माझे काही "पाहण्याचे" कार्यक्रम... :)

Primary tabs

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
31 Aug 2008 - 6:19 pm

राम राम मंडळी,

(ह्या लेखातल्या ष्टोर्‍या या सूर्याइतक्या सत्य आहेत. परंतु पात्रांची नावे मात्र बदलली आहेत!)

तसा मी वृत्तीने खुशालचेंडूच! आजपर्यंत लग्नकार्य वगैरे काही केलं नाही. नाही, म्हणजे एक मुलगी तशी मला खूप आवडली होती परंतु तिच्याशी काय आपलं लग्न जमलं नाय बुवा! आमच्या हृदयावर पाय का काय म्हणतात तो देऊन एक भल्या इसमाशी विवाह करून ती बया माझ्या लाईफमधून कायमची चालती झाली. परमेश्वर त्या दोघांना सुखी ठेवो. असो, तो विषय डिटेलमंदी पुन्ना केव्हातरी.

तर काय सांगत होतो? हां! तर आपण अजूनपर्यंत लगीनकार्य वगैरे काय केलेलं नाही. अलिकडे एकेका विवाहीत पुरुषांचे हताश, निराश, न्यूनगंडग्रस्त, वैफल्यग्रस्त, भितीग्रस्त चेहेरे पाहिले की मी लगीन केलं नाय, हे एका अर्थी बरंच झालं असं अजूनही मला वाटतं! साला, आपण आपले अद्याप खुशालचेंडू 'भवरा बडा नादान' आहोत तेच बरं आहे! ;)

पण बरं का मंडळी, अद्याप जरी मी लग्न केलेलं नसलं तरी मुली पाहण्याचे कार्यक्रम मात्र आपण अगदी चिक्कार केले बरं का! ती हौसच होती म्हणा ना आपल्याला! मुली पाहण्याचे कार्यक्रम करत होतो तेव्हा लगीन करायचंच नाही असं काय ठरवलं नव्हतं. च्यामारी बगू, आवडलीच एखादी, समजा अगदीच भरली मनात आणि तिनंही जर आपल्याला पसंद केलं तर करूनदेखील टाकू लग्न! हा विचार मनात होताच. साला आता चाळीशीत खोटं कशापायी बोला? :) पण तो काय योग आला नाय. काही मुली मला पसंद पडल्या नाहीत आणि एखाद दोन मुली मला प्रथमदर्शनी पसंद पडल्या, परंतु च्यामारी त्यांना काय आपलं थोबाड आवडलं नाय! :)

ते असो. परंतु मुली पाहण्याचे जे काही कार्यक्रम केले ते काही अणुभव मात्र खरोखरीच मजेशीर होते. आमचे पिताश्री चचलेले आणि म्हातारी जरा पायाने अधू, त्यामुळे मुलगी पाहायला मी नेहमी एकटाच जात असे.

आता मंडळी, मला सांगा की मी तिच्यायला जन्मजात थोराड दिसतो, दोन पोरांचा बाप दिसतो हा काय माझा दोष झाला का? अहो दिसणं काय कुणाच्या हातात असतं का? साला, आम्ही म्यॅट्रिक पास झालो तेव्हाच बीकॉम झाल्यासारखे दिसत होतो त्याला आता आमचा काय इलाज? मग बीकॉम नंतर दोन वर्षांनी तर आम्ही अजूनच थोराड दिसत असणार! त्याचा अनुभव मला लवकरच एक मुलगी पाहायला गेलो होतो तेव्हा आला. एका भल्या मुलीच्या भल्या बापाने त्याच्या नकळतच आमच्या थोराडपणाचे धिंडवडे काढले होते! :)

बोरिवलीचं एक स्थळ होतं. जुजबी पत्रिका जुळली, फोनाफोनी झाली आणि एका रविवारी भल्या सकाळी मी त्या स्थळाचा बोरिवलीचा पत्ता हुडकत हुडकत त्या बिल्डिंगपाशी पोहोचलो. खाली नावांच्या पाट्या पाहिल्या. आमचं भावी सासर दुसर्‍या मजल्यावर होतं. पहिला मजला चढलो. जिन्यासमोरच्याच एका ब्लॉकचं दार उघडं होतं. बाहेरच्याच खोलीत कुणी काकू काही निवडत टीव्ही पाहात बसल्या होत्या. आमची नजरानजर झाली. माझ्या चेहेर्‍यावर नवख्या माणसाचे भाव होते. दुसरा मजला चढण्याकरता म्हणून मी वळलो तर मागून त्या काकूंची हाक ऐकू आली.

"कोण पाहिजे?"

"जोशी दुसर्‍या मजल्यावर राहतात ना? त्यांच्याकडे जायचंय."

"हो, हो, दुसरा मजला, ब्लॉक नंबर १०" काकू हासत हासत म्हणाल्या आणि आत वळल्या. मी तीन-चार पायर्‍या चढलो असेन नसेन, तोच मला त्या काकूंचा संवाद ऐकू आला. त्या बहुधा आपल्या 'अहों'शी बोलत असणार,

"बहुधा आरतीला पाहायला आले असावेत!"

छ्या! साला मी त्या आरतीला पाहायला जाणारा कुणी असेन किंवा तिच्या बापावर कोर्टाचं समन्स बजावणारा कुणी असेन! ह्या काकूला करायचंय काय! :)

दुसर्‍या मजल्यावर पोहोचलो. १० नंबरचा ब्लॉक जोश्यांचाच होता. मी दार ठोठावलं. एका सद्गृहस्थानं दार उघडलं. तो बहुतेक स्वत: जोश्याच असावा.

"नमस्कार. मी अभ्यंकर."

"या, या! आम्ही तुमचीच वाट पाहात होतो!" जोश्या शक्य तितक्या अदबीनं म्हणाला.

मी घरात शिरलो. जोश्या 'बसा' म्हणाला. पुढचा क्षण हा नियतीने आमच्या थोराडपणावर घातलेला घाला होता!

