलणारी" करू शकते तसेच एक सेवा म्हणून योग्य संगणकप्रणाली वापरून इतरांनी बनवलेल्या यंत्रांना देखील एकमेकांशी "बोलते" करू शकते. अर्थात अशा सेवांसोबत John Deere आपली शेतीला उपयुक्त असणारी वेगवेगळी यंत्रे देखील कशी विकली जातील हेही पहात असेलच! ITEA क्षेत्रात जसे आपापली यंत्रे आणि software पुरवणारे आहेत तसेच वेगवेगळ्या गरजांप्रमाणे कमी जास्त गुंतवणूक आणि व्याप्ती असलेले आणि "बेतलेले संच" (customised units) जमवून/जुळवून देणारेही आहेत. अनेक कंपन्या (अगदी Accenture सारख्या) या क्षेत्रात अनेक यंत्रे विकतात आणि सल्ला पुरवतात.

ITEA करता जोरदार गुंतवणूक लागत असल्याने अनेक हजार एकरांची शेती असलेलेच याचा विचार करतात. या "investment oriented" शेतीचे लक्ष्य असते की एखाद्या शेतातून जास्तीच्या तंत्रज्ञानाकरता गुन्तवणूक केल्याशिवाय जे उत्पन्न मिळाले असते त्यापेक्षा अधिक उत्पन्न (अर्थातच गुंतवणूकीकरता केलेला खर्च त्यावरील परताव्यासह पूर्णतः परत मिळवल्यानंतर) मिळवणे ! असे उत्पन्न मिळवण्याकरता शेतात वापरलेली उपकरणे आणि यंत्रे तसेच या वेगवेगळ्या साधनांना एकत्र आणि सुसूत्रपणे राबवण्याकरता लागणारे तंत्रज्ञान अनेक पद्धतीने मदत करते- आणि आता तर अशा "तंत्रावलंबी शेतकऱ्या" ना असे सगळेच तंत्रज्ञान एकत्रितपणे उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्याही जोरदार धंदा करत आहेत - फक्त प्रगत देशातच. मात्र अशा "तंत्रावलंबी शेतकऱ्या" ना "आहेत चार बुके शिकलेले" असे असून चालणार नाही!

आणखीही मोठ्या प्रमाणावर शेती करणाऱ्याना इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत - जसे probes वापरून मिळणाऱ्या माहिती खेरीज सगळ्याच शेताच्या वेगवेगळ्या भागांची वेळोवेळी विमानातून चित्रफीत घेऊन, ती उपग्रहामार्फत संगणकांवर मिळवून, तिची छाननी करून त्यावरून वेगवेगळ्या सांख्यिक आधारावर (संगणकामार्फत) निर्णय घेत (संगणकामार्फत) यंत्रे चालवणे. काही काळाने जसे MRI वगैरे पद्धतीने संपूर्ण मानवी शरीराचा त्रिमितीतील नकाशा मिळू शकतो तसाच काहीसा प्रकार कितीही मोठ्या "शेताबद्दल" (शेत या पारंपारिक शब्दातून दर्शवणाऱ्या जमिनीच्या तुकड्यापेक्षा हजारो पटीने मोठ्या भूभागालाही शेतच म्हणावे कां?) शक्य होईल आणि अशा शेताला पाणी, खते आणि कीटकनाशकेसुद्धा अगदी बोण्डल्या-बोण्डल्याने किंवा थेंबांच्या मापाने "पाजता" येतील आणि प्रत्येक चौरस सेंटीमीटर मध्यॆ वेळोवेळी होणारे बदल टिपता येतील. एकूणच या पद्धतीत शेती आणि माहिती तंत्रज्ञान या दोन्हीच्या मिलापामुळे कुठल्याही प्रकारचा अपव्यय शक्य तितका टाळला गेल्याने सामान्यतः जितके धान्याचे उत्पादन होईल त्यापेक्षा बरेच जास्त उत्पन्न मिळवणे नक्कीच शक्य होईल.