"हे काय? मुलगा कुठे आहे? तो नाही का आला?" जोश्याने आपलेपणाने, भोळेपणाने विचारलंन, परंतु आपण नक्की कुठला बाँब टाकला आहे याची त्या बिचार्‍या जोश्याला कल्पना नव्हती! :)

"मुलगा? अहो मीच मुलगा आहे!" :) :) :)

"हो का? वा वा वा!" जोश्या मनसोक्त हासत उद्गारला! :) :) :) :)

पुढची ष्टोरी सांगवत नाही! :)

तिथनं सुटलो आणि जिने उतरू लागलो. त्या पहिल्या मजल्यावरच्या तांदूळ निवडणार्‍या काकू दारातच उभ्या होत्या. त्या मला खो खो हासत आहेत असा उगाचंच मला भास झाला! :)

------------------------------------------------------------------------------------------------

बिवलकर! मुलुंडचं एक स्थळ. दुपारची ५ ची वेळ. ठरल्या वेळेनुसार मुलगी पाहायला म्हणून मी त्या घरी पोहोचलो. दारावरची बेल दाबली.

एका आठवी-नववीतल्या पोरसवदा मुलीने दार उघडलं. बहुधा नवर्‍या-मुलीची धाकटी बहीण असावी. पत्रिकेत दिलेल्या माहितीनुसार मुलीला एक धाकटी बहीण आणि भाऊ आहेत हे मला आठवलं!

"नमस्कार. मी अभ्यंकर."

ती मुलगी दार उघडून खुदकन हासत आत पळाली. बहुधा ताईला "भावी जिज्जाजी आले बरं का!" हे सांगायला गेली असावी! :)

"या या!"

बिवलकराने माझं स्वागत केलं. खाली कारपेटवर उघड्या अंगाचा बिवलकर बसला होता. बसला कसला होता, पसरलाच होता जवळजवळ! पट्ट्यापट्ट्याची अर्धी चड्डी आणि उघडाबंब! छ्या! या बिवलकराला अगदीच सेन्स नव्हता. अरे तुझ्या मुलीला पाहायला मंडळी येणार आहेत ना? अरे मग निदान लेंगा आणि एखादा साधा शर्ट घालून तरी बस ना! पण मंडळी, मला तरी तो बिवलकर तसाच आवडला होता! सेन्सबिन्स गेला खड्ड्यात! :)

"बसा! काय म्हणताय? घर सापडलं ना पटकन? की शोधायला काही त्रास झाला?"

बिवलकरने जुजबी संभाषण सुरू केलं.

"छ्या! सालं मुंबईत काय भयानक उकडतं हो आजकाल!" एका टॉवेलनं मानेवरचा घाम पुसत बिवलकर म्हणाला! बिवलकराने एव्हाना माझ्यातला व्यक्तिचित्रकार जागा केला होता! :)

एकंदरीत ते घर मला फार आवडलं होतं, बिवलकर आवडला होता. अवघडलेपण जाऊन मीही तिथे अगदी लगेच रुळलो. आतल्या खोलीतून खाण्याचा सुंदर वास येत होता. हम्म! खायचा बेत कहितरी जोरदार असणार!

थोड्या वेळाने नवरीमुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. सोबत बिवलकरकाकूही होत्या. घरगुती साडीतल्या, दात अंमळ पुढे असलेल्या बुटक्याश्या बिवलकरकाकू तेवढ्याच साध्या आणि सालस वाटत होत्या.

"नमस्कार मेहेंदळे!" बिवलकरकाकू म्हणाल्या.

"मेहेंदळे??" साला, आता हा मेहेंदळ्या कोण? मला काही कळेना!

"आग्गं! कम्माल आहे तुझी पण!" बिवलकर डाफरलाच जवळजवळ!

"अगं हे मेहेंदळे नाहीत, अभ्यंकर आहेत!"

बिवलकर आता बायकोवर चांगलाच वैतागला होता. आईने केलेल्या नावाच्या घोटाळ्यामुळे नवर्‍यामुलीचा चेहराही एव्हाना कसनुसा झाला होता.

"अभ्यंकर? अरे हां हां! बरोबर! अभ्यंकरच. सॉरी हां, माझा जरा घोटाळा झाला. मेहेंदळे सात वाजता यायच्येत!"

असं म्हणून भाबडेपणाने, मोकळेपणाने हासत काकू उद्गारल्या! छ्या! मला तर आता त्या मुलीपेक्षा काकूच जास्त आवडू लागल्या होत्या! :)

इथे बिवलकराच्या कपाळावर पुन्हा एकदा आठ्या चढल्या होत्या. वेंधळ्या बायकोने मेहेंदळे नावाची कुणी अजून एक पार्टी त्यांच्या मुलीला पाहायला सात वाजता येणार आहे ही माहिती उगाचंच उघड केली होती! :)

नवर्‍यामुलीशी, बिवलकर फ्यॅमिलीशी माझ्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. जरा वेळाने मात्र त्या बिवलकरकाकूंचा मी आजन्म ऋणी राहीन असा बेत पुढ्यात आला. अप्रतीम चवीचा वांगी-भात, सोबत तितकीच सुंदर काकडीची कोशिंबिर आणि घरी केलेली अतिशय सुरेख अशी नारळाची वडी! माझ्यातला लाजराबुजरा नवरामुलगा केव्हाच पळाला होता आणि रसिक खवैय्या जागा झाला होता. मी मनमुराद दाद देत त्या बेतावर तुटून पडलो! स्वत: बिवलकर आणि बिवलकर काकू मला आग्रहाने खाऊ घालत होते. वांगीभाताचा आग्रह सुरू होता, नको नको म्हणता दोनपाच नारळाच्या वड्याही झाल्या होत्या!

"अहो घ्या हो अभ्यंकर! अहो लग्न जमणं, न जमणं हे होतच राहील. पण तुम्ही इतकी दाद देत आपुलकीने खाताय हीच आमच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे!" बिवलकरकाकूंमधली अन्नपूर्णा प्रसन्नपणे मला म्हणाली!

मंडळी, बिवलकरांच्या मुलीने मला पसंद केलं की नाही किंवा मी तिला पसंद केलं की नाही हा भाग वेगळा, परंतु आजही वांगीभात म्हटलं की मला बिवलकरकाकू आठवतात! तसा खमंग आणि चवदार वांगीभात मी पुन्हा कधीच खाल्ला नाही!

-- तात्या अभ्यंकर.

अनुभवप्रतिभाविरंगुळाकथावाङ्मय

प्रतिक्रिया

नंदन's picture

31 Aug 2008 - 6:29 pm | नंदन

लेख, तात्या. लेखाची शैली तुझ्या नेहमीच्या शैलीपेक्षा थोडी वेगळी वाटली. दोन्ही किस्से मजेदारच. बिवलकर काकूंची प्रतिक्रियाही आवडली. अजूनही असेच किस्से असतील, तर ते वाचायला आवडतील. (बोरिवली, मुलुंड ही सुरुवातीची दोन टोकं झाली -- आता हळूहळू मुंबईकडे सरकायला हरकत नाही ;))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आजानुकर्ण's picture

31 Aug 2008 - 6:53 pm | आजानुकर्ण

शैलीतील बदल सुखावह आहे.

आपला,
(उपवर) आजानुकर्ण

मेघना भुस्कुटे's picture

31 Aug 2008 - 7:58 pm | मेघना भुस्कुटे

असेच म्हणते!
सात्विक वाचून नाही म्हटलं तरी जरा कंटाळा आलाच होता. हे वाचताना धमाल येतीय. :) लवकर लिहा आणखी अनुभव असतील तर.

धनंजय's picture

2 Sep 2008 - 3:58 pm | धनंजय

ही शैलीही उत्तम हाताळली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2008 - 6:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त तात्या,

"हे काय? मुलगा कुठे आहे? तो नाही का आला?"
"अभ्यंकर? अरे हां हां! बरोबर! अभ्यंकरच. सॉरी हां, माझा जरा घोटाळा झाला. मेहेंदळे सात वाजता यायच्येत!"

हे सहीच!

आता मिपावर कांदापोह्यांची जागा वांगीभात घेणार का?

अदिती

शैलेन्द्र's picture

31 Aug 2008 - 6:33 pm | शैलेन्द्र

वा तात्या... मानला तुम्हाला...

चतुरंग's picture

31 Aug 2008 - 6:38 pm | चतुरंग

लिहिणार असं मागं म्हणाला होतात तात्या, तसं खरंच लिहिलंत की!
बिवलकरांचा किस्सा खरंच मनोरंजक आहे. कुठलीही परीटघडीची भीडभाड न बाळगता वांगीभात चापण्याची आणि नारळाच्या वड्या खात त्यांचे कौतुक करण्याची तुमची रसिकता भावली!;)
अजूनही असे अस्सल किस्से येऊदेत!

(खुद के साथ बातां : गाण्याचा कोणी शौकीन भेटला आणि बघायच्या कार्यक्रमाऐवजी गाण्याची मैफिल करुनच तात्या आले असा एखादा किस्सा असेल का रे रंगा? B) )

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2008 - 6:43 pm | बिपिन कार्यकर्ते

ह. घ्या.

(खुद के साथ बातां : गाण्याचा कोणी शौकीन भेटला आणि बघायच्या कार्यक्रमाऐवजी गाण्याची मैफिल करुनच तात्या आले आणि म्हणूनच ते स्थळ हातचे गेले असा एखादा किस्सा असेल का रे रंगा? )

बिपिन.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2008 - 6:41 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त... नंदनशी सहमत.

"मुलगा? अहो मीच मुलगा आहे!" :)

"हो का? वा वा वा!" जोश्या मनसोक्त हासत उद्गारला! :) :)

कसला पोपट .....

बिपिन.

भडकमकर मास्तर's picture

31 Aug 2008 - 9:12 pm | भडकमकर मास्तर

तात्या, भाग आवडला...
..... मी तीन मुली घरी जाऊन पाहिल्या, त्या आठवणी जागृत झाल्या......
पोरींच्या बापांशी जाम अवांतर / फाल्तु विषयांवर बोलावं लागतं.... ( त्या वेळी मी मोरूची मावशी नाटकात काम करत असे...मग काय, मुलीच्या बापाशी अत्र्यांची नाटकं याविषयावर काहीबाही बोलत वेळ काढला...आणि पोरीने चकार शब्द काढला नाही...)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

रेवती's picture

31 Aug 2008 - 7:10 pm | रेवती

तात्या,
आपण हे अनुभव मोकळेपणाने सगळ्यांना सांगताय ह्याचेच कौतुक आहे.
मला वाटते बरेच जण आपापले असे अनुभव सांगतील आता!
वांगीभाताचा किस्सा आवडला. इतके मनमोकळे लोक आता कमीच झालेत.
चचलेले या शब्दाचा अर्थ समजला नाही.

रेवती

विसोबा खेचर's picture

1 Sep 2008 - 12:46 am | विसोबा खेचर

रेवती,

चचलेले या शब्दाचा अर्थ समजला नाही.

चचणे म्हणजे मरणे. आमच्या गुरुजींनी "अंतुबर्वा" ह्या लेखात हे क्रियापद वापरले आहे! :)

तात्या.

शैलेन्द्र's picture

31 Aug 2008 - 7:17 pm | शैलेन्द्र

चचलेले== देवाघरि गेलेले..

रेवती's picture

31 Aug 2008 - 10:37 pm | रेवती

मला माहीत नव्हते.

रेवती

टारझन's picture

31 Aug 2008 - 8:13 pm | टारझन

असं म्हणून भाबडेपणाने, मोकळेपणाने हासत काकू उद्गारल्या! छ्या! मला तर आता त्या मुलीपेक्षा काकूच जास्त आवडू लागल्या होत्या!