प्रचलित आणि रूढ विचार पद्धतीच्या विरुद्ध विचार करणारे शेतीतील Galileo तर आता आणखीनच टोकाचा विचार करत म्हणत आहेत "शेत कां नांगरायला हवे? " पारंपारिक शेतीत जमिनीतील वेगवेगळे स्तर खालीवर केले जाऊन त्यातील पोषक द्रव्येसुद्धा सगळीकडे समान पसरावीत यासाठी शेत नांगरले जाते. शेत नांगरताना जमिनीतील प्राणवायू/हवा देखील मोकळा होतो आणि आधीच्या पिकाचे तण आणि निरुपयोगी/उर्वरित भाग पुन्हा जमिनीत गाडला गेल्याने कुजून जमिनीत मिसळतो. त्याचवेळी जी भुसभुशीत माती शेत नांगरण्याने वरती येऊन पसरली जाते ती वाऱ्याने आणि पावसाच्या/वाहत्या पाण्याबरोबर वाहून गेल्याने सदैव होणारी जमिनीची धूप टाळण्याकरता अनेक नवविचारवादी नांगरणी टाळतात ("no till farming") आणि आधीच्या पिकाचा कापणीनंतर शिल्लक राहिलेला भाग काही काळ तसाच शेतांत पसरून ठेवतात. असा पसरलेला पाने, धाटे असा सगळा "ओला वनस्पतीजन्य" अंश काही काळातच नैसर्गिकरित्या जमिनीत सामावला जातो आणि तोपर्यंत जमिनीच्या सगळ्यात वरच्या थराचे संरक्षण होते. पुढील पीक (आधीचे पीक काय होते हे लक्षात घेऊन निवडलेले) पेरण्याआधी या वनस्पतिजन्य थरात यांत्रिक नांगराने एक खाच पाडली जाऊन त्यातच पेरणी केल्याने तेव्हढ्या खाचेपुरतीच जमीन उघडी पडते. जशी जरूर वाटेल तसा तणनाशक रासायनिक द्रव्यांचा उपयोग केल्याने विघटन होउनही शिल्लक असलेला आधीच्या पिकाचा अंश उपद्रवी ठरत नाही. या पद्धतीत पारंपारिक शेतीत पेरणी आधी करावे लागणारे नांगरणीचे फेरे वाचतात आणि अनेक वेळा अवजड वाहने शेतात फिरल्याने शेतातील मातीचे दबणेही चुकते. आळीपाळीने पिके बदलत ठेवण्याचे फायदेदेखील (कडधान्यॆ पेरल्याने जमिनीला पुन्हा होणारा नत्रवायूचा पुरवठा पुढील पिकाला उपयोगी पडतो, प्रत्येक वेळी वेगळे पीक घेतल्याने आधीच्या पिकाला होणारी रोगराई पुढल्या पिकात पसरत नाही) काही प्रमाणात या पद्धतीत मिळतात. या पद्धतीत वापरले जाणारे तणनाशकाचे प्रमाण पारंपारिक शेतीत वापरल्या जाणाऱ्यां तणनाशकापेक्षा फारसे जास्त नसते. अशा कमी धूप होणाऱ्या जमिनीला रासायनिक खतेसुद्धा कमी प्रमाणात लागतात.

नव-विचार हे फक्त काही काळापुरतेच नाव-विचार रहातात - त्या नंतरही जे इतरांपुढे २-४ पावले रहातात ते नेहेमीच इतरांपेक्षा जास्त सक्षम आणि सदा-हरित राहू शकतात- पण हे नव-विचार भारताकरता कदाचित पुढील काही काळा करता तरी अव्यवहार्य ठरतील कारण भारतीय लोकसंख्येचा बराच भाग रोजगाराकरता शेतीवर अवलंबून आहे आणि राहील तसेच भारतापुरते पाहिले तर शेतीकरता ITEA वगैरे प्रणालीत लागणारी अवाढव्य गुंतवणूक करू शकणारे फार थोडे "शेतकरी" असतील (जर corporate farming किंवा contract farming ही पद्धत सुरू होऊ शकली तर मात्र हे चित्र बदलेल).

तेव्हां काही काळाने तुमच्या ५६ व्या मजल्यावरच्या घराच्या खिडकीत तुम्हाला पाहिजे तसे आणि तेव्हढेच धान्य, भाज्या रोजच्या रोज पिकवून देणारी kit मिळू लागली तर आश्चर्यचकित होऊ नका !

जिज्ञासूनी जास्त माहितीकरता पहावे
http://www.nytimes.com/2009/08/24/opinion/24Despommier.html?_r=0
http://www.verticalfarm.com/
http://www.ibtimes.com/indoor-farming-future-takes-root-abandoned-buildi...
https://www.newscientist.com/article/mg22129524-100-vertical-farms-sprou...
http://www.bbc.com/future/story/20130603-city-farms-to-feed-a-hungry-world
http://www.agriland.ie/farming-news/john-deere-launches-information-enab...
http://farmindustrynews.com/precision-farming/silicon-valley-comes-agric...
http://farmindustrynews.com/blog/precision-farming-roundup-new-products-...
https://en.wikipedia.org/wiki/Precision_agriculture
https://www.accenture.com/in-en/insight-accenture-digital-agriculture-so...
http://cdn.intechopen.com/pdfs-wm/30650.pdf
http://www.ecnmag.com/news/2013/02/smart-agriculture-using-intelligent-s...
http://www.motherearthnews.com/homesteading-and-livestock/no-till-farmin...
https://cropwatch.unl.edu/tillage/advdisadv
http://modernfarmer.com/2013/08/7-facts-till-farming/
http://thefarmerslife.com/environment/what-is-no-till/
http://thefarmerslife.com/environment/farming-smarter-with-cover-crops/
http://www.forbes.com/sites/federicoguerrini/2015/02/18/the-future-of-ag...
http://www.cnbc.com/2015/06/24/vertical-farming-the-next-big-thing-for-f...
http://www.theguardian.com/science/2014/feb/06/vertical-farming-explaine...
https://en.wikipedia.org/wiki/Intensive_farming

(क्रमशः)

धोरणमांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Oct 2015 - 6:09 pm | पैसा

अतिशय आकर्षक कल्पना आहे! प्रत्यक्षात येऊ शकते का?