तात्या .. असं माझं टिन एज मधे व्हायचं बॉ ... आता चोविशीत खोट काय बोलू ... लेखणात मला पु.लंचा प्रभाव दिसला.
उत्तम लेख ... वास्तविकता डायरेक्ट डोळ्यासमोर

आमचाही एक किस्सा :
.......... मावसभावाच्या लग्नासाठी २ वर्षांपुर्वी नासकात गेलो होतो. सकाळी मुलीकडच्यांनी राहण्या साठी घर दिलेलं..अंघोळ आणि नाष्ट्याची सोय होती . दुसर्‍या दिवशी सगळं आवरून नाष्ट्यासाठी जाणार तोच २ टोपड्यांनी मला पकडलं. माझं शिक्षण आणि मी कोण हे पुर्ण माहित होतं त्यांना. पण मी त्यांना ओळखत नव्हतो. मला म्हणे इथे अंमळ गर्दी आहे, आपण आमच्या घरी चलावे. मी म्हंटलं असंल कोणी तरी पोरीकडचा, इथला खाऊ संपला म्हणून आपली खास व्यवस्था केली असेल. मी होकार द्यायच्या २ मिनीटात एका रिक्षात कोंबून मला त्या घरी नेण्यात आलं. मी फक्त नाष्टा करायला जायचं या मानसिकतेत होतो. १० मिनीटावर घर होतं .

......... मस्त २ मजली बंगला होता, बाहेर धान्य वगैरेचं गोदाम , ट्रॅक्टर , एक जिप ..घरामागे मोठ्ठ वावर. एक द्राक्षाची बागही होती साइड ला. फॅमिली बक्कळ पैका वाली असावी.मी येण्याची आधीच कल्पना आहे की काय आत सगळं नीट नेटकं आवरलेलं, एका बाजुला झोक्यावर त्या घरातले पुराणपुरूष झोका घेत लिहिता आणि उच्चारता न येणारा झोक्याचा आवाज करत शांतता भंग करत होते. हॉल मधे लाकडी सोफे त्यावर कुशनच्या उशा (हे मला बिककुल कंफर्टेबल वाटलं नाही) आणि उत्तम बैठकीची व्यवस्था होती. कुठे कोणी पादलं तरी एका मोठ्या दिवाणखाण्यात सगळी फॅमिली वास हवेत विरायच्या आत जशी जमा होते इथे सगळी फॅमिली हजर. कर्णधाराने फिल्डींग लावल्याप्रमाणे सगळे आपापल्या पोझिशन वर होते. घरातले कर्ते आणि मुखिया वाटनारे गृहस्थ ३-४ लटकेलछाप लोकांना घेउन बसले होत.त्यांची मुले पण एका कोपर्‍यात बसलेली. एक जण आभ्यास करत होता (एप्रिल मधे अभ्यास? मी ताडले ते बेनं नुसतं नाटक करत होतं ) सुना स्वयंपाक घरातुन डोकवत होत्या. १२-१५ वर्षांच्या ३ मुली उगाच मला पाहून एकादा लै भारी विनोद झाल्यावर ह ह पु वा व्हावी तशा(किंवा पौराणिक मालिकांमधल्या राजकन्या व तिझ्या मैत्रिणी जशा कारण नसताना हसतात तशा) उगाच हसून एकडून तिकडून येऊन स्वैंपाकघरात पळत होत्या. मी अजुन ही निरागस मनाने गंमत पहात, मी मुलाचा भाउ आहे म्हणून आपल्याला काही फॉरेन रिटर्न सारखी वागणुक मिळते आहे असे समजुन फुगत होतो. मी आल्यावर सगळेच आपल्याघरी कृष्ण दही चोरायला आला असा आनंद त्यांना झालेला. सगळे उभे राहिले. आणि "आमच्या घरी चला" म्हणनारे कुठे तरी धान्याच्या पोत्यांवर विराजले.अजुनही ट्युब पेटत नव्हती. मग घरातुन चहा आला. आम्ही अंमळ बोर माणूस , चहाच्या बाबतीत बाजीराव नखरे फार. "चहा नको .. मला त्याबरोबर गुडडे ची बिस्किटे लागतात." असं म्हंटल्याबरोबर एका आदेशासरशी अभ्यास करणारं(!!) ते बेनं बाणासारखं बाहेर पळालं मोजुन २ मिनीटात चहा गार व्हायच्या आत माझ्या पुढ्यात बिस्किटे हजर. आपण ऑलिंपीक मेडल जिंकल्याचा आनंद त्याच्या तोंडावर स्पष्ट दिसत होता.

च्या-बिस्किटं झाल्यावर, एक काकू मला स्वयंपाक घरातुन येत आहेत असं मला ८० अंशाच्या कोनातुन दिसलं.. त्यांच्या मागे एक गोरी पान,सुंदर,ऍव्हरेज उंचीची मुलगी मस्त साडी घातलेली, पदर थोडा डोळ्यांपर्यंत , हातातल्या ट्रे भल्या मोठ्या ट्रे मधे पोहे, बालुशाही,गुलाबजाम, समोसे, आणि अजुन कसलासा पदार्थ होता. चहा+बिस्किट नाकात गेलं आणि खोकला लागला .४४० किलो व्होल्टचा झटका लागावा आणि काळजात धस्स्स व्हावं आणि मति खुंटावी असलं फिलींग मला पुर्वी कधीही आलं नव्हतं.मला परिस्थितीची कल्पना आल्यावर सावरायला ५-१० सेकंद गेले. मी बावळटासारखा तिच्याकडे पहात होतो. आयला "आपल्याला दाखवण्याचा" प्रोग्रॅम आहे , ही गोष्ट पटतच नव्हती. मी खरोखर स्वता:ला पिंच करून पाहिलं. बापरे.. मी जाम घाबरलो. पोहे खाऊन झाले. गुलाबजाम मला आवडतात हे सिक्रेट माहिती असावं , मोठ्याबाउल मधे २०+ गुलाबजाम होते. मी कसे बसे (जबराइच्छा होत असताना) फक्त ६-८ गुलाबजाम खाल्ले. आणि त्या कर्त्याने डायरेक्ट विषयाला हात घातला.
"काय मंग जावायबाप्पू .. पोरगी पसंत का ? आम्हाला तुम्ही कालच पसंत पडले ........." असली खतरा सुरूवात ...( आयचा घो ... टार्‍या ... तुझी कन्यारास यावेळी कशी गप्प बसली बे ?) माझी बोलती बंद झालेली .. मी त् त् प् प् करत होतो. मी म्हणालो मी असला विचार नाही हो केला अजुन .. मी तर आजुन जॉबलेस आहे हो .. त्यावर ते म्हणाले आवो .." कुटं चाकर्‍या करत बसता .... आमची बागायती हाय, द्राक्ष, कापशी आन् उसाचं आमुक आमुक मिळतं .. " खुल्लमखुल्ला ऑफर ? मला काहीही सुचत नव्हतं ... चहा-पोहे खाऊन नाय कसं म्हणू याचं बळच जिवावर आलेलं... कसं बसं बडबडायला लागलो (मला सुचलं नाही की उगाच इंग्लिश बोलायची सवय आहे) ... मी इंग्लिश सुरू झाल्यावर तर सगळे लोक अजुन ४ पावलं पुढे सरकुन मी काय बोलतोय हे ऐकत आहेत असा भास मला झाला.आईशी चर्चा करावी लागेल, असं पटेबल कारण देत शेवटी कसा बसा निसटलो ..

जाताना पोरीकडे एक फिल्मी लुक दिला, बिचारी 'चक्क' लाजली आणि मी 'तिला नाही म्हणनार आहे' हे शल्य मनात ठेउन निघालो .
(समाप्त)

अविवाहित
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

भडकमकर मास्तर's picture

31 Aug 2008 - 9:13 pm | भडकमकर मास्तर

टार्‍या, आवडला रे तुझा लेख....
:):) ...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

1 Sep 2008 - 11:35 am | स्वाती दिनेश

बा टारझना,तुझा किस्सा वाचल्यावर कसे काय त्या (अचानक उद्भवलेल्या) प्रसंगाला तू (गुलाबजाम खात खात)तोंड दिले असशील ते दृश्य डोळ्यासमोर आले,:)
स्वाती

लिखाळ's picture

1 Sep 2008 - 3:33 pm | लिखाळ

टारझन महाशय,
किस्सा मस्तच.. फारच जोरात !

>>मी आल्यावर सगळेच आपल्याघरी कृष्ण दही चोरायला आला असा आनंद त्यांना झालेला. हा हा हा.. हे फारच मस्त !

--लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Sep 2008 - 3:52 pm | बिपिन कार्यकर्ते

टार्‍या, दही थोडंसं तरी चाखून बघितलं का रे? म्हणजे गोड का आंबट ते तरी कळलं असतं... ;)

बिपिन.

टारझन's picture

1 Sep 2008 - 4:44 pm | टारझन

नको .. दह्याची चव घेतली असती तर तिथेच लोणी घुसळायचा जॉब मिळाला असता ...आणि पोती वहावी लागली असती (सुचक डांबिस कृपा)
आणि आज इमानात बसून आफ्रिकेत मज्जा मज्जा करायला भेटली नसती .. दही खाण्यापेक्षा टस्कर देणे सोप्पे :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Sep 2008 - 4:51 pm | बिपिन कार्यकर्ते

असो... हा विषय आपण इथे (म्हणजे ह्या धाग्यावर) थांबवू... रात्री प्रत्यक्ष बोलू... टिंग्याचे मतही विचारात घेता येईल... ;) काही नाही तुझी काळजी वाटते म्हणून हा उपद्व्याप :S

बिपिन.

संदीप चित्रे's picture

2 Sep 2008 - 8:04 pm | संदीप चित्रे

>> आयला "आपल्याला दाखवण्याचा" प्रोग्रॅम आहे
हहपुवा टार्‍या :)

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2008 - 7:43 pm | बिपिन कार्यकर्ते

टार्‍या, तसंही तुला कोणाला नाही म्हणायाला अंमळ जडच जातं, विशेषतः काका लोकांना.... मला माहित आहे. कसला प्रसंग गुदरला रे तुझ्यावर. माणसं काय काय थराला जातात. मस्त लिहिलं आहेस.

बिपिन.

यशोधरा's picture

31 Aug 2008 - 8:26 pm | यशोधरा

तात्या, मस्तच लिहिलंत!! बिवलकर काकू एकदम आवडल्या! :) आणि तुम्ही हे अनुभव मोकळेपणे लिहिताय हे ग्रेट!
टार्‍या , सह्हीच रे!! त् त् प् प् एकदम झक्कास!! =))

विनायक प्रभू's picture

31 Aug 2008 - 8:27 pm | विनायक प्रभू

आवड्ले मज आवड्ले. मनापासुनी आव्ड्ले.
विनायक प्रभु

ब्रिटिश टिंग्या's picture

31 Aug 2008 - 9:35 pm | ब्रिटिश टिंग्या

टार्‍या अन् तात्या दोघांचेही अनुभव मस्त!

(अननुभवी) टिंग्या :)

केशवसुमार's picture

31 Aug 2008 - 9:50 pm | केशवसुमार

तात्याशेठ,
वेगळ लेख.. किस्से आवडले..
प्रेवि मुळे आमच्या आयुष्यात 'कांदापोहे' खायचा योग काही आला नाही.. राहीन गेलेल्या गोष्टी..
अशी पाहून न जमलेली मुलगा मुलगी नंतर कधी भेटले तर त्या दोघांना काय वाटत असेल? हा विचार नेहमी मनात येतो..
(प्रेवि)केशवसुमार

भडकमकर मास्तर's picture

31 Aug 2008 - 10:18 pm | भडकमकर मास्तर

अशी पाहून न जमलेली मुलगा मुलगी नंतर कधी भेटले तर त्या दोघांना काय वाटत असेल? हा विचार नेहमी मनात येतो..
(प्रेवि)केशवसुमार

हा एकांकिकेचा झकास विषय असू शकतो...
यावर संवाद पाडीन म्हणतो...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