शेखरमोघे's picture

23 Oct 2015 - 10:55 am | शेखरमोघे

या सगळ्या इतरत्र सुरू झालेल्या कल्पनादेखील इतक्या नव्या आहेत की त्या भारतात प्रचलित आणि व्यवहार्य होण्यास बरीच वर्षे लागतील.

ही संकल्पना अतिशय लहान प्रमाणात वेगवेगळ्या ट्रेंमध्ये मातीचे पातळ थर लावून पॉलिहाउससारख्या बंदिस्त जागेत राबवता येते. अर्थात माहिती तंत्रज्ञानाधारित शेती हा विषय अजून भारतात एव्हढा प्रचलित नाही कारण त्यासाठी लागणारी भांडवळी गुंतवणूक ही फक्त मोठ्या शेतांमध्येच परतावा देऊ शकते. नांगरणीविरहीत शेती ही संकल्पनाही आपल्याकडे प्रामुख्याने छोट्या शेतकर्‍यांना उपयुक्त ठरेल अशी आहे. तथापि, भारतात जितकी सखोल शेती होते ते पाहताही संकल्पना किती शेतकर्‍यांना रुचेल हा प्रश्न आहेच.

अशा प्रकारे शेती केल्यास ,या व्यवसायाला सोन्याचे दिवस येतील ,सध्या प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे,सर्व शेती व्यवसायाचा मुळ पाया आहे, शेती उत्पादनाची योग्य भावात विक्री होणे, उदा: ज्या वेळी बाजारात पाच रूपये किलो या दराने टाम्यॅटो मिळतात त्या वेळी आपण फार खुष होतो , यातील दोन रुपये शंभर दिवस कष्ट करून शेतकऱ्याला व तिन रुपये एका दिवसात दलालाला मिळतात ,कष्ट करण्याची , नवनवीन कल्पना साकारण्यची , त्या साठी लागणारी बौध्दिक क्षमता,जमीन आपल्या कडे भरपूर उपलब्ध आहे. प्रगती साठी देखिल खुप स्कोप आहे.पण या जमाखर्चातच घोडे पेंड खाते .अशा उत्पादन वाढीच्या प्रकल्पाचे निश्चितच स्वागत होईल .

शेखरमोघे's picture

23 Oct 2015 - 10:53 am | शेखरमोघे

आपल्या देशातील प्रत्येक काम इतके "कायद्यानुसार" आणि "रूढीनुसार" चालते. "कायद्यानुसार" शेतकर्‍यानाच (म्हणजे शेतमाल तयार करून विकणारे) नव्हे तर शेतमाल विकत घेणार्‍यानासुद्धा मण्डीतूनच माल विकावा/विकत घ्यावा लागतो आणि प्रत्येक वेळी मन्डीच्या कोष्टकाप्रमाणे दलाली, मालाच्या चढवण्या-उतरवण्यातील तूट, मजूरी, हमाली असा साधारण ८-१० % खर्च सोसावा लागतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याकरता ITC ने सुरू केलेली ITC Chaupal ही "e" यन्त्रणा काही वस्तून्करता तरी यशस्वी ठरली आहे.

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2015 - 9:25 am | बोका-ए-आझम

पण आपल्या देशात कुठल्याही नवीन कल्पनेची वाट लावण्यात राजकारणी लोक हे नेहमीच पुढे असतात. ही योजना जर त्यांना बाजूला सारून राबवता आली तर चालू शकेल पण ते आपल्या देशात अशक्य वाटतं. शिवाय ITEA चा खरोखर फायदा करुन घ्यायचा असेल तर तो फक्त उत्पादनात नाही तर शेतमालाची साठवणूक, वाहतूक आणि खरेदी-विक्री या सगळ्यांमध्ये झाला पाहिजे.

शेखरमोघे's picture

23 Oct 2015 - 10:58 am | शेखरमोघे

पूर्णपणे सहमत. साठवणूक आणि वाहतूक यातील कमतरतेमुळे उत्पादनाचा फार मोठा भाग वाया जातो, तो जरी योग्य नियोजनाने वाचवता आला तरी उपलब्धतेत प्रचन्ड वाढ होईल.