रेवती's picture

31 Aug 2008 - 10:55 pm | रेवती

हा विचित्र प्रसंग माझ्या भावाच्या बाबतीत घडला आहे. त्याचे लग्न ठरले व होणार्‍या वहिनीला घेऊन मी, भाऊ, वहिनी, माझा नवरा व मुलगा असे आत्याकडे गेलो तर तीने सांगितले की तीचे आणखी एक नातेवाईक त्यांचा मुलगा व होणारी सून असे भेटायला येणार आहेत. जेंव्हा ते आले (म्हणजे अजून दरवाजातच होते) माझ्या भावाचा व त्या आलेल्या नातेवाईकांच्या सूनेचा चेहरा पडला. त्या दोघांशिवाय कुणालाही याबद्द्ल माहीत नव्हते (माझ्या आई बाबांना माहीत होते पण ते आमच्याबरोबर नव्हते). हॅलो म्हणून झाल्यावर भाऊ व माझी होणारी वहिनी स्वयंपाकघरात जाउन बसले. आम्ही तेथून लवकर सटकलो हे सांगायला नको.

रेवती

वाचक's picture

2 Sep 2008 - 5:11 am | वाचक

ह्यांची एक गोष्ट आहे - कथा संग्रहाचे नाव आत्ता आठवत नाहिये - पण मुलगा त्या मुलीला 'काकूबाई' समजून नकार देतो आनि मग ती मुलगी त्याच्या घरी येउन त्याची उलटतपासणी घेतल्यासारखे प्रश्न विचारुन त्याला निरुत्तर करते - संवाद अप्रतिम

मेघना भुस्कुटे's picture

2 Sep 2008 - 7:04 am | मेघना भुस्कुटे

'आमच्यावर कोण प्रेम करणार?' - 'तेंडुलकरांच्या निवडक कथा'मधे समाविष्ट.

वाचक's picture

2 Sep 2008 - 8:09 am | वाचक

आत्ताच बेसमेंटमधे जाउन बघितले पुस्तक - धन्यवाद मेघना

पद्मश्री चित्रे's picture

1 Sep 2008 - 4:51 pm | पद्मश्री चित्रे

आणि प्रांजळ. आवडला.

>>अशी पाहून न जमलेली मुलगा मुलगी नंतर कधी भेटले तर त्या दोघांना काय वाटत असेल? हा विचार नेहमी मनात येतो

मी बघितलेला एक मुलगा माझ्याच ऑफीस ला होता, पण पुण्यात. पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांच्या नावावर काट मारली.पण बढ्त्या -बद्ल्या घेत घेत आम्ही २ वर्षापूर्वी एकाच ऑफीस ला आलो. प्रथम एक्मेकानां बघुन दचकलो,ऑकवर्ड वाटलं. आधी बरेच दिवस बोललोच नाही. टाळायचोच बोलणे.पण हळु हळु सगळं नॉर्मल झालं. आता आम्ही अगदी छान सहकारी मित्र आहोत.
( हा लेख त्यानेच आधी वाचला आणि मला वाचायला सांगितला.. आणि खूप हसलो..)

सहज's picture

31 Aug 2008 - 10:26 pm | सहज

तात्या आणि टार्‍या किस्से आवडले.

:-)

प्रेवि जिंदाबाद!

मदनबाण's picture

1 Sep 2008 - 4:19 am | मदनबाण

हेच म्हणतो..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

ऋषिकेश's picture

31 Aug 2008 - 10:36 pm | ऋषिकेश

हा हा! छानच!
तात्या, मस्त विषय आणि लेखनशैली! अजून येऊ द्यात.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

पिवळा डांबिस's picture

31 Aug 2008 - 10:57 pm | पिवळा डांबिस

आमचा प्रेमविवाह असल्याने कांदेपोह्यांची बैठक हा विषय अपरिचित, पण तात्याने वर्णन केलेले अनुभव वाचून =))
विशेषतः स्वतःचा झालेला पोपट मनमोकळेपणाने चित्रित करण्याची इष्टाईल आवडली....:)
हे खरंच असं असतं का हो? की काल्पनिक? ;)

अप्रतीम चवीचा वांगी-भात, सोबत तितकीच सुंदर काकडीची कोशिंबिर आणि घरी केलेली अतिशय सुरेख अशी नारळाची वडी! मी मनमुराद दाद देत त्या बेतावर तुटून पडलो!
तात्या, हे मात्र खूप आवडलं!! अरे, भोजन सत्य, पोरगी मिथ्य:!

[स्वगतः हे परमेश्वरा, अशा प्रसंगातून सोडवल्याबद्दल मी तुझा आजन्म ऋणी राहीन!!:) पण प्रेमविवाहातही सगळं साधं-सोपं असतं असं समजू नका मंडळी! आता त्या अनुभवावरही एक लेख लिहायला हवा!! :X ]

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2008 - 11:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
किस्से आवडले आणि लिहिण्याची शैलीही.

मी घरात शिरलो. जोश्या 'बसा' म्हणाला. पुढचा क्षण हा नियतीने आमच्या थोराडपणावर घातलेला घाला होता!

"हे काय? मुलगा कुठे आहे? तो नाही का आला?" जोश्याने आपलेपणाने, भोळेपणाने विचारलंन, परंतु आपण नक्की कुठला बाँब टाकला आहे याची त्या बिचार्‍या जोश्याला कल्पना नव्हती!

हा हा हा हा =)) असा प्रसंग तर दुश्मनावरही येऊ नये.

प्रियाली's picture

31 Aug 2008 - 11:31 pm | प्रियाली

माझा स्वतःचा असा अनुभव नसल्याने अशा प्रसंगांना कधी तोंड द्यावे लागले नाही. अर्थात, देण्याची इच्छाही नव्हती. :) पण तुमचे किस्से आवडले.

मस्त!

मृदुला's picture

31 Aug 2008 - 11:35 pm | मृदुला

मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात वांगीभात! मजा आहे.
पहिल्या किश्श्यातल्या जोशीकाकांना मुलगा एकटा येणे अपेक्षित नसावे बहुतेक. आणि पुढे झालेले गृहस्थ ;-) मुलगा नसावेत असे वाटले असावे.

मी मुलगा बघायला अशी एकदाच एका मुलाच्या घरी गेले होते. त्याच्या आईशी पुष्कळ गप्पा मारून परतले. बाकी इतर वेळी मुलगा व मी एखाद्या उपहारगृहात एकमेकांना पाहून घेत असू. अश्या प्रकारात भरपूर मित्र झाले. बहुतेकांची आता लग्ने (एकेक) झाली आहेत. संपर्क अधून मधून होतो. त्यात काही विशेष वाटत नाही. (रेवती यांच्या अनुभवाचे आश्चर्य वाटले.)

रेवती's picture

1 Sep 2008 - 12:29 am | रेवती

रेवती यांच्या अनुभवाचे आश्चर्य वाटले
धक्का बसला, कि आता हे इथे कुठे आलेत? किंवा आपण इथे अगदी आत्ताच का आलो?. त्यानंतर वर्षभरात माझ्या आईला सूनेच्या डोहाळेजेवणाचे आमंत्रणही आले. त्यावेळेस काही विचित्र वाटले नाही. आधी माहीत असणे की कोण भेटणार आहेत व दाखवण्याच्या कार्यक्रमात ओळख होताना कीती मोकळेपणा (बोलण्यात) मिळाला यावरही गोष्टी अवलंबून असतात.

प्राजु's picture

31 Aug 2008 - 11:39 pm | प्राजु

तात्या,
एकदम मस्त आहेत दोन्ही अनुभव. आणि हो,खरंच लेख शैली मध्ये बदल जाणवला बरं. हरकत नाही .
पण मला एक प्रश्न पडला आहे.. तुम्हाला मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये वांगी भात आणि कोशिंबीर बरी मिळाली हो!!!;) नाहीतर जनरली, चहा-पोहे असाच बेत असतो . म्हणून तर त्याला मुलगी पाहण्याचा किंवा दाखवण्याच्या कार्यक्रम न म्हणता चहा पोह्याच्या कार्यक्रम म्हणतात. क्वचितच कधी तरी पोह्याच्या जागी उपमा आणि उन्हाळा असेल तर चहाच्या जागी सरबत असा बदल होतो.. ;)
लेख आवडला हे सां न ला. पण हे काय दोनच अनुभव... अजून बरीच मुंबई बाकी आहे ना!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनस्वी's picture

1 Sep 2008 - 10:04 am | मनस्वी

तात्या, सहीच आहेत किस्से! आवडले.
टार्‍या, तुझा अनुभवही भन्नाट होता.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मृगनयनी's picture

1 Sep 2008 - 10:58 am | मृगनयनी

तात्या जी, टार्या जी.... मस्त....!..... असे प्रसंग तर आयुष्याच्या उत्तरार्धात जीवनाची लज्जत वाढवतात......

(स्पश्टीकरणः जीवनाच्या पुर्वार्धात घडलेले हे प्रसंग उत्तरार्धात आठवून... आपल्या जोडीदाराबरोबर शेअर करताना..... अंमळ तरुण झाल्यासारखं वाट्टं.. नै...!!! :) )

बाकी लग्न-गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात.... हेच खरं!!!

:)

स्वाती दिनेश's picture

1 Sep 2008 - 11:31 am | स्वाती दिनेश

तात्या,
लेख आवडला.चहापोह्यांच्या कार्यक्रमाला 'वांगीभात' वाचून आश्चर्यही वाटले.इथे जर्मनीतही आमच्या एका मित्रासाठी असा एक जर्मन कार्यक्रम केला होता त्याची आठवण झाली.
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2008 - 2:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त आहे तुझी गोष्ट!

अजिंक्य's picture

1 Sep 2008 - 12:28 pm | अजिंक्य

दोघांचेही (दोन्ही) अनुभव मस्त....
(तात्या, तुमचं डेअरिंग जबरदस्त आहे. नाहीतर स्वतःबद्दलचे अनुभव 'शेअर' करणं कठीण असतं.)
(टारझनचं ठीक आहे - तो 'बघायला' न जाताही गुलाबजाम खाऊन आला - =)) )

-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.

झकासराव's picture

2 Sep 2008 - 4:09 pm | झकासराव

गुलाब जाम खाने के लिये हम कुछ भी कर सकते है :)
तात्या आणि टारु दोघांचे अनुभव भारीच रे.
आम्हाला असला अनुभव नाय मिळाला प्रे वी मुळे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सर्किट's picture

1 Sep 2008 - 12:49 pm | सर्किट (not verified)

तात्या,

तुझे एकंदरीत व्यक्तिमत्व बघता, तुझे लग्न होणे नाही. वाटल्यास धोंडोपंतांना विचार. उगाच का त्या मुलींना आणि त्यांच्या बापांना त्रास देतोस ?

-- सर्किट

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2008 - 2:41 pm | प्रभाकर पेठकर

तात्या,
अनुभवकथन मस्त आहे. वांगी भाताचे मलाही आश्चर्य वाटले. सहसा अशा कार्यक्रमात 'चहा-पोहे'च असतात. असो. त्यांनी नविन प्रथा सुरू केली असेल. पण ती चांगली आहे. मुलीला चांगले पोहे करता येण्या पेक्षा चांगला 'वांगी भात' येतो हे नवरदेवाच्या मनात ठसविले की ती जेवण उत्तम बनवत असेल असा अंदाज बांधता येतो. 'वांगी भाता'सारखी तुलनात्मक दृष्ट्या कठीण पाककृती येणार्‍या मुलीस पोह्यांसारखी साधी पाककृती येतच असणार. पण चांगले पोहे केले म्हणजे उत्तम स्वयंपाक जमेलच असे सांगता येत नाही. असा विचार त्यांनी केला असावा.

नको नको म्हणता दोनपाच नारळाच्या वड्याही झाल्या होत्या!
दोनपाच नारळांच्या वड्या की नारळाच्या दोनपाच वड्या? आयला मला फार आवडतात बुवा.

टारझन ह्यांचा अनुभवही 'रोमहर्षक' आहे. अभिनंदन.

लिखाळ's picture

1 Sep 2008 - 3:28 pm | लिखाळ

तात्या,
फार मस्त लेख. आवडला.
आता बिवलकर काकांचे व्यक्तिचित्रपण येउद्या !
-- (नुकतेच वांगीभात खाल्लेला) लिखाळ.

पावसाची परी's picture

1 Sep 2008 - 3:39 pm | पावसाची परी

>>टारझनचं ठीक आहे - तो 'बघायला' न जाताही गुलाबजाम खाऊन आला -
मस्तच रे टार्‍या
पोरी फिदा आहेत म्हण्जे या खविसटल्यावर
टार्‍या आज तुझा अनुभव वाचुन मी हसुन हसुन मेले रे
जियो दोस्ता!

शितल's picture

1 Sep 2008 - 5:27 pm | शितल

तात्या,
अफलातुन अनुभव आहे हो तुमच्या पाठीशी. :)
बिलवलकर काकु तर अगदी मजेशीर वाटल्या.
पण पोटभर खाऊन आलात हे बरे केलेत :)

टार्‍या,
मस्त अनुभव बॉ तु़झा,
गुलाबजाम कसे खाल्ले असशील हे चित्र डोळ्यासमोर उभे राहत आहे. :)

सुचेल तसं's picture

1 Sep 2008 - 6:52 pm | सुचेल तसं

तात्या,
लै भारी अनुभवकथन !!!

टारझनचा अनुभव पण आवडला...

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

सुनील's picture

1 Sep 2008 - 7:27 pm | सुनील

तात्या आणि टार्‍या दोघांचेही किस्से मजेशीर.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनीषा's picture

2 Sep 2008 - 12:21 am | मनीषा

दोन्ही किस्से मस्तच ...
वांगीभात, काकडीची कोशींबीर, नारळाच्या वड्या ... मेनू आवडला

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Sep 2008 - 6:58 am | llपुण्याचे पेशवेll

तात्या एक नंबर झाला आहे लेख.. मी पहील्यांदा नजरचुकीने पाहण्याचा ऐवजी पोहण्याचा असे वाचले होते त्यामुळे वाटले की मस्त मुटके, सूर वगैरे मारल्याचे किस्से असतील. पण पहीला परिच्छेद वाचल्यावर कळले ते पोहणे नसून पाहणे आहे. :)
पुण्याचे पेशवे

ईश्वरी's picture

2 Sep 2008 - 7:27 am | ईश्वरी

तात्या , मस्त लेख. दोन्ही किस्से मजेशीर वाटले. पाहण्याच्या कार्यक्रमाला वांगीभाताचा बेत तर अफलातून होता.
ईश्वरी

प्रकाश घाटपांडे's picture

2 Sep 2008 - 9:19 am | प्रकाश घाटपांडे

दचकु नका ? विवाह आणि ज्योतिष या विषयावरील या माझ्या पुस्तकाचे हे नांव आहे. तसे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ..... यात हा विषय आनुषंगिक म्हणुन घेतला आहेच. लोकांना ज्योतिष विषय हा प्रसंगवशात चघळायला आवडतो. लग्नाच्या मार्केट मधे हा विषय चांगला चघळला जातो.
मग आम्ही या विषयावर २००४ मध्ये परिसंवाद घडवुन आणला आणि त्यानिमित्ताने पुस्तकाचे प्रकाशन केले. परिसंवादात पालकांच्या वतीने अनुरुप वधुवर सुचक मंडळाचे महेंद्र कानिटकर , साथ साथ च्या विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी, ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांना बोलते केले होते. अनिल अवचटांच्या हस्ते कार्यक्रम घडवुन आणला होता.
(स्वतः पत्रिका न पाहता रजिस्टर्ड लग्न केलेला)
प्रकाश घाटपांडे

अनिल हटेला's picture

2 Sep 2008 - 9:49 am | अनिल हटेला

तात्या !!

मस्तच लिहीलये !!

अगदी असे अनुभव शेयर करण्याच डेरींग आवडल आपल्याला ..

टारोबा !!

तु गुलाब जामुन वर भागवलस ,हे बर केल !!

बाकी आज मना पासुन हसलो !!

हापीसातील चीने माझ्या थोबाडा कडे बघतायेत ( आता तर चांगल होत !! ह्या अर्थानी )

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सागररसिक's picture

2 Sep 2008 - 11:43 am | सागररसिक

माझे सुधा कहि अनुभव अहेत .
जरा लिखनाचा सराव करतो :)

रामदास's picture

2 Sep 2008 - 11:51 am | रामदास

बघायला दोन आत्या आणि दोन बहिणी असं पॅनल आलं होतं.
नंतर मुलीसोबत आणखी एक पॅनल आलं.
नंतर पावसामुळे मुंबईत अडकलो, तेव्हा आणखी एक पॅनल येउन गेलं.
मुलगा दोन दिवस घरी आला नाही म्हणून पॅनल धास्तावलं.
पोहे मीच केले होते.

सुनील's picture

2 Sep 2008 - 12:05 pm | सुनील

हो, पण पुढे काय झाल? की बोहल्यावरून पलायन?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रामदास's picture

2 Sep 2008 - 8:11 pm | रामदास

छे ! छे!
रामदास लग्नानंतर दहा वर्षानी झालो.

अवलिया's picture

2 Sep 2008 - 3:11 pm | अवलिया

अफलातुन धमाल किस्से
तात्या
अजुन येवु द्या

नाना

विसोबा खेचर's picture

4 Sep 2008 - 11:06 am | विसोबा खेचर

आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार...!

बोला, गणपतीबाप्पा मोरया........!

अरे लालबागच्या राजाचा............... विजय असो...........

आपला,
(कृतज्ञ) तात्या.